उषःकाल होता होता
विज्ञान कथांचे जगद्विख्यात लेखक आयझॅक असिमॉव्ह यांच्या 'नाईटफॉल' ह्या प्रसिद्ध दीर्घकथेचा स्वैर अनुवाद.
"If the stars should appear one night in
a thousand years, how would men believe
and adore, and preserve for many generations
the remembrance of the city of God?"
-Ralph Waldo Emerson
सारो विद्यापिठाचे उपकुलगुरू ऍटन ७७ आपल्या टेबलापाशी बसले होते. त्यांच्या डोळ्यात संतापाने नुसता अंगार फुललेला होता. त्वेषाने दात- ओठ खात आणि आपला खालचा ओठ हटवादीपणाने किंचित पुढे काढून ते आपल्या पुढ्यात बसलेल्या तरूण वार्ताहराकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होते.
त्यांच्या समोर बसलेल्या वार्ताहराचं नाव होतं थर्मन ७६२. गेले काही दिवस सर्व बिनीच्या वर्तमानपत्रांमधून त्याचं स्तंभलेखन भलतंच गाजत होतं. अगदी सुरुवातीला त्याचे स्तंभ म्हणजे उगाच काहीतरी खूळ आहे असं म्हणून वाचकांनी तो विषय सोडून दिला होता. पण आता मात्र त्याच्या स्तंभांना फारच महत्त्व प्राप्त झालं होतं. या स्तंभलेनाच्या अनुभवातून तो बरंच काही शिकला होता. इतर कुठल्याही पत्राकाराला हेवा वाटावा अशा, अशक्य कोटीतील लोकांच्याही मुलाखती मिळवणं हे त्याचं प्रमुख कौशल्य होतं. या मुलाखती घेताना त्याला कधी धक्काबुक्की झाली, मारहाणही झाली. क्वचित हाडं मोडली. कधीकधी तर प्रकरण अगदी गंभीर दुखापती होण्यापर्यंत गेलं.. पण या सगळ्यातून तो दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकला होता. आपलं डोकं सतत शांत कसं ठेवायचं आणि आत्मविश्वासाने समोरच्या माणसाशी कसं वागायचं . त्यामुळे ऍटन यांच्या थयथयाटाकडे त्याने अगदी सहज दुर्लक्ष केलं. हस्तांदोलनासाठी पुढे केलेला आपला हातही त्याने मागे घेतला आणि ऍटॉनच्या संतापाला उतार पडण्याची वाट बघत तो मख्खासारखा आपल्या खुर्चीत बसून राहिला. तसं बघायला गेलं, तर खगोलशास्त्रज्ञ म्हणजे मोठी विचित्र जमात असते. त्यातून गेल्या दोन महिन्यातलं ऍटनचं वागणं बघता, हा चमत्कारिक म्हातारा म्हणजे सगळ्या तऱ्हेवाईक खगोलशास्त्रज्ञांचा मेरूमणीच म्हणायला हवा होता.
आपलं डोकं किंचित शांत झाल्यावर ऍटननी बोलायला सुरुवात केली. आपल्या भावनांना कष्टाने आवर घातल्यामुळे त्यांचा आवाज जरासा थरथरत होता पण त्यांच्या ज्ञानाची खोली प्रकट करणारी त्यांच्या आवाजातली जरब मात्र तशीच होती.
" हा असला प्रस्ताव घेऊन तू माझ्यासमोर येऊच कसा धजावलास? हा प्रस्ताव म्हणजे माझा धडधडीत अपमान आहे. अर्थात तुझ्यासारख्या निर्लज्ज आणि गेंड्याची कातडी असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार म्हणा... "
विद्यापिठाच्या वेधशाळेतला टेलिफोटोग्राफर बीनाय २५ याने आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि या संभाषणात उडी घेतली. "सर..., एकूण परिस्थितीकडे बघितलं तर.... "
ऍटननी आपली मान वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि शुभ्र केसांनी मढलेली आपली भुवई उंचावली . "तू यात पडू नकोस बीनाय. या माणसाला इथे घेऊन येण्यामागे तुझा उद्देश चांगलाच आहे हे मला माहीत आहे. पण आत्ता कुठलाच शिस्तभंग केलेला मला खपणार नाही. "
आता याहून जास्त वेळ गप्प बसण्यात अर्थ नाही हे ओळखून थर्मनने बोलायला सुरुवात केली, "ऍटन साहेब, तुम्ही मला माझं म्हणणं पूर्ण करू दिलंत तर... "
"यंग मॅन, आता तू काहीही जरी म्हणालास तरी गेले दोन महिने तुझ्या स्तंभांमधून आमच्या विरुद्ध तू जे काही गरळ ओकतोयस, ते वाचल्यावर तुझ्या बोलण्याचा काही उपयोग होईलसं मला वाटत नाही. मी आणि माझे सहकारी जगावर येऊन कोसळणाऱ्या भीषण संकटापासून जगाला वाचवण्यासाठी इथे अविश्रांत झटतो आहोत. दुर्दैवाने ते संकट टाळणं आता अशक्यच आहे. आणि तू आमच्याविरुद्ध सगळ्या वर्तमानपत्रांतून युद्ध मांडलं आहेस. आमची यथेच्छ टिंगलटवाळी करून, आमच्या कर्मचाऱ्यांना पार विदूषकच करून टाकलं आहेस तू.. "
ऍटन साहेबांनी टेबलावरून सारो सिटी क्रॉनिकल्स या वर्तमानपत्राचा ताजा अंक हातात घेतला आणि तो थर्मनसमोर नाचवत ते म्हणाले, " उद्दामपणाबद्दल जगप्रसिद्ध असलेल्या तुझ्यासारख्या बातमीदारानेही इथे माझ्यासमोर येण्यापूर्वी दहादा विचार करायला हवा होता. आणि आपल्या वृत्तपत्रांनाही, आज इथे वेधशाळेत काय काय होतंय ते टिपून घ्यायला तुझ्यासारखा माणूसच मिळाला का? " संतापाने ऍटनचा स्फोटच व्हायचा बाकी होता. हातातला वर्तमानपत्राचा अंक जमिनीवर भिरकावून देऊन ऍटन खिडकीजवळ गेले. आपले हात मागे वळवून पाठीजवळ त्यांची एकच घट्ट मूठ करून ते उभे राहिले.
"चालता हो इथून... " अचानक मागे वळून त्यांनी गर्जना केली आणि पुन्हा ते आकाशाकडे बघायला लागले.
त्यांच्या ग्रहाच्या सहा सूर्यांपैकी सर्वात तेजस्वी असलेला सूर्य - गॅमा, आता मावळायला लागला होता. गॅमा एव्हाना फिकुटला होता. त्याचा पिवळट गोल अस्ताचलाच्या क्षितिजरेषेवर हळूहळू अंधुक होत होता. आपण शुद्धीवर असताना, एक शहाणा माणूस म्हणून आपण गॅमाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही याची ऍटॉनना पूर्ण कल्पना होती.
" अं..थांब जरा..... तुला बातमीच हवीये ना? इकडे ये. मी देतो तुला बातमी. "थर्मन अजून आपल्या जागेवरच उभा होता. . हे वाक्य ऐकल्यावर तो हळूच ऍटनच्या शेजारी जाऊन उभा राहिला.
ऍटननी खिडकीबाहेर निर्देश केला. "आपल्या सहा सूर्यांपैकी बीटा एकटाच आता आकाशात उरला आहे. दिसतोय ना? "
हा प्रश्न विचारायची खरं म्हणजे काही गरज नव्हती. बीटा आता आकाशमाथ्यावर पोचला होता. बीटाच्या लाल प्रकाशात सगळा आसमंत लालकेशरी रंगाने नहात होता. मावळतीच्या बाजूने गॅमाचा क्षीण प्रकाश हळूहळू दिसेनासा होत होता. आकाशमाथ्यावर पोचल्यामुळे बीटा एखाद्या ठिपक्यासारखा दिसत होता. त्याचा आकार इतका लहान झालेला थर्मनने कधीच पाही ला नव्हता, पण या क्षणी बीटा हाच आकशगोलाचा सार्वभौम सम्राट होता याबद्दल काही वादच नव्हता.
त्यांच्या ग्रहाचं नाव होतं लगाश. लगाशचा सूर्य होता अल्फा, कारण लगाश अल्फभोवती फिरत असे. सध्या अल्फा पार पलिकडच्या गोलार्धात पोचला होता आणि त्यांच्या आकाशातून मावळला होता. त्यांच्या आकाशातले इतर चार तारेही सध्या दुसऱ्या गोलार्धात होते आणि म्हणूनच त्यांच्या आकाशातून मावळले होते. हे चार तारे म्हणजे दोन-दोन ताऱ्यांच्या दोन जोड्या होत्या. बीटा हा एक 'रक्त-बटू' किंवा रेड ड्वार्फ प्रकारचा तारा होता. तो अल्फाचा मित्र होता आणि सध्या आकाशात अगदी एकटा होता. बीटाच्या लाल प्रकाशात वर आकाशाकडे बघणार्या ऍटनचा चेहरा तांबूस दिसत होता. ऍटन म्हणाले, " आता चार तासांच्या आतच, आपल्या संस्कृतीचा अंत होणार आहे. कारण म्हणजे सध्या बीटा हा एकटाच सूर्य आकाशात उरलेला आहे. जा हे छाप तुझ्या पेप्रात. पण तू लिहिलेला स्तंभ वाचायला कोणीच शिल्लक असणार नाही. " त्यांच्या चेहऱ्यावर एक खिन्न हसू पसरलं.
"पण समजा, हे चार तास गेले.... पुढचे चार तासही गेले आणि काहीच घडलं नाही, तर काय करायचं? " थर्मनने हळूच विचारलं.
"त्याची चिंता तुला नको. जे घडायचंय ते घडणारच... "
"हो कबूल आहे पण असं काहीच घडलं नाही तर.... "
बीनाय ने दुसऱ्यांदा आपलं तोंड उघडलं. "सर, मला वाटतं तुम्ही त्याचं म्हणणं एकदा ऐकून घ्यावं."
"मि. ऍटन, हा प्रस्ताव आपण मताला टाकू या... " थर्मन म्हणाला.
हे ऐकताच इतका वेळ शांतपणाने काम करणाऱ्या वेधशाळेच्या इतर पाच कर्मचाऱ्यांमध्ये जराशी चलबिचल झाली.
"त्याची काही गरज नाही. " ऍटन ठामपणे म्हणाले. "हा तुझा मित्र इतका आग्रहच करतो आहे, तर मी तुम्हाला पाच मिनिटं देतो. त्याच्या वर एक क्षणही मिळणार नाही. " त्यांनी खिशातून पॉकेटवॉच बाहेर काढलं. "बोला काय बोलायचंय ते."
" वा. हे उत्तम झालं. आता मला सांगा, तुम्ही जर इथल्या घटनांचा साक्षीदार म्हणून मला इथे थांबू दिलंत तर असा काय फरक पडणार आहे? जर तुमचा अंदाज बरोबर असेल तर तुमचं भाकित खरं होईलच. त्यावेळी मी इथे असल्यामुळे काही त्रास होणार नाही आणि शिवाय ते खरं ठरलंच तर माझा हा स्तंभ लिहिलाच जाणार नाही. पण समजा, जर तुमच्या भाकिताप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर नेहमीप्रमाणे तुमची टर उडवली जाईल. छी-थू होईल. परिस्थिती बरीच अवघड होऊन जाईल. पण तसं झालंच, तर निंदा करण्याचं हे काम तुम्ही एका मित्रावर सोपवणं हेच शहाणपणाचं ठरणार नाही का?"
" आणि हे दयावंत मित्र कोण? आपण की काय? " ऍटॉननी खंवचटपणे विचारलं.
"हो. मीच" थर्मनने आता जागेवरच फतकल मारली आणि मांडी ठोकली.
"माझ्या स्तंभातून मी जरा वाईट भाषा वापरली असेल कदाचित, पण तुम्हा लोकांना संशयाचा फायदा मिळेल अशी खबरदारी मी नेहमीच घेत आलो आहे. हल्लीचे दिवस हे काही लगाशवरच्या लोकांना 'जगबुडी आली' असा उपदेश करण्याचे दिवस नाहीत हे तुम्हीही मान्य कराल. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, की लोकांचा 'बुक ऑफ रिव्हिलेशन्स' वर आता मुळीच विश्वास उरलेला नाही. आणि तुमच्यासारखे शास्त्रज्ञसुद्धा आपल्या मतांपासून घूमजाव करून सांप्रदायिकांची री ओढायला लागतात तेंव्हा तर लगाशकरांचा संताप अगदी अनावर होतो. "
"असं काहीच नाहीये यंग मॅन.. " त्याला मध्येच थांबवत ऍटन म्हणाले. "आमच्याकडे असलेल्या माहितीपैकी बरीच माहिती जरी संप्रदायाकडून आम्हाला मिळालेली असली, तरी आम्ही काढलेल्या निष्कर्षांचा संप्रदायाच्या भाकडकथांशी काहीही संबंध नाही. सत्य हे नेहमी सत्यच असतं. मठाच्या अद्भुत दैवतशास्त्रामागेही काही प्रमाणात सत्याचा अंश आहे. आम्ही फक्त ते सत्य शोधून काढलं आहे आणि त्यातून गूढरम्य दैवी भाग वगळला आहे. आता तर हे संप्रदायवाले तुझ्यापेक्षाही जास्त द्वेष करतात आमचा. आणि हे मी तुला सांगायची गरज नाही, नाही का?"
" मी तुमचा द्वेष करत नाही. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो आहे की लोक भयंकर चिडलेत. "
"चिडू दे की मग " ऍटन खोचकपणे म्हणाले.
" हो पण उद्याचं काय? "
"उद्या? उद्या उरलेलाच नाहीये ! "
" पण समजा उद्या असलाच तर? आपण असं समजू या की उद्याचा दिवस उजाडणार आहे. तसं झालं तर काय होईल? लोकांच्या मनामध्ये खदखदणारा हा असंतोष आणखी उग्र रूप धारण करेल. आधीच गेले दोन महिने आर्थिक मंदी आहे. गुंतवणूकदारांचा खरं म्हणजे या जगवबुडीवर वगैरे विश्वास नाहीये. पण सावधगिरीचा उपाय म्हणून तेही पैसा गुंतवायला तयार नाहीयेत. सामान्य माणसांना तर यातलं खरंखोटं काहीच ठरवता येत नाहीये, पण सध्या सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेमुळे त्यांनीही आपल्या खरेदीच्या याद्या जराशा गुंडाळूनच ठेवलेल्या आहेत. ही झाली आत्ताची परिस्थिती. एकदा का हा सगळा प्रकार घडून गेला, की सगळे भांडवलदार हात धुवून तुमच्या पाठीमागे लागतील. 'कुणीही उठावं, मनाला येतील ती 'भाकितं' करावीत, आणि आपल्या ग्रहाची अर्थव्यवस्था खुशाल ढवळून काढावी , असे प्रकार कसे चालतील? अशा लोकांना आता आपल्या ग्रहबांधवांनीच योग्य तो धडा शिकवायला नको का?' असा प्रश्न त्यांनी विचारला तर किती मोठा आगडोंब उसळेल याची तुम्हाला कल्पना असेलच. आणि असा प्रश्न ते विचारणारच आहेत हेही लक्षात घ्या सर. "
थर्मनकडे रोखून बघत ऍटन म्हणाले, " मग अशा परिस्थितीतून आम्हाला यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी तू नक्की काय करायचं म्हणतोयस? "
थर्मन त्यांच्याकडे बघून हसला. " सर, मी तुमचा पब्लिसिटी एजंट म्हणून काम करीन. हे सगळं प्रकरण नुसत्या टिंगलटवाळीवरच संपावं अशी मी परिस्थितीला एक डूब देईन. सगळीकडून होणारी शेरेबाजी आणि अपमान सहन करणं फारसं सोपं नाही याची मला कल्पना आहे. पण लोकांसमोर आलेली तुमची प्रतिमा दररोज कसलीतरी भाकितं करत सुटणाऱ्या एखाद्या बुवासारखी असेल तर लोक हा प्रकार फारसा गांभिर्याने न घेता सहज हसून सोडून देतील. लोकक्षोभापासून वाचण्यासाठी हे असंच काहीतरी करावं लागेल. आपण असं केलं, तर तुमचीही सुखरूप सुटका होईल. या सगळ्याचा मोबदला म्हणून, हे सगळंच प्रकरण ' कव्हर' करायजी अधिकृत परवानगी फक्त आमच्याच वर्तमानपत्राला मिळावी एवढंच माझं मागणं आहे.
थर्मनच्या या बोलण्यावर बीनायने मान डोलावली आणि तो म्हणाला, "सर, आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की थर्मन जे काही म्हणातोय ते बरोबर आहे. गेले दोन महिने आपण सगळे या प्रकल्पावरच काम करत आहोत आणि त्यात कुठे काही त्रुटी राहिल्या नाहीत ना याची खातरजमा करून घेतो आहोत. आता यात एखादी चूक निघण्याची शक्यता लाखात एखादी असेल. आपली आकडेमोड अचूक आहे आणि त्यात जर काही उणं-अधिक झालंच असलं, तर ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करू या. "
टेबलाभोवती जमलेल्या लोकांनी एकमताने याला दुजोरा दिला. ऍटनचं तोंड अचानक कडू झालं. हा कडूजहर घोट त्यांना टाकवेना की गिळवेना. त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या पाठीशी एकमेकांमध्ये गुंफले होते. असंख्य सुरकुत्यांचं जाळं पसरलेला त्यांचा वयोवृद्ध चेहरा कसल्या तरी निश्चयाने एकदम ताठ झाला. "ठीक आहे. तुझा हट्टच असेल तर थांब तू. पण आमच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणायचा प्रयत्न करू नकोस. अजूनही मी या वेधशाळेचा संचालक आहे. आणि एक लक्षात ठेव. वर्तमानपत्रातल्या तुझ्या स्तंभात तू काय वाट्टेल ते लिहीत असलास तरी इथे असेपर्यंत तुझी मतं तुझ्याजवळच ठेवलीस तर फार बरं होईल. इथे असेपर्यंत मी सांगितलेल्या गोष्टी पाळून तुला आम्हाला सहकार्य करावं लागेल.... "
ऍटनना आणखीही बरंच कायकाय बोलायचं असावं. तेवढ्यात ...
" हॅलो! हॅलो!! हॅलो!!! काय मंडळी काय म्हणताय? अरेच्या! तुम्ही सगळे इतके सुतकी चेहरे करून काय बसलाहात? तब्येती बऱ्या आहेत ना सगळ्यांच्या? " पलिकडून आलेल्या या आवाजाने त्यांना थांबवलं. एक चांगला गब्दुल माणूस आत आला. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर सुखवस्तूपणा ओसंडून वाहत होता. हसताना त्याचे तुकतुकीत गाल प्रकाश हलेल तसे चकाकत होते.
ऍटननी एकदम दचकून त्याच्याकडे पाहिले. "अरे शीरिन! तू इथे काय करतोयस? तू आपल्या छावणीतच थांबणार होतास ना? "
शीरिनने यावर नुसतेच एक स्मितहास्य केले आणि एका खुर्चीत आपला देहविस्तार माववत त्याने फतकल मारली.
" जळो ती छावणी. आपण तर कंटाळलो बुवा तिथे बसून. तिथे असं लपून बसण्यापेक्षा इथे येणं केंव्हाही उत्तम असं माझं स्पष्ट मत आहे. इथे आलं की कसं युद्धाबिद्धाच्या आघाडीवर आल्यासारखं वाटतं. त्यातून या संप्रदायवाल्यांनी ओरडून ओरडून अगदी 'बाऊ' करून ठेवलेले ते तारे नक्की असतात तरी कसे हे बघायची मला प्रचंड उत्सुकता आहे."
त्याने आपले हात एकमेकांवर जोराने घासले आणि तो स्वतःशीच पुटपुटला, " बाहेर अगदी बर्फाळ हवा पडली आहे. वारं तर इतकं बोचरं आहे की नाकातली हवा गोठेल असं वाटतं आहे. इतक्या लांबून बीटाची ऊब अगदीच अपुरी आहे... "
यावर ऍटनने हताश झाल्यासारखी आपली मान जोराने हलवली. आणि वैतागून ते म्हणाले, "शीरिन, दर वेळी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा भलतं काहीतरी करायलाच हवं का? आत्ता या वेळी इथे तुझं काय काम आहे? "
"आत्ता इथे माझं काय काम आहे? " शीरिन अजूनही चेष्टेच्याच सुरात बोलत होता.. त्याने नाटकी हताशपणे आपले दोन्ही पंजे ऍटनसमोर पसरले. " आपल्या छावणीमध्ये माझ्यासारख्या मानसोपचारतज्ञाचं काय काम आहे? त्या लोकांना चांगलं मनुष्यबळ हवं. सशक्त आणि सुदृढ मुलं जन्माला घालू शकतील अशा बायका हव्यात. माझ्या देहविस्ताराकडे बघता अंगमेहनतीची कामं मला जमायची नाहीत आणि नुसतीच मुलं जन्माला घालण्याच्या उपयोगी मी पडू शकत नाही. मग तिथे थांबून उगीचच एक खाणारं तोंड मी कशाला वाढवू? मी आपला इथेच बरा आहे. "
"ही कुठली छवणी आहे सर? " थर्मनने मध्येच विचारलं.
आत्ता कुठे शीरिनचं लक्ष पहिल्यांदा थर्मनकडे गेलं. त्याने विचारलं, "कोण आपण? "
"हा थर्मन ७६२. सध्याचा बिनीचा बातमीदार. याचं नाव तर तू ऐकलंच असशील... " नको असलेली गोष्ट करायची सक्ती झाल्यावर एखादा माणूस जशी आदळ-आपट करेल तसा चेहरा करून ऍटन म्हणाले.
थर्मनने झटकन आपला हात पुढे केला आणि शीरिनशी हस्तांदोनल करून तो म्हणाला, " तुम्ही शीरीन ५०१ आहात ना? सारो विद्यापिठातले जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ! मी बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल....सर, हे छावणीचं काय म्हणत होतात तुम्ही? "
"त्याचं असं आहे, की आमचं हे जे 'भाकित' आहे, शापवाणी म्हणा हवं तर, ते अटळ आहे हे आम्ही लोकांना सांगतो आहोत. त्यातल्या काही लोकांना या गोष्टीची सत्यता पटली आहे. या लोकांमध्ये इथे काम करणाऱ्यांच्या घरची मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. काही बाहेरचे लोकही आहेतच. या सगळ्यांची संख्या सुमारे तीनेकशे असेल. बायका आणि लहान मुलांची संख्या खूप जास्त म्हणजे जवळजवळ तीन चतुर्थांश इतकी आहे. "
"आलं लक्षात. तुम्ही या सगळ्या लोकांना अशा एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवलंय जिथे अंधार आणि हे 'तारे' त्यांना गाठू शकणार नाहीत. बरोबर? म्हणजे बाकीच्या सृष्टीचा सर्वनाश झाला तरी हे लोक सुखरूप राहतील... " थर्मनने एक सुस्कारा सोडला आणि नुकत्याच कानी आलेल्या गोष्टींवर विचार करत तो बराच वेळ शांत बसून राहिला. ऍटनच्या टेबलाभोवती जमलेल्या मंडळींनी एव्हाना बुद्धिबळाचा एक पट उघडला होता. एक अक्षरही न बोलता तिथे असलेल्या सहा लोकांनी त्या अनोख्या पटावर बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. सगळ्यांचीच नजर पटावर अगदी एकाग्रपणे लागलेली होती आणि विद्युत्वेगाने सटासट चालींवर चाली खेळल्या जात होत्या. ऍटन आणि शीरीन मात्र टेबलाच्या एका कोपऱ्यात उभे होते. त्यांचं आपापसात अगदी हळू आवाजात काहीतरी बोलणं चाललं होतं. थर्मन काही वेळ त्या बुद्धिबळाच्या पटाचं आणि खेळाडूंचं निरीक्षण करत उभा राहिला. मग त्याने ऍटन आणि शीरिनच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.
त्यांच्याजवळ जाऊन तो म्हणाला, " सर, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. या सगळ्यांना आपला त्रास होणार नाही अशा एखाद्या ठिकाणी आपल्याला बसता येईल का?"
ऍटननी त्रासिक चेहरा करून थर्मनकडे पाहिलं. पण ते काही बोलणार तेवढ्यात शीरिननेच बोलायला सुरुवात केली.
"काहीच हरकत नाही. मला आवडेल तुझ्याशी बोलायला. तशीही बडबड करायला मला आवडते. मला फार बरं वाटतं कोणाशीतरी बोलल्यावर . आत्ताच ऍटन मला तुझ्याबद्दल सांगत होते. आमचे जगबुडीचे निष्कर्ष चुकले तर काय होईल याबद्दलचा तुझा अंदाज बरोबर आहे. माझंही मत तुझ्यासारखंच आहे . बाकी, मी तुझे लेख नेहमी वाचतो. आवडतात मला. बरेचदा आपली मतंही जुळतात. "
"शीरिन, प्लीज.... " ऍटन कळवळलेच.
"काय झालं?... ठीक आहे, आपण त्या पलिकडच्या खोलीत जाऊ या. तिथल्या खुर्च्या इथल्यापेक्षा चांगल्या आहेत... "
पलिकडच्या खोलीतल्या खुर्च्या खरंच आरामशीर होत्या. त्या खोलीला आतून लालबुंद पडदे लावलेले होते. तिथे एक काळपट लाल रंगाचा गालिचाही घातलेला होता. बीटाच्या तांबड्या प्रकाशात त्या खोलीच रूप रक्ताने माखल्यासारखंच दिसत होतं.
आत शिरल्यावर शीरिनने आपले खांदे उडवले. " काही क्षणांसाठी पांढरा प्रकाश मिळावा म्हणून दहा दमड्या खर्चायची सुद्धा माझी तयारी आहे. आत्ता गॅमा आणि डेल्टा आकाशात असते तर किती बरं झालं असतं.... "
"विचार काय विचारायचंय ते... पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे वेळ नाहीये. अजून तासाभरातच वरच्या मजल्यावर, निरीक्षणकक्षात जायची वेळ होईल. आणि त्यानंतर बोलायला वेळच उरणार नाही. " ऍटन आपल्या स्वरातला तुसडेपणा किंचितही कमी न करता म्हणाले.
"ठीक आहे. विचारतो. " असं म्हणून थर्मनने हातांची घडी घातली. " तुम्ही सगळे या गोष्टीकडे इतक्या अनन्यभावाने बघताहात की त्याचा माझ्यावरही परिणाम झाला आहे. तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला हवा असं मलाही आता वाटायला लागलं आहे. मला थोडीशी पार्श्वभूमी समजावून सांगाल का? हा सगळा काय प्रकार आहे? "
आता मात्र ऍटनच्या संतापाचा स्फोट झाला. " याचा अर्थ इतके दिवस आम्ही घसा फोडून जे काही सांगतो आहोत, त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळवायचे कष्ट न घेताच तू आमच्यावर चिखलफेक चालवली होतीस? "
थर्मन ओशाळं हसला. "असं काही नाहीये सर. मला यातली बऱ्यापैकी माहिती आहे. आता अवघ्या काही तासांतच आपल्यावर अंधाराची अशी एक सावली पडणार आहे, जी सगळ्याच मानवजातीला अगदी वेडंपिसं करून सोडेल असं तुमचं भाकित आहे. हे माहितेय मला. पण असं म्हणण्यामागे काय शास्त्रीय कारणं आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे."
"थांब, थांब. जरा थांब. आत्ता तू ऍटनना यामागची शास्त्रीय कारणं विचारत बसलास, आणि त्यांनी तुझ्या प्रश्नांना उत्तरं दिलीच तर अनेक आकडेमोडींचं आणि आलेख - आकृत्यांचं एक भेंडोळं ते तुझ्यासमोर टाकतील. त्यातलं काहीच तुला समजणार नाही. हा प्रश्न तू मला विचार. मी तुला हे सगळं अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगतो. " शीरीन मध्येच म्हणाला.
"बरं तुम्ही सांगा ... " थर्मन.
"त्याच्या आधी मला काहीतरी प्यायला हवंय ... "
"पाणी चालेल? " ऍटॉननी घुश्श्यात विचारलं.
" तुम्ही माझी चेष्टा करताय का सर.... "
"तुझीच चेष्टामस्करी बास कर आता. आज दारू पिण्यावर बंदी आहे. मुळातच आज लोकांचं लक्ष कामावरून उडणं अगदी साहजिक आहे. आज माझ्या हाताखालच्या लोकांनी पूर्णपणे झोकून देऊन आपापलं काम केलेलं मला हवं आहे... "
काही न बोलता शीरिनने नुसतीच मानेनेच संमती दाखवली आणि आपल्या भेदक नेत्रांनी थर्मनकडे रोखून बघत त्याने बोलायला सुरुवात केली. "थर्मन, आपल्या लगाशवर वेळोवेळी नांदलेल्या संस्कृतींचं निरीक्षण केलं तर त्यांच्यात आपल्याला एक चक्राकार गती दिसते हे तुला माहीतच असेल. यातल्या 'चक्राकार' या शब्दातच खरी मेख आहे. "
"हो मीही याबद्दल ऐकलंय. तुम्ही म्हणताय तो विचार अलिकडेच इतिहासतज्ञांनी मांडला आहे. पण या सिद्धांताला सर्वानुमती मिळाली आहे का? " आपल्या बोलण्याला उद्धटपणाचा वास येऊ नये अशा बेताने थर्मनने विचारलं.
"हो. साधारणपणे गेल्या शतकभरात या सिद्धांताला बऱ्यापैकी मान्यता मिळालेली आहे. पण या संस्कृतींचं हे चक्राकार वागणं हे जरा विचित्रच आहे. हे असं का आहे यामागचं गूढ उकलण्याचे अनेक प्रयत्न होत राहिले आहेत. आपल्याला अशा नऊ संस्कृतींबद्दल खात्रीशीर पुरावे मिळालेले आहेत. अशा आणखीही संस्कृती होत्या असं म्हणायला निश्चित जागा आहे. या सगळ्या संस्कृती साधारण आपल्याइतक्याच विकसित होत्या. गंमत म्हणजे या सर्व संस्कृतींच्या नाशाचं कारण एकच आहे, ते म्हणजे वणवा. हे वणवे कसे आणि का लागले याबद्दल कुठलीच ठोस माहिती मिळत नाही. यातली प्रत्येक संस्कृती अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात होते आणि हे असं का? हे सांगायला काहीच मागे उरत नाही. "
शीरिनचं बोलणं थर्मन अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. तो म्हणाला, " पण सर, आपल्या ग्रहावर अश्मयुगातले लोकही एके काळी रहात होते ना ? "
"हो रहात होते. पण त्या काळातल्या माणसांबद्दल आपल्याला काहीच माहिती मिळत नाही. आपण फक्त एवढाच अंदाज बांधू शकतो की त्या काळचा मानव म्हणजे एप माकडाचंच थोडंसं उत्क्रांत झालेलं एक रूप होतं. त्यामुळे अश्मयुगीन कालखंड विचारात घेतला नाही तरी चालतो. "
" अच्छा! मग पुढे? "
"या सगळ्या घटनांची कारणामीमांसा म्हणून काही गोष्टी सांगितल्या जातात. पण त्या एकाहून एक अद्भुत आणि चमत्कारिक आहेत. काही लोक म्हणतात की आपल्याकडे ठराविक काळाने आगीचा पाऊस पडतो. काही लोक म्हणतात की ठराविक काळानंतर लगाश एखाद्या सूर्याच्या खूप जवळून जात असल्यामुळे असं होतं. काही लोकांच्यामते याहून अघटित आणि कल्पनेच्या पलिकडलं काहीतरी घडतं. पण एक मतप्रवाह असा आहे, जो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हा मतप्रवाह शतकानुशतकं चालत आलेला आहे. अगदी अखंडितपणे. "
" संप्रदायाच्या बुक ऑफ रिव्हिलेशन्स मधले 'तारे' ना? त्याच्याबद्दल मला माहीत आहे. "
"अगदी बरोबर! " शीरीन खूश होऊन म्हणाला. " संप्रदायाचं असं म्हणणं आहे, की प्रत्येक दोन हजार पन्नास वर्षांनंतर एकदा लगाश एका अंधाऱ्या गुहेत जातो. मग सगळेच सूर्य दिसेनासे होतात आणि सगळीकडे अंधाराचं राज्य पसरतं. सगळ्या क्षितिजांना गिळून टाकणारा मिट्ट काळोख सगळीकडे पसरतो. त्यानंतर हे तारे प्रकट होतात. ते आले की सगळी मानवजात आपलं स्वत्व गमावून बसते. सगळ्याच माणसांना झपाटून, अगदी पार पिसाटवून टाकणारी वेडाची एकच लाट उसळते आणि तिच्या प्रभावाखाली माणसं आपणच खपून उभं केलेलं जग पार नष्ट करून टाकतात. अर्थात या सगळ्याला ते त्यांच्या धार्मिक संकल्पनांची आणि कथांची डूब दिल्याशिवाय राहत नाहीत पण त्या सगळ्याचं मूळ हे इथे आहे. "
काही क्षण तिथे एकदम शांतता पसरली. शीरिनने एक मोठा श्वास घेतला. आणि तो पुढे बोलू लागला. "आता आपण वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताकडे वळू या. " या सिद्धांताचं नाव सांगताना त्यातल्या एकेका अक्षरावर जोर देऊन त्याचं महत्त्व अधोरेखित केल्यासारखा शीरीन बोलत होता. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर, खिडकी जवळ उभं राहून बाहेरच्या परिसराचं निरीक्षण करणारे ऍटन मात्र एक तुच्छतादर्शक उद्गार काढून तिथून बाहेर गेले.
ऍटन निघून गेले त्या दिशेकडे दोघं काही काळ बघतच राहिले. थर्मनने विचारलं, " काय झालं? "
" विशेष असं काही नाही. आमच्या लोकांपैकी दोघेजण अजून इथे पोचलेले नाहीत. ते बऱ्याच वेळापूर्वी इथे पोचायला हवे होते. सध्या आमच्याकडे मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे कारण छावणीमध्ये पुरेसे लोक पाठवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. "
"त्या दोघांनी घाबरून पळ नसेल ना काढला? "
" कोण दोघे? फारो आणि यिमो? शक्यच नाही...पण ते दोघं जर अजून तासाभरात परत आले नाहीत, तर इथलं वातावरण बिघडायची शक्यता आहे"
बोलताबोलता शीरिन ताडकन उभा राहिला. " ऍटन इथे नाहीत तेवढ्यात आपला कार्यभाग उरकून घेऊ या.... "
जवळच्या खिडकीपाशी जाऊन तो खाली उकिडवा बसला आणि खिडकीखालच्या खोबणीतून त्याने एक बाटली बाहेर काढली.
त्या बाटलीमध्ये एक लाल द्रावण होते. त्याने ती बाटली जोरजोरात हलवल्यावर त्या द्रावणातून बुडबुड्यांची एक माळ उभी राहिली.
"मला वाटलंच होतं, की ऍटॉनना अजून या जागेचा पत्ता लागलेला नाही. " बाटली हातात घेऊन शिईन टेबलापाशी आला. "आपल्याकडे एकच ग्लास आहे त्यामुळे अतिथीचा मान म्हणून तू ग्लासातून पी. मी बाटलीनेच पिणार आहे. "
शीरिनने अगदी काळजीपूर्वक बाटलीतली थोडीशी वारुणी त्या लहानश्या ग्लासामध्ये ओतली. ग्लासाचा आकार बघितल्यावर थर्मनने तक्रारीचा सूर लावायचा प्रयत्न केला, पण शीरिनने केवळ एकाच भेदक कटाक्षाने त्याला गप्प केले.
"बाळ, मोठ्यांचा मान राखलाच पाहिजे... "
एखाद्या जखमेला धक्का बसल्यावर व्हावा तसा चेहरा करून थर्मन पुन्हा आपल्या जागेवर बसला. " जशी आपली आज्ञा, आजोबा.... मग पुढे काय झालं? "
शीरिनने वाईनची बाटली तोंडाला लावून एकापाठोपाठ एक असे मोठे घोट घेतले. पुरेसे मद्य पोटात गेल्यावर आपल्या रुमालाने तोंड पुसून शीरीन पुढे बोलायला लागला."तुला गुरुत्वाकर्षण या विषयाची किती माहिती आहे? "
"अं.. फारसं काही माहिती नाही, पण मी असं ऐकलंय, की हा अगदीच अलिकडे लागलेला शोध आहे त्यामुळे त्याचं स्वरूप संपूर्णपणे आपल्याला अजून कळालेलं नाही. आणि हा शोध नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी करावी लागणारी आकडेमोड इतकी अवघड आहे की ती समजू शकणारी माणसं आख्ख्या लगाशवर फक्त बाराच आहेत म्हणे. "
"छ्या! शुद्ध थापा आहेत या सगळ्या. गुरुत्त्वाकर्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या बेरजा-वजाबाक्या मी तुला अगदी एका वाक्यात देऊ शकतो. 'गुरुत्त्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धान्त असं सांगतो, की विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचून घेणारं एक असं बल असत. त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांचा गुणाकार भागिले त्यांच्यातल्या अंतराचं वर्गमूळ हे सूत्र वापरून हे बल नक्की किती आहे ते आपल्याला मोजता येतं. "
"झालं? एवढंच सूत्र? "
" हो एवढी माहिती पुरेशी आहे. हे सूत्र शोधून काढायला आपल्याला चारशे वर्ष लागली. "
"बापरे.. एवढा वेळ कसा काय लागला? तुम्ही सांगताना तर ते बरंच सोपं वाटलं... "
"हम्म... एवढा वेळ लागला कारण सृष्टीचे नियम असे चुटकीसरशी कळत नसतात. ते शिकताना जरी सहज सोपे वाटले, तरी त्यांना अचूक सूत्रात बसवण्यामागे जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांची अनेक शतकांची मेहनत असते. चारशे वर्षांपूर्वी जिनॉव्ही फोरायने असा शोधा लावला की अल्फा लगाशभोवती फिरत नसून लगाश अल्फाच्या भोवती फिरतो. तेंव्हापासून आपले खगोलशास्त्रज्ञ या गोष्टीवर काम करताहेत. त्या सगळ्यांनी अथक परिश्रम करून आपल्या सहा सूर्यांच्या भ्रमणाचा आलेख काढला. या सहा सूर्यांच्या अवकाशातल्या भ्रमणाचं गणित मांडलं. या गणिताला या लोकांनी अक्षरशः पिंजून काढलं. त्याच्याबद्दल अनेक सिद्धांत मांडले. त्यांची सर्व कसोर्ट्यांवर कसून तपासणी झाली. अनेक मुद्दे मांडले गेले. खोडले गेले. चर्चा झाल्या. नवी गृहितकं जन्माला आली. या सगळ्यातून मांडला गेलेला प्रत्येक नवा सिद्धांत आधीच्या सिद्धंतापेक्षा अधिक अचूक होता. सत्याच्या जवळ जाण्यासाठी चाललेली ही सगळीच धडपड अतिशय जटिल होती. किचकट होती. अवघड होती. "
थर्मनने मान डोलावली. त्याच्या विचारचक्राला गती आली होती. त्या तारेतच त्याने आपला रिकामा ग्लास शीरिनसमोर धरला. नाखुशीनेच शीरिनने लाल वारुणीचे काही थेंब त्याच्या ग्लासात ओतले. त्या बाटलीतून आपण स्वतःही एक घोट घेतल्यावर शीरीन पुढे बोलायला लागला. "शेवटी, या लोकांनी असं सिद्ध करून दाखवलं, की आपल्या सहा सूर्यांचं अवकाशातलं भ्र्मण हे पूर्णपणे गुरुत्त्वाकर्षणाच्या वैश्विक नियमाला धरूनच होतं. तो क्षण फारफार महत्त्वाचा होता. या गोष्टीला आता वीस वर्षं झाली आहेत. "
बोलता बोलता शीरीन उठला. आपल्या हातातली बाटली तशीच धरून तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.
"आता आपण अगदी कळीच्या मुद्द्याशी येऊन पोचतो. गेल्या दहा वर्षांमध्ये, गुरुत्त्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे लगाशच्या भ्रमणाचं कोष्टक मांडण्याचं काम पूर्ण झालं. तेंव्हा असं लक्षात आलं, की गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमांप्रमाणे गणिताने दाखवलेली लगाशची कक्षा आणि प्रत्यक्षातली लगाशची कक्षा, यांच्यात काही ताळमेळच नाही. याचं कारण शोधण्यासाठी इतर पाच सूर्यांच्या गुरुत्त्वाकर्षणामुळे लगाशच्या कक्षेत होणारे बदल अगदी काटेकोरपणे विचारात घेतल्यावरही या दोन कक्षांमधली तफावत खूपच जास्त होती. याचा अर्थ अगदी सरळ होता. एक तर आपल्या सिद्धांतामध्ये काहीतरी त्रुटी होती नाहीतर इथे अशी एखादी गोष्ट होती जी आपल्याला पूर्णपणे अज्ञात होती, जिच्यामुळे हे गणित चुकत होतं. "
थर्मन आपल्या जागेवरून उठला आणि शीरिनच्या शेजारी जाऊन उभा राहिला. खिडकीतून बाहेर दूरवर लगाशचं लालसर क्षितिज आणि क्षितिजावर पसरलेल्या जंगलांच्या पार्श्वभूमीवरचे सारो शहरातल्या इमारतींचे आकार दिसत होते. त्याला आता अस्वस्थ वाटायला लागलं. कसल्या तरी अज्ञात भितीने त्याला घेरायला सुरुवात केली. त्याने आकाशाकडे पाहिलं. बीटा अजूनही आकाशमाथ्यावर एखाद्या पाशवी अमंगळ बिंदूसारखा लालेलाल तळपत होता.
"सर, पुढे काय झालं ते सांगताय ना? " तो हळूच म्हणाला.
"त्यानंतर साधारण एक वर्षभर खगोलशास्त्रज्ञ या रहस्याची उकल करण्यासाठी धडपडत होते. त्यासाठी लोकांनी एकापेक्षा एक तर्क मांडले, अनुमाने काढली, हे सगळं एखाद्या सिद्धांतात बसवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळेच तर्क एकापेक्षा एक अतर्क्य आणि पटायला अवघड होते. अखेरीस ऍटनना एक कल्पना सुचली. या मुद्द्यावर आपल्या संप्रदायाची मदत घेण्याची. संप्रदायाचे सध्याचे प्रमुख सॉर ५ हे यातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिली. त्यामुळे हा प्रश्न सुटायला खूपच मदत झाली. आणि एका संपूर्ण नवीन पद्धतीने हा प्रश्न ऍटननी सोडवला. "
"समजा, आपल्या शेजारी असा एखादा ग्रह आहे, जो आपल्याला दिसू शकत नाही. तर? तो ग्रह असल्यामुळे स्वयंप्रकाशी नाही. आपल्या सहा सूर्यांचा प्रकाश परिवर्तित केल्यावरच तो दिसू शकेल. शिवाय, आपला लगाश जसा निळसर खडकांनी बनलेला आहे, तसाच हा ग्रहसुद्धा निळसर खडकांनी बनला असेल, तर आपल्या अवकाशात सतत पडत असलेल्या उजेडाच्या पुरामध्ये तांबड्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरचा हा अस्पष्ट अंधुक धूसर ग्रह आपल्याला दिसूच शकणार नाही... हो की नाही? "
थर्मनने पटकन एक शीळ घातली. "कसली भन्नाट कल्पना आहे ही.... "
"भन्नाट वाटतंय? मग हे घे.. जर हा ग्रह लगाशभोवती अशा गतीने, अशा कोनात आणि अशा कक्षेमध्ये फिरत असेल की ज्यामुळे लगाशच्या गणिती कक्षेतून भरकटण्याचं गणित सुटेल, तर? तर काय होईल? "
थर्मनने आपली मान जोराने हलवली.
"कधी ना कधी हा ग्रह आपल्या कुठल्यातरी सूर्याच्या आणि आपल्या मध्ये येईल. " आता शीरिनने उरलेली सगळी बाटली एका घोटात रिकामी केली.
"तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की हा सगळा नुसता तर्क नाहीये. हे सगळं प्रत्यक्षात घडत असलं पाहिजे.... " हताश होऊन एखादं सत्य मान्य करावं तसा थर्मन म्हणाला.
"हो. पण तो ज्या प्रतलामध्ये फिरतो, त्या प्रतलामध्ये फक्त एकच सूर्य आहे. " शीरिनने आकाशमाथ्याकडे बोटाने इशारा केला. "तो सूर्य म्हणजे बीटा. आणि हेही सिद्ध झालेलं आहे, की बीटाचं हे ग्रहण ज्या वेळी होतं, त्या प्रत्येक वेळेला आपल्या आकाशात अशी काही स्थिती असते, की त्या वेळी बीटा एकटाच आपल्या आकाशात असतो. बीटा आपल्यापासून सगळ्यात लांब अंतरावर असतो आणि आपला चंद्र आपल्यापासून सगळ्यात जवळ असतो. या ग्रहणाच्या वेळी चंद्राचा आकाशात दिसणारा व्यास बीटाच्या व्यासाच्या तब्बल सातपट असतो. हे ग्रहण जवळजवळ सहा तास, म्हणजे अर्ध्या दिवसापेक्षाही जास्त वेळ टिकतं. चंद्र बीटाला संपूर्णपणे झाकून टाकतो आणि त्याची सावली लगाशला संपूर्णपणे गिळून टाकते. हे बीटा - ग्रहण प्रत्येक दोन हजार एकोणपन्नस वर्षांनी एकदा होतं. "
थर्मनचा चेहरा आता निर्विकार झाला होता. "हे सगळं मी छापायचंय का? "
शीरिनने मान डोलावली. "हो. हे बीटा - ग्रहण आणखी पाऊण तासात सुरू होईल. मग जगावर अंधाराचं साम्राज्य पसरेल. मग कदाचित हे तारे येतील. मग लोकांना वेड लागेल. आणि मग सगळं संपेल. एक वर्तुळ पूर्ण होईल.... "
शीरिनच्या चेहऱ्यावर चिंता आणि गहन विचार यांच मिश्रण दिसत होतं. त्याच अवस्थेमध्ये त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. "आम्हाला फक्त दोन महिने मिळाले पूर्वतयारी करण्यासाठी. इथे वेधशाळेत पुरेशी लोकंही नाहीत. शिवाय दोन महिन्यांमध्ये अख्ख्या लगाशला येणाऱ्या आपत्तीपासून वाचवणं, सावध करणं हे खरंच प्रचंड मोठं काम आहे. या कामासाठी कदाचित दोनशे वर्षंसुद्धा कमी पडतील... पण आमची सगळी कागदपत्रं, सगळ्या नोंदी छावणीत वसाहतीत ठेवल्या आहेत. शिवाय आज आम्ही या ग्रहणाची छायाचित्रे घेणार आहोत. या चक्राचं पुढचं आवर्तन हे सत्याच्या साथीनेच सुरू व्हायला हवं. असं झालं तरच भावी पिढ्यांना या क्षणाला तोंड देण्यासाठी तयारी करता येईल. पुरेसा वेळ मिळेल. आणि जेंव्हा पुढच्या बीटाग्रहणाचा दिवस येईल, तेंव्हा सगळी मानवजात त्या दिवसासाठी सज्ज असेल..... मला वाटतं हाही तुझ्या लिखाणातला एक मुद्दा असायला हवा. "
खिडकीवरचा पडदा हलला आणि वाऱ्याची एक झुळूक आत आली. थर्मन खिडकीवर रेलून उभा राहिला. वाऱ्याने त्याचे केस भुरूभुरू उडत होते. खिडकीवर ठेवलेल्या त्याच्या हातांवर गडद लाल सूर्यप्रकाश पडला होता. अचानक तो मागे वळला. कसल्या तरी झटक्याने त्याने एकदम विचारलं, "काळोखात असं काय असतं, ज्याने आपल्याला वेड लागेल? "
आपल्या हातातल्या वाईनच्या बाटलीशी विमनस्कपणे चाळा करताकरता शीरीन स्वतःशीच हसला. " यंग मॅन, तू कधी काळोख पाहिलायस का? "
थर्मन मागच्या भिंतीला टेकून उभा राहिला. " नाही. कधीच नाही. पण काळोख कसा असेल याबद्दल कल्पना करणं सोपं आहे.... काळोख म्हणजे.. अं अं " बोलताबोलता तो आपल्या बोटांनी काहीतरी अमूर्त कल्पना पकडायचा प्रयत्न करत असल्यासारखा काही क्षण उभा राहिला. मग एकाएकी त्याचे डोळे चमकले... " काळोख म्हणजे प्रकाशाचा अभाव! एखाद्या गुहेत असतो तसा... "
"तू कधी एखाद्या गुहेत गेला आहेस का? "
" छे... कधीच नाही. "
" मला वाटलंच... परवा मी सहजच एक मी प्रयत्न करून पाहिला. तसा मी काही फार आत गेलो नव्हतो. मी जिथे उभा होतो तिथून गुहेचं तोंड दिसत होत. गुहेच्या तोंडातून प्रकाशाचं एक वलय दिसत होतं. माझ्या आजूबाजूला अगदी गडद अंधार होता. पण मी फार काळ गुहेमध्ये थांबू शकलो नाही. मी तिथून बाहेर प्रकाशाच्या दिशेने धावत सुटलो. माझ्यासारखा अगडबंब माणूस इतक्या जोरात पळू शकेल असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. "
थर्मनच्या चेहऱ्यावर स्मिताची एक बारीक रेषा उमटली. " मी तुमच्या जागी असतो, तर मी नक्कीच तिथून पळून आलो नसतो. "
शीरिनने वैतागून एकदम थर्मनकडे पाहिलं.. " उगाचच बढाया मारू नकोस. हिंमत असेल, तर तो पडदा लावून टाक आत्ताच्या आत्ता"
" पडदे कशाला लावायचे? जेंव्हा आपल्याकडे एकाच वेळी चार - पाच सूर्य तळपत असतात तेंव्हा भगभगाट जरा कमी करण्यासाठी म्हणून पडदे लावणं वेगळं. आत्ता आकाशात एकच सूर्य असताना पडदे लावायची गरजच काय? "
" तेच तर बघायचंय ना... ते पडदे लावून घे आणि इकडे येऊन बस. "
"बरं... " असं म्हणत थर्मनने पडदा बंद करायची दोरी ओढली. त्याच्या जवळच्या रुंद खिडकीवरचे पडदे बंद झाले. दांडीवरच्या पितळी कड्या किणकिणल्या. खोलीत काळपट लाल रंगाची आभा पसरली.
थर्मनच्या पावलांचा आवाज खोलीभर घुमला. पण टेबलाकडे जाताना वाटेतच तो एकदम थांबला. " मला काहीच दिसत नाहीये सर... तुम्ही कुठे आहात? "
"हातानी चाचपडावं लागेल तुला. तुझी वाट शोधावी लागेल. " शीरिनने अस्वस्थपणे त्याला सांगितलं.
" सर, मला काहीच दिसत नाहीये... कुठे आहात तुम्ही सर? " थर्मनला धाप लागली होती.
"मग? तुला काय वाटलं होतं? आता असं कर, इकडे ये आणि खुर्चीत बस. " अंधारातून जरा दरडावणीच्या सुरात आज्ञा झाली. अंधारात पावलांचा आवाज घुमला. थांबत थांबत, सावकाशपणे ती पावलं टेबलाच्या दिशेने आली. कोणीतरी खुर्चीवर अडखळलं. अंधारातून एक बारीकसा आवाज फुटला.. " हुश्श... पोचलो एकदाचा.... "
"कसा वाटला हा अनुभव तुला? आवडला? "
"छे छे! आजिबातच नाही. मला तर असं वाटतंय की सगळ्या भिंती... सगळ्या भिंती माझ्यावर चालून येतायत... मला दोन्ही हातांनी त्यांना अडवायचंय.. पण मला वेडं झाल्यासारखं वाटत नाहीये... आणि मगाशी वाटणारी अस्वस्थताही आता बरीच कमी झाली आहे. "
" ठीक आहे. आता ते पडदे उघडून टाक"
पुन्हा एकदा अंधारात पावलांचा आवाज घुमला. सावकाश एकेक पाऊल टाकत थर्मन खिडकीशी पोचला. मग पडदा सळसळला.
थर्मनने पडद्याची दोरी ओढली. पडदा सरसरत मागे सरकल्याचा आवाज झाला. तो आवाज कुठल्याही सिंफनीपेक्षाही अधिक कर्णमधुर होता... आणि मग खोली पुन्हा एकदा तांबड्या प्रकाशाने नाहून निघाली.
थर्मनने खिडकीबाहेर तेजाने तळपणाऱ्या सूर्याकडे एक विजयी कटाक्ष टाकला. शीरिनने आपल्या हाताने कपाळावर आलेला घाम पुसला आणि तो म्हणाला, "एका अंधाऱ्या खोलीतच आपली ही अवस्था झाली.... "
"पण हे सगळं अगदीच असह्य वाटलं नाही.... " थर्मन पुटपुटला.
"हम्म्म एखाद्या खोलीत हे इतकं असह्य वाटणार नाही. पण तू कधी जंगलोरच्या शताब्दी-जत्रेमध्ये गेलायस का? "
"नाही... मला तिथे जायला जमलंच नाही. फक्त एका जत्रेसाठी सहा हजार मैल लांब जाणं माझ्या जिवावर आलं. "
" मी गेलो होतो. तुला माहितीये का? तिथल्या ऍम्यूझमेंट पार्कमध्ये एक जादूचा बोगदा होता. जत्रा सुरू झाल्यापासून पहिला एक महिनाभर तर त्याने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले होते... "
"हो. मी ऐकलंय त्याच्याबद्दल... पण नंतर त्या बोगद्यावरून काहीतरी वाद झाला होता ना? "
"वाद असा नाही झाला... पण कुरबुरी झाल्या. अर्थातच त्यांच्यावर पडदा पाडला गेला . तो जो बोगदा होता, त्याची गंमत माहितीये तुला? एक किलोमीटर लांबीचा साधा बोगद्यासारखा बोगदा होता तो. पण त्याच्या आत एकही दिवा नव्हता. तिथे जाणाऱ्यांना एका टप नसलेल्या डब्यामध्ये बसवलं जात असे. एका टोकाकडून निघालं की पलिकडच्या टोकाला जायला पंधरा मिनिटे लागायची. सलग पंधरा मिनिटे मिट्ट काळोखातून प्रवास करायची ती फेरी तुफान लोकप्रिय झाली. पण नंतर ती बंद करावी लागली. "
"लोकप्रिय झाली? "
" साधीसुधी नाही. अमाप लोकप्रिय झाली. गंमत म्हणून एखाद्या भीतीदायक गोष्टीला सामोरं जाण्यामध्ये एक प्रकारचा थरार असतो. जन्माला आल्यापासून माणसाला कळत-नकळत तीन प्रकारच्या गोष्टींबद्दल भय वाटत असतं. ती त्याची सहजप्रवृत्ती असते. मोठ्या आवाजाचं भय, धडपडण्याचं भय आणि अंधाराचं भय. एखाद्याची मजा करायची असेल तर अचानक त्याच्या समोर जाऊन मोठा आवाज केला जातो तो याचमुळे. अनपेक्षितपणे मोठ्ठा आवाज कानावर आदळला की दचकायला होतं आणि समोरच्याला हसू येतं. आपल्याला एखाद्या रोलरकोस्टरमध्ये बसायला आवडतं तेही याचमुळे . जादूचा बोगदा इतका लोकप्रिय होण्यामागेही हेच कारण होतं..... आणि बोगद्यातल्या फेऱ्या बंद होण्यामागेही हेच कारण होतं. लोक भीतीने थरकाप झालेल्या, अर्धमेल्या अवस्थेमध्ये बोगद्यातून बाहेर यायला लागले. आणि तरीही पैसे भरून हा थरार अनुभवण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. "
" बरोबर... आता आठवलं मला... काही लोक त्या फेरीदरम्यानच मरण पावले होते ना? ती फेरी बंद केल्यावर असं काहीतरी कानावर येत होतं खरं... "
शीरिनने नकारार्थी मान हलवली. हाताच्या एकाच झटक्याने थर्मनचं म्हणणं उडवून लावत तो म्हणाला, " दोनतीन लोक मेले. त्याचं काही फार महत्त्व नाही. गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊन गप्प करण्यात आलं. जंगलोर शहराच्या महानगरपालिकेलाही गप्प बसवण्यात आलं. जत्रेच्या संचालकांचं असं म्हणणं होतं, की हृदयावर पडलेला ताण सहन करू न झाल्यामुळे कमकुवत मनाच्या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं, पण हे लोक त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर त्या फेरीत बसले होते. आणि असं पुन्हा होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाईल. मग त्यांनी फेरीत जाण्यापूर्वी प्रत्येक माणसाची तपासणी करायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे लोकांची अगदी रीघच लागली. "
"बरं! असं असेल तर... "
"नाही. याला अजून काही बाजू आहेत. काही काही वेळेला लोक त्या फेरीतून पूर्णपणे ठणठणीत अवस्थेत परतायचे. पण नंतर ते कुठल्याच इमारतीत जाऊ शकत नसत. मग ती इमारत राजवाडा असो, ऑफिस असो, झोपडी असो , चित्रपटगृह असो की एखादा तंबू.... "
थर्मन गडबडला. " याचा अर्थ, त्या लोकांना उघड्या मैदानातून कुठल्याही बंदिस्त जागेत जाता येत नव्हतं ? मग ते लोक झोपायचे कुठे? "
"बाहेर जमिनीवर... आकाशाखाली. "
"त्यांना पकडून खोलीत बंद का नाही केलं? "
" केलं ना... पण या लोकांना बळजबरीने एखाद्या खोलीत न्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यांना एकदम झटका येई. ते हिंसक होत. आणि समोर दिसेल त्या भिंतीवर आपलं डोकं जोरजोरात आपटायला लागत. या लोकांना खोलीत ठेवायचं तर त्यांना बांधून तरी ठेवावं लागे, किंवा झोपेच्या गोळ्या तरी द्याव्या लागत असत."
"ते लोक ठार वेडे झाले असले पाहिजेत. "
"बरोबर. त्या फेरीतल्या दर दहा माणसांपैकी किमान एका माणसाची अशी अवस्था होत असे. मग त्यांनी आम्हा मानसोपचार तज्ज्ञांकडे मदत मागितली. आम्हाला यात एकच उपाय माहीत होता, तो आम्ही त्यांना सांगितला. आम्ही ती फेरी बंद करायला लावली. " शीरिनने आपले हात समोरच्या टेबलावर पसरले.
अखेरीस थर्मनने विचारलं, " या सगळ्या लोकांना नक्की झालं काय होतं? "
"तू मगाशी म्हणालास ना, की अंधारात या भिंती तुझ्यावर चालून येतायत असं तुला वाटत होतं? या लोकांच्या बाबतीत तसंच झालं होतं. आपल्याला अंधाराची भीती वाटते ना, तिला मानसशास्त्रात 'क्लॉस्ट्रोफोबिया' किंवा बंद जागांचं भय असं म्हणतात. आपल्याला अंधाराची भीती वाटते कारण अंधार आणि बंदिस्त जागा यांचा एकमेकांशी अगदीच जवळचा संबंध आहे. त्यामुळे एका गोष्टीबद्दल वाटणाऱ्या भीतीमध्ये दुसऱ्या गोष्टीची भीतीही ओघाने येतेच. "
"पण मग त्या बोगद्यातून बाहेर आलेल्या लोकांचं काय? "
"त्या लोकांना सलग पंधरा मिनिटे अंधारात काढावी लागली होती. दुर्दैवाने त्यांना त्या क्लॉस्ट्रोफिबियाचा परिणाम सहन होऊ शकला नाही. पंधरा मिनिटं प्रकाशिशिवाय काढायला लागणं हा कालावधी पुरेसा मोठा आहे. दोन तीन मिनिटातच तुझी चांगली वाट लागली होती. हो ना? त्या लोकांच्या बाबतीत जे काही झालं , त्याला आम्ही क्लॉस्ट्रोफोबिक फिक्सेशन असं म्हणतो. त्यांच्या मनातली अंधाराबद्दलची भिती आणि बंदिस्त जागांबद्दलची भिती या भावनांनी त्यांच्या मनाचा कायमचा ताबा घेतला होता. फक्त पंधरा मिनिटांच्या अंधाराचा हा असा परिणाम होतो. "
थर्मनच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. " माझा नाही विश्वास बसत यावर... "
"विश्वास बसत नाहीये की विश्वास ठेवायचा धीर होत नाहीये? जरा खिडकीबाहेर बघ काय दिसतंय... " शीरीन आता अगदी दरडावणीच्या सुरात बोलत होता. थर्मनने बाहेर नजर टाकली. पण त्याच्याकडे लक्ष न देता शीरिनने आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं.
"समजा आता खिडकीबाहेर काळोख पसरला आहे. अगदी किर्र अंधार. नजर पोचेल तिथवर फक्त काळ्या अंधाराचा अंमल आहे. काळं आकाश आणि अंधाराने गिळून टाकलेला आसमंत. आणि मग हे जे काय 'तारे' आहेत, ते दिसायला लागले आहेत... अशी कल्पना करणं तरी तुला जमेल का?"
"अं .. हो" थर्मन बोलताना अडखळला.
कसल्यातरी आवेशात शीरिनने आपला हात टेबलावर जोरात आपटला. "खोटं बोलतोयस तू. जशा अनंत काळ किंवा अनंत अंतराच्या कल्पना तुझ्या मेंदूसाठी अमूर्त आहेत, तशीच ही कल्पनाही तुझ्यासाठी अमूर्त आहे. या विषयावर गप्पा मारणं सोपं सलं, तरी ही गोष्ट म्हणजे नक्की काय आहे हे तुला समजणं तुझ्या मेंदूच्या कुवतीबाहेरचं आहे. सत्याच्या कणभर जवळ गेलास तर तुला अस्वस्थ वाटायला लागलं. आता जेंव्हा पूर्ण सत्याला सामोरं जायची तुझ्यावर वेळ येणार आहे, तेंव्हा त्या अवस्थेचा ताळेबंद लावतालवता तुझा मेंदू पुरता भंजाळून जाणार आहे. तुला कायमचं वेड लागणार आहे. ठार वेड. अगदी खात्रीने. "
शीरिनच्या आवाजात एकाएकी अपार खिन्नता आली. " ज्ञानाकडे , सत्याकडे जायची दोन हजार वर्षांची तडफड पुन्हा एकदा वाया जाणार आहे. उद्या लगाशवर धडक्या अवस्थेतलं एकही ठिकाण शिल्लक नसेल. "
जरा भानावर आल्यावर थर्मन म्हणाला, " हे मात्र माझ्या डोक्यावरून गेलं. आकाशत एकही सूर्य शिल्लक नाही म्हणून मला आणि सगळ्याच माणसांना वेड लागेल हे एकवेळ मान्य केलं, तरी सुद्धा, या गोष्टीमुळे शहरंच्या शहरं बेचिराख कशी होतील हे काही आपल्याला समजत नाही. "
शीरीन आता चांगलाच चिडला होता. "मूर्ख माणसा, तुझ्या आजूबाजूला सगळीकडे अंधार पसरल्यावर जिवाच्या करारावर तुला कोणती गोष्ट हवीशी वाटायला लागेल? उजेड! मागचापुढचा विचार न करता प्रकाश मिळवण्यासाठी जे काही सुचेल ते तू करायला लागशील. हो ना? "
"हो लागीन. मग? "
"तुला प्रकाश कसा मिळेल? "
" मला नाही माहीत... "
"जर सूर्याचा प्रकाश मिळत नसेल, तर प्रकाश मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? "
"ते मला कसं कळणार? "
एव्हाना ते दोघे एकमेकांच्या समोरासमोर, एकमेकांवर चाल करण्याच्या पवित्र्यात उभे होते.
"अशा वेळी प्रकाश मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एखादी गोष्ट जाळायची. तू कधी जंगलात लागलेला वणवा पाहिलायस ? कधी चुलीवर स्वयंपाक केलायस? चुलीतून फक्त उष्णताच नाही मिळत. प्रकाशही मिळतो. अंधारात माणसं प्रकाश मिळवणार आहेत. "
"लाकडं जाळून? "
" लाकडं? लाकडं अशी सहज मिळतात का? लाकडांच्या ऐवजी त्यांच्या हाताला जे जे म्हणून लागेल ते ते सगळं ते जाळत सुटणार आहेत. लगाशवरची प्रत्येक वस्ती पेटणार आहे. "
ते दोघंजण काही क्षण एकमेकांकडे त्वेषाने बघत उभे राहिले. जणू काही ही त्यांच्यातल्या शक्तीचीच परीक्षा होती. पण मग थर्मन मागे हटला. त्याला धाप लागली होती. शेजारच्या खोलीतून अचानक कसलातरी आवाज यायला लागला होता, पण थर्मनच्या तो खिजगणतीतही नव्हता.
शीरीन म्हणाला, " बहुतेक यिमो आणि फारो आलेत. हा यिमोचा आवाज आहे. " शीरिनने आपला आवाज प्रयत्नपूर्वक शांत केला आहे हे कळत होतं. "चल, बघू या काय प्रकार आहे तो..
"हो चला. " थर्मन म्हणाला. त्याने मनोमन काहीतरी झटकून टाकायचा प्रयत्न केला. वातावरणातला ताण निवळला.
शेजारच्या खोलीतून जोरजोरात संभाषणांचे आवाज येत होते. ते दोघे आत शिरले. त्या खोलीत मधोमध दोन तरुण मुलं उभी होती. त्यांना त्यांचे ओव्हरकोट काढण्याचीही सवड न देता, वेधशाळेतल्या बाकी लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या होत्या आणि रणांगणातल्या मुरारबाजीसारखे ते दोघं त्या चौफेर हल्ल्याला तोंड देत होते.
ऍटन एकदम तीरासारखे आत घुसले. जाब विचारावा तसं त्यांनी त्या दोन तरुण मुलांना विचारलं, " कुठे होतात? पत्ता काय तुम्हा दोघांचा? आता फक्त अर्धा तास राहिला आहे आपल्या हातात... काही शुद्ध आहे की नाही? "
फारो २४ एका खुर्चीवर बसला आणि आपले तळहात त्याने जोरात एकमेकांवर घासले. बाहेरच्या गार वाऱ्यातून आल्यामुळे त्याचे गाल लालबुंद झाले होते. तो म्हणाला, " मी आणि यिमो आमचा स्वतःचाच एक लहानसा प्रयोग करून बघत होतो. कृत्रिमरित्या अंधार करून त्यातून ताऱ्यांच्या प्रकाशासारखा प्रकाश पाडता येईल अशी व्यवस्था करून बघायचा आमचा विचार होता. थोडीशी पूर्वकल्पना मिळाली तर बघावी म्हणून आम्ही हा उद्योग केला. "
त्यांच्या आजूबाजूला खुसपूस झाली. ऍटनचे डोळे अचानक चमकले. सावध झाले. "तुम्ही आधी यातलं काहीच मला बोलला नाहीत. कसा काय जमवलात हा प्रयोग तुम्ही? "
"बऱ्याच दिवसांपासून माझ्या आणि यिमोच्या मनात ही कल्पना घोळत होती. आम्ही आमच्या फावल्या वेळात तिच्यावर काम करत होतो. यिमोच्या माहितीत एक जागा होती. शहराच्या जुन्या गावभागात एक एकमजली घर आहे. त्याचं छप्पर एखाद्या घुमटासारखं आहे. तिथे पूर्वी कसलं तरी संग्रहालय होतं बहुतेक. पण ते जाऊ दे. तर ते घर आम्ही विकत घेतलं. "
"तुम्हा दोघांकडे एवढे पैसे कुठून आले? " ऍटननी विचारलं.
"आमच्या खात्यात तेवढे पैसे होते. आम्हाला त्यासाठी २००० दमड्या खर्ची घालाव्या लागल्या. " यिमो ७० म्हणाला. आणि मग स्वतःच कबुलीजबाब दिल्यासारखी त्याने पुस्ती जोडली, " तशीही अजून अर्ध्या तासानी २००० दमड्यांची किंमत २००० कागदाच्या कपट्यांपेक्षा जास्त नसेल ना. "
" म्हणूनच पैशांचा विचार न करता आम्ही ते घर घेतलं. मग त्यात शक्य तितका चांगला काळोख निर्माण करायला म्हणून आम्ही त्याच्या छतापासून पायापर्यंत काळ्या मखमली कापडाचं एक आवरण तयार केलं. मग आम्ही छपराजवळ मखमलीच्या कापडाला आणि नंतर छपरालाही गोल भोकं पाडली. त्या सगळ्या भोकांवर धातूच्या झडपा बसवल्या. भिंतीवरच्या एका कळीच्या मदतीने त्या झडपांची उघडझाप करायची सोय आम्ही करून घेतली. यासाठी आम्हाला पैसे खर्च करावे लागले. काही सुतार आणि गवंड्यांची मदत घ्यावी लागली. पण अर्थातच पैशाला काहीच किंमत नव्हती आमच्या दृष्टीने. शेवटी आम्ही एक अशी यंत्रणा उभी केली ज्यामुळे आम्हाला त्या घराच्या छपरातून ताऱ्यांच्या प्रकाशासारखा प्रकाश मिळेल. "
एका दमात हे एवढं सगळं बोलल्यावर श्वास घ्यायला तो क्षणभर थांबला. तिथे पसरलेल्या शांततेतून ऍटन म्हणाले, "तुम्हाला असं खाजगी संशोधन करायला परवानगी नाहीये.. "
त्यांचं बोलणं मध्येच थांबवत फारो म्हणाला, " हो आम्हाला माहितेय सर. पण खरं सांगू का? यिमो आणि मी, आम्हाला दोघांनाही सारखं वाटत होतं की अशा प्रकारचा प्रयोग करणं धोकादायक ठरू शकतं. शीरिनचं या बाबतीतलं म्हणणं आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही वेड लागू शकतं याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आम्ही दोघांनीच हा धोका पत्करायचा असं आम्ही ठरवलं. जर आम्ही वेड न लागता यातून बाहेर आलो असतो, तर आम्हाला काळोखाच्या परिणामांपासून अलिप्त होण्याचा मार्ग शोधायचा होता. एकदा ते जमलं असतं तर आम्ही तुम्हाला सगळ्यांनाही यात सामील करून घेतलं असतं. पण आम्हाला वाटलं होतं तसं काहीच झालं नाही... "
"का? काय झालं? " -ऍटन.
आता यिमोने बोलायला सुरुवात केली. "आम्ही दारं बंद केली आणि पूर्ण काळोखात जाऊन उभे राहिलो. आमचे डोळे अंधाराला सरावायला जरा वेळ लागला. पूर्ण काळोख फार विचित्र असतो. असं वाटतं की सगळ्या भिंती आणि छपर आपल्याकडे धावत येतायत आपल्याला गिळून टाकायला. पण थोड्या वेळाने आम्हाला ते सरावाचं झालं. मग आम्ही त्या छपरातल्या झडपा उघडल्या. खोलीच्या छपरातून प्रकाशाचे लहानलहान पुंजके चमकायला लागले. "
"मग पुढे? "
"पुढे काहीच नाही. काहीच झालं नाही. हा प्रकार सगळ्यात विचित्र होता. भोकं असलेल्या छपरापेक्ष वेगळं असं तिथे काहीच दिसलं नाही की जाणवलं नाही. आम्ही हा उद्योग बरेच वेळा करून पाहिला. त्यातच आमचा इतका वेळ गेला. पण काहीच घडलं नाही... "
तिथे स्मशानशांतता पसरली. नकळत सर्व नजरा शीरिनकडे वळल्या. तो तोंडाचा आ वासून एका खुर्चीवर स्तब्ध बसला होता.
थर्मनने सर्वात आधी बोलायला सुरुवात केली. "शीरिन, याचा अर्थ काय आणि याचा तुमच्या सगळ्या स्पष्टीकरणावर काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतंय ना? " त्याच्या चेहऱ्यावरून समाधान आणि आनंद ओसंडून वहात होता.
शीरिनने हाताने त्याला थांबवलं. " एक मिनिट, मला याचा जरा विचार करू दे. " त्याने आपली बोटं मोडली. आणि अचानक त्याने वर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कणभरही आश्चर्य दिसत नव्हतं. त्याने बोलायला सुरुवात केली, " बरोबरच आहे... "
पण त्याला आपलं वाक्य पूर्ण करता आलं नाही. त्या इमारतीच्या वरच्या भागातून कसलातरी आवाज आला. बीनाय त्या आवाजाने दचकून एकदम उभा राहिला आणि काय गडबड आहे हे बघायला आवाच्या दिशेने त्याने धाव घेतली. बाकीचे लोकही त्याच्या मागोमाग धावत सुटले.
पुढच्या गोष्टी एकामागोमाग एक इतक्या त्वरेने घडल्या की बास! वरच्या घुमटामध्ये मोठ्यामोठ्या फोटोग्राफिक प्लेटसचे तुकडे इतस्ततः पडले होते. एक माणूस ओणव्याने वाकून त्या प्लेटसजवळा काहीतरी करत होता. हा प्रकार पाहताक्षणी संतापाने बीनायने एकदम धाव घेतली आणि त्याच्या गळ्यावर एक जबरदस्त पोलादी पकड घेतली. तोवर बाकीचे लोकही तिथे येऊन पोचले. आणि मग एकामागोमाग एक लोकांनी येऊन त्या माणसाला धरलं. झटापटीचे आवाज आले आणि अर्धा डझन माणासांनी त्या घुसखोराला जणू काही गिळून टाकलं.
ऍटन सगळ्यात शेवटी आले. दम खात ते म्हणाले, "सोडा त्याला. "
नाखुशीनंच त्या लोकांनी घुसखोराला सोडलं. त्याला दम लागला होता. त्याचे कपडे फाटले होते आणि त्याच्या कपाळावर जखम झाली होती. इतर लोकांनी त्याचे दोन्ही हात धरून त्याला उभं केलं. त्या घुसखोराने लांब दाढी राखलेली होती. तिला विशिष्ट कोनात वळवलेलं होतं. ही दाढी म्हणजे संप्रदायाची खूण होती. बीनायने त्याची गचांडी धरली आणि त्याला जोरजोराने हलवलं.
"काय रे कुत्र्या, या फोटोग्राफिक प्लेटसशी काय करत होतास तू? तुला काय वाटलं? ... "
" मला नकोच आहेत तुमच्या प्लेटस. त्या चुकून पडल्या खाली... " संप्रदायी म्हणाला.
तो पलिकडे ठेवलेल्या कॅमेऱ्यांकडे जळजळीत नजरेने बघत होता. तो कुठे पाहतो आहे हे लक्षात आल्यावर बीनाय आणखी संतापला. "अच्छा ... बच्चमजी, हे कॅमेरे नष्ट करायचा डाव होता काय तुझा! तसं असेल तर तुझ्या हातून फोटोग्राफिक प्लेटस फुटल्या हे तुझं सुदैवच म्हणायला हवं. जर का तू एकाही कॅमेऱ्याला हात जरी लावला असतास ना, तर मी तुझे हाल हाल करून तुला ठार मारलं असतं. पण हरकत नाही..." असं म्हणत त्याने आपल्या हाताची मूठ वळली आणि त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने उगारली.
ऍटननी त्याच्या बाहीला धरलं. "पुरे बीनाय. बास झालं. सोड त्याला "
बीनाय संतापाने थरथरत काही क्षण तसाच उभा राहिला . अखेर त्याने आपला उगारलेला हात खाली घेतला. त्याला बाजूला करून ऍटन स्वतः त्याच्या समोर उभे राहिले. "तू लाटिमर आहेस ना? "
त्या घुसखोराने कमरेत झुकून अभिवादन केलं पण त्यात नम्रतेपेक्षा गुर्मीचा ताठाच अधिक होता. मग आपल्या कमरेजवळ लावलेल्या बिल्ल्याकडे निर्देश करून तो म्हणाला, " हो मीच लाटिमर२५, लॉर्ड सॉर ५ यांचा उजवा हात. "
"गेल्या आठवड्यात जेंव्हा लॉर्ड सॉर इथे आले होते तेंव्हा त्यांच्यासोबत तूही आला होतास. बरोबर?
लाटिमरने पुन्हा एकदा कमरेत झुकून अभिवादन केले.
"हम्म... काय हवंय तुला? "
" मला हवी असलेली गोष्ट तुम्ही आपणहून राजीखुशीने मला देऊ शकणार नाही."
"तुला सॉर५ यांची पाठवलंय का? की तुझा तूच आलायस? "
"या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. "
"तू एकटाच आलायस की अजून काही लोक येऊ घातलेत? "
"याही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. "
ऍटननी आपल्या घड्याळाकडे एक नजर टाकली आणि तेम्हणाले, " आत्ता या घडीला सॉरसाहेबांना काय हवंय माझ्याकडून? ठरल्याप्रमाणे सगळ्या अटी तर मी यापूर्वीच पूर्ण केल्या आहेत. "
लाटिमर नुसताच हसला. काहीच बोलला नाही.
ऍटन आता चिडले होते. "मी त्यांच्याकडे गेलो होतो माहितीची याचना करायला. अशी माहिती, जी संप्रदायाखेरीज दुसरीकडून कुठूनही मिळू शकत नाही. ही माहिती तुम्ही लोकांनी मला दिली याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. या माहितीचा मोबदला म्हणून मी तुमची मतप्रणाली सिद्ध करून द्यायची असं ठरलं होतं. त्याप्रमाणे मी ती दिलीही. "
"बुक ऑफ रिव्हिलेशन्समध्ये लिहिलेल्या गोष्टी स्वयंसिद्ध आहेत. त्या सिद्ध करायची काही गरजच नाही" किंचित गर्वोद्धतपणे लाटिमर म्हणाला.
" हो पण त्या गोष्टी स्वयंसिद्ध आहेत त्या फक्त तुमच्या संप्रदायातल्या लोकांसाठी. माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नकोस. तुमच्या मतप्रणालीला विज्ञानाचं पाठबळ मिळवून देईन असं मी कबूल केलं होतं. आणि तसं ते मी दिलं आहे. "
लाटिमरचे डोळे संतापाने बारीक झाले. त्याच्या मुद्रेवर तुच्छतेचा भाव प्रकट झाला होता. " हो दिलंत ना! दिलंत तुम्ही पाठबळ. पण ते देतानाही तुम्ही एखाद्या कोल्ह्यासारखा धूर्तपणा केलात. तुमच्या मल्लिनाथीमुळे आमची मतप्रणाली सिद्ध झाली खरी, पण ती अशा पद्धतीनं की तिची गरजच संपुष्टात आली. जगबुडीचा अंधार आणि प्रकट होणारे तारे, यांना तुम्ही एखाद्या नैसर्गिक गोष्टीचं रूप दिलंत आणि त्यांच सगळं धार्मिक महत्त्व संपुष्टात आलं. हा आमच्या देवाचा अपमान आहे. "
"असला तर असला. मी काही मुद्दामून कोणाचा अपमान केलेला नाही. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या आहेतच. त्या तशाच सांगायला हव्य्यात... "
"जे तुम्हाला सत्य वाटतंय, त्या खरं म्हणजे थापा आहेत सगळ्या. अगदी शुद्ध फसवणूक आहे ही"
ऍटनने संतापाने आपले पाय जमिनीवर आपटले. "सत्याबित्याबद्दल तुला काय रे ठाऊक ? "
"मला सगळं माहितेय.... " लाटिमर हे वाक्य असं म्हणाला की जणू काही या घोषणेनंतर कुणी काही बोलूच शकत नाही.
ऍटनचा चेहरा संतापाने जांभळा पडला. बीनायने मध्येच काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण त्याला तोंडातून अक्षरही काढू न देता ऍटन एकदम कडाडले, "मग सॉर ५ महाराजांचं काय म्हणणं आहे? त्यांना अजूनही असं वाटतंय का, की जगावर कोसळणाऱ्या संकटातून पसरणार्या वेडाच्या लाटेतून लोकांना वाचवण्यासाठी आम्ही जगाला सावध करतोय ते चुकीचं आहे? आम्ही कोट्यवधी लोकांच्या आत्म्यांना संकटात लोटतो आहोत? जा जाऊन सांग त्यांना. म्हणावं आम्हाला आमच्या प्रयत्नांना फारसं यश आलेलं नाहीये. "
"पण तुम्ही असा प्रयत्न करून मुळातच फार मोठं नुकसान केलंय. आणि आता ही वैज्ञानिक उपकरणं वापरून या प्रकराची माहिती गोळा करण्याचे तुमचे हे सैतानी चाळे तातडीने बंद पाडायला हवे आहेत. ताऱ्यांच्या मर्जीपुढे आपलं काही चालत नाही. आपण ताऱ्यांच्या इच्छेचा मान राखायलाच हवा. मला दुःख फक्त याच गोष्टीचं आहे, की माझ्या वेंधळेपणामुळे तुमच्या या उपकरणांचा नायनाट करायचं काम माझ्या हातून पूर्ण होऊ शकलं नाही"
ऍटन म्हणाले, " त्याचा फारसा उपयोग झाला नसता. कारण आज शेवटच्या क्षणांमध्ये जी काही निरीक्षणं आम्ही नोंदवू ती वगळल्यास आमची सगळी माहिती आमच्या छावणीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. तिला तुम्ही हात लावू शकणार नाही. " ते खिन्नपणे हसले. " तू अनधिकृतपणे इथे घुसलेला एक घुसखोर आहेस, गुन्हेगार आहेस आणि या सगळ्या वादामध्ये ही गोष्ट विसरून चालणार नाही. "
त्यांच्या मागे उभ्या असलेल्या दोघांजणांकडे वळून ते म्हणाले, "पोलिसांना बोलवा. लौकर "
" ऍटन, अहो तुम्हाला झालंय तरी काय? आपल्याकडे एवढा वेळच नाहीये. हे प्रकरण मला हाताळू द्या... " गर्दीतून पुढे येत शीरिन म्हणाला.
"शीरिन, माकडचेष्टा करायची ही वेळ नव्हे. हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हाताळू दे. शिवाय, याच्यासारखंच तुलाही इथे थांबायचं काही कारण नाहीये हे लक्षात ठेव."
शीरिनचा चेहरा वेदनेने पिळवटल्यासारखा झाला. "बीटाचं ग्रहण सुरू व्हायला काही मिनिटंच उरल्येत. आता आपण पोलिसांना कशाला बोलवत बसायचं? ते इथे कधीच पोचू शकणार नाहीयेत. शिवाय हा माणूस इतका शहाणा नक्कीच वाटतो आहे की तो इथे शांत बसेल आणि आणखी काही गडबड करणार नाही. वाटल्यास आपण तशी शपथ घ्यायला लावू या त्याला "
लाटिमर एकदम म्हणाला, "ते शपथेचं वगैरे काही मला सांगू नका. मी असलं काहीही करणार नाही. तुम्हाला काय हवं ते तुम्ही खुशाल करा. माझ्या शब्दावर विश्वास वगैरे ठेवत बसू नका, कारण माझं इथलं काम पूर्ण करण्यासाठी जी संधी मिळेल ती मी आजिबात वाया घालवणार नाही. खरं तर, तुम्ही पोलिसांना बोलवाच. "
लाटिमरकडे बघून शीरिन हसला. " तू अगदी दिल्या शब्दाला जागणारा आहेस नाही का! पण असं बघ, की तिकडच्या खिडकीत एक तरूण धट्टाकटा माणूस बसलाय. त्याची पकड पोलादी आहे आणि तो बराच चपळही आहे. शिवाय तोही तुझ्यासारखाच बाहेरचा माणूस आहे. एकदा बीटाग्रहण सुरू झालं, की तुझ्यावर नीट लक्ष ठेवण्याशिवाय त्यालाही दुसरा काही उद्योग नाहीये. आणि वयाबरोबर चपळाई जरा कमी झाली असली, तरी एखाद्या माणसाची गठडी वळणं मला मुळीच अवघड नाही. तेंव्हा आता बर्या बोलाने मी सांगतो तसं करायचं. "
लाटिमरने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. पण शीरिन पुढे म्हणाला, " बीटाग्रहणाला सुरुवात झाली, की थर्मन आणि मी तुला घेऊन पलिकडच्या खोलीत जाऊ. तिथे एकही खिडकी नाहीये आणि तिला बाहेरच्या बाजूल एक भलंथोरलं कुलूप पण आहे. हे ग्रहण संपेपर्यंत तुला तिथेच बसायचं आहे. कळलं?"
"उत्तम आहे. तारे प्रकट झाल्यावर नक्की काय होणार हे तुमच्याइतकंच मलाही माहित्ये. जेंव्हा हा सगळा गोंधळ संपेल तेंव्हा माझी सुटका करायला कोणाचंच डोकं ठिकाणावर नसेल. त्या कपाटात बसून मला गुदमरल्यामुळे मरण येईल किंवा उपासमारीने तरी मरण येईल असंच ना? तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची म्हणा... पण असं असलं तरी मी काही तुम्हाला शब्द देणार नाही कारण काही झालं तरी हा माझ्या तत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता या गोष्टीवर मला मुळीच चर्चा नकोय. "
ऍटनची चलबिचल झाली. ते म्हणाले, "शीरिन, या माणसाला कोंडून ठेवणं म्हणजे .... "
"ऍटन, असं काहीही होणार नाहीये. त्याला कोंडून ठेवायची वेळ आपल्यावर यायची नाही. लाटिमरने भलतीच हुशारी दाखवून आपल्याला गंडवायचा प्रयत्न केला आहे. पण मी काही प्रमाणपत्र विकत घेऊन सायकोलॉजिस्ट झालेलो नाही. "
त्याने ऍटनना शांत केलं आणि लाटिमरकडे वळून तो म्हणाला, " तुला खरंच असं वाटलं की तुला उपासमारीनं ठार मारण्याइतका मी जंगली माणूस आहे? मित्रा, मी जर तुला कोंडून ठेवलं, तर तुला काहीच दिसायचं नाही. ना अंधार, ना तारे. मला तुमच्या मतप्रणालीबद्दल फारशी माहिती नसली, तरी एवढं नक्कीच माहिती आहे की तारे प्रकट झाल्यावर तुला अंधारात ठेवणं म्हणजे तुझ्या चिरंतन आत्म्यावर घाव घालण्यासारखं आहे. तू तत्त्वाचा माणूस दिसतोयस, त्यामुळे इथे काही गडबड न करण्याबद्दल तू मला जर वचन दिलंस तर मी तुझ्यावर विश्वस ठेवायला तयार आहे. "
लाटिमरच्या कपाळावरची शीर तटतटली. मग चरफडत तो म्हणाला, "ठीक आहे मी वचन देतो. पण तुझ्या या धर्मविरोधी करणीमुळे तू अनंत काळ नरकात सडशील."
शीरिनला उद्देशून अशी शापवाणी उच्चारल्यावर तो तरातरा एका कोपऱ्यातल्या उंच स्टुलाकडे चालता झाला.
"थर्मन, त्याच्या शेजारी जाऊन बस. तशी काही आवश्यकता नाही म्हणा, पण आपली खबरदारी म्हणून... थर्मन? थर्मन! "
थर्मनचा चेहरा फिकुटला होता. बसल्या जागी तो खिळल्यासारखा झाला होता. "ते बघा..." त्याने खिडकीबाहेर बोट दाखवलं. त्याचे हात थरथरत होते आणि आवाजही कापरा झाला होता.
एकजात सगळ्यांनी मान वळवून खिडकीतून बाहेर पाहिलं. एक क्षणभर तिथे तणावपूर्ण शांतता पसरली. सगळेजण डोळे फाडफाडून खिडकीबाहेर पाहत होते.
अडकित्त्याने कातरलेल्या सुपारीसारखी आकाशात बीटाची एक बाजू दिसेनाशी झाली होती. बीटाची कातरली गेलेली बाजू अगदी नखभर सुद्धा नसेल , पण वेधशाळेल्या लोकांना त्यामध्ये पुढच्या सगळ्या अनर्थाची नांदी स्पष्ट दिसली.
एक क्षणभरच लोक त्या चमत्काराकडे बघत राहिले. मग अचानक तिथे एकच गडबड उडाली. आणि अर्ध्या क्षणाच्या आत जो तो पद्धतशीरपणे आपापल्या कामात गढून गेला.
एकदा युद्धाला तोंड फुटलंय म्हटल्यावर भावनेला जागा नव्हती. आणि इथे तर सगळे एका ध्येयाने झपाटलेले शास्त्रज्ञ होते. त्यामुळेच अगदी ऍटनसुद्धा आपल्या कामात गर्क झाले होते.
"ग्रहणस्पर्श पंधरा मिनिटांपूर्वीच झाला असणार. आपल्या अंदाजापेक्षा थोडा लौकरच. पण सगळ्या अनिश्चितता लक्षात घेतल्या तर आपला अंदाज खूपच बरोबर ठरला असं म्हणायला हवं..." असं म्हणत शीरिनने आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर तिथे कोणीही नव्हतं. थर्मन मात्र एकटाच खिडकीतून बाहेर बघत उभा होता. शीरिनने त्याला हळूच मागे खेचलं.
"आधीच ऍटन भडकलेले आहेत. या लाटिमर प्रकरणाने त्यांचा वेळा खाल्ला आणि त्या गोंधळात ग्रहणस्पर्श बघायचा राहिला. आता तू जर त्यांच्या मधेमधे आलास तर मागचापुढचा विचार न करता ते तुला सरळ खिडकीतून खाली फेकून देतील. "
थर्मनने मान डोलावली आणि तो खाली बसला. शीरिन म्ह्णाला,"बापरे थर्मन, तुला तर अगदी थरथरायला होतंय..."
थर्मनने आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवायचा एक क्षीण प्रयत्न केला आणि तो कसनुसं हसला, "मला बरं वाटत नाहीये..."
"तुझं डोकं अजून ठिकाणावर आहे ना?"
"नक्कीच आहे. पण... माझा अजूनही या वेडं होण्यावर विश्वास बसलेला नाहीये. मनापासून तर नाहीच नाही. तुम्हाला सगळ्यांना या अवस्थेची सवय व्हायला निदान दोन महिने तरी मिळाले होते. पण मला हे सगळं आत्ताच कळलंय. मला थोडा वेळ तरी द्या या सगळ्याची सवय करून घ्यायला"
" तुझं म्हणणं बरोबर आहे. बरं मला सांग तुझ्या घरी कोण कोण असतं? आई -वडील? बायको? मुलं? " शीरिनने विचारले,
"तुम्ही छावणीत माझी सोय करण्यासाठी विचारताय ना? पण मी एकटाच आहे. मला फक्त एक बहीण आहे. ती दोन हजार मैलांवर राहते. खरं सांगायचं तर मला तिचा पत्तासुद्धा नीटसा माहीत नाहीये."
"अच्छा! पण तुला छावणीत जायला काय हरकत आहे? तशीही तिथली एक जागा रिकामी आहे कारण मी तिथे थांबलो नाही. तुझं इथे आता काहीच काम नाही आणि तुझ्या रूपाने वसाहतीत मोलाची भरच पडेल."
"तुम्हाला काय वाटलं मला भिती वाटत्ये? मी एक पत्रकार आहे आणि इथे जे जे काय होईल त्याचा वृत्तांत मला लिहायचा आहे. तो मी लिहीनच"
"बरं! कामावर जाज्ज्वल्य निष्ठा आहे वाटतं तुझी!"
" हो तसं म्हणता येईल. म्हणा हवं तर. पण आत्ता या क्षणी मला दारूची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही मघाशी संपवलीत त्याच्या निम्मी तरी बाटली असायला हवी. अचानक तो थबकला. शीरिन त्याला कोपरखळ्या मारत होता. "नीट ऐक... तुला काही ऐकू येतंय का?"
थर्मनने मान वळवून शीरीन बघत होता तिकडे पाहिलं. आपल्या आजूबाजूला चाललेल्या गडबड गोंधळापासून पूर्णपणे अलिप्त अवस्थेत लाटिमर एकटक नजरेने खिडकीबाहेर बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसला तरी पिसाट आनंद झळकत होता. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता.
"काय म्हणतोय तो? "थर्मनने विचारलं.
"बुक ऑफ रिव्हिलेशन्स चा पाचवा अध्याय म्हणतोय तो. अगदी शांत राहा आणि ऐक. काही बोलू नकोस" शीरीन म्हणाला.
आता लाटिमरच्या आवाजाला कसलीतरी धार चढली होती. त्याचे बोलणे नीट ऐकू येईल इतपत त्याचा आवाज आता मोठ्याने येत होता. "आणि मग असं झालं, त्या वेळी बीटा एकाकीपणे आकाशावर पहारा देत असताना संक्रमण सुरू झालं. त्यातली अर्धा फेरा झाल्यावर तो एकटाच खंगलेल्या अवस्थेत लगाशवरची आपली थंड नजर तशीच लावून उभा होता. हे दृश्य बघायला गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, चौकाचौकात माणसांचा सागर उसळला होता. सगळ्यांनाच एका अनामिक नैराश्याने ग्रासलं होतं त्यांची मनं सैरभैर झाली होती. वाचा बसलेली होती. आणि ती माणसं बैचैन होऊन तारे प्रकट होण्याची वाट बघत होती. "
"आणि मग भर दुपारी, ट्रिगन शहरामध्ये जमलेल्या लोकांमधून वेंद्रे २ पुढे आला. आणि तिथे जमलेल्या लोकांना म्हणू लागला, "अरे पाप्यांनो, तुम्ही ऋताचा मार्ग सोडून भरकटलेले आहात. आणि आता अंधाराची गुहा तुमच्यासकट सगळ्या लगाशला गिळून टाकायला येत आहे. "
"तेंव्हाच अंधाराच्या कराल दाढांनी बीटाला गिळंकृत केले. आणि मग सगळे काही दिसेनासे झाले. आंधळ्या झालेल्या लोकांना हातभर अंतरावरचेही काही दिसेना. त्यांना शेजारील माणसांचे स्पर्श होत होते, श्वास जाणवत होते पण काहीही दिसत नव्हते. "
"आणि त्यानंतर दिव्य संगीताच्या झंकारात अगणित तारे प्रकट झाले. तो अनुभव इतका दिव्य होता की झाडाच्या पानांनीदेखिल आनंदाने टाळ्या वाजवल्या. "
"आणि मग ते सगळे लोक आपलं स्वत्व गमावून बसले. त्यांच्यातली हिंस्र श्वापदं जागी झाली आणि अंधाराने गडप केलेल्या लगाशच्या शहराशहरांमधून, रस्त्यांवरून ती पाशवी शरीरं फिरू लागली. "
"त्या तार्यांमधून एक स्वर्गीय ज्वाळा बाहेर पडली आणि लगाशवर कोसळली. त्या ज्वाळेने जिथे जिथे पाऊल टाकले तिथे तिथे एकच आगडोंब उसळला. अग्निनारायणाने जे समोर दिसेल ते भस्म करायला सुरुवात केली. माणसे, जंगले आणि मानवाच्या कर्तृत्वाची ग्वाही देणार्या इमारती आणि सारं स्थिरचर विश्व आगीच्या लोळांमध्ये कायमचं नष्ट झालं. "
"तरीसुद्धा... "
एकाएकी लाटिमरचा आवाज बदलला. त्याने खिडकीबाहेर लावलेली आपली एकटक नजर कणभरही हलवली नव्हती. पण आपल्यावर रोखलेल्या दोन नजरा त्याला जाणवल्या होत्या. श्वाससुद्धा न घेता त्याची बोलण्याची पद्धत एकदम बदलून गेली. बुचकळ्यात पडलेला थर्मन त्याच्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिला. आता त्याचे शब्द कळतील न कळतील असे अस्पष्ट येत होते. त्याच्या आवाजाच्या चढउतार करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी बदल झाला. आणि क्षणभरात त्याचं बोलणं कमालीचं अगम्य होऊन गेलं.
"त्याने त्यांच्या मूळ भाषेतल्या ग्रंथातल्या ओळी म्हणायला सुरुवात केलेली दिसत्ये. याच भाषेत बुक ऑफ रिव्हिलेश्न्स लिहिलेलं आहे. " शीरीन हलकेच हसला.
"अच्छा! पण हे झालं एवढं पुरे झालं. आता मला बरं वाटतंय. " थर्मनने आपले विस्कटलेले केस हातानेच सरखे केले. आता त्याचे हात आजिबात थरथरत नव्हते.
"खरं की काय! " शीरिनला आश्चर्य वाटलं.
"हो. मगाशी मी एकदम गडबडून गेलो होतो. तुमचे अंदाज, गुरुत्त्वाकर्षण आणि हे ग्रहण हे सगळं एका दमात पाहिल्यावर मला काही कळेनासंच झालं होतं. पण हे पठण ऐकून बरं वाटलं. " त्याने बोटानेच लाटिमरकडे निर्देश केला. "मी लहान असताना माझी दाई हे सगळं म्हणायची. तिचं बोलणं मी नेहमी हसण्यावारी नेलं आहे. आत्ता या सगळ्या गोष्टींना भिऊन राहण्याची मला आजिबात इच्छा नाहीये. पण ही चांगली मनस्थिती अशीच रहायला हवी असेल, तर सध्या या खिडकीकडे दुर्लक्षच केलेलं बरं नाही का? " हे शेवटचं वाक्य तो अगदी उसनं अवसान आणून म्हणाला.
"हो पण त्या आधी तुला आपला आवाज कमी करायला हवा... यंत्रात खुपसलेलं आपलं डोकं बाहेर काढून ऍटन आत्ता तुझ्याकडेच पहात होते. त्यांनी नुसत्या नजरेनेच तुला ठार केलं असतं असं मला वाटायला लागलं... "
थर्मनने जीभ चावली... " अरे! आपल्या म्हातारबुवांना मी विसरूनच गेलो होतो. " आवाज होणार नाही अशा बेताने त्याने आपली खुर्ची उचलली आणि तिचं तोंड दुसरीकडे वळवलं. खुर्चीवर बसण्यापूर्वी त्याने एकदाच मागे वळून पाहिलं आणि तो म्हणाला, "मला सारखं असं वाटतंय, की या तारका-वेडाचा काही परिणामच होणार नाही अशी काहीतरी युक्ती असणार... "
शीरीन काहीच बोलला नाही. बीटा आता आकाशमाथ्यावरून खाली सरकला होता. खिडकीतून आत येणार्या त्याच्या रक्तवर्णी प्रकाशाने खिडकीची चौकट उजळून निघाली होती. हळूहळू तिरक्या होऊ लागलेल्या किरणांचा एक कवडसा शीरिनच्या मांडीवर पडला होता. मावळतीचं सूतोवाच करणार्या त्या कवडशाकडे तो काही वेळ तसाच बघत बसला. जरा वेळाने कसल्या तरी तंद्रीतून खडबडून जागा झाल्यासारखा तो एकदम खाली वाकला आणि थेट सूर्याकडेच त्याने बघायला सुरुवात केली. बीटाच्या एका बाजूला मगाशी दिसत असलेली काळी पाकळी आता एक तृतियांश बीटाएवढी झाली होती. क्षणभर शीरिनचा थरकाप झाला आहे असंच वाटलं. पण मग तो ताठ उभा राहिला. आता त्याचा चेहरा मघापेक्षा बराच फिकुटवाणा दिसायला लागला होता. ओशाळं हसत त्याने आपलीही खुर्ची वळवून घेतली.
" गेल्या तासाभरात सारोमधल्या किमान वीस लाख लोकांना संप्रदायात सामील व्हायची उपरती झाली आहे. संप्रदायही मोठ्या संख्येने नोंदणी शुल्क आकारून लोकांना सभासदत्व बहाल करत सुटलेला आहे. संप्रदायाला सध्या 'न भूतो न भविष्यती' असे सुगीचे दिवस आलेले आहेत आणि तो आपलं उखळ पांढरं करून घेणार आहे. असो... काय म्हणत होतास तू? "
"हे संप्रदायवाले लोक एका आवर्तनातून पुढच्या आवर्तनात हे बुक ऑफ रिव्हिलेशन्स कसं काय पोचवत असतील? मुळात हा ग्रंथ लिहिलाच कसा गेला? जर सगळी माणसं वेडी होणार असतील, तर हा ग्रंथ लिहायला कुणाचं डोकं ठिकाणावर राहील? म्हणजेच या वेडातून वाचण्याचा काहीतरी उपाय असला पाहिजे. नाहीतर हे कसं काय शक्य आहे? "
शीरिनच्या आवाजात खेद जाणवायला लागला होता. "त्याचं असं आहे, की या गोष्टी प्रत्यक्ष पाहणारे कोणी साक्षीदार नाहीत त्यामुळे काय आणि कसं होतं हे नक्की कळणं कठीणच आहे. पण काही अंदाज नक्कीच बांधता येतात. त्यातल्या त्यात तीन प्रकारच्या माणसांना या तारका-वेडाचा त्रास होत नाही. एक म्हणजे या तारका आजिबात न बघणारे लोक. असे लोक, जे मतिमंद आहेत किंवा कसल्या तरी अमलाखाली असल्यामुळे जे ग्रहणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बेशुद्ध असतात . पण असे लोक अगदी थोडे असतात आणि त्यांनी काहीही प्रत्यक्ष पाहिलेलं नसल्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणता येत नाही. अशा लोकांना आपण सोडून देऊ. मग येतात ती सहा वर्षांखालील मुलं. या मुलांसाठी, जगात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे एकेक नवलच असतं. या जगाशी जुळवून घेण्याची त्यांची प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे अंधार आणि तारे अशा गोष्टी त्यांना जगातल्या इतर अनेक चमत्कारांपैकीच एक वाटतात. लक्षात येतंय का तुझ्या? "
थर्मनने मान डोलावली. "हो पटतंय तुम्ही सांगताय ते."
"तिसरा प्रकार म्हणजे काही रिकाम्या डोक्याची मंडळी. या लोकांची विचारशक्ती इतकी क्षीण असते की फार विचार करणं त्यांना जमत नाही. त्यांना जगाशी काही देणं-घेणं नसतं. अशा बधीर लोकांवर या अंधार-तारे वगैरेंचा फार परिणाम होऊ शकत नाही. अशिक्षित लोक, कष्टाची कामे करणारे लोक किंवा डोक्याने जरा मंद लोक या वर्गात येतात.
या सगळ्यांपैकी लहान मुलांना अशा गोष्टी नीटशा आठवतही नाहीत. त्यांच्या अंधुक आठवणींना या अशा बधीर लोकांच्या चमत्कारिक हकीगतींची जोड दिल्यावर त्यातून हे 'बुक ऑफ रिव्हिलेशन्स' तयार झालं असावं. लहान असताना हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघितलेली मुलं, मोठेपणी इतिहासकार वगैरे झाली असतील. त्यांच्या आठवणीं आणि या अर्धवट लोकांच्या कहाण्या हेच या ग्रंथाचं मूळ आहे. या मूळ ग्रंथाचं, नंतरच्या आवर्तनांमध्ये पुन्हापुन्हा संपादन झालेलं आहे.... "
"तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना, की जशी आपण गुरुत्वाकर्षणाबद्दलची माहिती पुढच्या आवर्तनातल्या लोकांपर्यंत पोचवणार आहोत, तसाच हा ग्रंथ या लोकांनी एका आवर्तनातून दुसर्या आवर्तनात पोचवला आहे? " थर्मन एकदम उसळून म्हणाला.
शीरिनने आपले खांदे उडवले. " त्यांनी हे नक्की कसं केलं असेल हे महत्त्वाचं नाही. इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे, की जरी हा ग्रंथ सत्यावर आधारित असला, तरी तितपतच त्याचा उपयोग आहे. हा ग्रंथ म्हणजे निर्भेळ सत्य नाही. आता हेच बघ, फारो आणि यिमोचा छपरातून तारे बघण्याचा प्रयोग फसला. का फसला माहीत्ये? "
बोलताबोलता तो ताडकन उठून उभा राहिला. ऍटन घाईघाईने त्याच्याचकडे येत होते. "काय झालंय? " त्याने विचारलं. ऍटननी त्याच्या दंडाला धरून त्याला एका बाजूला घेतलं. त्यांची बोटं त्याच्या दंडामध्ये रुतली होती.
"शू... हळू बोल. आपल्या छावणीमधून आपल्या खाजगी टेलिफोन लाईनवर फोन आला होता. " ते अगदी हळू आवाजात बोलत होते आणि बोलताना त्यांना बरेच कष्ट पडत होते.
"तिकडे काही गडबड नही ना झाली ? काही संकट वगैरे नाही ना कोसळलं? "शीरिनने गडबडीने विचारलं.
"संकट त्यांच्यावर नाही आलं" सूचकपणे ऍटन म्हणाले. " थोड्या वेळापूर्वीच ते भूमिगत झालेत आणि परवापर्यंत ते दडून राहतील. ते सगळे अगदी सुरक्षित आहेत. पण शीरीन, गावात फार गोंधळ माजलाय. कुणाचाच पायपोस कोणाच्या पायाला उरलेला नाही. ते सगळं कल्पनेच्या पलिकडलं आहे... " त्यांना पुढे बोलवेना.
शीरीन एकदम तुसडेपणाने त्यांना म्हणाला, " मग? त्यात काय विशेष? हे सगळं आणखी अवघड होत जाणार आहे. पण तुम्ही का कापताय असे? तुम्हाला बरं वाटतंय ना? " त्याला काहीतरी संशय आला असावा.
ऍटनचे डोळे संतापाने मोठे झाले. पण क्षणभराने जरा शांत होऊन ते म्हणाले, "तुला माहीत नाहीये. तिकडे संप्रदायवाल्यांनी लोकांना भडकवायला सुरुवात केली आहे.. ते लोकांना पापक्षालन, मुक्ती काय वाट्टेल ते मिळवून देण्याचं कबूल करतायत. त्याचा मोबदला म्हणून आपली वेधशाळा फोडायला सांगतायत ते लोकांना. शीरीन, आता काय करायचं? "
एक क्षण शीरीन कसल्यातरी विचारात गढल्यासारख्या त्याच्या पावलांकडे एकटक बघत होता. मग त्याने आपल्या हनुवटीवर आपलीच मूठ आपटली आणि मग तो एकदम दरडावणीच्या स्वरात म्हणाला, " काय करणार? आपल्या लोकांना यातलं काही कळलं नाहीये ना? "
"नाही. आजिबात नाही. "
"उत्तम. त्यांना काही कळूही देऊ नका. खग्रास ग्रहण लागायला अजून किती वेळ आहे? "
"एखादा तास फार फार तर... "
" आपल्याला हा जुगार खेळावा लागेल. दुसरं काही आपल्या हातात राहिलेलं नाही. एका मोठ्या जमावाचा 'मोर्चा' तयार करायला त्यांना काहीतरी वेळ लागेलच. शिवाय गावातून इथवर पोचायलाही वेळ लागणार. गावापासून इथवर चांगले पाच मैल होतात. "
त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. शेताच्या चौकोनी तुकड्यांमधून उपनगरामधली मोठीमोठी पांढरी घरं दिसत होती. दूर क्षितिजावर मावळत चाललेल्या बीटाच्या तांबड्या प्रकाशात सारो गाव एखाद्या ठिपक्यासारखं दिसत होतं. खिडकीतून बाहेर बघत बघतच तो म्हणाला, " त्यांना यायला वेळ लागेल. तुम्ही आपलं काम चालूच ठेवा. ते इथे येऊन पोचण्याआधी खग्रास ग्रहण लागू दे अशी प्रार्थना करा... "
आकाशात बीटाचा अर्धा भाग गडप झाला होता. झापड आल्यावर डोळ्याच्या पापण्या मिटत जाव्यात तशी ती काळी रेघ आता वक्र झाली होती. बीटाच्या प्रकाशमान डोळ्यावर जणूकाही एखादी तिरकी राक्षसी पापणी मिटत होती. खोलीत काळोख दाटायला लागला होता. सगळंच धूसर व्हायला लागलं होतं. खिडकीतून दिसणार्या शेतांच्या आखीव चौकोनांमध्ये दाटलेली शांतता एकदम त्याला जाणवली. जणू काही सगळं कीटकजगत घाबरून चिडीचूप शांत बसलं होतं.
अचानक त्याच्या कानात कोणीतरी बोलल्याचा आवाज आला आणि तो दचकला. थर्मन त्याला विचारत होता. " काय झालं? सगळं ठीक आहे ना? "
"अं... हो तू जागेवर जाऊन बस. आपण त्यांच्या वाटेत येतोय. "
ते दोघंही आपल्या जागेवर परत आले. परत आल्यावरही शीरिन बराच वेळ काहीच न बोलता शांत बसला होता. मग त्याने त्याच्या टायची गाठ सैल केली. आपली मान मागेपुढे हलवून पाहिली. पण त्याचा अस्वस्थपणा कमी झाला नाही. अचानक त्याने वर पाहिलं. "तुला गुदमरल्यासारखं होतंय का? "
थर्मनने आपले डोळे मिटून दोन तीन खोल श्वास घेतले. " नाही बुवा... का हो काय झालं? "
"मी जरा जास्तच वेळ खिडकीत उभा होतो. अंधाराचा परिणाम झाला असणार माझ्यावर. गुदमरल्यासारखं वाटणं, श्वासोच्छ्वास करायला त्रास होणं हे क्लॉस्ट्रोफोबियाच्या सुरुवातीच्या काही लक्षणांपैकी एक लक्षण आहे. "
"हम्म. म्हणजे माझ्यावर अजून काही परिणाम झालेला नाहीये ... अरेच्या, हे पाहा कोण आलंय ?"
खिडकीशेजारून बीनाय कोपऱ्यात बसलेल्या या दुक्कलीकडे आला . त्याच्यामुळे खिडकीतून येणारा प्रकाश एकदम अडला. शीरिनने आपले डोळे बारीक करून प्रश्नार्थक नजरेने बीनायकडे पाहिलं. "हॅलो बीनाय! "
बीनाय आपल्या देहविस्ताराचा भार एका पायावरून दुसर्या पायावर घेत उगीचच हसला. " मी जरा इथे बसलो तर चालेल ना? माझे कॅमेरे जुळवून झालेत आणि आता खग्रास ग्रहण लागेपर्यंत करण्याजोगं काहीच नाहीये माझ्याकडे. " बोलता बोलता त्याने लाटिमरकडे एक नजर टाकली. पंधरा मिनिटांपूर्वीच लाटिमरने आपल्या बाहीतून एक कातडी बांधणीचं पुस्तक बाहेर काढलं होतं. पुस्तक उघडून तो एकाग्रतेने काहीतरी वाचत होता.
" हा हरामखोर माणूस काही त्रास तर देत नाहीये ना? "
शीरिनने मान हलवली. त्याने आपले खांदे मागे ओढून घेतले होते आणि सहज श्वासोच्छ्वास करायचा तो प्रयत्न करत होता. "बीनाय, तुला श्वास घ्यायला काही त्रास होत नाहीये ना? "
बीनायनेही दोन तीन खोल श्वास घेतले. " अं असं काही वाटत तरी नाहीये... "
क्लॉस्ट्रोफोबियाचा नमुना चाखायला मिळाला मला. ओशाळवाण्या स्वरात शीरीन म्हणाला.
"असं होय! माझ्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार घडला. मला असं वाटायला लागलं की माझी दृष्टी गेली आहे की काय. सगळं इतकं अंधुक अंधुक दिसत होतं. आणि हवाही एकदम गार झाली आहे असंही वाटत होतं. "
" गार वाटतंच आहे. हा भास वगैरे नाहीये. मला तर असं वाटायला लागलंय की माझी पावलं फ्रिजमध्ये ठेवून मी लगाशप्रदक्षिणेला निघालोय, इतके माझे पाय गारठलेत.
अशा वेळी आपण आपल्या मनाला इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायला हवं. थर्मन, मी तुला मगाशी सांगत होतो ना की फारो आणि यिमोचा तो छपरातून तारे बघण्याचा प्रयोग का फसला... "
"हो तुम्ही त्याबद्दल सांगायला सुरुवात केली होतीत. " थर्मन म्हणाला. त्याने आपला एक पाय गुडघ्यात वाकवून त्याच्यामोवती आपल्या दोन्ही हातांची मिठी घातली आणि आपली हनुवटी आपल्या गुडघ्यावर टेकवली.
"हा तर मी असं म्हणत होतो की त्या दोघांनी बुक ऑफ रिव्हिलेशन्स चा शब्दशः अर्थ घेण्याची चूक केली. तारे प्रकट होणे या गोष्टीला इतकं महत्त्व द्यायची काही गरज नव्हती. मला तर असं वाटतंय, की हे तारे-बिरे काही खरे नसणार. पूर्ण काळोखात गेल्यावर माणसाचं मन प्रकाशाशिवाय राहू शकत नाही. त्यामूळेच हे ताऱ्यांचं खूळ निघालं असावं. "
"अच्छा ! थोडक्यात, तुम्हाला असं वाटतंय की हे तारे म्हणजे भ्रमिष्ट झालेल्या लोकांच्या मनाचे खेळ आहेत. याचाच अर्थ, तारे हे वेड लागण्याचं कारण नसून वेड लागल्याचे परिणाम आहेत... मग या बीनायचे फोटो काय कामाचे? "
" त्या फोटोंच्यामुळे तारे बिरे सगळं झूठ आहे हे सिद्ध तरी होईल. किंवा कदाचित याच्या उलटही घडेल. कुणी सांगावं... आता हेच बघ.. "
बीनायने आपली खुर्ची पुढे ओढून घेतली आणि चर्चेत उडी घेतली. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि उत्साह दिसत होता. "बरं झालं तुम्ही दोघं याच विषयावर बोलताहात ते. या तार्यांबद्दल ऐकल्यावर माझ्या डोक्यात एक मस्त कल्पना आली आहे. अर्थात ही नुसतीच कल्पना आहे. तिच्यातून जास्त अर्थपूर्ण असं काही निघणार नाही. तुम्हाला सांगू माझी कल्पना? "
हे बोलताना तो थोडासा अडखळल्यासारखा झाला. मग शरिन आपल्या खुर्चीत मागे नीट टेकून बसला आणि म्हणाला, "सांग मला आवडेल ऐकायला. "
"समजा या विश्वामध्ये आणखीही सूर्य असतील, " बोलता बोलता आपल्याच बोलण्याची लाज वाटून तो जरा थांबला. मग म्हणाला, "म्हणजे... म्हणजे असे सूर्य जे इथून इतके लांब आहेत की दिसू शकत नाहीत... जाऊ दे, माझं हे बोलणं ऐकणार्याला असं वाटेल की मी खूप कादंबर्या वाचतो की काय... "
"नाही. हे सूर्य जर आपल्यापासून चार प्रकाशवर्षांपे़क्षा जास्त लांब असतील तर त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा आपल्यावर फारसा प्रभाव पडणार नाही आणि आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून त्यांना शोधूही शकणार नाही कारण ते खूप लहान असतील. त्यांची संख्या एक दोन डझन असेल कदाचित. "
थर्मनने एकदम शीळ घातली. " काय भन्नाट कल्पना आहे! एखाद्या रविवारच्या साप्ताहिक पुरवणीसाठी हिच्यावर मस्त लेख होऊ शकतो. आपल्यापासून आठ प्रकाशवर्षे अंतरावर असलेले दोन डझन सूर्य! लोक अगदी वेडे होतील वाचून."
बीनाय म्हणाला, "ही फक्त एक कल्पना आहे. मला वाटतं जेंव्हा बीटाला ग्रहण लागेल तेंव्हा हे तारे दिसतील. कारण त्यांच्या प्रकाशाला गिळून टाकणारा सूर्यप्रकाश नसेल ना आजूबाजूला. आणि ते इतके लांब असल्यामुळे ते अगदी लहानसे दिसतील. छोट्या छोट्या संगमरवरी ठिपक्यांसारखे. हे संप्रदायवाले लोक म्हणतात की तेंव्हा कोट्यवधी तारे दिसतात, पण ही अतिशयोक्ती असावी. या विश्वात असे कोट्यवधी तारे मावतील अशी जागा कुठेच नाही. "
शीरिन आता त्याचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. "तुझ्या बोलण्यात दम आहे. आणि या ठिकाणी अतिशयोक्ती केली जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण आपल्या मनाला पाचाच्या पुढच्या संख्या नेमक्या कळत नाहीत पटकन. त्यामुळे पाचापेक्षा जास्त असलेल्या सगळ्या गोष्टी 'खूप' असतात. आणि भ्रमिष्ट लोकांच्या कथनात या दोन डझन तार्यांचे कोट्यवधी तारे झाले असणार. फारच सुरेख कल्पना आहे ही. "
माझ्या डोक्यात अजून एक मस्त कल्पना आहे. समजा असा एखादा ग्रह आहे, ज्याला एकच सूर्य आहे. जर असं झालं तर गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतासाठी लागणारी सगळी आकडेमोड किती सोपी होऊन जाईल पाहा. शिवाय हा ग्रह त्या एकाच सूर्याभोवती व्यवस्थित लंबवर्तुळाकार कक्षेत फिरेल. अशा जगामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सिद्ध करत बसावं लागणार नाही. उलट हा सिद्धांत हा एक पायाभूत आणि स्वयंभू नियम म्हणून आपोआप स्वीकारला जाईल. अशा जगातल्या लोकांना दुर्बिणीच्या शोधाच्याही आधी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत माहीत असेल. "
"पण असं जग असणं प्रत्यक्षात शक्य आहे का? "शीरिनला अजूनही शंका होती.
"का नाही? असं जग असणं सहज शक्य आहे. आणि ही गोष्ट गणिताने सिद्ध देखील झाली आहे. अशा जगाला 'एकास एक जग' असं म्हणतात. पण मला त्या जगामागची वैचारिक प्रक्रिया जास्त आवडते. "
" हम्म... भारी कल्पना आहे. पण ही फक्त वैचारिकरित्याच शक्य असेल असं वाटतंय. ऍबसोल्यूट झीरो किंवा परफेक्ट गॅससारखी.... "
"बरोबर आहे. पण यातली खरी गोम कशात आहे माहितेय का? अशा ग्रहावर जीवसृष्टी असणं शक्य नाही. तिथे पुरेशी उष्णता नसेल पुरेसा उजेड नसेल, आणि तो ग्रह सूर्याभोवती फिरत असेल तर दिवसाचा अर्धा भाग तिथे संपूर्ण अंधार असेल. सजीवांना जगायला प्रकाशाची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे अशा एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असणं अशक्यच आहे. शिवाय... "
शीरिने अचानक उभा राहिला. त्याची खुर्ची मागच्या मागे कोलमडली. "ऍटननी दिवे आणलेत बाहेर. "
बीनाय बसल्या जागीच अर्धवट मागे वळला. उजेड मिळणार या कल्पनेनेच त्याला हायसं वाटलेलं दिसलं.
आपल्या दोन्ही हातांमध्ये मिळून सहा सळ्या घेऊन ऍटन येत होते. प्रत्येक सळई साधारण बोटभर जाडीची आणि फूटभर उंचीची होती. खिडकीजवळ बसलेल्या या तिघांच्या खांद्यावरून पलिकडे आपल्या सहकार्यांकडे बघत ऍटन म्हणाले, " चला सगळे आपापल्या कामाला लागा. शीरिन, इकडे ये आणि मला मदत कर."
शीरीन धावतच त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या हातातल्या सळया घेऊन त्याने भराभरा भिंतीवर बसवलेल्या शमादानांमध्ये एकेक सळई खोचून टाकली. मग, जणू काही देवाच्या पूजेतलं एखादं विशेष कार्य करावं, तशाच श्रद्धेने त्याने एका काडेपेटीतून एक काडी बाहेर काढली. थरथरत्या हाताने ती पेटवली आणि ऍटनकडे दिली. ती काडी एका सळईच्या टोकाशी असलेल्या वातीजवळ नेऊन ती वात पेटवण्याचे प्रयत्न ऍटननी सुरू केले. थोड्याच वेळात ती वात फर्रकन पेटली आणि ऍटनचा चेहरा उजळून निघाला. आजूबाजूच्या लोकांनीउत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. ही ज्योत जवळजवळ सहा इंच उंच होती. थोड्याच वेळात अशा सहा वातींच्या प्रकाशात ती खोली उजळून निघाली. पण हा प्रकाश फिका होता. झपाट्याने नाहीशा होणार्या सूर्यप्रकाशापेक्षाही फिका होता. दिव्यांच्या ज्योती कसलेकसले आवाज करत होत्या. भिंतींवर चित्रविचित्र आकारांच्या सावल्या नाचत होत्या. ज्योतींमधूनही काजळी बाहेर पडत होती. त्या खोलीतलं वातावरण एखाद्या भटारखान्यासारखं झालं होतं. पण असं असलं तरी त्या ज्योती पिवळा प्रकाश देत जळत होत्या. चार साडेचार तास कमी कमी होत जाणार्या बीटाच्या प्रकाशापेक्षा या पिवळ्या प्रकाशात काहीतरी वेगळेपण नक्कीच होतं. त्यामुळे अगदी लाटिमरनेसुद्धा आपलं पुस्तकात खुपसलेलं डोकं बाहेर काढून कौतुकाने त्या दिव्यांकडे पाहिलं.
त्या ज्योतीतून बाहेर पडणार्या काजळीची पर्वा न करता शीरिनने आपले हात एका दिव्याजवळ धरून शेकले आणि तो स्वतःशीच पुटपुटला, " पिवळा रंग इतका सुंदर दिसतो हे माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं... "
थर्मनने मात्र त्या दिव्यांच्या वासामुळे तोंड वाकडं केलं होतं. " कसले आहेत ते दिवे? "
"लाकूड आहे ते... "
"शक्यच नाही. त्यांच्या टोकाकडे तर नुसतीच काजळी आहे आणि तिथे खरं तर काहीच जळत नाहीये. शिवाय ती ज्योत नुसतीच अधांतरी जळल्यासारखी दिसतेय. "
"तीच तर मजा आहे. कृत्रिमरित्या उजेड पडण्यासाठी आम्ही शोधलेलं हे एक अफलातून उपकरण आहे. पाणवनस्पतींची खोडं उन्हात खडखडीत वाळवून घ्यायची आणि मग प्राण्यांच्या चरबीत बुडवून काढायची. असा दिवा पेटवला की त्यातली चरबी जळते. अगदी हळूहळू. हा दिवा साधारण अर्धा तास जाईल. आपल्या सारो विद्यापिठातल्या एका मुलाने हा शोध लावला. आम्ही असे खूप दिवे तयार केलेत पण त्यातले जवळजवळ सगळे छावणीत पाठवून दिलेत. आणि हे थोडेसे दिवे इथे ठेवले आहेत. "
आता त्या खोलीत शांतता पसरली . लाटिमरने आपली खुर्ची उचलून एका दिव्याखाली नेऊन ठेवली आणि दिव्याच्या प्रकाशात तो बुक ऑफ रिव्हिलेशन मधले उतारे म्हणायला लागला. म्हणताना फक्त त्याचे ओठ तेवढे हलत होते. बीनायही आपल्या कॅमेर्यात डोळे घालून उभा होता. ही संधी साधून थर्मन आपल्या उद्याच्या वृत्तपत्रातल्या लेखाची टिपणे काढायला लागला. गेले दोन तास तो हा उद्योग करत बसला होता. अगदी पद्धतशीरपणे. आणि या गोष्टीचा फोलपणा त्याला जाणवत होता. पण मगाशी शीरिन म्हणाला होता तसं, लिखाण करण्यात दंग झालेलं त्याचं मन इकडेतिकडे भरकटत नव्हतं. आता आकाशात एक सैतानी तांबडी जांभळी आभा पसरली होती. जणू काही एखादं बीट चिरून कोणीतरी आकाश रंगवून काढलं होतं. आता हवाही एकदम घट्ट झाल्यासारखी वाटत होती. खिडकीतून मावळतीची उदास छाया आत आली. खोलीतल्या दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशाने त्या छायेवर आपल्या उजेडाच्या नख्या रुतवल्या आणि ओरखडे काढले. बाहेरचा करडेपणा आता हळूहळू काळेपणाकडे झुकू लागला. खोलीत दिव्यांभोवती दबक्या पावलांनी लोक आपलं काम करत होते. मध्येच कोणीतरी एकदम दचकायचं. जोराने श्वास आत ओढून घ्यायचं. जो तो शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. त्यांचं जग अंधाराच्या कुशीत चाललं होतं.
थर्मनला अचानक कसला तरी कोलाहल जाणवला. खोलीतल्या शांततेमुळेतो खूप लांबून येत असावा असं वाटत होतं. तो एकदम ताठ बसला. टिपणं काढायची आपली लहानशी वही बंद करून त्याने आपला श्वास रोखून धरला आणि कान देऊन ऐकायचा प्रयत्न केला. मग काळजीपूर्वक पावले टाकत, सोलरस्कोप आणि बीनायचा कॅमेरा यांच्यामधून वाट काढत तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला, "शीरिन!!! "
तिथल्या शांततेत हा आवाज घुमला. दोन ढांगांमध्ये शीरिन त्याच्या शेजारी येऊन पोचला. एकाएकी काम थांबलं. ऍटन खिडकीपाशी येऊन उभे राहिले. प्रचंड मोठ्या अशा सोलरस्कोपमध्ये डोळे घालून बसलेल्या यिमोनेही एकदम खाली काय चाललंय हे बघायला मान वळवली.
बाहेर बीटा एखाद्या चिमुकल्या खड्यासारखा दिसत होता. लगाशकडे एक शेवटची नजर टाकत असल्यासारखा, पूर्वक्षितिजावर लालबुंद निखार्यांसारखी नुसतीच लाल आभा दिसत होती. सारो शहर आणि वेधशाळा यांना जोडणारा रस्ता लालेलाल रिबिनीसारखा दिसत होता. पूर्वेला एरवी दिसणारी जंगलं अंधारात गूढ वाटत होती.
पण त्या रस्त्यावर इतरही काही होतं. सारो शहराकडून वेधशाळेच्या दिशेनेच येत असलेला एक मोठा जमाव त्या रस्त्यावर अंधुक दिसत होता.
ऍटन म्हणाले, " भ्रमिष्ट झालेली शहरातली माणसं इकडेच येताहेत... "
"खग्रास ग्रहणाला किती वेळ उरलाय? " शीरिनने विचारलं.
"अजून पंधरा मिनिटं... पण ते लोक इथे पाच मिनिटात पोचतील. "
"ठीक आहे. तुमचं काम असंच चालू राहू द्या. आम्ही त्यांना थोपवतो. ही इमारत एखाद्या किल्ल्यासारखी बांधलेली आहे. ऍटन, या लाटिमरवर जरा लक्ष ठेवा . मी आलोच. चल रे थर्मन!"
शीरीन दारातून बाहेर पडला. थर्मनने पळत जाऊन त्याला गाठलं. समोरच खाली जायचा गोल जिना होता. मधल्या खांबाभोवती गोल पायर्या खाली खाली जात अंधारात नाहीश्या झालेल्या होत्या. त्यांचा सुरुवातीचा झपाटा चांगलाच होता. त्यामुळे काही क्षणांमध्येच ते पन्नास एक फूट खाली जाऊन पोचले. आता वरच्या घुमटातून येणारा उजेड लांब राहिला होता. त्यांच्या डोक्यावर आणि पायाखाली अंधार दाटलेला होता. उतरता उतरता शीरीन एकाएकी थांबला. आपल्या लठ्ठ गुबगुबीत पंजा आपल्या छातीवर दाबून धरत तो म्हणाला, "मला श्वास घेता येत नाहीये. तू एकटाच जा आणि खाली जाऊन सगळी दारं लावून टाक.... " शीरिनचे डोळे एखाद्या बेडकासारखे बाहेर आले होते. आवाज नीट फुटत नव्हता.
थर्मन काही पायर्या खाली उतरला आणि मागे वळून म्हणाला, "जरा थांबा. अजून थोडा वेळ दम नाही का धरवणार तुम्हाला? "
त्याला स्वतःला धाप लागली होती. श्वासोच्छ्वास जोराने चालला होता. आणि अंधारात एकट्याने खाली जायच्या कल्पनेनेच तो सटपटला होता. थर्मनला अंधाराची भीती वाटत होती!
" तुम्ही इथेच थांबा. मी एक सेकंदात येतो. आलोच... " असं म्हणत तो वर पळाला. एका दमात दोन दोन तीन तीन पायर्या चढत तो धापा टाकत वरच्या घुमटात पोचला. त्याला दम लागला असला तरी हा दम काही पळत आल्यामुळे लागला नव्हता. वर येऊन एका शमादानातला दिवा त्याने खेचून बाहेर काढला. त्या दिव्यातून उग्र दर्प येत होता आणि त्याच्या काजळीमुळे थर्मनला काहीच दिसेनासं झालं होतं. पण तो दिवा म्हणजे जणू काही एखादा विश्वमोलाचा आनंदाचा ठेवाच आहे असंच त्याला वाटलं. तो दिवा घेऊन जिना उतरताना त्याची ज्योत मागे मागे उफाळत होती.
थर्मनने खाली वाकून शीरिनला जोरजोरात हलवलं. शीरीन जोरात कण्हला. थर्मन म्हणाला, " जागे व्हा आणि स्वतःला सांभाळा. हा बघा आपल्याकडे एक दिवा आहे. " अंधारात शीरिनची पावलं अडखळत होती. शर्मनने एका हातात दिवा उंच धरला आणि दुसर्या हाताने शीरिनच्या दंडाला धरून, त्याला आधार देत देत तो एकेक पायरी उतरायला लागला. आता अगदी बुडायला आलेल्या बीटाचा उरलासुरला प्रकाश तळमजल्यावरच्या खोल्यांमध्ये भरून राहिला होता. त्या प्रकाशाकडे पाहून थर्मनला जरा बळ आल्यासारखं वाटलं.
"त्यांचा आवाज येतोय बघा... पकडा हा दिवा!" तो एकदम खेकसला.
शब्द कळत नसले तरी बाहेरून काहीतरी बोलल्याचे आवाज येत होते. शीरीन म्हणाला ते अगदी खरं होतं. शंभर एक वर्षांपूर्वी बांधलेली वेधशाळेची इमारत चांगली दणकट होती. जणू काही एखादा अभेद्य किल्लाच. तिच्यावर नव्या गाव्होटियन शैलीचा प्रभाव असल्यामुळे इमारतीच्या सौंदर्यापेक्षा टिकाऊपणा, उपयुक्तता यांना जास्त महत्त्व दिलं होतं. वेधशाळेच्या सगळ्या खिडक्यांना बाहेरून एकेक इंच जाडीचे पोलादी गज बसवलेले होते आणि या गजांची टोकं भिंतींच्या बांधकामात पक्की बसवून टाकलेली होती. इमारतीच्या भिंती दगडातून बांधून काढलेल्या होत्या आणि इतक्या भक्कम होत्या की भूकंप झाला असता तर त्यांना एक साधी चीरसुद्धा पडली नसती. वेधशाळेत यायचा मुख्य दरवाजा ओक लाकडाचा बनवलेला होता. आणि त्याला बाहेरून पोलादाचं आवरण चढवलेलं होतं. थर्मनने ते दार लावून घेतलं आणि कड्या लावून टाकल्या. त्या कड्यांचा बद्दबद्द आवाज सगळीकडे घुमला.
बोळकांडीच्या दुसर्या टोकाला पोचलेल्या शीरिनने एक जोरदार शिवी हासडली. तिथे एक लहान दरवाजा होता त्याचं अंगचं कुलूप कोणीतरी छिन्नी हातोडीने फोडलं होतं.
"लाटिमर इथून आत घुसला असणार... "
" बापरे, अहो नुसते उभे काय राहिलाहात? आपल्याला टेबलं खुर्च्या रचून ते दार बंद करायला हवं. आणि तो दिवा जरा माझ्यापासून लांबच ठेवा प्लीज. त्याच्या काजळीने मला गुदमरायला होतंय... "
बोलता बोलता त्याने एक मोठं टेबल ओढत ओढत त्या दारापाशी नेलं आणि त्या दारामागे उभं केलं. मग आणखी तीन चार खुर्च्या आणून त्याने त्या दारामागे पक्क्या रचल्या आणि ती वाटच बंद करून टाकली. ते लाकडी सामान चांगलं जड आणि दणकट होतं. तयार झालेली बॅरिकेड दिसायला फारशी पद्धतशीर नसली, तरी अभेद्य होती हे नक्की. एव्हाना त्यांना बाहेरच्या बाजूने हाताने दार वाजवल्याचे आवाज ऐकू यायला लागलेले होते. कोणीतरी जोरजोरात ओरडत होतं. ते सगळंच एखाद्या अर्धवट जागृतावस्थेतल्या स्वप्नासारखं वाटत होतं.
बाहेरचा जमाव सारो शहरातून पायी चालत इथवर आला होता. त्यांच्या मनात फक्त दोनच गोष्टींनी घर केलं होतं. एक म्हणजे संप्रदायाकडून शुद्धिपत्र मिळवण्यासाठी वेधशाळा नष्ट केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठार वेडं करून सोडेल अशी पाशवी दहशत. सारो शहरातून वेधशाळेत येण्यासाठी वाहनं वापरावीत, एक नेतृत्व उभं करावं, सुसंघटित आणि योजनाबद्ध प्रयत्न करावेत, हत्यारं घेऊन यावं अशा गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. वेधशाळेच्या दाराबाहेर निःशस्त्र उभे राहून नुसत्या हातांनीच ते वेधशाळेची दारं फक्त ठोठावीत होते.
ते लोक वेधशाळेपाशी येऊन पोचले तेंव्हाच बीटाचा शेवटचा तांबडा लाल किरण जमिनीवर उतरला. आणि मग सगळ्या मानवतेवरचाच सूर्य मावळला आणि मागे उरली फक्त भीती.
"चल लौकर... आपण वर जाऊ या. " शीरीन म्हणाला.
वरती, घुमटामध्ये एकटा यिमो आपल्या सोलरस्कोपपाशी होता. बाकीची सगळी मंडळी बीनायच्या कॅमेऱ्याजवळ दाटीवाटीने उभी होती. बीनाय त्यांना भराभर सूचना देत होता. त्याच्या खोल गेलेल्या आवाजातून त्याच्यावरचा ताण जाणवत होता.
" मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या सगळेजण. बीटाच्या खग्रास अवस्थेच्या काही क्षण आधीचे फोटो मला घ्यायचेत आणि फोटोग्राफिक प्लेटसही बदलायच्या आहेत. एकेक जण एकेका कॅमेर्यापाशी उभे राहा. तारे प्रकट होतील तेंव्हा काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. हो ना? "
आजूबाजूच्या लोकांनी माना डोलवल्या. आपल्या डोळ्यांवर आपला हात आडवा धरून बीनायने आडोसा केला आणि इकडेतिकडे पाहिलं.
" दिवे अजून जळतायत ना? असू दे. दिसले मला दिवे. तर मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा. जास्त चांगले फोटो मिळवण्याच्या फंदात पडू नका. तसं करताना तुम्ही मोलाचा वेळ वाया घालवाल. एका वेळी दोन दोन तारे फोटोत येण्यासाठी धडपडू नका. मिळतील तसे आणि मिळतील ते फोटो काढत राहा. आणि एखाद्या क्षणी तुम्हाला जर असं वाटलं की आता आपला अवतार संपला, तर लगेच कॅमेर्यापासून लांब पळा.... "
शीरिन आणि थर्मन अजून दाराजवळच उभे होते. शीरिन म्हणाला, " मला ऍटन कुठे दिसत नाहीयेत. मला त्यांच्याकडे घेऊन चल... "
मिट्ट काळोखात जळणारे दिवे नुसत्याच प्रकाशाच्या ठिपक्यांसारखे दिसत होते. त्यांच्या फरफरत्या प्रकाशात सगळ्या खगोलशास्त्रज्ञांच्या आकृत्या विचित्र दिसत होत्या. थर्मन थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग एकदम तो म्हणाला, " किती अंधार आहे... "
शीरिनने आपले दोन्ही हात समोर ताठ धरले आणि अंधारातच चाचपडत, ठेचकाळत तो ऍटनना शोधू लागला. "ऍटन... ऍटन! "
थर्मनने त्याचा हात धरला. "थांबा मी नेतो तुम्हाला त्यांच्याकडे... "
अंधारातून कशीबशी वाट शोधताना अंधाराला आपल्यापर्यंत येऊ न देण्यासाठी त्याने डोळे मिटून घेतले आणि विचारही शक्य तितके बंद केले. त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. अंधारात चालता चालता शीरिन भिंतीवर जाऊन आदळला. "ऍटन! " कळवळून त्याने हाक मारली.
कोणीतरी थरथरत्या हातांनी त्याचा हात धरला. मग सोडून दिला. "कोण? शीरिन? तू आहेस का? "
"ऍटन! "आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी शीरीन धडपडत होता. " त्या मोर्चाची व्यवस्था लावून आलो. आता तुम्ही आजिबात काळजी करू नका. कोणीही आत शिरू शकणार नाही. "
लाटिमर आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरील संभ्रमाची जागा आता निग्रहाने घेतली होती. त्याने शांत बसायचं कबूल केलं होतं. दिलेला शब्द मोडला असता तर त्याला नरकात जावं लागलं असतं. पण त्याच्याकडून जबरदस्तीने वचन घेतलं गेलेलं होतं. त्याने आपणहून थोडंच दिलं होतं! आता तारे प्रकट होणार होते. तो शांतपणे बसून राहून जे चाललय ते बघू शकत नव्हता - पण त्याने शब्द दिला होता...
बीटाच्या अगदी अखेरच्या काही किरणांच्या प्रकाशात वर बघत असलेल्या बीनायचा चेहरा अंधुक दिसला आणि मग तो चेहरा खाली वाकून कॅमेर्याच्या आड लुप्त झाला. त्या क्षणीच लाटिमरचा निर्णय झाला. त्याला इतका ताण आला होता, की त्याची नखं त्याच्या तळहातामध्ये रुतत होती. घाईघाईने पुढे जायच्या प्रयत्नात तो वेड्यागत भेलकांडला. त्याच्या समोर, आजूबाजूला अगदी पायाखालीही फक्त एक काळी पोकळी दिसत होती. तेवढ्यात कोणीतरी त्याला धरलं. कोणाचीतरी बोटं त्याच्या गळ्याभोवती फासासारखी चिकटली.
त्याने आपला गुडघा वाकवला आणि तो त्या हल्लेखोराच्या पोटात मारला. "सोड मला. सोड मला.. नाहीतर मी तुझा जीव घेईन"
त्या प्रहाराने कळवळून थर्मनने एक किंकाळी फोडली आणि तो म्हणाला, " अरे हरामखोरा! दिलेला शब्द फिरवतोस? "
काही क्षण थर्मनला सगळं अगदी लख्ख जाणवत होतं. कुठूनतरी बीनायचा आवाज ऐकू आला. "मला चांगली फ्रेम मिळते आहे. सगळे आपापल्या कॅमेर्याजवळ जा. कामाला लागा. लवकर... "
कुणीतरी दिवा मालवल्यासारखा पूर्ण अंधार होताना सूर्याचा शेवटचा किरण लुप्त झालेला त्याला अगदी स्पष्ट जाणवला.
आणि त्याच वेळी बीनाय ओरडला.. "हाऽऽऽ". शीरिनने किंकाळी फोडली. कोणीतरी वेड्यासारखं हसायला लागलं आणि मग ते हसणं बंद झालं. अचानक तिथे अगदी स्मशानशांतता पसरली. थर्मनने आपल्या हातांनी घट्ट धरलेला लाटिमरचा देह लुळा पडला. थर्मनने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या काळ्या डोळ्यांमधली दृष्टी हरवली होती. त्या डोळ्यांमध्ये जळणार्या दळिद्री दिव्यांचं प्रतिबिंब पडलं होतं. त्याच्या तोंडाला फेस आला होता. "
भयचकित होऊन एका जागी खिळल्यासारखा होत अगदी सावकाश एका हाताचा आधार घेऊन तो बसता झाला आणि त्याने खिडकीकडे पाहिलं खिडकीमध्ये रक्त गोठवणारा अंधार भरलेला होता आणि त्यातून तारे दिसत होते.
पृथ्वीवरून दिसतात तसे मंद मंद छत्तीसशे तारे नव्हेत तर तीस हजार तेजस्वी सूर्य लगाशच्या आकाशात नाचत होते.. लगाश हा एका तेजस्वी तारकागुच्छाच्या केंद्रापाशी होता. खिडकीतून दिसणारी ती तेजाची पखरण बघताना बोचर्या वार्यामुळे वाजणारी थंडी आणखीनच वाढली होती आणि त्या तार्यांचं दर्शन प्राणांवर डाग द्यावेत तसं भाजत होतं.
धडपडत थर्मन उभा राहिला. त्याचा श्वास अडकला होता. अनामिक भयाने त्याचं सगळं शरीर आवळलं जात होतं. त्याला वेड लागत होतं आणि त्याला ते कळत होतं. त्याच्या मनात खोल कुठेतरी शहाणपणाचा एकच अंकुर या काळ्या भ्रमाला दूर सारायचा प्रयत्न करत होता. आपण भ्रमिष्ट होत आहोत ही जाणीवच फार भयंकर होती. अजून थोड्या वेळाने आपण शरीराने इथेच असू पण आपल्यातला मानव्याचा सगळा अंश कायमचा ठार झालेला असेल... अंधारात बुडून गेलेला असेल.. हाच तो काळोख... हाच तो सगळ्याचा अंत. हीच जगबुडी....
जमिनीवर रांगत जाणाऱ्या कोणालातरी त्याने हातानेच अडवलं. पण तो माणूस त्याच्या अंगावर धडकला. आपला दुखणारा गळा दोन्ही हातांत धरून थर्मन लंगडत लंगडत दिव्यापाशी गेला. "उजेड! प्रकाश!! "तो ओरडला.
दूर कुठेतरी ऍटन कण्हत होते. एखाद्या घाबर्या झालेल्या मुलासारखे गळा काढून रडत होते. "केवढे हे तारे! आणि आम्हाला कधी कळलंसुद्धा नाही.. आम्हाला वाटलं, एका विश्वात सहा तारे असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या तार्यांबद्दल काहीच माहिती नसणं हाच तर खरा अंधार आहे. कायमचा अंधार आहे. आणि आम्हाला हे कधीच कळलं नाही.... आजिबात कळलं नाही.... "
घुमटामध्ये शिल्लक राहिलेल्या एका दिव्याला कोणीतरी धक्का लावला आणि तो दिवा खाली पडून विझला. आता ते बाहेरचे झळाळणारे तारे त्यांना वेढूनच बसले. खिडकीबाहेर सारो गावाकडे एक लाल प्रकाश दिसत होता. पण हा प्रकाश सूर्याचा मात्र नव्हता. काहीतरी धडाडून पेटलं होतं. त्याच्या ज्वाळा उंच उंच उफाळत होत्या.
पुन्हा एकदा एक भलीथोरली रात्र वस्तीला आली होती.
1 Comments:
सुन्दर कथा ... नावे भारतिय असति तर लक्षात ठेवायला सोपि गेलि असति... असो... शुभेच्छा !!
Post a Comment
<< Home