पुस्तकायन

Wednesday, December 05, 2007

शतेषु जायते शूरः .....॥

निन्दन्तु नीतीनिपुणाः यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेच्छम्।
अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः॥

असं नीतिशतकात म्हटलंय. मानवी गुणांमध्ये शौर्य या गुणाचे महत्त्व फार मोठे आहे. वीर हा नेहमी रणांगणातच शोभून दिसतो म्हणतात. शेक्सपियर म्हणतो जग ही रंगभूमी आहे. ज्याला त्याला आपापल्या वृत्तीप्रमाणे जग वाटते असे माझे मत आहे. कोणाला जग रंगभूमी वाटेल तर कोणाला मरुभूमी.
पण मला मात्र जग , जग म्हणण्यापेक्षा जीवन ही रणभूमी वाटते. आमचा कायमचाच अर्जुन झालेला असतो. तोसुद्धा एकाग्रतेने , सव्यसाचीपणे सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनून तळपणारा नव्हे, तर कुरुक्षेत्रावर समोर युद्धाचा प्रसंग पाहून श्रीकृष्णाला ' सीदन्ति मम गात्राणि... ' असं सांगणारा. किंकर्तव्यविमूढ झालेला. असा अर्जुन होण्याचा प्रसंग रोजरोज येत असल्यामुळे कुठल्याही संकटकाळी न डगमगणारा आणि सर्व प्रकारची युद्धे लढून ती हमखास जिंकणारा, शक्तिमान तरीही नम्र, न्यायाचा मार्ग कधीही न सोडणारा, वचनाला जागण्यासाठी प्राणांचंही बलिदान देणारा आणि वर उद्धृत केलेलं नीतिशतकांतलं सुभाषित सार्थ करून दाखवणारा असा शूर वीर नायक जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मी थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिले. या वीराचं नाव मॅक्सिमस डेस्मस मरिलियस. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या 'ग्लॅडिएटर' या चित्रपटाचा नायक.
जितक्या वेळा हा चित्रपट पाहावा तितक्या वेळा त्याचे नवीनच कंगोरे हातात येतात. नाट्यमयता हा या चित्रपटाचा स्थायीभाव आहे. आणि खटकेबाज संवादांमधून त्या नाट्याची खुमारी उत्तरोत्तर वाढतच जाते.
हा आहे एक राजकारणाचा विशाल पट. यात एक राजा आहे. वृद्ध, जराजर्जर आणि तरीही जग पादाक्रांत करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतारवयातही कष्ट सोसणारा राजा. राजा कसला सम्राटच तो. एक चतुर्थांश जगावर ज्याची सत्ता चालते असा , अनिर्बंध, एकाधिकारशाही राजसत्तेचे प्रतीक असणारा सम्राट. पण हा सम्राट विचारी आहे. विवेकी आहे. न्यायी आहे. आयुष्याच्या अंताला आल्यावर त्याला आपल्या चुका कळतात. आयुष्याचं सिंहावलोकन करून तो नीरक्षीरविवेक करतो. जाताना या जगाला आपण काय देऊन जाणार? जग आपल्याला एक मूर्ख हुकूमशहा म्हणून ओळखणार का? असे प्रश्न त्याला पडतात.
यात एक सेनापती आहे. रोमच्या सम्राटाचा विश्वविजयी सेनापती. राजकारण्यांनाही चळचळा कापायला लावेल असे प्रचंड सैन्यबळ त्याच्या पाठीशी आहे. आपल्या शूर पण दिलदार स्वभावाने त्याने सैनिकांची मने केव्हाच जिंकली आहेत. त्याच्या एका शब्दासरशी त्याचे सैनिक वारा, वादळ, ऊन, तहान ,भूक, हाडं गोठवणारी थंडी यापैकी कशाचीही पर्वा न करता युद्धात स्वतःला झोकून देतात इतका त्यांचा आपल्या नायकावर विश्वास आहे. आणि त्याचंही आपल्या सेनेवर प्रेम आहे. या वीरांवर अन्याय होऊ नये म्हणून तो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो. त्याला मोठेपणाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा हव्यास नाही. सेनापतीच्या वस्त्रांमध्येही तो एक साधा शेतकरीच राहिलेला आहे. आपल्या गव्हाच्या शेतात सोन्यासारखे दाणे पिकवावेत, आपल्या लाडक्या मुलाबरोबर काळ घालवावा ही त्याची एकमेव इच्छा आहे.
यात एक राजपुत्र आहे. पित्याच्या मृत्यूनंतर रोमचा राजा होण्याचं त्याचं स्वप्न आहे. स्वभावाने क्रूर, कपटी, पाताळयंत्री, सगळी मूल्ये धाब्यावर बसवणारा , वृत्तीने नीच असा हा मुलगा आहे. त्यातच नुकतंच आलेलं तारुण्य त्याच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालतंय. कणाकणाने झिजणाऱ्या, दर क्षणाला मृत्यूच्या आणखी जवळ जाणाऱ्या आपल्या पित्याबद्दल त्याला काडीचंही प्रेम नाही. उलट आपला बाप कधी मरतो याचीच तो वाट पाहत बसला आहे. तो शूर असल्याचा आव आणतो पण त्याचं काळीज सशाचं आहे. मरणाची भीती त्याला वाटते.
या राजपुत्राला एक मोठी बहीण आहे. ल्युसिला तिचं नाव. नुकतेच वैधव्य आले असल्यामुळे आपल्या आठ वर्षांच्या मुलाला घेऊन ती माहेरी आली आहे. रोमन सम्राटाची मुलगी असल्यामुळे राजकारण तिला नवीन नाही. ती त्यात चांगलीच मुरलेली आहे. सध्या तरी आपल्या भावाला राजा होण्यासाठी ती सर्वार्थाने मदत करते आहे. एके काळी ती मॅक्सिमसच्या प्रेमात होती. तिने त्याला आपला स्वीकार करण्याची विनंती केली होती. पण मॅक्सिमसचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे त्याने ही मागणी धुडकावून लावली होती. अजूनही ती मॅक्सिमसला विसरू शकलेली नाही. विजयानिमित्त सीझरने दिलेल्या मेजवानीच्या प्रसंगीही ती गवाक्षातून चोरून मॅक्सिमसकडे पाहते. ल्युसिला आपल्या भावापेक्षा - कॉमोडसपेक्षा सर्वच बाबतीत उजवी आहे. केवळ ती मुलगी आहे म्हणून, नाहीतर ती खूप चांगली सम्राट होऊ शकली असती. तिच्या वृद्ध पित्याच्या नजरेतून तिचं मॅक्सिमसकडे बघणंही सुटलेलं नाही आणि तिचा भावाला असलेला पाठिंबाही सुटलेला नाही. सीझरच्या दृष्टीने ल्युसिलाला राणी करणं हा योग्य पर्याय ठरू शकेल हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं.
या चार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा या चित्रपटाचा भार सांभाळणाऱ्या भव्य स्तंभांप्रमाणे आहेत. आणि यांच्या अवतीभवती उभा आहे तो रोमच्या राजमुकुटाचा काटेरी मार्ग.
चित्रपटाला सुरुवात होते ती सीझर मार्कस ओरिलियसच्या शेवटच्या लढाईपासून. ज्ञात जगाचं हे शेवटचं टोक आहे. जर्मेनियामधल्या रानटी टोळ्या तहाचा मार्ग धुडकावून लावतात आणि मॅक्सिमस सूर्यासारखा आग ओकत रणांगणात उतरतो. मॅक्सिमस हा मूर्तिमंत पराक्रम आहे. आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा देऊन तो त्यांच्यातलाच एक म्हणून लढतो. विजयश्री खेचून आणतो.
या विजयानिमित्त सीझर मार्कस ओरिलियसने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये रोमच्या संसदेचे सदस्य आलेले आहेत. एके काळी लोकाधिकार असलेल्या रोमवर सध्या सीझरची अनिर्बंध सत्ता आहे. संसदेतले हे लोकप्रतिनिधी ज्याच्या बाजूला असतील त्याला सत्ता मिळण्याचा मार्ग सुकर होईल असं साधं सोपं समीकरण आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेला अधिक मुरड घालू न शकणारा कॉमोडस या लोकप्रतिनिधींचे साहाय्य मिळावे म्हणून खेळी खेळतो आहे. काही लोकप्रतिनिधी त्याला बधतात. काही अधिक विचारी सांसद सावध पावलं टाकू पाहतात. त्यांना रोममध्ये पुन्हा लोकशाहीची स्थापना झालेली हवी आहे. सत्तेच्या मार्गामध्ये आपल्याला जर सैन्याची मदत झाली तर आपण संसदेला धाब्यावर बसवू शकतो हे कळण्याइतका कॉमोडस हुशार आहे. तो खुबीने मॅक्सिमसचा कल जाणून घेऊ पाहतो. मॅक्सिमस हा तलवारबहाद्दर असला तरी राजकारणातल्या डावपेचांचा त्याला तिटकारा आहे. कसलेही छक्केपंजे न करता तो आपली निष्ठा सीझरवर आणि पर्यायाने रोमवर असून व्यक्तिगत लांगूलचालन आपल्याला जमणार नाही हे स्पष्ट करतो. लाडावलेल्या आणि 'नाही' हा शब्द माहीत नसलेल्या हट्टी कॉमोडसला हा सरळ नकार पचणं शक्यच नाही. पण वरवर तरी तो तसे काही दाखवत नाही.
रोमची सत्ता म्हणजे पतंगांना आकृष्ट करणारा एक रत्नदीप आहे आणि या रत्नदीपाचं भासमान स्वामित्वदेखील कोणा एकाच्या हाती फार काळ राहू शकणार नाही हे आपल्याला या मेजवानीमध्ये जाणवतं. एका सम्राटाच्या होऊ घातलेल्या अस्ताबरोबर तीव्र होऊ पाहणाऱ्या सत्तासंघर्षाचं बुद्धिबळाच्या पटासारखं त्रिमित रूप या मेजवानीमध्ये अगदी ठळकपणे दिसतं. आपल्या मुख्य पात्रांची, त्यांच्या स्वभावांची नेमकी ओळख आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांची नांदी इतक्या रोचक पद्धतीने आणि इतक्या कमी वेळात करून देणाऱ्या पटकथाकाराच्या प्रतिभेला ' हॅट्स ऑफ ' असंच म्हणावंसं वाटतं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ. सीझर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मॅक्सिमसला आपल्या तंबूत बोलावतो आणि मॅक्सिमसला त्याच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगायला सांगतो. मॅक्सिमसला घरी जायचं आहे. त्याला तीन वर्षात घरी जायला मिळालेलं नाही. जिंकण्याजोगा प्रदेश संपला म्हणजेच युद्ध संपलं आणि युद्धाखेरीज इतर कशातही मॅक्सिमसला रस नाही. मॅक्सिमसच्या अंगी असलेल्या, धैर्य, न्यायी बुद्धी, सत्याची चाड, दिल्या शब्दाला जागण्याची वृत्ती, अतुल आणि निःसंशय निष्ठा आणि अर्थातच धगधगता अतुलनीय पराक्रम या गुणांमुळे सीझरच्या मनात काही वेगळंच घाटतंय. अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्रित आणि लोभी कॉमोडस राज्यावर बसला तर किती मोठा अनर्थ होईल हे सीझर चांगलाच ओळखून आहे. म्हणूनच पुत्रप्रेमाने आंधळा न होता तो एका राजाचं कर्तव्य बजावतो. आपल्यानंतर राज्याच्या रक्षणाची जबाबदारी तो मॅक्सिमसवर सोपवू इच्छितो आहे. मॅक्सिमसने रोमचा पालक होऊन तिथे लोकशाहीची पुनर्स्थापना करावी आणि ही शेवटची कामगिरी पार पाडल्यावर सुखाने निवृत्त होऊन घरी जावं असं तो त्याला सांगतो. असं करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करताना तो म्हणतो, " राजा हा पालनकर्ता असावा लागतो. हे काम मी तुझ्यावर सोपवतो आहे कारण तुला रोमचा सत्ताधीश व्हावं असं मुळीच वाटत नाही. सत्तेचा हव्यास तुला स्पर्श करू शकत नसल्यामुळे तूच सत्तेचा पालक होऊ शकशील. या बाबतीत तुझा स्वार्थ कधीच आड येणार नाही हे मला माहीत आहे. तूच माझा मुलगा होण्यास लायक आहेस. तू माझा मुलगा असायला हवा होतास. कॉमोडस सारख्या न्यायनीती धाब्यावर बसवणाऱ्या मुलाला राजा होऊ देण्यासारखा अनर्थ नाही. तो माझा उत्तराधिकारी असणार नाही ही गोष्ट मी स्वतः त्याला सांगणार आहे. या बाबतीत मी तुला आदेश देणार नाही पण तू ही कामगिरी करावीस अशी माझी आत्यंतिक इच्छा आहे."
सम्राट मॅक्सिमसला आपला मुलगा मानतो यातून त्याचा मोठेपणा अधोरेखित होतो. पोटच्या मुलाबद्दलचं प्रेम न सुटल्यामुळे राज्यं बेचिराख झालेली इतिहासाने पाहिली आहेत. पण इथे मात्र उपभोगशून्य स्वामी होऊन रोमची सत्ता पुन्हा एकदा लोकांच्या हाती देण्याची जबाबदारी मॅक्सिमसवर सोपवून सीझर त्याचा बहुमानच करतो.
इथे कथेतल्या नाट्यमयतेचा पहिला चरम बिंदू आपल्याला बघायला मिळतो. आयुष्यभर हुकूमशहा म्हणून अनिर्बंध अधिकाराने राज्य केलेल्या सीझरला शेवटी झालेला साक्षात्कार, रोमसारख्या विश्वविजयी राज्याची सत्ता आपल्या हाताने लोकांच्या हातात देण्याची त्याची तळमळ, त्याच सत्तेसाठी वेड्या झालेला आपल्या पुत्रापेक्षा लायक उमेदवार समोर आहे हे पाहून त्याला रोमच्या सत्ताबदलासाठी सर्वाधिकार देणारा हा सम्राट एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व सांगून जातो.
त्याच रात्री कॉमोडस सीझरचा गळा दाबून खून करतो. एक माणूस म्हणून मुलाचं अपयश हे एक पिता म्हणून आपलं अपयश आहे अशी कळवळून दिलेली कबुली उच्चारतानाच त्या जराजर्जर सम्राटाचा पोटच्या मुलाकडून कपटाने खून होतो. मॅक्सिमसचा पाठिंबा आपल्याला कधीच मिळणार नाही हे ओळखून त्याचा काटा काढायचा कॉमोडसचा बेत अयशस्वी होतो खरा पण मॅक्सिमसची पत्नी आणि त्याचा आठ वर्षांचा मुलगा यांना मात्र हालहाल करून मारण्यात येत. सर्वस्व लुबाडला गेलेला परागंदा मॅक्सिमस बेशुद्धावस्थेत एका गुलामांच्या व्यापाऱ्याला सापडतो आणि डोंबाऱ्यांसारखे तलवारीचे खेळ करून दाखवणारा तमासगीर मुलाम अर्थात ग्लॅडिएटर म्हणून आयुष्य काढण्याची वेळ त्याच्यावर येते. रोमचा सर्वशक्तिमान सेनापती एक तमासगीर होतो तेव्हा नियतीच्या खेळाबद्दल हसूही येतं आणि रडूही.
राजा म्हणून नालायक असलेला कॉमोडस लोकांचं लक्ष आपल्या ढिसाळ कारभारावरून काढून ते दुसरीकडे वेधून घेण्यासाठी एक अचूक चाल खेळतो. जुन्या सीझरने तलवारबाजीच्या खेळावर घातलेली बंदी उठवून तो त्या खेळांचा महोत्सवच आयोजित करतो. रोमचे प्रजाजन म्हणजे फक्त एक जमाव आहे आणि जो कोणी या जमावावर नियंत्रण मिळवेल त्याला रोमच्या सत्तेपासून कधीही दूर जावं लागणार नाही हे कॉमोडसने ओळखलं आहे. त्याची ही चाल इतकी बिनतोड आहे की राजकारणात मुरलेले आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी झटणारे सेनेटर ग्राकस सारखे लोकही हा सगळा खेळखंडोबा नुसता बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत.
या खेळात आपलं नशीब फळफळेल या आशेने मॅक्सिमसचा मालक आपल्या गुलामांना घेऊन रोममध्ये येतो. इथे चित्रपटाचा दुसरा सगळ्यात मोठा नाट्यमय बिंदू आपल्याला पाहायला मिळतो. एक तर गेल्या शंभर वर्षात रोमच्या सेनेने रोम शहरात पाऊल ठेवलेलं आही. त्यामुळे मॅक्सिमसनेही रोम कधीच पाहिलेलं नाही. जगाची राजधानी, लोकशाहीची गंगोत्री, अमर्यादित सत्ताकेंद्र, लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातल्या संघर्षाचा केंद्रबिंदू अशा अनेक पैलूंमुळे रोमचं महत्त्व वादातीत आहे. आणि अशा रोमचा राजनियुक्त पालक मॅक्सिमस कोणाच्याही नकळत एक नामहीन, अस्तित्वहीन गुलाम म्हणून रोम शहरात पाऊल ठेवतो. नियतीचा हा दुसरा वार आहे. अर्थात नियतीच्या हातातलं बाहुलं होऊन राहण्याऐवजी, टँजंट जाणारा बिंदू जसा वर्तुळाच्या त्या बिंदूला लंबरूप जाताना वर्तुळाचे शून्यमंडळ भेदून जातो तसा आपल्या कथेचा नायक नियतीचा हा वाकडा फास छेदून तिच्या कक्षेच्या पार निघून जाताना आपल्याला दिसतो.
मॅक्सिमस जिथे येऊन पोचला आहे ते रोमचं प्रसिद्ध कलोझियम आणि तिथली युद्धभूमी अर्थात अरीना या चित्रपटात अनेक पैलू घेऊन येणारी एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे. ' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ' अशा वृत्तीने लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या योद्ध्याची लढाई बघण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळं करून उभं राहणाऱ्या आणि त्या लढाईतून आपलं मनोरंजन करून घेणाऱ्या रोमवासीयांचं हे कलोझियम हे जगातल्या सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे असं वाटून जातं.
कलोझियममधे विशेष गुणवत्ता दाखवणाऱ्या तलवारबाजांना सीझरकडून एक लाकडी तलवार मिळते. ही तलवार त्यांच्या दास्यत्वातून मुक्तीचं प्रतीक असते. मॅक्सिमसचा मालक या तलवारीचं आमिष दाखवून त्याला उत्तम खेळ करून दाखवण्यासाठी उद्युक्त करू पाहतो. पण ' मारा किंवा मरा ' चा हा हिंस्र खेळ करून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या सामान्य तलवारबाजांपेक्षा ज्ञानाने, कर्तृत्वाने, मानाने खूप मोठ्या असलेल्या मॅक्सिमसचे डोळे मात्र पैलतीराला लागलेले आहेत. वृद्ध सीझरची अखेरची इच्छा एखाद्या फासासारखी गळ्याला खुपते आहे आणि बायको - मुलावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचाय या एकाच इच्छेने तो अरीनामधे उतरतो. नियतीच्या या अजब खेळात मॅक्सिमसच्या अंगातले नैसर्गिक नायकाचे गुण उचंबळून येतात. आपल्या सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून सांघिक प्रयत्नांनी तो हेही युद्ध जिंकतो. रोमच्या जनतेने आजवर इतकं प्रेक्षणीय काही पाहिलेलंच नाही. कलोझियममधला हजारो लोकांचा समुदाय अक्षरशः खुळावल्यासारखा मॅक्सिमसचा जयजयकार करतो. नवीन सीझर कॉमोडसलाही त्याची दखल घेणं भाग पडतं.
जिंकल्यानंतर फुरफुरणाऱ्या घोड्यावरून प्रेक्षकांना अभिवादन करणारा गुलाम मॅक्सिमस हा संपूर्ण चित्रपटातील माझा सर्वात आवडता क्षण आहे. त्याच्या अंगावरची गुलामीची लाजिरवाणी कातडी फाडून त्याच्यातला विश्वविजयी सेनापती झळाळणाऱ्या सोन्यासारखा बाहेर येताना बघून आता हा नियतीला काटशह नक्की देणार अशी खात्रीच पटते.
या पराक्रमी तलवारबाजाची एका क्षणात आभाळाला भिडलेली लोकप्रियता सहन न होऊन कॉमोडस त्याला भेटायला आपल्या आसनावरून खाली अरीनामधे उतरतो. खरे तर आताच हातातल्या शस्त्राने त्याची कंठनाळ भेदून आपला सूड पुरा करायचा अशी मॅक्सिमसची इच्छा आहे. पण कॉमोडसच्या पुढ्यात उभा असलेल्या ल्युसिलाच्या मुलाला - ल्युसिअसला पाहून त्याला कुठेतरी दुसऱ्या जगात त्याची आतुरतेने वाट पाहणारा आपला मुलगा आठवतो. हातातलं शस्त्र खाली टाकून तो मागे वळतो. त्यानंतरचा संवाद तर जगप्रसिद्धच आहे. कॉमोडसने खूपच हट्ट केल्यावर आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढून मॅक्सिमस जेव्हा त्याच्या समोर उभा राहतो तेव्हा मात्र कॉमोडसच्या पायाखालची जमीन निसटते. आधीच अतुलनीय शौर्याने जनतेच्या गळ्यातला ताईत झालेला मॅक्सिमस आपल्या सीझर मार्कस ओरीयसवरील निष्ठेचा पुनरुच्चार करतो आणि एका क्षणात नियतीची पारडी फिरतात. एक गुलाम सीझरपेक्षाही मोठा होतो. अरीनाच्या लुटुपुटूच्या युद्धभूमीवर एका गुलामाकडून रोमन सीझरचा पराभव होतो.
कॉमोडस मॅक्सिमसपुढे नेहमीच खुजा होता. पण आजवर हे सत्य रोमन जनतेच्या लक्षात आलं नव्हतं. आता मात्र कॉमोडस - मॅक्सिमसमधला विरोधाभास लोकांच्या नजरेत अगदी ढळढळीतपणे आला आहे. कॉमोडसच्या एकेक कपटी वाराला सहज तोंड देणारा मॅक्सिमसचं नेतेपण आता लोकांबरोबरच सेनेटर ग्राकसलाही मान्य झालं आहे. ल्युसिअसच्या जिवाची भीती घालून अन्याय्य आणि अनैतिक मागण्या करणाऱ्या कॉमोडसचं खरं रूप पाहून मुळापासून हादरलेली ल्युसिलाही आता मॅक्सिमसला पाठिंबा देते आहे. ल्युसिअसकडे पाहून आपल्या निष्पाप मुलाची आठवण येणारा मॅक्सिमस ल्युसिलाचा संघर्ष पाहून अखेरीस तिची साथ स्वीकारतो. रातोरात रोममधून बाहेर पडून आपल्या सेनेला घेऊन दोन दिवसात रोमवर कब्जा मिळवायची योजना ल्युसिला, मॅक्सिमस आणि सेनेटर ग्राकस आखतात. पण ऐनवेळी ग्राकसला अटक होते, मॅक्सिमसला दगा देऊन पकडलं जातं आणि कॉमोडस ही योजना उधळून लावतो.
या परिस्थितीमध्ये मॅक्सिमसचा खून किंवा वध झाला तर तो हुतात्मा होईल आणि जनतेचा असंतोष उफाळून येईल हे ओळखून कॉमोडस अखेरचा विषभरा दंश करतो. रोमच्या लोकांसमोर कलोझियमच्या अरीनामध्येच मॅक्सिमसला लढाईत मारायचा बेत कॉमोडस आखतो. त्याने आपली लोकप्रियता परत येईल अशी त्याला खात्री असते.
आपल्याविरुद्ध कट करताना पकडल्या गेलेल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला ल्युसिअसच्या जिवाची भीती घालून आपल्याशी लग्न करायला भाग पाडणारा कॉमोडस अजूनही सशाच्या काळजाचाच आहे. साक्षात मृत्यू समोर उभा राहिल्यावर त्याच्याकडे हसून पाहण्याची धमक त्याच्याकडे नाही. रणांगणात आपण मॅक्सिमसला सरळसरळ कधीच नमवू शकणार नाही हे ओळखून युद्ध सुरू व्हायच्या आधी मॅक्सिमसच्या पाठीत तो खंजीर खुपसतो. जखमी अर्धमेल्या अवस्थेत मॅक्सिमसला रणांगणावर आणलं जातं. आणि सुरू होतो एका विश्वविजयी योद्ध्याचा सर्वश्रेष्ठ रणसंग्राम.
त्याही अवस्थेमध्ये शत्रूवर जीवघेणे प्रहार करीत, त्याचे प्रहार चुकवीत मॅक्सिमस त्याला निःशस्त्र करतो. धर्मयुद्धाचे नियम कधीच न विसरणारा सच्चा सैनिक असल्यामुळे कॉमोडस निःशस्त्र केल्यावर तो आपली तलवारही टाकून देतो. आता मात्र कॉमोडसला भान राहिलेलं नाही. आसपास उभ्या सैनिकांकडे तो तलवार मागतो. पण युद्धाच्या नियमांप्रमाणे त्याला तलवार मिळणार नाही हे लक्षात आल्यावर आपल्याच पायापाशी लपवलेला खंजीर काढून तो मॅक्सिमसवर वार करू पाहतो. नेहमीच परिस्थितीपेक्षा मोठा होणारा खराखुरा धीरोदात्त नायक मॅक्सिमस त्याच खंजिराने उरल्यासुरल्या शक्तीनिशी कॉमोडसला कंठस्नान घालतो.
रोमच्या लाखो प्रजाजनांच्या साक्षीने कपटी कॉमोडसचा अंत होतो. आता मात्र मॅक्सिमसला 'त्या' जगापासून अधिक काळ दूर राहणं शक्य नाही. तो ती वाट चालूही लागतो. पण त्याच्या घराच्या उंबरठ्याशी त्याचे प्राण अडखळतात. अजून त्याने त्याची सगळी कर्तव्यं बजावलेली नाहीत. ल्युसिलाला पाहून तो थांबतो. ल्युसिअसचं भविष्य सुरक्षित असल्याची तो तिला ग्वाही देतो. सेनेशिवाय लढलेला हा रोमचा खरा सत्ताधीश रोममध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचे आदेश देतो. जर्मेनियाच्या सीमेवर बर्फात गोठणाऱ्या आणि स्वार्थी राजकारणामुळे अन्याय सोसत खितपत पडलेल्या आपल्या प्रिय सैनिकांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल करतो. शेवटी सीझरच्या जात्या जिवाच्या अखेरच्या इच्छेला आपण योग्य न्याय देऊ शकलो या समाधानात इहलोकातून परलोकाचा त्याचा प्रवास संपतो. त्या जगात त्याचे आप्त त्याला भेटतात रोममध्ये एक नवी पहाट होते. आयुष्यभर अनेक लढाया जिंकलेला हा वीर मरताना माणसांपेक्षा, नियतीपेक्षा , एवढंच नाही तर प्रत्यक्ष जीवनापेक्षाही मोठा होतो. एका सुडो-आफ्रिकन भाषेत लिहिलेल्या गाण्याचे सूर आपल्याही कानात घुमत राहतात. हा प्रसंग नाट्यमयतेची चरम सीमा गाठणारा तिसरा बिंदू ठरतो.
या शोकांतिकेचा हा शेवट इतका परिणामकारक आहे की तो लख्ख सूर्यप्रकाशही क्षणभर करडा वाटायला लागतो. ग्रीक ऑपेराचे सूर काळजाला विद्ध करून जातात. असं वाटतं की काळाचं हजारो वर्षांच अंतर कुठल्या कुठे नाहीसं झालंय आणि हा क्षण त्या क्षणाशी एकरूप झालाय. त्या गाण्यातल्या शब्दांचा अर्थ कळत नाही पण 'आता मी मुक्त आहे' असा त्यातला भाव समजायला शब्दांची गरजच पडत नाही. डोळे मिटून बसलं तर संपूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर जसाच्या तसा पुन्हा एकदा पाहता येईल इतका सखोल परिणाम करणारा दुसरा चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही.
बाकी चित्रपटाची पटकथा घट्ट आणि बांधेसूद आहे. दिग्दर्शकाचं कौशल्य वादातीत आहे. कलोझियममधली दृश्यं तर संगणकावर घडवून नंतर इथे चिकटवली आहेत अशी शंकासुद्धा येऊ नये इतकी बेमालूम जमली आहेत. युद्धाचे प्रसंग अंगावर काटे उभे करतात. पहिल्या लढाईच्या चित्रीकरणाच्या वेळी जंगलातील झाडांना इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणाऱ्या आणि नंतर इथे असं काही घडलं होतं अशी शंकाही येऊ नये अशी चोख साफसफाई करणाऱ्या निसर्गप्रेमी तंत्रज्ञांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट झाल्यामुळे ही एक जमून आलेली भट्टी ठरली आहे. मॅक्सिमसची लार्जर दॅन लाईफ भूमिका जिवंतपणे साकारणाऱ्या रसेल क्रो या गुणी अभिनेत्याबद्दल तर काय सांगावं? कुठेही भडकपणा किंवा बटबटीत छटा न येऊ देता त्याने उभा केलेला मॅक्सिमस अक्षरशः अविस्मरणीय आहे. या अभिनेत्याची खरी ताकद ' अ ब्यूटिफुल माइंड ' या चित्रपटात त्याने उभ्या केलेल्या नोबेल विजेत्या स्किझोफ्रेनिक शास्त्रज्ञाकडे बघून लक्षात येते. विशेषतः ग्लॅडिएटर पाहिल्यावर जर ब्यूटिफुल माइंड पाहिला तर त्याने डॉ. जॉन नॅश यांचं व्यक्तिमत्त्व साकारताना मुळातून बदललेली संपूर्ण देहबोली पाहून थक्क व्हायला होतं.
चित्रपट पाहताना प्रेक्षकांना हे सगळं केवळ काल्पनिक आहे या गोष्टीचा संपूर्णपणे विसर पडतो आणि ते पडद्यावरच्या कथेशी अगदी एकरूप होऊन जातात. इतकं जबरदस्त सामर्थ्य या चित्रपटात आहे यातच मला वाटतं सारं काही आलं.

--अदिती
(१४ नोव्हेंबर २००७,
कार्तिक शुद्ध ४ शके १९२९)

0 Comments:

Post a Comment

<< Home