पुस्तकायन

Friday, April 13, 2007

नौदलाच्या कराराचा मसुदा(२)

"पण घंटेचा आवाज ऐकून एक वयस्कर, गंभीर चेहऱ्याच्या बाई वर आल्या. त्यानी एक एप्रन बांधला होता . मी त्यांना पाहून बुचकळ्यात पडलो. चौकशी केल्यावर मला असं कळलं की ती आमच्या कॉफीवाल्याची बायको होती. मग मी तिलाच माझ्यासाठी कॉफी करून आणायला सांगितली."
"जरा वेळाने , माझे पुढचे दोन भाग लिहून झाल्यावर मला फारच झोप यायला लागली. अंगही अगदी आंबून गेलं होतं. पाय मोकळे करावेत म्हणून मी खोलीतच येरझाऱ्या घालू लागलो. अजून माझी कॉफी कशी आली नाही याचं मला जाम आश्चर्य वाटत होतं. "

"माझ्या खोलीचं दार उघडून मी बाहेरच्या व्हरांड्यात एक नजर टाकली. माझ्या खोलीच्या दारासमोर एक बोळ आहे जो एका गोल जिन्यापर्यंत जातो. तिथे मंद दिवे लावलेले होते. माझ्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी तेवढी एकच वाट आहे. बोळाच्या दुसऱ्या टोकालगतचा गोल जिना खालच्या मजल्याकडे जातो जिथे जिन्याशेजारीच कॉफीवाल्याचं दुकान आहे.या जिन्याच्या मध्यावर अजून एक बोळ त्याला काटकोनात येऊन मिळतो. या बोळाच्या दुसऱ्या टोकाला एक लहान शिडीसारखा जिना आहे जो एका लहानश्या दरवाज्याला मिळतो. आमची नोकर मंडळी किंवा चार्ल्स स्ट्रीटवरून येणारी कारकून मंडळी जवळचा मार्ग म्हणून या दरवाज्याचा वापर करतात. हे पहा त्याच्या रचनेचं ढोबळ चित्र ..."
"फारच छान... माझ्या डोळ्यांपुढे एक छान चित्र तयारझालेलं आहे..."
"हे सगळं तुम्हाला नीट समजणं फार महत्त्वाचं आहे. मी गोल जिन्याने खालच्या चौकात गेलो आणि पाहिलं तर कॉफीवाल्याच्या स्पिरिटच्या दिव्यावर एका किटलीत पाणी उकळत होतं आणि त्यातून वाफांवर वाफा येत होत्या. त्या दिव्याशेजारीच शेजारीच आमच्या कॉफीवाल्याला गाढ झोप लागली होती. पाण्याला चांगलीच उकळी फुटली होती आणि ते आता जमिनीवर सांडायला लागलं होतं. मी तो दिवा विझवला आणि कॉफीवाल्याला हलवून जागं करावं म्हणून माझा हात त्याच्या जवळ नेला तोच त्याच्या डोक्यावर बांधलेल्या एका घंटेचा जोरदार आवाज झाला. अचानक झालेल्या या आवाजाने तो दचकून जागा झाला. "
"फेप्स साहेब...." तो आश्चर्यचकित होऊन क्षणभर माझ्याकडे पहातच राहिला.
"कॉफी झाली का ते पहायला मी खाली आलो"
"मी.. मी पाणी उकळायला ठेवलं आणि माझा डोळा लागला साहेब" असं म्हणत असताना त्याने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मग त्या अजूनही किणकिणणाऱ्या घंटेकडे तो बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण गोंधळलेले- गडबडलेले भाव होते.
"साहेब, जर तुम्ही इथे आहात तर ही घंटा कोण वाजवतंय?"
"बापरे! घंटा... ही कशाची घंटा आहे?" मी त्याला ओरडून विचारलं
"ही तुमच्या खोलीतली घंटा आहे"
"एक क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी ते अमूल्य भेंडोळं टेबलावर उघडंच टाकून आलो होतो आणि कोणीतरी माझ्या खोलीत घंटा वाजवत होतं. मी वेड्यासारखा गोल जिन्यावरून वर पळत सुटलो. बोळकांडीतून धावत धावत मी माझ्या खोलीत आलो. तिथे कोणीही नव्हतं. सगळं काही जिथल्या तिथे आणि जसंच्या तसं होतं. पण.... ते भेंडोळं मात्र तिथून गायब झालं होतं. मी करत असलेली त्याचे प्रत तिथेच होती पण मूळ मसुदा नाहीसा झाला होता."
हे ऐकून होम्स त्याच्या खुर्चीत एकदम सावरून बसला. त्याच्या बुद्धीला आवडतं खाद्य मिळालेलं दिसत होतं.
"मग? ...काय केलंत तुम्ही?" तो पुटपुटला...
"माझ्या लगेच लक्षात आलं की चोर लहान दरवाज्याजवळच्या शिडीवरून वर आला असणार कारण तो जर गोल जिन्याने आला असता तर मला नक्कीच दिसला असता."
"तुमची खात्री आहे की तो तुमच्या खोलीत किंवा त्या व्हरांड्यात कुठे लपून बसला नव्हता? तुम्ही म्हणाला होतात ना, की तिथे फारसा उजेड नव्हता म्हणून..."
"नाही त्या व्हरांड्यात किंवा माझ्या खोलीत लपायला जागाच नाही. एखादा उंदीरसुद्धा तिथे लपून राहू शकत नाही. "
"हम्म्म . धन्यवाद... पुढे सांगा..."
"माझ्या चेहऱ्याचा रंग उडालेला पाहून एव्हाना आमच्या कॉफीवाल्याच्याही लक्षात आलं होतं की काहीतरी जबरदस्त घोटाळा झाला आहे. तोही माझ्यामागोमाग धावत वर आला. मग आम्ही दोघेही त्या शिडीवरून चार्ल्स स्ट्रीटवर उघडणाऱ्या दाराकडे धावलो. ते दार लावलेलं होतं पण त्याचं कुलूप उघडंच होतं. मी घाईघाईने ते दार उघडलं आणि बाहेर पाहिलं. त्याच वेळी शेजारच्या इमारतीतल्या घड्याळाने तीन लहान टोले दिले. याचा अर्थ तेव्हा पावणे दहा वाजले होते."
"हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे..." होम्स म्हणाला आणि याने आपल्या शर्टाच्या बाहीवर याची नोंद करून घेतली.
"बाहेर रात्रीचा दाट अंधार पसरला होता आणि पाऊस पडत होता. चार्ल्स स्ट्रीटवर निर्जन शांतता होती पण पलिकडे व्हाईटहॉलजवळ मात्र नेहमीप्रमाणे प्रचंड रहदारी भरवेगात सुरू होती. आम्ही पावसाची पर्वा न करता रस्त्याच्या कडेने तसेच पळत सुटलो. तिथल्या कोपऱ्यावर आम्हाला एक पोलीस उभा असलेला दिसला."
"चोरी झालीये चोरी झालीये ... परराष्ट्र विभागाच्या कचेरीतून एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज चोरीला गेलाय . आत्ता इकडून कोणी पळून जाताना दिसलं का?" मी त्या पोलीसाला विचारलं. मला धाप लागली होती...
"मी गेली १०-१५ मिनिटं इथेच उभा आहे. तेवढ्या वेळात इथून फक्त एका बाईंना जाताना पाहिलंय मी. अशा जरा लठ्ठशा, वयस्कर होत्या शाल गुंडाळून जात होत्या."
"अहो ती माझी बायको होती... तुम्हाला दुसरं कोणी दिसलं का इथून जाताना?" कॉफीवाला म्हणाला.
"नाही बुवा..."
"मग तो चोर या दुसऱ्या बाजूकडून पळाला असणार...चला" तो माझ्या बाहीला धरून मला ओढत म्हणाला.
"पण मला त्याचं बोलणं खटकत होतं. शिवाय ज्या त्वरेने तो मला तिथून दूर घेऊन जाऊ बघत होता त्यामुळे माझा संशय अधिकच वाढला."
"त्या बाई कुठल्या दिशेने गेल्या?" मी पोलिसाला विचारलं.
"मला माहीत नाही साहेब. पण ती बरीच घाईत असावी. म्हणूनच माझं लक्ष तिच्याकडे गेलं..."
"किती वेळ झाला तिला जाऊन?"
"जास्तीत जास्त पाच मिनिटं झाली असतील साहेब.."
"फेप्स साहेब तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय...एकेक क्षण मोलाचा आहे.."कॉफीवाला मला विनवत होता.
"मी सांगतो तुम्हाला माझ्या बायकोचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.. चला लौकर आपण या दुसऱ्या बाजूने जाऊ या... तुम्ही नाही आलात तर मी एकटाच जातो..." असं म्हणत तो त्या रस्त्याने धावला सुद्धा...
मी काही क्षणात त्याला गाठलं आणि त्याच्या बाहीला धरून त्याला विचारलं
" कुठे राहतोस तू?"
"१६ आयव्ही लेन, ब्रिक्स्टन..." तो म्हणाला. "पण फेप्स साहेब तुम्ही या चुकीच्या गोष्टींमधे वेळ दवडू नका. आपण इकडे जाऊन पाहू या काही पत्ता लागतोय का ते..."
"त्याच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य होतं. मी आणि तो पोलिस त्याच्या मागोमाग धावलो. पण पुढे कोणीच नव्हतं. रस्त्यावर रहदारी सुसाट वेगाने धावत होती आणि पायी जाणारे लोक पावसापासून वाचण्यासाठी अडोसा शोधण्याच्या घाईत होते त्यामुळे तिथून जर कोणी गेलं असलं तर आम्हाला काहीच पत्ता लागू शकला नाही"
"मग आम्ही माझ्या ऑफिसात परत आलो. तिथल्या जिन्यावर आणि बोळकांड्यांमधे आम्ही पुन्हा एकदा शोधाशोध केली पण व्यर्थ. माझ्या खोलीत आणि तिच्या बाहेरच्या व्हरांड्यामधे एक तेलकट जाजम अंथरलेलं आहे ज्यावर कुणाच्याही पावलांचे ठसे अगदी सहज उमटतात. आम्ही काळजीपूर्वक त्याची तपासणी केली पण तिथेही आम्हाला कुठलेच ठसे आढळून आले नाहीत. "
"त्या दिवशी संध्याकाळभर पाऊस पडत होता का?"
"हो साधारण सात वाजल्यापासून पडत होता."
"मग नऊ वाजता तुमच्या खोलीत आलेल्या बाईंच्या चिखलाच्या बुटांचे ठसे तिथे कसे काय सापडले नाहीत?"
" बरोब्बर बोललात. माझ्याही डोक्यात तोच विचार आला. पण आमच्या ऑफिसात येणाऱ्या झाडूवाल्या आणि इतर बायका त्यांचे बूट बाहेरच काढून ठेवतात आणि आत वावरताना कामावरच्या सपाता घालतात."
" हम्म आलंय माझ्या लक्षात... म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की संध्याकाळभर पाऊस पडत असूनही तिथे चिखलाच्या पावलांचे कुठलेच ठसे सापडले नाहीत? मोठं विचित्र आणि गुंतागुंतीचं दिसतंय प्रकरण एकूणात....
बरं मग पुढे काय झालं?"
"आम्ही माझ्या खोलीचीही कसून तपासणी केली. तिथे कुठलीही चोरवाट किंवा छुपा दरवाजा असण्याची शक्यता नाही. खिडक्याही जमिनीपासून तीस फूट उंचीवर आहेत. त्या दिव्शी दोन्हीही खिडक्या आतून लावून घेतलेल्या होत्या. जमिनीवरच्या जाजमामुळे एखादं भुयाराच्या तोंडासारखं दार असण्याचीही फारशी शक्यता नाही. खोलीचं छत मजबूत पांढऱ्या सिमेंटने बांधून काढलेलं आहे. मी अगदी शपथेवर सांगू शकतो की चोर त्या दरवाज्यातूनच आत आला होता."
"चोर जर फायरप्लेसमधून आला असेल तर?"
"माझ्या खोलीत फायरप्लेस नाही. शेकोटीऐवजी आम्ही स्टोव्ह वापरतो. ती घंटेची दोरी माझ्या टेबलाच्या उजवीकडे एका तारेला जोडलेली आहे. ज्याने कोणी ती घंटा वाजवली तो माझ्या टेबलाशीच उभा असणार.पण चोराने घंटा का वाजवली असावी हे मात्र काही केल्या माझ्या लक्षात येत नाहीये.."
"हम्म्म ही गोष्ट विचित्र आहे खरी. मग तुम्ही काय केलंत? खोलीची तपासणी केली होतीत ना? काही माग लागला का? सिगारेटची राख किंवा एखादा हातमोजा किंवा हेअरपिन वगैरे?"
"तिथे तसं काहीच सापडलं नाही..."
"तुम्हाला कसला वास वगैरे जाणवला का?"
"वास ! अरेच्या! ही गोष्ट आमच्या डोक्यातच आली नाही..."
"अरेरे... तंबाखूचा वगैरे वास या कामात मोठा उपकारक ठरला असता..."
"मी कधीच सिगारेट्स ओढत नाही त्यामुळे तंबाखूचा वास मला नक्की जाणवला असता...पण तिथे कुठल्याही प्रकारच्या खुणा नव्हत्या
फक्त एकच गोष्ट विचित्र होती. मिसेस टॅंजी - कॉफीवाल्याची बायको, तिथून घाईघाईने बाहेर पडल्या होत्या. ही त्याच्या बायकोची रोजची घरी जाण्याची वेळ होती हे सोडून अजून कुठलंच स्पष्टीकरण तो कॉफीवाला देऊ शकला नाही. प्राप्त परिस्थितीत, त्या बाईने त्या कागदपत्रांची वासलात लावण्याच्या आत तिला ताब्यात घेणं हे उत्तम असं पोलीसाचं आणि माझं म्हणणं पडलं.आमचा संशय निश्चितपणे तिच्यावरच होता."
"आत्तापर्यंत ही बातमी स्कॉटलंड यार्डपर्यंत पोहोचली होती. ही बातमी कळताच इन्स्पेक्टर फोर्ब्स तातडीने तिथे हजर झाले आणि त्यांनी सूत्रं आपल्या हाती घेतली. आम्ही एका टॅक्सीत बसून अर्ध्या तासाच्या आत कॉफीवाल्याने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोचलो. त्याच्या घराचं दार ठोठावल्यावर एका तरुण मुलीने दार उघडलं. ती त्याची सगळ्यात मोठी मुलगी होती हे नंतर आम्हाला कळलं. मिसेस टॅंजी अजून घरी यायच्या होत्या म्हणून तिने आम्हाला दिवाणखान्यात बसून त्यांची वाट बघण्याची विनंती केली."
"सुमारे दहा मिनिटांनी पुन्हा दार वाजलं. तिथे आम्ही एक अक्षम्य चूक केली. ते दार आम्ही पुढे होऊन उघडायला हवं होतं पण तसं न करता आम्ही ते त्या मुलीला उघडायला सांगितलं.
"आई आपल्याकडे काही लोक आलेत" आई-मुलीचा एक क्षणिक संवाद आम्ही ऐकला आणि क्षणार्धात दाराचा आवाज झाला. बाहेरच्या बाजूने कोणीतरी पळत गेलं. इन्स्पेक्टर फोर्ब्सनी धावत जाऊन दरवाजा उघडला आणि मीही त्यांच्यामागे धावलो. पण आम्हाला उशीर झाला होता. त्या बाई आधीच मागच्या दाराकडे धावल्या होत्या. आम्ही स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाज्यातून आत घुसलो आणि तिला पकडलं. ती रागाने आमच्याकडे पहात असताना अचानक तिने मला ओळखलं. "
"अरे मि. फेप्स तुम्ही इथे कसे काय?" ती अचंबित झाली होती.
"आम्हाला पाहून तुम्ही का पळालात?" फोर्ब्जनी तिला दरडावून विचारलं.
"मला वाटलं तुम्ही भाडं वसूल करायला आला आहात...आम्ही एका व्यापाऱ्याला काही देणं लागतो.." ती म्हणाली.
"हम्म हे कारण पुरेसं समाधानकारक वाटत नाहीये मला. माझा असा संशय आहे की तुम्ही परराष्ट्रीय कचेरीतून काही अतिशय महत्त्वाची कागदपत्रं चोरली आहेत. तुम्हाला चौकशीसाठी आमच्याबरोबर स्कॉटलांड यार्डमधे यावं लागेल. "
तिने आम्हाला विरोध करायचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एका गाडीतून आम्ही दोघं तिला पोलीस स्टेशनमधे घेऊन आलो. त्याआधी आम्ही तिच्या स्वयंपाकघराची कसून तपासणी केली विशेषतः शेकोटीची आणि चुलीची पण आम्हाला जळके कागदाचे तुकडे किंवा राख वगैरे काहीच सापडलं नाही. स्कॉटलंड यार्डमधे एका स्त्री अधिकाऱ्याने तिची झडती घेतली. पण काहीच सापडू शकलं नाही. कागदपत्रांचा काहीच तपास न लागल्यामुळे माझ्या सगळ्या आशा धुळीला मिळाल्या."
"आणि त्या क्षणी मी किती गंभीर परिस्थितीमधे सापडलोय हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलं. या सगळ्या घटना इतक्या वेगाने घडल्या होत्या की मला दुसरा विचार करायला सवडच मिळाली नव्हती. मला जर ते कागद परत मिळाले नाहीत तर त्याचे परिणाम किती भयंकर होतील हे आता माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागलं. शाळेत असल्यापासून मी खूप हळवा ,संवेदनाशील आणि कचखाऊ मुलगा आहे. वॉटसनला विचारा हवं तर. तो सांगेल तुम्हाला."

"माझ्याबरोबरच मी घराण्याची प्रतिष्ठा आणि मामाची अब्रूही धुळीला मिळवली होती. की मी कुठल्यातरी भयंकर कटामधे बळीचा बकरा ठरलो होतो? मला माहीत होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामधे अशा चुकांना क्षमा नाही. झाल्या प्रकाराचा जबरदस्त आघात माझ्या मनावर झाला.
नंतर मी काय केलं मला काहीच आठवत नाही. मी बहुधा चक्कर येऊन खाली पडलो असणार. काही अधिकाऱ्यांनी मिळून मला एका गाडीत घातलं आणि वॉटरलू स्टेशनवर नेलं. वोकिंगला जाणाऱ्या गाडीत मला बसवल्यावर ते मला पोहोचवायला इथार्यंतही आले असते पण त्याच गाडीत माझे शेजारी, डॉक्टर फेरियर होते. त्यांनी मला घरी आणण्याची जबाबदारी घेतली पण गाडी सुटायच्या आतच मला अपस्माराचा झटका आला. त्या क्षणापासून मी जवळजवळ वेडाच झालो होतो."
--अदिती

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

<< Home