पुस्तकायन

Friday, April 13, 2007

प्रायॉरी स्कूल (१)

शेरलॉक होम्सकडे अनेक अडचणीत सापडलेले लोक धाव घेत असत. त्यामुळे नाट्यमयतेचं आम्हाला वावडं नव्हतं.आमच्या बेकर स्ट्रीटवरच्या घराच्या बैठकीच्या खोलीत बसून आम्ही अनेक नाट्यमय प्रसंग पाहिले. पण मि. थॉर्नीक्राफ्ट हक्स्टेबल आमच्याकडे आले तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी आत येण्याआधी त्यांचं कार्ड आम्हाला पाठवलं होतं. एम्. ए. , पी. एच.ड़ी. वगैरी मोठ्या वजनदार पदव्यांनी त्यावर अशी काही दाटी केली होती की त्या इवल्याश्या कागदाला त्या पदव्यांचं वजन पेलणार नाही असंच मला क्षणभर वाटून गेलं. तेवढ्यात ते स्वतःच आत आले. भक्कम शरीरयष्टी, भरदार उंची आणि स्वाभिमानाने ओतप्रोत भरलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहताच त्यांची विद्वत्ता किती सार्थ आहे हे जाणवत होतं. पण त्यांचं वागणं मात्र या सगळ्याला विसंगतच झालं. आत आल्या आल्या त्यांचे पाय लटपटले आणि तोल जाऊन ते आमच्या अस्वलाच्या कातड्याच्या गालिच्यावर बेशुद्ध होऊन कोसळले.
आम्ही त्यांच्याकडे धावलो. त्यांना कसलातरी धक्का बसला असावा. होम्सने घाईघाईने एक उशी त्यांच्या डोक्याखाली सरकवली . तोवर मी आतून ब्रँडीची बाटली घेऊन आलो. चिंतेने त्यांचा सगळा चेहरा आक्रसला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. तोंड ओघळलं होतं. दाढीचे खुंट वाढलेले होते. केस विस्कटलेले होते. शर्टाच्या आणि कॉलरच्या अवस्थेवरून ते बरेच लांबून आले होते.
"वॉटसन, काय झालंय त्यांना?" होम्सने मला विचारले.
मी त्यांची नाडी पाहिली. ती मंद लागत होती.
"भूक आणि थकव्यामुळे त्यांना गुंगी आली आहे बहुधा"
"उत्तर इंग्लंडमधल्या मॅकलटनचं परतीचं तिकिट आहे हे. अजून बारा वाजायचेत. ते भल्या पहाटेच निघाले असावेत." त्यांच्या घड्याळाच्या खिशातले तिकीट तपासत तो म्हणाला.
त्यांच्या किंचित सुजलेल्या पापण्या थरथरल्या आणि त्यांनी डोळे उघडले. एक क्षणभर शून्यात बघावं तसे ती आमच्याकडे बघत राहिले आणि पुढच्याच क्षणी ते घाईघाईने उठून उभे राहिले. त्यांचा चेहरा शरमेने लाल झाला होता.
" मि. होम्स, मी अशक्तपणाने असा एकदम कोसळलो त्याबद्दल क्षमा करा. तुम्हाला माझ्याबरोबर घेऊनच जायचं अशा निर्धाराने मी इथे आलो आहे. जरा मला एक ग्लासभर दूध आणि एखादं बिस्किट दिलंत तर माझ्या जिवात जीव येईल आणि आपण लगेच निघू शकू. आपलं लगेच तिथे पोहोचणं इतकं गरजेचं आहे की नुसती तार पाठवून ते सांगता आलं नसतं. म्हणून मी स्वतःच आलो."
"तुम्हाला जरा बरं वाटलं की.."
"मी आता बरा आहे. मला कळत नाही की मला असं अचानक झालं काय ...
पण ते सोडा. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आत्ता लगेचच्या गाडीने तुम्ही माझ्याबरोबर मॅकलटनला यावं."
होम्सने मान हलवली.
"सध्या मला अजिबात वेळ नाही. वॉटसनला विचारा हवं तर. एका गुंतागुंतीच्या केसचा निकाल लावायचा आहे. एका केसची कोर्टात तारीख आहे.
तितकंच निकडीचं काम असेल तरच मी इथून बाहेर जायचा विचार करू शकतो. एरवी ते जमणार नाही."
"निकडीचं काम? ड्यूक ऑफ होल्डरनेस यांच्या एकुलत्या एक मुलाला पळवलं गेलंय त्याबद्दल तुमच्या कानावर काहीच आलं नाहीये का?" आपले दोन्ही हात हवेत फेकत ते म्हणाले.
"कोण? आपले माजी कॅबिनेट मंत्री?"
"हो तेच. आम्ही ही बातमी बाहेर फुटू नये म्हणून खूप प्रयत्न केले पण या प्रकाराबद्दलच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. काल रात्रीच्या ग्लोबच्या अंकात तर बातमीही छापून आली आहे. मला वाटलं तुम्ही ती वाचली असेल..."
होम्सने हात लांब करत आपल्या एनसाक्लोपीडियाचा एच लिहिलेला खंड काढला.
"होल्डरनेस, सहावे ड्यूक, के.‍टी.पी.‌ई. ... बापरे ही तर आगगाडीच आहे.बेव्हर्लीचे बॅरन, कार्स्टनचे अर्ल... ही यादी तर न संपणारी आहे. १९०० सालापासून हॉलमशायरचे लॉर्ड ल्युटेनंट, १८८८ मध्ये सर चार्ल्स ऍपलडोर यांच्या कन्या एडिथ यांच्याशी विवाह झाला. एकुलता एक मुलगा आणि त्यांचा वारस लॉर्ड सॉल्टिअर, अंदाजे मालमत्ता अडीच हजार एकर जमीन, लँकेशायर आणि वेल्समधे खाणी. पत्ता : कार्ल्टन हाऊस टेरेस, होल्डरनेस हॉल, हॉलमशायर, कार्स्टन कॅसल, बँगर, वेल्स. ...
बापरे ही बरीच बडी आसामी दिसतेय.अगदी राजदरबारालाही अभिमान वाटावा अशी."
"बड्यात बडी आणि श्रीमंतात श्रीमंत. मि. होम्स, मला माहितेय की तुम्ही कधीच पैशासाठी काम करत नाही. पण तरीही मी हे तुम्हाला सांगतो की लॉर्डसाहेबांनी त्यांच्या मुलाला कोणी पळवलं हे शोधून काढणाऱ्याला पाच हजार पौंडांचं बक्षीस जाहीर केलंय आणि त्यांच्या मुलाला सोडवून आणणाऱ्याला ते वर आणखी हजार पौंड देणार आहेत."
"रक्कम बरीच मोठी आहे. मला वाटतं वॉटसन, आपण डॉक्टरांबरोबर जावं हे बरं...
मि. हक्स्टेबल, तुम्ही हे दूध प्या. थोडेसे ताजेतवाने व्हा आणि मग मला सविस्तर सांगा नक्की काय काय आणि कसं कसं घडलं ते मुख्य म्हणजे मला हे सांगा की तुमचा आणि तुमच्या प्रायॉरी स्कूलचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? आणि तुम्ही आज या घटनेला तीन दिवस उलटून गेल्यावर माझ्याकडे का धाव घेतली आहे?
असे गोंधळून जाऊ नका. तुमच्या गालावर वाढलेल्या दाढीवरून मला कळलं की ही गोष्ट तीन दिवसांपूर्वीच घडून गेलेली आहे."
दूध आणि बिस्किटे पोटात गेल्यावर डॉक्टरांच्या जिवात जीव आला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग पालटला आणि डोळ्यात पुन्हा चमक दिसू लागली. उतावीळपणे घडलेल्या घटनांचा तपशील त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली.
"प्रायॉरी ही माझी शाळा आहे. ती मीच सुरू केली आणि तिचा मुख्याध्यापक म्हणून मी ती चालवतो आहे. आजमितीला इंग्लंडमधल्या शाळांपैकी प्रायॉरी ही सर्वोत्कृष्ट प्राथमिक शाळा आहे. लॉर्ड लिव्हरस्टॉक, अर्ल ऑफ ब्लॅकवॉटर, सर केथकार्ट सोम्ज अशा प्रसिद्ध लोकांनी अत्यंत विश्वासाने आपली मुलं माझ्या हवाली केली आहेत. तीन आठवड्यांपूर्वी लॉर्ड होल्डरनेस यांचे सेक्रेटरी जेम्स विल्डर माझ्याकडे आले आणि ड्यूकसाहेबांचे चिरंजीव लॉर्ड सॉल्टिअर आमच्या शाळेत शिकायला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला खरोखरच अस्मान ठेंगणं झालं होतं. पुढे घडणाऱ्या दुर्दैवी घटनांची तेंव्हा मला मुळीच कल्पना नव्हती. "
"एक मे ला आमच्या उन्हाळी सत्राची सुरुवात होते. त्या दिवशी लॉर्ड सॉल्टिअर पहिल्यांदा आमच्या शाळेत आले. त्या मुलाचं वागणंबोलणं मोठं अदबशीर आणि मोहक होतं. लवकरच आमच्या शाळेच्या वातावरणात तो रुळला. मला लोकांच्या खाजगी भानगडीमध्ये नाक खुपसायला आवडत नाही पण मी हे निश्चितपणे सांगू शकतो की तो त्याच्या घरी फार सुखात नव्हता. ड्यूकसाहेबांचं त्यांच्या बायकोशी पटत नाही ही गोष्ट जगजाहीर आहे आणि या भांडणांचा परिणाम म्हणून ड्यूकसाहेब आणि डचेसबाई परस्परसंमतीने वेगळे राहतात. डचेसबाई आता दक्षिण फ्रान्समध्ये राहतात. या मुलाचा ओढा पहिल्यापासून आपल्या आईकडे होता आणि तो शाळेत येण्याच्या थोडेच दिवस आधी ही घटना घडली. त्यामुळे होल्डरनेस हॉलमधून आपल्या आईचं निघून जाणं त्याला खूप जड गेलं. त्याला आमच्या निवासी शाळेत पाठवण्यामागे हे एक प्रमुख कारण होतं. साधारण एका पंधरवड्यातच तो आमच्याकडे चांगला रुळला आणि आपलं दुःखही विसरायला त्याने सुरुवात केली होती."
"त्याला आम्ही शेवटचं पाहिलं परवाच्या सोमवारी म्हणजे १३ मेच्या रात्री. त्याची खोली दुसऱ्या मजल्यावर एका मोठ्या खोलीच्या एका भागात आहे. बाहेरच्या खोलीत दोन मुलं झोपतात. या दोन्ही मुलांना रात्री काहीही कळलं किंवा ऐकू आलं नाही. त्याच्या खोलीची खिडकी उघडी होती. या खिडकीपासून खाली जमिनीपर्यंत एक आयव्हीचा वेल पसरला आहे. आम्हाला या वेलाजवळ पावलांचे ठसे वगैरे मिळाले नाहीत पण माझ्या मते त्याच्या खोलीतून बाहेर पडायला हाच एक मार्ग होता."
"मंगळवारी सकाळी सातच्या सुमाराला तो त्याच्या खोलीत नाहीये हे आमच्या लक्षात आलं.तो रात्री त्याच्या बिछान्यातच झोपला होता. तशा खुणा होत्या तिथे. बाहेर पडायच्या आधी त्याने त्याचा पूर्ण युनिफॉर्म घातला होता. काळ्या रंगाचं जाकीट आणि करड्या रंगाची फुलपँट असा त्याचा वेष आहे. त्याच्या खोलीत कोणीही आलं नव्हतं. बाहेरच्या खोलीत झोपणाऱ्या मुलांपैकी एका मुलाची झोप बरीच सावध आहे आणि त्याने . कुठल्याही प्रकारच्या झटापटीचे आवाज किंवा मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकलेल्या नाहीत. तसं काही असतं तर त्याच्या ते लगेच लक्षात आलं असतं."
"लॉर्ड सॉल्टिअर नाहीसे झाले आहेत हे मला समजताच मी झाडून सगळ्या मुलांना, शिक्षकांना आणि नोकरचाकरांना बोलावून घेतलं. सगळे जण एकत्र जमल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की गायब झालेल्यांत लॉर्ड सॉल्टिअर एकटेच नव्हते. आमचे जर्मनचे मास्तर मि. हायडेगर यांचाही कुठे पत्ता नव्हता. हायडेगर सरांची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटच्या टोकाला आहे. त्यांची आणि लॉर्डसाहेबांची खोली एकाच बाजूला आहे. त्यांच्याही गादीवर झोपल्याच्या खुणा आहेत. पण ते मध्यरात्री अर्धवट कपडे चढवून कुठेतरी निघून गेले असावेत. त्यांचा शर्ट आणि त्यांचे मोजे जमिनीवर तसेच आहेत. त्यांनी खाली उतरायला आयव्हीच्या वेलाचा दोरासारखा उपयोग केला आहे कारण ते जिथे जमिनीवर उतरले तिथे त्यांचे ठसे आम्हाला सापडले आहेत. तिथे पलिकडेच एका शेडमध्ये त्यांची सायकल उभी केलेली असते. तीही गायब आहे. "
"हायडेगर गेल्या दोन वर्षांपासून आमच्या शाळेत आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणाहून त्यांच्याबद्दल खूपच प्रशंसा कानी आली होती. पण त्यांचा स्वभाव जरासा एकलकोंडा आणि फार मोकळा नव्हता. मुलं किंवा इतर शिक्षकामध्येही ते फार मिसळत नसत. आज गुरुवार. या दोघांचा अजूनही काहीच पत्ता लागला नाहीये.
आमची शाळा होल्डरनेस हॉलापासून जवळच आहे. अचानक घरची आठवण येऊन लॉर्डसाहेब घरी तर गेले नाहीत ना अशी शंका आल्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्यांच्या घरी होल्डरनेस हॉलामध्येच चौकशी केली.पण ड्यूकसाहेबांना झाल्या गोष्टीचा काहीच पत्ता नव्हता. ही बातमी कळल्यापासून ड्यूकसाहेब फारच काळजीत आहेत. काळजीच्या ओझ्यामुळे माझी स्वतःची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्षच पाहिले आहे. मि. होम्स, माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पूर्ण शक्तीनिशी या केसमध्ये लक्ष घालावे."
खरोखरच होम्स आतापर्यंत अत्यंत लक्षपूर्वक ही सगळी कहाणी ऐकत होता. त्याच्या कपाळाला इतक्या आठ्या पडल्या होत्या की त्याच्या दोन्ही भुवया जवळजवळ चिकटल्यासारख्या झाल्या होत्या. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं, की या केसमध्ये आपली सगळी शक्ती ओतण्यासाठी त्याला कोणाच्या विनंतीची गरज नव्हती. ही केस निश्चितच त्याच्या मेंदूला आवडता खुराक देणारी होती. त्याने शेजारच्या नोंदवहीत एक दोन गोष्टी लिहून ठेवल्या.
"तुम्ही यापूर्वीच माझ्याकडे न येऊन मोठी चूक केली आहे. घडल्या प्रकाराला इतका वेळ उलटून गेल्यावर त्याचा छडा लावायचा म्हणजे यशाची शक्यता पुष्कळ प्रमाणात कमी होते. तुम्ही माझे हात बांधूनच ठेवलेत म्हणा ना. उदाहरणच द्यायचं झालं तर त्या आयव्हीच्या वेलाजवळ आणि त्याशेजारच्या गवतात कुठल्याच प्रकारचे ठसे सापडले नाहीत हे कसं काय शक्य आहे?"
"यात माझा काही दोष नाही हो. सरसाहेबांना ही गोष्ट बाहेर फुटल्यावर उद्भवणाऱ्या गोंधळाची आणि त्याच्या इतर परिणामांची अतिशय भिती वाटते आहे. "
"पण या प्रकाराचा अधिकृत तपास तर झालाच असणार"
"हो झाला आहे आणि त्यातून निघालेले निष्कर्ष अतिशय निराशाजनक आहेत. आम्हाला मिळालेला सगळ्यात मोठा क्लू हा होता की शेजारच्या गावातल्या स्टेशनवरून एक लहान मुलगा आणि एक तरुण रात्रीच्या गाडीने निघून गेल्याचं कळलं. त्या दोघांचा तपास केल्यावर ते लिव्हरपूलमधे सापडले पण त्यांना या प्रकारातलं काहीच माहीत नाही असं कळलं. त्यानंतर रात्रभर मला झोप लागली नाही आणि मग मात्र पहाटेच मी तुमच्याकडे धाव घेतली. "
"मला वाटतं या दुक्कलीच्या मागे लागण्याच्या नादात तिथल्या परिसराची पाहणी लांबणीवर टाकण्यात आली असणार."
"लांबणीवर वगैरे नाही टाकली... पूर्णपणे सोडून दिली."
"आणि या सगळ्यात तीन दिवस वाया घालवले. ही गोष्ट भलत्याच निष्काळजीपणाने आणि बेजबाबदारपणे हाताळली गेली आहे."
"कबूल आहे"
"ठीक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. हे प्रकरण उलगडता येऊ शकेल. मला एक सांगा त्या मुलाच्यात आणि त्या जर्मनच्या मास्तरांमध्ये काही संपर्क होता का?"
"काहीच नाही. "
"हा मुलगा त्यांच्या वर्गात होता का?"
"नाही. आजपर्यंत ते दोघं एकमेकांशी एक शब्दही बोललेले मला आठवत नाहीत "
"ही गोष्ट महत्वाची आहे. त्या मुलाकडे सायकल होती का?"
"नाही"
"दुसऱ्या कोणाची सायकल हरवली आहे का?"
"नाही"
"तुमची तशी खात्री आहे?"
"हो आहे"
"याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय का की जर्मनचे मास्तर ऐन मध्यरात्री त्या मुलाला कडेवर घेऊन आपल्या सायकलवरून पळून गेले?"
"नाही हो.."
"मग तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल?"
"ती सायकल लोकांना फसवण्यासाठी असेल. ती रानात कुठेतरी लपवून ते
दोघे पायी गेले असतील."
"हम्म. पण ही गोष्ट जरा मूर्खपणाचीच वाटते नाही का? तिथे शेडमध्ये आणखी
किती सायकली होत्या?"
"बऱ्याच"
" मग त्यांना लोकांची दिशाभूलच जर करायची असती तर त्यांनी दोन सायकली नसत्या का लपवून ठेवल्या?"
"हो खरंय तुम्ही म्हणता ते."
"खरंच आहे ते. सायकल दिशाभूल करायला वापरली होती हा तर्क साफ चुकीचा आहे. पण तपासाला सुरुवात करायला हा मुद्दा चांगला आहे. सायकल नष्ट करणं किंवा दडवणं ही काही फारशी सोपी गोष्ट नाही. अजून एक. तो मुलगा नाहीसा होण्याआधी त्याला भेटायला कोणी आलं होतं का?"
"नाही."
"त्याला एखादं पत्र वगैरे आलं होतं का?"
"हो एक पत्र आलं होतं."
"ते पत्र कोणी पाठवलं होतं?"
"त्याच्या वडिलांनी"
"मुलांना आलेली पत्रं तुम्ही उघडून पाहता का?"
"नाही"
"मग ते पत्र त्याच्या वडिलांनी पाठवलंय हे तुम्हाला कसं कळलं?"
"त्या पाकिटावर ड्यूकसाहेबांचा शिक्का होता आणि त्याच्यावरचा पत्ताही त्यांच्याच हस्ताक्षरात होता. शिवाय ड्यूकसाहेबांनीच ते पत्र लिहिलं होतं हे त्यांनीही मान्य केलं आहे."
"यापूर्वी त्याला कधी पत्रं आली होती का?"
"नाही. बरेच दिवस त्याला कुठलं पत्र वगैरे आलं नव्हतं."
"त्याला फ्रान्समधून कधी पत्र आलं होतं का?"
"नाही. कधीच नाही."
"मी हा प्रश्न का विचारला हे तुमच्या लक्षात आलंच असेल. एकतर त्या मुलाला कोणीतरी जबरदस्तीने पळवून नेलं किंवा तो आपल्या स्वतःच्या इच्छेने पळाला. जर तो आपणहून पळाला असेल तर त्याला बाहेरून कोणीतरी तसं सुचवलं होतं कारण इतका लहान मुलगा आपणहून असं करेल ही गोष्ट जरा अवघड वाटते. आता जर त्याला भेटायला कोणी आलं नसेल तर त्याला ही सूचना पत्रातूनच मिळू शकते. म्हणूनच त्याला पत्र लिहिणारी व्यक्ती कोण हे जाणून घेण्याची माझी धडपड आहे."
"दुर्दैवाने या बाबतीत मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवर त्या मुलाला फक्त त्याच्या वडिलांकडूनच पत्र येत असत."
"तो नाहीसा झाला त्या दिवशीही त्याच्या वडिलांनीच त्याला पत्र लिहिलं होतं. वडील-मुलाचे संबंध कसे होते? मैत्रीचे होते की कसे?"
"ड्यूकसाहेबांना इतर कोणाशी इतक्या ममतेने आणि प्रेमाने वागताना मी तरी पाहिलेलं नाही. त्यांच्यावर अनेक लहानमोठ्या सार्वजनिक आणि खाजगी जबाबदाऱ्या असतात पण या सगळ्यातून ते आपल्या मुलासाठी नेहमीच वेळ काढतात."
"पण त्या मुलाचा ओढा त्याच्या आईकडे जास्त आहे?"
"हो"
"तो कधी तसं म्हणाला का"
"नाही"
"मग ड्यूकसाहेब म्हणाले का?"
"छे छे. कधीच नाही"
"मग हे तुम्हाला कसं माहीत?"
"ड्यूकसाहेबांचे सेक्रेटरी मि. जेम्स विल्डर यांच्याशी मी बोललो आहे. त्यांनीच मला लॉर्ड सॉल्टिअर यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं."
"हम्म. अरे हो! त्या मुलाच्या खोलीत ड्यूकसाहेबांनी पाठवलेलं ते पत्र सापडलं का?"
"नाही. बहुतेक त्याने ते बरोबर नेलं असावं. मि. होम्स वेळ झाली आहे. आपल्याला आता निघायला हवं."
"मी एक टॅक्सी बोलावतो. साधारण पाव घटकेत आपण निघू. अजून एक. तुम्ही जर घरी तार करणार असाल तर तिथल्या लोकांचा असाच समज राहू देणं बरं की अजूनही तपास लिव्हरपूललाच सुरू आहे किंवा सध्या जी काही स्थिती असेल ती तशीच राहील असं बघा. मला तिथे येऊन गुपचूप काही गोष्टी तपासायच्या आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे तो माग अजून इतका शिळा झाला नसावा की वॉटसन आणि मी अशा दोन जुन्या शिकारी कुत्र्यांना तो शोधून काढता येऊ नये."

--अदिती

Labels: ,

प्रायॉरी स्कूल (२)

त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मि. हक्स्टेबल यांच्या प्रसिद्ध शाळेत येऊन पोहोचलो. आम्ही पोहोचेपर्यंत चांगला अंधार पडला होता. तिथल्या बटलरने मालकाला पाहून एक कार्ड त्यांच्या हातात दिलं आणि त्यांच्या कानात तो काहीतरी कुजबुजला. मि. हक्स्टेबल जरासे गोंधळलेले आणि वैतागलेले दिसले. आमच्याकडे वळून ते म्हणाले "ड्यूकसाहेब आलेयत. ते आणि त्यांचे सेक्रेटरी वर आहेत. चला मी तुमची ओळख करून देतो."
ड्यूकसाहेब बरेच प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांचा चेहरा मला चांगलाच ओळखीचा होता. पण प्रत्यक्षात ते त्यांच्या छायाचित्रांपेक्षा वेगळेच दिसत होते. ते उंच होते. त्यांचे कपडे निष्काळजीपणाने आणि घाईघाईने चढवल्यासारखे दिसत होते. त्यांचा चेहरा काळजीने ओढलेला होता. नाक मात्र एखाद्या पोपटाच्या चोचीप्रमाणे बाकदार आणि मोठं होतं. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि वाढलेल्या लाल दाढीमुळे त्याचा फिकटपणा अधोरेखित होत होता. त्यांनी शुभ्र पांढरा कोट घातला होता. आणि त्याच्या बटणपट्टीतून त्यांच्या घड्याळाची साखळी चमकत होती. ते आमच्याकडेच रोखून पहात होते. त्यांच्या शेजारीच एक तरुण मुलगा उभा होता. चणीने लहानसा, किंचित बावचळलेला, निळ्या डोळ्यांचा आणि अगदी पारदर्शक भाव असलेल्या चेहऱ्याच तो मुलगा म्हणजेच त्यांचा सेक्रेटरी मि. विल्डर असणार हे मी ओळखलं. त्यानेच पुढे होत आमच्याशी बोलायला सुरुवात केली.
"मि. हक्स्टेबल, तुम्हाला लंडनला जाऊ नका असा निरोप द्यायला आज सकाळी मी येऊन गेलो पण मला यायला उशीर झाला. तुम्ही लंडनला जाऊन मि. शेरलॉक होम्स यांना बोलावणार होतात असं मला कळलं. ड्यूकसाहेबांना कुठलीही पूर्वकल्पना न देता तुम्ही असं काही करावं हे त्यांना मुळीच आवडलेलं नाही"
"पोलिसांना काहीच यश येत नाहीये हे पाहून मी "
"पोलिसांना काहीच सापडलं नाहीये असं ड्यूकसाहेबांना मुळीच वाटत नाही."
"पण मि. विल्डर..."
"मि. हक्स्टेबल तुम्ही हे विसरू नका की या गोष्टीबद्दल कुणालाही कळू नये अशी ड्यूकसाहेबांची इच्छा आहे."
"झालेल्या चुकीची दुरुस्ती करणं सहज शक्य आहे. मि. शेरलॉक होम्स उद्या सकाळच्या गाडीने लंडनला परत जाऊ शकतात."
"तसं होणार नाही डॉ. हक्स्टेबल. ही उत्तरेकडची हवा मोठी छान आहे.. मी इथे काही दिवस राहीन म्हणतो.तुमच्याकडच्या जंगलामध्ये मला काही गोष्टी तपासायच्या आहेत आणि तुम्ही मला तुमच्याकडे राहायला जागा दिलीत किंवा नाही दिलीत तरी मी हे काम करणारच.. त्यामुळे मी इथे राहावं की गावातल्या खानावळीत हे तुम्हीच ठरवायचं आहे" होम्स म्हणाला.
बिचाऱ्या डॉक्टरांची अवस्था अगदीच दयनीय झाली होती.त्यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं. यातून त्यांची सुटका केली ती ड्यूकसाहेबांनी. त्यांचा खर्जातला आवाज तिथे एखाद्या ढालीसारखा घुमत होता.
"मि. विल्डर म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही असं काही करण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोलायला हवं होतंत पण आता मि. शेरलॉक होम्सना तुम्ही विश्वासात घेतलंच आहे तर त्यांची मदत न घेणं हे मूर्खपणाचं ठरेल. मि. होम्स, खानावळीत राहण्यापेक्षा तुम्ही माझ्याबरोबर होल्डरनेस हॉलमधेच का राहात नाही?"
"मी तुमचा आभारी आहे सर, पण सध्या तपासाच्या दृष्टीने मी इथे राहणंच जास्त योग्य आहे."
"ठीक आहे. जशी तुमची इच्छा. अर्थातच विल्डर आणि मी तुम्हाला कुठलीही माहिती द्यायला आणि मदत करायला केंव्हाही तयार आहोत."
"मला तुमच्या घरी एकदा यावं लागेल असं वाटतंय. तूर्तास मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या मुलाच्या रहस्यमय अदृश्य होण्यामागे काय कारण असू शकेल याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?"
"मला काहीच सांगता येणार नाही."
"मला याची कल्पना आहे की माझ्या काही प्रश्नांमुळे तुम्हाला त्रास होणार आहे पण अगदी नाईलाज झाल्यानेच मी हे प्रश्न विचारतो आहे.
तुम्हाला असं वाटतं का की डचेसबाईंचा यात काही हात असेल म्हणून?"
उत्तर देण्यापूर्वी ते बरेच अडखळले. बऱ्याच विचारानंतर त्यांनी उत्तर दिलं
"नाही तसं असेल असं मला वाटत नाही."
"दुसरी शक्यता अशी आहे की तुमच्या मुलाच्या बदल्यात खंडणी म्हणून पैसे उकळण्याच्या दृष्टीने त्याला पळवण्यात आलं असावं. तुमच्याकडे अशी काही मागणी करण्यात आली आहे का?"
"नाही"
"अजून एक प्रश्न. तुमचा मुलगा नाहीसा झाला त्या दिवशी तुम्ही त्याला एक पत्र लिहिलं होतंत ना?"
"नाही त्याच्या आधल्या दिवशी लिहिलं होतं."
"बरोब्बर. पण त्याला ते त्याच दिवशी मिळालं?"
"हो"
"तुमच्या पत्रात असा काही मजकूर होता का की ज्यामुळे तुमचा मुलगा बावचळून जाईल आणि असं काही करेल?"
"नाही अजिबात नाही."
"ते पत्र तुम्ही स्वतःच पेटीत टाकलं होतं का?"
यावर सरसाहेब काही बोलणार तोच त्यांचा सेक्रेटरी रागाने म्हणाला
"सर त्यांची पत्रं स्वतः कधीच पेटीत टाकत नाहीत. हे पत्र इतर पत्रांसोबतच त्यांच्या टेबलावर ठेवलेलं होतं. मी स्वतः ते नेऊन टाकलं."
"तुमची अशी खात्री आहे का की ते पत्र इतर पत्रांसोबत होतं?"
"हो "
"सर तुम्ही त्या दिवशी एकूण किती पत्रं लिहिलीत?"
"वीस किंवा तीस असतील. माझा पत्रव्यवहार बराच मोठा आहे. पण या प्रश्नाचा काय संबंध आहे या सगळ्याशी?"
"नक्कीच आहे "
"माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी पोलिसांना यापूर्वीच दक्षिण फ्रान्समधे शोध घ्यायला सांगितलं आहे. जरी मला असं वाटत नसलं की डचेसबाई असं काही करतील तरी त्या मुलाच्या डोक्यात भलत्या कल्पना आहेत. या जर्मन मास्तरांच्या मदतीने तो आपल्या आईकडे पळून गेला असण्याची शक्यता आहे.डॉ. हक्स्टेबल, मला वाटतं आता आम्ही निघावं हे उत्तम"
होम्सला त्यांना अजून बरेच प्रश्न विचारायचे असणार. पण त्यांचा चेहऱ्यावरून असं दिसत होतं की एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीने त्यांच्या खाजगी गोष्टींबद्दल उघडपणे प्रश्न विचारावेत हे त्यांना फारसं पसंत पडलं नसावं. शिवाय प्रत्येक प्रश्नाबरोबर त्यांच्या दुर्दैवी आणि दुःखमय खाजगी आयुष्याची अधिकाधिक लक्तरं चव्हाट्यावर येत आहेत असं त्यांना वाटणं साहजिक होतं.
ड्यूकसाहेब आणि त्यांचे सेक्रेटरी तिथून बाहेर पडल्यावर होम्सने त्याच्या नेहमीच्या उत्साहाने झाल्या प्रकाराच्या चौकशीला सुरुवात केली. त्या मुलाची खोली आम्ही नीट तपासली. त्यात काहीच सापडलं नाही पण एवढं मात्र निश्चित झालं की तो खिडकीवाटेच बाहेर पडला होता. जर्मनच्या मास्तरांच्या खोलीतही काहीच सापडलं नाही. त्यांच्या वजनामुळे आयव्हीच्या वेलाचा एक तुकडा तुटून पडला होता. एका कंदिलाच्या प्रकाशात त्याने दोन्ही टाचा जमिनीला टेकवल्यामुळे उमटलेली खूण आम्हाला दिसली. मऊ हिरवळीतला तो ठसा सोडल्यास रात्रीच्या त्या अगम्य आणि रहस्यमय पलायनाचा इतर कोणताही पुरावा तिथे नव्हता.
त्यानंतर होम्स एकटाच बाहेर गेला आणि अकरानंतर परत आला. त्याने आपल्याबरोबर त्या परिसराचा एक नकाशा आणला होता. पलंगावर नीट बसत त्याने तो आपल्या मांडीवर ठेवला आणि दिवा त्याच्यावर नीट धरून त्याने हळूहळू त्यातल्या आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवर आपल्या पाईपच्या लाल टोकाने खुणा करायला सुरुवात केली.
"ही केस मला माझ्यावर कुरघोडी करताना दिसतेय. तरीपण काही मुद्दे असे आहेत जे फारच महत्त्वाचे आहेत. वॉटसन, माझी अशी इच्छा आहे की सुरुवातीलाच या प्रदेशाची भौगोलिक रचना तू नीट समजावून घ्यावीस.कारण त्याचा आपल्या कामाशी संबंध आहे"
" आता नीट बघ. हा काळा चौकोन म्हणजे ही शाळा आहे. मी इथे एक पिन लावतो. हा इथे हमरस्ता आहे. हा शाळेशेजारून पूर्व-पश्चिम जातो. तुझ्या हेही लक्षात आलं असेल की शाळेजवळ एक मैलाच्या परिसरात दुसरा कुठलाही लहान रस्ता नाही. म्हणजेच हे दोघे जर कुठल्या रस्त्याने गेले असतील तर तो रस्ता हाच असला पाहिजे."
"बरोबर."
"दैवाची कृपा आहे आपल्यावर. त्या रात्री या रस्त्यावरून नक्की कोण कोण गेलं हे आपण तपासून पाहू शकतो. या इथे एक पोलीस रात्री बारा ते पहाटे सहा पहाऱ्यावर उभा होता. तुझ्या हे लक्षात आलंच असेल की पूर्वेकडे हमरस्त्याला छेदणारा हा पहिला रस्ता आहे. या पोलिसाशी मी बोललो. तो म्हणाला की तो एकही क्षण आपल्या जागेपासून हालला नाही आणि कुठलाही मुलगा किंवा तरुण त्याचा डोळा चुकवून तिथून जाऊ शकला नसता. मला तरी त्याच्या एकंदर वागण्याबोलण्यावरून तो पुरेसा विश्वासार्ह वाटला. त्यामुळे ही बाजू पक्की झाली. आता या दुसऱ्या बाजूला वळू. इथे एक रेड बुल नावाची सराई आहे.तिथली मालकीण आजारी होती आणि तिथली लोकं रात्रभर डॉक्टरांची वाट पहात जागी होती. डॉक्टर दुसऱ्या केसमधे अडकले असल्यामुळे सकाळपर्यंत येऊ शकले नाहीत. सराईतल्या लोकांपैकी कोणी ना कोणी रात्रभर रस्त्यावर लक्ष ठेवून होतं त्यांचं म्हणणं आहे की त्या रस्त्यावरून कोणीही गेलं नाही. जर ते खरं बोलत असतील तर आपली पश्चिम बाजूही पक्की होते आणि आपण अशा निष्कर्षाला येतो की आपली दुक्कल या रस्त्यावरून गेलीच नाही."
"पण ती सायकल. तिचं काय?" मी मध्येच मुद्दा काढला.
"बरोबर बोललास. आता आपण सायकलकडे वळू. आपला मघाचाच तर्क पुढे नेत आपण असं म्हणू शकतो की हे दोघंजण शाळेच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेले असणार. आता आपण या दोन शक्यतांचा विचार करू या. शाळेच्या दक्षिणेला बरीच मोठी शेतजमीन आहे जी दगडांच्या भिंती घालून तुकड्याम्मधे विभागण्यात आली आहे. सायकल घेऊन इथून जाणं अशक्य आहे हे मान्य करायलाच हवं. त्यामुळे आपण दक्षिण दिशा सोडून देऊ आणि उत्तरेकडे वळू. इथे एक दाट झाडीचा पट्टा आहे ज्याला रॅग्ड शॉ असं नाव आहे. त्याच्या एका बाजूला एक मोठा डोंगर आहे. त्याला लोअर जिल मूर म्हणतात. तो सुमारे दहा मैल पसरलेला आहे आणि वर वर चढत गेलेला आहे. इथेच या निर्जन भागाच्या एका बाजूला आहे होल्डरनेस हॉल. रस्त्याने गेलं तर दहा मैल आणि डोंगरावरून गेलं तर फक्त सहा मैल लागतात तिथे जायला. काही शेतकऱ्यांच्या झोपड्या सोडल्या तर इथे दुसरं काही नाही. या झोपड्यांमधे मुख्यतः त्याची दुभती जनावरं असतात. हा अपवाद सोडल्यास जंगली प्राण्यांशिवाय इतर कोणीच इथे रहात नाही. पार चेस्टरफिल्ड पर्यंत हीच परिस्थिती आहे. चेस्टरफिल्डला मात्र एक चर्च आहे, काही झोपड्या आहेत आणि एक सराई आहे. त्यानंतर डोंगर आणखी उंच उंच होत जातात. त्यामुळे या उत्तरेकडच्या भागातच आपल्याला शोध घ्यायला हवा. "
"अरे पण ती सायकल?" मी माझा मुद्दा लावून धरला.
"अरे हो हो" होम्स जरासा अधीरेपणाने म्हणाला. " एका चांगल्या सायकलस्वाराला उत्तम प्रतीचा रस्ताच लागतो असं नाही. डोंगरावर एकमेकांत गुंतलेल्या पायवाटा आहेत आणि त्या दिवशी पौर्णिमा होती.
अरेच्या! हे कोण आलं आता?"
तेवढ्यात आमच्या दारावर टकटक झाली आणि पुढच्याच क्षणी डॉक्टर हक्स्टेबल आत आले. त्यांच्या हातात एक निळी टोपी होती.
"शेवटी आपल्याला माग सापडला. ही त्या मुलाची टोपी आहे."
"ही कुठे सापडली?"
डोंगरावर मंगळवारी रात्री काही जिप्सी लोक वस्ती करून राहिले होते. पोलिसांनी आज त्यांच्या गाडीची तपासणी केली. त्यात ही सापडली."
"याचं त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?"
"ते असं खोटंच सांगतायत की त्यांना मंगळवारी सकाळी ही डोंगराजवळ सापडली. त्या हरामखोरांना माहितेय त्या मुलाचा ठावठिकाणा. त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायद्याचा बडगा किंवा ड्यूकसाहेबांचा खजिना यांपैकी एक गोष्ट नक्कीच त्यांचं तोंड उघडेल."
"जे होतं ते चांगल्यासाठीच . आता हे तर नक्की झालं की लोअर जिल मूरजवळच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत." डॉक्टर बाहेर पडल्यावर होम्स समाधानाने म्हणाला.
"जिप्सींना पकडणं सोडून पोलिसांनी या भागात खरंच काहीही केलेलं नाही. हा बघ वॉटसन, डोंगरावरून येणारा एक प्रवाह इथे नकाश्यात दाखवला आहे. दिसतोय? काही काही ठिकाणे तो एखाद्या ओढ्याइतका रुंद होतो आहे. विशेषतः होल्डरनेस हॉल आणि शाळा यांच्यादरम्यानच्या भागात. सध्याच्या कोरड्या हवेत आपल्या ठसे सापडणं अशक्य आहे पण या प्रवाहाच्या आजूबाजूला ते निश्चितपणे सापडतील. मी तुला उद्या सकाळी लौकर उठवीन. आपण दोघं पाहू या हे रहस्य उलगडतंय का ते."


--अदिती

Labels: ,

प्रायॉरी स्कूल (३)

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेंव्हा नुकतंच फटफटू लागलं होतं. आणि होम्स पूर्णपणे तयार होऊन माझ्या पलंगाशेजारी उभा होता. आणि एव्हाना त्याची काही तपासणी करूनही झाली होती.
"गवताची आणि सायकल शेडची तपासणी मी उरकली आहे. रॅग्ड शॉमधेही मी एक चक्कर टाकून आलो. आता लौकर आटप वॉटसन. शेजारच्या खोलीत गरम कोको ठेवलाय तो घे आणि चल. आपल्याला आज इकडचं जग तिकडे करायचं आहे.
त्याचे डोळे चमकत होते आणि गाल लालेलाल झाले होते. त्याच्यापुढे वाढून ठेवलेल्या कामाच्या अफाट पसाऱ्याचा निरानिपटा करायच्या कल्पनेनेच तो झपाटल्यासारखा झाला होता. एक क्षणभर मला वाटून गेलं की बेकर स्ट्रीटवरच्या आपल्याच विचारांत बुडालेल्या आळशी आणि झोपाळू प्राण्याशी या आजच्या उत्साही आणि तयारीत उभ्या असलेल्या माणसाचं खरंच काही साम्य असू शकेल का?
खरोखरच तो दिवस खूप उलटसुलट घडामोडींनी भरलेला होता. पण त्याची सुरुवात अगदी निराशाजनक रितीने झाली. मोठ्या उत्साहाने आम्ही डोंगरावरचे मेंढ्यांच्या पावलांमुळे पडलेले रस्ते विंचरत होल्डरनेस हॉलजवळच्या त्या ओढ्याजवळ येऊन पोहोचलो. जर तो मुलगा घरी गेला असेल तर त्याच्या पावलांचे ठसे इथल्या ओलसर जमिनीवर उमटायलाच हवे होते. पण तो मुलगा आणि जर्मनचे मास्तर कधी इथून गेले होते असं काहीही चिन्ह तिथे नव्हतं. होम्स बिचारा उतरलेल्या चेहऱ्याने जमिनीवरचा प्रत्येक ठसा काळजीपूर्वक तपासून पहात पुढे चालला होता. आत्तापर्यंत आम्हाला फक्त शेळ्या-मेंढ्यांचे ठसे सापडले होते. आणि थोड्या वेळापूर्वी गायीच्या खुरांचा एक माग दिसला होता. याशिवाय इतर काहीच नाही.
वाढत चाललेल्या डोंगराळ जमिनीकडे पाहून होम्स म्हणाला "लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे इथून थोडंसं पुढे गेल्यावर अजून एक ओलसर पट्टा आहे. अरे पण हे काय आहे? अरेच्या! अरे बापरे!! हे बघ काय आहे..."
आम्ही एका अरुंद पायवाटेने चाललो होतो आणि तिच्या बरोबर मध्यावर एका सायकलीच्या चाकाचा स्पष्ट असा ठसा होता.
"वा! शेवटी सापडला आपल्याला" मी म्हणालो.
पण होम्सने मान हलवली. त्याच्या गोंधळलेले भाव होते.
"ठसा सायकलीचाच आहे हे नक्की. आपल्याला हवी आहे ती सायकल ही नव्हे. तिच्या चाकांचा ठसा मी चांगला ओळखतो. हे चाक डनलॉप कंपनीचं आहे आणि जर्मनच्या मास्तरांच्या सायकलीचं चाक पाल्मर कंपनीचं आहे. त्याच्या खुणा लाटांसारख्या असतात. गणिताच्या मास्तरांनीच मला हे सांगितलं. त्यामुळे हा माग हायडेगरांचा नाही "
"मग त्या मुलाचा असेल.." मी म्हणालो.
"जर त्याच्याकडे एक सायकल असेल आणि आपण ते गोष्ट सिद्ध करू शकलो तर असं म्हणता येईल. हा माग अशा माणसाचा असावा जो शाळेतून बाहेर चालला असावा"
"किंवा शाळेकडे जात असावा " मी.
"नाही वॉटसन. तू जर नीट लक्षपूर्वक पाहिलंस तर तुझ्या लक्षात येईल की
मागच्या चाकावर तुलनेने अधिक भार असल्यामुळे मागच्या चाकाचा ठसा जास्त खोलवर उमटला आहे. आणि तुला असंही दिसेल की अनेक ठिकाणी पुढच्या चाकाच्या वरवरच्या ठशावरून मागच्या चाकाचा ठसा उमटला आहे. आणि तो खात्रीने शाळेच्या विरुद्ध दिशेला चालला आहे. याचा आपल्या केसशी संबंध आहे की नाही मला माहीत नाही पण इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापूर्वी हा माग कुठे जातो आहे ते मी पाहणार आहे. "
आम्ही त्या मागावर चालू लागलो. काहीशे यार्ड्स गेल्यावर अचानक ओलसर जमीन संपली आणि त्याबरोबरच आमचा मागही संपला. मग आम्ही मागे वळलो आणि त्याच मागावरून परत चालायला सुरुवात केली. शेजारून वाहणाऱ्या झऱ्याजवळ आम्हाला अजून एक माग सापडला. गायींच्या खुरांमुळे तो जवळजवळ दिसेनासा झाला होता. अगदी पुसट असला तरी तो थेट रॅग्ड शॉकडे जात होता. रॅग्ड शॉशेजारच्या जंगलातून तो बाहेर आला असणार. होम्सने तिथेच एका दगडावर बसकण मारली आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत हनुवटी ठेवून तो विचारात गढून गेला. तो आपल्या समाधीतून बाहेर आला तोवर माझ्या दोन सिगारेट्स संपल्या होत्या.
"एखादा धूर्त माणूस आपल्या सायकलचे टायर्स बदलू शकतो. अशा माणसाशी हा खेळ खेळायला खरंच मजा येईल. आता आपण मघाशी अर्धवट सोडलेली पहाणी पूर्ण करू या."
पुन्हा एकदा आम्ही त्या पाणथळ भागाची शास्त्रशुद्ध तपासणी सुरू केली. आणि आमच्या कष्टाचं चांगलं फळ आम्हाला मिळालं. त्या वाटेवर एक माग होता.
एखादं तारांचं भेंडोळं जमिनीवरून फिरवत नेलं तर उमटेल तशी सुबक नक्षी असलेला तो माग पाहून होम्सने आनंदाने एकदम उडीच मारली. तो पाल्मर टायरचा माग होता.
"हे बघ. हेर हायडेगर. शंकाच नाही . वॉटसन, माझा अंदाज खरा ठरला" त्याची उत्सुकता लपत नव्हती.
"वा रे पठ्ठे!"
"पण अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचाय. शक्यतोवर या ठशावर पाय पडणार नाही याची काळजी घे आणि असा कडेकडेने चालत रहा. हा माग फार लांबवर जायचा नाही असं का कोण जाणे पण मला वाटतंय."
तिथल्या उंचसखल भागात मऊ माती आणि कठीण खडक यांची रेलचेल होती. त्यामुळे मधूनमधून तो माग अदृश्य होत होता पण काही अंतरावर तो आम्हाला पुन्हा सापडायचा."
"वॉटसन, नीट बघ. या मागावरून असं दिसतंय की हायडेगर जीव खाऊन सायकल मारत होते. वेगाने जाण्याच्या प्रयत्नात होते. हे इथे बघ. इथे दोन्ही चाकांचे ठसे सारखेच स्पष्ट आणि खोलवर गेलेले आहेत. याचा अर्थ अस की सायकलस्वार तिच्या हँडलवर भार देतो आहे. याचाच अर्थ तो वेगाने चालला आहे. अरेच्या ते धडपडले आहेत."
मातीवर काही अंतर फिसकटलेल्या - फरफटलेल्या खुणांचा एक रुंद पट्टा होता. मग काही पावलांचे ठसे होते आणि त्यानंतर परत ती टायरची रांगोळी सुरू झाली होती.
"कडेला तोल गेला असेल का?" मी विचारलं.
होम्सने शेजारच्या एका मोठ्या पिवळ्या फुलांच्या वेलीची एक फांदी उचलली. त्या फुलाच्या पिवळ्या पाकळ्यांवर मोठे मोठे लाल चट्टे होते आणि खाली जमिनीवरही ठिकठिकाणी साकळलेलं रक्त दिसत होतं.
("हे काही फारसं चांगलं दिसत नाही.")
हे काही चांगलं लक्षण नाही. वॉटसन, लक्ष देऊन चाल बरं का . इथे काय काय आहे? ते जखमी अवस्थेत खाली कोसळले आणि परत उभे राहिले. त्यांनी सायकलीवर टांग टाकली आणि पुढे जायला सुरुवात केली. पण इथे त्यांच्याशिवाय दुसरा माग नाही. त्यांच्या शेजारी एक खुरांचा माग आहे पण एखाद्या बैलाने त्यांना जखमी केलं नाही हे निश्चित. पण मला दुसऱ्या कोणाचं काही चिन्ह पण दिसत नाही. ठीक आहे आपण पुढे जाऊया. आता हा चाकांचा माग आणि रक्ताचे डाग पाहता ते आपल्याला गुंगारा देऊ शकणार नाहीत. "पण आम्हाला फार पुढे जावं लागलंच नाही. ओल्या चिखलमय जमिनीवर चाकांच्या खुणांची गोल गुंडाळी झाली होती. थोडंसं पुढे दाट झुडुपांमधे काहीतरी धातूची वस्तू चकाकत होती. आम्हाला तिथे पाल्मर टायर्स असलेली एक सायकल सापडली. तिचं एक पेडल वाकलं होतं आणि पुढचा भाग रक्ताने रडबडला होता. झुडुपांच्या दुसऱ्या बाजूकडून एक बूट बाहेर आला होता. आम्ही धावतच त्या बाजूला गेलो. तिथे त्या सायकलचा दुर्दैवी स्वार अस्ताव्यस्त पडला होता. कोणीतरी त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला होता. तो प्रहार इतका जोराचा होता की त्यांच्या डोक्याची शकलं झाली होती आणि त्यामुळेच त्यांचा तात्काळ अंत झाला होता. त्या प्रहारामागे लावण्यात आलेली शक्ती हल्लेखोराचा खुनशीपणा उघडपणे सांगत होती. पण त्याचबरोबर त्या माणसाच्या धाडसाचीही प्रचिती येत होती. त्यांच्या पायात नुसतेच बूट.होते मोजे नव्हते. त्यांचा कोट छातीवर फाटला होता आणि त्यातून आतला रात्री झोपताना घालायचा शर्ट दिसत होता. ते हायडेगरच होते यात काही शंकाच नव्हती. होम्सने त्यांच्या पालथ्या देहाला सरळ केलं आणि गंभीर चेहऱ्याने त्याची तपासणी केली. मग तो तिथेच एक दगडावर बसून बराच वेळ विचार करत राहिला. त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून मला वाटलं की जे काही आम्हाला सापडलं ते धक्कादायक असलं तरी आमच्या शोधमोहिमेसाठी फारसं उपकारक नसावं.
"वॉटसन, या परिस्थितीत काय करावं हे कळत नाहीये. मला वाटतंय की अगोदरच इतका वेळ वाया गेला आहे की आपण आपला शोध तसाच चालू ठेवावा. पण हा प्रकार पोलिसांना सांगणं आपल्याला भाग आहे."
"मी चिठ्ठी घेऊन जातो वाटल्यास"
"पण मला तुझी मदत लागणार आहे. एक मिनिट . तो बघ तिकडे एक माणूस लाकूड तोडतो.आहे. त्याला इकडे बोलावतोस का?
तो पोलिसांना घेऊन येईल."
मी त्या माणसाला बोलावून आणलं. तो बराच घाबरलेला होता. होम्सने एक पत्र त्याच्याजवळ दिलं आणि ते डॉ. हक्स्टेबल यांना पोचवायला सांगितलं. "आता बघ वॉटसन, सकाळपासून आपल्याला दोन क्लू मिळाले. पहिला होता पाल्मर टायर्स असलेली सायकल. तो क्लू आपल्याला कुठवर घेऊन आला हे आपण पाहिलंच आहे. दुसरा क्लू आहे तो डनलॉप टायरवाल्या सायकलीचा. त्याचा शोध घेण्यापूर्वी आपल्याला हे तपासून पाहिलं पाहिजे की आपल्याला पक्क्या माहीत असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत.
"पहिला मुद्दा असा आहे की तो मुलगा त्याच्या स्वतःच्या इच्छेने शाळेबाहेर पडला. त्याच्या खिडकीतून उतरून त्याने बाहेरचा रस्ता धरला हे नक्की. तेंव्हा त्याच्याबरोबर कोणी होतं किंवा कसं हे आत्ता आपण सांगू शकत नाही."
"खरं आहे"
"आता आपण जर्मनच्या मास्तरांकडे वळू. तो मुलगा बाहेर पडला तेंव्हा त्याने पूर्ण युनिफॉर्म घातला होता. यावरून असं म्हणता येतं की त्याला माहीत होतं की त्याला बाहेर जायचंय. पण जर्मनचे मास्तर मोजे न घालता बाहेर पडले. यावरून त्यांनी ऐन वेळी हा निर्णय घेतला होता."
"खात्रीने"
"ते का बरं गेले? कारण त्यांच्या खिडकीतून त्यांनी त्या मुलाला बाहेर जाताना पाहिलं. आणि त्याला गाठून शाळेत परत आणावं म्हणून तेही बाहेर पडले. सायकलीवर टांग टाकून त्यांनी त्या मुलाचा पाठलाग केला आणि त्यातच त्यांचा अंत झाला."
"असं दिसतंय खरं."
"आता आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग येतो. जर एखाद्या माणसाला एखाद्या मुलाचा पाठलाग करायचा असता तर तो त्याच्यामागे पळाला असता. त्या मुलाला गाठणं त्याला आजिबात अशक्य नव्हतं. पण जर्मनच्या सरांनी तसं केलं नाही. ते सायकलवरून निघाले. मला असं कळलंय की ते खूपच उत्कृष्ट सायकलपटू होते. याचा अर्थ त्यांच्या असं लक्षात आलं होतं की त्या मुलाकडे कुठलंतरी वेगवान वाहन आहे."
"ती दुसरी सायकल!!!"
"जरा विचार कर वॉटसन. जर्मनच्या मास्तरांचा शाळेपासून पाच मैलांवर मृत्यू होतो. तोसुद्धा बंदुकीच्या गोळीने नाही तर एका ताकदवान माणसाने केलेल्या जीवघेण्या प्रहाराने. लक्षात ठेव की एखादा लहान मुलगा अनवधानाने गोळी झाडू शकतो. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की त्या मुलाबरोबर कोणीतरी होतं आणि त्यांच्याकडे एक जलदगतीने जाणारं वाहनही होतं कारण एका उत्कृष्ट सायकलपटूला त्यांना गाठायला पाच मैल अंतर जावं लागलं. असं असलं तरीही त्या भागात बारकाईने शोध घेतल्यावर आपल्याला काय मिळालं? गायीचे बैलांचे काही ठसे फक्त मिळाले. या भागापासून पन्नास यार्डांपर्यंतच्या भागात दुसरी कुठलीही वाट नाही. या दुसऱ्या सायकलस्वाराचा या खुनाशी काहीच संबंध नाही आणि आपल्याला एकही माणसाच्या पावलाचा ठसा मिळालेला नाही."
"होम्स!! हे अशक्य आहे"
"अगदी बरोब्बर बोललास. हे खरंच अशक्य आहे.. याचा अर्थ मी काहीतरी चूक करतोय. तूही हे सगळं तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहेस. तुला यात काही चूक सापडतेय का?"
"त्यांचं डोकं फुटलं ते सायकलीवरून खाली पडल्यामुळे तर नसेल?"
"वॉटसन, दलदल आणि चिखलात पडल्यावर डोकं फुटेल?"
"आपलं डोकं चालत नाही बुवा"
"च् च् आपण यापेक्षा वाईट गोष्टी सोडवल्या आहेत. आपल्याकडे खूप काही आहे फक्त आपण त्याच्याकडे योग्य पद्धतीने पहायला हवं. पाल्मरचं काम तर संपलंय. आता डनलॉप आपल्याला कुठे घेऊन जातं ते बघूया चल."
आम्ही डनलॉप टायरचा माग धरून चालायला सुरुवात केली. थोडं अंतर जातो न जातो तोच रस्त्याने एक तिरकं वळण घेतलं आणि तो डोंगरावर उंच चढला. आता आम्ही तो ओढा मागे सोडला. आणि या कोरड्या जमिनीवर आता आम्हाला काहीच सापडेना. डनलॉपचा शेवटचा ठसा आम्हाला दिसला त्या जागेवरून तो कुठेही जाऊ शकला असता. एका बाजूला काही मैलांवर होल्डरनेस हॉल, तर एका बाजूला एक रस्ता जो चेस्टरफिल्डकडे जात होता.

Labels: ,

प्रायॉरी स्कूल (४)

आम्ही चेस्टरफिल्डकडे वळलो. जरा वेळाने आम्हाला फायटिंग कॉक नावाची सराई दिसली. ती इमारत जुनाट आणि भीतीदायक दिसत होती. तिच्या छपरावर एक मोठ्या कोंबड्याची आकृती बसवलेली होती. अचानक होम्सच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. तोल सावरण्याच्या प्रयत्नात त्याने माझ्या खांद्याचा आधार घेतला. त्याचा घोटा मुरगाळला होता आणि त्याला अतिशय वेदना होत होत्या. तसाच लंगडत तो त्या इमारतीच्या दरवाज्याजवळ गेला. तिथे एक माणूस एक मातीचा काळा पाईप ओढत उभा होता.
"आपणच मि. रुबेन हायेज का?"होम्सने विचारलं.
"कोण तुम्ही? आणि तुम्हाला माझं नाव कसं ठाऊक?" त्याने विचारलं. त्याचे डोळे कावेबाज आणि कपटी होते.
"तुमच्या डोक्यावर असलेल्या फळीवर तसं लिहिलंय. आणि साधारण एखाद्या घराचा मालक कोण असावा हे ओळखणं काही अवघड नाही.
तुमच्याकडे एखादी बैलगाडी किंवा घोडागाडी आहे का हो? आम्हाला जरा देता का?"
"नाहीये माझ्याकडे"
"मला माझा पाय जमिनीला टेकवतासुद्धा येत नाहीये हो"
"नका टेकवू मग"
"पण मला चालता येणार नाही ना"
"मग लंगडी घाला"
हायेजसाहेबांचं बोलणं एकूणच उद्धटपणाचं होतं पण होम्सने ते हसून सोडून दिलं.
"हे बघा राव, माझी परिस्थिती फारच अवघड आहे. त्यामुळे मी कोणत्या वाहनातून घरी जातो आहे हे मला मुळीच महत्त्वाचं वाटत नाही."
"मलाही."
"माझं काम फार महत्त्वाचं आहे. मी वाटल्यास तुम्हाला भाडं देतो पण मला एखादी सायकल तरी द्या वापरायला."
हे ऐकून मात्र त्याने लगेच कान टवकारले.
"कुठंशी जायचंय तुम्हाला?"
"होल्डरनेस हॉलमधे"
"लॉर्डसाहेबांचे दोस्त दिसताय..." आमच्या चिखलाने माखलेल्या अवतारांकडे तुच्छतेने पाहतं तो खवचटपणाने म्हणाला.
होम्स जणू काही एखादा मोठा विनोदच झाला आहे असा हसायला लागला.
"आम्हाला पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल."
"का बरं?"
"कारण त्यांच्या हरवलेल्या मुलाचा ठावठिकाणा सांगायला आम्ही त्यांच्याकडे जातो आहोत. "
हे ऐकून तो एकदम दचकला.
"काय सांगता काय? तुम्ही त्याला शोधताय की काय?"
"तो लिव्हरपूलमधे आहे अशी पक्की बातमी कळली आहे. तो कुठल्याही क्षणी इथे येऊन पोहोचेल."
त्याच्या चेहऱ्यावरून कसलीतरी छाया सरकून गेली. अचानक त्याच्या उग्र, दाढीचे खुंट वाढलेल्या चेहऱ्यावर सौजन्याचे भाव उमटले.
"तसं मला ड्यूकसाहेबांशी काही देणंघेणं नाही. एके काळी मी त्यांच्या वाड्यावर गाडीवान म्हणून होतो खरा. पण त्यांनी मला फार क्रूरपणे वागवलं. शेवटी माझी काहीच चूक नसताना त्यांनी निर्दयपणे मला नोकरीवरून काढून टाकलं.
पण त्यांच्या मुलाचा तपास लागला हे ऐकून मला आनंदच झाला आहे. ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मी तुम्हाला मदत करीन."
"आभारी आहे मी तुमचा. आधी आम्हाला काहीतरी खायला देता का? ते झालं की मग तुमची सायकल आम्हाला द्या." होम्स म्हणाला.
"पण माझ्याकडे एकही सायकल नाहीये."
होम्सने खिशातून एक नाणं काढून त्याच्यासमोर धरलं.
"अरे बाबा, माझ्याकडे सायकल नाही. हॉलपर्यंत जायला मी तुम्हाला दोन घोडे देईन हवं तर."
"ठीक आहे. आमच्या पोटोबा उरकला की आपण यावर बोलू." होम्स म्हणाला.
तिथल्या दगडी , रंग उडालेल्या स्वयंपाकघरात आल्यावर मात्र ज्या विद्युतवेगाने होम्सचा मुरगळलेला पाय बरा झाला तो पाहून मी उडीच मारली. हे सगळं होईपर्यंत रात्र पडायला आली होती आणि दिवसभर आमच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. त्यामुळे हातातोंडाची गाठ पडल्यावर इतर सगळे विचार आपोआपच बंद झाले.
होम्स मात्र नेहमीप्रमाणे आपल्याच विचारात दंग होता. मधेच उठून एकदोनदा खिडकीजवळ जाऊन त्याने अस्वस्थपणे बाहेर नजर टाकली. खिडकीतून बाहेरचं विस्तीर्ण आवार दिसत होतं. तिथेच थोडं पलिकडे एक लहानसा लोहाराचा भाता होता आणि तिथे एक लहान मुलगा काम करत होता. त्याच्या समोरच्या बाजूला एक तबेला होता. होम्स परत आला . पण खाली बसता बसता तो अचानक ताडकन उठून उभा राहिला आणि माझ्याकडे वळून म्हणाला " कोडं सुटलं वॉटसन! तुला आठवतंय? आपल्याला गायीच्या खुरांचे ठसे सापडले होते..."
"हो. चिक्कार ठसे होते तिथे"
"कुठे होते?"
"कुठे म्हणजे? सगळीकडे होते. झऱ्याजवळच्या चिखलात, पुढे वाटेवर, हायडेगर जिथे पडले तिथे शेजारी."
"अगदी बरोबर! आता मला सांग, आज दिवसभरात डोंगरावर तुला किती गायी दिसल्या?"
"एकही नाही."
"आपल्याला दिवसभरात गायीच्या पावलांच्या इतक्या खुणा दिसल्या पण एकही गाय कुठे दिसली नाही हे तुला जरा विचित्र वाटत नाही का?"
"हो. विचित्र आहे खरं."
"आता नीट आठवायचा प्रयत्न कर. तुला ते ठसे कसे होते हे आठवतंय का?"
"हो"
"तुला आठवतंय? ते ठसे काही वेळा असे होते
---: : : : :--- ,
काही वेळा '---: . : . : . : .---' असे,
तर कधीकधी "---. ' . '. ' .
असे दिसत होते".
त्याने त्याच्या ताटलीतले ब्रेडचे तुकडे नीट रचून मला दाखवले.
"नाही बुवा. मला इतकं नाही आठवत"
"पण मला आठवतंय. अगदी स्पष्टपणे. मी पैज लावू शकतो यावर. आपल्याला जरा सवड झाली की मी तुला दाखवीन परत एकदा.
देवा... तेंव्हाच ही गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही? मी इतका दूधखुळा आहे का?"
"कुठली गोष्ट?"
"मधेच संथपणे चालणारी, मधेच रेंगाळणारी, मधेच चौखूर उधळणारी गाय वैशिष्ट्यपूर्णच म्हटली पाहिजे. वॉटसन, इतक्या बेमालूमपणे ही गोष्ट घडवून आणणारं हे डोकं एखाद्या एखाद्या खेडवळ माणसाचं नक्की नाही.
चल. आकाश निरभ्र आहे. त्या भात्याजवळ फक्त तो मुलगाच आहे. आपण जरा पाहणी करून येऊ. "
त्या तबेल्यात दोन घोडे उभे होते. त्यांच्याकडे नीट लक्ष दिलेलं दिसत नव्हतं. त्यांचे केस राठ झाले होते. होम्सने त्यातल्या एकाचा मागचा पाय वर उचलून त्याच्या टाचेचं निरीक्षण करायला सुरुवात केली.
"जुनेच नाल नव्याने ठोकलेले दिसतायत. ..... नाल जुने आणि खिळे मात्र नवे! ही केस खास आहे नक्की. चल आता जरा त्या भात्याजवळ जाऊ या"
त्या पोऱ्याने आमच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. जमिनीवर पसरलेल्या लोखंडाच्या आणि लाकडाच्या पसाऱ्यात डावीकडे-उजवीकडे नजर फिरवत होम्स काहीतरी शोधत होता. अचानक आमच्या मागून कोणीतरी आलं. पाहतो तर दस्तुरखुद्द घरमालक तिथे उभा . त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता. डोळ्यात रक्त उतरलं होत. त्याची मुद्रा हिंस्र दिसत होती. आपल्या हातातली लोखंडी दांडा असलेली काठी त्याने इतक्या खुनशीपणाने आमच्यावर उगारली की माझ्या खिशात रिव्हॉल्व्हर आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद झाला."
"भुरट्यांनो, इथे काय करताय?" दात ओठ खात तो किंचाळला.
त्याच्याकडे बघून अत्यंत शांतपणाने होम्स म्हणाला, "काय झालं मि. रुबेन हायेज, आम्हाला काहीतरी नको ते सापडेल अशी तुम्हाला भिती वाटली की काय?"
आपला संताप आवरायला त्याला बरेच कष्ट पडलेले दिसले. मोठ्या प्रयत्नांनी त्याने एक उसनं हसू चेहऱ्यावर आणलं. ते त्याच्या संतप्त मुद्रेहूनही कितीतरी अधिक भेसूर दिसत होतं.
" हे पाहा , माझ्या भट्टीत तुम्हाला काय हवं ते तुम्ही खुशाल शोधा पण माझ्या परवानगीशिवाय माझ्या भानगडीत उगाचच नाक खुपसणारी माणसं मला मुळीच आवडत नाहीत. तेंव्हा जितक्या लौकर तुम्ही इथला मुक्काम आटोपता घ्याल तितका मला जास्त आनंद होईल."
ठीक आहे मि. हायेज, हरकत नाही. मी तुमच्या तबेल्यात एक नजर टाकली आहे आणि मला वाटत मी चालतच जाईन. तसंही हे अंतर काही फार नाही नाही का?"
"दोन मैल लागतात. आणि हा हॉलकडे जायचा रस्ता."
आम्ही तिथून बाहेर पडेपर्यंत तो खुनशी नजरेने आमच्याकडे रोखून पाहतं होता. आम्ही त्या रस्त्यावरून फार पुढे गेलो नाही. तिथल्या वळणावर, आम्ही त्याच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर जाताच होम्स थांबला.
"त्या इमारतीत बरंच ऊबदार वाटत होतं ना. आपण तिथून जितकं लांब जातोय तितकं सगळं गार गार वाटायला लागलंय. मला वाटतं आपण काही वेळ इथंच थांबावं."
"खरं आहे. या रुबेनला सगळं ठाऊक आहे हे तर दिसतंच आहे." मी म्हणालो.
"तुलाही असंच वाटतंय ना? इथे घोडे आहेत, लोहाराचा भाता आहे. ही जागा निश्चितच मला आकर्षित करणारी आहे. कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा थोडं निरीक्षण करू या."
डोंगराशेजारच्या रस्त्यावरून आम्ही चाललो होतो. तितक्यात होल्डरनेस हॉलकडून एक सायकलस्वार वेगाने आमच्या दिशेने येताना आम्हाला दिसला.
"वॉटसन! लप!" माझ्या खांद्याला जोराचा हिसका देऊन मला खाली खेचत होम्स ओरडला.आम्ही खाली झुडुपांमधे लपतो न लपतो तोच तो स्वार वेगाने आमच्या शेजारून पुढे गेला. त्याच्या मागे उठलेल्या धुराळ्यातून मला एक घाबरलेला फिकट चेहरा दिसला. तो जेम्स विल्डर होता. कसल्यातरी धक्क्याने त्याने आ वासला होता आणि डोळे विस्फारले होते.
"ड्यूकसाहेबांचा सेक्रेटरी! चल वॉटसन. तो काय करतोय हे पाहायला हवं."
एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उड्या मारत आम्ही एका अशा जागी येऊन पोचलो जिथून त्या घराचा दरवाजा स्पष्ट दिसत होता. त्याच्याशेजारी, भिंतीपाशी विल्डरची सायकल होती. घराच्या आवारात किंवा खिडक्यांमधून कुठल्याही प्रकारची हालचाल जाणवत नव्हती. होल्डरनेस हॉलच्या उंच मनोऱ्यांच्या मागे सूर्य बुडाला आणि संधिप्रकाशाने आम्हाला वेढून टाकलं.
तेवढ्यात एका घोडागाडीच्या दोन बाजूंना उजळलेले दोन दिवे आम्हाला दिसले, टापांचा आवाज आला आणि काही क्षणांतच प्रचंड वेगाने ती गाडी फायटिंग कॉकच्या दिशेने धावू लागली.
"वॉटसन, तुला काय वाटतंय? काय झालं असेल ?" कुजबुजत्या स्वरात होम्स म्हणाला
"कोणीतरी पळ काढलाय"
"एकच माणूस उतरलाय. आणि हा निश्चितपणे जेम्स विल्डर नाही कारण तो स्वतःच दरवाज्यात उभा आहे."
अंधारात लालसर प्रकाशाचा एक चौकोन उजळून निघाला. त्या प्रकाशात जेम्स विल्डरची काळी आकृती दिसत होती. तो दारातून बाहेर वाकून कोणाचीतरी वाट पाहात होता. काही क्षणातच कुठेतरी पावलं वाजली. तिथे अजून एक आकृती प्रकट झाली आणि त्याच क्षणी तो दरवाजा आणि त्याचबरोबर तो प्रकाश हे दोन्हीही बंद झाले. पाच मिनिटांनंतर पहिल्या मजल्यावरचा एक दिवा लागला.
"आपल्या मित्राचं वागणं मोठं विचित्र दिसतंय बुवा... हे पाहुणे फारच मोठे दिसताहेत आणि बरेच महत्त्वाचेही असावेत. पण या अवेळी जेम्स विल्डर इथे काय करतोय? चल वॉटसन, थोडासा धोका पत्करावा लागला तरी चालेल पण आपल्याला हालचाल केली पाहिजे."
दबक्या पावलांनी रस्ता ओलांडून आम्ही त्या दगडी कुंपणापाशी जाऊन पोचलो. तिथे जवळच ती सायकल टेकवून ठेवली होती.
होम्सने एक काडी पेटवून तिच्या मागच्या चाकाजवळ धरली आणि तो हसला. मी पाहिलं तर त्या सायकलीला डनलॉपचं टायर होतं.
आमच्या बरोब्बर डोक्यावरच्याच खिडकीत तो दिवा लावलेला होता.
"मला त्या खिडकीतून आत डोकावून पाहायचाय. वॉटसन, तू जरा भिंतीवर ओणव्याने उभा राहतोस का?"
पुढच्याच क्षणी तो माझ्या खांद्यावर चढला. पण क्षणभरातच तो पुन्हा खाली उतरला.
"मित्रा, आजचा दिवस बराच खडतर होता आणि आपण तो सार्थकी लावलेला आहे. इथून शाळा बरीच लांब आहे त्यामुळे जितक्या लवकर आपण चालायला लागू तितकं चांगलं."
परतीच्या वाटेवर त्याने काही केल्या आपलं तोंड उघडलं नाही आणि एकदाचे आम्ही शाळेजवळ पोचल्यावर तो लगेच आतही गेला नाही. मॅकलटन स्टेशनवर जाऊन त्याने काही तारा पाठवल्या. रात्री उशीरा त्याचं आणि डॉक्टरांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. हायडेगरांच्या मरणाबद्दल तो त्यांचं सांत्वन करत होता. आणि एवढं सगळं होऊनही रात्री उशीरा जेंव्हा तो माझ्या खोलीत आला तेंव्हा तो सकाळी होता तितकाच उत्साही आणि तत्पर दिसत होता.
"सगळं काही आलबेल आहे मित्रा. उद्या संध्याकाळच्या आत आपण हे रहस्य सोडवलेलं असेल." तो मला म्हणाला.

Labels: ,

प्रायॉरी स्कूल (५)

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता आम्ही होल्डरनेस हॉलजवळच्या यू ऍव्हेन्यूपाशी पोचलो. एलिझाबेथच्या काळातल्या एका मोठ्या दारातून आम्ही सरसाहेबांच्या अभ्यासिकेत गेलो. तिथे जेम्स विल्डरची आणि आमची भेट झाली. काल रात्रीच्या प्रसंगाची सावली अजूनही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
"तुम्ही सरसाहेबांना भेटायला आला आहात? पण त्यांना अजिबात बरं नाहीये. काल आम्हाला डॉक्टरांची तार मिळाली. त्यांनी हायडेगरांबद्दल कळवलं आहे. झाल्या घटनेचा ड्यूकसाहेबांना बराच धक्का बसला आहे. "
"मि. विल्डर, मला कुठल्याही परिस्थितीत ड्यूकसाहेबांना भेटायचंय."
"पण ते त्यांच्या खोलीत आहेत."
"मग मला त्यांच्या खोलीत जावं लागेल."
"ते झोपलेत."
"मी त्यांना तिथे जाऊन भेटेन.
"होम्सचा हट्टी आणि निग्रही चेहरा पाहून त्याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे विल्डरला कळून चुकलं .
"ठीक आहे मि. होम्स, मी त्यांना कळवतो."
साधारण एका तासानंतर लॉर्डसाहेबांची आणि आमची गाठ पडली. त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात प्रेतकळा आली होती. खांदे उतरले होते. एका दिवसात ते कितीतरी वृद्ध झाल्यासारखे दिसत होते. त्यांनी किंचित झुकून आमचं स्वागत केलं आणि ते समोर स्थानापन्न झाले. त्यांची लालबुंद दाढी टेबलावर रुळत होती.
"बोला मि. होम्स.." ते म्हणाले.
पण होम्सचे डोळे त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या सेक्रेटरीवर खिळले होते.
"मला वाटतं लॉर्डसाहेब, मि. विल्डर इथे नसतील तर मी जास्त मोकळेपणाने बोलू शकेन,"
विल्डरचा चेहरा आणखीनच फिकट दिसायला लागला. त्याने होम्सकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.
"जर लॉर्डसाहेबांची पण अशीच इच्छा असेल तर..."
"होय मि. विल्डर, तुम्ही जाऊ शकता.
आता बोला मि. होम्स काय म्हणणं आहे तुमचं?"
विल्डर बाहेर पडून ते दार लावून घेईपर्यंत होम्स शांतच राहिला.
"युअर ग्रेस, डॉ. हक्स्टेबल आम्हाला म्हणाले होते की तुम्ही एक बक्षीस जाहीर केलं आहे. ही गोष्ट खरी आहे ना?"
"अलबत्. ही गोष्ट खरी आहे"
"जो कोणी तुम्हाला तुमच्या मुलाचा ठावठिकाणा सांगेल त्याला तुम्ही पाच हजार पौंड बक्षीस देणार आहात?"
"हो"
"आणि त्याला पळवणाऱ्यांची नावं सांगणाऱ्याला आणखी एक हजार पौंड मिळतील?"
"हो खात्रीने."
"यात त्याला पळवणारे आणि त्याला सध्या जबरदस्तीने ताब्यात ठेवणारे हे दोघेही आले ना?"
"हो हो हो! मि. होम्स, जर तुम्ही तुमचं काम नीटपणे पूर्ण केलं असेल तर तुम्हाला सढळ हाताने गौरवलं जाईल."
होम्सने आपले तळहात एकमेकांवर घासले. त्याच्या वागण्यातून उघड होणारा द्रव्यलोभ पाहून मला धक्काच बसला. एरवी तो किती निरिच्छ होता हे मला माहीत होतं.
"युअर ग्रेस, तुमचं चेकबुक तिथे शेजारीच दिसतंय. तुम्ही जर त्यात एक सहा हजार पौंडांचा चेक लिहिलात तर मला फार आनंद होईल. आणि हो तो क्रॉस करा बरं का. 'द कॅपिटल ऍन्ड काऊन्टीज' बँकेच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरच्या शाखेत माझं खातं आहे."
लॉर्डसाहेब त्यांच्या खुर्चीत एकदम ताठ बसले आणि त्यांनी होम्सकडे एक अतिशय थंड नजर टाकली.
"मि. होम्स, ही विनोद करायची वेळ आहे असं तुम्हाला वाटतंय का?"
"अजिबात नाही युअर ग्रेस. मी माझ्या आयुष्यात इतका गांभिर्याने कधीच वागलो नाही."
"मग या सगळ्याचा अर्थ काय आहे?"
"याचा अर्थ एवढाच की तुम्ही जाहीर केलेलं बक्षीस मी जिंकलं आहे. तुमचा मुलगा कुठे आहे हे मला माहीत आहे आणि सध्या त्याला डांबून ठेवणाऱ्यांपैकी काही लोकांना तरी मी निश्चितपणे ओळखतो."
लॉर्डसाहेबांच्या भुतासारख्या पांढऱ्या फटक चेहऱ्यामुळे त्यांची लालबुंद दाढी आणखी लाल वाटायला लागली होती.
"कुठे आहे तो?" क्षीण आवाजात ते पुटपुटले.
"त्याला तुमच्या घरापासून दोन मैलांवर फायटिंग कॉक सराईत ठेवलंय किंवा काल रात्रीपर्यंत तरी ठेवलं होतं असं म्हणायला हवं."
ते मट्कन त्यांच्या खुर्चीत बसले.
"हे सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे?"
यावर होम्सने जे उत्तर दिलं त्याची मी कल्पनाही केली नव्हती. पुढे झुकून ड्यूकसाहेबांच्या खांद्याला हाताने हलकेच स्पर्श करत तो म्हणाला "या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात.. आणि आता मला माझा चेक हवा आहे."
ड्यूकसाहेब ताडकन उठून उभे राहिले असहायतेने त्यांच्या हाताच्या मुठी वळल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर त्या वेळी जे भाव होते ते मी कधीच विसरू शकणार नाही. नंतर अंगी मुरलेल्या दरबारी सभ्यपणाला साजेसा संयम दाखवत त्यांनी पुन्हा एकदा खुर्चीत बसकण मारली आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला. बराच वेळ ते तसेच निःशब्द बसून होते. खालमानेनेच हताशपणे त्यांनी विचारलं "काय काय कळलंय तुम्हाला?"
"मी काल रात्री तुम्हाला दोघांना एकत्र पाहिलंय"
"तुमच्या मित्राला सोडून इतर कोणाकोणाला हे माहीत आहे?"
"मी कोणालाही काहीही सांगितलं नाहीये"
आपलं चेकबुक उघडून त्यांनी थरथरत्या हाताने एक चेक लिहायला पेन सरसावलं.
"सध्याची स्थिती माझ्या दृष्टीने कितीही भयंकर असली तरीही मी माझा शब्द पाळणार आहे. मी जेंव्हा ही घोषणा केली तेंव्हा परिस्थिती असं काही अनपेक्षित वळण घेईल असं मला मुळीच वाटलं नव्हतं. तुम्ही आणि तुमचा मित्र विश्वासार्ह आहात असं मी समजतो आहे."
"आपल्याला काय म्हणायचंय मला काही कळलं नाही."
"सरळ शब्दांत सांगायचं तर तुम्ही आणि तुमचे मित्र या दोघांनाच जर ही गोष्ट माहीत असेल तर ती तुमच्याकडून आणखी कोणाला कळता कामा नये. मला वाटतं बारा हजार पौंड या कामासाठी पुरेसे होतील. नाही का?"
"युअर ग्रेस, गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. शिवाय त्या मास्तरांच्या खुनाचं काय?"
"पण जेम्सला यातलं काहीच माहीत नव्हतं. त्याने या कामासाठी नेमलेल्या त्या रासवटाचं काम आहे ते."
"युअर ग्रेस, मला वाटतं जेंव्हा एखाद्या माणसाला एखाद्या कामासाठी नेमण्यात येतं तेंव्हा ते काम पूर्ण करताना झालेल्या सर्व गोष्टींची जबाबदारी काम सांगणाऱ्याकडे असते."
"तात्त्विकदृष्ट्या तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण कायद्यापुढे हे ग्राह्य धरलं जात नाही. जो माणूस गुन्हा घडला तेंव्हा त्या जागी नव्हता आणि ज्याला अशा कृत्यांबद्दल तुमच्या-माझ्याइतकीच घृणा वाटते त्याला शिक्षा होता कामा नये. या प्रकाराबद्दल कळताक्षणी त्याने माझ्याकडे सगळं कबूल केलं. त्याला इतका धक्का बसला होता की तिथल्या तिथे त्याने त्या खुन्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले. मि. होम्स, त्याला वाचवा. तुम्ही त्याला वाचवायलाच हवं ... मी सांगतो म्हणून तरी त्याला वाचवा ...." त्यांचा संयमाचा बांध फुटला आणि असहायतेने त्यांनी खोलीत फेऱ्या मारायला सुरुवात केली. दुःखाने त्यांचा चेहरा कसातरीच दिसत होता. अखेरीस त्यांनी स्वतःला आवरलं आणि ते पुन्हा एकदा खुर्चीत बसले.
"या गोष्टी बाहेर फुटायच्या आधी तुम्ही माझ्याकडे आलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आता आपल्याला हे तरी तपासून बघता येईल की या लाजिरवाण्या प्रकारामुळे होणारं नुकसान कमी कसं करता येईल."
"अगदी बरोबर बोललात. मला वाटतं आपल्यात कसलाही आडपडदा नसेल तर या गोष्टी हाताळणं सोपं जाईल. तुमच्यासाठी मी माझ्या हातात असेल ते ते करायला करायला वचनबद्ध आहे पण त्यासाठी मला यातल्या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. मला वाटतं तुम्ही मघाशी मि. जेम्स विल्डर यांच्याबद्दल बोलत होतात आणि त्याने खून केलेला नाही."
"नाही. खुनी पळून गेलाय."
होम्स हलकेच हसला.
"युअर ग्रेस, माझी कीर्ती अजून तुमच्या कानावर आलेली दिसत नाही नाहीतर तुम्हाला असं वाटलंच नसतं. माझ्या हातातून निसटून जाणं तितकंसं सोपं नाही. माझ्या सूचनेवरून काल रात्री अकरा वाजता चेस्टरफिल्डला मि. रुबेन हायेज यांना अटक करण्यात आली. आज सकाळी शाळेतून बाहेर पडण्यापूर्वी मला इथल्या पोलिसांकडून तशी तार मिळाली आहे."
ड्यूकसाहेब खुर्चीला टेकून बसले आणि आश्चर्याने होम्सच्या चेहऱ्याकडे पाहू लागले.
"तुमच्याकडे निश्चितच कसलीतरी दैवी शक्ती आहे. "ते उद्गारले. "रुबेन हायेजला अटक झाली तर एकूणात. जर या गोष्टीचा जेम्सला काही त्रास होणार नसेल तर ही मोठी आनंदाची गोष्ट आहे."
"तुमचा सेक्रेटरी?"
"नाही. माझा मुलगा"
आता आश्चर्यचकित होण्याची पाळी होम्सची होती.
"ही गोष्ट मला अगदी नवीन आहे युअर ग्रेस. जरा अधिक विस्ताराने सांगू शकाल का?"
"मी तुमच्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही. हे सगळं तुम्हाला सांगत असताना मला कितीही जरी त्रास झाला तरी मी तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहे. जेम्सचा मूर्खपणा आणि त्याचा द्वेष यांच्यामुळे आज आमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमधे पूर्ण प्रामाणिकपणा दाखवणंच हिताचं ठरेल.
मी नुकताच तारुण्यात प्रवेश केला होता तेंव्हाची गोष्ट आहे. मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. तरुण वयातलं आणि पहिलं प्रेम माणसाला कधीच विसरता येत नाही. मी तिला लग्नाची मागणीही घातली. पण जर आमचं लग्न झालं असतं तर मला इस्टेटीतला वाटा सोडून द्यावा लागला असता म्हणून तिने माझ्याशी लग्न करायला नकार दिला. आज जर ती जिवंत असती तर मी दुसऱ्या कोणाशीच कधी लग्न केलं नसतं. पण दुर्दैवाने ती वारली आणि जाताना या लहानग्याला माझ्याकडे सोडून गेली. तिच्या पश्चात मी जीव लावून त्याचं पालनपोषण केलं. त्याचं माझं नातं मी उघडपणे जगाला सांगू शकत नव्हतो पण मी त्याला काहीच कमी पडू दिलं नाही. त्याला उत्कृष्ट प्रतीचं शिक्षणही दिलं आणि तो तरुण झाल्यापासून सावलीसारखं सतत माझ्याबरोबर ठेवलं. पण त्याने मात्र या रहस्याचा वापर मला त्रास देण्यासाठी करायला सुरुवात केली. माझं आणि माझ्या बायकोचं न पटायलाही तोच कारणीभूत होता. माझ्या या औरस वारसाबद्दल त्याला सुरुवातीपासून तिरस्कार वाटे आणि तो त्याचा अगदी रागराग करायचा. तुम्ही विचाराल की त्याही परिस्थितीत मी त्याला माझ्या जवळच का ठेवलं. या प्रश्नाला माझं फक्त एवढंच उत्तर आहे की त्याच्यात मी त्याच्या आईला पाहत होतो आणि तिच्या आठवणींमुळे मी आजवर हे सगळं निमूटपणे सहन करत आलो आहे. त्याचं वागणं बोलणं थेट त्याच्या आईसारखं आहे आणि त्यामुळेच कितीही झालं तरी मी त्याला माझ्यापासून लांब पाठवू शकलो नाही. पण तो आर्थरला म्हणजे लॉर्ड सॉल्टिअरना काहीतरी इजा करेल अशी मला कायमच भिती वाटत राहिली. आर्थरच्या सुरक्षिततेसाठीच मी त्याला त्या शाळेत पाठवलं होतं. "
"हा हायेज माझ्याकडे नोकरीला होता तेंव्हा त्याची आणि जेम्सची ओळख झाली. तो माणूस बदमाश होता हे मला सुरुवातीपासूनच माहीत होतं पण काही अनाकलनीय मार्गाने जेम्सची आणि त्याची अगदी जवळची मैत्री झाली. हलक्या दर्जाच्या लोकांची संगत जेम्सला नेहमीच आवडते. लॉर्ड सॉल्टिअरना पळवायची योजना आखताना जेम्सने या हलकटाची मदत घेतली. हा प्रकार घडला त्याच्या आधल्या दिवशी मी आर्थरला एक पत्र लिहिलं होतं हे तुम्हाला आठवतच असेल. जेम्सने ते पत्र उघडलं आणि त्यात आर्थरला आपल्याला शाळेजवळ रॅग्ड शॉमधे भेटायला यायला सांगणारी एक चिठ्ठी घातली. त्याने ती चिठ्ठी डचेसबाईंच्या नावाने लिहिली होती आणि त्यामुळे आर्थर त्याच्या सांगण्याप्रमाणे वागला. त्या दिवशी संध्याकाळी जेम्स सायकलवरून जंगलात गेला. त्याने माझ्याजवळ जो कबुलीजबाब दिला तेच मी तुम्हाला सांगतोय. जंगलात त्याची आणि आर्थरची भेट झाली. त्याने आर्थरला सांगितलं की त्याच्या आईला त्याला भेटायचं आहे आणि तो जर मध्यरात्री त्याच ठिकाणी परत आला तर तिथे एक माणूस उभा असेल जो त्याला त्याच्या आईकडे घेऊन जाईल. बिचारा आर्थर त्याच्या जाळ्यात सापडला. तो जेंव्हा मध्यरात्री ठरल्या जागी आला तेंव्हा एक लहानसे शिंगरू घेऊन हायेज तिथे त्याची वाट पहात उभा होता. त्यावेळी त्यांचा एका माणसाने पाठलाग केला. हायेजने आपल्या काठीने त्याच्यावर वार केला आणि त्यात तो माणूस ठार झाला. अर्थात जेम्सला हे कालच कळलं. हायेजने आर्थरला त्याच्या घरी - फायटिंग कॉकमधे आणलं आणि वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत कोंडून ठेवलं. हायेजबाई त्याची देखभाल करत होत्या. मिसेस हायेज स्वभावाने खूप चांगल्या आहेत पण त्यांच्या खुनशी नवऱ्यापुढे त्यांचं काही चालत नाही. "
"हे सगळं झालं तेंव्हा आपली पहिल्यांदा गाठ पडली. मला या घटनाक्रमाबद्दल तेंव्हा तुमच्याइतकीच माहिती होती. तुम्ही मला विचाराल की या सगळ्यामागे जेम्सचा उद्देश काय होता. त्याच्या मते तो माझा वारस व्हायला हवा होता पण त्याला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या सामाजिक प्रथांचा तो तिरस्कार करतो आणि आर्थरचा शक्य तितका द्वेष. हा द्वेष यामागे होताच पण आणखी एक निश्चित कारणही होतं. आर्थरला ओलीस ठेवून त्याला माझ्याकडून ही अन्यायी परिस्थिती बदलून घ्यायची होती. त्याला असं वाटत होतं की तसं करणं माझ्या हातात आहे. आर्थरच्या बदल्यात मी सगळी इस्टेट त्याच्या नावे करावी असं त्याचं म्हणणं होतं. त्याला हे पक्कं माहीत होतं की त्याच्याविरुद्ध मी पोलिसांची मदत कधीच घेऊ शकलो नसतो. त्याचा बेत काय होता हे मी तुम्हाला सांगतोय पण प्रत्यक्षात मात्र असं काही करायला त्याला संधीच मिळाली नाही. घटना इतक्या वेगाने घडत गेल्या की त्याला यातलं काहीच करता आलं नाही."
"तुम्हाला त्या हायडेगरांचा मृतदेह सापडला आणि त्याचे हे सगळे बेत उधळून लावले गेले. ती गोष्ट त्याला कळल्यावर त्याला मोठा धक्का बसला . काल तो माझ्याकडे आला. आम्ही माझ्या अभ्यासिकेत बसलो. डॉक्टरांनी आम्हाला तार पाठवली होती. जेम्सच्या चेहऱ्यावर दिसणारी भिती आणि त्याचं अस्थिर वागणं पाहून मला येत असलेला संशय पक्का झाला आणि मी त्याला सरळ सगळं खरं सांगून टाकायला सांगितलं. त्याने सगळा प्रकार माझ्यासमोर कबूल केला. आणि हायेजला पळून जाता यावं म्हणून तीन दिवसांची मुदत मागितली. त्याच्यापुढे मी जसा नेहमी नमतो तसाच याही वेळी नमलो. तो लगेच हायेजला सावध करायला आणि पळून जा असं सांगायला फायटिंग कॉकमधे गेला. दिवसाच्या प्रकाशात मी तिथे जाऊ शकलो नाही कारण त्यावरून बरंच वादळ उठलं असतं पण रात्र होताक्षणी मी माझ्या लाडक्या आर्थरला भेटायला तिकडे धाव घेतली. तो सुरक्षित होता पण त्याने जे काही पाहिलं होतं त्यामुळे त्याला जबर धक्का बसला होता. पण मी कबूल करून बसलो होतो त्याप्रमाणे त्याला आणखी तीन दिवस मिसेस हायेज यांच्या ताब्यात राहू देण्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. खुन्याची माहिती दिल्याशिवाय पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सांगणं अशक्य होतं आणि खुनी कोण हे कळताच जेम्सला धोका होणार होता. मि. होम्स जे झालं ते कसलीही लपवाछपवी न करता मी तुमच्यापुढे मांडलं आहे. तुम्हीही इतक्याच स्पष्टपणाने माझ्याशी बोलाल अशी आशा आहे.?"
"हो. मी बोलीन. "होम्स म्हणाला. "पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कायद्याच्या नजरेत स्वतःला फारच संकटात लोटलेलं आहे. तुम्ही एका गुन्ह्याची माहिती कायद्यापासून दडवून ठेवलीत आणि एका खुन्याला पळून जायला मदत केलीत. कारण हायेजला पळून जाण्यासाठी जेम्सने जे काही पैसे दिले असतील ते तुमच्याकडूनच घेतलेले आहेत."
ड्यूकसाहेबांनी मान डोलावली.
"ही गोष्ट निश्चितपणे फार गंभीर आहे. पण त्याहूनही भयंकर आहे ते धाकट्या मुलाच्या बाबतीतलं तुमचं वागणं. तुम्ही त्याला तीन दिवसांसाठी त्या भयंकर जागेत सोडून आलात?"
"मला देण्यात आलेल्या शब्दावर विश्वास ठेवून...."
"असल्या लोकांच्या शब्दांवर तुम्ही विश्वास ठेवता? उद्या सकाळी तुमच्या मुलाला तिथून हलवून आणखी कुठे नेलं जाणार नाही कशावरून? तुमच्या मोठ्या मुलाला वाचवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाला अनावश्यक आणि विनाकारण मोठ्या संकटात लोटलं आहे"
लॉर्डसाहेबांना त्यांच्या घरी त्यांना असं तोंडावर काही ऐकून घेण्याची सवय नव्हती. संतापाने त्यांचा चेहरा लाल झाला होता. पण केवळ त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळेच ते शांत राहू शकले.
"मी तुम्हाला यातून बाहेर काढीन पण माझी एक अट आहे. तुमच्या नोकराला बोलवा. मी त्याला मला हव्या तशा आज्ञा देईन. तुम्ही त्यात हस्तक्षेप करायचा नाही"
एक शब्दही न बोलता त्यांनी त्यांच्या टेबलाजवळची विजेची घंटा वाजवली. दार उघडून एक नोकर आत आला.
"मला हे सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की तुमचे धाकटे मालक सापडले आहेत. सरसाहेबांची अशी इच्छा आहे की आत्ता लगेच त्यांना आणायला एक गाडी पाठवली जावी. ते फायटिंग कॉक मधे आहेत."
तो माणूस आनंदाने तिथून बाहेर पडला. त्यानंतर होम्स म्हणाला," आता भविष्याच्या सुरक्षिततेची तजवीज केल्यानंतर आपण भूतकाळाला कसा पायबंद घालायचा याकडे लक्ष देऊ. मी काही कोणी पोलीस अधिकारी नाही. आणि जर या प्रकरणात योग्य तो न्याय होत असेल तर मला माहीत असलेलं सगळं पोलिसांना सांगायला मी बांधील नाही. राहिली गोष्ट रुबेन हायेजची. त्याला मी वाचवणार नाही. त्याने तोंड उघडायचं ठरवलं तर तो काय काय बोलेल हे मी सांगू शकत नाही पण मला वाटतं तुम्ही त्याला हे समजावून सांगू शकाल की गप्प राहणं हे त्याच्या हिताचंच आहे. पोलिसांना असंच वाटेल की तुमच्या मुलाला खंडणीसाठी पळवण्यात आलं होतं आणि जर त्यांचं तेवढ्याने समाधान होत असेल तर मी त्यांना खोलात शिरायला सांगणार नाही. एक मात्र निश्चित सांगेन की जितका जास्त वेळ मि.जेम्स विल्डर तुमच्या घरी राहतील तितकेच वाईट परिणाम तुम्हाला भोगायला लागतील."
"हो. मला माहितेय ते. मी बोललोय त्याच्याशी. तो इथून कायमचा निघून जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला जायचं म्हणतोय तो."
"तसं असेल तर तुमचं आणि डचेसबाईंचं भांडण मिटवायला ही चांगली वेळ आहे. तुम्ही स्वतःच म्हणाला होतात ना की तुमच्या आणि डचेसबाईंच्या भांडणाचं कारण तोच होता म्हणून...."
"मी आज सकाळीच तिला पत्र लिहिलं आहे."
"तसं असेल तर आमची उत्तरेकडची खेप फुकट गेली नाही म्हणायची. मला आपल्याला अजून एक लहानशी गोष्ट विचारायची आहे, हायेजने त्याच्या घोड्यांना गायींचे खूर बसवले होते त्यामुळे आमची चांगलीच दिशाभूल झाली. ही कल्पना त्याला जेम्सने सुचवली असेल का?"
त्यांनी एक मिनिटभर विचार केला आणि मग ते आम्हाला एका खोलीत घेऊन गेले. तिथे एक वस्तुसंग्रहालय होतं. त्याच्या मध्यभागी असलेल्या काचेच्या कपाटासमोर ते थांबले.
"हे नाल होल्डरनेस हॉलच्या बागेत पुरून ठेवलेले सापडले. ते आहेत घोड्याचे नाल पण त्यांना गायीच्या खुरासारखा आकार देऊन शत्रूची दिशाभूल केली जात असे. हे साधारण मध्ययुगात होल्डरनेस हॉलमधे राहणाऱ्या सरदारांचे असावेत."
होम्सने त्या कपाटाचं दार उघडलं आणि आपलं बोट जरासं ओलं करून त्या नालावरून फिरवलं. त्या नालावर अलिकडेच चिखलाचा एक नवा थर साठला असावा. त्या चिखलाची एक रेघ त्याच्या बोटावर उमटली.
"धन्यवाद.! "तो म्हणाला आणि त्याने दार बंद केलं. "उत्तरेत मी पाहिलेली ही दुसरी नवलाची वस्तू."
"पहिली वस्तू कुठली?"
"हसत हसत त्याने आपल्या चेकची घडी घालून तो खिशात सुरक्षित ठेवला. नंतर त्याच्यावरून हलकेच हात फिरवत तो मिस्कीलपणे म्हणाला
" मी एक गरीब माणूस आहे."
--अदिती

Labels: ,

तीन विद्यार्थी !!!(१)

१८९५ मधली गोष्ट आहे. होम्स एका प्रसिद्ध विश्वविद्यालयात काही चौकशीनिमित्त तळ ठोकून होता. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने मीही त्याच्याबरोबर तिथे होतो. विश्वविद्यालयाचा नामोल्लेख टाळून या अतिशय रंगतदार केसबद्दल लिहायचं मी ठरवलं आहे.
त्या विश्वविद्यालयाच्या परिसरात, ग्रंथालयाजवळच्या एका बैठ्या इमारतीत आमची राहण्याची सोय केली गेली होती.
एक दिवस संध्याकाळी तिथले लेक्चरर मि. हिल्टन सॉम्स आम्हाला भेटायला आले. चांगले उंचनिंच असलेले सॉम्स नेहमी उत्साहाने सळसळत असायचे. ते कधीच शांत बसायचे नाहीत. पण त्या दिवशी मात्र ते विलक्षण वैतागलेले दिसत होते. त्यांच्याकडे पाहून कळत होतं की काहीतरी गडबड झालेली होती.
आत आल्याआल्या होम्सकडे वळून त्यांनी बोलायला सुरुवात केली
" मि. होम्स तुमचा थोडासा वेळ घेऊ का? सेंट ल्यूक्स कॉलेजमधे एक घोटाळा झालाय. अशा वेळी तुम्ही इथे आहात ही खरोखर देवाचीच कृपा आहे. नाहीतर मी काय केलं असतं मला तर काही कळत नाही. "
"सध्या मला अजिबात वेळ नाही. मला विचाराल तर तुम्ही पोलिसांची मदत घ्या... " होम्स जरासा वैतागला होता.
"नाही नाही. पोलिसांना यामधे आणलं तर कॉलेजची बदनामी होईल. एकदा गोष्ट पोलिसांपर्यंत गेली की नंतर त्यावर आपलं नियंत्रण रहात नाही. आणि ही गोष्ट जर षट्कर्णी झाली तर परिणाम फार भयंकर होतील. मि. होम्स, अशा प्रकरणांमध्ये तुमची कीर्ती फार मोठी आहे तुम्हीच आता आम्हाला वाचवू शकता. आम्हाला वाचवा हो..."
बेकर स्ट्रीटवरच्या घरातल्या परिचित वातावरणापासून फार काळ लांब राहिल्यामुळे होम्स आधीच चिडचिडा झाला होता. त्याचं डकवबुक, त्याची रासायनिक प्रयोगशाळा, त्याचा सवयीचा झालेला अव्यवस्थितपणा यांच्याशिवाय तो भलताच अस्वस्थ झालेला दिसत होता. पण या सगळ्याची कल्पना नसल्यामुळे सॉम्सनी आपले घोडे पुढे दामटत त्यांची हकीगत सांगायला सुरुवात केलीसुद्धा.
"मि. होम्स आमच्या कॉलेजतर्फे दिल्या जाणाऱ्या एका अतिशय मानाच्या शिष्यवृत्तीसाठी घेतली जाणारी परीक्षा उद्यापासून सुरू होते आहे. मी या परीक्षेसाठी ग्रीक भाषेचा परीक्षक म्हणून काम पाहतो आहे. उद्याच्या परीक्षेत ग्रीक भाषेतला एक मोठा उतारा भाषांतरासाठी घालायचा आहे. हा उतारा पाठ्यपुस्तकाबाहेरील असला पाहिजे असा नियम आहे. हा उतारा कुठला आहे हे जर एखाद्या विद्यार्थ्याला आधीच कळलं तर त्याला फार मोठा फायदा होऊ शकतो म्हणूनच या प्रश्नपत्रिका आम्ही अगदी काळजीपूर्वक सांभाळतो."
"आज सुमारे तीन वाजता मुद्रणालयातून या प्रश्नपत्रिकांची मुद्रिते आणि छापलेले गठ्ठे माझ्या ऑफिसमधे येऊन पडले. त्यात छापलेला उतारा बारकाईने तपासणं गरजेचं होतं. म्हणून मी साडेचारपर्यंत ते तपासत बसलो होतो. पण अजून ते काम पूर्ण झालं नव्हतं. मला माझ्या एका मित्राकडे चहासाठी जायचं होतं म्हणून ते कागद टेबलावर तसेच ठेवून मी बाहेर पडलो. मला परत यायला साधारण एक तासभर लागला असेल. "
"तुम्हाला ठाऊकच आहे की कॉलेजच्या ऑफिस-खोल्यांना दोन दारं असतात. आतून हिरव्या रंगाचं, आणि बाहेरून मोठं आणि जड असं ओक लाकडाचं. मी जेंव्हा परत आलो तेंव्हा या बाहेरच्या दरवाज्याच्या अंगच्या कुलुपात एक किल्ली होती. ती पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं. एक क्षणभर मला वाटलं मी जाताना किल्ली दरवाज्यालाच विसरून गेलो की काय. पण मी खिसा चाचपून पाहिला तर माझी किल्ली माझ्या खिशातच होती. माझ्या खोलीच्या कुलुपाची एकच दुसरी किल्ली आहे जी माझ्या नोकराकडे असते. बॅनिस्टर त्याचं नाव. तो गेली दहा वर्षं माझ्याकडे काम करतो आहे तो अतिशय विश्वासू आणि खात्रीलायक माणूस आहे. ती किल्ली नीट पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ती किल्ली बॅनिस्टरचीच होती. तो मला चहा हवा आहे का असं विचारायला माझ्या खोलीत आला होता आणि बाहेर पडताना निष्काळजीपणाने तो ती किल्ली कुलुपात तशीच विसरला होता. मी बाहेर पडल्या पडल्या लगेचच तो तिथे आला असावा. त्याच्या या वागण्याचा एरवी इतका त्रास झाला नसता पण आज खूप विचित्र परिस्थितीत ही घटना घडली आहे आणि त्याचे परिणाम घातक होऊ शकतात."
"आत येऊन माझ्या टेबलाकडे नजर टाकताच माझ्या असं लक्षात आलं की माझी कागदपत्रं कोणीतरी हलवली होती. प्रश्नपत्रिकेचे तीन मोठे ताव मी एकत्र नीट रचून ठेवले होते. पण मी परत आलो तेंव्हा त्यातला एक जमिनीवर पडलेला होता. एक खिडकीजवळच्या लहान टेबलावर होता आणि फक्त एकच त्याच्या मूळ जागी होता.. "
आत्तापर्यंतच्या कथनात होम्सला पहिल्यांदाच रस वाटलेला दिसला
"पहिलं पान जमिनीवर, दुसरं खिडकीजवळ आणि तिसरं पान जागच्या जागी होतं ना?" होम्सने विचारलं.
"अगदी बरोब्बर! पण तुम्हाला कसं कळलं?"
"तुमची हकीगत रंगतदार आहे.. पुढे सांगा.."
"आधी मला वाटलं की बॅनिस्टरनेच प्रश्नपत्रिकांची हलवाहलवी केली आहे. मी लगेच त्याला विचारलं. पण त्याने साफ नकार दिला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तो खोटं बोलत नसावा हे मला कळत होतं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. दुसरी शक्यता अशी होती की कुलुपाला किल्ली तशीच पाहून कोणीतरी चोरून प्रश्नपत्रिका बघण्यासाठी माझ्या ऑफिसात शिरलं होतं. मी बाहेर गेलो आहे हे त्या माणसाला माहीत असावं. शिष्यवृत्ती अतिशय प्रतिष्ठेची आहे आणि तिची रक्कमही बरीच जास्त आहे. या रकमेपायी एखाद्याला असं काही कृत्य करण्याचा मोह निश्चित पडू शकतो."
"बॅनिस्टरला झाल्या प्रकाराचा बराच धक्का बसला होता. प्रश्नपत्रिकेचे ताव हलवले गेले आहेत हे कळल्यावर तो एकदम बेशुद्ध पडला. मी त्याला थोडी ब्रॅंडी दिली आणि एका खुर्चीत बसवले. तो सावरेपर्यंत मी त्या खोलीची काळजीपूर्वक तपासणी केली. माझ्या असं लक्षात आलं की त्या पसरलेल्या कागदांशिवाय इतरही काही खुणा असं दर्शवत होत्या की खोलीत कोणीतरी आलं होतं. खिडकीजवळच्या टेबलावर एका पेन्सिलीला टोक केल्यावर पडलेल्या लाकडाच्या कपच्या होत्या. एक शिसाचा मोडका तुकडाही जवळच पडला होता. घाईघाईने तो उतारा उतरवून घेताना त्या घुसखोराच्या पेन्सिलीचे टोक मोडले होते आणि त्याला पुन्हा टोक करून घ्यावे लागले होते. "
"सुरेख!" होम्सची चिडचिड कुठच्या कुठे पळाली होती आणि या केसने त्याचे सगळे लक्ष वेधून घेतले होते. तो म्हणाला " दैव तुमच्या बाजूने आहे..."
"एवढंच नाही अजूनही काही खुणा होत्या. माझ्या लिहिण्याच्या टेबलाचा पृष्ठभाग अगदी स्वच्छ, गुळगुळीत आहे आणि लाल रंगाच्या उत्कृष्ट चामड्याने तो मढवलेला आहे. या पृष्ठभागावर मला एक तीन इंच लांब अशी फाटल्याची खूण दिसली. शिवाय त्या टेबलावर एक लहानसा मातीचा काळा डोंगर होता ज्यात लाकडाचा भुस्साही मधे मधे दिसत होता. माझी अशी खात्री आहे की या दोन्ही खुणा त्या घुसखोराच्याच होत्या. बाकी तिथे पावलांचे ठसे वगैरे आढळले नाहीत किंवा तो कोण होता हे कळू शकेल अशा खुणाही तिथे नव्हत्या. मला काय करावं काही सुचेनासं झालं होतं तेंव्हाच मला आठवलं की तुम्ही इथे जवळच आहात. म्हणून मी सरळ तुमच्याकडे आलो. प्लीज मला मदत करा. मला त्या घुसखोराला पकडलं पाहिजे किंवा पुन्हा प्रश्नपत्रिका तयार होईपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलली पाहिजे. पण परीक्षा पुढे ढकलावी लागली तर त्यासाठी कारणे द्यावी लागतील आणि त्यातून मोठा घोटाळा होऊन बसेल. यात कॉलेज आणि विश्वविद्यालय दोन्हींची बदनामी होणार आहे. मला हे प्रकरण शक्यतोवर बाहेर न फोडता निस्तरायचं आहे"
"हम्म.. मला या प्रकरणात लक्ष घालायला आवडेल. पाहू या काय होतंय ते.
बरं मला एक सांगा, छापलेल्या प्रश्नपत्रिका आल्यावर कोणी तुमच्या खोलीत आलं होतं का?"
"हो. मि. दौलत रास आला होता. तो एक भारतीय विद्यार्थी आहे. तो त्याच मजल्यावर राहतो. उद्याच्या परीक्षेबाबत काही तपशील विचारायला तो आला होता."
"तो उद्याच्या परीक्षेला बसणार आहे?"
"हो"
"त्या वेळी प्रश्नपत्रिका तुमच्या टेबलावर पसरल्या पसरल्या होत्या?"
"मला आठवतंय त्याप्रमाणे त्या गुंडाळून ठेवल्या होत्या"
"पण त्या प्रश्नपत्रिका आहेत हे त्याला ओळखता आलं असेल का?"
"उम्म तशी शक्यता आहे"
"तुमच्या ऑफिसात इतर कोणीच आलं नव्हतं?"
"कोणीच नाही"
"छापलेल्या प्रश्नपत्रिका तुमच्या खोलीत असतील हे कोणाला माहीत होतं?"
"छापखानावाला सोडून कोणालाच नाही."
"म्हणजे बॅनिस्टरलाही माहीत नव्हतं?"
"हो. त्याला माहीत नव्हतं"
"आता कशी आहे त्याची तब्येत?"
"माहीत नाही. बिचारा बॅनिस्टर...तुम्हाला भेटायच्या घाईत मी त्याला खुर्चीवर तसाच सोडून आलो..."
"तुम्ही तुमचं दार उघडंच टाकून आलात?"
"हो पण त्या प्रश्नपत्रिका कुलूपबंद केल्या आहेत मी"
"अच्छा. म्हणजे एकुणात असं दिसतंय की जर तुमच्या टेबलावरील कागद म्हणजे छापलेल्या प्रश्नपत्रिका आहेत हे त्या भारतीय विद्यार्थ्याच्या लक्षात आलं नसेल, तर त्यांना हात लावणाऱ्या माणसाला या गोष्टीची काहीच पूर्वकल्पना नव्हती."
"हो असंच वाटतंय..."
"हम्म. चला आपण प्रत्यक्षच जाऊन पाहू या!" होम्स म्हणाला. " वॉटसन, ही केस तुझ्या पठडीतली नाही. इथे मानसिक किंवा शारीरिक गोष्टी दिसत नाहीत. पण तुला हवं तर तू येऊ शकतोस..."
"मि. सॉम्स, मी चला. मी तुमच्या सेवेला तत्पर आहे...."

--अदिती

Labels: ,

तीन विद्यार्थी!!!(२)

मि. सॉम्सच्या ऑफिसची इमारत जुन्या पद्धतीची होती. त्यांच्या बैठकीच्या खोलीला लागून एक खूप मोठी, पट्ट्यापट्ट्यांची नक्षी केलेली खिडकी होती. बाहेर एक मोठं गोथिक पद्धतीचं दार होतं. दाराला लागून एक जुनाट जिना होता. तळमजल्यावर सॉम्सची खोली होती. वरच्या मजल्यांवर त्या तीन विद्यार्थ्यांच्या खोल्या होत्या. आम्ही घटनास्थळाशी पोहोचलो तेंव्हा नुकतीच संधिप्रकाश पडायला सुरुवात झाली होती. होम्स आत येता येता थबकला आणि त्याने त्या मोठ्या खिडकीचं काही वेळ निरीक्षण केलं. मग खिडकीजवळ जाऊन टाचा उंचावून चवड्यांवर उभं राहून आपली मान शक्य तितकी उंच करत त्याने काही वेळ आत डोकावून पाहिलं.
"तो दारातूनच आला असणार. खिडकीच्या एका पाख्याशिवाय तिथून आत यायला मोकळी जागाच नाहीये ." मि. सॉम्स म्हणाले.
"छान!" होम्स म्हणाला "हम्म इथे बघण्यासारखी आणखी काही नसेल तर आपण आत जाऊ"
सॉम्सनी बाहेरच्या दरवाज्याचे कुलूप काढून आम्हाला आत नेले. होम्स गालिच्याचे निरीक्षण करत होता तोवर आम्ही दरवाज्यातच उभे राहिलो.
"इथे कुठलेच ठसे नाहीयेत." तो म्हणाला. " अर्थात आज हवा बरीच कोरडी आहे त्यामुळे तशी अपेक्षा करणंही चूकच आहे म्हणा.
तुमच्या नोकराची तब्येत आता बरीच सुधारलेली दिसतेय. तुम्ही त्याला खुर्चीत बसवून आला होतात ना? कुठल्या खुर्चीत बसवलं होतंत त्याला?"
"त्या तिकडच्या खुर्चीत"
"आपण आधी टेबलाकडे मोर्चा वळवू. काय झालं असेल हे उघड आहे. आत आलेल्या माणसाने खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावरून एक एक करून प्रश्नपत्रिकेची पानं घेतली. ती घेऊन तो खिडकीजवळच्या लहान टेबलावर बसला. कारण त्याला खिडकीबाहेर लक्ष ठेवायचं होतं. म्हणजे तुम्ही येताना दिसताच त्याला पळ काढता आला असता. "
"खरं सांगायचं तर त्याला पळ काढता आला नाही. कारण मी बाजूच्या दाराने आत आलो."
"छान! पण तरीही त्याच्या डोक्यात योजना तशीच होती. मला ती पानं दाखवा पाहू. हम्म बोटांचे ठसे तरी दिसत नाहीयेत. त्याने आधी पहिलं पान खिडकीजवळ नेलं आणि त्याची प्रत करून घेतली. यासाठी त्याला किती वेळ लागला असेल बरं? साधारण पंधरा मिनिटं. त्यापेक्षा कमी नाही. ती झाल्यावर त्याने हातातलं पान खाली ठेवलं आणि दुसरं घेतलं. तो ते उतरवून घेत असतानाच त्याला तुमची चाहूल लागली आणि त्याला अतिशय घाईघाईने पळून जायला लागलं. त्याला खूपच घाईघाईने पळून जावं लागलं असणार कारण ते दोही ताव टेबलावर जागच्या जागी ठेवायला त्याला वेळच मिळाला नाही.
तुम्ही दाराजवळ असताना तुम्हाला पावलांचा आवाज आला का?"
"नाही."
"तो इतका जोरजोरात लिहीत होता की त्याच्या पेन्सिलीचं टोक मोडलं आणि त्याला ते परत करावं लागलं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. वॉटसन हे पहा. हे पेन्सिल साधी नाही. ती नेहमीपेक्षा जास्त लांब होती, तिचं शिस मऊ होतं, ती बाहेरून निळी होती आणि ती तयार करणाऱ्या कंपनीचं नाव चंदेरी अक्षरात तिच्यावर लिहिलं होतं. तिच्या आता शिल्लक तुकड्याची लांबी फक्त दीड इंच असावी. मि. सॉम्स , अशा पेन्सिलीच्या मालकाचा शोध घ्या. तुम्हाला तुमचा घुसखोर सापडेल. त्यात त्या माणसाकडे एक मोठा धारदार चाकू आहे हे सांगितल्यावर तर त्याला शोधणं आणखी सोपं होईल."
होम्सचं बोलणं ऐकत असताना मि. सॉम्स आश्चर्यचकित झाले होते.
"या गोष्टींचा मी तपास करतो. पण हे पेन्सिलीच्या लांबीबद्दल तुम्ही कसं काय सांगितलंत ते काही मला कळलं नाही"
होम्सने त्या पेन्सिलीच्या लाकडी कपच्यांपैकी एक तुकडा त्यांच्यापुढे धरला. त्यावर MN असं चंदेरी अक्षरांमधे लिहिलेलं होतं.
"हे पाहिलंत..?"
"हो पण अजूनही माझ्या काहीच लक्षात येत नाहीये.."
"हम्म वॉटसन आणि इतरांवर मी कधीकधी अन्याय करतो की काय अशी शंका मला येते. आता हे पहा. या MN चा अर्थ काय असू शकेल? बहुधा एखाद्या शब्दाची शेवटची दोन अक्षरे असावीत. साधारणपणे पेन्सिलींच्या बाजारपेठेत जोहान फेबर हे नाव खूप प्रसिद्ध आहे.पण पेन्सिलीच्या उरलेल्या भागावरून तिच्यावर Johann असं लिहिलेलं नसावं असं वाटतंय." त्याने ते छोटं टेबल शेजारच्या विजेच्या दिव्याच्या प्रकाशात सरकवलं.
"त्याने ज्या कागदावर लिहिलंय तो जर पुरेसा पातळ असला तर आपल्याला या टेबलाच्या गुळगुळीत पृष्ठभागावर त्याचे ठसे सापडायला हवेत. पण मला इथे तसं काही दिसत नाही. आता या मोठ्या टेबलाकडे वळू या. हा काळा डाग म्हणजे तुम्ही म्हणता तो मातीचा डोंगर दिसतोय. साधारण पिरॅमिडच्या आकाराचा आणि आतून पोकळ. तुम्ही म्हणालात तसे यात भुश्श्याचे कणही दिसताहेत.
अरेच्या! ! ही फाटल्याची खूण तर खास आहे. या इथून फाटायला सुरुवात झाली आणि या इथपर्यंत चांगलाच मोठा तुकडा निघाला आहे. मि. सॉम्स, ही गोष्ट मला दाखवलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार!
आता मला सांगा या दरवाज्यापलिकडे काय आहे? "
"माझी निजायची खोली"
"हा सगळा प्रकार झाला तेंव्हापासून तुम्ही आत गेला आहात का?"
"नाही मी तर सरळ तुमच्याकडेच धाव घेतली"
"मला ही खोली आतून बघायची आहे. हे जुन्या काळातलं फर्निचर खूपच सुरेख दिसतंय. तुम्ही काही वेळ बाहेर थांबता का? तोवर मी जरा इथली फरशी तपासतो. उम्म इथे काही नाहीये. आता हा पडदा पाहू या. हाही जुन्या पद्धतीचा दिसतोय. याच्या मागे काय आहे? इथे तुम्ही तुमचे कपडे ठेवता का? जर एखाद्या माणसाला या खोलीत लपून बसायचं असेल तर तो कुठे लपू शकेल? याच पडद्यामागे लपेल कारण पलंगाखाली लपायला जागा नाही आणि कपाटाची रुंदी एखादा माणूस लपून बसू शकेल इतकी नाही. आत्ता इथे कोणी नसणार म्हणा "
असं म्हणत त्याने तो पडदा बाजूला सारला. त्याच्याकडे पाहताच मला जाणवलं की तो खूप सावध आणि तयारीत होता. कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची त्याची तयारी होती. पण तसे काही घडले नाही. त्या पडद्यामागे एक खुंटाळं होतं ज्याला तीन चार कपडे अडकवून ठेवलेले होते. होम्स मागे वळला आणि अचानक जमिनीकडे पहात उभा राहिला.
"अरे वा! हे बघा काय आहे!"
तिथे एक लहानसा वाळूचा डोंगर होता. अगदी टेबलावर होता तसाच.विजेच्या दिव्याच्या प्रकाशात होम्सने तो आपल्या तळहातावर घेतला.
"मि. सॉम्स, तुमच्या घुसखोराने त्याचा माग तुमच्या बैठकीच्या खोलीबरोबरच तुमच्या निजायच्या खोलीतही ठेवलाय"
"पण त्याचं इथे काय काम असेल?"
"उघड आहे. तुम्ही बाजूच्या दरवाज्यातून आत आलात त्यामुळे तुम्ही थेट दारापर्यंत येईपर्यंत त्याला तुमची चाहूल लागली नाही. अशा वेळेला त्याने काय केलं? त्याच्या सगळ्या वस्तू उचलून तो इथे आत येऊन लपला."
"अरे बापरे! म्हणजे मी जेंव्हा बॅनिस्टरशी बोलत होतो तेंव्हा तो आत अडकलेला होता? अरेरे... आम्हाला जरा जरी कल्पना असती तर.."
"हो असंच दिसतंय"
"पण त्याला इतर मार्गही असतील की.... तुम्ही ही खिडकी तपासून पाहिलीत का?"
"शिसाची चौकट, लेटिसचं लाकूडकाम, तीन दारं, त्यातलं एक बिजागऱ्यांवर आतबाहेर होणारं आणि इतकं मोठं की एका माणसाला सहज आत येता येईल."
"हो. त्या खिडकीतून बाहेरचं पटांगण एका कोनातून दिसतं पण आतला माणूस बाहेरून नीट दिसत नाही. तो इथून आत आला असावा आणि या दारातून बाहेरच्या खोलीत गेला असावा. जाताना त्याचे हे ठसे उमटले असावेत. बाहेरच्या खोलीचं दार उघडं असलेलं पाहून तो पळून गेला असावा."
होम्सने वैतागाने मान हलवली.
"आपल्याला काय घडलं असणं शक्य आहे याचा विचार करायला हवा. तुम्ही असं म्हणालात ना की इथे तीन विद्यार्थी राहतात आणि त्यांना आपापल्या खोलीत जाताना तुमच्या दारावरून जावं लागतं?"
"हो"
"आणि ते तिघंही उद्याच्या परीक्षेला बसणार आहेत?"
"त्यांच्यातल्या कोणावर तुमचा संशय आहे का?"
"हा प्रश्न फारच अवघड आहे. आपल्या हाती पुरावा नसताना आरोप करणं चांगलं नाही."
"तुम्ही तुमचं मत सांगा. पुरावे आपण नंतर शोधू."
"मी तुम्हाला त्या तिघांची काही वैशिष्ट्यं सांगतो. पहिल्या मजल्यावर गिल्खिस्ट राहतो. तो अतिशय हुशार मुलगा आहे आणि तितकाच चांगला खेळाडू पण आहे. तो कॉलेजच्या रग्बी आणि क्रिकेट संघांमधे आहे. नुकतंच त्याला लांब उडीच्या स्पर्धेत बक्षीस मिळालं आहे. त्याची शरीरयष्टी खेळाडूला साजेशी तगडी आहे. त्याचे वडील मि. जॅबेझ गिल्ख्रिस्ट त्यांच्या रेसच्या वेडापायी कर्जबाजारी होऊन गेले. पण तो खूप कष्टाळू आहे. एक दिवस तो नक्की पुढे जाईल."
"दुसऱ्या मजल्यावर मि. दौलत रास राहतो. तो भारतीय आहे. सगळ्या भारतीय लोकांप्रमाणे. तो बराच शांत असतो. तो खूपच चांगला आहे पण त्याचं ग्रीक जरासं कच्चं आहे. पण तो पद्धतशीरपणे आणि इतर गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ न देता अभ्यास करणारा मुलगा आहे."
"तिसऱ्या मजल्यावर मि. माईक मॅकलॅरन राहतो. त्याने खरंच मनावर घेतलं तर तो फारच हुशार आहे. खरं म्हणजे विश्वविद्यालयातल्या सर्वात हुशार मुलांपैकी तो एक असावा. पण त्याचा अभ्यास बरेचदा अनियमित, अकेंद्रित आणि रमतगमत चालतो. पहिल्या वर्षाला असताना काही भानगडींमधे अडकल्यामुळे त्याची जवळजवळ हकालपट्टीच झाली होती. या वर्षीही आत्तापर्यंत त्याने सगळा वेळ नुसताच वाया घालवला आहे. आता उद्याच्या परीक्षेची त्याला खरंच भिती वाटत असणार."
"म्हणजे तुमचा त्याच्यावर संशय आहे."
" तसंच काही मी म्हणणार नाही पण या तिघांमधे तोच असं करू शकेल असं वाटतं."
"खरंय. मि. सॉम्स आता आपण तुमच्या नोकराची गाठ घेऊ"
बॅनिस्टर हा एक ठेंगणा, फिकट चेहऱ्याचा, गुळगुळीत दाढी केलेला, करड्या केसांचा साधारणा पन्नाशीचा माणूस होता. मघा त्याला बसलेल्या धक्क्यातून तो अजूनही फारसा सावरला नव्हता. त्याच्या सुखासीन चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. त्याच्या हाताची बोटंही थरथरत होती.
"बॅनिस्टर, आम्ही आज घडलेल्या प्रकाराची चौकशी करत आहोत." मि. सॉम्स म्हणाले.
"होय साहेब"
"तू तुझी किल्ली दरवाज्याच्या कुलुपाला तशीच विसरलास?" होम्सने त्याला विचारले
"होय साहेब"
"नेमकी आजच म्हणजे प्रश्नपत्रिका कुलूप लावून ठेवलेल्या असतानाच तू ही किल्ली विसरावीस ही गोष्ट साधीसुधी खास नाही नाही का?"
"जे झालं ते फार वाईट होतं साहेबपण मी ही किल्ली याआधीही काही वेळा कुलुपाला विसरलो आहे."
"तू दार उघडून आत आलास तेंव्हा किती वाजले होते?"
"साडे चार वाजले होते. सॉम्स साहेब नेहमी याच वेळी चहा पितात."
"तू इथे किती वेळ होतास?"
"साहेब बाहेर गेलेत हे पाहून मी लगेच बाहेर आलो."
"तू टेबलावरच्या कागदांना हात लावला होतास का?"
"अजिबात नाही साहेब"
"तू किल्ली कुलुपातच कशी काय विसरलास?"
"माझ्या एका हातात चहाचा ट्रे होता म्हणून मी असा विचार केला की ट्रे ठेवून किल्ली काढून घ्यायला परत यावं. पण नंतर मी ती गोष्ट साफ विसरून गेलो."
"दाराला आपोआप बंद होणारं स्प्रिंगचं कुलूप बसवलेलं आहे का?"
"नाही"
"मग ते दार उघडंच होतं?"
"होय साहेब"
"जेंव्हा मि. सॉम्सनी तुला हाक मारली तेंव्हा तुला बराच धक्का बसला का?"
"होय साहेब. आजवर इतकी मोठी चूक माझ्या हातून झालेली नाही. मी जवळजवळ बेशुद्धच झालो"
"हो ते माहितेय मला. बरं मला सांग, तुला चक्कर आली तेंव्हा तू कुठे उभा होतास?"
"मी कुठे होतो? त्या तिथे दाराशेजारी"
"हम्म. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तू तिथे उभा होतास आणि तू या पलिकडच्या खुर्चीत बसलास. या मधल्या खुर्च्या तू का सोडून दिल्यास?"
"माहीत नाही साहेब. मी कुठे बसलो याला काहीच महत्त्व नाही"
"मि. होम्स त्याला यातलं काही माहीत असेल असं मला वाटत नाही. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याची अवस्था खरोखरीच अगदी वाईट दिसत होती."
"तुझे साहेब बाहेर पडले तेंव्हा तू याच ठिकाणी बसला होतास?"
"हो. ते बाहेर पडल्यावर एखादं मिनिट मी इथे असेन. मग मी दाराला कुलूप लावलं आणि माझ्या खोलीत गेलो."
"तुझा कोणावर संशय आहे का?"
"नाही. या विश्वविद्यालयाच्या परिसरात असा खोटेपणा करणारा कोणी माणूस असेल असं मला वाटत नाही साहेब."
"ठीक आहे. माझं काम झालंय." होम्स म्हणाला." एक मिनिट, या इमारतीतल्या इतर रहिवाशांना इथे चोरी झाली आहे त्याबद्दल तू काही सांगितलयस का?"
"नाही साहेब. मी काहीच बोललो नाहीये"
"तू त्यांच्यापैकी कोणाला भेटला होतास का?"
"नाही साहेब, कोणालाच नाही."
"छान!. मि. सॉम्स, तुमची हरकत नसेल तर आपण चौकापर्यंत एक चक्कर मारून येऊ या का?"
हळूहळू काळोख पडत होता आणि त्या काळोखात त्या इमारतीतल्या तीन प्रकाशमान चौकोनी खिडक्या उठून दिसत होत्या.
"तुमची तिन्ही पाखरं आपापल्या घरट्यांमधेच आहेत असं दिसतंय. पण हे काय? त्यातला एक बराच अस्वस्थ झालेला दिसतोय"
भारतीय विद्यार्थ्याच्या खिडकीच्या पडद्यावर त्याची काळी सावली पुढेमागे हलताना दिसत होती. तो त्याच्या खोलीत येरझाऱ्या घालत असावा.
मला त्यांची एकेक झलक हवी आहे. आत्ता जमू शकेल का?"
"हो अगदी सहज जमेल. ही इमारत इथल्या सगळ्यात जुन्या इमारतींपैकी एक आहे. त्यामुळे इथले पाहुणे तिचं निरीक्षण करायला येत असतात. चला मीच तुम्हाला घेऊन जातो"
"आमची नावं सांगू नका" होम्स म्हणाला आणि मग आम्ही गिल्ख्रिस्टचा दरवाजा ठोठावला.
"एका पिवळ्या केसांच्या सडपातळ तरुण मुलाने दार उघडून आमचं स्वागत केलं. त्या खोलीत काही मध्ययुगीन वास्तुकलेचे दुर्मिळ नमुने होते. त्यातला एक नमुना पाहून होम्स इतका प्रभावित झाला की लगेच त्याने खिशातून एक वही काढून पेन्सिलीने त्याचे रेखाचित्र काढून घ्यायला सुरुवात केली. चित्र काढताना त्याच्या पेन्सिलीचे टोक मोडले. मग त्याने गिल्ख्रिस्टकडे पेन्सिल मागितली आणि शेवटी त्याच्या पेन्सिलीला टोक करायला गिल्ख्रिस्टचा चाकूही मागून घेतला. हाच प्रकार त्या भारतीय विद्यार्थ्याच्या खोलीतही घडला. तो भारतीय विद्यार्थी बराच अबोल आणि बुटकासा होता. होम्सच्या या वास्तुशास्त्रीय कुतूहलामुळे तो बराच वैतागलेला दिसत होता आणि आम्ही तिथून बाहेर पडल्यावर त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. पण या दोन्ही वेळेला होम्सला अपेक्षित क्लू मिळाला नाही असं मला वाटलं. तिसऱ्या वेळी मात्र आम्हाला यश मिळाले नाही. तिसऱ्या विद्यार्थ्याने दार उघडले तर नाहीच पण तो आमच्या अंगावर ओरडला
" तुम्ही कोणीही असाल. मला त्याची पर्वा नाही. तुम्ही खड्ड्यात जा. उद्या माझी परीक्षा आहे आणि आत्ता इतर कुठल्याही गोष्टीला मी महत्त्व देत नाही."
"हद्द झाली उद्धटपणाची" मि. सॉम्स खाली उतरताना म्हणाले. "अर्थात त्याला हे माहीत नव्हतं की मी त्याचं दार वाजवलं होतं पण त्याचं वागणं निश्चित चुकीचं आणि सध्याच्या परिस्थितीत तर संशयाला पुष्टी देणारं होतं"
यावर होम्सचं उत्तर मात्र वेगळंच होतं.
"त्याची उंची किती आहे हे तुम्ही मला सांगू शकाल का?"
"नक्की सांगता येणार नाही. तो मि. रासपेक्षा उंच आहे पण गिल्ख्रिस्टपेक्षा बुटका आहे. साधारण साडेपाच फुटाच्या घरात असेल."
"हा मुद्दा महत्त्वाचा आहे. असो मि. सॉम्स आता मी तुमची रजा घेतो"
हे ऐकून मि. सॉम्सना बराच धक्का बसलेला दिसला. ते कळवळून म्हणाले " मि होम्स, अशा संकटाच्या प्रसंगी तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. प्रसंगाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. उद्या परीक्षा आहे आणि मला आजच काहीतरी पावले उचलणे भाग आहे. जर ती प्रश्नपत्रिका फुटली असेल तर मला उद्याची परीक्षा पुढे ढकलावी लागेल. हा निर्णय घ्यायला यापेक्षा जास्त वेळ घालवून चालणार नाही"
"सध्या हा निर्णय असाच राहू द्या. उद्या सकाळी लौकर मी तुमच्याकडे येतो. मग आपण यावर थोडा वेळ चर्चा करू आणि मग मी तुम्हाला निश्चित सल्ला देऊ शकेन. तोवर तुम्ही काहीही बदलू नका. लक्षात ठेवा काहीही बदलू नका."
"ठीक आहे मि. होम्स"
"तुम्ही तुमच्या डोक्याला त्रास देत बसू नका. आपण यातून नक्कीच काही मार्ग काढू. सध्या मी ही वाळू आणि पेन्सिलीच्या लाकडाच्या कपच्या घेऊन जातो आहे. गुड नाईट!"
खाली चौकातून आम्ही पुन्हा एकदा त्या इमारतीकडे नजर टाकली. तो भारतीय विद्यार्थी अजूनही अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. बाकीचे दोघे मात्र कुठे दिसत नव्हते.
"हम्म. वॉटसन, सांग बरं तुला काय वाटतंय?" आम्ही हमरस्त्यावर आलो.
"एखाद्या घरगुती नाटकाचा लहानसा अंक असावा तसा आहे हा प्रकार. तुझ्यासमोर तीन पर्याय आहेत. तू कोणता पर्याय निवडशील?"
"सगळ्यात वरच्या मजल्यावरचा प्राणी. त्याच्याबद्दल फारसं चांगलं काही ऐकायला आलेलं नाही. अर्थात तो भारतीय मुलगा सुद्धा जरा विचित्रच आहे. इतक्या अस्वस्थ येरझाऱ्या घालण्याचं कारण काय असावं बरं?"
"त्यात विचित्र वाटण्यासारखं काहीच नाही. बरेच लोक एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करताना येरझाऱ्या घालतात."
"तो आपल्याकडे विचित्र नजरेने बघत होता"
"जर उद्या तुझी परीक्षा असती आणि आधल्या दिवशी विचित्र चौकसपणा घेऊन आलेला एक अनोळखी माणसांचा घोळका तुझा महत्त्वाचा वेळ खात तुझ्या दाराशी उभा राहिला असता तर तूही असाच वागला असतास. पेन्सिली, चाकू सगळं व्यवस्थित होतं. पण त्या माणसाचं मात्र मला कोडं पडलंय"
"कोणाचं?"
"बॅनिस्टर. या प्रकरणातून त्याला काय मिळणार आहे कळत नाही."
"मला तर तो प्रामाणिक वाटला."
"हो मलाही. पण मला हे कळत नाहीये की अशा प्रामाणिक माणसाने...
अरे! इथे स्टेशनरीची दुकानं आहेत. आपण चौकशीला इथूनच सुरुवात करू या"
"त्या गावात एकूण चार स्टेशनरीची दुकानं होती. त्यातल्या प्रत्येक दुकानात होम्सने पेन्सिलीच्या लाकडाच्या कपच्या दाखवल्या आणि तशाच दुसऱ्या पेन्सिली विकत मागितल्या. सगळ्या दुकानदारांनी त्याला सांगितलं की त्यांची लांबी वेगळी असल्यामुळे त्या नेहमी उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या मागवाव्या लागतील. अर्थात या गोष्टीमुळे होम्स निराश झाल्यासारखा वाटला नाही. फक्त त्याने हसून आपले खांदे उडवले.
"वॉटसन, आपला एकमेव ठोस पुरावा अयशस्वी ठरला आहे. पण माझी अशी खात्री आहे की उपलब्ध पुराव्यावर आपण एक चांगली केस उभी करू शकू. अरेच्या! नऊ वाजले. आपल्या घरमालकीणबाई साडेसातनंतर आलात तर जेवायला मिळणार नाही असं मघाच म्हणाल्या होत्या. काय रे वॉटसन तुझ्या या अनियमित जेवणाच्या वेळा, ही तंबाखू ओढायची सवय... अशाने तुझी तिथून हकालपट्टी होईल आणि माझ्यावरही तुझ्यामागोमाग रस्त्यावर यायची वेळ येईल. पण त्याआधी आपण हे तीन विद्यार्थ्यांचं कोडं सोडवून टाकू या"

--अदिती

Labels: ,

तीन विद्यार्थी!!!(३)

त्या दिवशी रात्री आम्हाला जेवायला बराच उशीर झाला. आमचं जेवण झाल्यावर होम्स बराच वेळ विचार करत बसला होता पण या विषयाबद्दल त्याने चकार शब्द काढला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमाराला तो माझ्या खोलीत आला तेंव्हा माझी आन्हिकं नुकतीच आटोपली होती.
"वॉटसन, आपल्याला सेंट ल्यूक्स कॉलेजला भेट दिली पाहिजे. ब्रेकफास्टला उशीर झाला तर चालेल ना तुला?"
"हो. चालेल."
"आपण तिथे पोहोचेपर्यंत काळजीने सॉम्स निम्मे झाले असतील बहुधा."
"तुझ्याकडे चांगली बातमी आहे तर!"
"हो तसं म्हणायला हरकत नाही"
"कोडं सुटलं का?"
"होय! मी हे रहस्य उलगडलं आहे"
"पण तुला आणखी पुरावा कुठे मिळाला?"
"भल्या पहाटे सहा वाजता उठून दोन तास कष्ट केले आणि पाच एक मैल चालून आलं की पुरावा आपोआप मिळतो मित्रा! हे बघ"
त्याने त्याची मूठ उघडली. त्याच्या तळहातावर वाळलेले मातीचे तीन शंक्वाकृती डोंगर होते.
"अरे पण काल तर तुझ्याकडे दोन डोंगर होते"
"हो पण आत्ता सकाळी तीन आहेत. आणि असं म्हणायला निश्चितच जागा आहे की जिथून हे पहिले दोन नमुने आले तिथूनच हा तिसराही आला आहे. चल वॉटसन. सॉम्सची काळजी दूर करू"
जेंव्हा आम्ही सॉम्सच्या घरी पोहोचलो तेंव्हा काळजीने खरंच त्यांचा जीव अर्धा झाला होता. थोड्याच वेळात परीक्षा सुरू होणार होती. आणि ती पुढे ढकलावी की कसे यावर त्यांना अजूनही मार्ग सापडला नव्हता. त्यांच्या अस्वस्थतेमुळे त्यांना एका जागी उभं राहणंही शक्य होत नव्हतं. आम्ही आत गेलो तेंव्हा ते धावतच होम्सपाशी आले. आपले दोन्ही हात त्यांनी असहायपणे होम्सपुढे पसरले.
"देवासारखे आलात हो! मला वाटलं तुमचाही आधार सुटतो आहे की काय. परीक्षेचं काय करायचं ते मला लौकर सांगा. "
"परीक्षा ठरल्याप्रमाणेच घ्यायला काहीच हरकत नाही."
"अहो पण तो भुरटा..."
"तो परीक्षेला बसणार नाही."
"चोर सापडला?"
" हे प्रकरण बाहेर जाणार नाहीये. त्यामुळे आता जरासा कायदा हातात घेऊन आपणच इथे एक छोटासा खटला चालवणार आहोत या आणि एका माणसाचं कोर्ट मार्शल करणार आहोत. सॉम्स तुम्ही इथे बसा. वॉटसन तू इथे बस. मी या खुर्चीत बसतो. चला झाली सगळी तयारी
वाजवा घंटा..."
बॅनिस्टर आत आला. आमच्याकडे पाहून त्याला धक्का बसलेला आम्हाला स्पष्ट दिसला .
"दार लावून घे." होम्स म्हणाला. " आता आम्हाला खरं खरं सांग काल काय झालं ते"
हे वाक्य ऐकल्यावर त्याचा चेहरा पांढरा फटक पडला.
"मी कालच तुम्हाला सगळं सांगितलंय साहेब"
"त्यात काही भर घालण्यासारखं काही नाही का तुझ्याकडे?"
" नाही. काहीच नाही."
"ठीक आहे. माझा अंदाज मी तुला सांगतो. काल संध्याकाळी इथे असलेली एखादी गोष्ट लपवायला म्हणून तू या खुर्चीत बसलास का?"
बॅनिस्टरचा चेहरा आणखी पडला.
"नाही साहेब तसं काही नाहीये"
"अर्थातच हा माझा एक अंदाज आहे. या गोष्टीचा माझ्याकडे काहीच पुरावा नाही. पण माझा अंदाज बरोबर ठरण्याची शक्यता बरीच जास्त आहे." होम्स मुत्सद्दीपणे म्हणाला.
" सॉम्स साहेबांची पाठ वळताच तू आतल्या खोलीत लपून बसलेल्या माणसाला बाहेर सोडलंस"
बॅनिस्टरच्या तोंडाला एव्हाना कोरड पडली होती.
"आत कोणीच नव्हतं साहेब"
"आता मात्र तू अडकलास बॅनिस्टर. आत्तापर्यंत तू कदाचित खरंही बोलला असशील पण तुझं हे वाक्य साफ खोटं आहे हे मला माहिती आहे."
"आत कोणीच नव्हतं साहेब" कसल्या तरी निश्चयाने तो ठामपणे म्हणाला.
"असं काय करतोस बॅनिस्टर? कबूल करून टाक"
"आत खरंच कोणीही नव्हतं साहेब"
"ठीक आहे. तू आम्हाला काही न सांगायचं ठरवलेलं दिसतंयस. हरकत नाही. त्या भिंतीशेजारी जाऊन उभा राहा. मि. सॉम्स तुम्ही वर जाऊन गिल्ख्रिस्टला इथे बोलावून आणू शकाल का?"
काही क्षणातच मि. सॉम्स परत आले. त्यांच्या मागोमाग गिल्ख्रिस्ट आत आला. त्याचा तरुण चेहरा प्रसन्न आणि उत्साही दिसत होता. उंच, सडपातळ , चपळ असा गिल्ख्रिस्ट म्हणजे तारुण्याचं मूर्त रूप असावा असं वाटत होतं. त्याच्या निळ्या डोळ्यांत मात्र प्रश्नचिन्हे होती. त्याने आम्हा सगळ्यांकडे नजर टाकली आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या बॅनिस्टरकडे तो अविश्वासाने पाहू लागला.
"मि. गिल्ख्रिस्ट ,जरा ते दार लावून घ्याल का? " होम्स म्हणाला. "हम्म. या खोलीत आपण मोजकीच लोकं आहोत. या खोलीत काय झालं हे या चार भिंतींच्या कधीही बाहेर जाणार नाही. आपण एकमेकांशी खरं बोलू शकतो. आता मला सांगा मि. गिल्ख्रिस्ट, तुमच्यासारख्या एका चांगल्या घरातल्या मुलाने कालचा प्रकार का करावा?"
एक क्षणभर तो हबकला आणि त्याने बॅनिस्टरकडे एक कटाक्ष टाकला. त्याचा संताप आणि त्याला बसलेला धक्का त्यातून स्पष्ट दिसत होता.
"गिल्ख्रिस्ट साहेब, मी एक शब्दही बाहेर पडू दिला नाही. मी त्यांना काहीही सांगितलं नाही."
"पण तू आत्ता हे वाक्य बोललास ना?
मि. गिल्ख्रिस्ट आता तुमच्यापुढे कबुलीजबाब देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही." होम्स म्हणाला.
एक क्षणभर गिल्ख्रिस्ट आपल्या भावनांना आवर घालायचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण नंतर अचानक तो खाली गुडघ्यांवर बसला आणि आपलं तोंड आपल्या ओंजळीत लपवून त्याने स्फुंदून स्फुंदून रडायला सुरुवात केली.
"शांत हो" होम्स त्याला हलकेच म्हणाला. " अरे जो चुका करतो तोच माणूस असतो. आणि तू कोणी निर्ढावलेला गुन्हेगार नाहीस हे आम्हाला ठाऊक आहे. आपण असं करू या. काय झालं असेल हे मी सांगतो. त्यात काही तपशील चुकला असेल तर तू तो दुरुस्त कर. ते तुला जास्त सोपं जाईल. चालेल? मी तुझ्यावर कुठे अन्याय तर करत नाही ना याकडे लक्ष दे "
"मि. सॉम्स , तुम्ही म्हणालात की प्रश्नपत्रिका तुमच्या खोलीत आहेत हे कुठल्याही मार्गाने बाहेर कळणार नाही , अगदी बॅनिस्टरही ते सांगणार नाही तेंव्हाच काय झालं असेल याचा मला उलगडा व्हायला लागला. छापखानावाल्याला मी संशयितांमधून बाजूला केलं कारण त्याला त्या प्रश्नपत्रिका त्याच्या छापखान्यातच पाहता आल्या असत्या. त्या भारतीय विद्यार्थ्यालाही मी संशयातून बाहेर काढलं कारण जर प्रश्नपत्रिकांची गुंडाळी टेबलावर असेल तर त्यांच्याबद्दल त्याला काहीही माहीत नसावं. मी ही शक्यताही निकालात काढली की एखादा माणूस नेमका त्याच दिवशी या खोलीत घुसला ज्या दिवशी प्रश्नपत्रिका टेबलावर ठेवलेल्या होत्या. घुसखोराला हे माहीत असणार की त्या प्रश्नपत्रिका खात्रीने टेबलावर होत्या. पण त्याला ते कळलं कसं?"
"मी जेंव्हा तुमच्या खिडकीची तपासणी करत होतो तेंव्हा तुम्हाला असं वाटलं की तिथून कोणी आत आलं नाही ना हे मी पाहतोय. पण एखादा माणूस दिवसाढवळ्या , समोरच्या सगळ्या खोल्यांमधे जाग- वर्दळ असताना असं काहीतरी करेल हे मला शुद्ध वेडेपणाचं वाटलं. मी हे पहात होतो की खिडकीतून डोकावून पाहिल्यावर टेबलावर ठेवलेल्या प्रश्नपत्रिका पाहू शकण्यासाठी त्या माणसाची उंची किती असायला हवी. मी स्वतः सहा फूट उंच आहे आणि तरीही मला त्या खिडकीतून बाहेर पाहायला कष्ट पडत होते. म्हणजे तो जो कोणी असेल त्याची उंची माझ्यापेक्षा कमी निश्चितच नसणार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या तीन विद्यार्थ्यांपैकी ज्याची उंची खूप जास्त आहे त्याचाच संशय घ्यायला हवा. "
"मी आत आलो आणि त्या कडेच्या लहान टेबलाबद्दल माझं मत मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या मुख्य टेबलावरून मी काहीच निष्कर्ष काढू शकलो नाही. तेंव्हाच तुम्ही मला गिल्ख्रिस्ट बद्दल सांगितलंत की तो लांब उडीमधे भाग घेतो. त्याच क्षणी सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला. आता मला फक्त काही छोटे पुरावे लागणार होते जे मी फारसा वेळ न दवडता मिळवले. "
" झालं असं होतं की हा मुलगा त्या दिवशी दुपारभर मैदानात लांब उडीचा सराव करत होता. त्याचे उडी मारताना घालायचे बूट हातात घेऊन तो इकडे परत आला. तुम्हाला माहीतच असेल की अशा प्रकारच्या बुटांना खाली मोठे अणकुचीदार खिळे असतात. खोलीत परत जात असताना त्याच्या उंचीचा फायदा मिळून त्याला खिडकीच्या चौकटीच्या फटीतून आतले कागद दिसले. ते कसले कागद होते हे त्याने लगेच ओळखलं. ही गोष्ट त्याला कळल्याने तसं म्हटलं तर काहीच फरक पडणार नव्हता. पण त्याला तुमच्या नोकराच्या निष्काळजीपणाने तुमच्या दरवाज्याच्या कुलुपाला तशीच राहिलेली किल्ली दिसली. टेबलावरचे कागद म्हणजे खरोखरीच प्रश्नपत्रिका आहेत का हे बघण्याची उर्मी अनावर झाली. अर्थातच कोणी काही विचारलं असतं तर तो असं म्हणू शकणार होता की तो काहीतरी शंका विचारायला आत आला होता."

"जेंव्हा त्याला कळलं की ते कागद खरंच प्रश्नपत्रिकेचे आहेत तेंव्हा या गोष्टीचा फायदा घेण्याचा मोह वरचढ ठरला. त्याने आपले बूट टेबलावर ठेवले. खिडकीजवळच्या खुर्चीत तू काय ठेवलं होतंस?"
"हातमोजे" गिल्ख्रिस्ट उत्तरला.
होम्सने एक विजयी कटाक्ष बॅनिस्टरकडे टाकला."त्याने आपले हातमोजे त्या खुर्चीत ठेवले आणि प्रश्नपत्रिकेचे ताव एकामागून एक घेत ते उतरवून घ्यायला सुरुवात केली. त्याला वाटलं की त्याचे सर खोलीच्या मुख्य दाराने आत येतील आणितो त्यांना येताना सहज पाहू शकेल. पण तुम्ही या बाजूच्या दरवाज्याने आलात. अचानक इतक्या जवळून तुमची चाहूल लागल्यामुळे तो गडबडला. त्याला पळून जायला काही मार्गच शिल्लक नव्हता. आपले बूट उचलून त्याने आतल्या खोलीकडे धाव घेतली. त्याचे हातमोजे घाईघाईत खुर्चीतच राहिले. तुम्ही जर नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की ही फाटण्याची खूण एकीकडे वरवर आहे तर आतल्या खोलीच्या दिशेने ती खोलवर जाते. यावरून हे स्पष्ट होतं की बूट त्या दिशेने उचलला गेला होता. अर्थातच चोराने त्या दिशेने धाव घेतली होती. एका खिळ्याला लागलेली माती टेबलावर पडली होती आणि तसाच दुसरा ठसा आत सापडला होता. इथे मी असं सांगू इच्छितो की आज पहाटे खेळाच्या मैदानात जाऊन मी लांब उडीसाठी वापरली जाणारी काळी माती तपासली. उडी मारून झाल्यावर खेळाडूचा पाय घसरू नये म्हणून जो भुस्सा पसरलेला असतो तो मिसळून त्या मिश्रणाचा एक नमुना मी घेऊन आलो आणि माझ्याकडचा दोन जुन्या नमुन्यांशी तो मी ताडून पाहिला. मी बोलतो आहे ते बरोबर आहे ना मि. गिल्ख्रिस्ट?"
तो एव्हाना उठून उभा राहिला होता. मान हलवत तो म्हणाला " हो हे सगळं खरं आहे."
"देवा रे! तुला यावर काय म्हणायचंय?"
"माझा गुन्हा उघडकीला आल्यामुळे मी जरासा भांबावलो आहे पण सर, मला तुम्हाला हे पत्र द्यायचंय. मी रात्रभर अस्वस्थ आहे आणि माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. मी हे आज पहाटे तुम्हाला देण्यासाठी लिहिलं. हे लिहिताना माझी चोरी पकडली गेली आहे हे मला माहीत नव्हतं. हे घ्या सर. मी त्यात लिहिलं आहे की मला या परीक्षेला बसायची इच्छा नाही. मला ऱ्होडेशिअन पोलिसांकडे एक चांगली नोकरी मिळालेली आहे आणि ती स्वीकारून मी लगोलग दक्षिण आफ्रिकेला चाललो आहे."
"तू खोटेपणाने न वागायचा आणि परिस्थितीचा गैरफायदा न घेण्याचा निर्णय घेतलास हे पाहून मला खूप आनंद झाला. पण तुझा निर्णय कसा काय बदलला?"
गिल्ख्रिस्टने बॅनिस्टरकडे हात केला. "या माणसाने मला योग्य मार्ग दाखवला." "बॅनिस्टर, तुझ्या लक्षात आलं असेल की मला हे कळलं होतं की तूच त्या माणसाला जाऊ दिलंस कारण तूच इथे होतास आणि तूच खोलीला कुलूप लावलंस. कारण तो त्या खिडकीतून बाहेर पडणं अशक्य होतं. आता तू तुझ्या वागण्याचं कारण आम्हाला सांग आणि हे रहस्य पूर्णपणे सोडव बरं."
"जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्हाला हे सगळं सोपं वाटलं असतं पण जरी तुम्ही अतिशय हुशार असलात तरी तुम्हाला हे माहीत असणं शक्य नाही. एके काळी या मुलाच्या वडिलांकडे , मि. जॅबेझ गिल्ख्रिस्ट साहेबांकडे मी बटलर होतो. ते दिवाळखोर झाले आणि मी या कॉलेजमधे नोकरी करू लागलो.पण माझ्या जुन्या मालकांचे उपकार मी विसरू शकलो नाही. ते या जगात नव्हते पण त्यांच्या मुलावर माझं बारीक लक्ष होतं.. काल जेंव्हा सॉम्स साहेबांनी मला हाक मारली तेंव्हा आत आल्या आल्या मला कोपऱ्यातल्या खुर्चीतले गिल्ख्रिस्ट साहेबांचे हातमोजे दिसले. मी ते मोजे चांगले ओळखत होतो आणि ते इथे असण्याचा अर्थ मला चटकन समजला. जर सॉम्स साहेबांना ते दिसले असते तर सगळा खेळ खलास झाला असता. मी त्या खुर्चीत बसकण मारली आणि तोपर्यंत ढिम्म हललो नाही जोवर सॉम्स साहेब तुम्हाला भेटायला बाहेर पडले नाहीत. तेवढ्यात आतून हे साहेब बाहेर आले. मी त्यांना एके काळी माझ्या अंगाखांद्यावर खेळवलंय हो. त्यांनी झाल्या प्रकाराची कबुली माझ्यापाशी दिल्यावर माझं मन द्रवलं. मी त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितल्या असत्या त्या चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या हातून झालेल्या चुकीची जाणीव करून दिली. आता मला सांगा माझं काही चुकलं का?"
"मुळीच नाही" असं म्हणत होम्स आपल्या खुर्चीतून उठला. तो आनंदाने हसत होता.
"मि. सॉम्स, तुमचा प्रश्न आता सुटला आहे आणि आम्हालाही भुका लागल्या आहेत त्यामुळे आता आम्ही निघतो . चल वॉटसन!"
आणि मग गिल्ख्रिस्टकडे वळून तो म्हणाला," तुमच्या ऱ्होडेन्शियामधील उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. एकदा तुम्ही तोंडघशी पडता पडता वाचला आहात. आता तुम्ही खूप मोठे होऊन दाखवा...."

(समाप्त)
--अदिती

Labels: ,

नौदलाच्या कराराचा मसुदा(१)

जुलै महिन्याचे दिवस होते. माझं नुकतंच लग्न झालं होतं. त्या काळात होम्स काही विवक्षित आणि राजकीय महत्त्वाच्या केसेसमधे अगदी गळ्यापर्यंत बुडाला होता. त्यातल्या एका केसमधे इंग्लंडचं राजकीय भवितव्यच नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील काही मोलाच्या गोष्टींना मोठाच धोका निर्माण झाला होता. सुदैवाने या केसबद्दल बोलण्याची मुभा मला होम्सकडून मिळालेली आहे.
या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एके दिवशी सकाळी मला आलेल्या एका पत्राने. सकाळच्या डाकेने मला माझ्या एका जुन्या शाळामित्राचं पत्र आलं. पर्सी फेप्स त्याचं नाव. हा गडी अतिशय हुशार, खिलाडू आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा होता. प्रसिद्ध राजकारणी आणि पुढारी लॉर्ड होल्डहर्स्ट हे त्याचे सख्खे मामा. पण त्याला मिळालेल्या अफाट यशाचं पूर्ण श्रेय त्यालाच जातं. मामाच्या लौकिकाला साजेशी कामगिरी त्याच्या मदतीशिवाय पर्सी करून दाखवत होता. वयाने असेल माझ्याएवढाच. पण चांगल्या दोन इयत्ता गाळून तो पुढे गेला. मिळवता येण्याजोगी सगळी बक्षीसं त्याने मिळवली.केंब्रिज कॉलेजची मानाची शिष्ज्यवृत्तीही त्याने पटकावली. तिथेही पठ्ठ्याने गुरुजनांच्या अपेक्षा पूर्ण करत दैदिप्यमान यश मिळवलंन. मग परराष्ट्रीय विभागात त्याला नोकरी मिळाली आणि तो सरसर वर चढला. एखाद्या परिकथेत शोभावी अशी त्याची ही कारकीर्द मला माहीत होती. पण शाळेनंतर आमचा पत्रव्यवहार मात्र कमी होत गेला आणि गेली काही वर्षं तर तो बंदच होता.
अशा पर्सीचं पत्र सकाळच्या डाकेनं टेबलावर येऊन पडलं आणि माझं मन काही क्षण त्या जुन्या रम्य दिवसांमधे भरारी मारून आलं. मोठ्या उत्सुकतेने मी ते पत्र फोडलं आणि वाचू लागलो
"ब्रायरब्री,
वोकिंग
प्रिय वॉटसन,
ओळखलंस का मला? मी 'बेडक्या' फेप्स.
तुला माहीतच असेल की माझ्या मामाच्या, लॉर्ड होल्डहर्स्टच्या दबदब्यामुळे परराष्ट्र खात्यात मी एका चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतो. माझ्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी आजवर मी मोठ्या सचोटीने आणि निष्ठेने अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आलो आहे. पण काही दिवसांपूर्वी माझ्यावर असा काही दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे की माझं सर्वस्व पणाला लागलं आहे. आणि अतिशय लाजिरवाण्या अशा बेअब्रूची तलवार माझ्या डोक्यावर टांगली गेली आहे....
या सगळ्या परिस्थितीबद्दल या पत्रात काहीही सांगणं मला शक्य नाही..जर तू माझ्या म्हणण्याला होकार दिलास तर मी तुला प्रत्यक्षच ते सगळं सांगेन.
गेले नऊ आठवडे मी मेंदूज्वराने आजारी होतो आणि अजूनही त्या थकव्यातून मी बाहेर आलेलो नाही. तू मि. शेरलॉक होम्सनाही तुझ्यासोबत घेऊन येऊ शकशील का? मला या प्रकरणात त्यांचं मत हवं आहे. पोलीसांनी मला आधीच सांगितलं आहे की यात अधिक काही करता येण्याजोगं नाही पण तरीही मला हे प्रकरण त्यांच्या कानावर घालायचं आहे. प्राप्त परिस्थितीत मला एकेक क्षण युगासारखा वाटतो आहे. तुम्ही दोघे शक्य तितक्या लौकर इकडे येऊ शकाल का? खरं तर मी याआधीच हे प्रकरण मि. होम्सना सांगायला हव होतं पण ही घटना घडली तेव्हापासून मी शुद्धीवर असा नव्हतोच. म्हणून या गोष्टीला इतका उशीर झाला आहे. नुकताच मी शुद्धीवर आलो आहे आणि माझी तब्येत इतकी क्षीण झाली आहे की हे पत्र स्वतः लिहिण्याची सुद्धा माझ्यात ताकद नाही. मी हे दुसऱ्याकडून लिहून घेत आहे.
सद्यपरिस्थितीत मला फक्त मि. होम्सचाच आधार वाटतो आहे त्यामुळे निर्णय घेण्याबाबत झालेल्या दिरंगाईबाबत मला क्षमा करून ते शक्य तितक्य लवकर इकडे येऊ शकतील का?.
वॉटसन, कसंही कर आणि त्यांना इकडे घेऊन ये.
येशील ना?
तुझा मित्र
फेप्स."

प्रकरणाचं गांभिर्य लक्षात घेऊन जराही वेळ न दवडता, बायकोचा निरोप घेऊन मी बेकर स्ट्रीटवर येऊन हजर झालो. पाहतो तर आमचे साहेब एका काचपात्रात काहीतरी उकळत बसले होते. अंगावर अजून रात्री झोपतानाचेच कपडे होते. काचपात्रातल्या पाण्याची वाफ थंड करून तिचं झालेलं पाणी एका परीक्षानळीत घेऊन त्यात लिटमस बुडवीत तो माझ्याशेजारी येऊन बसला, तोपर्यंत माझं सकाळचं वर्तमानपत्र वाचून संपलं होतं.
"अरेच्या! हा लिटमस लाल झाला की! याचा अर्थ खुनी सापडला" होम्स कोडं सोडवल्याच्या आनंदात दिसला.
"काय म्हणतोस वॉटसन? सकाळी सकाळी इकडे कुठे?" तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुज्झ्याकडे माझ्यासाठी काहीतरी आहे...
असं कर, तिथे माझं नवं तंबाखूचं पुडकं आहे. बघ कशी मस्त आहे ती... तोवर मी आलोच..."
असं मला सांगून त्याने शेजारचं पॅड पुढे ओढलं. पेन्सिलीने भराभरा तारांचे मसुदे खरडले आणि आमच्या पोऱ्याला त्या कशा पाठवायच्या याच्या सूचना देऊन मग तो जरा शांतपणे बसला. एक दीर्घ श्वास घेत तो मला म्हणाला
"बोला महाराज काय काम काढलंत?"
मी काही न बोलता ते पत्र त्याच्या. हातात दिलं."आज सकाळी आलंय...."
त्याने झरझर ते वाचून काढलं. "अरे पण यात तर काहीच तपशील दिला नाहीये... पण हे 'लिहिणारी' मुलगी वैचित्र्यपूर्ण दिसतेय"
"लिहिणारी मुलगी? अरे हे माझ्या मित्राने लिहिलेलं नसलं तरी अक्षर पुरुषी वळणाचं वाटतंय"
" हा हा... चूक. हे एका बाईचं अक्षर आहे आणि ती कोणी साधीसुधी स्त्री नसावी. फारच दुर्मिळ गुण आहेत तिच्या अंगात.... प्रकरण आकर्षक वाटतंय. या मघाचच्या शिक्षेपेक्षा कितीतरी जास्त रोचक!"
मी त्याच्याकडे बघून हसलो. अर्थातच ते अक्षर एका मुलीचं आहे हे मला पटलेलं नव्हतं.
"चल आपण प्रत्यक्षच पाहू या कोण हा तुझा मित्र आणि त्याची ती लेखनिका..." तो मिस्कीलपणे म्हणाला. काही मिनिटांत आम्ही वॉटरलू स्टेशनवर होतो. आम्हाला लगेच एक ट्रेन मिळाली. "त्तासाभरात आम्ही वोकिंगच्या फरच्या जंगलाजवळ उतरलो. स्टेशनपासून अगदी जवळच मोठ्या बागेनं वेढलेलं एक प्रचंड घर म्हणजेच ब्रायरब्री होतं. आत आल्यावर जवळ एक स्टेशन आहे याचा मागमूसही लागत नव्हता. आम्ही कोण हे आत कळवल्यावर एका अतिशय सुंदर सजवलेल्या दिवाणखान्यात आमच स्वागत करण्यात आलं. आम्हाला भेटायला आलेला माणूस उंच आणि मजबूत शरीरयष्टीचा होता. त्याचं वय चाळीशीच्या आसपास असावं पण तो वयाच्या मानाने बराच तरूण दिसत होता.त्याचे गाल तर इतके गुलाबी - गुबगुबीत होते की एखाद्या खोडकर शाळकरी मुलाचीच आठवण व्हावी. शेकहँड करून तो म्हणाला
"बरं झालं तुम्ही आलात ते. पर्सीने तुम्हाला भेटायचा अगदी ध्यास घेतलाय. साध्या साध्या गोष्टी मनाला लावून घ्यायची त्याला सवय आहे त्यामुळे आता तर काही बघायलाच नको. त्याच्या आईबाबांना त्याची अवस्था बघवत नाही त्यामुळे त्यांच्या वतीने मीच तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो..."
"अं.. प्रकरण नक्की काय हे मला माहीत नाही पण तुम्ही फेप्स कुटुंबापैकी दिसत नाही..." -होम्स
क्षणभर आश्चर्याने त्याने डोळे विस्फारले आणि मग त्याने हसायला सुरुवात केली.
"आता कळलं. माझ्या गळ्यातला J.H. हा मोनोग्राम वाचलात तुम्ही.. मला वाटलं काय जादू केलीत कोण जाणे!
मी जोसेफ हॅरिसन. पर्सीच्या होणाऱ्या बायकोचा, ऍनीचा मोठा भाऊ. ती आत त्याच्याजवळ बसली आहे. पर्सी आजारी पडला तेव्हापासून गेले दोन महिने ऍनीच त्याची शुश्रुषा करतेय. आता या नात्याने तुम्ही मला फेप्स कुटुंबाचा एक घटक म्हणायला हरकत नाही " तो हसत हसत म्हणाला आणि त्याने आम्हाला पलिकडल्या खोलीत नेले. ही खोलीही अतिशय प्रशस्त होती. तिच्या अर्ध्या भागात एक पलंग ठेवला होता आणि उरलेल्या अर्ध्या भागात एक कोच ठेऊन बैठकीची व्यवस्था केली होती. तिथे दोन मोठ्या खिडक्या होत्या आणि बागेतली आरोग्यदायक हवा भरभरून आत येत होती. कोपऱ्याकोपऱ्यातून फुलदाण्यांमधून भरून ठेवलेल्या गुच्छांमुळे कसं प्रसन्न वाटत होतं. कोचावर एक अशक्त माणूस आरामात पहुडला होता. अरेच्या हा अर पर्सी! मी त्याला ओळखलंच नाही. आजाराने त्याचा चेहरा फिक्कट पांढरा पडला होता. त्याच्या शेजारीच एक सुंदर मुलगी बसली होती. आम्ही आत येताच ती उठून उभी राहिली..
"पर्सी मी आत जाते" ती म्हणाली पण पर्सीने तिचा हात धरून तिला थांबवले. ती सुंदर पण जराशी ठेंगणी होती. तिचे डोळे इटालियन मुलींसारखे सुंदर होते आणि तिचे केस खूप काळे आणि भरगच्च दाट होते. तिची कांती अतिशय तेजस्वी होती आणि त्या पार्श्वभूमीवर पर्सीच्या चेहऱ्याची गेलेली निस्तेज रया आणखी जाणवत होती. जोसेफ आम्हाला आत सोडून बाहेर गेला. आणि पर्सी मला म्हणाला
"हॅलो वॉटसन... अरे मिशीत किती वेगळा दिसतोस तू.. मी क्षणभर ओळखलंच नाही तुला. मीही सध्या ओळखू येण्याच्या पलिकडे गेलो आहे. असो... प्रवासात काही त्रास नाही ना झाला? आणि हो ही ऍनी. अरेच्या हेच का मि. शेरलॉक होम्स?"
होम्सने मान डोलावली.
"वा वा ! होम्स साहेब, तुम्ही आलात... मला फार बरं वाटलं. अरे पण तुम्ही उभे का? बसा ना.." आम्ही सगळे खाली बसलो. ऍनीलाही खाली बसावं लागलं. पर्सीने तिचा हात अगदी घट्ट धरून ठेवला होता.
"जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला सांगतो माझी कहाणी..." पर्सी होम्सकडे वळून म्हणाला
" माझं अगदी छान चाललं होतं. मी खूप सुखात होतो. माझ्या लग्नाचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपला होता. तेंव्हाच दुर्दैवाचा असा एकच जबरदस्त फटका बसला की सगळं पार उध्वस्त झालं. . "

"मि होम्स, वॉटसनने तुम्हाला सांगितलंच असेल की मी परराष्ट्रीय खात्यात काम करतो. माझ्या मामाच्या, लॉर्ड होल्डहर्स्टच्या प्रभावामुळे मला खूप जबाबदारीच्या कामगिऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली आणि अतिशय थोड्या वेळात नेत्रदीपक प्रगती करून मी अतिशय वरच्या, प्रतिष्ठेच्या आणि जबाबदारीच्या हुद्द्यावर जाऊन पोचलो. मामा परराष्ट्र मंत्री झाल्यावर त्याने अनेक अवघड कामगिऱ्या मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवल्या आणि मी त्या सगळ्या यशस्वीपणे पार पाडल्या."

"सुमारे दहा आठवड्यांपूर्वी , तारीखच सांगायची झाली तर २३ मेच्या दिवशी मामाने मला त्याच्या खाजगी ऑफिसमधे बोलावून घेतलं. आणि एक अतिशय गुप्त आणि जोखमीच काम त्याने माझ्यावर सोपवलं.
करड्या रंगाची एक कागदांची सुरनळी मामाने माझ्या हातात दिली आणि तो म्हणाला
" इंग्लंड आणि इटलीमधे होणाऱ्या एका अत्यंत गुप्त कराराचा हा मसुदा आहे. दुर्दैवाने यातल्या काही गोष्टी अफवांच्या रूपाने याआधीच बाहेर पसरल्या आहेत. रशियन आणि फ्रेंच सरकारचे लोक हा मसुदा हस्तगत करण्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार होतील. याची एक प्रत आपल्याकडे करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे म्हणून केवळ, हा माझ्या कपाटातून काही वेळासाठी का होईना, बाहेर काढणं मला भाग आहे. तेंव्हा हा काळजीपूर्वक तुझ्या खोलीत घेऊन जा. तिथे लिहिण्याची सोय आहे ना? "
"हो आहे..."
"हा कागद तुझ्या खोलीत कुलूपबंद करून ठेव. मी तुझी आज रात्री उशीरा `ऒफिसमधे थांबण्याची व्यवस्था करतो. इतर लोक निघून गेल्यानंतर याची काळजीपूर्वक एक प्रत तयार कर. तुझं काम झालं की हा कागद नीट कुलूप लावून तुझ्याच खोलीत ठेव आणि सकाळी दोन्ही कागद माझ्या ताब्यात दे."
"मी तो कागद ताब्यात घेतला आणि ."
"एक मिनिट...." होम्सने मधेच त्याला थांबवले
"हे बोलणं चालू असताना तिथे आजूबाजूला आणखी कोणी होतं की तुम्ही दोघंच होतात?"
"आम्ही दोघंच होतो ."
" ती खोली किती मोठी होती?"
"बरीच मोठी होती.आमच्या दोन्हीकडे सुमारे तीस तीस फूट जागा होती"
"म्हणजे तुम्ही खोलीच्या मध्यभागी उभे होतात का?"
"हो"
"आणि किती मोठ्या आवाजात बोलत होतात?"
"अगदी हळू बोलत होतो.. मामाचा आवाज मुळातच खूप लहान आहे आणि मी फारसं बोललोच नाही..."
"ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद....मग पुढे काय झालं ?"
"मामाने दिलेल्या सगळ्या सूचना मी तंतोतंत पाळल्या. माझ्या ऑफिसातील इतर लोक घरी जाईपर्यंत मी ते भेंडोळं कुलूपबंद करून ठेवलं. माझ्याबरोबरचा एक कारकून चार्ल्स गोरोट त्याचं नाव , त्याचं काहीतरी काम राहिलं होतं ते पूर्ण करत बसला होता. त्याचं काम उरकेपर्यंत मी जाऊन जेवून आलो. मी परत आलो तोपर्यंत तो घरी गेलेला होता. मला ते काम पूर्ण करायची घाई होती कारण जोसेफ, ऍनीचा भाऊ काही कामानिमित्त शहरात आला होता आणि तो रात्री अकराच्या ट्रेननं परत येणार होता. जर शक्य झालं असतं तर मलाही तीच ट्रेन पकडायची होती."
"मी जेव्हा ते भॆंडोळं उघडून कामाला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मामाने आजिबात अतिशयोक्ती केलेली नव्हती. तो मजकूर खरोखरच अतिशय महत्त्वाचा आणि गोपनीय होता. तपशिलाच्या खोलात न शिरता असं म्हणता येईल की त्रिराष्ट्रीय करारातली इंग्लंडची भूमिका आणि फ्रान्सने इटलीच्या ताब्यातील भूमध्य समुद्राचा ताबा घेतला तर इंग्लंड कोणती पावलं उचलेल याबद्दल त्यात लिहिलेलं होतं. तो मजकूर पूर्णतः नौदलाच्या आखत्यारीत येत होता आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्याही झालेल्या होत्या. हे सगळं पाहिल्यावर प्रसंगाचं गांभिर्य लक्षात घेऊन जराही वेळ वाया न घालवता मी त्याची एक प्रत करायला सुरुवात केली. "
"तो मजकूर फ्रेंच भाषेत लिहिलेला होता आणि बराच लांबलचक होता. त्यात सव्वीस उपप्रभाग होते. मी शक्य तितक्या लौकर ते पूर्ण करायच्या प्रयत्नात होतो पण नऊ वाजून गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की माझे फक्त नऊ भाग पूर्ण झाले होते. आता मी अकराच्या ट्रेनने घरी जाण्याचा विचार सोडून दिला. दिवसभर बरीच कामं केल्यामुळे मला खूप थकवा आला होता आणि मगाशीच जेवण झाल्यामुळे मला थोडीशी पेंगही येत होती. आता झोप घालवण्यासाठी कॉफी घ्यावी असं मी ठरवलं. आमच्या जिन्यापाशी एक कॉफीची पूड विकणाऱ्या माणसाच दुकान आहे. आमच्या ऑफिसमधलं कोणी जर उशीरापर्यंत काम करत असेल तर तो त्याच्या स्पिरिटच्या दिव्यावर छानशी कॉफी आनंदाने करून देतो. त्याला बोलावण्यासाठी म्हणून मी माझ्या टेबलाजवळची लहानशी घंटा वाजवली."
--अदिती

Labels: ,