प्रायॉरी स्कूल (१)
शेरलॉक होम्सकडे अनेक अडचणीत सापडलेले लोक धाव घेत असत. त्यामुळे नाट्यमयतेचं आम्हाला वावडं नव्हतं.आमच्या बेकर स्ट्रीटवरच्या घराच्या बैठकीच्या खोलीत बसून आम्ही अनेक नाट्यमय प्रसंग पाहिले. पण मि. थॉर्नीक्राफ्ट हक्स्टेबल आमच्याकडे आले तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी आत येण्याआधी त्यांचं कार्ड आम्हाला पाठवलं होतं. एम्. ए. , पी. एच.ड़ी. वगैरी मोठ्या वजनदार पदव्यांनी त्यावर अशी काही दाटी केली होती की त्या इवल्याश्या कागदाला त्या पदव्यांचं वजन पेलणार नाही असंच मला क्षणभर वाटून गेलं. तेवढ्यात ते स्वतःच आत आले. भक्कम शरीरयष्टी, भरदार उंची आणि स्वाभिमानाने ओतप्रोत भरलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहताच त्यांची विद्वत्ता किती सार्थ आहे हे जाणवत होतं. पण त्यांचं वागणं मात्र या सगळ्याला विसंगतच झालं. आत आल्या आल्या त्यांचे पाय लटपटले आणि तोल जाऊन ते आमच्या अस्वलाच्या कातड्याच्या गालिच्यावर बेशुद्ध होऊन कोसळले.
आम्ही त्यांच्याकडे धावलो. त्यांना कसलातरी धक्का बसला असावा. होम्सने घाईघाईने एक उशी त्यांच्या डोक्याखाली सरकवली . तोवर मी आतून ब्रँडीची बाटली घेऊन आलो. चिंतेने त्यांचा सगळा चेहरा आक्रसला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. तोंड ओघळलं होतं. दाढीचे खुंट वाढलेले होते. केस विस्कटलेले होते. शर्टाच्या आणि कॉलरच्या अवस्थेवरून ते बरेच लांबून आले होते.
"वॉटसन, काय झालंय त्यांना?" होम्सने मला विचारले.
मी त्यांची नाडी पाहिली. ती मंद लागत होती.
"भूक आणि थकव्यामुळे त्यांना गुंगी आली आहे बहुधा"
"उत्तर इंग्लंडमधल्या मॅकलटनचं परतीचं तिकिट आहे हे. अजून बारा वाजायचेत. ते भल्या पहाटेच निघाले असावेत." त्यांच्या घड्याळाच्या खिशातले तिकीट तपासत तो म्हणाला.
त्यांच्या किंचित सुजलेल्या पापण्या थरथरल्या आणि त्यांनी डोळे उघडले. एक क्षणभर शून्यात बघावं तसे ती आमच्याकडे बघत राहिले आणि पुढच्याच क्षणी ते घाईघाईने उठून उभे राहिले. त्यांचा चेहरा शरमेने लाल झाला होता.
" मि. होम्स, मी अशक्तपणाने असा एकदम कोसळलो त्याबद्दल क्षमा करा. तुम्हाला माझ्याबरोबर घेऊनच जायचं अशा निर्धाराने मी इथे आलो आहे. जरा मला एक ग्लासभर दूध आणि एखादं बिस्किट दिलंत तर माझ्या जिवात जीव येईल आणि आपण लगेच निघू शकू. आपलं लगेच तिथे पोहोचणं इतकं गरजेचं आहे की नुसती तार पाठवून ते सांगता आलं नसतं. म्हणून मी स्वतःच आलो."
"तुम्हाला जरा बरं वाटलं की.."
"मी आता बरा आहे. मला कळत नाही की मला असं अचानक झालं काय ...
पण ते सोडा. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आत्ता लगेचच्या गाडीने तुम्ही माझ्याबरोबर मॅकलटनला यावं."
होम्सने मान हलवली.
"सध्या मला अजिबात वेळ नाही. वॉटसनला विचारा हवं तर. एका गुंतागुंतीच्या केसचा निकाल लावायचा आहे. एका केसची कोर्टात तारीख आहे.
तितकंच निकडीचं काम असेल तरच मी इथून बाहेर जायचा विचार करू शकतो. एरवी ते जमणार नाही."
"निकडीचं काम? ड्यूक ऑफ होल्डरनेस यांच्या एकुलत्या एक मुलाला पळवलं गेलंय त्याबद्दल तुमच्या कानावर काहीच आलं नाहीये का?" आपले दोन्ही हात हवेत फेकत ते म्हणाले.
"कोण? आपले माजी कॅबिनेट मंत्री?"
"हो तेच. आम्ही ही बातमी बाहेर फुटू नये म्हणून खूप प्रयत्न केले पण या प्रकाराबद्दलच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. काल रात्रीच्या ग्लोबच्या अंकात तर बातमीही छापून आली आहे. मला वाटलं तुम्ही ती वाचली असेल..."
होम्सने हात लांब करत आपल्या एनसाक्लोपीडियाचा एच लिहिलेला खंड काढला.
"होल्डरनेस, सहावे ड्यूक, के.टी.पी.ई. ... बापरे ही तर आगगाडीच आहे.बेव्हर्लीचे बॅरन, कार्स्टनचे अर्ल... ही यादी तर न संपणारी आहे. १९०० सालापासून हॉलमशायरचे लॉर्ड ल्युटेनंट, १८८८ मध्ये सर चार्ल्स ऍपलडोर यांच्या कन्या एडिथ यांच्याशी विवाह झाला. एकुलता एक मुलगा आणि त्यांचा वारस लॉर्ड सॉल्टिअर, अंदाजे मालमत्ता अडीच हजार एकर जमीन, लँकेशायर आणि वेल्समधे खाणी. पत्ता : कार्ल्टन हाऊस टेरेस, होल्डरनेस हॉल, हॉलमशायर, कार्स्टन कॅसल, बँगर, वेल्स. ...
बापरे ही बरीच बडी आसामी दिसतेय.अगदी राजदरबारालाही अभिमान वाटावा अशी."
"बड्यात बडी आणि श्रीमंतात श्रीमंत. मि. होम्स, मला माहितेय की तुम्ही कधीच पैशासाठी काम करत नाही. पण तरीही मी हे तुम्हाला सांगतो की लॉर्डसाहेबांनी त्यांच्या मुलाला कोणी पळवलं हे शोधून काढणाऱ्याला पाच हजार पौंडांचं बक्षीस जाहीर केलंय आणि त्यांच्या मुलाला सोडवून आणणाऱ्याला ते वर आणखी हजार पौंड देणार आहेत."
"रक्कम बरीच मोठी आहे. मला वाटतं वॉटसन, आपण डॉक्टरांबरोबर जावं हे बरं...
मि. हक्स्टेबल, तुम्ही हे दूध प्या. थोडेसे ताजेतवाने व्हा आणि मग मला सविस्तर सांगा नक्की काय काय आणि कसं कसं घडलं ते मुख्य म्हणजे मला हे सांगा की तुमचा आणि तुमच्या प्रायॉरी स्कूलचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? आणि तुम्ही आज या घटनेला तीन दिवस उलटून गेल्यावर माझ्याकडे का धाव घेतली आहे?
असे गोंधळून जाऊ नका. तुमच्या गालावर वाढलेल्या दाढीवरून मला कळलं की ही गोष्ट तीन दिवसांपूर्वीच घडून गेलेली आहे."
दूध आणि बिस्किटे पोटात गेल्यावर डॉक्टरांच्या जिवात जीव आला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग पालटला आणि डोळ्यात पुन्हा चमक दिसू लागली. उतावीळपणे घडलेल्या घटनांचा तपशील त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली.
"प्रायॉरी ही माझी शाळा आहे. ती मीच सुरू केली आणि तिचा मुख्याध्यापक म्हणून मी ती चालवतो आहे. आजमितीला इंग्लंडमधल्या शाळांपैकी प्रायॉरी ही सर्वोत्कृष्ट प्राथमिक शाळा आहे. लॉर्ड लिव्हरस्टॉक, अर्ल ऑफ ब्लॅकवॉटर, सर केथकार्ट सोम्ज अशा प्रसिद्ध लोकांनी अत्यंत विश्वासाने आपली मुलं माझ्या हवाली केली आहेत. तीन आठवड्यांपूर्वी लॉर्ड होल्डरनेस यांचे सेक्रेटरी जेम्स विल्डर माझ्याकडे आले आणि ड्यूकसाहेबांचे चिरंजीव लॉर्ड सॉल्टिअर आमच्या शाळेत शिकायला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला खरोखरच अस्मान ठेंगणं झालं होतं. पुढे घडणाऱ्या दुर्दैवी घटनांची तेंव्हा मला मुळीच कल्पना नव्हती. "
"एक मे ला आमच्या उन्हाळी सत्राची सुरुवात होते. त्या दिवशी लॉर्ड सॉल्टिअर पहिल्यांदा आमच्या शाळेत आले. त्या मुलाचं वागणंबोलणं मोठं अदबशीर आणि मोहक होतं. लवकरच आमच्या शाळेच्या वातावरणात तो रुळला. मला लोकांच्या खाजगी भानगडीमध्ये नाक खुपसायला आवडत नाही पण मी हे निश्चितपणे सांगू शकतो की तो त्याच्या घरी फार सुखात नव्हता. ड्यूकसाहेबांचं त्यांच्या बायकोशी पटत नाही ही गोष्ट जगजाहीर आहे आणि या भांडणांचा परिणाम म्हणून ड्यूकसाहेब आणि डचेसबाई परस्परसंमतीने वेगळे राहतात. डचेसबाई आता दक्षिण फ्रान्समध्ये राहतात. या मुलाचा ओढा पहिल्यापासून आपल्या आईकडे होता आणि तो शाळेत येण्याच्या थोडेच दिवस आधी ही घटना घडली. त्यामुळे होल्डरनेस हॉलमधून आपल्या आईचं निघून जाणं त्याला खूप जड गेलं. त्याला आमच्या निवासी शाळेत पाठवण्यामागे हे एक प्रमुख कारण होतं. साधारण एका पंधरवड्यातच तो आमच्याकडे चांगला रुळला आणि आपलं दुःखही विसरायला त्याने सुरुवात केली होती."
"त्याला आम्ही शेवटचं पाहिलं परवाच्या सोमवारी म्हणजे १३ मेच्या रात्री. त्याची खोली दुसऱ्या मजल्यावर एका मोठ्या खोलीच्या एका भागात आहे. बाहेरच्या खोलीत दोन मुलं झोपतात. या दोन्ही मुलांना रात्री काहीही कळलं किंवा ऐकू आलं नाही. त्याच्या खोलीची खिडकी उघडी होती. या खिडकीपासून खाली जमिनीपर्यंत एक आयव्हीचा वेल पसरला आहे. आम्हाला या वेलाजवळ पावलांचे ठसे वगैरे मिळाले नाहीत पण माझ्या मते त्याच्या खोलीतून बाहेर पडायला हाच एक मार्ग होता."
"मंगळवारी सकाळी सातच्या सुमाराला तो त्याच्या खोलीत नाहीये हे आमच्या लक्षात आलं.तो रात्री त्याच्या बिछान्यातच झोपला होता. तशा खुणा होत्या तिथे. बाहेर पडायच्या आधी त्याने त्याचा पूर्ण युनिफॉर्म घातला होता. काळ्या रंगाचं जाकीट आणि करड्या रंगाची फुलपँट असा त्याचा वेष आहे. त्याच्या खोलीत कोणीही आलं नव्हतं. बाहेरच्या खोलीत झोपणाऱ्या मुलांपैकी एका मुलाची झोप बरीच सावध आहे आणि त्याने . कुठल्याही प्रकारच्या झटापटीचे आवाज किंवा मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकलेल्या नाहीत. तसं काही असतं तर त्याच्या ते लगेच लक्षात आलं असतं."
"लॉर्ड सॉल्टिअर नाहीसे झाले आहेत हे मला समजताच मी झाडून सगळ्या मुलांना, शिक्षकांना आणि नोकरचाकरांना बोलावून घेतलं. सगळे जण एकत्र जमल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की गायब झालेल्यांत लॉर्ड सॉल्टिअर एकटेच नव्हते. आमचे जर्मनचे मास्तर मि. हायडेगर यांचाही कुठे पत्ता नव्हता. हायडेगर सरांची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटच्या टोकाला आहे. त्यांची आणि लॉर्डसाहेबांची खोली एकाच बाजूला आहे. त्यांच्याही गादीवर झोपल्याच्या खुणा आहेत. पण ते मध्यरात्री अर्धवट कपडे चढवून कुठेतरी निघून गेले असावेत. त्यांचा शर्ट आणि त्यांचे मोजे जमिनीवर तसेच आहेत. त्यांनी खाली उतरायला आयव्हीच्या वेलाचा दोरासारखा उपयोग केला आहे कारण ते जिथे जमिनीवर उतरले तिथे त्यांचे ठसे आम्हाला सापडले आहेत. तिथे पलिकडेच एका शेडमध्ये त्यांची सायकल उभी केलेली असते. तीही गायब आहे. "
"हायडेगर गेल्या दोन वर्षांपासून आमच्या शाळेत आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणाहून त्यांच्याबद्दल खूपच प्रशंसा कानी आली होती. पण त्यांचा स्वभाव जरासा एकलकोंडा आणि फार मोकळा नव्हता. मुलं किंवा इतर शिक्षकामध्येही ते फार मिसळत नसत. आज गुरुवार. या दोघांचा अजूनही काहीच पत्ता लागला नाहीये.
आमची शाळा होल्डरनेस हॉलापासून जवळच आहे. अचानक घरची आठवण येऊन लॉर्डसाहेब घरी तर गेले नाहीत ना अशी शंका आल्यामुळे आम्ही सर्वप्रथम त्यांच्या घरी होल्डरनेस हॉलामध्येच चौकशी केली.पण ड्यूकसाहेबांना झाल्या गोष्टीचा काहीच पत्ता नव्हता. ही बातमी कळल्यापासून ड्यूकसाहेब फारच काळजीत आहेत. काळजीच्या ओझ्यामुळे माझी स्वतःची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्षच पाहिले आहे. मि. होम्स, माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पूर्ण शक्तीनिशी या केसमध्ये लक्ष घालावे."
खरोखरच होम्स आतापर्यंत अत्यंत लक्षपूर्वक ही सगळी कहाणी ऐकत होता. त्याच्या कपाळाला इतक्या आठ्या पडल्या होत्या की त्याच्या दोन्ही भुवया जवळजवळ चिकटल्यासारख्या झाल्या होत्या. त्याच्याकडे पाहूनच कळत होतं, की या केसमध्ये आपली सगळी शक्ती ओतण्यासाठी त्याला कोणाच्या विनंतीची गरज नव्हती. ही केस निश्चितच त्याच्या मेंदूला आवडता खुराक देणारी होती. त्याने शेजारच्या नोंदवहीत एक दोन गोष्टी लिहून ठेवल्या.
"तुम्ही यापूर्वीच माझ्याकडे न येऊन मोठी चूक केली आहे. घडल्या प्रकाराला इतका वेळ उलटून गेल्यावर त्याचा छडा लावायचा म्हणजे यशाची शक्यता पुष्कळ प्रमाणात कमी होते. तुम्ही माझे हात बांधूनच ठेवलेत म्हणा ना. उदाहरणच द्यायचं झालं तर त्या आयव्हीच्या वेलाजवळ आणि त्याशेजारच्या गवतात कुठल्याच प्रकारचे ठसे सापडले नाहीत हे कसं काय शक्य आहे?"
"यात माझा काही दोष नाही हो. सरसाहेबांना ही गोष्ट बाहेर फुटल्यावर उद्भवणाऱ्या गोंधळाची आणि त्याच्या इतर परिणामांची अतिशय भिती वाटते आहे. "
"पण या प्रकाराचा अधिकृत तपास तर झालाच असणार"
"हो झाला आहे आणि त्यातून निघालेले निष्कर्ष अतिशय निराशाजनक आहेत. आम्हाला मिळालेला सगळ्यात मोठा क्लू हा होता की शेजारच्या गावातल्या स्टेशनवरून एक लहान मुलगा आणि एक तरुण रात्रीच्या गाडीने निघून गेल्याचं कळलं. त्या दोघांचा तपास केल्यावर ते लिव्हरपूलमधे सापडले पण त्यांना या प्रकारातलं काहीच माहीत नाही असं कळलं. त्यानंतर रात्रभर मला झोप लागली नाही आणि मग मात्र पहाटेच मी तुमच्याकडे धाव घेतली. "
"मला वाटतं या दुक्कलीच्या मागे लागण्याच्या नादात तिथल्या परिसराची पाहणी लांबणीवर टाकण्यात आली असणार."
"लांबणीवर वगैरे नाही टाकली... पूर्णपणे सोडून दिली."
"आणि या सगळ्यात तीन दिवस वाया घालवले. ही गोष्ट भलत्याच निष्काळजीपणाने आणि बेजबाबदारपणे हाताळली गेली आहे."
"कबूल आहे"
"ठीक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. हे प्रकरण उलगडता येऊ शकेल. मला एक सांगा त्या मुलाच्यात आणि त्या जर्मनच्या मास्तरांमध्ये काही संपर्क होता का?"
"काहीच नाही. "
"हा मुलगा त्यांच्या वर्गात होता का?"
"नाही. आजपर्यंत ते दोघं एकमेकांशी एक शब्दही बोललेले मला आठवत नाहीत "
"ही गोष्ट महत्वाची आहे. त्या मुलाकडे सायकल होती का?"
"नाही"
"दुसऱ्या कोणाची सायकल हरवली आहे का?"
"नाही"
"तुमची तशी खात्री आहे?"
"हो आहे"
"याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय का की जर्मनचे मास्तर ऐन मध्यरात्री त्या मुलाला कडेवर घेऊन आपल्या सायकलवरून पळून गेले?"
"नाही हो.."
"मग तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल?"
"ती सायकल लोकांना फसवण्यासाठी असेल. ती रानात कुठेतरी लपवून ते
दोघे पायी गेले असतील."
"हम्म. पण ही गोष्ट जरा मूर्खपणाचीच वाटते नाही का? तिथे शेडमध्ये आणखी
किती सायकली होत्या?"
"बऱ्याच"
" मग त्यांना लोकांची दिशाभूलच जर करायची असती तर त्यांनी दोन सायकली नसत्या का लपवून ठेवल्या?"
"हो खरंय तुम्ही म्हणता ते."
"खरंच आहे ते. सायकल दिशाभूल करायला वापरली होती हा तर्क साफ चुकीचा आहे. पण तपासाला सुरुवात करायला हा मुद्दा चांगला आहे. सायकल नष्ट करणं किंवा दडवणं ही काही फारशी सोपी गोष्ट नाही. अजून एक. तो मुलगा नाहीसा होण्याआधी त्याला भेटायला कोणी आलं होतं का?"
"नाही."
"त्याला एखादं पत्र वगैरे आलं होतं का?"
"हो एक पत्र आलं होतं."
"ते पत्र कोणी पाठवलं होतं?"
"त्याच्या वडिलांनी"
"मुलांना आलेली पत्रं तुम्ही उघडून पाहता का?"
"नाही"
"मग ते पत्र त्याच्या वडिलांनी पाठवलंय हे तुम्हाला कसं कळलं?"
"त्या पाकिटावर ड्यूकसाहेबांचा शिक्का होता आणि त्याच्यावरचा पत्ताही त्यांच्याच हस्ताक्षरात होता. शिवाय ड्यूकसाहेबांनीच ते पत्र लिहिलं होतं हे त्यांनीही मान्य केलं आहे."
"यापूर्वी त्याला कधी पत्रं आली होती का?"
"नाही. बरेच दिवस त्याला कुठलं पत्र वगैरे आलं नव्हतं."
"त्याला फ्रान्समधून कधी पत्र आलं होतं का?"
"नाही. कधीच नाही."
"मी हा प्रश्न का विचारला हे तुमच्या लक्षात आलंच असेल. एकतर त्या मुलाला कोणीतरी जबरदस्तीने पळवून नेलं किंवा तो आपल्या स्वतःच्या इच्छेने पळाला. जर तो आपणहून पळाला असेल तर त्याला बाहेरून कोणीतरी तसं सुचवलं होतं कारण इतका लहान मुलगा आपणहून असं करेल ही गोष्ट जरा अवघड वाटते. आता जर त्याला भेटायला कोणी आलं नसेल तर त्याला ही सूचना पत्रातूनच मिळू शकते. म्हणूनच त्याला पत्र लिहिणारी व्यक्ती कोण हे जाणून घेण्याची माझी धडपड आहे."
"दुर्दैवाने या बाबतीत मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे आजवर त्या मुलाला फक्त त्याच्या वडिलांकडूनच पत्र येत असत."
"तो नाहीसा झाला त्या दिवशीही त्याच्या वडिलांनीच त्याला पत्र लिहिलं होतं. वडील-मुलाचे संबंध कसे होते? मैत्रीचे होते की कसे?"
"ड्यूकसाहेबांना इतर कोणाशी इतक्या ममतेने आणि प्रेमाने वागताना मी तरी पाहिलेलं नाही. त्यांच्यावर अनेक लहानमोठ्या सार्वजनिक आणि खाजगी जबाबदाऱ्या असतात पण या सगळ्यातून ते आपल्या मुलासाठी नेहमीच वेळ काढतात."
"पण त्या मुलाचा ओढा त्याच्या आईकडे जास्त आहे?"
"हो"
"तो कधी तसं म्हणाला का"
"नाही"
"मग ड्यूकसाहेब म्हणाले का?"
"छे छे. कधीच नाही"
"मग हे तुम्हाला कसं माहीत?"
"ड्यूकसाहेबांचे सेक्रेटरी मि. जेम्स विल्डर यांच्याशी मी बोललो आहे. त्यांनीच मला लॉर्ड सॉल्टिअर यांच्याबद्दल बरंच काही सांगितलं."
"हम्म. अरे हो! त्या मुलाच्या खोलीत ड्यूकसाहेबांनी पाठवलेलं ते पत्र सापडलं का?"
"नाही. बहुतेक त्याने ते बरोबर नेलं असावं. मि. होम्स वेळ झाली आहे. आपल्याला आता निघायला हवं."
"मी एक टॅक्सी बोलावतो. साधारण पाव घटकेत आपण निघू. अजून एक. तुम्ही जर घरी तार करणार असाल तर तिथल्या लोकांचा असाच समज राहू देणं बरं की अजूनही तपास लिव्हरपूललाच सुरू आहे किंवा सध्या जी काही स्थिती असेल ती तशीच राहील असं बघा. मला तिथे येऊन गुपचूप काही गोष्टी तपासायच्या आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे तो माग अजून इतका शिळा झाला नसावा की वॉटसन आणि मी अशा दोन जुन्या शिकारी कुत्र्यांना तो शोधून काढता येऊ नये."
--अदिती