नौदलाच्या कराराचा मसुदा(३)
"डॉक्टरांनी मध्यरात्री घराचं दार ठोठावल्यावर माझी ती भयंकर अवस्था पाहून घरच्या लोकांची काय स्थिती झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. माझी आई आणि ऍनी यांना प्रचंड धक्का बसला होता. डॉक्टरांना पोलिसांनी पुरेशी कल्पना दिली असावी. माझी तब्येत फारच खालावली होती. मला यातून बाहेर पडायला खूप वेळ लागणार हे ओळखून जोसेफच्या या खोलीत माझं अंथरूण घातलं गेलं आणि त्या बिचाऱ्याला बेघर करून गेले नऊ आठवडे मी याच खोलीत मेंदूज्ज्वराच्या भयंकर यातना भोगत होतो. जर ऍनीने माझी काळजी घेतली नसती तर मी जगूच शकलो नसतो. ती दिवसभर माझ्या उशाशी बसून असायची, डॉक्टर दिवसरात्र हाकेच्या अंतरावर असायचे आणि रात्री एक नर्स सतत माझ्यावर लक्ष ठेऊन असायची. कारण मला अपस्माराचे झटके आले की मला आवरणं केवळ अशक्य होत असे. हळूहळू मी भानावर आलो आणि गेले तीन दिवस मी शुद्धीवर म्हणण्याजोग्या अवस्थेत आहे. झालेल्या घटनांच्या भयंकर आठवणी मला नीटशा आठवायला लागल्यात. मी शुद्धीवर आलो नसतो तर बरं झालं असतं असं मला कधी कधी वाटायला लागतं.
भानावर आल्यावर मी आधी मि. फोर्ब्सना तार केली. त्यांनी मला सांगितलं की शक्य होते ते सगळे प्रयत्न करून झाले आहेत. तो कॉफीवाला आणि त्याची बायको यांची पूर्ण चौकशी झाली पण त्यात कहीही निष्पन्न झालं नाही. त्या दिवशी उशिरापर्यंत ऑफिसमधे थांबलेला आमचा कारकून मि. गोरोट फ्रेंच असल्यामुळे त्याचीही कसून चौकशी झाली पण त्यातही काहीच सापडलं नाही. माझी शेवटची आशा आता तुमच्यावरच आहे मि होम्स. मला वाचवा नाहीतर माझी मोठीच बेअब्रू होणार आहे. मला चार लोकात तोंड दाखवायला जागा राहणार नाही हो..."
एवढं बोलून अतिशय थकलेला पर्सी ग्लानी येऊन कोचावर आडवा झाला. त्याला तकवा आणण्यासाठी ऍनीने एका ग्लासात कसलेसे औषधयुक्त सरबत त्याला प्यायला दिले.
हे सगळं ऐकल्यानंतर होम्स आपली मान किंचित मागे टाकून डोळे मिटून काही वेळ अगदी शांत बसून राहिला. एखाद्याला वाटलं असतं की त्याला झोप लागली आहे पण मला अनुभवाने माहीत होतं की त्याच्या डोक्यात विचारांचं एक वादळ घोंघावत होतं.आणि तो त्याच्या विचारांमधे खोलवर बुडालेला होता. जरा वेळाने तो पर्सीला म्हणाला
"तुम्ही खरोखरच फार नेमकेपणाने सगळ्या घटनांचं वर्णन केलं आहे. आणि जवळजवळ सगळेच तपशील सांगितले आहेत. मला तुम्हाला एकच अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे.
इतकी मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर होती हे तुम्ही कोणाला सांगितलं होतंत का?"
"कुणालाच सांगितलं नहतं."
"अगदी मिस् हॅरिसन यांना सुद्धा?"
"ते काम करायला सांगितलं गेलं तेव्हापासून ही चोरी होईपर्यंत मी ऑफिसातच होतो. वोकिंगला मी आलोच नाही."
"तुमच्या घरचं कोणी तुम्हाला भेटायला आलं होतं का?"
"नाही कुणीच नाही..."
"तुमच्या घरातल्या कोणाकोणाला तुमच्या ऑफिसच्या अंतर्गत रचनेबद्दल माहिती आहे?"
"अं.. सगळ्यांनाच आहे. घरातल्या सगळ्यांनीच माझं ऑफिस आतून पाहिलेलं आहे."
"अर्थात तुम्ही घरात कोणालाच त्या मसुद्याबद्दल बोलला नसाल तर या सगळ्या प्रश्नांना काहीच अर्थ नाही."
"मी काहीच बोललो नव्हतो.."
"त्या कॉफीवाल्याबद्दल तुम्ही काय संगू शकाल?"
"तो एक माजी सैनिक आहे.एवढंच माहितेय मला..."
"कुठल्या रेजिमेंटमधे होता काहीसांगू शकाल?"
"बहुधा कोल्डस्ट्रीम गार्डस...."
"हम्म . धन्यवाद. फोर्ब्जकडे मला इतर तपशील नक्की सापडतील. आपले अधिकारी तपशील गोळा करण्यात फार हुशार आहेत. जर त्यांना ते नीट वापरता आले असते तर..... अरेच्या कय सुंदर गुलाब आहे हा...."
गुलाबी हिरव्या आकर्षक रंगसंगतीच्या एका विशेष सुगंधी फुलाचे निरीक्षण करताना तो पुन्हा एकदा त्याच्या त्या समाधीत बुडाल्यासारखा झाला. हे पाहून बिचारा पर्सी पुन्हा एकदा आडवा झाला. ऍनीने मात्र होम्सकडे वळून मोठ्या आशेने त्याला विचारले
"या प्रकरणाचा काही उलगडा होईल अशी तुम्हाला कितपत आशा वाटते?"
होम्स एकदम भानावर आला आणि तिला म्हणाला
"अरे आपल्याला ही केस सोडवायची आहे नाही का! उम्म्म मी या सगळ्यावर नीट विचार करतो आणि मला काय वाटतंय ते तुम्हाला कळवतो."
"तुम्हाला काही क्लू दिसतायत का?"
"माझ्यापुढे एकूण सात क्लू आहेत पण त्यातले खरे उपयोगी कोणते हे मी विचार केल्यावरच सांगू शकेन."
"तुमचा कोणावर संशय आहे का?"
"हो आहे...माझ्या स्वतःवर!"
"काय?"
" मला संशय आहे की मी नीट विचार न करताच घाईघाईने निष्कर्ष काढीन..."
"मग लंडनला जा आणि तुमच्या निष्कर्षांची चांगली तपासणी करा..."
" तुम्ही खूपच चांगली सूचना केली आहे.मला वाटतं वॉटसन हेच उत्तम होईल. मि फेप्स मला तुम्हाला उगाचच खोटी आशा दाखवायची नाहीये. या प्रकरणात खूपच गुंता झाला आहे..." तो उठून उभा राहिला.
"आपली पुन्हा भेट होईपर्यंत मी शांत बसू शकणार नाही..." पर्सी म्हणाला.
"उम्म्म मी असं करीन उद्या सकाळी याच ट्रेनने मी परत इथे येईन पण माझ्याकडून नकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता गृहीत धरून चाला..."
"तुम्ही उद्या येतो म्हणालात यातच सगळं काही आलं. काहीतरी केल्याचं समाधान तरी मला मिळेल..." पर्सी म्हणाला. "अरे हो! मी विसरलोच.. मला लॉर्ड होल्डहर्स्टांकडून एक पत्र आलंय."
"आहा! काय म्हणतात ते?"
"पत्र बरंच कोरडेपणाने लिहिलंय पण तरी मामाचं हृदय जाणवतंय त्यातून. त्याने मला झाल्या प्रकरणाचं गांभिर्य पुन्हा सांगितलंय आणि हेही सांगितलंय की मी पूर्णपणे बरा होईपर्यंत माझ्यावर कारवाई होणार नाही तरी मला झालेला प्रकार निस्तरायची ही शेवटची संधी आहे..."
"हम्म... योग्य तेच हिलंय आणि तुम्हाला समजून घेऊन लिहिलंय...चल वॉटसन आपल्याला आज दिवसभरात बरीच कामं करायची आहेत."
जोसेफने आम्हाला परत वोकिंग स्टेशनपर्यंत सोडलं आणि आम्हाला लगेचच एक पोर्टसमाऊथला जाणारी जलदगती ट्रेन मिळाली. आम्ही क्लॅपहॅम जंक्शन पार करेपर्यंत होम्स त्याच्या विचारांतच बुडालेला होता.
" या लाईनवरच्या गाड्यांमधून लंडनला जायला मला फार आवडतं. कारण ही लाईन इमारतींच्या वरून जाते. खालची घरं बघ किती सुरेख दिसतायत.ते बघ काय आहे.."
"बोर्डिंग शाळा ?"
" त्या नुसत्या बोर्डिंगच्या शाळा नाहीत वॉटसन... उद्याच्या इंग्लंडला मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत ते. बरं ते जाऊ दे. मला सांग हा फेप्स दारू पितो का?"
"मला तशी शक्यता कमी वाटतेय..."
"मलाही. पण आपल्याला सगळ्या शक्यतांचा विचार करायला हवा ना..तो यात बराच खोलवर अडकलाय आणि आपण त्याला बाहेर काढू शकू की नाही सांगता येत नाही....
तुला मिस हॅरिसन कशी वाटली?"
" बरीच खंबीर मनाची आहे ती."
"पण मनाने चांगली असावी. ती आणि तिचा भाऊ म्हणजे नॉर्दंबरलॅंडच्या आसपासच्या एका लोखंडाच्या खाणींच्या मालकाची मुलं असावीत.मागच्या वर्षी हिवाळ्यात पर्सी कुठल्यातरी प्रवासादरम्यान तिला भेटला असावा. त्याने तिला लग्नाची मागणी घतली असणार आणि म्हणून त्याच्या घरातल्या लोकांशी ओळख करून घ्यायला म्हणून ती आपल्या भावाबरोबर इथे आली. तेवढ्यात हा सगळा प्रकार घडला आणि तिने आपल्या प्रियकराच्या शुश्रुषेचं काम अंगावर घेतलं आणि म्हणूनच तिचा भाऊही इथेच राहिला.....
मला आज बऱ्याच चौकशा करायच्या आहेत. एक दोन चौकश्यांचा या प्रकरणाशी खरं म्हटलं तर काही संबंध नाहीये..."
"माझे पेशन्ट्स.." मी बोलायला सुरुवात केली पण मला दोन शब्दही न बोलू देता तो जरा घुश्श्यातच माझ्या अंगावर ओरडला" तुला जर तुझ्या केसेस या केसपेक्षा जास्त रोचक वाटत असतील तर तू जाऊ शकतोस..."
"मी असं म्हणत होतो की सध्या माझी प्रॅक्टिस तशी थंडच आहे त्यामुळे मी वेळ काढू शकतो..."
"वा वा..." याची कळी एकदम खुलली.". मला वाटतं आपण आधी फोर्ब्जला भेटावं. तो आपल्याला बरेच तपशील देईल..."
"पण तू म्हणालास की तुला काही क्लू मिळालाय म्हणून..."
"माझ्याकडे बरेच क्लू आहेत पण त्यांची क्रमवारी लावायला हवी. वॉटसन तुला माहितेय? सगळ्यात शोधायला अवघड गुन्हा तो असतो असतो ज्यामागचा उद्देश आपल्याला माहीत नसतो. या केसमधे आपल्याला उद्देश तर माहिती आहे. प्रश्न आहे तो यामुळे सर्वात जास्त फायदा कोणाचा होणार आहे हा. यात रशियन राजदूत आहे , फ्रेंच राजदूत आहे त्यांना तो कागद विकू शकेल असा माणूस आहे आणि लॉर्ड होल्डहर्स्ट सुद्धा आहेत.."
"लॉर्ड होल्डहर्स्ट!"
"त्यांच्या वकुबाच्या माणसाला असा एखादा दस्तऐवज चुकून गहाळ झाला तर बराच फायदा होण्यासारखा आहे नाही का.."
"पण त्यांच आजवरचं चारित्र्य तर निर्मळ आहे..."
"थोड्या वेळात आपण त्यांना प्रत्यक्ष भेटू तेव्हा आपल्याला कळेलच.. तोपर्यंत माझ्या चौकशीला सुरुवातही झाली आहे हे तुला माहितेय का?"
"सुरुवात झाली? कधी ? कशी?"
" मी वोकिंग स्टेशनवरून लंडनच्या सगळ्या वर्तमानपत्रांना तारा केल्या आहेत. या आज संध्याकाळच्या आवृत्त्यांमधे छापल्या जातील."
त्याच्या हातात एका वहीचे फाडलेले पान होते. त्यावर पेन्सिलीने लिहिले होते " " बक्षीस! बक्षीस!
२३ मे च्या रात्री परराष्ट्र कचेरीत किंवा त्याच्या जवळपास एका उतारूला सोडणाऱ्या टॅक्सीचा नंबर कळवणाऱ्याला १० L चे बक्षीस द्दिले जाईल."
"याचा अर्थ तुला वाटतंय चोर एका टॅक्सीतून आला होता..."
"नसला आला तरी याने काहीच फरक पडणार नाहीये. पण फेप्स म्हणाला तशी जर व्हारांड्यात किंवा त्याच्या खोलीमधे लपण्याजोगी जागाच जर नसेल तर तो माणूस बाहेरूनच आला असला पाहिजे. रस्त्यावर इतका चिखल असूनसुद्धा त्याने चिखलाचा काहीही माग सोडला नाही आणि तो तिथून निघून गेल्यावर काही मिनिटांमधे त्या जाजमाची तपासणी झाली होती यावरून आपण असं म्हणू शकतो की तो टॅक्सीतून आला होता. "
"हम्म्म तसंच असणार..."
"माझ्या क्लूज मधला हा एक क्लू होता. यावरून आपल्याला काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर येते ती घंटा. ही घंटा बरीच त्रासदायक आहे. ती का वाजवली गेली होती? त्या चोराने आपली फुशारकी मारण्यासाठी ती वाजवली का? का चोराबरोबर आलेल्या व्यक्तीने च्राला थांबवायला घंटा वाजवली? का ती चुकून वाजली? की ती..." आणि अचानक तो त्याच्या त्या गुगीच्या अवस्थेला जाऊन शांत बसला. त्याला खूप जवळून ओळखणाऱ्या मला माहीत होतं की एखादी नवी शक्यता त्याला खुणावत असली पाहिजे.
"आमचं स्टेशन आलं तेव्हा तीन वाजून वीस मिनिटं झाली होती. आम्ही तिथेच आमचं जेवण घाईघाईने उरकलं आणि स्कॉटलंड यार्डामधे जाऊन पोचलो. होम्सने आधीच फोर्ब्जला तार केलेली होती. आणि तो आमची वाटच पहात होता. आम्ही त्याच्या केसमधे ढवळाढवळ करतोय असात्याचा समज झाला होता की काय नकळे पण तो आमच्यावर जरा चिडलेलाच वाटला मला.
"मि होम्स, मी तुमच्या तपासाच्या पद्धतीबद्दल ऐकून आहे. तुम्ही पोलिसांनी कष्टाने गोळा केलेली माहिती हस्तगत करता अणि मग त्या माहितीच्या बळावर ती केस सोडवून आमचं श्रेय लाटता."
"उलट आत्तापर्यंत मी सोडवलेल्या एकूण त्रेपन्न केसेसपैकी फक्त चार केसेस्मधे माझं नाव आहे आणि उरलेल्या एकोणपन्नास केसेसमधे पोलिसांनाच सगळं श्रेय मिळालं आहे. अर्थात तुम्ही इथे नवीन दिसताय त्यामुळे हे सगळं तुम्हाला माहीत नाही याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही. तुमच्या यापुढील कारकीर्दीमधे तुम्हाला माझ्याबरोबर काम करायचे प्रसंग जास्त येतील, माझ्या विरोधात काम करण्याचे नाही हे मात्र तुम्हाला सांगून ठेवतो..."
"तुम्ही जर मला एक-दोन दुवे सांगू शकाल तर फार होईल. आत्तापर्यंत मला या केसमधे काहीच यश मिळालेले नाही..." अचानक त्याच्या सगळा नूरच पालटला होता.
"काय काय केलंत तुम्ही"
"टॅंजी - तो कॉफीवाला, त्याआ आम्ही आत टाकलं होतं पण चांगल्या वर्तनामुळे त्याला सोडून द्यावं लागलं. तो निर्दोष असावा. त्याची बायको मात्र तितकी सज्जन वाटली नाही. तिला या कागदपत्रांबद्दल काहीतरी माहीत असणार."
"तुम्ही तिच्यावर पाळत ठेवली आहे का?"
"आमच्या एक दोन खबऱ्या तिच्या मागावर आहेत. ती दारू पिते आणि ती चिकार झिगलेली असताना तिचं तोंड उघडायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना काही माहिती मिळू शकली नाही."
"तिला देणी होती ना?"
"हो पण ती चुकवली गेली आहेत."
"तिच्याकडे पैसे कुठून आले?"
"टॅंजीचं पेन्शन मिळायचं होतं. त्यातून ते पैसे चुकवले तिने. त्यांच्याकडे अचानक घबाड आलं असावं अशी लक्षणं दिसली नाहीत मला."
"फेप्सने बोलावल्यावर तिच्या नवऱ्याऐवजी ती आली होती याचं काय कारण सांगितलं तिनं?"
"ती म्हणाली की तिचा नवरा खूपच दमला होता म्हणून ती वर आली होती"
"हम्म्म तिचा नवरा त्याच्या दुकानात गाढ झोपलेला सापडला याच्याशी हे जुळतंय. तसं असेल तर तिचं वागणं सोडून तिच्याविरुद्ध आपल्याकडे काहीच नाही. त्या दिवशी ती घाईघाईने घरी का गेली याबद्दल ती काही बोलली का? पोलीस हवालदाराला तिने चांगलंच च्क्रावून सोडलं होतं..."
" तिला निघायला रोजच्यापेक्षा उशीर झाला होता आणितिला घाईने घरी पोचायचं होतं असं तिचं म्हणणं आहे"
"पण मि. फेप्स तिच्यानंतर वीस मिनिटांनी निघाले आणि तिच्या दहा मिनिटं आधी पोचले याबाबत तिचं काय म्हणणं आहे?"
"बस आणि घोडागाडीच्या वेगातला फरक!"
"ती मागच्यादारी का पळाली हे तिने सांगितलं का?"
"तिने पैसे स्वयंपाकघरात ठेवले होते आणि देणेकऱ्यांना ते द्यायला म्हणून ती तिकडे गेली."
"तिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे एकूणात... तिला चार्ल्स स्ट्रीटजवळ कोणी घोटाळताना दिसलं का?"
"हवालदार सोडून इतर कोणीही तिथे नव्हतं म्हणे."
"तुम्ही तिची उलटतपासणी खूप छान घेतली आहे. अजून काय केलंत तुम्ही?"
"त्या गोरोटवरही पाळत ठेवली होती पण त्याच्याजवळही आक्षेपार्ह असं काहीच सापडलं नाही."
"आणखी काही?"
"नाही कुठल्याच प्रकारचा पुरावा सापडत नाही आहे.."
"ती घंटा का वाजली असावी याबद्दल तुम्ही काही अंदाज बांधला आहे का?"
"नाही ना... माझी तर अगदी मती कुंठित झाली आहे..ज्याने कोणी ती वाजवली तो भलताच बेडर असला पाहिजे...अशी घंटा वाजवायची म्हणजे..."
"हम्म्म विचित्र गोष्ट आहे खरी... असो तुम्ही मला मोठीच मदत केलीत त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. मला चोर सापडला तर मी तुम्हाला कळवेनच. बराय परत भेटू... चल वॉटसन..."
आम्ही तिथून बाहेर पडल्यावर मी त्याला विचारलं " आता कुठे जायचंय आपण?"
"आपण आता आपले प्रसिद्ध कॅबिनेट मंत्री आणि भावी पंतप्रधान लॉर्ड होल्डहर्स्ट यांना भेटायला जातो आहोत."
आम्ही डाऊनिंग स्ट्रीटवरच्या लॉर्ड होल्डहर्स्ट यांच्या ऑफिसमधे आलो. सुदैवाने ते ऑफिसमधे होते. आमच्या कामाबद्दल सांगितल्यावर लगेचच आम्हाला आत जायची परवाअगी मिळाली. त्यांचं ऑफिस उत्कृष्ठ सजवलेलं होतं. शेकोटीच्या दोन बाजूला असलेल्या दोन अतिशय सुंदर आणि मौल्यवान खुर्च्यांमधे आम्ही बसलो. लॉर्ड होल्डहर्स्ट उंच , सडसडीत होते. त्यांचा देखणा चेहरा, विचारमग्न भाव, कुरळे पण अकाली पांढरे झालेले केस या सगळ्यातून त्यांच्या खानदानी व्यक्तिमत्त्वाची ओळख पटत होती. आम्ही खाली बसल्यावर होम्सकडे पाहून ते म्हणाले,
"मि. होम्स तुमचं नाव तर सर्वपरिचितच आहे. तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आला आहात हे मला माहीत आहे. पण तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने काम करताय?"
"मि. पर्सी फेप्स यांच्या बाजूने.."
"हम्म.. बिचारा पर्सी... माझं त्याचं मामा - भाच्याचं नातं असल्यामुळे मी इच्छा असूनही त्याला या प्रकरणातून वाचवू शकत नाहीये. या घोटाळ्याचा त्याच्या कारकीर्दीवर फार वाईट परिणाम होणार आहे हो..."
"पण जर ती कागदपत्र सापडली तर?"
" ती जर सापडली तर सगळंच चित्र पालटेल..."
"मला तुम्हाला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत लॉर्ड होल्डहर्स्ट..."
"मी शक्य ते सगळं सहकार्य करायला तयार आहे..."
"तुम्ही त्याला त्या सूचना दिल्यात तेंव्हा तुम्ही दोघे याच खोलीत होतात का?"
"हो. याच खोलीत होतो."
""मग तुमचं बोलण कोणी चोरून ऐकलं असण्याची काही शक्यता दिसत नाही "
"हो तशी काहीच शक्यता नाही."
"त्या कराराची एक प्रत करायची आहे असं तुम्ही इतर कोणाजवळ बोलला होतात का?"
"नाही मी हे कोणालाच सांगितलं नव्हतं."
"तुमची तशी खात्री आहे?"
"हो हो अगदी पूर्ण खात्री आहे. मी कोणालाही याबाबत काहीच सांगितलं नव्हतं."
"हम्म.. जर तुम्ही कोणाला सांगितलं नाहीत, मि. फेप्स कोणाला बोलले नाहेत तर मग चोरी पूर्वनियोजित नव्हती असं दिसतंय. केवळ अपघाताने चोर त्या ठिकाणी आला असणार आणि त्याला ते भेडोळं सापडलं असणार."
"हम्म या बाबतीत मी काहीच सांगू शकत नाही.... "
होम्सने काही क्षण विचार केला आणि तो म्हणाला " या करारातले मुद्दे जर फुटले तर त्याचे परिणाम किती भयंकर होतील असं तुम्हाला वाटतं?"
"अनर्थ होईल हो... सर्वनाश होईल..." त्यांचा चेहरा खूप गंभीर झाला होता.
"पण अजूनपर्यंत तसं काही घडलंय?"
"नाही बुवा..."
"जर ते भेंडोळं रशिअयन किंवा फ्रेंच दूतावासापर्यंत पोहोचलं असतं तर तुम्हाला ते कळलं असतं?"
"हो नक्कीच ती बातमी माझ्यापर्यंत आली असती..." त्यांच्या चेहयावर ताण स्पष्ट दिसत होता.
"ते भॆडोळं नाहीसं होऊन आता जवळजवळ दहा आठवडे लोटले आहेत.अजूनही तशी काही बातमी आपल्या कानावर आलेली नाही. याचा अर्थ असा समजायचा का की काही कारणास्तव तो कराराचा मसुदा अजूनही इच्छित स्थळी पोहोचलेला नाही?"
लॉर्ड होल्डहर्स्टांनी आपले खांदे उडवले. "त्या चोराने ते कागद फ्रेम करून भिंतीवर लावण्यासाठी निश्चितच पळवले नाहीत. नाही का?"
"उम्म्म तो कदाचित अजून चांगले पैसे मिळायची वाट बघत असेल.."
"तो जर अजून थोडा वेळ थांबला तर त्याच्या हाती काहीच लागणार नाही. काही महिन्यांनंतर त्या कराराबद्दल गुप्तता बाळगण्याजोगं काही कारणच उरणार नाही."
"अरे! ही माहिती फार महत्त्वाची आहे.... पण असं असू शकतं ना की तो चोर अचानक आजारी पडला असेल आणि बरेच दिवस आजारीच असेल.."
"कुठला आजार? मेंदूज्ज्वराचा?" त्यांनी एकदम होम्सकडे एक सूचक कटाक्ष फेकला...
"मी तसं म्हणालो नाही.." होम्स जराही विचलित न होता म्हणाला." असो आम्ही आधीच तुमचा बराच मौल्यवान वेळ घेतला आहे. तेंव्हा आता आम्ही तुमचा निरोप घेतो.."
" तुमच्या तपासासाठी शुभेच्छा... तो गुहेगार कोणीही असला तरी त्याला सोडू नका.." ते आम्हाला बाहेर सोडताना म्हणाले.
आम्ही परत व्हाईटहॉलपाशी आलो.
" हा माणूस तसा सज्जन वाटला मला. पण त्याला त्याचं पद टिकवण्यासाठी बरीच खटपट करावी लागते आहे. त्याची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नसावी आणि त्याला बरीच देणी असावीत. तू पाहिलंच असशील की त्याच्या बुटांचे तळवे दुसऱ्यांदा लावलेले होते.
असो, आजच्या दिवशी एवढंच पुरे. तू आता तुझ्या पेशंटस कडे जाऊ शकतोस. मी आज यावर अधिक काही काम करणार नाही अर्थात माझ्या टॅक्सीबद्दलच्या जाहिरातीचं उत्तर मिळालं तर वेगळी गोष्ट आहे. आणि हो वॉटसन, आजच्यासारखाच उद्याही येशील ना माझ्याबरोबर वोकिंगला? आजच्याच गाडीने जाऊ आपण..."
--अदिती
0 Comments:
Post a Comment
<< Home