पुस्तकायन

Wednesday, April 11, 2007

जामखिंडीकरांचा बोका! (१)

...बाहेरून पावसाच्या पागोळ्यांचा मंद आवाज येत होता. मी कुठल्यातरी अंधाऱ्या गुहेत लपून बसलो आहे असं वाटत होतं. पावसामुळे हवा मस्त गार झाली होती. आईच्या साडीची आजीने शिवलेली माझी लाडकी गोधडी पांघरून मी आरामात लोळत होतो. मला सर्दी होईल म्हणून आजीने खिडकी बंद करून घेतली होती. खिडकीच्या वरच्या उघड्या झापेतून मी बाहेर पाहिलं. अजून रात्रच आहे असं वाटत होतं. पण खाली स्वयंपाकघरातून मस्तपैकी खमंग सांज्याचा वास आला. आणि मला कळलं की सकाळ केंव्हाच झाली होती. आता तर शाळेची वॆळ होत आली असणार. अरेच्च्या! विसरलोच की... आज तर शाळा सुरू होणार होती.
मागच्या आठवड्यात आजीने मला बाबूरावांबरोबर रेल्वेलाईनीपलिकडल्या पुस्तकांच्या मोठ्ठ्या दुकानात धाडलं होतं. नव्या कोऱ्या पुस्तकांचा तिथे सुरेखसा वास येत होता. मग माझी पुस्तकं, नवीन पेन, शाईची एक मोठ्ठी दौत आणि एक सुरेखशी रंगपेटी तिथे आम्ही घेतली. मागच्या वर्षी परिक्षेत ड्रॉईंगमधे मी पहिला आलो म्हणून आजोबांनी मला त्यांच्याकडची एक जुनी रंगपेटी दिली होती पण ती प्रयोग करताना संपून गेली. मग मी आजीकडे हट्ट धरला.
"किती रे बाबा हट्टी तू... अगदी आजोबांवर आणि बाबांवर गेलयस बघ...." आजी कौतुकाने मला म्हणाली होती. शाळा सुरू होताना तुला नवी रंगपेटी घेऊ असं तिनं मला कबूल केलं. सुट्टीत आंबे पाडा, विट्टीदांडू खेळा, शिऱ्याच्या टिप्याला फिरवायला घेऊन जा, नदीत डुंबायला जा, साताऱ्याच्या मामाने पाठवलेली पुस्तकं वाचा, आई-बाबांकडे जाऊन या असल्या उद्योगांमधे मला त्या रंगपेटीचा विसरच पडला होता. पण त्या दुकानात ती पेटी हातात धरल्यावर मात्र मला वेडच लागल्यासारखं झालं. ती खूप सुंदर चकचकीत हिरव्या रंगाची आणि पत्र्याची होती. आत वेगवेगळ्या रंगांच्या वड्या आणि एक लाल रंगाचा सुरेखसा ब्रश होता. तिलाही एक मस्त वास येत होता. ती उघडून मी कितीतरी वेळ आतले रंग पहातच राहिलो. तोपर्यंत बाबूरावांनी माझ्या पुस्तकांचा गठ्ठा मोठ्या पिशवीत भरला. मग ते म्हणाले" आता वह्या..." दुकानदाराने गुळगुळीत पानांच्या चार वह्या माझ्यासमोर ठेवल्या. त्यातली एक मी उचलून हातात घेतली. त्यावर माझं नाव सुरेख अक्षरांमधे लिहिल्यावर ती कशी दिसेल असं मनोराज्य मी करायला लागलो. तोवर बाबूरावांनी मला आवडलेल्या प्रकारच्या एक डझन वह्या बांधून घेतल्या. त्यांच्यावर सुंदर झाडांची, पक्ष्यांची चित्र होती. त्यातलं एक कमळाचं चित्र तर इतकं सुंदर होतं की नव्या रंगपेटीतून आधी छानशी कमळंच रंगवायची असं मी ठरवून टाकलं.
"आता एक दप्तर दाखवा पाहू ... चांगलं दणदणीत दाखवा. मागचं दप्तर सहा महिन्यांत फाटून गेलं की हो ." बाबूराव दुकानदाराला म्हणाले. ते दप्तर अगदीच काही सहा महिन्यांत नव्हतं फाटलं पण हे वाक्य दुकानदारला सुनवायला आजीने बाबूरावांना अगदी बजावून सांगितलं होतं....
दप्तरात विट्टीदांडू, जांभळं - चिंचांची पिशवी, कातरकामाची कात्री - डिंक - चिकटपट्टीची गुंडाळी, दोरीच्या उड्या मारायची दोरी, लगोरीचा चिंधीचा चेंडू आणि गोट्या कोंडुसकराने जमवलेले रंगीत दगड नीट मावतील ना हे मी काळजीने बघू लागलो. मागच्या वर्षी अनेक दिवस माझ्या जुन्या दप्तराने निमूटपणे या वस्तूंची ने-आण केली. पण एक दिवस चानक भर रस्त्यात ते फाटलं.. आतल्या गोट्यांचा डबा उघडून त्या रस्त्यावर सांडल्या. तरी बरं चंद्या दिक्षीत बरोबर होता. त्यातल्या सगळ्या गोट्या नाहीच परत मिळाल्या पण मग मी चंद्याला सांगून टाकलं की यापुढे तुझ्या गोट्या तूच सांभाळ. दप्तर का फाटलं याचं कारण आजीला काही केल्या पटलं नव्हतं. दोन दिवस तिनं शिक्षा म्हणून मला घरीच बसवून ठेवलं होतं. खेळणं बंद. मित्रांकडे जाणं बंद. शाळेत जायचं की थेट घरी यायचं... मग एक दिवस माझा उतरलेला चेहरा बघून तिलाच माझी दया आली. पण तोपर्यंत " आई वडिलांच्या स्वप्नांवर बोळा फिरवू नकोस, जरा अभ्यासाची जाणीव ठेव, उनाडक्या करू नकोस, आता तू लहान राहिला नाहीस, वस्तू जपून वापराव्या... दर वर्षी नवीन दप्तर आणायला आपण काही जहागीरदार नाही ..." असं कायकाय तिनं मला ऐकवलं होतं. तिच्या रागाचा पारा इतका वर चढला होता की आजोबाही तिच्यापुढे जायला घाबरत होते....
नव्या दप्तरात या सगळ्या वस्तू मावल्यानंतर रंगपेटी आणि सगळी वह्या पुस्तकं मावली पाहिजेत असंच दप्तर द्या असं दुकानदाराला अगदी बजावून सांगायचं असं मी ठरवलं. तेवढ्यात "ए लंप्या!" अशी हाक माझ्या कानावर आली. पाहतो तर काय जनार्दन हरदनहळ्ळीकर ! त्याच्या बाबांबरोबर तोही पुस्तकं घ्यायला आला होता. मला आणि त्याला एकमेकांना कायकाय सांगायचं होतं. जन्याच्या बाबांचं मंडईजवळ मोठ्ठं दुकान होतं. आधी ते मंडईत भाजी विकायला बसायचे म्हणून त्यांना गावात सगळे कोथमिऱ्या म्हणत. आम्हीही जन्याला जन्या कोथमिरेच म्हणायचो. आम्ही एकमेकांकडे मघून मॅडसारखी एकाच वेळी बोलायला सुरुवात केली. आणि मग बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो. तोपर्यंत बाबूरावांनी माझं सामान नीट बांधून सायकलला लावून पण टाकलं. या सगळ्या गोंधळात ते दप्तराचं दुकानदाराला विचारायचं राहूनच गेलं. बाबूरावांना मला घरी सोडून तालुक्याला जायचं होतं. म्हणून सायकलीवर टांग टाकून आम्ही घरी आलो. निघताना माझं आणि जन्याचं संध्याकाळी क्रिकेटच्या मैदानात भेटायचं ठरलं.
अजून शाळा सुरू व्हायला बरेच दिवस अवकाश आहे असं म्हणून आजीने खेळायला जायला कशीबशी परवानगी दिली. या वर्षी मॅड्सारखा पाऊस शाळा सुरू व्हायच्या आधीच पडायला लागला होता. कदाचित मगच्या वर्षी नीट अभ्यास केला नाही म्हणून त्याच्याही आजीने त्याची चांगली हजेरी घेतली असेल. शेवाळ्यात निसरड्यात नको जाऊस खेळायला असं आजी मला सांगत होती. पण आजोबा तिला म्हणाले " जाऊ दे त्याला. आत्ताच तर खेळायचं वय आहे त्याचं. नंतर माझ्याएवढा झाल्यावर का खेळणार आहे तो?"
"हम्म.. आता काय बोलणार... तुझ्या आवडीची शेवग्याच्या शेंगांची आमटी केलीये. अंधार पडायच्या आत परत ये रे..." मी बाहेर पडता पडता आजी म्हणाली.
जन्या सुट्टीत त्याच्या आजोळी गेला होता. त्याच्या आजीच्या परसात एक दिवस एक मोठा वाघ आला होता म्हणे. मग गावातल्या सर्कसवाल्याने त्याला पकडून नेलं. जन्याने तो वाघ हाताच्या अंतरावरून पाहिला. ती गोष्ट ऐकताना माझे डोळे हे एवढे झाले होते. एका जागी खिळल्यासारखा मी त्याच्या तोंडाकडे बघतच राहिलो.
"लंप्या ते बघ!" तेवढ्यात आवाज आला... तो आवाज कुठून आला हे मी पाहिलं आणि उडालोच!. जन्याच्या वाघाबद्दल विचार करण्यात मी इतका गुंग झालो होतो की जन्या माझ्यासमोरून उठून पलिकडच्या बंगल्याच्या कुंपणाजवळच्या पेरूच्या फांदीपाशी कसा काय पोहोचला हे मला कळलंच नाही!
तो काय दाखवत होता हे मी आश्चर्याने पाहिलं तर काय! त्या पेरूच्या झाडाच्या सोळा हजार एकशे अठ्ठावन्न पानांमधून साधारण बावीसशे सत्तावीस हिरवेगार खोबरी पेरू लुकलुकत होते!... आजपर्यंत या मैदानात बसून आम्ही काय काय केलं होतं पण हे झाड आणि हे पेरू माझ्या लक्षातच आले नाहीत! एकेक पेरू कसा अगदी माझ्या मुठीएवढा होता. तो नुसता पाहिला तरी तोंडाला कसं पाणी सुटत होतं. ते पेरू बघत नुसतं उभं राहणं शक्यच नव्हतं. मी आणि जन्या एकमेकंकडे पाहून हसलो. "काय बोलतोस लंपू? चढायचं काय?"
जन्याचे डोळे कसल्या तरी जादूने भारलेले होते.
"हो!" मी म्हणालो. झाडावर चढण्यात जन्याची आणि माझी कायम शर्यत लागणार! कितीही अवघड खोड असलं तरी जन्या एखाद्या माकडासारखा सुळकन त्यावर चढणार आणि मला वेडावून म्हणणार "तुझ्यासारख्याचं काम नाही हे... सोडच तू" मग मलाही चेव येणार आणि त्याच्यामागे मीही झाडावर स्वारी करणार.या गडबडीत नेमका माझ्या शर्टाला डाग पडणार किंवा चड्डीची धांदोटी निघणार. मग ती आजीपासून लपवताना माझी तारांबळ उडणार..
पण हे सगळं माझ्या डोक्यात यायच्या आत जन्या त्या फांदीवर पोचला सुद्धा! मीही त्याच्या मागोमाग पळालो. शेवाळ्याने माखलेली निसरडी भिंतीची कड दोन्ही हातांनी पकडून भिंतीच्या खाचेत पाय ठेवून स्वतःला वर ओढून घेऊन मी तिच्यावर चढलो. मग तिथून भिंतीच्या मुख्य टपावर. मग एक पाय फांदीवर ठेवून, दोन्ही हातांनी वरची फांदी घट्ट पकडून मी पायाने भिंतीला रेटा दिला आणि माकडाराखा दोन्ही हातांनी आणि पायांनी फांदी पकडून एक मस्त झोका घेतला. फांदीवर पण हिरवट शेवाळं माखलं होतं. त्यातून जाणाऱ्या दोन धावऱ्या मुंग्या तेवढ्यात माझ्या हातावर चढल्या आणि मला गुदगुल्या व्हायल्या लागल्या.जन्या एव्हाना दोन फूट वरच्या फांदीवर उभा होता आणि त्याच्या डोक्यावर लटकणाऱ्या पेरूकडे खिळल्यासारखा बघत होता. मी घाईघाईने हातावरच्या मुंग्या झटकून वर गेलो. त्याच्या शेजारी उभा राहिलो. तो पेरू खरंच तसा मस्त होता. अगदी नंबरी. माझा सांगलीचा मामा हणायचा तसा टॉपक्लास! मी एक चवड्यांवर उभा राहिलो आणि तो पेरू तोडण्यासाठी हात वर केला. माझा हात त्या पेरूला लागला तोच म्याव! असा गुरगुरण्याचा जोरदार आवाज आला. फांदीवर कसलीशी झटापट झाली. लांबून कोणीतरी काहीतरी ओरडलं. मी पाहिलं तर जन्याने भिंतीवर उडी मारलेली आणि तो मला हाका मारू लागलेला. मला काही कळायच्या आतच माझ्या पायावर कोणीतरी जोरदार पंजा मारला. माझा पाय फांदीवरून घसरला. खाली पडता पडता मी दोन्ही हातांनी हाताला लागलेली फांदी पकडली आणि समोर पाहिलं तर दोन पिवळे धमक्क डोळे माझ्याकडे रोखून बघत होते. त्या डोळ्यांचा मालक कोण असावा हे मी शोधू लागलो. फेंदारलेल्या मोठ्या पांढऱ्या मिशा, उंच ताठ उभी केलेली पाठ, सोनेरी सोनेरी घवघवीत अंग, आणि अतिशय लठ्ठ अशी झुबकेदार शेपूट असलेला एक बोका माझ्याकडे रागाने बघत होता. तशाही अवस्थेत मला त्याला हात लावावासा वाटला पण थोडीशी भितीही वाटली.दुर्दैवाने त्या फांदीवरच्या शेवाळ्यामुळे हात सटकला आणि क्षणार्धात मी खाली पडलो. माझ्या वजनाने आणि अचानक खाली पडण्याने करकरा पुढे मागे हलणारी ती फांदी तेवढ्यात भिंतीपासून लांब सरकली आणि मी थेट जमिनीवर कोसळलो. माझं डोकं खाली चिखलात आदळलं. हनुवटी दगडावर आपटून एक तीव्र कळ माझ्या मेंदूपर्यंत गेली. पोट छाती गुडघे आणि चवडे सोलवटले. क्षणभर वेदनांनी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली.
" मेयाऊऊऊऊ " वरून आवाज आला आणि तो बोकेश्वर जमिनीवर उडी मारून माझ्याशेजारून बघताबघता पसार झाला.
क्रमशः


(टीप. प्रकाश नारायण संतांचा लंपन हा वाचणाऱ्याला भुरळ घालणारा आहे. मीही एक लंपनभक्त आहे. त्या प्रेमापोटीच मी लंपन हे नाव घेतलं . आणि त्यानंतर प्र. ना. संताची नक्कल करून पाहण्याचा मोह आवरता येणं अशक्यच होतं. म्हणून ही कथा. ही संपूर्णपणे माझी निर्मिती आहे. पण संतांना पूर्ण श्रेय देऊनच ही इथे सादर करते आहे. काही चुका झाल्या असल्या तर कानही धरा आणि त्या पोटात घाला ही विनंती...
ही कल्पना सुचवल्याबद्दल सातीचे आणि लिहिताना मदत केल्याबद्दल मी राधिका आणि नंदन यांचे आभार.)
--अदिती

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

<< Home