पुस्तकायन

Friday, April 13, 2007

नौदलाच्या कराराचा मसुदा(४)

आम्ही दोघे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी भेटलो आणि वोकिंगला पोहोचलो. होम्सच्या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नव्हता आणि काही नव्या घडामोडीही झाल्या नव्हत्या. जेंव्हा होम्सच्या मनात असेल तेंव्हा तो अगदी अडेलतट्टूपणा करायचा. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या मनात काय चाललंय याचा काहीही अंदाज मी बांधू शकलो नाही.
आम्ही ब्रायरब्रीला पोहोचलो तेंव्हा पर्सी कालच्यापेक्षा बऱ्याच बऱ्या अवस्थेत होता. अजूनही ऍनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होती. त्याने कोचावरून उठून हसतमुखाने आमचे स्वागत केले.
"काही कळलं का?" त्याने आशाळभूतपणे विचारलं.
"मी कालच म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे अजूनही सांगण्याजोगं काहीही नाही. मी काल फोर्ब्सला भेटलो, तुमच्या मामांना भेटलो. मी काही ठिकाणी खडे टाकले आहेत आणि तिथून काहीतरी बातमी मिळायची मी वाट पाहतो आहे..."
"म्हणजे तुम्ही आशा सोडलेली नाही तर.."
"मुळीच नाही.."
"तुम्ही अगदी देवासारखे आमच्या मदतीला धावून आला आहात...आपण धीर सोडता कामा नये. लौकरच खरं काय ते बाहेर येईल..." ऍनी म्हणाली.
एव्हाना फेप्स परत कोचावर बसला होता. आमच्याकडे तोंड करून तो म्हणाला "काल इथे काही गोष्टी घडल्या आहेत. त्यांच्या तुम्हाला ठाऊक असणं आवश्यक आहे."
"मला वाटलंच होतं की काहीतरी घडणार... काय झालं?"
"काल रात्री इथे एक गंभीर प्रकार घडला." त्याने सांगायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर भिती दाटून आली होती. "तुम्हाला म्हणून सांगतो. माझी अशी खात्री पटली आहे की मला एका फार मोठ्या कटात गोवण्यात आलं आहे आणि प्रतिष्ठा वगैरे सोडा, माझ्या जिवालाच धोका निर्माण झाला आहे. "
"काय सांगता काय?"
"तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण जे झालं ते खरं आहे. मला जगात कोणीही शत्रू नाही पण काल रात्री माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्या घटनेनंतर मला फक्त हीच शक्यता दिसतेय"
"काय झालं मला सांगा बरं..."
"तुम्हाला माहीतच आहे की गेले नऊ आठवडे मी जवळजवळ शुद्धीवर नव्हतो. काल रात्री अनेक दिवसांनंतर अशी वेळ होती की माझ्यावर लक्ष ठेवायला कोणी नर्स या खोलीत नव्हती. मला वाटलं की मी माझा माझा झोपू शकतो पण मी खोलीत एक लहानसा दिवा मात्र लावून ठेवला होता. पहाटे दोनच्या सुमाराला मी अर्धवट झोपेत असताना कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. तो आवाज काही फार मोठा नव्हता. आधी मला वाटलं की जवळपास कुठेतरी एखादा उंदीर खुडबूड करतो आहे. अचानक तो आवाज जोरात यायला लागला आणि मला माझ्या खिडकीजवळून एखाद्या धातूच्या पट्टीचा आवाज यावा तसा एक आवाज ऐकू यायला लागला. मी ताडकन उठून बसलो. मला भास नक्कीच होत नव्हता. मघाचचा तो आवाज गजांमधून काहीतरी पुढे सारताना झाला होता आणि हा आवाज खिडकीची खिट्टी उघडतानाचा असणार. "
"त्यानंतर सुमारे दहा मिनिटं शांतता होती जणू काही तो जो कोण माणूस होता तो या गोष्टीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करत होता की या गडबडीत मला जाग तर आली नाही ना... नंतर ती खिडकी अलगद उघडली गेली आणि तिच्या दारांच्या करकरण्याचा लहानसा आवाज माझ्या कानावर पडला. मला हा ताण सहन होईना. मी पलंगावरून उठलो आणि खाडकन खिडकीचे जाळीचे पडदे बाजूला सारले. खिडकीजवळ एक माणूस दबा धरून बसला होता. अंधारामुळे मी त्याला नीट पाहू शकलो नाही. निमिषार्धात तो तिथून गायब झाला. त्याने कसलंतरी काळं बुरख्यासारखं कापड पांघरलं घेतलं होतं आणि आपल्या चेहऱ्याचा खालचा भाग त्याने झाकून घेतला होता. पण त्याच्या हातात एक लांबट सुरा होता. मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण तो पळून जाण्यासाठी वळला तेंव्हा ते पातं अंधारात चमकलेलं मला दिसलं. "
"क्या बात है! प्रकरण जास्त जास्त रंगतदार होत चाललंय! मग तुम्ही काय केलंत?" होम्स उद्गारला...
"माझ्यात पूर्वीची ताकद असती तर खिडकीतून उडी मारून मी त्याचा पाठलाग केला असता आणि त्याला पकडलं असतं. काल मात्र मी घंटा वाजवून नोकरांना बोलावलं. या गोंधळात थोडा वेळ वाया गेला कारण घंटा खाली स्वयंपाकघरात टांगलेली आहे आणि आमचे नोकर वरच्या मजल्यावर झोपतात. पण माझ्या आरडाओरड्यामुळे जोसेफला जाग आली आणि त्याने इतरांना उठवलं. गेले काही दिवस हवा कोरडी आहे त्यामुळे बागेतल्या गवतावर कुठलेही ठसे सापडणं अवघड होतं म्हणून तो विचार आम्ही सोडून दिला. बागेच्या लाकडी कुंपणाजवळ मात्र जोसेफला कोणीतरी तिथून वर चढून आल्याच्या काही खुणा सापडल्या मी अजून पोलिसांना काहीच कळवलं नाहीये कारण मी म्हटलं की आधी हे सगळं तुमच्या कानावर घालावं. . "
ही सगळी गोष्ट ऐकून होम्सने उडीच मारली आणि तो उत्तेजित झाल्यासारखा खोलीत येरझाऱ्या घालू लागला.
"संकटं कधीच एकटी येत नाहीत..." तो म्हणाला. तो वरवर हसत होता पण या गोष्टीने त्याला जरा आश्चर्य वाटलेलं दिसत होतं.
" काल तुमचा दिवस नव्हता एकूणात असं दिसतंय मला... माझ्याबरोबर बागेत एक फेरफटका मारवेल का तुम्हाला?"
"हो! चालेल की. मला जरा ऊन खावंसं वाटतंय. आपण जोसेफ्लाही घेऊ बरोबर."
"मी पण येणार" ऍनी म्हणाली.
"तुम्हाला नाही येता यायचं मिस हॅरिसन.. तुम्ही जिथे आहात तिथेच बसून राहिलात तर खूप बरं होईल. काहीही झालं तरी आपल्या जागेवरून हलू नका."
ती बिचारी हिरमुसली होऊन परत तिच्या जागेवर बसली. जोसेफ येताच आम्ही सगळे बाहेर पडलो. आम्ही पर्सीच्या खोलीच्या खिडकीची बाहेरून तपासणी केली. तो म्हणाला त्याप्रमाणे इथे काही खुणा होत्या पण त्या इतक्या अस्पष्ट होत्या की त्यांच्यावरून काहीच लक्षात येत नव्हतं. क्षणभर होम्सने त्यांचं निरीक्षण केलं आणि खांदे उडवत तो म्हणाला," यांच्यावरून तर काहीच समजत नाहीये. पण मला हे कळत नाही की इतर सोप्या आणि मोठ्या खिडक्या असताना चोराने याच खिडकीची निवड का बरं केली असावी?"
"स्वयंपाकघराच्या आणि डायनिंग रूमच्या खिडक्या रस्त्यावरून दिसू शकतात." जोसेफ म्हणाला.
"अच्छा... तो या दाराने आत आला असेल. हे कसलं दार आहे?"
"हे सामानाची ने-आण करायला वापरलं जातं. पण रात्री याला कुलूप लावलेलं असतं."
"अशी घटना यापूर्वी कधी घडली होती का?"
"कधीच नाही.." पर्सी म्हणाला.
"तुम्ही खूप मौल्यवान गोष्टी घरात ठेवता का?"
"नाही"
आपले हात आपल्या खिशात ठेवून तो प्रसंगाला विसंगत अशा निष्काळजीपणाने इकडेतिकडे पहात राहिला. अचानक जोसेफकडे वळून तो म्हणाला ,"तुम्हाला काही खुणा सापडल्या होत्या ना? कुठे आहेत त्या? जरा दाखवा पाहू मला"
जोसेफने तत्परतेने आम्हाला ती जागा दाखवली. लाकडी कुंपणाच्या वरच्या भागाचा एक मोठा तुकडा तुटून खाली पडला होता. होम्सने तो उचलून घेतला आणि काळजीपूर्वक त्याचे निरीक्षण करून तो म्हणाला " हा बराच जुना दिसतोय. हे नक्की काल रात्रीचंच आहे का?"
"उम्म असेलही नसेलही" -जोसेफ.
"या फाटकाच्या दुसऱ्या बाजूने उडी मारल्याच्या खुणा नाहीत त्यामुळे इथे आपल्याला काही माग मिळणार नाही आता आपण पुन्हा आत जाऊ या."
पर्सीच्या अंगात अजून बराच अशक्तपणा होता त्यामुळे तो खूप सावकाश चालत होता जोसेफ त्याला आधार देण्यासाठी त्याच्या बरोबरीने चालत होता. होम्स मात्रा लांब ढांगा टाकत केंव्हाच पर्सीच्या खोलीच्या खिडकीजवळ पोचला होता. तो कुजबुजत्या आवाजात पण घाईघाईने ऍनीला म्हणाला, "आज पूर्ण दिवसभर तुम्ही जिथे आहात तिथेच बसून रहा. काहीही झालं तरी तुम्ही तुमची जागा सोडू नका. तुम्ही आज दिवसभर तुमच्या जागेवरच राहणं अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात?"
" ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होईल." ऍनी म्हणाली. ती बुचकळ्यात पडलेली दिसत होती.
"आणि हो रात्री झोपताना या खोलीला बाहेरून कुलूप लावून घ्या आणि किल्ली कोणालाही देऊ नका."
"पण पर्सी कुठे झोपेल?"
"पर्सीला आम्ही आमच्याबरोबर लंडनला घेऊन चाललो आहोत."
"आणि मी मात्र इथे बसून रहायचं?"
"त्याच्यासाठी एवढं करणार नाही का तुम्ही? आता वेळ नका वाया घालवू.मला वचन द्या पाहू की तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागाल.."
तिने मान डोलावली तेवढ्यात ते दोघे खोलीजवळ येऊन पोहोचले.
"ए ऍनी, घरकोंबड्यासारखी आतच काय बसून राहिली आहेस? बाहेर ये जरा ऊन खायला..." जोसेफ म्हणाला...
"नको रे.. माझं ना जरासं डोकं दुखतंय आणि या खोलीत मस्त गार वाटतंय. मी इथेच थांबते थोडा वेळ" ऍनी म्हणाली.
"मि. होम्स आता तुम्ही काय करणार आहात?" पर्सीने विचारलं
"हम्म्म आजच्या प्रकाराच्या नादात आपण आपल्या मुख्य विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मि. पर्सी तुम्ही आज आमच्याबरोबर लंडनला येऊ शकाल का?"
"आत्ता लगेच?"
" नाही पण साधारण एका तासाभरात चालेल ना?"
"मला बरीच हुशारी वाटतेय. माझी तुम्हाला काही मदत होण्यासारखी आहे का?"
"हो. खूप मदत होणार आहे..."
"मग मला आज रात्री लंडनलाच रहावं लागेल का?"
"हो मी आत्ता तेच सुचवणार होतो"
"चालेल. म्हणजे आज रात्री माझ्या मारेकऱ्याला मी गुंगारा देणार तर. अगदी चालेल.जसं तुम्ही म्हणाल तसं करूया. माझ्याकडे लक्ष द्यायला जोसेफलाही घेऊया का बरोबर?"
"नको नको. तुमची काळजी घ्यायला आपला वॉटसन आहेच! तो डॉक्टर आहे माहितेय ना तुम्हाला... आपण असं करू दुपारचं जेवण इथेच उरकून घेऊ आणि लगेच निघू. चालेल ना?"
त्याने जसं सांगितलं त्याप्रमाणेच सगळी व्यवस्था करण्यात आली. ऍनीने होम्सच्या सांगण्याप्रमाणे डोकेदुखीची सबब सांगितली आणि ती तिथेच थांबली. होम्सच्या या वागण्याचा अर्थ माझ्या काही लक्षात आला नाही. अर्थात त्याला काही कारणाने पर्सीला ऍनीपासून दूर ठेवायचं असल्यास नकळे. पर्सी मात्र बराच आनंदात दिसला. तो स्वतः आम्हाला जेवायला घेऊन गेला.
पण होम्सच्या वागण्याचा अर्थ मला लावता येत नाही हेच खरं. कारण तिथून निघाल्यावर त्याने जे केलं ते आणखी चमत्कारिक होतं. स्टेशनपर्यंत गेल्यावर त्याने आम्हाला ट्रेनमधे बसवून दिलं आणि मग अगदी शांतपणे तो आम्हाला म्हणाला की तो वोकिंगमधेच थांबणार आहे.
"पण मग आपल्या लंडनमधल्या कामाचं काय होणार?" पर्सी वैतागून म्हणाला
"त्याचं काय करायचं ते आपण उद्या बघू. पण सध्या माझं इथे एक तातडीचं काम आहे.."
"ब्रायरब्रीला माझा निरोप पोहोचवाल का? मी उद्या येतो म्हणावं..." गाडी सुटतासुटता पर्सी म्हणाला.
"मी ब्रायरब्रीला जाणार नाहीये. अरे हो. एक राहिलंच. मि. फेप्स तुम्ही आज रात्री ब्रायरब्रीला नसणं हे मला मोठंच उपकारक होणार आहे. वॉटसन, लंडनला पोचल्यावर लगेच तू मि. फेप्सना आपल्या बेकर स्ट्रीटवरच्या घरी घेऊन जा. त्यांना रात्री आपल्या गेस्टरूम मधे झोपायला सांग. मी उद्या सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी घरी येतो." होम्स उत्तरला आणि हात हलवत त्याने आमचा निरोप घेतला.
आमच्या लंडनपर्यंतच्या प्रवासात मी आणि पर्सीने यावर बराच खल केला पण या नवीन कोड्याचं गूढ काही केल्या आम्हाला उलगडलं नाही.
"मला वाटतं काल रात्रीच्या चोरीबद्दल काहीतरी शोधून काढायला ते गेले असावेत. माझी खात्री आहे की तो चोर कोणी साधासुधा चोर नव्हता."
"मग तो कोण असावा असं तुला वाटतंय?"
"तुला कदाचित असं वाटेल की मला आलेल्या अशक्तपणामुळे मला भास होताहेत पण मला असं वाटतंय की माझ्याविरुद्ध कुठलातरी मोठा राजकीय कट रचला गेला आहे आणि आता त्या लोकांचा मला मारायचा बेत आहे. नाहीतर तो चोर एका बेडरूमच्या खिडकीतून आत का घुसला जिथे त्याला चोरण्यासारखं काहीच सापडणार नव्हतं आणि त्यात भर म्हणजे त्याने तो मोठा सुरा का बरं बरोबर आणला असेल?"
"ती कुलूप तोडायला वापरलेली कानस वगैरे तर नव्हती ना?"
"नाही रे... तो एक मोठा सुराच होता. त्याचं हे एवढं थोरलं पातं मी अंधारात चमकताना पाहिलंय"
"पण कोण मागे लागलंय तुझ्या इतकं हात धुवून?"
"तेच तर कळत नाहीये ना..."
"जर होम्सलाही असंच वाटत असेल तर त्याचा निर्णय योग्यच असणार. काल रात्री तुझ्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याला रंगे हाथ पकडण्यासाठीच तो मागे थांबला असेल. त्या माणसाला पकडता आलं तर तुझी हरवलेली कागदपत्रं परत मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे कारण असं समजणं वेडेपणाचं ठरेल की तुला दोन वेगवेगळे शत्रू आहेत ज्यातला एक तुझ्याकडे चोरी करतो आणि दुसरा तुला मारण्याचा प्रयत्न करतो."
"पण मि. होम्स तर ब्रायरब्रीला परत जाणार नाहीयेत ना?"
"मी त्याला चांगला ओळखतो. तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय तो असं काहीतरी करणार नाही."
मग आम्ही इतर बऱ्याच विषयांवर चर्चा केली. पण तो दिवसच काहीतरी विचित्र उगवला होता. नुकताच आजारातून उठलेला असल्याने फेप्स अजूनही बराच अशांत मनस्थितीत होता. शिवाय त्याच्या डोक्यावर घोटाळत असलेली चिंतेची तलवार त्याला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे विषयांतराचे माझे सगळे प्रयत्न फोल ठरवून तो पुन्हा पुन्हा ते भेंडोळं, होम्स आता काय करेल, उद्या सकाळी आपल्याला काय बातमी ऐकायला मिळेल, लॉर्ड होल्डहर्स्ट काय करतील याच विषयांवर चर्चा करत बसला होता. जसजशी संध्याकाळ झाली तसा त्याला या सगळ्याचा त्रास होऊ लागला.
"तुझा होम्सवर पूर्ण विश्वास आहे?"
"मी त्याला याहीपेक्षा अवघड परिस्थितीतून बाहेर पडताना पाहिलंय..."
"पण इतक्या मोठ्या गोष्टी पणाला लागल्या होत्या का?"
" ते सांगता येणार नाही पण युरोपातील तीन प्रतिष्ठेच्या राजअघराण्यांसाठी त्यानं काम केलं आहे. "
"हम्म. त्यांच्याकडे बघून कुठल्याच गोष्टीची कल्पना पण येत नाही... ते काही म्हणाले का तुला?"
"नाही."
"हे आणखी वाईट आहे.."
"उलट हेच चांगलं आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचा माग त्याच्या हातून निसटतो तेंव्हा तो त्याच्याबद्दल बोलतो पण जर त्याच्या हाती विशेष असं काही लागलं असलं तर तो त्याबद्दल एक शब्दही उच्चारत नाही. तेंव्हा माझा तुला असा प्रेमाचा सल्ला आहे की तू आता जाऊन शांतपणे झोप. उद्या सकाळी सगळी रहस्यं उलगडतीलच ना..."
मी कसबसं त्याला झोपायला पाठवून दिलं. पण त्याच्या सध्याच्या मनस्थितीत त्याला झोप लागणं अवघडच होत हे मला माहीत होतं. त्याचा गुण मलाही लागला की काय नकळे पण मलाही रात्री नीट झोप लागली नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करत मी काय झालं असेल याच्या शक्यतांचा विचार करत होतो आणि त्या सगळ्याच एकापेक्षा एक अशक्य कोटीतल्या होत्या.रात्रभर मी या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिलो.
सात वाजता मी उठून खाली आलो. पाहतो तर पर्सी रात्रभरच्या जाग्रणाने अगदी लोळागोळा होऊन बसला होता. मला पाहून त्याने पहिला प्रश्न विचारला "मि. होम्स आले का?"
"त्याने सांगितलंय ना तो आठ वाजता येईल.. मग ओ बरोब्बर आठ वाजता येईल."
--अदिती

Labels: ,

1 Comments:

Blogger sahyoge said...

mis adit.i.... tumcha lihilele sarv ch uttam aahe. pan.. tumhi jya shetrat aahat tya shetra che kahi lekh liha..

5:32 PM  

Post a Comment

<< Home