पुस्तकायन

Thursday, April 12, 2007

नौदलाच्या कराराचा मसुदा(५)

"त्याने सांगितलंय ना तो आठ वाजता येणारे?.. मग तो बरोब्बर आठ वाजता येईल."
आणि खरोखरच आठाच्या ठोक्याला एक घोडागाडी खाली येऊन उभी राहिली आणि त्यातून होम्स खाली उतरला. त्याच्या डाव्या हाताला मलमपट्टी केलेली होती आणि त्याचा चेहरा बराच थकलेला आणि उतरलेला दिसत होता. त्याला वर यायला बराच वेळ लागला.
"ते जखमी झालेले दिसताहेत.." पर्सीला धक्का बसलेला होता.
""काय लागलं तुला होम्स?" होम्सला नीट आतही न येऊ देता मी म्हणालो.
"काही नाही रे माझाच मूर्खपणा नडला. जरासं खरचटलंय बाकी काही नाही... आईगं ! मि. फेप्स काय केस होती ही..."
"मला वाटलंच की ही तुमच्याही आवाक्याबाहेर जाणार..."
"तुझी कोणाशी मारामारी वगैरे झाली का होम्स? काय झालं तू सांगत का नाहीयेस?"
"अरे हो हो... आधी मला चार घास खाऊ तर देशील? ब्रेकफास्टनंतर सांगतो सगळं. पहाटे पहाटे सरेच्या गार हवेतून चालत आलोय मी... बरं त्या टॅक्सीवाल्याचा काही पत्ता लागला का? नाही? वाटलंच मला. प्रत्येक वेळेला आपल्याला सगळीच उत्तरं मिळाली पाहिजेत असं थोडंच आहे?."
काही क्षणातच आम्ही न्याहारीसाठी टेबलावर मांडामांड केली. मी मिसेस हडसनना कॉफी आणायला सांगणार तितक्यात त्यांनी तीन झाकलेल्या ताटल्या आणून टेबलापाशी ठेवल्या. आम्ही टेबलाशी बसलो. मी आश्चर्यात बुडालेला, होम्स प्रचंड थकलेला आणि फेप्स नैराश्याने आपले केस उपटणारा...
"हडसनबाईंच्या स्वयंपाकाला कशाचीच तोड नाही. स्कॉटिश घरातलं अगत्य म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून कळतं." असं म्हणत त्याने त्याच्या ताटलीवरचं झाकण बाजूला केलं. आत चविष्ट कोंबडीचा रस्सा होता.
"तुला काय वाढलंय वॉटसन?"
"हॅम आणि अंडी" मी उत्तरलो.
"वा! मि. फेप्स तुम्ही काय घेणार? थोडसं चिकन देऊ की अंडी चालतील?"
"मला काही नको..." -पर्सी
"अहो असं काय करताय? बघा तरी तुमच्या पानात काय वाढलंय ते"
"मला खरंच काहीही नकोय.."
" ठीक आहे. मग तुम्हाला वाढलेले पदार्थ माझ्या पानात घालता का?" होम्सच्या चेहऱ्यावर भलताच खट्याळ भाव होता.
जरा नाखुषीनेच पर्सीने त्याच्या ताटलीवरचं आवरण बाजूला केलं आणि तो ओरडलाच. त्याच्या पानात एक करड्या रंगाच्या कागदांचं भेंडोळं होतं. आनंदाने वेडा झाल्यासारखा तो काहीवेळ त्याच्याकडे पहातच राहिला आणि मग ते आपल्या छातीशी कवटाळूनत्याने ज्रजोरात उड्या मारायला सुरुवात केली. तो हर्षवायूने बेशुद्ध पडायची पाळी आल्यावर आम्हाला त्याला पकडून एका खुर्चीवर बसवावं लागलं आणि त्याच्या जिवात जीव येण्यासाठी थोडी ब्रँडी त्याला पाजावी लागली.
"हाहा ! तुम्हाला असा धक्का देणं खरं म्हणजे चुकीचं आहे पण तुमची थोडीशी मजा करण्याचा मोह मला आवरला नाही..." त्याच्या पाठीवर थोपटत होम्स म्हणाला. तोही आनंदाने हसत होता.
फेप्सने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरले आणि भावनातिरेकाने तो म्हणाला" तुम्ही देवदूत आहात. तुम्ही माझे प्राण वाचवलेत. माझी अब्रू वाचवलीत..."
"अहो काय करणार? तुमच्याबरोबर माझीही अब्रू पणाला लागली होती ना! "
फेप्सने ते अमूल्य भेंडोळं आपल्या कोटाच्या अगदी आतल्या खिशात नीट ठेवून दिलं.
"मि. होम्स तुम्हाला आणखी उपास घडावा अशी काही माझी इच्छा नाही पण हे सगळं तुम्ही कसं काय केलंत हे जाणून घ्यायला मी प्रचंड उत्सुक आहे.."
होम्सने एक कप कॉफी आणि त्याचा ब्रेकफास्ट यांवर आडवा हात मारला. आपला पाईप शिलगावला आणि आमच्या समोरच्या खुर्चीत बसून तो बोलू लागला
"मी काय केलं ते आधी सांगतो. का केलं ते नंतर बघूच..
तुम्हाला दोघांना गाडीत बसवून दिल्यावर मी सरेच्या सुंदर वाश्रीतून लांबवर फेरफटका मारत रिप्लाय नावाच्या गावात पोचलो. तिथे एका टपरीत चहा घेतला. एक पाण्याची बाटली आणि काही सँडविचेस बरोबर बांधून घेऊन मी तिथून बाहेर पडलो. वोकिंगला परत आल्यावर ब्रायरब्रीच्या शेजारून जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर जाऊन पाळत ठेवून मी लपून बसलो तेंव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता. "
"रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे थांबण्याची मी वाट पाहिली. तो रस्ता मुळातच फार गजबजलेला नसतो असा माझा अंदाज आहे. मग मी कुंपणावरून उडी मारून आत बागेत आलो."
"पण फाटक तर उघडं असेल ना?" - पर्सी
" हो पण अशा प्रकरणांमधे माझी काही पद्धत आहे. मी तुमच्या बागेतल्या तीन फरच्या झाडांच्या मागे लपून बसलो त्यामुळे घरातल्या कोणाला मी दिसणार नव्हतो. तिथून पुढे मला रांगतच जावं लागलं. ही बघा माझी पँट कशी गुडघ्यांवर फाटली आहे ती. तर मी रांगत रांगत तुमच्या बेडरूमच्या खिडकीखालच्या झुडुपांजवळ जाऊन बसलो आणि आतल्या घडामोडींचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.
तिथल्या खिडकीचा पडदा उघडाच होता आणि मिस हॅरिसन टेबलाशी बसून पुस्तक वाचताना मला दिसत होत्या. पावणे दहा वाजता त्यांनी दिवा मालवला , पडदे - जाळ्या लावल्या आणि त्या तिथून बाहेर पडल्या.
त्यांनी दार बाहेरून लावून घेतलं आणि त्याला कुलूप लावल्याचा आवाज मी ऐकला."
"कुलूप?" -पर्सी
"हो मीच त्यांना तसं करायला सांगितलं होतं. त्यांनी माझी प्रत्येक सूचना अगदी तंतोतंत पाळली. आज हे कागद परत तुमच्या ताब्यात मिळाले याचं बरचसं श्रेय त्यांनाच आहे. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्यच झालं नसतं."
" तर त्या तिथून निघून गेल्यावर सगळीकडचे दिवेही बंद झाले. आणि पुढे होणाऱ्या घटनांची वाट बघत मी तसाच त्या झुडुपात दबा धरून बसून राहिलो."
"रात्रीचं वातावरण अगदी प्रसन्न होतं पण तरीही पुढे काय होणार या विचाराने माझ्या जिवाची अगदी घालमेल होत असल्यामुळे मला तो पहारा काही फारसा सुखावह वाटला नाही. मला बराच वेळ तसंच बसून रहावं लागलं. सारखं घड्याळाकडे पाहून मला अशी शंका यायला लागली की ते बंदच पडलं असावं बहुतेक. पण सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मी कडी उघडल्याचा आवाज ऐकला. त्यानंतर एका कुलुपात एक किल्ली फिरवली गेली आणि एका नोकरांच्या दरवाज्यातून मि. जोसेफ हॅरिसन बाहेर आले.."
"जोसेफ!!!" फेप्स पुन्हा एकदा आश्चर्याने ओरडला.
"त्याच्या डोक्यावर हॅट नव्हती आणि त्याने एक लांब काळा कोट बगलेत धरला होता ज्यामुळे काही घोटाळा झालाच तर तो आपला चेहरा लपवू शकणार होता. भिंतीच्या सावलीतून तो दबक्या पावलांनी चालत खिडकीखाली आला. तिथे आल्यावर त्याने दाराच्या फटीतून एक मोठा सुरा आत सारला आणि त्याच्या पात्याने ती खिट्टी उघडली. मग त्याने खिडकीचं दार उघडलं आणि आतल्या जाळीच्या फटीतून तो सुरा घालून आतली आडवी पट्टी उघडली. आता त्याने ती जाळी सताड उघडली. "
"मी जिथे बसलो होतो तिथून मला खोलीतल्या सगळ्या वस्तू आणि त्याच्या हालचाली अगदी स्पष्ट दिसत होत्या. त्याने आत जाऊन कोपऱ्यातल्या दोन मेणबत्त्या पेटवल्या आणि दरवाज्याशेजारचा गालिचाचा कोपरा मागे सारला प्लंबरलोकांना जमिनीखालचे नळ तपासायला असतो तसा तक्तपोशीचा एक चौकोनी तुकडा त्याने बाहेर काढला. त्याच्याखाली स्वयंपाकघरात जाणाऱ्या नळाचा T आकाराचा जोड आहे. त्यात हात घालून त्याने हे भेंडोळं बाहेर काढलं. फळी आणि गालिचा नीट जागच्या जागी ठेवला. मेणबत्त्या विझवल्या आणि बाहेर आला तेव्हाच मी त्याला पकडलं.
"तो माझ्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त क्रूर निघाला. त्याने हातातल्या सुऱ्याने माझ्यावर हल्ला केला. त्याच्यावर ताबा मिळवेपर्यंत माझ्या डाव्या हाताच्या पेरांवर त्याने दोन वार केलेले होते. शेवटी मी त्याला जेरबंद केलं तो खुनशी नजरेने माझ्याकडे बघत होता. शेवटी त्याची समजूत घालून मी त्याच्याकडून ते भेंडोळं हस्तगत केलं. मग मी त्याला सोडून दिलं.पण सकाळी मी सगळी हकीगत तार करून फोर्ब्सला कळवली आहे. त्याने जर जोसेफला पकडलं तरफारच छान पण माझी अशी अटकळ आहे तो पळून गेला असणार. आणि माझा असा अंदाज आहे की लॉर्ड होल्डहर्स्ट आणि मि. पर्सी फेप्स या दोघांनही हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं नाही तर जास्त बरं वाटेल. ..."
"बापरे... म्हणजे हे कागद माझ्या आजारपणात पूर्णवेळ माझ्यापासून हाताच्या अंतरावर होते?"
"हो ."
"आणि जोसेफ हा या सगळ्यामागचा सूत्रधार आणि चोर आहे?"
"जोसेफ जसा दिसतो त्याच्या अगदी उलट आहे. आज सकाळी त्याच्याकडून मला जी माहिती मिळाली त्यावरून त्याला शेअरबाजारात अराच तोटा झाला आहे आणि तो भरून काढण्यासाठी तो कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे त्याला योग्य संधी मिळाल्यावर आपल्या बहिणीचा किंवा तुमच्या प्रतिष्ठेचाही विचार न करता त्याने संधीचा फायदा घेतला."
"बापरे माझं डोकं अगदी चक्रावून गेलं आहे."
"तुमच्या केसमधे सगळ्यात मॊठा अडथळा हा होता की त्यात खूपच जास्त पुरावा होता. खरा उपयोगी पुरावा इतर फाफटपसाऱ्यात लपून गेला होता. त्यामुळे सगळ्या मुद्द्यांची छाननी करून त्यातल्या खऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांची नीट क्रमवारी लावायला हवी होती. तेंव्हाच नक्की कोणत्या घटना घडल्या आणि कुठल्या क्रमाने घडल्या हे लक्षात आलं असतं. त्या रात्री तुम्ही जोसेफबरोबरच घरी जाणार होतात त्यामुळे मला जोसेफचा संशय आधीपासूनच होता. नंतर जेंव्हा कोणीतरी तुमच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला तोसुद्धा अशा वेळी की जेंव्हा पहिल्यांदाच रात्रपाळीची नर्स तिथे हजर नव्हती, तेंव्हा माझा संशय पक्का झाला कारण तुम्ही म्हणाला होतात की त्या खोलीत आधी जोसेफ रहात होता . त्यामुळे तिथे काहीतरी लपवून ठेवायचं असतं तर ते जोसेफच करू शकला असता. "
" बापरे...मी डोळ्यांवर कातडं ओढलं होतं की काय?"
"त्या रात्री ज्या घटना घडल्या त्या साधारणपणे अशा होत्या
जोसेफ चार्ल्स स्ट्रीटवरच्या दारातून आत आला. त्याला आतला रस्ता माहीत असल्यामुळे तुम्ही खोलीबाहेर पडल्यावर क्षणार्धातच तो सरळ तुमच्या खोलीत शिरला. तिथे कोणीही नाही हे पाहून लगेच त्याने तिथली घंटा वाजवली. तेवढ्यात तिथे टेबलावर ठेवलेल्या कागदांकडे त्याचं लक्ष गेलं. त्या कागदपत्रांची किंमत लक्षात आल्याबरोबर त्याने ती उचलून आपल्या खिशात घातली आणि तो तिथून बाहेर सटकला. झोपलेल्या कॉफीवाल्याने घंटेकडे तुमचं लक्ष वेधून घेईपर्यंत काही मोलाची मिनिटं निघून गेली होती आणि तेवढा वेळ त्याला पळून जायला पुरेसा होता."
"वोकिंगच्या दिशेने येणारी पहिली गाडी पकडून तो घरी आला. त्या कागदपत्रांचे नीट निरीक्षण केल्यावर ती खरंच मौल्यवान आहेत याबद्दल त्याची खात्री पटली आणि त्याने ती एका सुरक्षित जागी लपवून ठेवली. फ्रेंच किंवा रशियन दूतावासात जाऊन त्या कागदपत्रांच्या मोबदल्यात मोठी रक्कम वसूल करायची स्वप्नं तो रंगवत असतानाच तुम्हाला बेशुद्धावस्थेत घरी आणण्यात आलं आणि त्याला क्षणाचीही उसंत न देता तिथून बाहेर काढण्यात आलं आणि तुम्हाला त्याच्या खोलीत ठेवलं गेलं. त्यानंतर त्या खोलीत कमीतकमी दोन माणसं तर कायमच असायची. त्यामुळे तो त्याच्या खजिन्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्याच्या अवस्थेची कल्पनाच केलेली बरी. आणि मग परवा रात्री त्याला हवी तशी संधी चालून आली. त्याने चोरून तुमच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जागे होतात त्यामुळे त्याचा बेत उधळला गेला. तुम्ही काल रात्री तुमचं औषध घ्यायला विसरला होतात. "
"हो आठवलं मला... मी झोपायच्या आधी औषध घेतलं नव्हतं.."
"माझा असा अंदाज आहे की त्याने त्या औषधात गुंगीचं औषध मिसळून ठेवलं होतं आणि त्यामुळे तुम्ही बेशुद्ध असाल अशी त्याची खात्री होती. अर्थातच पुन्हा संधी मिळाली की तो पुन्हा एकदा त्या खोलीत येणार हे मला माहीत होतं. काल रात्री तुम्ही घरी नसल्यामुळे त्याला तशी संधी मिळाली. म्हणूनच मि मिस हॅरिसनना दिवसभर ती खोली सोडून हलू नका असं सांगितलं होतं. अशा प्रकारे सगळं काही आलबेल आहे त्याची समजूत करून दिल्यावर मी बाहेर पहाऱ्यावर थांबलो. माझी खात्री होती की हे कागद त्या खोलीतच कुठेतरी आहेत. पण ते स्वतः शोधत बसण्यापेक्षा मी त्यालाच ते बाहेर काढू दिले आणि अनेक कटकटीं टाळल्या. "
"पण परवा रात्री तो दारातून का नाही आला? खिडकी उघडत बसण्याचा धोका त्याने का पत्करला?"
"कारण दारातून आत आला असता तर वाटेत त्याला सात बेडरूम्स ओलांडून यावं लागलं असतं. याउलट बागेत उतरून खिडकीतून आत येणं त्याला कधीही जास्त सोपं होतं."
"तुम्हाला काय वाटतं ? त्याने मला मारलं असतं? तो सुरा फक्त खिडकी उघडायलाच होता की..."
"काही सांगता येत नाही.मि. जोसेफ हॅरिसन हे मला फारसे विश्वासार्ह वाटले नाहीत हे मात्र खरं....."
(समाप्त)

'नेव्हल ट्रीटी'चा स्वैर अनुवाद.
--अदिती

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

<< Home