पुस्तकायन

Wednesday, May 02, 2007

माझे काही हीरोज!

हिरो या शब्दाचा मूळ अर्थ बहुधा शूरवीर किंवा सेनापती असा असावा.(संदर्भ: अ हिरो हॅज फॉलन हे एज ऑफ मायथॉलॉजीमधले वाक्य!). पण मराठीत हिरो कसं म्हणावं याबद्दल मोठाच प्रश्न होता. कारण वीर म्हणायला जावं तर सगळ्यात आधी ते उपहासात्मक वाटतं. अंतू बर्वा ऐकत ऐकत लहानाची मोठी झाल्यामुळे आणि रत्नागिरीच्या मधल्या लोकोत्तर आळीशी बराचसा थेट संबंध असल्यामुळे जिभेला तिरकं वळणा आपसूकच आलंय. दुसरं म्हणजे आपल्या थोर हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रभावामुळे पंजाबी मुली आपल्या मोठ्या भावाला 'वीर' म्हणतात हे ऐकलेलं आहे. माझ्या या हिरोज ना मोठा भाऊ म्हणणं मला फारसं आवडणारं नाही. बरं नायक म्हणावं तर आम्ही सगळे इट्स माय लाईफ असं म्हणत आपल्या आयुष्याच नायकपद स्वतःकडेच असल्याचं बजावून सांगणाऱ्या पिढीचे शिलेदार! त्यामुळे माझ्या आयुष्यात हे एवढे सगळे नायक कसे येणार असा प्रश्न पडेल असं वाटायला लागलं. त्यामुळे माझे हिरोज असंच म्हणायचं हे ठरलं.
ही सगळी हिरो मंडळी काही अपवाद सोडता त्रिमितीय हाडामासाची माणसं नसून द्विमितीय पुस्तकातली पात्रं आहेत. अनेकदा पुस्तकातल्या व्यक्तिरेखा खऱ्या माणसांइतकंच काहीतरी सांगून जातात. त्यामुळेच ती मनात घर करून राहतात. अगदी नारायण-नंदा प्रधानापासून मधू मलुष्ट्यापर्यंत तमाम वल्ली जशा प्रसंग येताच अचानक प्रकट होतात आणि सुखद धक्का देऊन जातात तशीच ही हिरो लोकं अनेक वळणांवर भेटत राहतात.
माझ्या आयुष्यातल्या हिरोज मध्ये पहिला मान हा कुमार जगताच्या लाडक्या हिरोचा म्हणजे फास्टर फेणेचा आहे. माझी वाचनाची वाढती भूक कशी भागवावी हा प्रश्न मी फार लहान वयातच आई-बाबांच्या पुढ्यात टाकला. चांदोबा, ठकठक, चंपक, किशोर मला फार फार तर दोन तास पुरायचे . साप्ताहिक सकाळमध्ये येणाऱ्या कथा वाचायला मी अजून खूपच लहान होते. मग मे महिन्याच्या सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयात आमची रवानगी झाली. तिथे एप्रिल-मे मध्ये बालविभाग तिसऱ्या मजल्यावरच्या खूप कपाटं ठेवलेल्या मोठ्या खोलीत असायचा. घराच्या भिंतींऐवजी पुस्तकांची कपाटं असावीत हे स्वप्न बहुधा तेंव्हापासून असावं. लाडवाला आलेल्या मुंग्या अशाच लाडवात घर करतात आणि भिंती खातात असं माझं मत होतं. एके दिवशी सकाळी फा.फे ची आणि माझी पहिली भेट झाली. बुद्धिबळाच्या पटासारखा चौकटींचा शर्ट घालणारा किडकिडीत आणि तुडतुडीत असा हा प्राणी मला जाम आवडला. प्रथमच मला कोणीतरी "लहान आहेस अजून..." असं न म्हणणारं भेटलं याचा आनंद खूप मोठा होता. मग मी फा.फे वाचतच गेले. ते जग माझ्यासाठी नवं होतं. मोठ्या भावंडांच्या गप्पांमधून आम्हाला तांदुळातल्या खड्यासारखं हाकलून देऊन मग ज्या गप्पा चालायच्या त्या विश्वाची ही एक खिडकी होती. त्यातले बरेच संदर्भ मला अजून लागायचे होते. पण तरीही मला ते वाचताना अत्यंत आनंद व्हायचा.
नंतर माध्यमिक शाळेत गेल्यावर आमच्या प्रचंड मोठ्या आणि सुंदर अशा दगडी ग्रंथालयामध्ये मधल्या सुट्टीत तिथेच बसून वाचायला पुस्तकं मिळायची. माझ्या दृष्टीने ती जागा स्वर्गच होती. तिथे मी फा. फे. चे सगळे भाग ओळीने परत वाचले. इंग्रजी शिकायला सुरुवात केल्यावर फास्ट - फास्टर - फास्टेस्ट या त्याच्या नावाच्या व्युत्पत्तीचा अर्थ समजला. पेटंट म्हणजे काय हेच माहीत नसल्यामुळे ट्टॉक हा बन्याचा पेटंट उद्गार आहे म्हणजे काय हे कळायला मला बराच वेळ लागला. पण अन्वरने वैतागून त्याला ऐकवलेलं "तू काय घड्याळ बिड्याळ आहेस का सारखं टिकटिकायला?" हे वाक्य नकळत रात्री आमच्या मोठ्या किल्लीच्या घड्याळाचे ते मंद्रगंभीर टोले आणि टकटक ऐकताना नकळत मनात चमकून जायचं.
फुरसुंगीहून पुण्यालाच काय पण जगाच्या पाठीवर कुठेही एकट्याने जाणाऱ्या. बँकेत स्वतःचं खातं असणाऱ्या, सुभाष नावाच्या एअरगन बाळगून असणाऱ्या मित्राबरोबर सायकलवरून हिंडणाऱ्या, सदैव संकटांना पाठीवर घेऊन हिंडणाऱ्या, शाळेच्या ट्रीपमध्ये अचाट साहसं करणाऱ्या या मुलाचं मला जाम कौतुक वाटायचं. त्याच्या हर्क्युलिस कंपनीच्या सायकलचं हडकुळी हे नाव मला फारच आवडायचं. मी सायकल शिकले तेही त्याच हडकुळीच्या प्रभावामुळे. याची आई "अजून लहान आहेस, मोठा झालास की जा हं एकट्याने" असं कध्धी कध्धी का म्हणत नाही असा मला पडलेला प्रश्न अजून आठवतो. त्यातून मन्सूर चाचा, अन्वर, शरद शास्त्री उर्फ शास्त्रीबुवा, मा-तुल हृदयाचे मामा मामी, बन्याहून सवाई असणारी त्याची मामेबहीण माली अशी नेहमी भेटणारी पात्र प्रत्यक्षात कधी भेटतील असं राहून राहून वाटायचं. परिकथादेखील खऱ्या वाटण्याचे दिवस होते ते. शिवाय भा. रा. भागवतांची अप्रतिम लेखनशैली तर अविस्मरणीय. त्यांच्या लेखनात कुठेही हे वाचणाऱ्या मुलांना आपल्याला लहान समजून काहीही वाचायला दिलंय अशी भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे हे आज जाणवतं. शिवाय फा. फे ची साहसं ओढून -ताणून आणलेली नव्हती. एखाद्या शैलीदार फलंदाजाने प्रत्येक चेंडू एखाद्या निराळ्याच पण प्रेक्षणीय तंत्राने खेळावा तसे भागवत आजोबा कल्पनेच्या विलक्षण भराऱ्या मारायचे पण त्या वास्तवाची जमीन सोडून कधीही जायच्या नाहीत. एक प्रकारचं भान, समंजसपणा, डोळस वृत्ती ठेवून ती पुस्तकं लिहिलेली आहेत. आता त्यातले संदर्भ बदलले असले तरीही त्यातली विविधता, रंजकता, आणि जादू आजही कायम असावी. शिवाय भागवत आजोबांच्या लेखनातल्या कोट्या आणि विनोद हे तर स्वतंत्र रसायन होतं. मी मागेच म्हटल्यासारखं हे सारं आपल्याला बरोबरीच्या नात्याने, एखादं गुपित सांगावं तसं सांगितलं जातंय ही भावना त्या सगळ्या वाचन-अनुभवाला खूप घट्ट रुजवून जायची. बालसाहित्य लिहिणं सोपं नाही. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे असं साने गुरुजी म्हणत असत. धड लहान नाहीत आणि धड मोठी नाहीत अशा अर्धवट वयातल्या मुलांना फा. फे ने बरंच काही दिलं असणार. धाडसी वृत्ती, संकटांमधून मार्ग काढण्याची चतुराई, आपला देश आपला समाज यांच्याप्रति आपली असलेली बांधिलकी या सगळ्या गोष्टी कुठलेही जड शब्द न वापरता आणि कसलंही अवडंबर न माजवता सहज शिकवल्या गेल्या. नेफा आघाडीवर 'तडफडलेल्या' बन्याला हौतात्म्य पत्करताना एका मेजरने स्वतःच्या रक्ताने करून दिलेली स्वाक्षरी मला कुठेतरी स्पर्श करून गेली होती. एकुणात त्या चिनी युद्धाबद्दलच्या सगळ्याच पुस्तकाने मला चांगलाच चटका लावला होता. एरवी रंजकतेने मोहित करणाऱ्या त्या पुस्तकाला असलेली ही कारुण्याची झालर कायमची लक्षात राहिली.
बन्या म्हणजे बनेश अर्थात फास्टर फेणे आणि या गँगने चांगली सातवी आठवीत जाईपर्यंत मला सोबत केली. आजही एखादं फा.फे. सापडलं तर त्यात रमून जावंसं वाटतं.
साधारण फा.फे. च्या कथांमध्ये रमून जात असतानाच, पुमग्रं च्या कपाटातून फा.फे. च्या मागून एक हिरो डोकावला. भागवत आजोबांची मला मिळालेली ही पुढची भेट होती. डोक्यावर टोपी, तोंडात पाईप असलेली त्याची मुद्रा मलपृष्ठावर असलेलं ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्याचं नाव मी नुसतंच उडत उडत ऐकलं होतं. त्याची थोरवी किंवा त्याचा 'बाप'पणा मला अजिबात माहीत नव्हता. तरीपण शंभर वर्षांपूर्वीच्या त्या कल्पनेतल्या खाजगी गुप्त पोलिसाने म्हणजे अर्थातच शेरलॉक होम्सने माझा पुरता कब्जा घेतला. आपण वाचतोय ते काहीतरी विलक्षण आहे हे मला जाणवलं. पण होम्स वाचल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया मला अजून आठवते. याला रेल्वेगाड्या वेळेवर कशा मिळतात? तारा अचूक पत्त्यावर कशा येतात? केवळ रेल्वे वेळापत्रक आणि आपलं घड्याळा एवढ्या गोष्टींच्या साहाय्याने तो आपला दिनक्रम कसा काय आखू शकतो? त्याच्या हातून वेळेबाबत कधीच चूक कशी काय होत नाही?.... माझ्या चिमुकल्या मनात त्या प्रश्नांनी अगदी गर्दी केलेली असे. पण ज्या पद्धतीने तो कोडी सोडवायचा ती पद्धत फारच रंजक वाटायची. लाल केसवाल्यांची संघटना, पिवळा चेहरा, हार्पूनवाला काळा पीटर, आग लागलेल्या खोलीत कोंडलेलं आणि वी वेअर मर्डर्ड असं भिंतीवर लिहून ठेवणारं जोडपं, संत्र्याच्या बिया, शेवटचा सामना आणि रिकामं घर वगैरे गोष्टी अजून आठवतात. नंतर मी मूळ इंग्रजीतून, डॉईलच्या भाषेत समग्र शेरलॉक होम्सही वाचून काढलं. हाऊंड ऑफ बेस्करव्हिले वाचताना अंगावर आलेला काटा अजून आठवतो. विशेषतः दूर डोंगराच्या टोकावर उभा असलेला 'तो' माणूस आणि त्याच्या मागे दिसणारा पूर्ण चंद्राचा गोल वाचताना जाणवलेला थरार कधीच विसरता येणार नाही. रेड सर्कल, गोल्डन स्पिंझनेट, पिवळा पट्टा, पाचूंच्या मुगुटाची गोष्ट वगैरे गोष्टी पुन्हा वाचताना माझ्या डोक्यात उमटत होता तो भागवतांच्या भाषांतराचा आलेख. दुसऱ्या डागाचे रहस्य अर्थात मिस्टरी ऑफ सेकंड स्टेन ही कथा तर भाषांतर वाचूनच डोक्यात इतकी पक्की बसली आहे की त्यातलं "आमचीही काही राजनैतिक गुपितं असतात साहेब!" हे वाक्य मी कधीही विसरू शकणार नाही.
तसं म्हटलं तर होम्सकथाही काही लहान मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या नाहीत. पण एकूणच त्यात रक्तरंजित खून मारामाऱ्या किंवा हिंसाचाराच्या तपशीलवार नोंदी वगैरे नसल्यामुळेच कदाचित ती पुस्तकं पुमग्रं मध्ये बालविभागात ठेवली असावीत. होम्सने मला रहस्यकथांच्या बाबतीत सज्ञान केलं. विशेषतः वर्गात चोरून किंवा मधल्या सुट्टीत किंवा असंच इकडेतिकडे पुस्तकातला किडा होऊन माझ्या मैत्रिणी जे काही वाचत (त्याच त्या कादंबऱ्या, डिटेक्टिव्ह कथा इ.इ.) त्यात चांगलं काय वाईट काय हे ठरवायची दृष्टी मला होम्सने दिली. बालवयातच हा एक्का हातात पडल्यामुळे नंतर पुस्तकातल्या बऱ्यावाईटाची पारख मला फार सोपी गेली असावी असं मला वाटतं.
सातवीतून आठवीत जाताना एक दिवस आईने माझ्यासाठी तिच्या ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं. त्याचं नाव पाडस. तेंव्हा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला संपूर्णपणे कळल्या नव्हत्या. पण पुस्तकाने मला वेड लावलं. मी तेंव्हा ज्योडीच्याच वयाची होते. त्यामुळे त्याचं ते "एक तरी प्राणी - पक्षी आपला असा असावा" हे वेड आपलं वाटायचं. मांजरं माझ्या वाऱ्याला उभी राहत नसल्यामुळे आणि कुत्रा पाळू या का यावर "कुत्रा किंवा तू कोणीतरी एकच या घरात राहील" हे मिळालेलं उत्तर यामुळे ज्योडीच्या मा चा राग त्याच्या बरोबरीने मलाही यायचा. पण बॅक्स्टरबेटावर जावंसं वाटायचं. हुतोआजी, ऑलिव्हर यांना भेटावंसं वाटायचं. शेवटी फ्लॅगला गोळी घातल्यावरची ज्योडीची तडफड वाचून मला खूप वाईट वाटलं होतं पण ते का हे मात्र कळलंच नव्हतं. "मी वाचलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांबद्दल" वर्गात सांगताना मी पाडसावर बोलले होते. आणि हा शेवट सांगताना ती भुकेची राक्षसीण वगैरे प्रकरण आपल्या लक्षातच आलेलं नाही हे स्पष्ट कळलं होतं हे आठवतंय मला. पण तेवढ्याने या पुस्तकाबद्दलचं माझं प्रेम मात्र कमी झालं नाही. पेनी आणि ज्योडी यांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडलेला आहे. तो असा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. पण कडेलोट नैराश्याचे प्रसंग आले तेंव्हा "जीवन फार सुंदर आहे पण ते सोपं मात्र नाही. आपण उठून उभं राहू पाहतो तेंव्हा ते एकच फटकारा मारतं आणि आपल्याला भुईसपाट करून टाकतं. पोटच्या पोरांची जीवनाशी दोन हात करताना होणारी ससेहोलपट पाहून बापाचं काळीज भरून येतं...." हे वाक्य मला आठवलेलं आहे. त्याने मला अफाट आधार दिलेला आहे. पेनी आणि ज्योडी माझ्या डोक्यात खूप खोलवर घट्ट बसलेले आहेत. कधीतरी अचानक ते आपलं दर्शन घडवतात आणि त्यांच्या प्रकाशात सगळं लख्ख होऊन जातं. त्यातली
"भूक म्हणजे इतकी लागली आहे की पोटाला वाटतंय गळा कापला की काय?
मोठा हुशारीने बोलतोस रे! कुठं शिकलास?
फॉरेस्टरांकडे म्हणतात असं..."
किंवा
"काय दिसतंय तुला?
काही नाही आणि त्यातलंही अगदी थोडं..."
अशी काही निवडक वाक्यं आम्ही घरात वापरतो. खूप मजा येते. माझ्या भावाने तर "वाढदिवसाला काय करू?" या प्रश्नाचं उत्तर "रताळ्याची रोटी !" असं देऊन आईला चकित करून सोडलं होतं. एकुणातच हे पुस्तक मनात खोल झिरपलं आहे. त्यातली पानंच्या पानं ओळीने आठवू शकतात इतकं खोल.
पेनी आणि ज्योडीनंतर माझ्या आयुष्यात बालपणाचा शेवटचा बहर घेऊन आलेलं टोळकं म्हणजे चौघीजणी! या पुस्तकाबद्दल तर काय सांगावं? आमच्या वर्गात हे पुस्तक वाचायची जोरदार फॅशन होती. सगळ्यांचे ते वाचून झालं होतं तरीही कोणी वर्गात ऑफ तासाला चौघीजणी वाचताना दिसलं तर एकमेकींच्या नाकाला नाक लावून तिच्याबरोबर अनेक जणी हे वाचताना सापडायच्या. पुढे चौघीजणीची माझी स्वतःची प्रत हाती आल्यावर तर मला अस्मान ठेंगणं झालं होतं. दहावीच्या अभ्यासातून विरंगुळा म्हणून एकमेकींना चौघीजणी मधलं क्विझ घालायचा उद्योग जाम रंगत असे. आंट मार्च च्या कुत्र्याची जात कुठली इथपासून ऍमी आणि लॉरीचं लग्न कुठे झालं इथपर्यंत कुठलेही प्रश्न सटासट विचारले जात. कोणाच्याही हातात पुस्तक नसे. पण सगळ्यांनाच सगळं इतकं पाठ झालं होतं की गाळलेल्या जागासुद्धा भरता येत असत. या पुस्तकाने शाळेची शेवटची तीन वर्षं सोनेरी रंगाने कायमची रंगवून टाकली.
आयुष्यात जर मी कुणाबद्दल हिरो वर्शिप केली असेल तर ती ज्योबद्दल आहे. मेग , बेथ, ज्यो आणि ऍमी या चार बहिणींच्या या गोष्टीत उत्कटतेने ओतप्रोत भरलेली, धडपडी, उद्योग करून ठेवणारी, मुळूमुळू रडत न बसणारी , माझ्यासारखेच घनदाट काळेभोर केस असणारी, लेखिका होण्यासाठी धडपडणारी माझ्याच वयाची ज्यो माझी रोल मॉडेल झाली नसती तरच नवल. साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मी ते पुस्तक वाचून काढलं. ते वाचायला सुरुवात केल्यापासून मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच दिसत असे. गणपतीची सजावट करताना, माळ्यावर वस्तू चढवताना-उतरवताना, बाबा मुंबईला असताना घरातला मोठा मुलगा म्हणून दूध आणण्यापासून आईला मदत करताना मला तीच दिसायची. तिच्या माझ्यातलं साम्य लक्षात आलं की माझा जीव आनंदानं सुपाएवढा व्हायचा. ते दिवस इतके स्वप्नील होते कारण मी माझ्या परीने ज्यो जगत होते असं मला वाटतंय. तिच्याबद्दल मला काय वाटायचं, वाटतं हे सांगायला शब्द अपुरे पडतील. आत्ताही हे सगळे लिहिताना ''जरी या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे!' या गाण्यासारखी अवस्था झाली आहे. जे मनात उसळलंय त्याच्या एक दशांशही कागदावर उतरलं तरी पुरे अशी अवस्था झाली आहे. अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात ती आहेच. तिने मला बरंच काही दिलंय. तिचं ऋण मोठं आहे.
ज्योच्या बरोबरीने मनाचा कब्जा घेतला तो लॉरीने. ही व्यक्तिरेखा इतकी लोभस आहे, इतकी मोहक आहे की असं कोणी प्रत्यक्षात असूच शकत नाही यावर आमचं एकमत व्हायचं. टॉमबॉय असल्यामुळे ज्यो माझी 'हिरो' झाली आणि तिचा लाडका मित्र लॉरी माझ्या हिरोजमध्ये अग्रस्थान पटकावून आहे. खट्याळ, खोडकर, खेळकर, अत्यंत गुणी, तरीही गर्वाने चढून न जाणारा, ज्याच्याबद्दल पाहताक्षणीच खूप विश्वास वाटावा असा हा बॉय नेक्स्ट डोअर. कितीतरी नव्या कल्पना शिकवून जाणारा. वडील युद्धावर आजारी पडलेले , आई त्यांच्या शुश्रूषेसाठी गेलेली आणि लहानगी बेथ स्कार्लेट फीवरने मरणाच्या दारात पडलेली अशा अवस्थेत लॉरी ने आणि त्याच्या आजोबांनी मेग, ज्यो आणि ऍमीची घेतलेली काळजी फारच हृदयस्पर्शी होती. लॉरीचं स्वतःचं ग्रंथालय, त्याची पुस्तकं, त्याचा पियानो, त्याचे ते सुंदर घर, ज्योशी त्याची असलेली घट्ट आणि निखळ मैत्री, ते आयुष्यग्रंथाचं रोज नवं पान उलटणं, रोज भांडणं , एकमेकांना गुपितं सांगणं, शर्यती लावणं, बर्फावरून घसरत जाणं वाचताना अपार सुख वाटायचं. आमचे दगडी शाळेतले वर्गबंधू मुलींशी बोलायलाही घाबरायचे त्या पार्श्वभूमीवर तर हा चार चार मुलींचा मित्र पाहून त्याच्या बेडरपणाचं कौतुक वाटायचं. मित्र-मैत्रिणीच्या नात्यात उगाचच भुवया उंचावण्यासारखं काही नाही हे माझं ठाम मत होतं आणि आहे. त्याला पुष्टी देणारी ही दृष्ट लागण्याजोगी मैत्री मनाचा ठाव घेत असे. सुसंस्कृतपणा, सहृदयता, उत्कट वृत्ती,खट्याळपणा, सशक्त व्यक्तिमत्त्व, साहसाची ओढ, नव्या प्रयोगांना सामोरं जायची तयारी, प्रेमभंगही झेलायची ताकद आणि शेवटी माधुर्याने ओतप्रोत भरून जाणारं तृप्त, सुखी माणूसपण या गुणांनी सजलेलं हे माझं सोनेरी पान आहे.
साधारण चौघीजणींना भेटायच्या आधी मला अजून एक हिरो सापडला. झालं असं, की आमच्या शाळेत एक नवीन बाई शिकवायला यायला लागल्या. त्यांच्या आणि आमच्या वयात फार फार तर ८-१० वर्षांचं अंतर असेल. त्यामुळे त्यांची आणि आमची वेव्हलेंथ मस्त जमायची. त्यांचं स्वतःचं वाचन अक्षरशः अफाट आहे. त्यामुळे त्यांचा तास ही माझ्यासारख्या वाचनवेड्या मुलींसाठी पर्वणीच असायची. या बाईंनी अनेक नवनवीन पुस्तकांशी, लेखकांशी आमची ओळख करून दिली. अनेक उत्तम पुस्तकं त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या मालकीचं मृत्युंजय हे पुस्तक मला द्याल का असं मी त्यांना जरा भीतभीतच विचारलं. त्यांनीही लगेच दुसऱ्या दिवशी ते मला आणून दिलं. वर म्हणाल्या, " माझ्या वहिनीला हवं होतं पण मी तिला सांगितलं, आधी लेकीला देते ."त्यांनी मला लेक म्हणणं हा अनुभव फारच सुखद होता. तो प्रसंग आजही जसाच्या तसा आठवतो.
त्यामुळे मृत्युंजय बद्दल एक वेगळीच भावना मनात आहे. शिवाय बाईंची एक छान सवय म्हणजे पुस्तकातली उत्तमोत्तम वाक्यं त्या अधोरेखित करून ठेवतात. जणू काही त्या स्वतःच मला त्या पुस्तकातलं भाषावैभव दाखवून देताहेत असंच वाटायचं ते पुस्तक वाचताना. कर्णाची व्यक्तिरेखा मला जाम आवडली. माझ्या हिरोंमध्ये त्याला लगेच स्थान मिळालं. सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, विलक्षण देखणा असा हा शापित राजपुत्र. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष ओढलं न गेलं तरच नवल. मला तर त्याच्या एकाग्रतेच्या, सूर्याकडे टक लावून पाहण्याच्या, त्याच्या बाहुबलाच्या कथा वाचताना प्रचंड भारल्यासारखं होत असे. विशेषतः भीमाने जोर लावून वाकवलेली सळई रो रोज सकाळी सरळ उभी करून ठेवत असे हे वाचताना मला खूप कौतुक आणि मजा वाटायची. त्याची ती जांभळी-लालसर प्रभा फाकणारी कुंडलं, अभेद्य असं कातडं आणि स्वबळावर मिळवलेली धनुर्विद्या वगैरे गोष्टी वाचताना नुसतं स्फुरण चढायचं.
सिंहशिशुरपि निपतति गजेषु सततं कथं महौजःसु ।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः ॥
ही उक्ती सार्थ करणारी त्याच्या मनातली क्षात्रतेजाची ती घगधगती ज्वाळा, प्रत्येक अपमानानंतर संतापाने पेटून उठणारं त्याचं अमोघ क्षत्रिय मन, त्याचा पराक्रम, त्याचे दिग्विजय, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहावं तसे काळाशी सतत केलेले दोन हात, प्रत्येक वेळी अन्याय सहन करण्याची त्याची असीम सहनशीलता पाहून तो माझ्या हिरोंच्या क्रमवारीत कितीतरी वर चढला. इंद्राला कवचकुंडलांचं दान देण्यासाठी त्याने स्वतःचीच कातडी सोलून काढली होती तो प्रसंग तर मी एकदाच कसातरी वाचला. नंतरच्या पारायणांमध्ये तो वाचवलाच नाही. अर्थात कर्णाला सर्वांगावर अभेद्य कवच आणि जन्मजात मांसल कुंडलं होती ही कविकल्पना आहे. जन्मानंतर त्याला नदीच्या पाण्यात सोडताना कुंतीमातेने स्वतःची अभिमंत्रित सुवर्णकुंडलं त्याच्या शेजारी ठेवलेली होते. ती कुंडलं अभिमंत्रित असल्यामुळे त्याचं रक्षण करत होती आणि तेच कर्णाचं कवच होतं असं मूळ महाभारतात लिहिलेलं आहे हे अलिकडेच कळलं. त्यामुळे कुंडलांची मोहिनी वजा करून माणूस म्हणून हे सारं सहन करणारा कर्ण अधिकच खरा वाटायला लागला. एकूणच काही दिवस माझा महाभारताकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला होता.
आणि शिवाजी सावंतांनी उलगडलेल्या भरजरी भाषेच्या पोतांबद्दल, वैभवाबद्दल तर काय सांगावं? अनेक दिवस ती भाषा मनात अशी आंदोलित होत राहायची. एकूणच सावंतांनी महाभारत हे एखाद्या प्रिझमामधून दाखवावं तसं दाखवलं. रिफ्रॅक्टेड फॉर्ममधे. त्यामुळे भीमार्जुन, कृष्ण वगैरे मंडळी पळपुटी वाटायची. खरं तर अजूनही वाटतात. कर्णाबद्दल सहानुभूतीने माझं बालमन पेटून उठत असे.
मृत्युंजय च्या प्रभावाखालून मी बाहेर येतानाच कर्णावरचं अजून एक अतिशय सुंदर पुस्तक वाचनात आलं. त्याचं नाव राधेय. लेखक रणजित देसाई. सावंतांचा मार्ग होता की प्रत्येक प्रसंगात कर्णावर कसा अन्याय झाला, त्याचा ज्यावर हक्क आहे असं श्रेय त्याला कसं मिळालं नाही आणि तो कसा निर्दोष आणि नियतीच्या हातचं बाहुलं होता वगैरे वगैरे. या गोष्टी डोक्यात पक्क्या बसलेल्या असल्यामुळे रणजित देसाई यांनी चितारलेला कर्ण मला खूप जास्त माणसासारखा वाटायला. चरित्रनायक जरी झाले तरी शेवटी माणसेच असतात आणि त्या माणूस असण्यातच त्यांचं मोठेपण असतं ही अक्क्ल मला आज आली आहे आणि या प्रवासात कर्णाने मला खूपच मदत केली आहे.
ज्यो - लॉरी- पेनी-ज्योडी यांनी माझा हात धरून मला महाविद्यालयीन वातावरणात आणून सोडलं. मग माझी नजर वळली ती इंग्रजी साहित्याकडे. मी मराठी आणि आठवीनंतर अर्धमराठी(अर्धमागधी नव्हे!) माध्यमातून शिकले. त्यामुळे किशोरवयात नॅन्सी ड्र्यू किंवा हार्डी बॉईज यांची पारायणं मी केली नाहीत. मी आठवीत असताना काकूने मला तिच्याकडचं एक परिकथांचं सचित्र इंग्रजी पुस्तक दिलं होतं आणि म्हणाली होती, आता तुला हे वाचता येईल नाही का!. मला वाटतं दुसरी तिसरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी लिहिलेलं असावं ते. पणा त्यातली चित्र इतकी सुरेख आहेत की बास. त्या प्रसंगानंतर मी निश्चय केला होता की माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या बहिणी जे वाचतात ते आणि त्याहूनही काही अधिक वाचन करायचं इंग्रजी साहित्याचा व्यासंग करायचा. याची सुरुवात मी अकरावीत केली. नॅन्सी ड्र्यू पासून. खरं म्हणजे हे सगळं वाचण्याइतकी मी लहान राहिले नव्हते. पणा त्याने बैठक मारून वाचायची सवय मात्र लागली. एनिड ब्लॉयटन मात्र मी प्रचंड एन्जॉय केलं आजही करते. द फेमस फाईव्ह ही मालिका हिंदीमध्ये डब करून सुट्टीत लावायचे. ती मी कधीही सोडली नाही. हे सगळे लोक माझ्या फुटकळ हिरोंच्या यादीत मधूनमधून डोकावतात.
अशा प्रकारे जरा सवय झाल्यावर मात्र एक मोठ्ठा हिरो माझ्या वाचनात सापडला. त्याचं नाव हॉवर्ड रोआर्क. फाऊंटनहेड या कादंबरीचा हा मनस्वी, स्वयंपूर्ण, कामावर प्रेम करणारा आणि कामासाठीच जगणारा स्वयंभू नायक मला कळायला बराच काळ जावा लागला. अत्यंत जीर्ण अवस्थेतली आणि बा‌‌ऽऽऽरिक टायपात छापलेली त्याची अत्यंत कुरूप प्रत हातात पडली तेंव्हा हे सगळं आपलं कधी वाचून होणार ही चिंता मला भेडसावू लागली होती. पण अंगभूत चिकाटीने मी तो डोंगर पार केला. वाचलेलं सगळंच समजलं असा माझा मुळीच दावा नाही. पण जे काय वाचलं ते खूप मोठं, भव्य आणि अर्थपूर्ण आहे हे नक्की जाणवलं होतं. डॉमिनिकवर तर माझी भक्तीच जडली होती. आणि रोआर्क बद्दल तर काय सांगावं? काही न सांगणंच उत्तम कारण ते सगळं सांगण्यासाठी पुरेसे बोलके शब्द माझ्यापाशी नाहीत. गेल वीनंड या इसमाचा मात्र सुरुवातीला मला अतिशय राग आला होता. रोआर्क त्याच्यावर इतकं प्रेम का करतो हे मला कळतच नव्हतं. पीटर कीटिंगची तर दया आली होती मला. मला पीटर कीटिंगसारखं करू नकोस अशी मी सारसबागेतल्या गणपतीला प्रार्थना करत असे.
रात्र रात्र जागून मी ते पुस्तक वाचत होते. मला आठवतंय, मध्यरात्रीचा दीड वाजला होता. दारासमोर ट्रकमधून कसलातरी माल उतरवण्याचं काम सुरू होतं. ट्रक्सची ये जा चालली होती. आईची निकराची बोलणी खाऊनही, धडधडत्या हृदयाने आणि विस्फारित डोळ्यांनी स्वयंपाकघरात, ओट्याजवळ खाली बसून मी फाऊन्टनहेड वाचत होते. प्रसंग होता गेल वीनंड बॅनर मधून रोआर्कच्या मागे सर्वक्तीनिशी उभा राहतो तो. लोक गेल ला नाकारतात. झिडकारतात. आजवर त्याने वाट्टेल ते छापलं तरी ते सहज वाचणारे वाचक त्याचं वर्तमानपत्र विकत घेणं नाकारतात. रात्रीच्या वेळी वृत्तपत्रांच्या गाळ्यांवरून न खपलेले बॅनरचे अंक परत येतात. त्याच्या पहिल्या पानावर रोआर्कचा फोटो छापलेला असतो. तो पाहून गेल ला हसायला येतं कारण न्यू यॉर्क शहरातल्या खुरटलेल्या लोकांना , अशा लोकांना ज्यांच्यात एवढी ताकदच नाही की ते रोआर्कला समजून घेऊ शकतील, गेल हॉवर्ड रोआर्क विकत असतो. तोही तीन डॉलरला एक. ....
हा प्रसंग वाचताना माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. ते बाहेरचे ट्रकचे आवाज आणि गेलच्या न खपलेल्या प्रती आणणाऱ्या ट्रक्सचे आवाज माझ्या दृष्टीने एकरूप झाले होते. तो प्रसंग जणू काही मी नजरेसमोर घडताना बघत होते. तो क्षण, ती वेळ, तो प्रसंग विसरणं मला प्रयत्न करूनही जमणार नाही. फाऊंटनहेड वाचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं दैदिप्यमान फळ हातात मिळाल्यासारखं मला वाटलं होतं.....
अजूनही नैराश्याच्या क्षणी मी रोआर्कचं कोर्टातलं तीन पानी भाषण वाचते. खूप बरं वाटतं. रोआर्क अजूनही मला पुरेसा समजलेला नाही. ती वाटचाल चालूच आहे. चालूच राहणार आहे.
रोआर्कनंतर खरं म्हणजे कोणाबद्दल लिहावं असा हिरो सापडणं एरवी मुश्किल ठरलं असतं. पण मला असा एक हिरो सापडला. साधारण पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना, जपानी भाषेच्या वर्गातल्या सेन्सेई आणि एक काका या दोघांनी माझं हॅरी पॉटर या विषयावर बौद्धिक घेतलं. तोवर मी "काय खूळ आहे ! " अशाच नजरेने हॅरीकडे बघत होते. पण हॅरीची सगळी गंमतच आहे. मी पहिलं पुस्तक वाचायच्या त्यावरचा चित्रपट पाहिला. हॅरीने मला वेड लावलं. माझ्या मनातलं जादूचं आकर्षण आणि या जगावेगळ्या पोरक्या मुलाबद्दल वाटणारी सहानुभूती यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मी या कथेत अक्षरशः ओढली गेले. मी हॅरी वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्याची पहिली चार पुस्तकं प्रकाशित झालेली होती आणि पाचव्या पुस्तकाची जोरदार प्रतीक्षा सुरू होती. सटासट एकामागोमाग मी चारही पुस्तकं वाचून काढली. तोवर पाचवं पुस्तकही माझ्या हातात पडलं. जपानीचा अभ्यास करता करता मी आणि काका हॅरी, लॉर्ड व्ही(व्होल्डी!), फॉक्स, यांच्यावर चर्चा करायचो. विशेषतः तिसरं पुस्तक मला विशेष आवडलं. पोरक्या हॅरीला वडीलधारं माणूस म्हणण्याजोगी एकच व्यक्ती म्हणजे सीरिअस भेटतो तो या पुस्तकात. शिवाय जेम्स आणि कंपनीच्या साहसी सफरींबद्दलही याच पुस्तकात वाचकाला कळतं. पॅट्रोनस, मरोडर्स मॅप आणि हॅरीचं विशिष्ट पॅट्रोनस यांच्याबद्दल वाचताना एक थरार जाणवतो. खूप छान वाटतं. हॅरी मोठा होतो तसतशी त्याच्या साहसांची पातळी वाढत जाते. ती वाचताना येणारी मजा वाढतच जाते. तरीही भूतकाळातली सफर, शंभर डिमेंटर्सच्या हल्ल्याला हॅरीने दोनदा दिलेलं समर्थ उत्तर या गोष्टी अद्वितीय आणि विलक्षण गुंगवून सोडणाऱ्या चमत्कृतींबद्दल बोलायचं झाल्यास चौथं पुस्तक जास्त रंजक आहे यात वादच नाही. आणि जादूगारांच्या विश्वाबद्दल अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने पाचव्या पुस्तकाला तोड नाही. पण माझं सगळ्यात आवडतं पुस्तक हे तिसरंच आहे.
मनोगतावरही अनेक सदस्यांशी हॅरीबाबत चर्चा झाली. माझा एक मनोगती मित्र फ्रेड आणि जॉर्ज या खोडकर जोडगोळीचं काम एकटा निभावू शकेल असं माझं स्पष्ट मत आहे. ते त्यालाही चांगलं ठाऊक आहे. माझी अजून एक मनोगती मैत्रीण आणि मी तर दिवसरात्र हॅरी याच विषयावर चर्चा करत असतो. त्यापायी मोबाईल कंपन्यांना आम्ही कितीतरी नफा मिळवून दिला आहे. आता सातव्या पुस्तकात नक्की काय काय होणार, हॅरी सातवा हॉरक्ऱक्स आहे का? फॉक्स परत येणार का, आर ए बी म्हणजे रेग्यूलस ब्लॅक हे कितपत बरोबर आहे? स्नेप चांगला की वाईट, क्रीचरचा लॉकेट चोरण्यात हात असणं शक्य आहे का? असल्या अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा करत असतो. सव्वीस जुलै दोन हजार सात दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. पण स्वतः जेकेआर ने म्हटल्याप्रमाणे आता हा मित्र पुन्हा भेटीला येणार नाही म्हणून मनाला चुटपूट लागलेली आहे. हुरहूर लागलेली आहे. एकीकडे सातवं पुस्तक वाचायची अनावर उत्सुकता आणि दुसरीकडे ही मालिका संपल्याबद्दलचं दुःख अशी मनाची रस्सीखेच सुरू आहे.
हॅरीने माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खडतर काळात मला धीर दिलाय. साथ दिली आहे. निखळ आनंद दिला आहे. अनेक कोडी घातली आहेत आणि सोडवूनही दाखवली आहेत. अद्भुतरम्य जगाची सफर घडवून रंजन केलं आहे. सोसायला अवघड अशा दुःखाचा काही काळापुरता का विसर पाडला आहे. आणि दूर गेलेल्या रम्य शालेय जीवनाची गोडी पुन्हा एकदा अनुभवायला दिली आहे. हॅरी नसता तर हा काळ खूपच कठीण गेला असता. यासाठी मी हॅरीची आणि जेकेआरची ऋणी आहे.
या यादीत छत्रपती शिवाजी महाराज, राऊ, थोरले माधवराव पेशवे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि मदनलाल धिंग्रांपासून ते अनंत कान्हेऱ्यांपर्यंत सगळे वीरवृत्तीचे क्रांतिकारक यांचा समावेश नसेल तर ही यादी निरर्थक ठरेल. पणा ही सगळी खरी माणसं आहेत. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे बराच अभ्यास करायला हवा. त्याशिवाय काहीही लिहिण्याची माझी लायकी नाही. पण वैराग्याचा भगवा रंग माझ्या भावविश्वात मिसळून ते अधिक तेजस्वी करण्यात या व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यापुढे मी अक्षरशः नतमस्तक आहे.
सध्या तरी माझं हे हिरोपुराण इथेच थांबवते आहे. पुन्हा नवीन हिरो सापडले की लिहीनच इथे.
राजते लेखनावधिः!
--अदिती
(१ मे २००७,
वैशाख शुद्ध चतुर्दशी, शके १९२९)

Labels: