पुस्तकायन

Thursday, February 21, 2008

पोक्त बालपणाची अस्वस्थ करून सोडणारी कहाणी : शौझिया

अफगाणिस्तान या एके काळी मुक्त असलेल्या आणि समृद्ध देशाची आज लक्तरं उरली आहेत. १९८८ साली रशियाच्या मदतीने बंडखोरांनी त्याच्यावर पहिला घाला घातला आणि त्यानंतर हा प्रांत अखंड धुमसतो आहे. 'तालिबान' च्या मूलतत्त्ववादी विचारसरणीने तर त्याला काहीशे वर्ष मागे नेऊन ठेवलं आहे.

गेली वीस वर्ष चाललेल्या या अराजकामध्ये अनेक उमलत्या वयाच्या मुलांचं बालपण अक्षरशः कोळशासारखं जळून राख झालं. डोळ्यात धगधगते अंगार आणि हृदयात सूडाची प्रचंड ज्वाला घेऊन उठलेल्या सोळा सोळा वर्षांच्या कोवळ्या मुलांना हाताशी धरून, त्यांना जवळच्या पाकिस्तानात बेकायदेशीर प्रशिक्षण देऊन तालिबानची अफगाणिस्तानावरची पकड घट्ट करून घेतली गेली. तालिबानने स्त्रियांना अशक्य बंधनांमध्ये ठेवून त्यांचं अस्तित्वच नाकारायचा प्रयत्न केला. पुरुष बरोबर नसताना घराबाहेर पाऊल टाकायचं नाही, सर्वांग बुरख्यात झाकून घ्यायचं, कामं करायची नाहीत अशा अनेक जाचक आणि जुलमी बंधनांमध्ये अफगाणी स्त्रिया जखडल्या गेल्या असताना परवाना नावाची एक बारा वर्षांची चिमुरडी तालिबान्यांशी दोन हात करायला रस्त्यावर उतरली. सगळी बंधने झुगारून देऊन तिने मुलीच्या वेषाचा त्याग केला. केस अगदी डोक्याबरोबर कापून ते भुंडे करून टाकले आणि मुलाच्या वेषात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायला ती सिद्ध झाली.

डेबोरा एलिस ही एक कॅनेडियन लेखिका आहे. किशोरवयीन मुलांसाठी पुस्तके लिहिण्याबरोबरच ती युद्धविरोधी कार्य करणाऱ्या आणि स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या संस्थांसाठी काम करते. १९९७ साली डेबोरा अफगाणिस्तानातील शरणार्थी लोक रहात असलेल्या पाकिस्तानातील छावण्यांमध्ये त्या लोकांच्या प्रश्नांबद्दल माहिती घेत असताना तिची गाठ एका आईशी पडली. त्या स्त्रीने सांगितलेल्या थरारक सत्यघटनांवर आधारित अशी तीन पुस्तकांची एक मालिका डेबोराने लिहिली. त्यातील दोन पुस्तकांची नायिका आहे ही परवाना. 'द ब्रेडविनर', 'परवानाज जर्नी' आणि 'मड सिटी' ही ती तीन पुस्तके. यात परवानाबरोबर तिची मैत्रीण शौझिया आपल्याला भेटते. याच शौझियाची कहाणी सांगणारं पुस्तक म्हणजे 'मड सिटी'. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज', 'सिलेक्टिव्ह मेमरीज' अशा पुस्तकांचे मराठीत सरस अनुवाद करणाऱ्या अपर्णा वेलणकर यांनी मड सिटी या पुस्तकाचा शौझिया या नावाने अतिशय सहज आणि सुरेख अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे तो प्रकाशित झाला आहे.

आपल्यावर कोसळलेल्या संकटांना तोंड देताना मोठी माणसं सर्वस्व पणाला लावतात. पण शौझियासारखी लहान मुलंदेखील आपली सर्व शक्ती लावून आलेल्या संकटाशी दोन हात करताना दिसतात. संकटकाळी आपल्यातलं जे जे काही चांगलं असेल ते बाहेर आलं पाहिजे आणि शेवटपर्यंत धीर न सोडता आलेल्या संकटाशी आपण दोन हात केले पाहिजेत हा संदेश शौझिया सतत देत राहते. शौझियाचा मित्र असलेला तिचा लाडका कुत्रा जास्पर तिला पावलोपावली साथ देतो. परवानासारखीच मुलाचे कपडे घालून काम करणारी शौझिया , घरातली माणसं केवळ पैशासाठी एका म्हाताऱ्या माणसाशी आपला 'निकाह' लावून देणार आहेत हे कळल्यावर रातोरात घरातून पळून जाते. अफगाणिस्तानातून पळून पाकिस्तानात पेशावरच्या छावणीत येऊन पोचते. मेंढपाळ तिची सोबत करतात आणि तिला वीरा मौसीच्या हाती सोपवून निघून जातात. वीरा मौसी सुद्धा एक अफगाणी शरणागत आहे. पण अतिशय तीव्र इच्छाशक्ती आणि दैवापुढे कधीही न झुकण्याची जिद्द बाळगून असलेली ही करारी व्यक्तिरेखा वाचताना आपल्यावर मोठा प्रभाव टाकून जाते. वीरा मौसी एके काळी मुलींच्या शाळेत शारीरिक शिक्षणाचे धडे देत होती आणि हॉकीची प्रशिक्षक म्हणून काम करत होती. इथे अनाथ आणि विधवा स्त्रियांसाठी चालवल्या जात असलेल्या पेशावरच्या छावणीत ती जमेल तितक्या स्त्रियांना आणि मुलांना सांभाळायचं काम करते आहे. मेंढपाळ शौझियाला वीरा मौसीकडे देऊन निघून जातात. स्वतंत्र वृत्तीची, कणखर आणि वीरा मौसीइतकीच करारी शौझिया वीरा मौसीचे हुकूम मानायला नकार देते. जगाशी झुंजायला निघालेल्या पण अजून पंखही पुरेसे न फुटलेल्या या गरुडाच्या पिल्लाला सांभाळणं कठीण आहे हे वीरा मौसीलाही पुरतं ठाऊक आहे. पण अर्धवट, अवघड वयाच्या शौझियाला काही समजावून सांगण्याइतका वेळ तिच्याकडे नाही आणि दर क्षणाला आणखी बिघडत चाललेल्या परिस्थितीला तोंड देतादेता ते तिला शक्यही नाही. एका मासिकात पाहिलेला, फ्रान्समधल्या जांभळ्या फुलांच्या शेताचा फोटो उराशी धरून बसलेली शौझिया जास्परच्या मदतीने फ्रान्सला जायचा ध्यास घेऊन आहे. काम करून पैसे मिळवायचे, समुद्राजवळ जायचं, बोटीत बसायचं आणि फ्रान्सला जायचं. तिथे त्या फुलांच्या सुंदर शेतात, गार गार हवेत ही गलिच्छ छावणी आणि तापदायक परिस्थिती विसरून मनसोक्त बागडायचं असं तिचं स्वप्न आहे. मग त्याच शेतावर काम करायचं आणि तिथेच रहायचा असा तिचा निर्धार आहे. एक दिवस पॅरिसमधल्या आयफेल टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर बसून परवानाबरोबर चहा प्यायचा असं त्या दोघींचं ठरलंय. छावणीत केलेल्या कामाचे पैसे वीरा मौसी आपल्याला देणार नाही हे कळतात शौझिया जास्परला घेऊन बाहेर पडते. तिचा यापुढचा सारा प्रवास डोळ्यात पाणी उभं करतो. अंगावर शहारे येतात. मन उदास, भकास होऊन जातं. शब्दांचं कुठलंही अवडंबर न माजवता भेसूर परिस्थितीचं नेमकं चित्रण करून डेबोरा आपल्याला पावलोपावली अंतर्मुख करून सोडते.

युद्ध करवणारे आपल्या घरी सुखासमाधानाने घोरत पडतात आणि शौझिया, परवानासारखी सामान्य मुलं असामान्य परिस्थितीला तोंड देताना पार होरपळून जातात हा विरोधाभास लक्षात आला की युद्धविरोधी काम करणाऱ्या संस्थांसाठी डेबोरा जे काम करते त्याचं महत्त्व पटायला लागतं. संस्कारक्षम वयातल्या किशोरवयीन मुलांना अद्भुतरम्य जग नेहमीच भुरळ घालतं आणि तसं जग उभं करणारी किंवा रहस्यकथा या प्रकारात मोडणारी पुस्तकं निदान इंग्रजी भाषेत तरी बरीच आहेत. पण याच स्वप्ररंजनात रमताना या मुलांना आजूबाजूच्या दाहक परिस्थितीचं भानही कोणीतरी आणून द्यायला हवं. ज्या मोकळ्या आणि मुक्त वातावरणात आपण वाढलो, आई वडिलांचं प्रेम, लाड आणि इतर गोष्टी ज्या आपण गृहित धरतो आणि म्हणूनच ज्यांची आपल्याला किंमत नसते त्या गोष्टींसाठी रस्त्यावर राहणारी, कचरा गोळा करणारी मुलं काय काय करतात याचं भान कळत्या वयातल्या कुठल्याही मुलाला हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच येईल. साध्या विरोधाभासातून आणि सोप्या सहज शैलीतून डेबोरा मुलांशी थेट संवाद साधते.मुद्दाम त्यांना उद्देशून असं काहीही न सांगताही ती त्यांना बरंच काही सांगून जाते. लहान मुलंच काय पणा मोठी माणसंही नकळत अंतर्मुख होतात, कुठेतरी नम्र होतात. आपल्याला मिळालेल्या सुरक्षित बालपणाबद्दल, मौल्यवान आणि स्थिर आयुष्याबद्दल त्यांना कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. उपदेशाचं अवडंबर न माजवता हे अगदी नकळत घडतं. कधी घडतं ते आपल्याला जाणवतही नाही हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. ओल्या मातीच्या गोळ्यासारख्या, उत्सुक आणि कुतूहलाने भरलेल्या कोवळ्या मनांवर काही मूलभूत गोष्टी बिंबवण्याचं काम करत असल्याबद्दल डेबोराला धन्यवादच द्यायला हवेत.
शौझियाचा प्रवास वाचताना अनेकदा डोळ्यात पाणी उभं राहतं. रस्त्यावर सिग्नलपाशी उभी राहून फुगे विकणारी, गाड्यांच्या काचा पुसणारी, गोळ्या बिस्किटं विकणारी, बालमजूर म्हणून काम करणारी अनेक मुलं नकळत डोळ्यांसमोरून तरळून जातात. मनावर ओरखाडे उमटतात. पूर्वी "तुम्हाला कल्पना नाही, लोकांना खायला मिळत नाही तिकडे. उगीच इतका माज करू नये" वगैरे गोष्टी मला कोणी बोललं तर "मी काय करू मग?" असं मला फटकन म्हणावंसं वाटे. आज मी मोठी पण झाले आहे आणि शौझिया वाचल्यावर त्या वेळी त्या लोकांना नक्की काय अभिप्रेत असावं याचाही अंदाज मला आला आहे.
शौझिया अस्वस्थ करून सोडतं. शेवट काहीसा अपेक्षित आणि अपरिहार्य असला तरी एकीकडे शौझियाबद्दल कौतुक वाटत राहतं आणि बालपणाला सोडून सहज मोठ्या झालेल्या, परिस्थितीपुढे मान न वाकवणाऱ्या त्या लहान मुलीकडे पाहून एक क्षणभर 'पाडसा'ची आठवण होते. कुठेतरी दाटून येतं. हुरहूर लागते.

मला वाटतं यापेक्षा जास्त काही लिहून वाचणाऱ्यांच्या अपेक्षांवर माझा प्रभाव पाडण्यात अर्थ नाही. हा निबंध वाचल्यावर जर कोणाला हे पुस्तक वाचावंसं वाटलं तर तेच हा लेख टंकायच्या श्रमांचं(!) फलित आहे असं मी मानेन.
--अदिती
(माघ शु १३ शके १९२९,१९ फेब्रु. २००८)