पुस्तकायन

Sunday, May 03, 2009

कल्पवृक्ष


मला आठवतही नाही तेंव्हापासून मी गाणी ऐकतेय. 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' पासून ते 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' पर्यंत अनेक गाण्यांनी माझं बालपण सजवलं. गीतरामायणातलं 'सेतू बांधा रे सागरी' ऐकायला खूप आवडायचं. 'देवहो बघा रामलीला ,भूवरी रावणवध झाला' हे गाणं मी 'देवहो पहारा मलीला भूवरी रावणवध झाला' असं म्हणत असे. हे ऐकून बाबांना जाम हसू यायचं पण त्यात काय मोठ्ठा विनोद झाला आहे हे काही माझ्या लक्षात येत नसे. हळूहळू ही सगळी गाणी लिहिणाऱ्या जादुगाराचं नाव ग दि माडगूळकर आहे ही माहिती मिळाली. मी शब्दांशी खेळायला सुरुवात खूप उशीरा केली त्यामुळे गदिमांच्या शब्दांचं गारुड माझ्या मनावर व्हायला अंमळ उशीरच झाला. पण गोरी गोरी पान मुळे मी त्यांच्यावर एक्दम खूश होते हे खरंच. नंतर मात्र, 'असा बालगंधर्व आता न होणे' पासून ते अगदी 'मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड' पर्यंत त्याची अगणित कविता - गाणी ऐकून किती साध्या शब्दात ते किती सहजतेने प्राण ओतत असत हे जाणवलं. त्यांचं लेखन वाचणाऱ्याला फार सोपं पण लिहायला अवघड आहे हे ही जाणवलं. 'जोगिया' कविता वाचल्यावर तर त्यातल्या शब्दांचा अर्थ समजण्याच्याही आधी त्यातल्या शब्दांच्या नादमाधुर्याने मला मोहिनी घातली.

या शब्दप्रभूची जडणघडण कशी झाली असेल याबद्दल मला आदरमिश्रित कुतूहल वाटायचं. इकडेतिकडे वाचलेले त्यांच्याबद्दलचे लेख, प्रतिसरकार - बेचाळीसच्या आंदोलनातला त्यांचा सहभाग, 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' चा उल्लेख , अनेक वर्षांपूर्वी वाचलेला आणि लक्षात राहिलेला गदिमांचाच 'हॅलो मिस्टर डेथ' हा लेख वगरे गोष्टींमधून काही तुकडे मिळत होते. अलिकडेच विद्या माडगूळकरांचं आत्मचरित्र वाचलं तेंव्हा गदिमांबद्दल बरंच काही समजलं. तरीसुद्धा हे सगळं कडेकडेनेच चाललं होतं असं वाटायचं. पण परवा गदिमांचंच वाटेवरल्या सावल्या हे पुस्तक वाचलं तेंव्हा या शब्दप्रभूची घडण त्याच्याच शब्दांत वाचायला मिळाली.

एका दिवाळी अंकात लिहिलेला बालपणाबद्दलचा प्रदीर्घ लेख आणि एका मासिकातली लेखमाला यांचं हे पुस्तकरूप संकलन. पण वाचताना तसं जाणवतही नाही. पुस्तक वाचून झाल्यावर जाणवते ती परमेश्वर नावाच्या एका वेड्या कुंभाराची गदिमा नावाचा एक मातीचा गोळा हाती घेऊन, त्याला अमृतकुंभाचा आकार देऊन जीवनरूपी भट्टीत रसरशीत तापवून पक्कं भाजून काढण्याची कारागिरी! आता कुंभारच परमेशवरासारखा सर्व प्रतिभेचा धनी म्हटल्यावर हा अमृतकुंभ अमृताने कसा ओतप्रोत भरला आणि अक्षय उरला हे सर्वश्रुतच आहे. आपल्याकडे कडू पाने असणाऱ्या निंबाला त्याच्या दैवी गुणांमुळे अमृतवृक्षाची उपमा दिली जाते. गदिमा हा असा निंबवृक्ष होता ज्याची पानेफुलेफळे मुळीच कडू नव्हती. ती अमृताचाच वर्षाव करीत असत. जणू काही कल्पवृक्षच! घडणीच्या काळात गदिमांनी जितकी आग पचवली तितक्याच सुखद शब्दचांदण्याचा वर्षाव त्यांनी नंतरच्या आयुष्यात केला.

डावखुरी माणसं तशी आपल्याकडे दुर्मिळच. त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रभावी असल्यामुळे त्यांची प्रतिभा वेगळीच आणि अनपेक्षित उंची गाठताना बरेच वेळा दिसते. शिवाय आपल्याकडे मारून मुटकून सर्व व्यवहार उजव्या हातानेच करायचा दंडक असल्याने या डावखुऱ्या लोकांना काही अंशी सव्यसाचित्व प्राप्त होत असावं. गदिमांच्या मातुःश्री डावखुऱ्या होत्या. जात्यावर बसल्याबसल्या त्या सहज ओव्या रचीत असत. शब्द आणि अर्थचमत्कृतींनी भरलेले अनेक म्हणी - वाक्प्रचार त्यांना मुखोद्गत होते असं गदिमांनीच कुठेतरी लिहून ठेवलंय. अशा मातेकडून गदिमांना कवित्वाचा, प्रसादगुणाचा आणि सहज साधं पण कसदार साहित्य निर्माण करण्याचा वारसा मिळाला. वडील बिचारे स्वभावाने गरीब आणि चाकरमाने. घरच्या कुलकर्णीपदापेक्षा पंतसचिव सरकारकडे कारकुनाची नोकरी करून प्रपंचाला हातभार लावणे त्यांना अधिक योग्य वाटले. पण वडील स्वभावाने अत्यंत प्रेमळ होते. शालेय वयात , कागद हवेत म्हणून हटून बसलो असताना आपल्याकडे लक्ष दिले नाही म्हणून कचेरीत सर्वांसमक्ष तिथला रूळ उचलून गदिमांनी वडिलांना मारले होते. आता वडील आपला चांगला समाचार घेणार अशा भीतीने घाबरून घरी स्वयंपाक करून ठेवला होता. वडिलांना मात्र तो रूळ स्मरणात देखील नव्हता. उलट मुलाने स्वयंपाक केला याचेच कोण कौतुक! गदिमांच्या बिटाकाकाने मात्र एकदोनदा त्यांना चांगला चोप दिला होता. मग त्यांच्या मातेने दिराची चांगली कानउघडणी केली होती. पण या काकाचा आपल्या पुतण्यावर फार जीव होता. या काकाबद्दल गदिमांनी अगदी गहिवरून लिहिले आहे. हा काका , काका व्हायच्या ऐवजी मोठा भाऊच झाला असता तर बरे झाले असते असेही त्यांनी लिहिले आहे.

त्यांच्या वडिलांची आई वेडी होती. म्हणजे ती स्वतःच स्वतःशी बडबडायची आणि आपल्या सुनेला घाबरायची. पण तिचेही गदिमांवर फार प्रेम होते. त्यांचे आजोबा म्हणजे माडगूळचे वतनदार कुलकर्णी. अंगाने चांगलेच भारदस्त. घोड्यावर मांड ठोकून फिरायचे तेंव्हा लोक घाबरायचे, त्यांची पंचक्रोशीत बाबा बामण या नावाने ख्याती होती. आपली जरब आपल्या अपत्यांपैकी कुणाकडेच नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना लौकर एक नातू हवा होता. कुलकर्णीपदाला वारस म्हणून. आजोळचे आजोबा म्हणजे शेजारच्या शेटफळे गावचे. या गावात कुलकर्णीपदावर माणूस टिकत नसे. नवा माणूस नेमला की वर्षाच्या आत त्याचा खून होत असे. अशा परिस्थितीमध्ये शेजारधर्म म्हणून गावचं कुलकर्णीपण करणाऱे हे दुसरे आजोबाही अगदी धीराचेच होते. या अशा सर्व व्यक्तिमत्वांकडून अनेक गुणावगुणांचा मिळालेला वारसा पेलून, जपून त्याला आपलं असं रूप देऊन गदिमा घडले. औंध संस्थानात आडबाजूला असलेल्या माडगूळच्या सातारी बाजाच्या मातीवर पोसलेल्या गदिमांवर या मातीचे संस्कार खोलवर झाले.

आपल्याला आपल्यासारखाच खमका नातू व्हावा अशी इच्छा असलेल्या आजोबांनी पहिली नात झाल्यावरही आशा सोडली नाही. उलट त्या नातीला ते विठ्ठलपंत अशी हाक मारत असत. दुसरा नातू जन्मतःच देवाघरी गेला. तिसऱ्या खेपेला आजोबांची गाठ गदिमांशी पडली आपल्या मिस्कील स्वभावाची चुणूक पाळण्यात पडायच्याही आधीपासून दाखावायची म्हणून की काय पण गदिमा रडलेच नाहीत. याही खेपेला अपयश आलेले पाहून, त्या नवजात बाळाला पुरायला जमिनीत खड्डाही खणला होता. ऐन वेळी सुईणीला सुबुद्धी झाली आणि तिने एक जळता निखारा बाळाच्या बेंबीजवळ नेला. बाळाने एकदम टाहो फोडला. आजोबांची इच्छा अखेरीस पूर्ण झाली. त्यांना तिन्ही लोकी झेंडा लावणारा त्यांच्यासारखा गुंडा नातू मिळाला. त्या वेळी त्या सुईणीला बुद्धी झाली नसती तर काय झाले असते या विचारानेही काळजाचा थरकाप होतो. पण नातू झाला मूळ नक्षत्रावर. केलेली शांत फळली नाही आणि दीड वर्षाच्या आत आजोबा देवाघरी गेले.

आजोबांबरोबर घरातील चांगली परिस्थितीही संपली. घरात वेडी आजी, बिटाकाका, आई, आक्का आणि गदिमा. वडील औंध सरकारच्या नोकरीत कुंडलला. लाडाकोडाचा नातू म्हणून गदिमा विलक्षण हट्टीपणा करत असत. मनाला येईल त्या गोष्टीचा हट्ट घ्यायचा आणि तो पुरा होईपर्यंत शांत बसायचे नाही अशा प्रकाराने त्यांनी घरातल्याच काय पण शेजारपाजारच्याही लोकांना सळो की पळो करून सोडले होते. घराच्या अंगणात बसून आक्काबरोबर मोठमोठ्याने 'बाळ गंगाधर टिळक!' असे ओरडण्याचा खेळ खेळणाऱ्या बाल गदिमांचे वर्णन डोळ्यासमोर अगदी चित्र उभेच करते आणि हसू आल्याखेरीज राहत नाही. मानेवर गळवे होणे, खांबावर धडकल्याने ती फुटणे, अवजड ट्रंक उचलायच्या नादात पायाला जखम होणे, ती चिघळणे असे अनेक 'पराक्रम' गदिमांनी या काळात केले. ही पायावरची जखम चिघळलेली असताना रात्री उखळ भरून तूपसाखर खायचा हट्ट करण्याचा प्रसंग वाचताना गदिमांच्या मातेची या सगळ्यात किती तारांबळ उडत असेल याचा विचार येऊन खूप वाईट वाटले. रात्री अपरात्री उठून भलभलते हट्ट करणाऱ्या मुलाच्या मागण्या त्या माऊलीने न थकता पुरवल्या. त्या फंदात तिलाही अनेकदा अपघात झाले. जखमा झाल्या.

आटपाडीजवळच्या गावी वडिलांकडे असताना, घरासमोरच्या ओढ्याच्या डोहात गदिमा बुडाले. त्यांना बिटाकाकाने आणि घरमालकाने शिताफीने वाचवले. हा प्रसंग लिहिताना त्यांनी घराच्या बुरुजामध्ये पिंपळाखाली कसलेसे देऊळ होते असा उल्लेख केला आहे. नुकतीच मुंज झालेल्या मुलाला पिंपळासमोरच्याच डोहात बुडून मृत्यू आल्यातच जमा होता हा संदर्भ वाचला की उगाचच काहीतरी गूढ वाटतं. आपल्या घरी जेवायला आलेल्या एका दशग्रंथी ब्राह्मणाने, तुझ्या मुलाच्या रूपाने तुझा कर्तृत्ववान पूर्वज तुझ्या पोटी आला आहे तेंव्हा त्याला कधीही मारू नकोस असे आपल्या आईला सांगितल्याचाही यात उल्लेख आहे. खरेखोटे देवाला ठाऊक, पण जन्माने त्रिज असणाऱ्या गदिमांच्यामध्ये काहीतरी विलक्षण असणार खासच असं वाटत राहतं.

अक्षरओळख, आधी वांडपणामुळे शाळेकडे केलेलं दुर्लक्ष, नंतर मात्र अभ्यासाची, विशेषतः पुस्ती काढण्याची लागलेली गोडी, घटवून सुंदर केलेले हस्ताक्षर, वर्गातल्या मुलांच्या गमतीजमतीही अधूनमधून वाचायला मिळतात. देव भक्तावर प्रसन्न होऊन त्याला खूप संपत्ती देतो अशा आशयाची एक कथा एकदा त्यांच्या वाचनात/ऐकण्यात आली. आपल्यावरही अशी कृपा व्हावी आणि घरातली पैशाची चणचण मिटावी अशा आशेने मारुती, विष्णू , शंकर इ. मातब्बर मंडळींकडे वशिला लावल्याचं त्यांनी लिहिलं आहे. मूळ कथा अरबी असल्यामुळे, अरबांचा म्हणजे मुसलमानांचा देव - अल्ला , याच्याकडे अशी कृपा करायची काहीतरी सिद्धीबिद्धी असणार असा अंदाज बांधून , आसपास कोणी नाही असे बघून गावातल्या मशिदीलाही आपण बाहेरून एक नमस्कार ठोकत होतो असेही गदिमांनी लिहिले आहे ते वाचताना फारच गंमत वाटली.

यानंतर मात्र घरातली आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली. आक्काच्या लग्नात वडिलांना कर्ज झाले. अनेक प्रयत्न करूनही बिटाकाका सातवीची परीक्षा पास होऊशकला नाही त्यामुळे त्याच्याही नोकरीचे काम होईना. घरातली खाणारी तोंडे वाढल्यामुळे वडिलांच्या पगारात घरखर्च चालणे अवघड होऊन बसले. तशातच वडिलांची कुंडलला बदली झाली. अठराविश्वे दारिद्र्य मराठी साहित्याला नवे नाही. साधारण गेल्या दीडेकशे वर्षांमध्ये अशा दारिद्र्यातून बाहेर पडायचं हाच विचार अनेक चरित्रनायकांना जगायची ( आणि म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची! ) प्रेरणा देत आला आहे असं दिसतं. उणीव असते तेंव्हाच जाणीव निर्माण होते असं माझी आई नेहमी म्हणते. ही जाणीव चांगली जोरकसपणे निर्माण व्हावी इतपत उणीव तेंव्हा गदिमांच्या घरात होती. तिचं वर्णन वाचताना डोळ्यांत पाणी येतं. घर म्हणून घेतलेली जागा जेमतेम एका खोलीची. त्यात अक्षरशः कोंड्याचा मांडा करून जगणारे कुटुंब, त्यांची गावात होणारी अवहेलना, मुलांचा अंगावर कोट नाही म्हणून मास्तरांनी दिलेला चोप घरी सांगणार कसा ही विवंचना, त्यात प्लेगाची साथ, वडिलांचा दमा हे सगळं वाचताना खरंच रडू फुटतं.
पण याच काळात गावाबाहेर खेळताना शेजारच्या किर्लोस्करवाडीला कधीतरी पाहिलेलं नाटक खेळायचा विचार गदिमांच्या डोक्यात आला. सगळे सवंगडी या नव्या खेळाला तयार झाल्यावर गदिमांनी रामायण - महाभारत - पुराणांमधले प्रसंग घेऊन हाहा म्हणता संवाद लिहिले आणि ते बसवून नाटक नाटक खेळताना आलेली गंमत मनोरंजक आहे. पुराणातले प्रसंग कमी पडायला लागल्यावर त्यांनी सद्यस्थितीवरही संवाद लिहिले होते. त्यातले काही गुपचूप एका मासिकात पाठवल्यावर छापूनही आले होते. शाळेच्या नव्या इमारतीत हट्टाने एक स्टेज बांधून औंध सरकारांसमोर गडकऱ्यांचे एक नाटकही (बहुधा राजसंन्यास ) या मुलांनी सादर केले होते. गावातल्या एका नाटकवेड्या माणसाने हे नाटक बसवले होते. पण शेवटच्या अंकात स्टेजवर मरून पडलेले एक पात्र पडदा पडला असे समजून पददा पडायच्या आधीच उठले आणि त्या अतिकरुण प्रसांगाचा अतिविनोदी प्रसंग मात्र झाला. आपण नट व्हावे आणि अभिनय अरावा ही ओढ बहुधा या प्रसंगापासूनच त्यांच्यात निर्माण झाली. पुढे त्यांच्या पहिल्यावहिल्या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांनी "गडकऱ्यांचा वारस आज आपल्याला लाभला आहे, त्याचं नाव गजानन दिगंबर माडगूळकर! " अशी ओळख करून दिली होती तो प्रसंग वाचताना गडकऱ्यांचे संस्कार इतक्या लहान वयापासून त्यांच्यावर झाले होते हे नकळत आठवलं. त्याच प्रसंगी, लोकांनी आग्रह केल्यावर, "माझ्यात आणि गडकऱ्यांच्यात एकच साम्य आहे ते म्हणजे आम्ही दोघेही सभेत भाषण करायला फार भितो! " असे हजरजबाबी उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली होती .

हे सगळे वर्णन एका दीर्घलेखातले आहे त्यामुळे त्यात आणखी तपशील वाचायला मिळाले असते तर किती मजा आली असती असेही वाटते. वेड्या आजीचा दारुण मृत्यू, त्यानंतर आजारपणामुळे मृत्यूच्या दारात उभी असलेली आई आणि स्वतः गदिमांचे जिवावरचे आजरपण या रडू फोडणाऱ्या आणखी काही जागा. कडक शिस्तीमुळे ज्या मुख्याध्यापकांची त्यांच्या पाठीवर टिंगल चाले त्याच मुख्याध्यापकांनी स्वतः सायकलवरून किर्लोस्करवाडीला जाऊन गदिमांसाठी औषध आणले. अशाच कडू गोड आठवणींमध्ये बालपणीचीहकीगत संपते आणि सुरू होतो तो चित्रपटक्षेत्रातला उमेदवारीचा प्रवास.

हा प्रवास मात्र फारफार रंजक आहे. ब्रह्मचारी चित्रपटात गदिमांनी एक्स्ट्रॉ म्हणून इतक्या भूमिका केल्या आहेत हे वाचल्यावर तो चित्रपट पुन्हा एकदा नीट बघायची इच्छा निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या एका वाण्याच्या दुकानात रात्रापुरती अंग टाकायची सोय आणि एक अंगावर एक दोरीवर अशी एकच कपड्यांची जोडी एवढ्या भांडवलावर ब्रह्मचारी चित्रपटापासून गदिमांनी आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. कुठल्याही उमेदवाराला करावी लागते तशी गर्दीतला एक ते ग दि माडगूळकर इथपर्यंतची वाटचाल खडतरच होती. ( इथे नकळत पुलंची त्यांच्याशी तुलना करावीशी वाटते. गदिमांच्या मानाने पुलंचं बालपण आणि एकूणच आयुष्य सुखवस्तू असावं किंवा पुलंनी आपले पैशाचे हाल फारसे कुठे बोलून दाखवले नसावेत. पण चरित्रनायकांची वगरे टिंगल करण्याइतकी विनोदबुद्धी बाळगून असणाऱ्या पुलंच्या बाबतीत पहिलीच शक्यता जास्त असं मला का कोण जाणे पण वाटतं.... तशीही पुलंनी चित्रपटक्षेत्रात उमेदवारी केली नसावी. नाटकात केली. ते कॉलेजपासून विलक्षण लोकप्रिय होते. त्यांचं शिक्षणही पूर्ण झालं. गदिमांना कॉलेजचं शिक्षण घेता आलं नाही याबद्दल खंत वाटे. एकूण परिस्थितीने पुलं माडगूळकरांपेक्षा उजवेच वाटतात. )

चित्रपटसृष्टीत शिरकाव करून घेतला खरा पण जिचं श्रेय मिळू शकेल अशी एकही भूमिका त्यांना मिळाली नाही. बाबूराव पेंढारकरांसारख्या लोकांचा कृपाप्रसाद मात्र मिळाला. अत्र्यांचा सहवास मिळाला. अत्रे किती सहज आणि सोपी गाणी लिहित ते जवळून बघायला मिळाले. चालीत बांधायला सोपी आणि सहज गुणगुणता येतील असे शब्द असलेली गाणी लिहिण्यासाठी गदिमांनी प्रयत्न केले. आपली शैली बदलली. अक्षर सुरेख असल्यामुळे चित्रपटाच्या पटकथेची कॉपी करायचं काम मिळालं. हळूहळू वर्तमानपत्रांत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी द्यायचे लेख लिहायची संधी मिळू लागली. आधी हा सगळा उद्योग हौशी नट या सदरात असल्यामुळे मोबदल्याच्या नावाने 'पूज्य' असला प्रकार होता. पुढे बाबूराव पेंढारकरांनी चित्रपट कंपनीला ( बहुधा हंस पिक्चर्स ) सांगून पगार देण्याची व्यवस्था करवली. तोवरशि कवण्या करून पैसे मिळवावे लागले. लेखनाचं काम वाढल्यावर गदिमांनी 'आपल्याला एक लेखणी मिळावी ' अशी बाबूरावांकडे विनंती केली. बाबूरावांनी तात्काळ आपल्या खिशाला लावलेले सोन्याचा मुलामा दिलेले पेन काढून दिले. हा प्रसंग वाचताना अंगावर एकदम रोमांच उभे राहतात. कोल्हापूर शहराच्या पावसाळ्याचा काही भरोसा नसल्यामुळे सकाळी भिजत दोन तीन मैल चालत स्टुडिओत जायचे आणि रात्री तसेच भिजत परतायचे असा दिनक्रम चाललेला पाहून बाबूरावांनीच कंपनीच्या नोकराला सांगून एक नवी छत्री गदिमांना देववली.

सुंदर हस्ताक्षरामुळे साक्षात वि. स. खांडेकरांकडे लेखनिक म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यांची पटकथा लिहायची पद्धत मुळातून समजून घेता आली. याच सुमारास राम फडके नावाच्या एका तरूण गायकाशी गदिमांची घट्ट मैत्री जमली. पुलंचीही ओळख साधारण याच सुमारास झाली असावी. पुलं तेंव्हा कॉलेजात असल्याचा उल्लेख आहे. भावी पिढ्यांना आदर्श ठरणारा एक कथा-पटकथा-संवादकार आणि सिद्धहस्त कवी जन्माला घालण्यासाठी जणू काही 'द होल युनिव्हर्स कॉन्स्पायर्ड टुगेदर!' गरिबीतही कविता जगायला बळ देत होत्या. लेखणीची नेट प्रॅक्टिस चांगलीच जोरात सुरू असल्यामुळे हळूहळू ती सिद्धहस्त होत होती. अशाच एका चित्रपटासाठी लिहून दिलेला पोवाडा अकून एच एमव्ही या मतब्बर कंपनीकडून गाणं लिहून देण्याबद्दलची विचारणा झाली. गदिमा- एचएमव्ही प्रवास सुरू झाला. विश्राम बेडेकरांबरोबर दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम करताना त्याच चित्रपटासाठी गाणीही लिहायला मिळाली. एक नाटक रंगभूमीवर आलं. हा सगळा प्रवास खडतर खराच पण तो आश्वासक वाटतो आणि म्हणूनच स्वप्नवत सुद्धा. व्ही शांतारामांसारख्या माणसाबरोबर रामजोशी हा चित्रपट करायला मिळाला आणि गदिमांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या गाडीने पहिला गियर सोडून दुसरा गियर टाकला. वंगण घालून ओव्हरॉयलिंग केलेल्या गाडीसारखी तिने जोमाने जी वाटचाल सुरू केली ती नंतर कधीच न थांबण्यासाठी. हे सगळं वाचताना आपण जादूच्या गालिच्यावरून वेगाने चाललो आहोत आणि खाली घडणाऱ्या घटना थक्क होऊन पाहतो आहोत असंच वाटत राहतं.

हे लेखन एकोणीसशे पन्नास पंचावन्नच्या सुमारासचं असावं असा माझा अंदाज आहे. 'वेदमंत्राहून आम्हा ' पाशी येऊन हा प्रवास संपतो. तो कदाचित आयुष्याच्या रंगमंचावर पुढचे प्रसंग घडायचे होते म्हणून संपला असेल. पण एका अर्थाने गदिमांची मेकिंग इयर्स तिथे संपली आणि हातखंडा प्रयोग सुरू झाले तिथे हा प्रवास संपला आहे. 'द इयर्स ऑफ सफरिंग वेअर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ कॉझ दे मेड मी हू आय ऍम टुडे' असं लिटल मिस सनशाईन सिनेमातलं एक वाक्य आहे. ते किती खरं आहे हे अनुभवाने पटतंच. त्या मापाने गदिमांच्या बेस्ट डेज चा हा आलेख फारच छान उतरला आहे. अत्यंत साधेपणाने, कुठल्याही प्रसंगाचं उदात्तीकरण न करताना , एक सामान्य माणूस म्हणून त्या क्षणी आपल्या मनात काय विचार आले हे त्यांनी ज्या सहजपणे आणि तरीही समर्थपणे लिहिलंय त्याला तोड नाही. त्या अर्थाने स्वतःचा उदोउदो करणाऱ्या इतर आत्मचरित्रांपेक्षा हे पुस्तक एकदम वेगळं आणि जास्त खरं वाटायला लागतं.
माझ्या मस्ट रीड यादीत याचा क्रमांक वरचा आहे.

--अदिती

Saturday, January 17, 2009

गॉन विथ द विन्ड १: स्कार्लेट

खूप वर्षांपूर्वी, टी एन टी कार्टून नेटवर्क नावाच्या वाहिनीवर रात्री नऊ वाजता जुने अभिजात इंग्रजी चित्रपट दाखवलेजात असत. आता त्या चित्रपटांची नावंही नीट आठवत नाहीत. इंग्रजी कळायचा तर प्रश्न उद्भवत नसल्यामुळे फारकाही समजतही नसे. कारण मला फक्त शास्त्र - गणिताची सवय होती. पण त्या चित्रपटांची गुणवत्ता अजून डोक्यातपक्की बसलेली आहे. सर्वात जास्त परिणामकारक वाटायचे ते त्यांच्यातले ठळक, लक्षवेधक रंग. गोरे लोकचेहऱ्याला इतकी प्रचंड रंगरंगोटी का करत असावेत? चांगले गोरेपान तर असतात असा प्रश्न पडण्याइतपत त्यातलेरंग भडक वाटत असत. पण दूरदर्शनच्या पडद्यावर पडणारा पाऊस(तांत्रिक बिघाडांचा), रुकावट के लिये खेद है, नाहीतर लाल - निळ्या उभ्या पट्ट्याबरोबर येणारा टीऽऽऽऽऽऽ असा कर्णकर्कश्श आवाज याच गोष्टींची सवय होती. त्यामुळे टी एन टी वरच्या चित्रपटांचं चित्रीकरण अतिशय नेत्रसुखद वाटत असे. विशेषतः निसर्गचित्रण तर भुरळघालत असे. जुना डेनिस मेनेस, झीब्रा इन किचन वगरे काही चित्रपटांची नावे आठवतात. बाकीच्यांच्या फक्तप्रतिमा आठवतात. ( यर्लिंग सुद्धा मी इथेच पहिल्यांदा पाहिला. अर्थातच त्यात हुतो आजीलाच कापून टाकलंय हेसोडल्यास बाकी काहीच समजलं नव्हतं. अलिकडे पुन्हा पाहिल्यावर हे जाणवलं. ) टीएनटीवरच एक दिवस मीगॉन विथ विंड' हा चित्रपट पाहिला. चार तासांचा आणि बोलल्या जाणाऱ्या संवादांमधलं एक अक्षरही समजलेला, तरीही जागून पाहिलेला गॉन विथ विंड. अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणजे काय हे माहीतच नव्हतंत्यामुळे चित्रपटाची पार्श्वभूमीच कळली नाही. पण हिरव्या रंगाच्या पडद्याचा फ्रॉक शिवणारी स्कार्लेट आणिचेहऱ्यावरून पक्का बदमाश वाटणारा, कॅप्टन बटलर झालेला क्लार्क गेबल तेवढा आठवतो आहे. हा चित्रपटपाहिल्यापासून अशी खूप इच्छा होती की गॉन विथ विंड एकदा मुळातून वाचावं.

गॉन विथ विंड वाचताना पहिल्याच वाक्यात भेटलेली स्कार्लेट हारा ही आजवर मी वाचलेल्या सर्वपुस्तकांमधली, जिच्याशी माझी हेट अँड लव्ह रिलेशनशिप आहे अशी एकमेव व्यक्तिरेखा आहे. पुस्तकांच्याबाबतीत एक तर मला एखादं पात्र संपूर्ण आवडतं (म्हणजे त्याचा शेवटी विजय व्हावा असं वाटतं) नाहीतर मी त्यापात्राच्या विरोधी गटात असते. (अपवाद ब्रोकन ऍरो मधला जॉन ट्रव्होल्टा. ) कथा वाचताना कथेशी एकरूप झालंकी ती कथा पानांच्या द्विमितीतून माझ्या कल्पनेच्या त्रिमितीय विश्वात नकळत प्रवेश करते. प्रत्येक पात्रालापांढरा किंवा काळा रंग घ्यावाच लागतो. स्कार्लेट ने मात्र माझा गोंधळ उडवून दिला.

स्कार्लेट सुंदर नव्हती पण अतिशय रेखीव होती. हिरवेकंच डोळे, नाजूक छोटे हात, लालबुंद ओठ आणिहस्तिदंताशी स्पर्धा करणारा शुभ्र गोरा वर्ण असलेली स्कार्लेट विलक्षण आकर्षक होती. पण तिला सुंदर म्हणतायेणार नाही. 'ऋतुचक्र' मध्ये दुर्गाबाईंनी नारळाच्या फुलांचं अतिशय सुरेख वर्णन केलं आहे. नारळाची फुलंलाकडाच्या रंगाची आणि गुळगुळीत असतात. वरवर टणक वाटणाऱ्या त्या फुलांना ना रंग ना सुवास ना मधुसंचय. फूल म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येणाऱ्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध. स्कार्लेट मला अशीच वाटली. एखाद्याद्विमितीय निर्जीव चित्रासारखी. कारण तिच्याकडे फक्त सौंदर्याचे निकष असलेली रूपवैशिष्ठ्ये होती. बुद्धीही होतीपण माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण असलेलं 'वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ' होणारं मन मात्र तिच्याकडेनव्हतंच. कोमल भावना तिच्या ठायी प्रकट झाल्या तरी त्या कमालीच्या संकुचित असत. त्यात स्वार्थ बराच असे. याच आत्मकेंद्रित घमेंडखोर वृत्तीमुळे मला सुरुवातीला तिची चीड येत असे. पुस्तक पुढे सरकल्यावर मात्र तिच्यामनोधैर्याची कसोटी पाहणारे एकेक प्रसंग समोर येत गेले आणि हळूहळू ही चीड, हा वैताग मागे पडत गेला.

एलन आणि जेराल्ड 'हारा यांची स्कार्लेट ही सर्वात मोठी कन्या. जन्मतःच निरोगी आणि उत्साहानेसळसळणारी स्कार्लेट म्हणजे तारुण्य, श्रीमंती, ऐश्वर्य यांचं प्रतीकच होती.. ( कदाचित त्यामुळेच तिचं नाव स्कार्लेटठेवलं असावं. ) एलनचं व्यक्तिमत्त्व स्कार्लेटच्या पूर्ण उलट होतं. ती साक्षात कारुण्यमूर्ती होती. दीडशे वर्षांपूर्वीच्या, ख्रिस्ती धर्माची सर्व बंधनं जिवापाड पाळणाऱ्या जॉर्जियन समाजात एलन अक्षरशः प्रातःस्मरणीय ठरली होती. बहुधा प्रत्येकालाच मनातून आपण एलनसारखं असावं (किंवा आपण एलनसारखेच आहोतच! मेंटल सेल्फप्रोजेक्शन!!! )असं वाटत असावं. प्रत्यक्षात असतो मात्र आपण स्कार्लेटसारखे! आई आणि कृष्णवर्णीय मॅमी यांनीस्कार्लेटच्या अडेलतट्टू आणि पराकोटीच्या हट्टी स्वभावाला मुरड घालायचा शक्य तितका प्रयत्न केला होता. एलन फ्रेंच उमराव घराण्यातली असल्यामुळे त्या समाजाचे सर्व शिष्टाचार तिच्या अंगी बाणलेले होते. उमरावघराण्याच्या आपल्या मुलींकडून (आणि पर्यायाने सुनांकडूनही) त्यांनी अगदी मृदू असावं, मोजून मापून वागावं - बोलावं, देवाला घाबरून असावं, सर्वच बाबतीत नाजूक असावं (पावलोपावली चक्कर येऊन पडावं, स्मेलिंगसॉल्टची बाटली सतत घेऊन हिंडावं लागेल इतकं नाजूक असावं! ) अशा ठराविक अपेक्षा असाव्यात. टेरालाशेतावरच्या निग्रो गुलामांच्या मुलांशी खेळणाऱ्या, वाऱ्यावर उंडारणाऱ्या आणि खाली मान घालून शिवणटिपणकरण्यात धन्यता मानता मनाला येईल तेच करणाऱ्या स्कार्लेटने मात्र याला संपूर्णपणे चाट दिली होती. मुलींनीकायम अंग चोरून कोपऱ्यात राहावं, पुरुष माणसं जे सांगतील त्याला फक्त मान हालवावी आणि आयुष्यभरखालमानेनं वागावं अशा अपेक्षा या वैश्विक असाव्यात असं वाटायला लागलं मला तर. अर्थात एलनकडून तिनेसहृदयतेचे आणि नीतीमत्तेचे संस्कार घ्यायला काहीच हरकत नव्हती म्हणा. पण स्कार्लेटने मात्र वडिलांचारेम्याडोक्या आयरिश उद्दाम स्वभाव नेमका उचलला होता. एलन आणि मॅमी यांचे संस्कार आणि बंधनं वरवर यास्वभावाला झाकून ठेवत असली तरी आणीबाणीच्या, संघर्षाच्या प्रसंगी स्कार्लेटचा हाच स्वभाव उचंबळून येत असे. अर्थात जेराल्डकडेही नसणारा अतिशय अप्पलपोटा आत्मकेंद्रित स्वभाव स्कार्लेटकडे कुठून आला हे मात्र माहीतनाही. कदाचित सर्वांना सामावून घेण्याच्या, स्वभावाला मुरड घालण्याच्या, भावंडांबरोबर मिळून मिसळूनराहण्याच्या मध्यमवर्गीय मराठी संस्कारांना स्कार्लेटचं वागणं छेद देत असल्यामुळेही मला ते खटकलं असेल. पणते खटकलं हे तर खरंच.

स्कार्लेटची कंबर अक्षरशः वीतभर होती. आसपासची सर्व तरूण मुलं तिच्यासाठी वेडी झालेली होती. घमेंडखोरस्वभाव आणि वडिलांच्या श्रीमंतीचा गर्व यामुळे तिचं कुठल्याच मुलीशी कधी पटलं नाही. अगदी सख्ख्याबहिणींशीही नाही. युद्धानंतर टेरा सांभाळताना केवळ बहिणींच्या अंगात 'हारांचं रक्त आहे आणि त्यांना आजोळीपाठवणं म्हणजे 'हारा कुळाला कमीपणा आहे असं समजून तिने बहिणींना सांभाळलं. तरीही वेळ पडल्यावरफ्रँक केनेडीचं धाकट्या बहिणीशी - सुएलनशी ठरलेलं लग्न खोटं बोलून तिने मोडलंच. नुसतं मोडलं नाही तरस्वतःच त्याच्याशी लग्न केलं. तेही केवळ टेराचे कर भरायला लागणारे पैसे जमा करण्यासाठी. हे सगळंधक्कादायक असलं तरी टेरासाठी आपल्या अस्तित्वाचा कण कण खर्ची घालणाऱ्या स्कार्लेटचा राग मला आलानाही. असो. तर आसपासच्या तीन परगण्यांमध्ये स्कार्लेटच्या सौंदर्याची कीर्ती पसरलेली होती. सर्व तरुण मुलीतिच्यावर खार खाऊन असत. एलन आणि मॅमी यांच्या पंखाखाली सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या स्कार्लेटलाही कधीएखाद्या जिवाभावाच्या मैत्रिणीची उणीव भासली नाही. उभ्या आयुष्यात स्कार्लेटला एकच खरी मैत्रीण मिळाली तीम्हणजे मेलनी. या मैत्रीचं श्रेय स्कार्लेटला शून्य आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर निरपेक्षनिःस्वार्थी प्रेमच करण्याच्या मेलनीच्या निष्कपट स्वभावाला संपूर्णपणे जातं. एलनचं प्रतिरूप वाटावं अशामेलनीने अतिशय भाबडेप्पणाने आयुष्यभर स्कार्लेटवर फक्त माया केली, तिला सांभाळलं. आयुष्यभर मेलनीचादुःस्वास करणाऱ्या स्कार्लेटला मेलनीची किंमत तिच्या मरणानंतर समजली. आयुष्यभर मेलनी स्कार्लेटलातिच्या धाडसी स्वभावाबद्दल सांगत राहिली. मला तुझा आधार वाटतो असं म्हणत राहिली. ऱ्हेट बटलरसकटआख्खं अटलांटा जिच्यापुढे झुकत असे ती मेलनी आपली खरी शक्ती होती हे स्कार्लेटला समजलं तेंव्हा तिला खऱ्याअर्थाने पोरकेपणाची जाणीव झाली. स्कार्लेटच्या पाषाणहृदयाला मेलनीच्या मृत्यूने जो पाझर फोडला त्याने तिलापार नेस्तनाबूत करून सोडलं.

टेरा या कापसाच्या मळ्याचा मालक होता जेराल्ड 'हारा. सर्व शेजाऱ्यांना धरून राहण्याच्या त्या काळातजॉर्जियामध्ये अजूनही बऱ्याच भागात जंगल होतं. जंगलातली थोडीथोडी जागा साफसूफ करून कापसाची शेतीकरणाऱ्या 'साऊथ' ला आपल्या या वैशिष्ठ्यपूर्ण संस्कृतीचा मोठा अभिमान होता. टेराचे सख्खे शेजारी म्हणजेट्वेल्व्ह ओक्स ला राहणारे विल्क्स कुटुंब. त्यांच्या घरापाशी ओकची बारा झाडं होती म्हणून हे नाव. ट्वेल्व्ह ओक्सचा ऍशली विल्क्स स्कार्लेटपेक्षा वयाने मोठा होता. युरोपात फिरून आलेला, संगीत - पुस्तकं - कविता - साहित्ययांत रमणारा सुसंस्कृत उमद्या स्वभावाचा ऍशली त्तिचा मित्र होता. ऍशलीच्या या आवडीच्या विषयांमध्येस्कार्लेटला अजिबात गतीच नव्हती. पण सोनेरी केस आणि निळे डोळे असलेल्या ऍशलीच्या देखण्याव्यक्तिमत्त्वाचा तिच्यावर प्रभाव पडला. आयुष्य म्हणजे फक्त घोड्यावरून रपेट, नवे कपडे, मेजवान्या, गप्पा, नाचअसलेली एक कायमस्वरूपी सहल आहे अशी समजूत असणारी पंधरा वर्षाची स्कार्लेट ऍशलीच्या प्रेमात केंव्हापडली तिचं तिलाही कळलं नाही. आयुष्य म्हणजे या सर्व गोष्टींपेक्षाही अधिक काही आहे, त्यात मोठ्याजबाबदाऱ्या असतात, दुःखं असतात याची तिला कल्पनाही नव्हती आणि घरच्या श्रीमंतीमुळे पैशांची किंमतहीनव्हती. ती जे मागेल ते तिला मिळत होतं त्यामुळे एखाद्या लहान मुलाने नव्या खेळण्यासाठी हट्ट करावा तसातिने ऍशलीसाठी हट्ट केला. ऍशलीचं लग्न त्याच्या आत्तेबहिणीशी - मेलनीशी आधीच ठरलेलं होतं. शिवाय त्यादोघांच्या स्वभावात असलेली तफावत पाहून खुद्द जेराल्डनेही तिला ऍशलीचा नाद सोडून द्यायला सांगितलं होतं. पण मिळणारी गोष्ट जास्तच हवीशी वाटायला लागते तसा स्कार्लेटने ऍशलीचा आणखीनच हट्ट धरला आणिदुर्दैवाने आयुष्यभर जपला. त्या हट्टातला फोलपणा तिच्या लक्षात आला तेंव्हा तिने मेलनी आणि ऱ्हेट यादोघांनाही गमावलं होतं. आयुष्य अर्थशून्य करून सोडणाऱ्या स्कार्लेटच्या या वेड्या हट्टामुळे मला तिच्याबद्दलसहानुभूती वाटली. मी लहान असताना बरीच हट्टी होते. एखाद्या गोष्टीचा हट्ट धरणाऱ्याच्या मनात काय कायचालू असतं याची कल्पना असल्यामुळे मला पुस्तकाच्या शेवटी स्कार्लेटबद्दल वाईट वाटलं. थोडीशी दयाही आली.

ऱ्हेट बटलर हा स्कार्लेटला पुरेपूर ओळखणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक होता. तिच्या चेहऱ्याकडे नुसता एककटाक्ष टाकल्यावर तिच्या मनात काय चालू आहे हे त्याला अचूक समजत असे. एक ऱ्हेट आणि दुसरी मॅमीसोडल्यास स्कार्लेटला कधीच कोणीच ओळखू शकलं नाही. नाही म्हणायला जेराल्ड तिला वेसण घालू शकत असेपण शिताफीने त्यातून सुटण्याइतकी स्कार्लेट डांबरट होतीच. ऍशलीला "माझ्याशी लग्न कर " असं स्कार्लेटनेसांगितलं तेंव्हा योगायोगाने ऱ्हेट तिथे हजर होता. सॅव्हानाच्या एका श्रीमंत कापूस शेतकऱ्याचा मुलगा म्हणजेसदर्न समाजाच्या वरच्या स्तरातलाच असूनही, समाजातल्या सभ्य माणसांमध्ये ऱ्हेटची गणना होत नसे. त्याचंवागणंही स्वार्थी - व्यापारीपणाचं होतं. 'बट ही इज नॉट जंटलमन! ' अशी त्याच्या पाठीवर चालणारी कुजबूजभूषणावह असल्याप्रमाणे तो वागत असे. खरं म्हणजे तथाकथित सभ्य आणि सुसंस्कृत समाजाच्या रूढ आदर्शवागणुकीच्या आपण किती विरुद्ध वागतो हे इतरांना दाखवून द्यायची एकही संधी त्याने कधी सोडली नाही. आपलाहा उघड स्वार्थ त्याने स्कार्लेटपासून कधीच लपवला नाही. त्यामुळे
"यू आर नॉट जंटलमन! "
"अँड यू आर नॉट लेडी! "
ही वाक्य पुस्तकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे दोघंही एकमेकांना ऐकवत राहिले. जॉर्जियन किंवा एकूणच सदर्नमूल्ये, युद्ध आणि युद्धाला कॉन्फेडरेट् लोकांनी दिलेलं 'ग्रेट कॉझ' हे नाव यांची सतत खिल्ली उडवणाऱ्या आणियुद्धामुळे निर्माण झालेल्या टंचाईत काळाबाजार करून पैसे कमावणाऱ्या ऱ्हेटने आपल्या अंगी असलेले खरे 'सदर्न' गुण फक्त एकदाच प्रकट केले. अटलांटावर यांकींनी निर्णायक हल्ला करून गल्लोगल्ली घरं पेटवून दिली तेंव्हा. काही तासांपूर्वी बाळंत झालेली मेलनी, तिचं तान्हं बाळ, स्कार्लेटचा मुलगा वेड हॅम्प्टन आणि तिची कृष्णवर्णीयदासी प्रिसी एवढ्या लोकांची जबाबदारी स्कार्लेटवर टाकून युद्धाच्या शेवटी ऱ्हेट युद्धात भाग घेण्यासाठी अंधारातनाहीसा झाला. "ते माझं गाव जाळतायत, मी प्रतिकार करणारच" असं म्हणत युद्धात सामील झालेला ऱ्हेट पाहूनमी थक्कच झाले. यादवी युद्ध हे काही फक्त काळ्या लोकांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी नव्हतं. दाक्षिणात्यराज्यांसाठी त्यांच्या संस्कृतीचं रक्षण करण्याचं ते साधन होतं. भलीबुरी कशीही असली तरी ही मूल्ये कॉन्फेडरेटलोकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट होती. या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी गेलेल्या ऱ्हेटमध्ये त्याने प्रयत्नपूर्वकझाकलेले दक्षिणी गुण असे अखेरीस प्रकट झालेच. यामुळे ऱ्हेटच्या एरवी काळ्या वाटणाऱ्या (तसाही वर्णाने तोइतरांपेक्षा काळाच होता म्हणे) मूर्तीमध्ये काही गोऱ्या छटाही दिसल्या. ऱ्हेटसारख्या दुष्टातला हा सुष्ट गुणांचाआविष्कार 'यिन यांग' इतकाच रम्य होता. स्कार्लेटला संपूर्णपणे ओळखून असणाऱ्या ऱ्हेटने तिचा वरवर अपमानकरत असताना मनातून मात्र तिच्यावर प्रेम केलं. ऍशलीकडून आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळावा म्हणूनआसुसलेल्या स्कार्लेटला या प्रेमाचा साक्षात्कार झाला तेंव्हाच ऱ्हेट तिला सोडून कायमचा निघून गेला. ऱ्हेटच्याप्रेमापलिकडे आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही हे तिला कळलं आणि ऱ्हेटला शोधायला ती निघाली. स्कार्लेटच्याहातातून वाऱ्यासारखा निसटून गेलेला ऱ्हेट हा खरा 'गॉन विथ विंड' तर त्याला शोधायला निघालेली स्कार्लेटम्हणाली 'टुमॉरो इज अनादर डे! ' टुमॉरो इज अनादर डे ' हे या पुस्तकाचं प्रकाशनाच्या आधीचं नाव. दोन्हीहीअर्थपूर्ण आहेत.

ऍशली आणि ऱ्हेट हे वरवर परस्परविरोधी, सर्वस्वी भिन्न असले तरी आतून एकसारखेच होते. अगदी एकामुशीतून काढल्यासारखे. दोघेही कापसाच्या श्रीमंत शेतकऱ्यांचे मुलगे. सुखवस्तू संपन्न कुटुंबातले. पण ऍशलीवरसुसंस्कृतपणाचे संस्कार खोलवर झाले. मुळातच मृदू स्वभावाच्या ऍशलीलाही ऱ्हेटसारखंच युद्ध अमान्य होतं. पणसमाजाची, काळाची हाक ऐकून तो युद्धावर गेला, चार वर्षं लढला. युरोपात फिरून आलेल्या ऍशलीने जग पाहिलंनव्हतं असं नाही. पण लहानपणापासून तो जो समाज बघत आलेला होता तो समाज त्यातल्यागुलामगिरीसारख्या प्रथांसहित त्याला प्रिय होता. युद्धातला फोलपणाही त्याला कळत होता. युद्धाने ते जग कायमचंनष्ट केल्यावर ऍशली मोडून पडला. प्राणीसंग्रहालयात वाढवलेल्या वाघ-सिंहांच्या छाव्यांना एकदम जंगलात सोडलंतर त्यांना जगता येत नाही तशीच ऍशलीची स्थिती होती. नव्या वातावरणाशी जुळवून घेणं त्याला जमलं नाही. लहानपणीच वडिलांशी झालेले वाद आणि नंतर घराबाहेर पडून सामाजिक चौकटी मोडून जगलेलं बेछूट बेबंदआयुष्य यामुळे ऱ्हेटचा सुसंस्कृत मृदू स्वभाव लोप पावला असला तरी ऍशलीला ऱ्हेटने पूर्णपणे ओळखलं याचंकारण त्या दोघांमध्ये असलेलं मूळ साम्य. क्लानच्या कामावर असताना गोळी लागलेल्या ऍशलीला ऱ्हेटनेकमालीच्या शिताफीने वाचवलं. ऍशलीच्या मनाची नक्की काय अवस्था झाली आहे आणि ती तशी का झाली आहेहे जेंव्हा ऱ्हेटने स्कर्लेटला सांगितलं तेंव्हा त्या दोघांमधला हा विरोधाभास एकदम माझ्यासमोर प्रकट झाला. ऍशलीला स्कार्लेटबद्दल कायम आकर्षण होतं याबद्दल त्याला दोष देण्यात अर्थ नसला तरी प्रसंगी वाईटपणास्वीकारून त्याने तिची कानउघडणी करायला हवी होती असं मला वाटत राहिलं.

पण स्कार्लेट ही अजिबात कचकड्याची बाहुली नाही. खरं म्हणजे यादवी युद्ध आणि स्कार्लेट यांनी आलटून पालटूनपुस्तकाचं नायकपण वाटून घेतलंय. आपलं जग युद्धाने कधीही परत उभं करता येणार नाही असं उध्वस्त केलंयआणि आता पै - पै जोडत पराभूत आयुष्य आपल्याला जगायचं आहे हे समजल्यावरही स्कार्लेट डगमगली नाही. समाजाच्या उच्च स्तरातल्या श्रीमंत जॉर्जियन कुटुंबांना समाजात सरंजामशाहीमध्ये शोभावा असा मान होता. त्यात स्कार्लेट ही तर एलनची मुलगी होती. नवरा चार्ल्स हॅमिल्टन युद्धात कामी आल्यावर स्कार्लेटने एलनच्यामुलीला साजेल असं सगळे सामाजिक संकेत पाळून वागावं अशीच सर्वांची अपेक्षा होती. त्यात ती टेरापासून दूरअटलांटाला, सासरी राहत होती. अशा परिस्थितीत तर तिचं वागणं अगदी आदर्श असायला हवंच हवं होतं. उलटघर चालवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्कार्लेटने स्वतः कष्ट केले. युद्धामुळे आलेलं दैन्य हे नशिबाचेभोग आहेत असं समजून आलिया भोगासी बिनशर्त शरणागती पत्करता, स्कार्लेटने यशस्वीपणे चालवूनदाखवलेली फ्रँक केनेडीची गिरणी अनेकांच्या भुवया उंचावत होती. पण काहीही झालं तरी यापुढे मी कधीहीरिकाम्या टेबलावर बसून भूतकाळच्या मेजवान्या आठवून दिवस काढणार नाही अशा निश्चयाने उभी राहिलेलीस्कार्लेट तिच्याविरुद्धच्या माझ्या सगळ्या आक्षेपांपेक्षाही मोठी ठरली. उदाहरणंच द्यायची झाली तर, स्कार्लेटची हीकाही रूपं पुरेशी ठरावीत -
मनाविरुद्ध का होईना पण अटलांटा हॉस्पिटलमध्ये दिवस दिवस जखमी सैनिकांची शुश्रुषा करणारी, येणाऱ्याजाणाऱ्या सैनिकांना आडाचं पाणी काढून प्यायला देणारी, आंट पिटीपॅट आणि मेलनी यांना सांभाळणारी स्कार्लेट .
जवळपासची सगळी माणसं बाहेरगावी गेली आहेत, अटलांटामध्ये हातघाईची लढाई चालली आहे, पलिकडची घरंशत्रूने पेटवली आहेत, शहरातल्या दोन डॉक्टरांना सैनिकांवर उपचार करण्यातून सवड नाही आणि मला आईनेसुईणपण शिकवलं अशा बढाया मारणाऱ्या बारा वर्षांच्या काळ्या मोलकरणीला सुईणपणातलं काहीच कळत नाहीअशा परिस्थितीत मेलनीचं अनेक तास चाललेलं बाळंतपण पार पाडणारी स्कार्लेट.
त्याच बाळंतपणानंतर मेलनीला घोडागाडीत घालून, घोडा आत्ता मरतोय की मग मरतोय अशा अवस्थेत असताना, ऱ्हेटने अंधारात उडी मारल्यावर टेरापर्यंतचा प्रवास एकटीने करायची वेळ तिच्यावर आली. रस्त्यावर अंधार, त्यातपेटलेल्या इमारतींच्या ज्वाळांचा हालता प्रकाश नाचतोय, पलिकडच्या रस्त्यावरून हातघाईच्या लढाईचे आवाजयेतायत अशा वातावरणात मध्ये कुठेच थांबता, जीव मुठीत धरून टेरापर्यंतचा प्रवास तिने पार केला. कधीएकदा घरी जाऊन आईच्या कुशीत शिरते आहे असं तिला झालं होतं. वाटेत शेजाऱ्यांची उध्वस्त घरं बघत तीमोठ्या आशेने घरी पोहोचली तर न्युमोनियाने आई वारली आहे, वडील भ्रमिष्ट झाले आहेत आणि दोन धाकट्याबहिणी पळून गेलेले तीन काळे गुलाम आता आम्हाला तूच खाऊ घाल म्हणून आशेने तिच्याच तोंडाकडे बघतआहेत अशी परिस्थिती तिच्या समोर उभी ठाकली. तो सगळाच प्रवास आणि घरी पोचल्याक्षणी सर्व जबाबदारीआपल्या खांद्यावर घेऊन सूत्रं हलवणारी स्कार्लेट .
घर लुटायला आलेल्या यांकी सैनिकाकडे मेक्सिकन युद्धात सन्मानपूर्वक मिळालेली आपल्या सासऱ्यांची तलवार लुटता आपल्या मुलाकडे असलेली भूतकाळाची एकमेव आठवण म्हणून परत मागणारी निर्भय स्कार्लेट.
आम्ही स्वयंपाकी आहोत, शेतमजूर नाही असे म्हणून शेतात काम करायला नकार देणाऱ्या काळ्या मजुरांनाकामाला लावून त्यांच्या बरोबरीने शेतात राबणारी, त्यापायी आपल्या नाजूक हातांना घट्टे पाडून घेणारी स्कार्लेट.
कुरकुरणाऱ्या बहिणींना सांभाळणारी, घरात घुसलेल्या यांकी सैनिकावर गोळी झाडून त्याच्याच पिस्तुलासहत्याचा मृतदेह दलदलीत नेऊन टाकणारी स्कार्लेट.
शुद्धीवर असताना जेराल्डने तिला आयरिश माणसांबद्दल सांगितलं होतं. आयरिश माणसं प्राण देतील पण आपल्यामातीशी इमान राखून वागतील. टेरासाठी रक्ताचं पाणी करणारी स्कार्लेट जेराल्डइतकीच आयरिश आहे. टेरावरनोकरी करणाऱ्या आणि नंतर यांकी लोकांचा करवसुली अधिकारी म्हणून टेरा घशात घालायला निघालेल्याजोनास विल्किर्सन ला टेरा मिळू देता कामा नये म्हंणून पडद्याचा शिवलेला फ्रॉक घालून अटलांटाला जाणारी, ऱ्हेटकडे मदत मागणारी स्कार्लेट.
ऍशली - मेलनी - ब्यू या विल्क्स कुटुंबाला पोसणारी, ऍशलीसारखा कर्तेपण स्वीकारू शकणारा पण सज्जनस्वभावामुळे त्यात अपयशी ठरलेला पुरुषासारखा पुरुष घरी बसून असताना टेराचा प्रपंच सांभाळणारी स्कार्लेट .
हे सगळे प्रसंग पाहिल्यावर नक्की कोणत्या अधिकाराने स्कार्लेट 'हारा या पुस्तकाची नायिका आहे हे पटतं.

लेखिका मार्गारेट मिशेल हिने आपल्या आईच्या आईवर ही व्यक्तिरेखा बेतली होती म्हणतात. म्हणजे स्कार्लेटमध्ये सत्याचा काहीतरी अंश असावा. तो नसता तरीसुद्धा खिळवून टाकणारी स्कार्लेट सारखी दुसरी व्यक्तिरेखाआजवर माझ्या वाचनात आलेली नाही. शेवटी तिच्या गुणदोषांची चिकित्सा करत बसण्यापेक्षा पुस्तकातून एखाद्याभव्य शिल्पासारख्या साकार झालेल्या तिच्या त्रिमित रूपाकडेच पाहणं खरं महत्त्वाचं असं वाटायला लागतं यातचसर्व काही आलं.

--अदिती
१५ जानेवारी २००९,
पौष कृ. शके १९३० '

Wednesday, June 11, 2008

रिबेका - अज्ञात भूतकाळाची भासमान सावली

जागतिक वाङ्मयामध्ये आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेने आपला असा वेगळा ठसा उमटवणारी काही पुस्तके आहेत. उदा. गॉन विथ द विंड, द अल्केमिस्ट आणि रिबेका. केवळ ही पुस्तके लोकप्रिय आहेत म्हणून ती वैशिष्ठ्यपूर्ण आहेत असे मात्र मला वाटत नाही. यातलं रिबेका मी अलिकडेच वाचलं. रिबेकाबद्दल थोडंसं लिहायचा मोह आवरणं अशक्य आहे. साधारण एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला हे पुस्तक प्रकाशित झालं. तेंव्हापासून आजतागायत त्याची रसिकांवरील मोहिनी कायम टिकून आहे. आल्फ्रेड हिचकॉकसारख्या समर्थ दिग्दर्शकाने या कादंबरीला चित्रबद्ध केले यावरून तिचं महत्त्व लक्षात यावं. मी लहान असताना, प्रसिद्ध पुस्तकांच्या लहान मुलांना वाचण्यायोग्य अशा सोप्या आवृत्त्यांमध्ये मी रिबेका पहिल्यांदा वाचलं. तेंव्हा त्यातला बराचसा धक्कादायक भाग वगळला होता. त्यामुळे त्या पुस्तकाचा म्हणावा तितका प्रभाव पडला नाही. नंतर महाविद्यालयामध्ये असताना मुद्दाम ग्रंथालयातून आणून त्याचा अनुवाद वाचला होता. तेंव्हा मी बऱ्यापैकी प्रभावित झाले होते. पण इंग्रजी भाषा येणाऱ्या माणसाने इंग्रजी पुस्तके अनुवादित स्वरूपात वाचणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखेच आहे (अपवाद पाडस) असे माझे मत आहे. त्यामुळे रिबेका मूळ इंग्रजी भाषेतून वाचण्याची इच्छा होती. कंपनीच्या बुक-क्लबातून ती पूर्ण झाली. पहिली काही पाने पुस्तकाने पकड घेण्यात खर्ची पडली. आणि त्यानंतर मात्र मी पुस्तकात जी शिरले ती पुस्तक संपेपर्यंत बाहेरच येऊ शकले नाही.

तसं पाहिलं तर ही रहस्यकथा नाही. पण एक रहस्य हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली - वाढलेली आणि पोरकी झालेली विशीची एक मुलगी पैसे मिळवण्यासाठी एका श्रीमंत विधवेची सोबतीण म्हणून काम करत असते. परिस्थितीच्या रेट्यामुळे आणि सततच्या गरिबीमुळे कायमच अंग चोरून राहणाऱ्या या मुलीला कुठल्याही गोष्टीबाबत अजिबात आत्मविश्वास वाटत नाही. रूपाने सामान्य आणि इतर कुठलेच वैशिष्ठ्यपूर्ण किंवा लक्षवेधक गुण नसल्यामुळे तिची सोबतिणीची नोकरीच तिच्यासाठी योग्य आहे असं खुद्द तिच्या मालकिणीचंही मत आहे. मुळातच दुर्बळ आणि कमकुवत असलेल्या या व्यक्तिरेखेचा कमकुवतपणा अधोरेखित करण्यासाठीच जणू काही, पूर्ण पुस्तकभर तिला नावच दिलेलं नाही. पुस्तक तिच्याच प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनात असल्यामुळे आपल्याला तिचं नाव कधीच कळत नाही. इतर सर्व व्यक्तिरेखांच्या पार्श्वभूमीवर ही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे विरोधाभास दाखवते. शिवाय तिची घालमेल, नखं खाणं, आपलं मत कधीच ठामपणे मांडू न शकणं, सारखं आपल्या हातून काही चुकलं तर? या शंकेनं भेदरून जाणं यातून तिची अवस्था अतिशय सुंदर रितीने प्रकट होते.

आपल्या मालकिणीबरोबर फ्रान्सच्या माँटे कार्लो नावाच्या एका बेटावर सुट्टीसाठी म्हणून आलेल्या या मुलीची गाठ एका श्रीमंत आणि प्रसिद्ध इंग्लिश उमरावाशी पडते ती या मालकिणीच्या आगाऊ - भोचक स्वभावामुळेच. तिच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या या उमरावाचं म्हणजेच काउंट मॅक्झिमिलियन डि विंटर चं घर मँडरलीला आहे. हे घर अतिशय देखणं आहे आणि मॅक्झिमच्या पहिल्या पत्नीने आपल्या रसिकतेने आणि सौंदर्यदृष्टीने ते अधिकच लोभसवाणं बनवलं आहे. हीच रिबेका. आपल्या संभाषणचातुर्यामुळे, अलौकिक सौंदर्यामुळे आणि आदरातिथ्यातील नैपुण्यामुळे तिने मँडरलीच्या पार्टीज म्हणजे लोकांनी आतुरतेने वाट पाहण्याच्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत. या रिबेकाचं वर्षभरापूर्वी अपघाती निधन झालं आहे. तिच्या निधनाबद्दल सगळं इंग्लंड शोक व्यक्त करतं आहे. मँडरलीचा काउंट आणि रिबेकाचा नवरा मॅक्झिम आपल्याच हॉटेलात उतरला आहे हे कळल्यावर तिची मालकीण त्याला आपल्याबरोबर जेवायचं आमंत्रण देते. बादरायण संबंध जोडून, प्रसिद्ध व्यक्तींच्या गळ्यात पडून त्यांच्याशी आपली सलगी असल्याचं दाखवण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या या बाईला सगळेच लोक टाळतात. बिचारा मॅक्झिम तिच्या तावडीत सापडतो. तिची आणि मॅक्झिमची जेवणाच्या टेबलावर गाठ पडते. मॅक्झिम तिला माझ्याबरोबर फिरायला येशील का असं विचारतो. मॅखिमचा हुद्दा, त्याची प्रसिद्धी, त्याची श्रीमंती हे काहीही माहीत नसताना ती मॅक्झिमच्या प्रेमात पडते. मॅक्झिम कायमच तिच्याशी अतिशय मृदूपणे वागतो. मधूनच येणारं त्याचं अबोलपण म्हणजे त्याला त्याच्या लाडक्या पत्नीची येणारी आठवण आहे असं समजणारी ती आपल्या भावना त्याच्याकडे बोलायचं धाडस करू शकत नाही. इथपासूनच रिबेकाची अदृश्य सावली आपल्याला जाणवायला लागते. अचानक मॅक्झिम तिला लग्नाबद्दल विचारतो. जगाला आश्चर्याने बुचकळ्यात पाडायला लावून आणि मालकिणीच्या धोक्याच्या सूचनांना धाब्यावर बसवून ते दोघं साधेपणाने लग्न करतात. काही दिवस इटलीमध्ये घालवून अखेरीस ते मँडरलीला येऊन पोचतात.

लहानपणी एका भेटकार्डावर पाहिलेलं स्वप्नासारखं सुंदर घर म्हणजेच मँडरली हे कळल्यावर कुठेतरी खूश झालेली ती मँडरलीची मालकीण म्हणून तिथे पाऊल ठेवताना थबकते. घाबरते. बावचळते. कळत नकळत प्रत्येक माणूस आपली तुलना रिबेकाशी करतो आहे आणि करणार आहे हे लौकरच तिच्या लक्षात येतं. अगदी हाऊसकीपर मिसेस डेन्व्हर्स पासून ते घरातला कुत्रा जॅस्परपर्यंत सगळेच लोक ही तुलना करत आहेत हे तिला जाणवतं. कुठलीही गोष्ट करताना "मॅडम ही गोष्ट अशीच करायच्या" हे वाक्य ऐकावं लागणं तिच्यासाठी अपरिहार्य होऊन बसतं. फुलं कुठल्या फुलदाणीत ठेवावीत इथपासून ते जेवणातील पदार्थ काय असावेत इथपर्यंत सगळ्या गोष्टी 'मॅडम' जशा करत असत अगदी तशाच केल्या जातात. तिला त्यात काहीही बदल करण्याचं धाडसच होत नाही. मॅक्झिमची नवी बायको म्हणून तिला भेटायला येणारे लोकही आपल्याकडे पाहून "मॅक्सने हिच्यात असं काय पाहिलं? ही तर अगदी सामान्य आहे. रिबेकासारखी मुळीच नाही... " असाच विचार करत आहेत हे तिला स्पष्टपणे दिसतं. ती घरात बिचकत बिचकतच वावरते. मालकीण असल्याची जबाबदारी तिला घेताच येत नाही. आपलं काहीतरी चुकेल, काहीतरी मोडतोड होईल आणि आपल्याला कोणीतरी रागावेल ही भीती तिला कायम वाटत राहते. मॅक्झिमची मोठी बहीण बिऍट्रिस, तिचा नवरा गाईल्स तिला भेटायला येतात. बिऍट्रिसला कुठे काय बोलावं याचा मुळीच पोच नाही. ती बोलताबोलता अनेक गोष्टी अर्ध्याच सोडून देते किंवा तिला कळू शकत नाही असं काहीतरी सूचक बोलते. रिबेकाची सावली गडद होऊ लागते. घरभर रिबेकाच्या खुणा आहेत. मिसेस डेन्व्हर्सने तिची खोली अशा प्रकारे ठेवली आहे जणू काही कुठल्याही क्षणी, ज्या बोटीतून जाताना वादळात सापडून रिबेका बुडाली, तीच आपली बोट नांगरून रिबेका घरात येईल आणि आपलं नेहमीचं कामकाज काही झालंच नाही अशा थाटात सांभाळायला लागेल. मॅक्झिम आणि ती घराच्या कमी सजवलेल्या आणि एके काळी पाहुण्यांच्या राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भागात राहतात. रिबेका जिथे राहायची तो भाग अधिक सुंदर, प्रशस्त आहे. मॅक्झिमला आता त्या भागात राहावंसं वाटत नाही कारण तिकडे गेल्यावर रिबेकाच्या आठवणींनी त्याला त्रास होत असेल असं तिला वाटतं. घरापुढे एक सुंदर राई आहे आणि तिच्यापलिकडे समुद्रकिनारा. या समुद्रकिनाऱ्यावर एक खाजगी धक्का आहे. तिथे रिबेकाचं एक लहानसं खोपटं आहे. तिची बोट नांगरायची जागा आहे. मॅंडरलीला आलेल्या पाहुण्यांबरोबर अनेक वेळ तिने इथे चांदण्या रात्रीच्या सहली आयोजित केलेल्या होत्या. त्या भागातल्या वार्षिक बोटींच्या शर्यतींमध्ये रिबेका भाग घेत असे. हे सगळं हळूहळू तिला समजतं नकळत तिच्या मनात रिबेकाची आकृती तयार होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूवर, अगदी मॅक्सवरही तीच आकृती हक्क सांगते आहे आणि आपली किंमत नगण्य आहे असं तिला वाटायला लागतं. अगदी मॅक्सला सुद्धा रिकाम्या वेळात अचानक जॅस्परची आठवण व्हावी तशीच तिची आठवण होते. थोडक्यात फावल्या वेळात मन रमवण्यासाठी मॅक्सने सांभाळलेल्या जॅस्परची आणि आपली जागा सारखीच आहे असं तिला वाटत राहतं. सर्व कामं सहजतेने, आपल्या डौलदार स्टाइलमध्ये करणाऱ्या रिबेकाच्या सर्व जनमानसात असलेल्या छबीशी आणि त्यामुळे ओघानेच येणाऱ्या दुय्यमपणाशी या प्रकारचा कुठलाच अनुभव किंवा आत्मविश्वास नसलेली ती लढा देण्याचा प्रयत्न करते खरी पण बऱ्याच वेळा एखाद्या भेदरलेल्या पाखरासारखी तिची अवस्था होऊन जाते. तिच्या सभोवताली असणारी रिबेकाची सावली आता आणखी गडद असं त्रिमित रूप घ्यायला लागते.

नव्या मालकिणीच्या सन्मानार्थ मँडरलीला दर वर्षी भरवल्या जाणाऱ्या फॅन्सी ड्रेस बॉलचं आयोजन परत सुरू केलं जावं याबद्दल तिथले लोक मॅक्सला गळ घालतात. या बॉलपासून अशा काही घटना घडत जातात की वाचकाला विचार करायलादेखील सवड मिळत नाही. भूतकाळाची भुतं वर्तमानाला राहू-केतूप्रमाणे ग्रासू पाहतात. त्याच्या कराल दाढांमध्ये तिने जे जे काही आपलं म्हणून उराशी जपून ठेवलं आहे ते सारं नष्ट होणार असं दिसायला लागतं. यापुढचा प्रकार, उकललेलं रहस्य आणि शेवट हा प्रत्यक्षच वाचावा असा आहे. तो इथे देऊन वाचकांचा रसभंग करण्यात काहीच अर्थ नाही.

पूर्ण पुस्तकभर मरूनही जिवंत असलेली रिबेका आणि जिवंत असूनही अनाम आणि मृतप्राय वाटणारी ती हा विरोधाभास अत्यंत उत्तम रितीने चित्रित केलेला आहे. तिच्यासारख्याच वाचकांनाही भूतकाळातल्या घटना अज्ञात आहेत त्यामुळे हाती आलं असं वाटत असतानाच क्षणार्धात हातातून निसटून जाणारं भूतकाळाचं भूत अस्वस्थ करत राहतं. मिसेस डेन्व्हर्सचं गूढ वागणं, मॅक्सचे वेगवेगळे मूडस, रिबेकाचं नाव घेतल्यावर फ्रान्सिसचा बदलणारा चेहरा, फॅवेलचं येणं, रिबेकाच्या खोपटात तिला वाटलेली अनाम भीती यातून त्या भूतकाळाबद्दल काहीतरी सूचना मिळत तर राहतात पण त्यांचा अर्थ मात्र लागत नाही. एक प्रकारच्या गूढ आणि रहस्यमय वातावरणात तिच्याबरोबर आपणही अडकून पडतो. अर्थही लागत नाही आणि सुटकाही होत नाही अशा प्रकारची परिस्थिती दाखवून वाचणाऱ्याच्या मनात योग्य आंदोलनं निर्माण करण्यात लेखिका अत्यंत यशस्वी झालेली आहे. काळाच्या ओघात वाहून गेलेली जुनी इंग्लिश समाजरचना आणि श्रीमंतांची बेफिकीर-बेदरकार वृत्तीही उत्तम प्रकारे दाखवली आहे. मिसेस डेन्व्हर्सची व्यक्तिरेखा तर फार सुंदर रितीने उतरली आहे. मॅक्सच्या आजीने रिबेकाला भेटण्यासाठी केलेला हट्ट आणि तिला ओळखायला दिलेला नकार आणि घरातल्या म्हाताऱ्या कुत्रीने सतत रिबेकाच्या पावलांची चाहूल घेणं यातून तिच्या मनावर झालेला परिणाम सुरेख अधोरेखित होतो. रिबेकाची सावली अस्वस्थ करते. भयचकित करते. आणि सत्याचा चेहरा समोर आल्यावर तर विषण्ण करून सोडते.

Daphne du Maurier या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेलं हे पुस्तक हा हा म्हणता विक्रमी खपाच्या यादीत जाऊन बसलं. (या नावाचा उच्चार कसा करायचा हे मात्र मला खरंच माहीत नाही. कृपया तज्ज्ञांनी खुलासा करावा. ) आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटाला पाच ऑस्कर पुरस्कारही मिळाले. या पुस्तकावर अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट निर्माण झालेले आहेत. अनेक समकालीन पुस्तकांमध्ये याचा उल्लेख सापडतो. आपल्याकडेही या पुस्तकावर आधारित 'कोहरा' नावाचा एक अप्रतिम कृष्णधवल चित्रपट काढला गेला. अर्थात त्यात कथा थोडीशी बदलली आहे. एकूणच वाचणाऱ्यावर हे पुस्तक चांगला प्रभाव पाडते. या लेखिकेवर अशाच विषयावर आणि घटनांवर आधारित अशा एका ब्राझिलियन लेखिकेच्या पुस्तकावरून रिबेका बेतलेले आहे असा आरोपही झालेला आहे. अनेक प्रकारांनी सतत चर्चेत राहिलेले हे पुस्तक एकदा तरी वाचावेच असे आहे असे मला वाटते. हे वाचून कुणी ते वाचले आणि त्यांना ते आवडले तर तेच माझ्या या लेखनाचे फलित आहे असे मी मानते.

--अदिती
(१०. ६. २००८
ज्येष्ठ शुद्ध ७ शके १९३०)

Thursday, February 21, 2008

पोक्त बालपणाची अस्वस्थ करून सोडणारी कहाणी : शौझिया

अफगाणिस्तान या एके काळी मुक्त असलेल्या आणि समृद्ध देशाची आज लक्तरं उरली आहेत. १९८८ साली रशियाच्या मदतीने बंडखोरांनी त्याच्यावर पहिला घाला घातला आणि त्यानंतर हा प्रांत अखंड धुमसतो आहे. 'तालिबान' च्या मूलतत्त्ववादी विचारसरणीने तर त्याला काहीशे वर्ष मागे नेऊन ठेवलं आहे.

गेली वीस वर्ष चाललेल्या या अराजकामध्ये अनेक उमलत्या वयाच्या मुलांचं बालपण अक्षरशः कोळशासारखं जळून राख झालं. डोळ्यात धगधगते अंगार आणि हृदयात सूडाची प्रचंड ज्वाला घेऊन उठलेल्या सोळा सोळा वर्षांच्या कोवळ्या मुलांना हाताशी धरून, त्यांना जवळच्या पाकिस्तानात बेकायदेशीर प्रशिक्षण देऊन तालिबानची अफगाणिस्तानावरची पकड घट्ट करून घेतली गेली. तालिबानने स्त्रियांना अशक्य बंधनांमध्ये ठेवून त्यांचं अस्तित्वच नाकारायचा प्रयत्न केला. पुरुष बरोबर नसताना घराबाहेर पाऊल टाकायचं नाही, सर्वांग बुरख्यात झाकून घ्यायचं, कामं करायची नाहीत अशा अनेक जाचक आणि जुलमी बंधनांमध्ये अफगाणी स्त्रिया जखडल्या गेल्या असताना परवाना नावाची एक बारा वर्षांची चिमुरडी तालिबान्यांशी दोन हात करायला रस्त्यावर उतरली. सगळी बंधने झुगारून देऊन तिने मुलीच्या वेषाचा त्याग केला. केस अगदी डोक्याबरोबर कापून ते भुंडे करून टाकले आणि मुलाच्या वेषात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायला ती सिद्ध झाली.

डेबोरा एलिस ही एक कॅनेडियन लेखिका आहे. किशोरवयीन मुलांसाठी पुस्तके लिहिण्याबरोबरच ती युद्धविरोधी कार्य करणाऱ्या आणि स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या संस्थांसाठी काम करते. १९९७ साली डेबोरा अफगाणिस्तानातील शरणार्थी लोक रहात असलेल्या पाकिस्तानातील छावण्यांमध्ये त्या लोकांच्या प्रश्नांबद्दल माहिती घेत असताना तिची गाठ एका आईशी पडली. त्या स्त्रीने सांगितलेल्या थरारक सत्यघटनांवर आधारित अशी तीन पुस्तकांची एक मालिका डेबोराने लिहिली. त्यातील दोन पुस्तकांची नायिका आहे ही परवाना. 'द ब्रेडविनर', 'परवानाज जर्नी' आणि 'मड सिटी' ही ती तीन पुस्तके. यात परवानाबरोबर तिची मैत्रीण शौझिया आपल्याला भेटते. याच शौझियाची कहाणी सांगणारं पुस्तक म्हणजे 'मड सिटी'. 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज', 'सिलेक्टिव्ह मेमरीज' अशा पुस्तकांचे मराठीत सरस अनुवाद करणाऱ्या अपर्णा वेलणकर यांनी मड सिटी या पुस्तकाचा शौझिया या नावाने अतिशय सहज आणि सुरेख अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे तो प्रकाशित झाला आहे.

आपल्यावर कोसळलेल्या संकटांना तोंड देताना मोठी माणसं सर्वस्व पणाला लावतात. पण शौझियासारखी लहान मुलंदेखील आपली सर्व शक्ती लावून आलेल्या संकटाशी दोन हात करताना दिसतात. संकटकाळी आपल्यातलं जे जे काही चांगलं असेल ते बाहेर आलं पाहिजे आणि शेवटपर्यंत धीर न सोडता आलेल्या संकटाशी आपण दोन हात केले पाहिजेत हा संदेश शौझिया सतत देत राहते. शौझियाचा मित्र असलेला तिचा लाडका कुत्रा जास्पर तिला पावलोपावली साथ देतो. परवानासारखीच मुलाचे कपडे घालून काम करणारी शौझिया , घरातली माणसं केवळ पैशासाठी एका म्हाताऱ्या माणसाशी आपला 'निकाह' लावून देणार आहेत हे कळल्यावर रातोरात घरातून पळून जाते. अफगाणिस्तानातून पळून पाकिस्तानात पेशावरच्या छावणीत येऊन पोचते. मेंढपाळ तिची सोबत करतात आणि तिला वीरा मौसीच्या हाती सोपवून निघून जातात. वीरा मौसी सुद्धा एक अफगाणी शरणागत आहे. पण अतिशय तीव्र इच्छाशक्ती आणि दैवापुढे कधीही न झुकण्याची जिद्द बाळगून असलेली ही करारी व्यक्तिरेखा वाचताना आपल्यावर मोठा प्रभाव टाकून जाते. वीरा मौसी एके काळी मुलींच्या शाळेत शारीरिक शिक्षणाचे धडे देत होती आणि हॉकीची प्रशिक्षक म्हणून काम करत होती. इथे अनाथ आणि विधवा स्त्रियांसाठी चालवल्या जात असलेल्या पेशावरच्या छावणीत ती जमेल तितक्या स्त्रियांना आणि मुलांना सांभाळायचं काम करते आहे. मेंढपाळ शौझियाला वीरा मौसीकडे देऊन निघून जातात. स्वतंत्र वृत्तीची, कणखर आणि वीरा मौसीइतकीच करारी शौझिया वीरा मौसीचे हुकूम मानायला नकार देते. जगाशी झुंजायला निघालेल्या पण अजून पंखही पुरेसे न फुटलेल्या या गरुडाच्या पिल्लाला सांभाळणं कठीण आहे हे वीरा मौसीलाही पुरतं ठाऊक आहे. पण अर्धवट, अवघड वयाच्या शौझियाला काही समजावून सांगण्याइतका वेळ तिच्याकडे नाही आणि दर क्षणाला आणखी बिघडत चाललेल्या परिस्थितीला तोंड देतादेता ते तिला शक्यही नाही. एका मासिकात पाहिलेला, फ्रान्समधल्या जांभळ्या फुलांच्या शेताचा फोटो उराशी धरून बसलेली शौझिया जास्परच्या मदतीने फ्रान्सला जायचा ध्यास घेऊन आहे. काम करून पैसे मिळवायचे, समुद्राजवळ जायचं, बोटीत बसायचं आणि फ्रान्सला जायचं. तिथे त्या फुलांच्या सुंदर शेतात, गार गार हवेत ही गलिच्छ छावणी आणि तापदायक परिस्थिती विसरून मनसोक्त बागडायचं असं तिचं स्वप्न आहे. मग त्याच शेतावर काम करायचं आणि तिथेच रहायचा असा तिचा निर्धार आहे. एक दिवस पॅरिसमधल्या आयफेल टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर बसून परवानाबरोबर चहा प्यायचा असं त्या दोघींचं ठरलंय. छावणीत केलेल्या कामाचे पैसे वीरा मौसी आपल्याला देणार नाही हे कळतात शौझिया जास्परला घेऊन बाहेर पडते. तिचा यापुढचा सारा प्रवास डोळ्यात पाणी उभं करतो. अंगावर शहारे येतात. मन उदास, भकास होऊन जातं. शब्दांचं कुठलंही अवडंबर न माजवता भेसूर परिस्थितीचं नेमकं चित्रण करून डेबोरा आपल्याला पावलोपावली अंतर्मुख करून सोडते.

युद्ध करवणारे आपल्या घरी सुखासमाधानाने घोरत पडतात आणि शौझिया, परवानासारखी सामान्य मुलं असामान्य परिस्थितीला तोंड देताना पार होरपळून जातात हा विरोधाभास लक्षात आला की युद्धविरोधी काम करणाऱ्या संस्थांसाठी डेबोरा जे काम करते त्याचं महत्त्व पटायला लागतं. संस्कारक्षम वयातल्या किशोरवयीन मुलांना अद्भुतरम्य जग नेहमीच भुरळ घालतं आणि तसं जग उभं करणारी किंवा रहस्यकथा या प्रकारात मोडणारी पुस्तकं निदान इंग्रजी भाषेत तरी बरीच आहेत. पण याच स्वप्ररंजनात रमताना या मुलांना आजूबाजूच्या दाहक परिस्थितीचं भानही कोणीतरी आणून द्यायला हवं. ज्या मोकळ्या आणि मुक्त वातावरणात आपण वाढलो, आई वडिलांचं प्रेम, लाड आणि इतर गोष्टी ज्या आपण गृहित धरतो आणि म्हणूनच ज्यांची आपल्याला किंमत नसते त्या गोष्टींसाठी रस्त्यावर राहणारी, कचरा गोळा करणारी मुलं काय काय करतात याचं भान कळत्या वयातल्या कुठल्याही मुलाला हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच येईल. साध्या विरोधाभासातून आणि सोप्या सहज शैलीतून डेबोरा मुलांशी थेट संवाद साधते.मुद्दाम त्यांना उद्देशून असं काहीही न सांगताही ती त्यांना बरंच काही सांगून जाते. लहान मुलंच काय पणा मोठी माणसंही नकळत अंतर्मुख होतात, कुठेतरी नम्र होतात. आपल्याला मिळालेल्या सुरक्षित बालपणाबद्दल, मौल्यवान आणि स्थिर आयुष्याबद्दल त्यांना कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. उपदेशाचं अवडंबर न माजवता हे अगदी नकळत घडतं. कधी घडतं ते आपल्याला जाणवतही नाही हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. ओल्या मातीच्या गोळ्यासारख्या, उत्सुक आणि कुतूहलाने भरलेल्या कोवळ्या मनांवर काही मूलभूत गोष्टी बिंबवण्याचं काम करत असल्याबद्दल डेबोराला धन्यवादच द्यायला हवेत.
शौझियाचा प्रवास वाचताना अनेकदा डोळ्यात पाणी उभं राहतं. रस्त्यावर सिग्नलपाशी उभी राहून फुगे विकणारी, गाड्यांच्या काचा पुसणारी, गोळ्या बिस्किटं विकणारी, बालमजूर म्हणून काम करणारी अनेक मुलं नकळत डोळ्यांसमोरून तरळून जातात. मनावर ओरखाडे उमटतात. पूर्वी "तुम्हाला कल्पना नाही, लोकांना खायला मिळत नाही तिकडे. उगीच इतका माज करू नये" वगैरे गोष्टी मला कोणी बोललं तर "मी काय करू मग?" असं मला फटकन म्हणावंसं वाटे. आज मी मोठी पण झाले आहे आणि शौझिया वाचल्यावर त्या वेळी त्या लोकांना नक्की काय अभिप्रेत असावं याचाही अंदाज मला आला आहे.
शौझिया अस्वस्थ करून सोडतं. शेवट काहीसा अपेक्षित आणि अपरिहार्य असला तरी एकीकडे शौझियाबद्दल कौतुक वाटत राहतं आणि बालपणाला सोडून सहज मोठ्या झालेल्या, परिस्थितीपुढे मान न वाकवणाऱ्या त्या लहान मुलीकडे पाहून एक क्षणभर 'पाडसा'ची आठवण होते. कुठेतरी दाटून येतं. हुरहूर लागते.

मला वाटतं यापेक्षा जास्त काही लिहून वाचणाऱ्यांच्या अपेक्षांवर माझा प्रभाव पाडण्यात अर्थ नाही. हा निबंध वाचल्यावर जर कोणाला हे पुस्तक वाचावंसं वाटलं तर तेच हा लेख टंकायच्या श्रमांचं(!) फलित आहे असं मी मानेन.
--अदिती
(माघ शु १३ शके १९२९,१९ फेब्रु. २००८)

Wednesday, December 05, 2007

शतेषु जायते शूरः .....॥

निन्दन्तु नीतीनिपुणाः यदि वा स्तुवन्तु
लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेच्छम्।
अद्यैव मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः॥

असं नीतिशतकात म्हटलंय. मानवी गुणांमध्ये शौर्य या गुणाचे महत्त्व फार मोठे आहे. वीर हा नेहमी रणांगणातच शोभून दिसतो म्हणतात. शेक्सपियर म्हणतो जग ही रंगभूमी आहे. ज्याला त्याला आपापल्या वृत्तीप्रमाणे जग वाटते असे माझे मत आहे. कोणाला जग रंगभूमी वाटेल तर कोणाला मरुभूमी.
पण मला मात्र जग , जग म्हणण्यापेक्षा जीवन ही रणभूमी वाटते. आमचा कायमचाच अर्जुन झालेला असतो. तोसुद्धा एकाग्रतेने , सव्यसाचीपणे सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनून तळपणारा नव्हे, तर कुरुक्षेत्रावर समोर युद्धाचा प्रसंग पाहून श्रीकृष्णाला ' सीदन्ति मम गात्राणि... ' असं सांगणारा. किंकर्तव्यविमूढ झालेला. असा अर्जुन होण्याचा प्रसंग रोजरोज येत असल्यामुळे कुठल्याही संकटकाळी न डगमगणारा आणि सर्व प्रकारची युद्धे लढून ती हमखास जिंकणारा, शक्तिमान तरीही नम्र, न्यायाचा मार्ग कधीही न सोडणारा, वचनाला जागण्यासाठी प्राणांचंही बलिदान देणारा आणि वर उद्धृत केलेलं नीतिशतकांतलं सुभाषित सार्थ करून दाखवणारा असा शूर वीर नायक जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मी थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिले. या वीराचं नाव मॅक्सिमस डेस्मस मरिलियस. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या 'ग्लॅडिएटर' या चित्रपटाचा नायक.
जितक्या वेळा हा चित्रपट पाहावा तितक्या वेळा त्याचे नवीनच कंगोरे हातात येतात. नाट्यमयता हा या चित्रपटाचा स्थायीभाव आहे. आणि खटकेबाज संवादांमधून त्या नाट्याची खुमारी उत्तरोत्तर वाढतच जाते.
हा आहे एक राजकारणाचा विशाल पट. यात एक राजा आहे. वृद्ध, जराजर्जर आणि तरीही जग पादाक्रांत करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतारवयातही कष्ट सोसणारा राजा. राजा कसला सम्राटच तो. एक चतुर्थांश जगावर ज्याची सत्ता चालते असा , अनिर्बंध, एकाधिकारशाही राजसत्तेचे प्रतीक असणारा सम्राट. पण हा सम्राट विचारी आहे. विवेकी आहे. न्यायी आहे. आयुष्याच्या अंताला आल्यावर त्याला आपल्या चुका कळतात. आयुष्याचं सिंहावलोकन करून तो नीरक्षीरविवेक करतो. जाताना या जगाला आपण काय देऊन जाणार? जग आपल्याला एक मूर्ख हुकूमशहा म्हणून ओळखणार का? असे प्रश्न त्याला पडतात.
यात एक सेनापती आहे. रोमच्या सम्राटाचा विश्वविजयी सेनापती. राजकारण्यांनाही चळचळा कापायला लावेल असे प्रचंड सैन्यबळ त्याच्या पाठीशी आहे. आपल्या शूर पण दिलदार स्वभावाने त्याने सैनिकांची मने केव्हाच जिंकली आहेत. त्याच्या एका शब्दासरशी त्याचे सैनिक वारा, वादळ, ऊन, तहान ,भूक, हाडं गोठवणारी थंडी यापैकी कशाचीही पर्वा न करता युद्धात स्वतःला झोकून देतात इतका त्यांचा आपल्या नायकावर विश्वास आहे. आणि त्याचंही आपल्या सेनेवर प्रेम आहे. या वीरांवर अन्याय होऊ नये म्हणून तो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो. त्याला मोठेपणाचा, पदाचा, प्रतिष्ठेचा हव्यास नाही. सेनापतीच्या वस्त्रांमध्येही तो एक साधा शेतकरीच राहिलेला आहे. आपल्या गव्हाच्या शेतात सोन्यासारखे दाणे पिकवावेत, आपल्या लाडक्या मुलाबरोबर काळ घालवावा ही त्याची एकमेव इच्छा आहे.
यात एक राजपुत्र आहे. पित्याच्या मृत्यूनंतर रोमचा राजा होण्याचं त्याचं स्वप्न आहे. स्वभावाने क्रूर, कपटी, पाताळयंत्री, सगळी मूल्ये धाब्यावर बसवणारा , वृत्तीने नीच असा हा मुलगा आहे. त्यातच नुकतंच आलेलं तारुण्य त्याच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालतंय. कणाकणाने झिजणाऱ्या, दर क्षणाला मृत्यूच्या आणखी जवळ जाणाऱ्या आपल्या पित्याबद्दल त्याला काडीचंही प्रेम नाही. उलट आपला बाप कधी मरतो याचीच तो वाट पाहत बसला आहे. तो शूर असल्याचा आव आणतो पण त्याचं काळीज सशाचं आहे. मरणाची भीती त्याला वाटते.
या राजपुत्राला एक मोठी बहीण आहे. ल्युसिला तिचं नाव. नुकतेच वैधव्य आले असल्यामुळे आपल्या आठ वर्षांच्या मुलाला घेऊन ती माहेरी आली आहे. रोमन सम्राटाची मुलगी असल्यामुळे राजकारण तिला नवीन नाही. ती त्यात चांगलीच मुरलेली आहे. सध्या तरी आपल्या भावाला राजा होण्यासाठी ती सर्वार्थाने मदत करते आहे. एके काळी ती मॅक्सिमसच्या प्रेमात होती. तिने त्याला आपला स्वीकार करण्याची विनंती केली होती. पण मॅक्सिमसचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे त्याने ही मागणी धुडकावून लावली होती. अजूनही ती मॅक्सिमसला विसरू शकलेली नाही. विजयानिमित्त सीझरने दिलेल्या मेजवानीच्या प्रसंगीही ती गवाक्षातून चोरून मॅक्सिमसकडे पाहते. ल्युसिला आपल्या भावापेक्षा - कॉमोडसपेक्षा सर्वच बाबतीत उजवी आहे. केवळ ती मुलगी आहे म्हणून, नाहीतर ती खूप चांगली सम्राट होऊ शकली असती. तिच्या वृद्ध पित्याच्या नजरेतून तिचं मॅक्सिमसकडे बघणंही सुटलेलं नाही आणि तिचा भावाला असलेला पाठिंबाही सुटलेला नाही. सीझरच्या दृष्टीने ल्युसिलाला राणी करणं हा योग्य पर्याय ठरू शकेल हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं.
या चार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा या चित्रपटाचा भार सांभाळणाऱ्या भव्य स्तंभांप्रमाणे आहेत. आणि यांच्या अवतीभवती उभा आहे तो रोमच्या राजमुकुटाचा काटेरी मार्ग.
चित्रपटाला सुरुवात होते ती सीझर मार्कस ओरिलियसच्या शेवटच्या लढाईपासून. ज्ञात जगाचं हे शेवटचं टोक आहे. जर्मेनियामधल्या रानटी टोळ्या तहाचा मार्ग धुडकावून लावतात आणि मॅक्सिमस सूर्यासारखा आग ओकत रणांगणात उतरतो. मॅक्सिमस हा मूर्तिमंत पराक्रम आहे. आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा देऊन तो त्यांच्यातलाच एक म्हणून लढतो. विजयश्री खेचून आणतो.
या विजयानिमित्त सीझर मार्कस ओरिलियसने आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये रोमच्या संसदेचे सदस्य आलेले आहेत. एके काळी लोकाधिकार असलेल्या रोमवर सध्या सीझरची अनिर्बंध सत्ता आहे. संसदेतले हे लोकप्रतिनिधी ज्याच्या बाजूला असतील त्याला सत्ता मिळण्याचा मार्ग सुकर होईल असं साधं सोपं समीकरण आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेला अधिक मुरड घालू न शकणारा कॉमोडस या लोकप्रतिनिधींचे साहाय्य मिळावे म्हणून खेळी खेळतो आहे. काही लोकप्रतिनिधी त्याला बधतात. काही अधिक विचारी सांसद सावध पावलं टाकू पाहतात. त्यांना रोममध्ये पुन्हा लोकशाहीची स्थापना झालेली हवी आहे. सत्तेच्या मार्गामध्ये आपल्याला जर सैन्याची मदत झाली तर आपण संसदेला धाब्यावर बसवू शकतो हे कळण्याइतका कॉमोडस हुशार आहे. तो खुबीने मॅक्सिमसचा कल जाणून घेऊ पाहतो. मॅक्सिमस हा तलवारबहाद्दर असला तरी राजकारणातल्या डावपेचांचा त्याला तिटकारा आहे. कसलेही छक्केपंजे न करता तो आपली निष्ठा सीझरवर आणि पर्यायाने रोमवर असून व्यक्तिगत लांगूलचालन आपल्याला जमणार नाही हे स्पष्ट करतो. लाडावलेल्या आणि 'नाही' हा शब्द माहीत नसलेल्या हट्टी कॉमोडसला हा सरळ नकार पचणं शक्यच नाही. पण वरवर तरी तो तसे काही दाखवत नाही.
रोमची सत्ता म्हणजे पतंगांना आकृष्ट करणारा एक रत्नदीप आहे आणि या रत्नदीपाचं भासमान स्वामित्वदेखील कोणा एकाच्या हाती फार काळ राहू शकणार नाही हे आपल्याला या मेजवानीमध्ये जाणवतं. एका सम्राटाच्या होऊ घातलेल्या अस्ताबरोबर तीव्र होऊ पाहणाऱ्या सत्तासंघर्षाचं बुद्धिबळाच्या पटासारखं त्रिमित रूप या मेजवानीमध्ये अगदी ठळकपणे दिसतं. आपल्या मुख्य पात्रांची, त्यांच्या स्वभावांची नेमकी ओळख आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांची नांदी इतक्या रोचक पद्धतीने आणि इतक्या कमी वेळात करून देणाऱ्या पटकथाकाराच्या प्रतिभेला ' हॅट्स ऑफ ' असंच म्हणावंसं वाटतं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ. सीझर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मॅक्सिमसला आपल्या तंबूत बोलावतो आणि मॅक्सिमसला त्याच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे सांगायला सांगतो. मॅक्सिमसला घरी जायचं आहे. त्याला तीन वर्षात घरी जायला मिळालेलं नाही. जिंकण्याजोगा प्रदेश संपला म्हणजेच युद्ध संपलं आणि युद्धाखेरीज इतर कशातही मॅक्सिमसला रस नाही. मॅक्सिमसच्या अंगी असलेल्या, धैर्य, न्यायी बुद्धी, सत्याची चाड, दिल्या शब्दाला जागण्याची वृत्ती, अतुल आणि निःसंशय निष्ठा आणि अर्थातच धगधगता अतुलनीय पराक्रम या गुणांमुळे सीझरच्या मनात काही वेगळंच घाटतंय. अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्रित आणि लोभी कॉमोडस राज्यावर बसला तर किती मोठा अनर्थ होईल हे सीझर चांगलाच ओळखून आहे. म्हणूनच पुत्रप्रेमाने आंधळा न होता तो एका राजाचं कर्तव्य बजावतो. आपल्यानंतर राज्याच्या रक्षणाची जबाबदारी तो मॅक्सिमसवर सोपवू इच्छितो आहे. मॅक्सिमसने रोमचा पालक होऊन तिथे लोकशाहीची पुनर्स्थापना करावी आणि ही शेवटची कामगिरी पार पाडल्यावर सुखाने निवृत्त होऊन घरी जावं असं तो त्याला सांगतो. असं करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करताना तो म्हणतो, " राजा हा पालनकर्ता असावा लागतो. हे काम मी तुझ्यावर सोपवतो आहे कारण तुला रोमचा सत्ताधीश व्हावं असं मुळीच वाटत नाही. सत्तेचा हव्यास तुला स्पर्श करू शकत नसल्यामुळे तूच सत्तेचा पालक होऊ शकशील. या बाबतीत तुझा स्वार्थ कधीच आड येणार नाही हे मला माहीत आहे. तूच माझा मुलगा होण्यास लायक आहेस. तू माझा मुलगा असायला हवा होतास. कॉमोडस सारख्या न्यायनीती धाब्यावर बसवणाऱ्या मुलाला राजा होऊ देण्यासारखा अनर्थ नाही. तो माझा उत्तराधिकारी असणार नाही ही गोष्ट मी स्वतः त्याला सांगणार आहे. या बाबतीत मी तुला आदेश देणार नाही पण तू ही कामगिरी करावीस अशी माझी आत्यंतिक इच्छा आहे."
सम्राट मॅक्सिमसला आपला मुलगा मानतो यातून त्याचा मोठेपणा अधोरेखित होतो. पोटच्या मुलाबद्दलचं प्रेम न सुटल्यामुळे राज्यं बेचिराख झालेली इतिहासाने पाहिली आहेत. पण इथे मात्र उपभोगशून्य स्वामी होऊन रोमची सत्ता पुन्हा एकदा लोकांच्या हाती देण्याची जबाबदारी मॅक्सिमसवर सोपवून सीझर त्याचा बहुमानच करतो.
इथे कथेतल्या नाट्यमयतेचा पहिला चरम बिंदू आपल्याला बघायला मिळतो. आयुष्यभर हुकूमशहा म्हणून अनिर्बंध अधिकाराने राज्य केलेल्या सीझरला शेवटी झालेला साक्षात्कार, रोमसारख्या विश्वविजयी राज्याची सत्ता आपल्या हाताने लोकांच्या हातात देण्याची त्याची तळमळ, त्याच सत्तेसाठी वेड्या झालेला आपल्या पुत्रापेक्षा लायक उमेदवार समोर आहे हे पाहून त्याला रोमच्या सत्ताबदलासाठी सर्वाधिकार देणारा हा सम्राट एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व सांगून जातो.
त्याच रात्री कॉमोडस सीझरचा गळा दाबून खून करतो. एक माणूस म्हणून मुलाचं अपयश हे एक पिता म्हणून आपलं अपयश आहे अशी कळवळून दिलेली कबुली उच्चारतानाच त्या जराजर्जर सम्राटाचा पोटच्या मुलाकडून कपटाने खून होतो. मॅक्सिमसचा पाठिंबा आपल्याला कधीच मिळणार नाही हे ओळखून त्याचा काटा काढायचा कॉमोडसचा बेत अयशस्वी होतो खरा पण मॅक्सिमसची पत्नी आणि त्याचा आठ वर्षांचा मुलगा यांना मात्र हालहाल करून मारण्यात येत. सर्वस्व लुबाडला गेलेला परागंदा मॅक्सिमस बेशुद्धावस्थेत एका गुलामांच्या व्यापाऱ्याला सापडतो आणि डोंबाऱ्यांसारखे तलवारीचे खेळ करून दाखवणारा तमासगीर मुलाम अर्थात ग्लॅडिएटर म्हणून आयुष्य काढण्याची वेळ त्याच्यावर येते. रोमचा सर्वशक्तिमान सेनापती एक तमासगीर होतो तेव्हा नियतीच्या खेळाबद्दल हसूही येतं आणि रडूही.
राजा म्हणून नालायक असलेला कॉमोडस लोकांचं लक्ष आपल्या ढिसाळ कारभारावरून काढून ते दुसरीकडे वेधून घेण्यासाठी एक अचूक चाल खेळतो. जुन्या सीझरने तलवारबाजीच्या खेळावर घातलेली बंदी उठवून तो त्या खेळांचा महोत्सवच आयोजित करतो. रोमचे प्रजाजन म्हणजे फक्त एक जमाव आहे आणि जो कोणी या जमावावर नियंत्रण मिळवेल त्याला रोमच्या सत्तेपासून कधीही दूर जावं लागणार नाही हे कॉमोडसने ओळखलं आहे. त्याची ही चाल इतकी बिनतोड आहे की राजकारणात मुरलेले आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी झटणारे सेनेटर ग्राकस सारखे लोकही हा सगळा खेळखंडोबा नुसता बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत.
या खेळात आपलं नशीब फळफळेल या आशेने मॅक्सिमसचा मालक आपल्या गुलामांना घेऊन रोममध्ये येतो. इथे चित्रपटाचा दुसरा सगळ्यात मोठा नाट्यमय बिंदू आपल्याला पाहायला मिळतो. एक तर गेल्या शंभर वर्षात रोमच्या सेनेने रोम शहरात पाऊल ठेवलेलं आही. त्यामुळे मॅक्सिमसनेही रोम कधीच पाहिलेलं नाही. जगाची राजधानी, लोकशाहीची गंगोत्री, अमर्यादित सत्ताकेंद्र, लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातल्या संघर्षाचा केंद्रबिंदू अशा अनेक पैलूंमुळे रोमचं महत्त्व वादातीत आहे. आणि अशा रोमचा राजनियुक्त पालक मॅक्सिमस कोणाच्याही नकळत एक नामहीन, अस्तित्वहीन गुलाम म्हणून रोम शहरात पाऊल ठेवतो. नियतीचा हा दुसरा वार आहे. अर्थात नियतीच्या हातातलं बाहुलं होऊन राहण्याऐवजी, टँजंट जाणारा बिंदू जसा वर्तुळाच्या त्या बिंदूला लंबरूप जाताना वर्तुळाचे शून्यमंडळ भेदून जातो तसा आपल्या कथेचा नायक नियतीचा हा वाकडा फास छेदून तिच्या कक्षेच्या पार निघून जाताना आपल्याला दिसतो.
मॅक्सिमस जिथे येऊन पोचला आहे ते रोमचं प्रसिद्ध कलोझियम आणि तिथली युद्धभूमी अर्थात अरीना या चित्रपटात अनेक पैलू घेऊन येणारी एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे. ' असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ' अशा वृत्तीने लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या योद्ध्याची लढाई बघण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळं करून उभं राहणाऱ्या आणि त्या लढाईतून आपलं मनोरंजन करून घेणाऱ्या रोमवासीयांचं हे कलोझियम हे जगातल्या सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे असं वाटून जातं.
कलोझियममधे विशेष गुणवत्ता दाखवणाऱ्या तलवारबाजांना सीझरकडून एक लाकडी तलवार मिळते. ही तलवार त्यांच्या दास्यत्वातून मुक्तीचं प्रतीक असते. मॅक्सिमसचा मालक या तलवारीचं आमिष दाखवून त्याला उत्तम खेळ करून दाखवण्यासाठी उद्युक्त करू पाहतो. पण ' मारा किंवा मरा ' चा हा हिंस्र खेळ करून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या सामान्य तलवारबाजांपेक्षा ज्ञानाने, कर्तृत्वाने, मानाने खूप मोठ्या असलेल्या मॅक्सिमसचे डोळे मात्र पैलतीराला लागलेले आहेत. वृद्ध सीझरची अखेरची इच्छा एखाद्या फासासारखी गळ्याला खुपते आहे आणि बायको - मुलावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचाय या एकाच इच्छेने तो अरीनामधे उतरतो. नियतीच्या या अजब खेळात मॅक्सिमसच्या अंगातले नैसर्गिक नायकाचे गुण उचंबळून येतात. आपल्या सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून सांघिक प्रयत्नांनी तो हेही युद्ध जिंकतो. रोमच्या जनतेने आजवर इतकं प्रेक्षणीय काही पाहिलेलंच नाही. कलोझियममधला हजारो लोकांचा समुदाय अक्षरशः खुळावल्यासारखा मॅक्सिमसचा जयजयकार करतो. नवीन सीझर कॉमोडसलाही त्याची दखल घेणं भाग पडतं.
जिंकल्यानंतर फुरफुरणाऱ्या घोड्यावरून प्रेक्षकांना अभिवादन करणारा गुलाम मॅक्सिमस हा संपूर्ण चित्रपटातील माझा सर्वात आवडता क्षण आहे. त्याच्या अंगावरची गुलामीची लाजिरवाणी कातडी फाडून त्याच्यातला विश्वविजयी सेनापती झळाळणाऱ्या सोन्यासारखा बाहेर येताना बघून आता हा नियतीला काटशह नक्की देणार अशी खात्रीच पटते.
या पराक्रमी तलवारबाजाची एका क्षणात आभाळाला भिडलेली लोकप्रियता सहन न होऊन कॉमोडस त्याला भेटायला आपल्या आसनावरून खाली अरीनामधे उतरतो. खरे तर आताच हातातल्या शस्त्राने त्याची कंठनाळ भेदून आपला सूड पुरा करायचा अशी मॅक्सिमसची इच्छा आहे. पण कॉमोडसच्या पुढ्यात उभा असलेल्या ल्युसिलाच्या मुलाला - ल्युसिअसला पाहून त्याला कुठेतरी दुसऱ्या जगात त्याची आतुरतेने वाट पाहणारा आपला मुलगा आठवतो. हातातलं शस्त्र खाली टाकून तो मागे वळतो. त्यानंतरचा संवाद तर जगप्रसिद्धच आहे. कॉमोडसने खूपच हट्ट केल्यावर आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढून मॅक्सिमस जेव्हा त्याच्या समोर उभा राहतो तेव्हा मात्र कॉमोडसच्या पायाखालची जमीन निसटते. आधीच अतुलनीय शौर्याने जनतेच्या गळ्यातला ताईत झालेला मॅक्सिमस आपल्या सीझर मार्कस ओरीयसवरील निष्ठेचा पुनरुच्चार करतो आणि एका क्षणात नियतीची पारडी फिरतात. एक गुलाम सीझरपेक्षाही मोठा होतो. अरीनाच्या लुटुपुटूच्या युद्धभूमीवर एका गुलामाकडून रोमन सीझरचा पराभव होतो.
कॉमोडस मॅक्सिमसपुढे नेहमीच खुजा होता. पण आजवर हे सत्य रोमन जनतेच्या लक्षात आलं नव्हतं. आता मात्र कॉमोडस - मॅक्सिमसमधला विरोधाभास लोकांच्या नजरेत अगदी ढळढळीतपणे आला आहे. कॉमोडसच्या एकेक कपटी वाराला सहज तोंड देणारा मॅक्सिमसचं नेतेपण आता लोकांबरोबरच सेनेटर ग्राकसलाही मान्य झालं आहे. ल्युसिअसच्या जिवाची भीती घालून अन्याय्य आणि अनैतिक मागण्या करणाऱ्या कॉमोडसचं खरं रूप पाहून मुळापासून हादरलेली ल्युसिलाही आता मॅक्सिमसला पाठिंबा देते आहे. ल्युसिअसकडे पाहून आपल्या निष्पाप मुलाची आठवण येणारा मॅक्सिमस ल्युसिलाचा संघर्ष पाहून अखेरीस तिची साथ स्वीकारतो. रातोरात रोममधून बाहेर पडून आपल्या सेनेला घेऊन दोन दिवसात रोमवर कब्जा मिळवायची योजना ल्युसिला, मॅक्सिमस आणि सेनेटर ग्राकस आखतात. पण ऐनवेळी ग्राकसला अटक होते, मॅक्सिमसला दगा देऊन पकडलं जातं आणि कॉमोडस ही योजना उधळून लावतो.
या परिस्थितीमध्ये मॅक्सिमसचा खून किंवा वध झाला तर तो हुतात्मा होईल आणि जनतेचा असंतोष उफाळून येईल हे ओळखून कॉमोडस अखेरचा विषभरा दंश करतो. रोमच्या लोकांसमोर कलोझियमच्या अरीनामध्येच मॅक्सिमसला लढाईत मारायचा बेत कॉमोडस आखतो. त्याने आपली लोकप्रियता परत येईल अशी त्याला खात्री असते.
आपल्याविरुद्ध कट करताना पकडल्या गेलेल्या सख्ख्या मोठ्या बहिणीला ल्युसिअसच्या जिवाची भीती घालून आपल्याशी लग्न करायला भाग पाडणारा कॉमोडस अजूनही सशाच्या काळजाचाच आहे. साक्षात मृत्यू समोर उभा राहिल्यावर त्याच्याकडे हसून पाहण्याची धमक त्याच्याकडे नाही. रणांगणात आपण मॅक्सिमसला सरळसरळ कधीच नमवू शकणार नाही हे ओळखून युद्ध सुरू व्हायच्या आधी मॅक्सिमसच्या पाठीत तो खंजीर खुपसतो. जखमी अर्धमेल्या अवस्थेत मॅक्सिमसला रणांगणावर आणलं जातं. आणि सुरू होतो एका विश्वविजयी योद्ध्याचा सर्वश्रेष्ठ रणसंग्राम.
त्याही अवस्थेमध्ये शत्रूवर जीवघेणे प्रहार करीत, त्याचे प्रहार चुकवीत मॅक्सिमस त्याला निःशस्त्र करतो. धर्मयुद्धाचे नियम कधीच न विसरणारा सच्चा सैनिक असल्यामुळे कॉमोडस निःशस्त्र केल्यावर तो आपली तलवारही टाकून देतो. आता मात्र कॉमोडसला भान राहिलेलं नाही. आसपास उभ्या सैनिकांकडे तो तलवार मागतो. पण युद्धाच्या नियमांप्रमाणे त्याला तलवार मिळणार नाही हे लक्षात आल्यावर आपल्याच पायापाशी लपवलेला खंजीर काढून तो मॅक्सिमसवर वार करू पाहतो. नेहमीच परिस्थितीपेक्षा मोठा होणारा खराखुरा धीरोदात्त नायक मॅक्सिमस त्याच खंजिराने उरल्यासुरल्या शक्तीनिशी कॉमोडसला कंठस्नान घालतो.
रोमच्या लाखो प्रजाजनांच्या साक्षीने कपटी कॉमोडसचा अंत होतो. आता मात्र मॅक्सिमसला 'त्या' जगापासून अधिक काळ दूर राहणं शक्य नाही. तो ती वाट चालूही लागतो. पण त्याच्या घराच्या उंबरठ्याशी त्याचे प्राण अडखळतात. अजून त्याने त्याची सगळी कर्तव्यं बजावलेली नाहीत. ल्युसिलाला पाहून तो थांबतो. ल्युसिअसचं भविष्य सुरक्षित असल्याची तो तिला ग्वाही देतो. सेनेशिवाय लढलेला हा रोमचा खरा सत्ताधीश रोममध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचे आदेश देतो. जर्मेनियाच्या सीमेवर बर्फात गोठणाऱ्या आणि स्वार्थी राजकारणामुळे अन्याय सोसत खितपत पडलेल्या आपल्या प्रिय सैनिकांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल करतो. शेवटी सीझरच्या जात्या जिवाच्या अखेरच्या इच्छेला आपण योग्य न्याय देऊ शकलो या समाधानात इहलोकातून परलोकाचा त्याचा प्रवास संपतो. त्या जगात त्याचे आप्त त्याला भेटतात रोममध्ये एक नवी पहाट होते. आयुष्यभर अनेक लढाया जिंकलेला हा वीर मरताना माणसांपेक्षा, नियतीपेक्षा , एवढंच नाही तर प्रत्यक्ष जीवनापेक्षाही मोठा होतो. एका सुडो-आफ्रिकन भाषेत लिहिलेल्या गाण्याचे सूर आपल्याही कानात घुमत राहतात. हा प्रसंग नाट्यमयतेची चरम सीमा गाठणारा तिसरा बिंदू ठरतो.
या शोकांतिकेचा हा शेवट इतका परिणामकारक आहे की तो लख्ख सूर्यप्रकाशही क्षणभर करडा वाटायला लागतो. ग्रीक ऑपेराचे सूर काळजाला विद्ध करून जातात. असं वाटतं की काळाचं हजारो वर्षांच अंतर कुठल्या कुठे नाहीसं झालंय आणि हा क्षण त्या क्षणाशी एकरूप झालाय. त्या गाण्यातल्या शब्दांचा अर्थ कळत नाही पण 'आता मी मुक्त आहे' असा त्यातला भाव समजायला शब्दांची गरजच पडत नाही. डोळे मिटून बसलं तर संपूर्ण चित्रपट डोळ्यांसमोर जसाच्या तसा पुन्हा एकदा पाहता येईल इतका सखोल परिणाम करणारा दुसरा चित्रपट माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही.
बाकी चित्रपटाची पटकथा घट्ट आणि बांधेसूद आहे. दिग्दर्शकाचं कौशल्य वादातीत आहे. कलोझियममधली दृश्यं तर संगणकावर घडवून नंतर इथे चिकटवली आहेत अशी शंकासुद्धा येऊ नये इतकी बेमालूम जमली आहेत. युद्धाचे प्रसंग अंगावर काटे उभे करतात. पहिल्या लढाईच्या चित्रीकरणाच्या वेळी जंगलातील झाडांना इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणाऱ्या आणि नंतर इथे असं काही घडलं होतं अशी शंकाही येऊ नये अशी चोख साफसफाई करणाऱ्या निसर्गप्रेमी तंत्रज्ञांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट झाल्यामुळे ही एक जमून आलेली भट्टी ठरली आहे. मॅक्सिमसची लार्जर दॅन लाईफ भूमिका जिवंतपणे साकारणाऱ्या रसेल क्रो या गुणी अभिनेत्याबद्दल तर काय सांगावं? कुठेही भडकपणा किंवा बटबटीत छटा न येऊ देता त्याने उभा केलेला मॅक्सिमस अक्षरशः अविस्मरणीय आहे. या अभिनेत्याची खरी ताकद ' अ ब्यूटिफुल माइंड ' या चित्रपटात त्याने उभ्या केलेल्या नोबेल विजेत्या स्किझोफ्रेनिक शास्त्रज्ञाकडे बघून लक्षात येते. विशेषतः ग्लॅडिएटर पाहिल्यावर जर ब्यूटिफुल माइंड पाहिला तर त्याने डॉ. जॉन नॅश यांचं व्यक्तिमत्त्व साकारताना मुळातून बदललेली संपूर्ण देहबोली पाहून थक्क व्हायला होतं.
चित्रपट पाहताना प्रेक्षकांना हे सगळं केवळ काल्पनिक आहे या गोष्टीचा संपूर्णपणे विसर पडतो आणि ते पडद्यावरच्या कथेशी अगदी एकरूप होऊन जातात. इतकं जबरदस्त सामर्थ्य या चित्रपटात आहे यातच मला वाटतं सारं काही आलं.

--अदिती
(१४ नोव्हेंबर २००७,
कार्तिक शुद्ध ४ शके १९२९)

Tuesday, October 23, 2007

द सीक्रेट ऍडव्हर्झरी

ऍगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथा वाचताना आपण एका जागी खिळून असतो. एखाद्या नागराजाने आपल्या भक्ष्याला मोहिनी घातल्यावर ते भक्ष्य जसं भयचकित होऊन हालचाल करायचं देखिल विसरून जातं ना अगदी तशीच आपली अवस्था होते. पॉयरॉ श्रेष्ठ की होम्स हा सध्या जिकडेतिकडे अगदी हमखास रंगणारा वाद झाला आहे. त्यात मला पडायचं नाही कारण मी पॉयरॉच वाचलेला नाही. पण होम्सची मोहिनी , गारुड, जादू, भुरळ काय वाट्टेल ते म्हणा, मला इतकं जखडून घालते की बास. असो हा लेख काही शेरलॉक होम्सचं गुणवर्णन करावं म्हणून लिहिलेला नाही.

नुकतंच ख्रिस्तीबाईंचं द सीक्रेट ऍडव्हर्झरी हे पुस्तक वाचनात आलं. 'देन देअर वेअर नन' नंतर सीक्रेट ऍडव्हर्झरी म्हणजे लहान मुलांचा खेळ आहे असं सुरुवातीला वाटून गेलं. पण या बाईची कथानकावरची पकड इतकी भक्कम आहे की हा पोरखेळ सुद्धा खिळवून ठेवण्यात अतिशय यशस्वी झाला. कसोटी असो की एक दिवसीय सामना सचिन तेंडुलकर जसा सूर्यासारखाच तळपतो तशीच ही रणजी मॅचसुद्धा एक वाचक म्हणून मला दिपवायाला पुरेशी वाटली. या बाई एका टोपणनावाने प्रेमकथा लिहीत असत असं कुठेतरी वाचलं होतं. यात प्रेमकथेचा भाग अगदी नगण्य आणि काहीसा अपेक्षितच असला तरीही मला तो आवडला.

साधारण पहिलं महायुद्ध संपत असताना, लुसिटानिया बोट बुडाली तेंव्हा सुरू होणारी ही कथा अनेक वळणं, काही सुखद काही दुःखद झटके देत देत इष्टस्थळाला पोहोचते तेंव्हा घालवलेला वेळ सार्थकी लागल्याचं समाधान नक्कीच मिळतं. विशीच्या आसपासच्या लोकांमधे जीवनाची आव्हानं स्वीकारण्याचा जो नैसर्गिक जोम असतो आणि आपण जे करू त्यात यशस्वी होऊच असा जो भाबडा आशावाद असतो त्याने भरलेले दोन तरुण लोक यात आहेत. 'यंग ऍडव्हेन्चरर्स' या नावाने ते चक्क एक कंपनी काढतात. टुपेन्स आणि टॉमी ही ती जोडी. टुपेन्स स्त्रीसुलभ आत्मविश्वासाने आणि मुली मुलांपेक्षा हुशार असतात या विश्वासाने (किंवा आपण टॉमीपेक्षा निश्चित जास्त हुशार आहोत या खात्रीने) यंग ऍडव्हेन्चरर्सचं सुकाणू आपल्या हातात घेते खरी पण ते काही तितकंसं सोपं काम नाही हे लवकरच तिला कळून चुकतं. टॉमीने तर काय पुस्तकाच्या खऱ्या हीरोचं काम अगदी उत्कृष्ठपणे वठवलंय. अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याने दाखवलेलं चातुर्य आणि अडचणीच्या वेळी आश्चर्यकारकपणे शांतपणे विचार करणारा त्याचा मेंदू अफलातूनच. या दोन व्यक्तिरेखा विलक्षण लोभस उतरल्या आहेत. आणि निःसंशय सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. बाकी पात्रांची नावं आणि वर्णनं देऊन भावी वाचकांचा रसभंग न करणंच उत्तम. एकेक पात्र अवतरतं आणि कोरम जमत जातो तसतशी मजा वाढत जाते. पण एकेक पात्र म्हणजे एकेक नमुना आहे हे मात्र जाताजाता सांगते.

या कथेचं मला जाणवलेलं वैशिष्ठ्य म्हणजे यात पात्र मुळातच थोडी आहेत. आणि ती सतत आपल्या नजरेसमोर बांधून पण घातलेली नाहीत. तरीही ऍगाथा ख्रिस्तीचे चाहते या नात्याने आपण त्यातल्या प्रत्येकावर संशय घेत राहतो. (मी तर फक्त टुपेन्स वर संशय घेऊ शकले नाही. बाकी सगळ्यांवर ती सुई कधी ना कधी रोखली होतीच!) सगळी परिस्थिती आपल्यासमोर अगदी उघड करून सांगतानाही आपला पुरेसा गोंधळ उडवून द्यायचं या बाईंचं कसब खरंच थोर आहे. सगळ्या व्यक्तिरेखा अगदी ठळक, सुस्पष्ट. सगळी वर्णनं अचूक. नेमकी. कथेचा वेग आणि ओघ खुर्चीत शांत बसणं अशक्य करणारे. वाचकाला विचार करायला सवडच न देता नुसते धक्क्यांवर धक्के देण्याचं हे तंत्र अगदी अचूकपणे, हुकुमीपणे वापरलंय इथे. सगळा मामला अगदी चोख आहे. एखाद्या कंजूष बनिया मारवाड्याप्रमाणे, एक भरीचा शब्द नाही, उल्लेख नाही की वळण नाही. तसा कथेचा जीव लहान मुलांच्या सहसकथांच्या इतकाच ठरावा पण मी वर म्हटल्याप्रमाणेच 'रणजी' तच काय पण गल्ली क्रिकेटमधेही सचिन तेंडुलकर सचिन म्हणूनच खेळतो ना(किंवा खेळायचा.... गेले ते दिवस असं काही लोक ठासून सांगत असतात त्यांच्या पत्रांची मारामारी नको!) त्यामुळे ही इटुकली कथा संपेपर्यंत पुस्तक हातातून अगदी सोडवत नाही. जाता जाता डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स वाचून त्यातलं सगळं खरं असतं असं मानणाऱ्यांनाही काही कोपरखळ्या मारलेल्या आहेत. त्या वाचताना जाम हसू येतं. आणि वर्णनशैली तर कथेचा प्राण आहे. पात्रांशी आपण अगदी चटकन एकरूप होतो. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. प्रसंगानुरूप अरेरे.., काय हे, केवढा हा मूर्खपणा, अरे देवा वाचव रे याला/हिला, किंवा असलेच कायकाय उद्गार आपल्या तोंडून कधी निघून जातात कळतच नाही. रहस्यदेखील इटुकलं असलं तरी अनपेक्षित असल्याने चांगला धक्का देऊन जातं ही अजून एक जमेची बाजू.

मधेमधे युरोप - अमेरिकन संस्कृतींचं एकमेकींना खेटून जाणं, आमचं वळण सरळ तुमचंच वाकडं वगरे भागही पदार्थातल्या मिठाइतका आहे आणि मिठासारखा चविष्टही झाला आहे. कंटाळा येण्याच्या आत पुस्तक संपतं पण दीर्घकाळ मनात रेंगाळून राहतं हे त्याचं खरं यश असावं बहुधा.
एका बैठकीत सगळं पुस्तक अक्षरशः अधाश्यासारखं वाचून काढल्यामुळे माझ्यावर त्याचा कदाचित जास्त परिणाम झाला असेल. मध्यंतर नसलेल्या सिनेमाचा होतो तसा. पण ते वाचल्यावर परीक्षण लिहिल्याशिवाय अगदी राहवलंच नाही. नाही म्हणायला सुरुवाती सुरुवातीला बन्याची नाही पण मालीची आठवण अनेक वेळा झाली. नंतर मात्र ट्टॉक्क वगरे टिकटिकायचंही विसरायला झालं होतं.

अर्थात रहस्यकथा वाचून निर्ढावलेल्या किंवा होम्ससारख्या बौद्धिक चमत्कृतींची अपेक्षा ठेवून वाचणाऱ्या व्हेटरान लोकांचा कदाचित अपेक्षाभंग होईल. तसं झाल्यास मला क्षमा करावी ही विनंती. पण आमच्या ऑफिसच्या बुक- क्लबमधे वाचनीय पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचं नाव असल्यामुळे असा अपेक्षाभंग होणारे फार लोक नसतील असं वाटतं आहे.

हा एवढा निबंध वाचून (सुद्धा!) कोणी हे पुस्तक वाचलं आणि त्याला/ तिला ते आवडलं तर आनंद वाटून घेतल्याने द्विगुणित झाल्याचा आनंद नक्की होईल म्हणून हा सगळा खटाटोप.
--अदिती (२३ ऑक्टोबर २०७)

Wednesday, May 02, 2007

माझे काही हीरोज!

हिरो या शब्दाचा मूळ अर्थ बहुधा शूरवीर किंवा सेनापती असा असावा.(संदर्भ: अ हिरो हॅज फॉलन हे एज ऑफ मायथॉलॉजीमधले वाक्य!). पण मराठीत हिरो कसं म्हणावं याबद्दल मोठाच प्रश्न होता. कारण वीर म्हणायला जावं तर सगळ्यात आधी ते उपहासात्मक वाटतं. अंतू बर्वा ऐकत ऐकत लहानाची मोठी झाल्यामुळे आणि रत्नागिरीच्या मधल्या लोकोत्तर आळीशी बराचसा थेट संबंध असल्यामुळे जिभेला तिरकं वळणा आपसूकच आलंय. दुसरं म्हणजे आपल्या थोर हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रभावामुळे पंजाबी मुली आपल्या मोठ्या भावाला 'वीर' म्हणतात हे ऐकलेलं आहे. माझ्या या हिरोज ना मोठा भाऊ म्हणणं मला फारसं आवडणारं नाही. बरं नायक म्हणावं तर आम्ही सगळे इट्स माय लाईफ असं म्हणत आपल्या आयुष्याच नायकपद स्वतःकडेच असल्याचं बजावून सांगणाऱ्या पिढीचे शिलेदार! त्यामुळे माझ्या आयुष्यात हे एवढे सगळे नायक कसे येणार असा प्रश्न पडेल असं वाटायला लागलं. त्यामुळे माझे हिरोज असंच म्हणायचं हे ठरलं.
ही सगळी हिरो मंडळी काही अपवाद सोडता त्रिमितीय हाडामासाची माणसं नसून द्विमितीय पुस्तकातली पात्रं आहेत. अनेकदा पुस्तकातल्या व्यक्तिरेखा खऱ्या माणसांइतकंच काहीतरी सांगून जातात. त्यामुळेच ती मनात घर करून राहतात. अगदी नारायण-नंदा प्रधानापासून मधू मलुष्ट्यापर्यंत तमाम वल्ली जशा प्रसंग येताच अचानक प्रकट होतात आणि सुखद धक्का देऊन जातात तशीच ही हिरो लोकं अनेक वळणांवर भेटत राहतात.
माझ्या आयुष्यातल्या हिरोज मध्ये पहिला मान हा कुमार जगताच्या लाडक्या हिरोचा म्हणजे फास्टर फेणेचा आहे. माझी वाचनाची वाढती भूक कशी भागवावी हा प्रश्न मी फार लहान वयातच आई-बाबांच्या पुढ्यात टाकला. चांदोबा, ठकठक, चंपक, किशोर मला फार फार तर दोन तास पुरायचे . साप्ताहिक सकाळमध्ये येणाऱ्या कथा वाचायला मी अजून खूपच लहान होते. मग मे महिन्याच्या सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयात आमची रवानगी झाली. तिथे एप्रिल-मे मध्ये बालविभाग तिसऱ्या मजल्यावरच्या खूप कपाटं ठेवलेल्या मोठ्या खोलीत असायचा. घराच्या भिंतींऐवजी पुस्तकांची कपाटं असावीत हे स्वप्न बहुधा तेंव्हापासून असावं. लाडवाला आलेल्या मुंग्या अशाच लाडवात घर करतात आणि भिंती खातात असं माझं मत होतं. एके दिवशी सकाळी फा.फे ची आणि माझी पहिली भेट झाली. बुद्धिबळाच्या पटासारखा चौकटींचा शर्ट घालणारा किडकिडीत आणि तुडतुडीत असा हा प्राणी मला जाम आवडला. प्रथमच मला कोणीतरी "लहान आहेस अजून..." असं न म्हणणारं भेटलं याचा आनंद खूप मोठा होता. मग मी फा.फे वाचतच गेले. ते जग माझ्यासाठी नवं होतं. मोठ्या भावंडांच्या गप्पांमधून आम्हाला तांदुळातल्या खड्यासारखं हाकलून देऊन मग ज्या गप्पा चालायच्या त्या विश्वाची ही एक खिडकी होती. त्यातले बरेच संदर्भ मला अजून लागायचे होते. पण तरीही मला ते वाचताना अत्यंत आनंद व्हायचा.
नंतर माध्यमिक शाळेत गेल्यावर आमच्या प्रचंड मोठ्या आणि सुंदर अशा दगडी ग्रंथालयामध्ये मधल्या सुट्टीत तिथेच बसून वाचायला पुस्तकं मिळायची. माझ्या दृष्टीने ती जागा स्वर्गच होती. तिथे मी फा. फे. चे सगळे भाग ओळीने परत वाचले. इंग्रजी शिकायला सुरुवात केल्यावर फास्ट - फास्टर - फास्टेस्ट या त्याच्या नावाच्या व्युत्पत्तीचा अर्थ समजला. पेटंट म्हणजे काय हेच माहीत नसल्यामुळे ट्टॉक हा बन्याचा पेटंट उद्गार आहे म्हणजे काय हे कळायला मला बराच वेळ लागला. पण अन्वरने वैतागून त्याला ऐकवलेलं "तू काय घड्याळ बिड्याळ आहेस का सारखं टिकटिकायला?" हे वाक्य नकळत रात्री आमच्या मोठ्या किल्लीच्या घड्याळाचे ते मंद्रगंभीर टोले आणि टकटक ऐकताना नकळत मनात चमकून जायचं.
फुरसुंगीहून पुण्यालाच काय पण जगाच्या पाठीवर कुठेही एकट्याने जाणाऱ्या. बँकेत स्वतःचं खातं असणाऱ्या, सुभाष नावाच्या एअरगन बाळगून असणाऱ्या मित्राबरोबर सायकलवरून हिंडणाऱ्या, सदैव संकटांना पाठीवर घेऊन हिंडणाऱ्या, शाळेच्या ट्रीपमध्ये अचाट साहसं करणाऱ्या या मुलाचं मला जाम कौतुक वाटायचं. त्याच्या हर्क्युलिस कंपनीच्या सायकलचं हडकुळी हे नाव मला फारच आवडायचं. मी सायकल शिकले तेही त्याच हडकुळीच्या प्रभावामुळे. याची आई "अजून लहान आहेस, मोठा झालास की जा हं एकट्याने" असं कध्धी कध्धी का म्हणत नाही असा मला पडलेला प्रश्न अजून आठवतो. त्यातून मन्सूर चाचा, अन्वर, शरद शास्त्री उर्फ शास्त्रीबुवा, मा-तुल हृदयाचे मामा मामी, बन्याहून सवाई असणारी त्याची मामेबहीण माली अशी नेहमी भेटणारी पात्र प्रत्यक्षात कधी भेटतील असं राहून राहून वाटायचं. परिकथादेखील खऱ्या वाटण्याचे दिवस होते ते. शिवाय भा. रा. भागवतांची अप्रतिम लेखनशैली तर अविस्मरणीय. त्यांच्या लेखनात कुठेही हे वाचणाऱ्या मुलांना आपल्याला लहान समजून काहीही वाचायला दिलंय अशी भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे हे आज जाणवतं. शिवाय फा. फे ची साहसं ओढून -ताणून आणलेली नव्हती. एखाद्या शैलीदार फलंदाजाने प्रत्येक चेंडू एखाद्या निराळ्याच पण प्रेक्षणीय तंत्राने खेळावा तसे भागवत आजोबा कल्पनेच्या विलक्षण भराऱ्या मारायचे पण त्या वास्तवाची जमीन सोडून कधीही जायच्या नाहीत. एक प्रकारचं भान, समंजसपणा, डोळस वृत्ती ठेवून ती पुस्तकं लिहिलेली आहेत. आता त्यातले संदर्भ बदलले असले तरीही त्यातली विविधता, रंजकता, आणि जादू आजही कायम असावी. शिवाय भागवत आजोबांच्या लेखनातल्या कोट्या आणि विनोद हे तर स्वतंत्र रसायन होतं. मी मागेच म्हटल्यासारखं हे सारं आपल्याला बरोबरीच्या नात्याने, एखादं गुपित सांगावं तसं सांगितलं जातंय ही भावना त्या सगळ्या वाचन-अनुभवाला खूप घट्ट रुजवून जायची. बालसाहित्य लिहिणं सोपं नाही. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे असं साने गुरुजी म्हणत असत. धड लहान नाहीत आणि धड मोठी नाहीत अशा अर्धवट वयातल्या मुलांना फा. फे ने बरंच काही दिलं असणार. धाडसी वृत्ती, संकटांमधून मार्ग काढण्याची चतुराई, आपला देश आपला समाज यांच्याप्रति आपली असलेली बांधिलकी या सगळ्या गोष्टी कुठलेही जड शब्द न वापरता आणि कसलंही अवडंबर न माजवता सहज शिकवल्या गेल्या. नेफा आघाडीवर 'तडफडलेल्या' बन्याला हौतात्म्य पत्करताना एका मेजरने स्वतःच्या रक्ताने करून दिलेली स्वाक्षरी मला कुठेतरी स्पर्श करून गेली होती. एकुणात त्या चिनी युद्धाबद्दलच्या सगळ्याच पुस्तकाने मला चांगलाच चटका लावला होता. एरवी रंजकतेने मोहित करणाऱ्या त्या पुस्तकाला असलेली ही कारुण्याची झालर कायमची लक्षात राहिली.
बन्या म्हणजे बनेश अर्थात फास्टर फेणे आणि या गँगने चांगली सातवी आठवीत जाईपर्यंत मला सोबत केली. आजही एखादं फा.फे. सापडलं तर त्यात रमून जावंसं वाटतं.
साधारण फा.फे. च्या कथांमध्ये रमून जात असतानाच, पुमग्रं च्या कपाटातून फा.फे. च्या मागून एक हिरो डोकावला. भागवत आजोबांची मला मिळालेली ही पुढची भेट होती. डोक्यावर टोपी, तोंडात पाईप असलेली त्याची मुद्रा मलपृष्ठावर असलेलं ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्याचं नाव मी नुसतंच उडत उडत ऐकलं होतं. त्याची थोरवी किंवा त्याचा 'बाप'पणा मला अजिबात माहीत नव्हता. तरीपण शंभर वर्षांपूर्वीच्या त्या कल्पनेतल्या खाजगी गुप्त पोलिसाने म्हणजे अर्थातच शेरलॉक होम्सने माझा पुरता कब्जा घेतला. आपण वाचतोय ते काहीतरी विलक्षण आहे हे मला जाणवलं. पण होम्स वाचल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया मला अजून आठवते. याला रेल्वेगाड्या वेळेवर कशा मिळतात? तारा अचूक पत्त्यावर कशा येतात? केवळ रेल्वे वेळापत्रक आणि आपलं घड्याळा एवढ्या गोष्टींच्या साहाय्याने तो आपला दिनक्रम कसा काय आखू शकतो? त्याच्या हातून वेळेबाबत कधीच चूक कशी काय होत नाही?.... माझ्या चिमुकल्या मनात त्या प्रश्नांनी अगदी गर्दी केलेली असे. पण ज्या पद्धतीने तो कोडी सोडवायचा ती पद्धत फारच रंजक वाटायची. लाल केसवाल्यांची संघटना, पिवळा चेहरा, हार्पूनवाला काळा पीटर, आग लागलेल्या खोलीत कोंडलेलं आणि वी वेअर मर्डर्ड असं भिंतीवर लिहून ठेवणारं जोडपं, संत्र्याच्या बिया, शेवटचा सामना आणि रिकामं घर वगैरे गोष्टी अजून आठवतात. नंतर मी मूळ इंग्रजीतून, डॉईलच्या भाषेत समग्र शेरलॉक होम्सही वाचून काढलं. हाऊंड ऑफ बेस्करव्हिले वाचताना अंगावर आलेला काटा अजून आठवतो. विशेषतः दूर डोंगराच्या टोकावर उभा असलेला 'तो' माणूस आणि त्याच्या मागे दिसणारा पूर्ण चंद्राचा गोल वाचताना जाणवलेला थरार कधीच विसरता येणार नाही. रेड सर्कल, गोल्डन स्पिंझनेट, पिवळा पट्टा, पाचूंच्या मुगुटाची गोष्ट वगैरे गोष्टी पुन्हा वाचताना माझ्या डोक्यात उमटत होता तो भागवतांच्या भाषांतराचा आलेख. दुसऱ्या डागाचे रहस्य अर्थात मिस्टरी ऑफ सेकंड स्टेन ही कथा तर भाषांतर वाचूनच डोक्यात इतकी पक्की बसली आहे की त्यातलं "आमचीही काही राजनैतिक गुपितं असतात साहेब!" हे वाक्य मी कधीही विसरू शकणार नाही.
तसं म्हटलं तर होम्सकथाही काही लहान मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या नाहीत. पण एकूणच त्यात रक्तरंजित खून मारामाऱ्या किंवा हिंसाचाराच्या तपशीलवार नोंदी वगैरे नसल्यामुळेच कदाचित ती पुस्तकं पुमग्रं मध्ये बालविभागात ठेवली असावीत. होम्सने मला रहस्यकथांच्या बाबतीत सज्ञान केलं. विशेषतः वर्गात चोरून किंवा मधल्या सुट्टीत किंवा असंच इकडेतिकडे पुस्तकातला किडा होऊन माझ्या मैत्रिणी जे काही वाचत (त्याच त्या कादंबऱ्या, डिटेक्टिव्ह कथा इ.इ.) त्यात चांगलं काय वाईट काय हे ठरवायची दृष्टी मला होम्सने दिली. बालवयातच हा एक्का हातात पडल्यामुळे नंतर पुस्तकातल्या बऱ्यावाईटाची पारख मला फार सोपी गेली असावी असं मला वाटतं.
सातवीतून आठवीत जाताना एक दिवस आईने माझ्यासाठी तिच्या ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं. त्याचं नाव पाडस. तेंव्हा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला संपूर्णपणे कळल्या नव्हत्या. पण पुस्तकाने मला वेड लावलं. मी तेंव्हा ज्योडीच्याच वयाची होते. त्यामुळे त्याचं ते "एक तरी प्राणी - पक्षी आपला असा असावा" हे वेड आपलं वाटायचं. मांजरं माझ्या वाऱ्याला उभी राहत नसल्यामुळे आणि कुत्रा पाळू या का यावर "कुत्रा किंवा तू कोणीतरी एकच या घरात राहील" हे मिळालेलं उत्तर यामुळे ज्योडीच्या मा चा राग त्याच्या बरोबरीने मलाही यायचा. पण बॅक्स्टरबेटावर जावंसं वाटायचं. हुतोआजी, ऑलिव्हर यांना भेटावंसं वाटायचं. शेवटी फ्लॅगला गोळी घातल्यावरची ज्योडीची तडफड वाचून मला खूप वाईट वाटलं होतं पण ते का हे मात्र कळलंच नव्हतं. "मी वाचलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांबद्दल" वर्गात सांगताना मी पाडसावर बोलले होते. आणि हा शेवट सांगताना ती भुकेची राक्षसीण वगैरे प्रकरण आपल्या लक्षातच आलेलं नाही हे स्पष्ट कळलं होतं हे आठवतंय मला. पण तेवढ्याने या पुस्तकाबद्दलचं माझं प्रेम मात्र कमी झालं नाही. पेनी आणि ज्योडी यांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडलेला आहे. तो असा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. पण कडेलोट नैराश्याचे प्रसंग आले तेंव्हा "जीवन फार सुंदर आहे पण ते सोपं मात्र नाही. आपण उठून उभं राहू पाहतो तेंव्हा ते एकच फटकारा मारतं आणि आपल्याला भुईसपाट करून टाकतं. पोटच्या पोरांची जीवनाशी दोन हात करताना होणारी ससेहोलपट पाहून बापाचं काळीज भरून येतं...." हे वाक्य मला आठवलेलं आहे. त्याने मला अफाट आधार दिलेला आहे. पेनी आणि ज्योडी माझ्या डोक्यात खूप खोलवर घट्ट बसलेले आहेत. कधीतरी अचानक ते आपलं दर्शन घडवतात आणि त्यांच्या प्रकाशात सगळं लख्ख होऊन जातं. त्यातली
"भूक म्हणजे इतकी लागली आहे की पोटाला वाटतंय गळा कापला की काय?
मोठा हुशारीने बोलतोस रे! कुठं शिकलास?
फॉरेस्टरांकडे म्हणतात असं..."
किंवा
"काय दिसतंय तुला?
काही नाही आणि त्यातलंही अगदी थोडं..."
अशी काही निवडक वाक्यं आम्ही घरात वापरतो. खूप मजा येते. माझ्या भावाने तर "वाढदिवसाला काय करू?" या प्रश्नाचं उत्तर "रताळ्याची रोटी !" असं देऊन आईला चकित करून सोडलं होतं. एकुणातच हे पुस्तक मनात खोल झिरपलं आहे. त्यातली पानंच्या पानं ओळीने आठवू शकतात इतकं खोल.
पेनी आणि ज्योडीनंतर माझ्या आयुष्यात बालपणाचा शेवटचा बहर घेऊन आलेलं टोळकं म्हणजे चौघीजणी! या पुस्तकाबद्दल तर काय सांगावं? आमच्या वर्गात हे पुस्तक वाचायची जोरदार फॅशन होती. सगळ्यांचे ते वाचून झालं होतं तरीही कोणी वर्गात ऑफ तासाला चौघीजणी वाचताना दिसलं तर एकमेकींच्या नाकाला नाक लावून तिच्याबरोबर अनेक जणी हे वाचताना सापडायच्या. पुढे चौघीजणीची माझी स्वतःची प्रत हाती आल्यावर तर मला अस्मान ठेंगणं झालं होतं. दहावीच्या अभ्यासातून विरंगुळा म्हणून एकमेकींना चौघीजणी मधलं क्विझ घालायचा उद्योग जाम रंगत असे. आंट मार्च च्या कुत्र्याची जात कुठली इथपासून ऍमी आणि लॉरीचं लग्न कुठे झालं इथपर्यंत कुठलेही प्रश्न सटासट विचारले जात. कोणाच्याही हातात पुस्तक नसे. पण सगळ्यांनाच सगळं इतकं पाठ झालं होतं की गाळलेल्या जागासुद्धा भरता येत असत. या पुस्तकाने शाळेची शेवटची तीन वर्षं सोनेरी रंगाने कायमची रंगवून टाकली.
आयुष्यात जर मी कुणाबद्दल हिरो वर्शिप केली असेल तर ती ज्योबद्दल आहे. मेग , बेथ, ज्यो आणि ऍमी या चार बहिणींच्या या गोष्टीत उत्कटतेने ओतप्रोत भरलेली, धडपडी, उद्योग करून ठेवणारी, मुळूमुळू रडत न बसणारी , माझ्यासारखेच घनदाट काळेभोर केस असणारी, लेखिका होण्यासाठी धडपडणारी माझ्याच वयाची ज्यो माझी रोल मॉडेल झाली नसती तरच नवल. साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मी ते पुस्तक वाचून काढलं. ते वाचायला सुरुवात केल्यापासून मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच दिसत असे. गणपतीची सजावट करताना, माळ्यावर वस्तू चढवताना-उतरवताना, बाबा मुंबईला असताना घरातला मोठा मुलगा म्हणून दूध आणण्यापासून आईला मदत करताना मला तीच दिसायची. तिच्या माझ्यातलं साम्य लक्षात आलं की माझा जीव आनंदानं सुपाएवढा व्हायचा. ते दिवस इतके स्वप्नील होते कारण मी माझ्या परीने ज्यो जगत होते असं मला वाटतंय. तिच्याबद्दल मला काय वाटायचं, वाटतं हे सांगायला शब्द अपुरे पडतील. आत्ताही हे सगळे लिहिताना ''जरी या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे, हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे!' या गाण्यासारखी अवस्था झाली आहे. जे मनात उसळलंय त्याच्या एक दशांशही कागदावर उतरलं तरी पुरे अशी अवस्था झाली आहे. अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात ती आहेच. तिने मला बरंच काही दिलंय. तिचं ऋण मोठं आहे.
ज्योच्या बरोबरीने मनाचा कब्जा घेतला तो लॉरीने. ही व्यक्तिरेखा इतकी लोभस आहे, इतकी मोहक आहे की असं कोणी प्रत्यक्षात असूच शकत नाही यावर आमचं एकमत व्हायचं. टॉमबॉय असल्यामुळे ज्यो माझी 'हिरो' झाली आणि तिचा लाडका मित्र लॉरी माझ्या हिरोजमध्ये अग्रस्थान पटकावून आहे. खट्याळ, खोडकर, खेळकर, अत्यंत गुणी, तरीही गर्वाने चढून न जाणारा, ज्याच्याबद्दल पाहताक्षणीच खूप विश्वास वाटावा असा हा बॉय नेक्स्ट डोअर. कितीतरी नव्या कल्पना शिकवून जाणारा. वडील युद्धावर आजारी पडलेले , आई त्यांच्या शुश्रूषेसाठी गेलेली आणि लहानगी बेथ स्कार्लेट फीवरने मरणाच्या दारात पडलेली अशा अवस्थेत लॉरी ने आणि त्याच्या आजोबांनी मेग, ज्यो आणि ऍमीची घेतलेली काळजी फारच हृदयस्पर्शी होती. लॉरीचं स्वतःचं ग्रंथालय, त्याची पुस्तकं, त्याचा पियानो, त्याचे ते सुंदर घर, ज्योशी त्याची असलेली घट्ट आणि निखळ मैत्री, ते आयुष्यग्रंथाचं रोज नवं पान उलटणं, रोज भांडणं , एकमेकांना गुपितं सांगणं, शर्यती लावणं, बर्फावरून घसरत जाणं वाचताना अपार सुख वाटायचं. आमचे दगडी शाळेतले वर्गबंधू मुलींशी बोलायलाही घाबरायचे त्या पार्श्वभूमीवर तर हा चार चार मुलींचा मित्र पाहून त्याच्या बेडरपणाचं कौतुक वाटायचं. मित्र-मैत्रिणीच्या नात्यात उगाचच भुवया उंचावण्यासारखं काही नाही हे माझं ठाम मत होतं आणि आहे. त्याला पुष्टी देणारी ही दृष्ट लागण्याजोगी मैत्री मनाचा ठाव घेत असे. सुसंस्कृतपणा, सहृदयता, उत्कट वृत्ती,खट्याळपणा, सशक्त व्यक्तिमत्त्व, साहसाची ओढ, नव्या प्रयोगांना सामोरं जायची तयारी, प्रेमभंगही झेलायची ताकद आणि शेवटी माधुर्याने ओतप्रोत भरून जाणारं तृप्त, सुखी माणूसपण या गुणांनी सजलेलं हे माझं सोनेरी पान आहे.
साधारण चौघीजणींना भेटायच्या आधी मला अजून एक हिरो सापडला. झालं असं, की आमच्या शाळेत एक नवीन बाई शिकवायला यायला लागल्या. त्यांच्या आणि आमच्या वयात फार फार तर ८-१० वर्षांचं अंतर असेल. त्यामुळे त्यांची आणि आमची वेव्हलेंथ मस्त जमायची. त्यांचं स्वतःचं वाचन अक्षरशः अफाट आहे. त्यामुळे त्यांचा तास ही माझ्यासारख्या वाचनवेड्या मुलींसाठी पर्वणीच असायची. या बाईंनी अनेक नवनवीन पुस्तकांशी, लेखकांशी आमची ओळख करून दिली. अनेक उत्तम पुस्तकं त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या मालकीचं मृत्युंजय हे पुस्तक मला द्याल का असं मी त्यांना जरा भीतभीतच विचारलं. त्यांनीही लगेच दुसऱ्या दिवशी ते मला आणून दिलं. वर म्हणाल्या, " माझ्या वहिनीला हवं होतं पण मी तिला सांगितलं, आधी लेकीला देते ."त्यांनी मला लेक म्हणणं हा अनुभव फारच सुखद होता. तो प्रसंग आजही जसाच्या तसा आठवतो.
त्यामुळे मृत्युंजय बद्दल एक वेगळीच भावना मनात आहे. शिवाय बाईंची एक छान सवय म्हणजे पुस्तकातली उत्तमोत्तम वाक्यं त्या अधोरेखित करून ठेवतात. जणू काही त्या स्वतःच मला त्या पुस्तकातलं भाषावैभव दाखवून देताहेत असंच वाटायचं ते पुस्तक वाचताना. कर्णाची व्यक्तिरेखा मला जाम आवडली. माझ्या हिरोंमध्ये त्याला लगेच स्थान मिळालं. सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, विलक्षण देखणा असा हा शापित राजपुत्र. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष ओढलं न गेलं तरच नवल. मला तर त्याच्या एकाग्रतेच्या, सूर्याकडे टक लावून पाहण्याच्या, त्याच्या बाहुबलाच्या कथा वाचताना प्रचंड भारल्यासारखं होत असे. विशेषतः भीमाने जोर लावून वाकवलेली सळई रो रोज सकाळी सरळ उभी करून ठेवत असे हे वाचताना मला खूप कौतुक आणि मजा वाटायची. त्याची ती जांभळी-लालसर प्रभा फाकणारी कुंडलं, अभेद्य असं कातडं आणि स्वबळावर मिळवलेली धनुर्विद्या वगैरे गोष्टी वाचताना नुसतं स्फुरण चढायचं.
सिंहशिशुरपि निपतति गजेषु सततं कथं महौजःसु ।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः ॥
ही उक्ती सार्थ करणारी त्याच्या मनातली क्षात्रतेजाची ती घगधगती ज्वाळा, प्रत्येक अपमानानंतर संतापाने पेटून उठणारं त्याचं अमोघ क्षत्रिय मन, त्याचा पराक्रम, त्याचे दिग्विजय, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहावं तसे काळाशी सतत केलेले दोन हात, प्रत्येक वेळी अन्याय सहन करण्याची त्याची असीम सहनशीलता पाहून तो माझ्या हिरोंच्या क्रमवारीत कितीतरी वर चढला. इंद्राला कवचकुंडलांचं दान देण्यासाठी त्याने स्वतःचीच कातडी सोलून काढली होती तो प्रसंग तर मी एकदाच कसातरी वाचला. नंतरच्या पारायणांमध्ये तो वाचवलाच नाही. अर्थात कर्णाला सर्वांगावर अभेद्य कवच आणि जन्मजात मांसल कुंडलं होती ही कविकल्पना आहे. जन्मानंतर त्याला नदीच्या पाण्यात सोडताना कुंतीमातेने स्वतःची अभिमंत्रित सुवर्णकुंडलं त्याच्या शेजारी ठेवलेली होते. ती कुंडलं अभिमंत्रित असल्यामुळे त्याचं रक्षण करत होती आणि तेच कर्णाचं कवच होतं असं मूळ महाभारतात लिहिलेलं आहे हे अलिकडेच कळलं. त्यामुळे कुंडलांची मोहिनी वजा करून माणूस म्हणून हे सारं सहन करणारा कर्ण अधिकच खरा वाटायला लागला. एकूणच काही दिवस माझा महाभारताकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला होता.
आणि शिवाजी सावंतांनी उलगडलेल्या भरजरी भाषेच्या पोतांबद्दल, वैभवाबद्दल तर काय सांगावं? अनेक दिवस ती भाषा मनात अशी आंदोलित होत राहायची. एकूणच सावंतांनी महाभारत हे एखाद्या प्रिझमामधून दाखवावं तसं दाखवलं. रिफ्रॅक्टेड फॉर्ममधे. त्यामुळे भीमार्जुन, कृष्ण वगैरे मंडळी पळपुटी वाटायची. खरं तर अजूनही वाटतात. कर्णाबद्दल सहानुभूतीने माझं बालमन पेटून उठत असे.
मृत्युंजय च्या प्रभावाखालून मी बाहेर येतानाच कर्णावरचं अजून एक अतिशय सुंदर पुस्तक वाचनात आलं. त्याचं नाव राधेय. लेखक रणजित देसाई. सावंतांचा मार्ग होता की प्रत्येक प्रसंगात कर्णावर कसा अन्याय झाला, त्याचा ज्यावर हक्क आहे असं श्रेय त्याला कसं मिळालं नाही आणि तो कसा निर्दोष आणि नियतीच्या हातचं बाहुलं होता वगैरे वगैरे. या गोष्टी डोक्यात पक्क्या बसलेल्या असल्यामुळे रणजित देसाई यांनी चितारलेला कर्ण मला खूप जास्त माणसासारखा वाटायला. चरित्रनायक जरी झाले तरी शेवटी माणसेच असतात आणि त्या माणूस असण्यातच त्यांचं मोठेपण असतं ही अक्क्ल मला आज आली आहे आणि या प्रवासात कर्णाने मला खूपच मदत केली आहे.
ज्यो - लॉरी- पेनी-ज्योडी यांनी माझा हात धरून मला महाविद्यालयीन वातावरणात आणून सोडलं. मग माझी नजर वळली ती इंग्रजी साहित्याकडे. मी मराठी आणि आठवीनंतर अर्धमराठी(अर्धमागधी नव्हे!) माध्यमातून शिकले. त्यामुळे किशोरवयात नॅन्सी ड्र्यू किंवा हार्डी बॉईज यांची पारायणं मी केली नाहीत. मी आठवीत असताना काकूने मला तिच्याकडचं एक परिकथांचं सचित्र इंग्रजी पुस्तक दिलं होतं आणि म्हणाली होती, आता तुला हे वाचता येईल नाही का!. मला वाटतं दुसरी तिसरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी लिहिलेलं असावं ते. पणा त्यातली चित्र इतकी सुरेख आहेत की बास. त्या प्रसंगानंतर मी निश्चय केला होता की माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या बहिणी जे वाचतात ते आणि त्याहूनही काही अधिक वाचन करायचं इंग्रजी साहित्याचा व्यासंग करायचा. याची सुरुवात मी अकरावीत केली. नॅन्सी ड्र्यू पासून. खरं म्हणजे हे सगळं वाचण्याइतकी मी लहान राहिले नव्हते. पणा त्याने बैठक मारून वाचायची सवय मात्र लागली. एनिड ब्लॉयटन मात्र मी प्रचंड एन्जॉय केलं आजही करते. द फेमस फाईव्ह ही मालिका हिंदीमध्ये डब करून सुट्टीत लावायचे. ती मी कधीही सोडली नाही. हे सगळे लोक माझ्या फुटकळ हिरोंच्या यादीत मधूनमधून डोकावतात.
अशा प्रकारे जरा सवय झाल्यावर मात्र एक मोठ्ठा हिरो माझ्या वाचनात सापडला. त्याचं नाव हॉवर्ड रोआर्क. फाऊंटनहेड या कादंबरीचा हा मनस्वी, स्वयंपूर्ण, कामावर प्रेम करणारा आणि कामासाठीच जगणारा स्वयंभू नायक मला कळायला बराच काळ जावा लागला. अत्यंत जीर्ण अवस्थेतली आणि बा‌‌ऽऽऽरिक टायपात छापलेली त्याची अत्यंत कुरूप प्रत हातात पडली तेंव्हा हे सगळं आपलं कधी वाचून होणार ही चिंता मला भेडसावू लागली होती. पण अंगभूत चिकाटीने मी तो डोंगर पार केला. वाचलेलं सगळंच समजलं असा माझा मुळीच दावा नाही. पण जे काय वाचलं ते खूप मोठं, भव्य आणि अर्थपूर्ण आहे हे नक्की जाणवलं होतं. डॉमिनिकवर तर माझी भक्तीच जडली होती. आणि रोआर्क बद्दल तर काय सांगावं? काही न सांगणंच उत्तम कारण ते सगळं सांगण्यासाठी पुरेसे बोलके शब्द माझ्यापाशी नाहीत. गेल वीनंड या इसमाचा मात्र सुरुवातीला मला अतिशय राग आला होता. रोआर्क त्याच्यावर इतकं प्रेम का करतो हे मला कळतच नव्हतं. पीटर कीटिंगची तर दया आली होती मला. मला पीटर कीटिंगसारखं करू नकोस अशी मी सारसबागेतल्या गणपतीला प्रार्थना करत असे.
रात्र रात्र जागून मी ते पुस्तक वाचत होते. मला आठवतंय, मध्यरात्रीचा दीड वाजला होता. दारासमोर ट्रकमधून कसलातरी माल उतरवण्याचं काम सुरू होतं. ट्रक्सची ये जा चालली होती. आईची निकराची बोलणी खाऊनही, धडधडत्या हृदयाने आणि विस्फारित डोळ्यांनी स्वयंपाकघरात, ओट्याजवळ खाली बसून मी फाऊन्टनहेड वाचत होते. प्रसंग होता गेल वीनंड बॅनर मधून रोआर्कच्या मागे सर्वक्तीनिशी उभा राहतो तो. लोक गेल ला नाकारतात. झिडकारतात. आजवर त्याने वाट्टेल ते छापलं तरी ते सहज वाचणारे वाचक त्याचं वर्तमानपत्र विकत घेणं नाकारतात. रात्रीच्या वेळी वृत्तपत्रांच्या गाळ्यांवरून न खपलेले बॅनरचे अंक परत येतात. त्याच्या पहिल्या पानावर रोआर्कचा फोटो छापलेला असतो. तो पाहून गेल ला हसायला येतं कारण न्यू यॉर्क शहरातल्या खुरटलेल्या लोकांना , अशा लोकांना ज्यांच्यात एवढी ताकदच नाही की ते रोआर्कला समजून घेऊ शकतील, गेल हॉवर्ड रोआर्क विकत असतो. तोही तीन डॉलरला एक. ....
हा प्रसंग वाचताना माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. ते बाहेरचे ट्रकचे आवाज आणि गेलच्या न खपलेल्या प्रती आणणाऱ्या ट्रक्सचे आवाज माझ्या दृष्टीने एकरूप झाले होते. तो प्रसंग जणू काही मी नजरेसमोर घडताना बघत होते. तो क्षण, ती वेळ, तो प्रसंग विसरणं मला प्रयत्न करूनही जमणार नाही. फाऊंटनहेड वाचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं दैदिप्यमान फळ हातात मिळाल्यासारखं मला वाटलं होतं.....
अजूनही नैराश्याच्या क्षणी मी रोआर्कचं कोर्टातलं तीन पानी भाषण वाचते. खूप बरं वाटतं. रोआर्क अजूनही मला पुरेसा समजलेला नाही. ती वाटचाल चालूच आहे. चालूच राहणार आहे.
रोआर्कनंतर खरं म्हणजे कोणाबद्दल लिहावं असा हिरो सापडणं एरवी मुश्किल ठरलं असतं. पण मला असा एक हिरो सापडला. साधारण पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना, जपानी भाषेच्या वर्गातल्या सेन्सेई आणि एक काका या दोघांनी माझं हॅरी पॉटर या विषयावर बौद्धिक घेतलं. तोवर मी "काय खूळ आहे ! " अशाच नजरेने हॅरीकडे बघत होते. पण हॅरीची सगळी गंमतच आहे. मी पहिलं पुस्तक वाचायच्या त्यावरचा चित्रपट पाहिला. हॅरीने मला वेड लावलं. माझ्या मनातलं जादूचं आकर्षण आणि या जगावेगळ्या पोरक्या मुलाबद्दल वाटणारी सहानुभूती यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मी या कथेत अक्षरशः ओढली गेले. मी हॅरी वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्याची पहिली चार पुस्तकं प्रकाशित झालेली होती आणि पाचव्या पुस्तकाची जोरदार प्रतीक्षा सुरू होती. सटासट एकामागोमाग मी चारही पुस्तकं वाचून काढली. तोवर पाचवं पुस्तकही माझ्या हातात पडलं. जपानीचा अभ्यास करता करता मी आणि काका हॅरी, लॉर्ड व्ही(व्होल्डी!), फॉक्स, यांच्यावर चर्चा करायचो. विशेषतः तिसरं पुस्तक मला विशेष आवडलं. पोरक्या हॅरीला वडीलधारं माणूस म्हणण्याजोगी एकच व्यक्ती म्हणजे सीरिअस भेटतो तो या पुस्तकात. शिवाय जेम्स आणि कंपनीच्या साहसी सफरींबद्दलही याच पुस्तकात वाचकाला कळतं. पॅट्रोनस, मरोडर्स मॅप आणि हॅरीचं विशिष्ट पॅट्रोनस यांच्याबद्दल वाचताना एक थरार जाणवतो. खूप छान वाटतं. हॅरी मोठा होतो तसतशी त्याच्या साहसांची पातळी वाढत जाते. ती वाचताना येणारी मजा वाढतच जाते. तरीही भूतकाळातली सफर, शंभर डिमेंटर्सच्या हल्ल्याला हॅरीने दोनदा दिलेलं समर्थ उत्तर या गोष्टी अद्वितीय आणि विलक्षण गुंगवून सोडणाऱ्या चमत्कृतींबद्दल बोलायचं झाल्यास चौथं पुस्तक जास्त रंजक आहे यात वादच नाही. आणि जादूगारांच्या विश्वाबद्दल अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने पाचव्या पुस्तकाला तोड नाही. पण माझं सगळ्यात आवडतं पुस्तक हे तिसरंच आहे.
मनोगतावरही अनेक सदस्यांशी हॅरीबाबत चर्चा झाली. माझा एक मनोगती मित्र फ्रेड आणि जॉर्ज या खोडकर जोडगोळीचं काम एकटा निभावू शकेल असं माझं स्पष्ट मत आहे. ते त्यालाही चांगलं ठाऊक आहे. माझी अजून एक मनोगती मैत्रीण आणि मी तर दिवसरात्र हॅरी याच विषयावर चर्चा करत असतो. त्यापायी मोबाईल कंपन्यांना आम्ही कितीतरी नफा मिळवून दिला आहे. आता सातव्या पुस्तकात नक्की काय काय होणार, हॅरी सातवा हॉरक्ऱक्स आहे का? फॉक्स परत येणार का, आर ए बी म्हणजे रेग्यूलस ब्लॅक हे कितपत बरोबर आहे? स्नेप चांगला की वाईट, क्रीचरचा लॉकेट चोरण्यात हात असणं शक्य आहे का? असल्या अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा करत असतो. सव्वीस जुलै दोन हजार सात दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. पण स्वतः जेकेआर ने म्हटल्याप्रमाणे आता हा मित्र पुन्हा भेटीला येणार नाही म्हणून मनाला चुटपूट लागलेली आहे. हुरहूर लागलेली आहे. एकीकडे सातवं पुस्तक वाचायची अनावर उत्सुकता आणि दुसरीकडे ही मालिका संपल्याबद्दलचं दुःख अशी मनाची रस्सीखेच सुरू आहे.
हॅरीने माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खडतर काळात मला धीर दिलाय. साथ दिली आहे. निखळ आनंद दिला आहे. अनेक कोडी घातली आहेत आणि सोडवूनही दाखवली आहेत. अद्भुतरम्य जगाची सफर घडवून रंजन केलं आहे. सोसायला अवघड अशा दुःखाचा काही काळापुरता का विसर पाडला आहे. आणि दूर गेलेल्या रम्य शालेय जीवनाची गोडी पुन्हा एकदा अनुभवायला दिली आहे. हॅरी नसता तर हा काळ खूपच कठीण गेला असता. यासाठी मी हॅरीची आणि जेकेआरची ऋणी आहे.
या यादीत छत्रपती शिवाजी महाराज, राऊ, थोरले माधवराव पेशवे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि मदनलाल धिंग्रांपासून ते अनंत कान्हेऱ्यांपर्यंत सगळे वीरवृत्तीचे क्रांतिकारक यांचा समावेश नसेल तर ही यादी निरर्थक ठरेल. पणा ही सगळी खरी माणसं आहेत. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे बराच अभ्यास करायला हवा. त्याशिवाय काहीही लिहिण्याची माझी लायकी नाही. पण वैराग्याचा भगवा रंग माझ्या भावविश्वात मिसळून ते अधिक तेजस्वी करण्यात या व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यापुढे मी अक्षरशः नतमस्तक आहे.
सध्या तरी माझं हे हिरोपुराण इथेच थांबवते आहे. पुन्हा नवीन हिरो सापडले की लिहीनच इथे.
राजते लेखनावधिः!
--अदिती
(१ मे २००७,
वैशाख शुद्ध चतुर्दशी, शके १९२९)

Labels: