पुस्तकायन

Wednesday, April 11, 2007

माझे भाषांतराचे प्रयत्न - संत्र्याच्या पाच बिया (२)

"काका, हे सगळं काय चाललंय?" मी त्याला ओरडून विचारलं
"मृत्यू" तो म्हणाला आणि त्याच क्षणी त्याच्या खोलीत गडप झाला. हा सगळा प्रकार पाहून मला भितीने अगदी घाम फुटला. मी ते पाकीट उचललं. त्याच्या आतल्या बाजूला डिंकाच्या वर लाल शाईने 'K' हे अक्षर तीन वेळा लिहिलेलं होतं. त्या पाच संत्र्याच्या बिया सोडल्या तर त्या पाकिटात दुसरं काहीही नव्हतं. तो इतका का घाबरला होता हे काही केल्या माझ्या लक्षात येईना. मी त्याच्या खोलीकडे पळालो. तो मला वाटेतच भेटला. त्याच्या हातात एक जुनाट गंजकी किल्ली - माळ्यावरच्या खोलीची असणार ती , होती आणि दुसऱ्या हातात एक गल्ला जमा करायला वापरतात तसली पितळी पेटी होती.
"त्यांना काय हवं ते करू देत. पण मी त्यांना गुंगारा देणार आहे." . तो गरजला."... मेरीला सांग मला माझ्या खोलीत एक शेकोटी लावून द्यायला आणि तू लगेच फोर्डहॅम ना आपल्या वकिलांना घेऊन ये."
" मी त्याने करायला सांगितलेली कामे केली. वकील आले तेंव्हा त्याने मला त्याच्या खोलीत बोलावलं. त्याच्या खोलीत शेकोटी धडाडून पेटली होती आणि चोहीकडे काळी पूड आणि जळकी राख पसरली होती. ती गल्ल्याची पेटी तिथेच बाजूला पडली होती. ती पूर्ण रिकामी होती आणि तिच्याकडे नीट बघताच माझ्या असं लक्षात आलं की तिच्या झाकणावरही सकाळच्या त्या पाकिटासारखाच एक मोठ्ठा 'K' काढलेला होता.
"जॉन, माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या या मृत्युपत्रावर सही करावीस." काका म्हणाला. " मी माझी सगळी मालमत्ता तिच्या सगळ्या सुदैवा-दुर्दैवासकट माझ्या भावाच्या म्हणजे तुझ्या बाबांच्या नावावर करतो आहे. जी पुढेमागे तुलाच मिळणार आहे. जर तू सुखाने तिचा उपभोग घेऊ शकलास तर फारच छान पण जर तुझ्या असं लक्षात आलं की तुला ती लाभत नाहीये तर हा तुझा काका तुला सांगतो आहे की तुझ्या सगळ्यात भयंकर शत्रूच्या नावे ती करून टाक. इतकी भयंकर दुधारी गोष्ट तुझ्या माथी मारताना मला पश्चात्ताप होतो आहे पण या नजिकच्या भविष्यकाळात कशा घटना घडतील हे मी सांगू शकत नाही .... याच्यावर सही करतोस ना?."
"त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्या कागदावर सही केली आणि आमचे वकील तो कागद बरोबर घेऊन गेले.या विचित्र घटनेचा माझ्यावर खोल परिणाम झाला. मी मनाशीच त्या प्रसंगावर उलटसुलट बाजूंनी अनेकदा विचार केला पण त्या प्रसंगाचा अर्थ मला लागू शकला नाही. त्या घटनेमुळे आलेलं भितीचं सावट काही केल्या माझ्या मनावरून जाईना पण जसजसे दिवस जात राहिले आणि आमच्या दिनक्रमामधे काही फरक पडला नाही तसतशी ती बोच मात्र जरा कमी व्हायला लागली. काकाचं पिणं मात्र प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आणि कोणत्याही प्रकारे माणसांची संगत तो पूर्णपणे टाळत होता. तो त्याचा बराचसा वेळ त्याच्या खोलीत आतून कुलूप लावून घेतलेल्या अवस्थेत घालवत असे. पण कधीकधी दारूच्या नशेत बेभान झालेला असताना तो हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बागेत फेऱ्या मारत असे आणि "मी कोणालाही घाबरत नाही. मी काही .बघतोच कोण मला पकडतंय ते" असं मोठमोठ्याने बरळत असे. हे उसनं अवसान गळाल्यावर मात्र तो पळत आपल्या खोलीत जायचा आणि तिला आतून कुलूप लावून बसायचा. त्याचं एकूणच वागणं पाहून असं वाटत होतं की त्याच्या मनात खोलवर दडून बसलेली दहशत सहन करणं त्याच्या शक्तीबाहेरचं होतं. अनेकदा थंडीच्या दिवसातही त्याचा चेहरा घामाने डबडबलेला मी पाहिला आहे."
"एक दिवस तो असाच त्याच्या त्या नशेतल्या सफरीवर घरातून बाहेर पडला तो परत आलाच नाही. आम्ही शोधाशोध केल्यावर बागेतल्या एका हिरवट डबक्यात तो तोंडावर पडलेला आम्हाला सापडला. त्याच्या आजूबाजूला झटापटीच्या काहीच खुणा नव्हत्या आणि त्या डबक्यात पाणीही फक्त दोन फूट खोल होतं. पण त्याच्या स्वतःच्या विचित्र वागण्यामुळे ज्यूरीतील लोकांनी त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असणार असा निर्णय दिला. पण मरणाच्या नुसत्या विचारानेदेखिल त्याला किती वेदना होत हे मी पाहिलं होतं. त्यामुळे त्याने आपणहून मृत्यूला मिठी मारली असेल या गोष्टीवर माझा कधीच विश्वास बसला नाही. पण हळूहळू ती गोष्ट मागे पडली. त्याची सुमारे चौदा हजार पौंडांची मालमत्ता वारशाने माझ्या बाबांना मिळाली जी आजपर्यंत त्यांच्याच नावे बँकेत आहे."
"एक मिनिट," होम्स त्याला मधेच थांबवत म्हणाला " तुमची हकीगत आजपर्यंत मी ऐकलेल्या सगळ्या कथांपेक्षा खरंच विलक्षण आहे. तुमच्या काकांना ते पत्र मिळालं त्या दिवशी कोणती तारीख होती आणि त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी कोणती तारीख होती हे तुम्ही मला नीट सांगू शकाल का?"
"ते पत्र आम्हाला मिळालं १० मार्च १८८३ ला आणि त्यानंतर बरोबर सात आठवड्यांनी म्हणजे २ मे १८८३ च्या रात्री काकाचा मृत्यू झाला."
"ठीक आहे...पुढे काय झालं?"
"जेव्हा माझ्या बाबांनी त्या घराचा ताबा घेतला तेव्हा मी त्यांना विनंती केली आणि ती माळ्यावरची खोली आम्ही काळजीपूर्वक तपासून काढली. आम्हाला ती पितळी गल्ल्याची पेटी मिळाली. ती रिकामी होती आणि तिच्या झाकणावर एक कागद चिकटवलेला होता. त्यावर 'K.K.K' असं लिहिलं होतं. त्याच्या खाली 'पत्रे, पावत्या, नोंदी ' असं लिहिलेलं होतं. माझ्या काकांनी नष्ट केलेल्या कागदांच्या स्वरूपाबद्दल यावरून कल्पना येत होती. त्या पेटीशिवाय त्या खोलीत महत्त्वाचं असं काहीच नव्हतं. हां काकांच्या जुन्या डायऱ्या आणि नोंदवह्या मात्र होत्या ज्यात त्याच्या पराक्रमाची वर्णनं होती. आणि त्याच्या अमेरिकेच्या दक्षिण संस्थानांमधल्या राजकारणी लोकांशी असलेल्या त्याच्या जवळिकीबद्दलही त्यात काही माहिती होती."
" माझे वडील १८८४ सालाच्या सुरुवातीला तिथे रहायला आले आणि १८८५ सालापर्यंत आमचं एकूणच बरं चाललं होतं. ४ जानेवारीच्या दिवशी आम्ही दोघे ब्रेकफास्ट करायला बसलो असताना बाबां एकदम ओरडले. त्यांच्या हातात एक पाकीट होतं आणि दुसऱ्या हातात संत्र्याच्या पाच बिया होत्या. काकाच्या विचित्र मृत्यूची बाबांनी नेहेमीच टर उडवली होती. पण मला त्यांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. "
"जॉन, हे सगळं काय आहे?" ते गडबडून गेले होते.
माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. "K.K.K." मी उद्गारलो.
त्यांनी पाकिटाच्या आत पाहिलं. " ते तर दिसतंच आहे... पण आतल्या बाजूला हे काय लिहिलंय?"
"कागदपत्रं सनडायलवर ठेवा" मी त्यांच्या खांद्यावरून वाकून ते वाक्य वाचलं.
"कुठले कागद? कुठली सनडायल?" त्यांनी मला विचारलं.
"आपल्या बागेत आहे एक सनडायल आहे तीच असणार. आणि ती कागदपत्र म्हणजे ती काकाने जाळून टाकलेलीच ..."
"काहीही.." बाबा धैर्य गोळा करायचा प्रयत्न करत म्हणाले. " आपण एका सभ्य देशात राहतो आणि असले जंगलचे कायदे पाळलेच पाहिजेत असं आपल्यावर बंधन नाही...कुठून आलंय हे पत्रं"

"डंडी" शिक्का बघत मी म्हणालो.
" प्रॅक्टिकल जोक्स.... दुसरं काय..." बाबा म्हणाले " माझा संबंधच काय सनडायल्स आणि कगदपत्रांशी? मी नाही असल्या पत्रांना भीक घालत..."
"आपण पोलिसांकडे जाऊ या. आत्ता लगेच..."
"नको ते आपल्या मूर्खपणाला हसतील.."
"मी जाणार..."
"नाही माझी तुला परवानगी नाही. विसरून जा. थोतांड आहे झालं..."
"त्यांच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. माझ्या मनात मात्र कुठेतरी धोक्याची घंटा वाजत होती."
"ते पत्र आल्यापासून तिसऱ्या दिवशी माझे बाबा त्यांच्या जुन्या मित्राला, मेजर फ्रीबॉडींना भेटायला पोर्टसडाऊन हिलला गेले. ते अशा वेळी घरापासून दूरच असलेले बरे या विचाराने मला जरा बरंच वाटलं. ते गेल्याच्या दुसऱ्या दिवशी मेजर फ्रीबॉडींची तार मला मिळाली. मी लगेच तिथे गेलो. संध्याकाळच्या वेळी फेअरहॅमहून परत येत असताना बाबा तिथल्या घराशेजारच्या चुनखडीच्या खड्ड्यात पडले होते. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. मी त्यांच्याकडे धावलो पण ते गेलेले होते. अनोळखी परिसरातून अंधुक प्रकाशातून घरी येताना ते खड्ड्यात पडले या वाक्यावर ज्यूरीचे एकमत झाले आणि त्यांनी अपघाती मृत्यूचा निर्वाळा देऊन टाकला. त्यांच्या मृत्यूशी संबंधित गोष्टींचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न केला पण मला घातपाताकडे निर्देश करणारी एकही खूण सापडली नाही किंवा त्यांच्या मृतदेहाशेजारी पावलांच्या किंवा तशा स्वरूपाच्या कुठल्याच खुणा मिळाल्या नाहीत. झालेल्या घटनांची पूर्ण माहिती मला असल्यामुळे माझी मात्र खात्री होती की त्यांना कुठल्यातरी भयंकर सापळ्यात अडकवण्यात आलं होतं."
"ज्या भयंकर परिस्थितीमधे माझी मालमत्ता मला मिळाली होती ती बघता मी ती तेंव्हाच कोणालातरी विकून टाकायला हवी होती. पण माझी अशी खात्री झाली होती की माझ्या काकांचा पूर्वेतिहास हाच आमच्यावरच्या संकटांचं कारण होता त्यामुळे इस्टेटीचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. "
"बाबा १८८५ मधे वारले. त्याला आता २ वर्षे आणि आठ महिने उलटले आहेत. इतके दिवस मी सुखाने जगलो आणि आमच्या घराण्याचा हा शाप मागच्या पिढीबरोबरच संपुष्टात आला असे समजून मी निर्धास्त झालो होतो पण माझा तो समज चुकीचा होता. बाबा आणि काकाच्या नशिबाप्रमाणे काल सकाळी माझ्यावरही तीच वेळ आली."
त्याने त्याच्या ओव्हरकोटाच्या खिशातून एक चुरगाळलेले पाकीट बाहेर काढले आणि त्यातून पाच संत्र्याच्या वाळक्या बिया बाहेर पडल्या."हे ते पाकीट. त्यावर लंडनच्या पूर्व विभागाचा शिक्का आहे आणि आत तेच 'K.K.K.' आणि कागदपत्रं सनडायलवर ठेवायची सूचना आहे. "
"मग तुम्ही काय केलंत?" होम्सने विचारलं.
"काहीच नाही."
"काहीच नाही?"
"खरं सांगू का? " आपलं तोंड वैतागाने आपल्या पांढुरक्या हातांमधे लपवीत तो म्हणाला" मी खूप असहाय्य आहे. आपल्यावर शिकाऱ्याचा घाव पडणार आहे हे माहीत असलेल्या सशाप्रमाणे माझी गत झाली आहे. काय करू मला तर काही सुचतच नाही.."
"छे छे....तुला काहीतरी हालचाल केलीच पाहिजे बाबा... ही हातपाय गाळण्याची वेळ नाही. तू त्वरेने हालचाल केलीस तरच तू वाचशील ..." होम्स जवळजवळ ओरडलाच...
"मी पोलिसांना सांगितलं आहे..."
"बर.."
"पण त्यांनी माझं बोलणं हसतहसतच ऐकून घेतलं. त्या इन्स्पेक्टरचं मत असंच पडलं की ही पत्रं म्हणजे प्रॆक्टिकल जोक्स आहेत आणि माझ्या बाबा-काकांचे मृत्यू हे ज्यूरींनी म्हटल्याप्रमाणे फक्त अपघात होते. त्यांचा याच्याशी संबंध जोडण्यात काहीच अर्थ नाही..."
होम्सने संतापाने आपले हात हवेत वर केले आणि मुठी वळल्या. " शुद्ध मूर्खपणा आहे हा..." तो वैतागून ओरडला.
"हा त्यांनी एवढं मात्र केलंय की माझ्या संरक्षणासाठी त्यांचा एक माणूस माझ्या घरी राहील अशी व्यवस्था केली आहे..."
"तो आत्ता आला आहे का तुझ्याबरोबर?"
"नाही.. त्याला फक्त घरातच माझ्याबरोबर रहायचे आदेश होते..."
पुन्हा एकदा होम्सने वैतागाने हवेत हात वर केले...
"का आलास तू माझ्याकडे?" तो ओरडला "आणि त्यातही इतका उशीर झाल्यावर का आलास? लगेच का नाही आलास ?"
"मी मेजर प्रेन्डरगास्टांशी आजच बोललो.. त्यांनी मला तुमच्याकडे यायचा सल्ला दिला..."
"तुला ते पत्र मिळून जवळजवळ दोन दिवस झाले आहेत. त्यामुळे याआधीच तू हालचाल करायला हवी होतीस. तू आत्ता आम्हाला सांगितलंस त्याव्यतिरिक्त तुझ्याकडे सांगण्यासारखं आणखी काही नाही ना? एखादा पुरावा वगैरे?"
"अं... आहे असं म्हणून त्याने आपल्या कोटाच्या खिशातून एक रंग उडालेला निळसर जुनाट कागद बाहेर काढला.
"माझ्या काकांनी जाळलेले कागद याच रंगाचे होते. हा मला काकाच्या खोलीत सापडला. हा शेकोटीतून उडाला असावा. संत्र्याच्या बियांचा उल्लेख सोडून त्यात इतर काही नाही. एखाद्या खासगी डायरीचे पान असावे तसा आहे तो. अक्षर मात्र काकाचंच आहे...."
होम्सने तो कागद उजेडात धरला. त्याच्या फाटलेल्या कडेवरून तो एखाद्या वहीतून फाडला असावा हे स्पष्ट दिसत होतं. त्याच्यावर मार्च १८६९ असं लिहिलेलं होतं आणि त्याखाली पुढील नोंदी होत्या -
४ मार्च हडसन त्याच जुन्या जागेवर आला होता.
७ मार्च सेंट ऑगस्टीनच्या मेकॉले, पॅरमोर आणि जॉन स्वेन ला बिया
पाठवल्या
९ मार्च मॅकॉले काम तमाम.
१० मार्च जॉन स्वेन काम तमाम
१२ मार्च पॅरमोरकडे जाऊन आलो. सगळं काही ठाकठीक झालं
"थॅंक्स..." कागदाची घडी घालून तो जॉन ओपनशॉकडे परत देत होम्स म्हणाला.. "आता मात्र आपल्याला एकही क्षण गमावून चालणार नाही. तू इथून ताबडतोब तुझ्या घरी जा आणि मी सांगतो तसं कर...."
"काय करू?"
"एकच काम. त्या पितळी गल्ल्याच्या पेटीमधे हा कागद घाल आणि त्यात एक चिठ्ठी लिहून ठेव, ज्यात सरळ शब्दात असं सांग की बाकीचे कागद तुझ्या काकाने नष्ट केले आहेत आणि हा एकच कागद उरला आहे. ती चिठ्ठी वाचून वाचणाऱ्याची तशी खात्री पटली पाहिजे. ती पितळी पेटी सांगितल्याप्रमाणे सनडायलवर ठेऊन दे .आलं लक्षात?"
"हो आलं लक्षात.."
"आत्ता सूड घेण्याचा वगैरे विचारही डोक्यात आणू नकोस.आधी तुला असलेला धोका आपल्याला टाळला पाहिजे. मग आपण या गुन्हेगारांना शिक्षा कशी करायची ते पाहू.."
"तुमचे आभार कसे मानू? तुम्ही मला आशेचा एक नवा किरण दिला आहे..." तो उठून ओव्हरकोट चढवत म्हणाला.
"एक सेकंदही वाया घालवू नकोस. स्वतःची नीट काळजी घे.तुझ्या जिवाला खूप मोठा धोका आहे. तू घरी कसा जाणार आहेस?"
"वॉटरलूहून ट्रेन पकडणार"
"अजून ९ वाजायचेत. रस्त्यावर वर्दळ असेल.तुला तसा धोका कमी दिसतो आहे. पण तू आजूबाजूला नीट बघ आणि काळजी घे"
"माझ्याकडे पिस्तूल आहे"
"छान! मग मी उद्यापासून तुझ्या केसमधे लक्ष घालायला सुरुवात करतो."
"तुम्ही हॉर्शेम ला येणार आहात का?"
" नाही हे रहस्य लंडनमधेच उलगडणार आहे"
"चालेल. मी दोन दिवसात त्या पेटीचं काय होतंय ते तुम्हाला कळवतो" तो आमच्याशी शेकहॅड करत म्हणाला आणि झपाट्याने चालत बाहेर पडला. पाऊस अजूनही कोसळतच होता. अतर्क्य घटनांची ही मालिका त्या वादळामुळे मला माझ्या सागरकथांइतकीच खिळवून टाकणारी वाटत होती.
शेरलॉक होम्स मात्र शेकोटीच्या लाल धगीकडे पाहतं बराच वेळ शांतपणे बसून होता. मग त्याने त्याचा पाईप पेटवला. आणि त्यातून निघणाऱ्या धुराच्या वेटोळ्यांकडे तो पहात राहिला.

Labels: ,

1 Comments:

Blogger MANOJ said...

Very Interesting. Waiting for complete story

5:06 PM  

Post a Comment

<< Home