माझे भाषांतराचे प्रयत्न - संत्र्याच्या पाच बिया (१)
मी शेरलॉक होम्सच्या केसेसबद्दल नोंदी ठेवत असतो आणि त्या वेळोवेळी काढून माझ्या मित्राचे बुद्धिचातुर्य आणि एकूणच परिस्थितीचे अचूक विश्लेषण करून त्यातील गाभा जाणून घेण्याचे कसब पाहताना आश्चर्यचकित होणे मला आवडते.
आज मी अशीच एक कथा सांगणार आहे. आजपर्यंत माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या सर्व कथांमधे या कथेमधल्या विचित्र आणि धक्कादायक घटनाक्रमासारखे प्रसंग सापडणार नाहीत.
१८८७ सालच्या सप्टेंबर महिन्याचे शेवटचे दिवस होते. शरदसंपातामुळे निर्मांण होणाऱ्या वादळाने भयंकर उग्र रूप धारण केले होते. पूर्ण दिवसभर गरजणाऱ्या वाऱ्याने आणि अक्षरशः कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने लंडनच्या भर शहरी वस्तीत राहणाऱ्या लोकांनाही आपल्या शहरी कोशातून बाहेर येऊन निसर्गाच्या बलवान पंचमहाभूतांच्या अस्तित्त्वाची दखल घेण्यास भाग पाडले होते. खवळलेली महाभूते एखाद्या बंदिस्त आणि संतापलेल्या सिंहासारखी गरजत होती अंगावर चालून येत होती.वादळाचा वेग दर क्षणाला वाढत होता आणि पाऊस त्याला साथ देत होता. फायरप्लेसच्या एका बाजूला शेरलॉक होम्स आपल्याच तंद्रीत त्याच्या त्या डकवबुकातील नोंदी तपशीलवार लावत बसला होता आणि मी क्लार्क रसेलच्या सागरी कथांमधे बुडून गेलो होतो. वादळाची गर्जना समुद्राच्या गंभीर गाजेशी आणि पावसाचा मारा लाटांच्या सळसळीशी एकरूप होत असल्यामुळे मोठी झकास वातावरणनिर्मिती होत होती. माझी बायको तिच्या माहेरी गेली होती आणि काही दिवसांकरिता मी पुन्हा एकदा माझ्या बेकर स्ट्रीटवरच्या घरात मुक्काम ठोकला होता.
अचानक दारावरची बेल वाजली. माझ्या मित्राकडे पाहून मी म्हणालो
" इतक्या रात्री कोण बरं आलं असेल ? तुझा एखादा मित्र?"
"तुझ्याशिवाय मला कोणी मित्र नाही आणि मला पाहुणे आलेले आवडत नाहीत" तो म्हणाला.
" मग.एखादा अशील?
" आत्ता या वेळी आणि या परिस्थितीत कोण येणार आपल्याकडे? का कोणीतरी फार मोठ्या संकटात सापडलंय? "
तितक्यात जिन्यावर पावलं वाजली आणि दारावर टकटकही झाली. त्याने टेबलावरचा दिवा रिकाम्या खुर्चीकडे प्रकाश पडेल असा सरकवला. त्यामुळे तो पाहुणा त्या खुर्चीत बसू शकणार होता.
"आत या" होम्स मोठ्याने म्हणाला.
एक विशी-बाविशीचा तरुण मुलगा आत आला. त्याचे कपडे उंची होते आणि .त्याच्या वागण्या बोलण्यात अदबशीरपणा होता. दिव्याच्या प्रकाशात त्याने अस्वस्थपणे इकडेतिकडे नजर टाकली. त्याचा चेहरा फिकुटला होता आणि डोळे जड झाले होते आणि कुठल्यातरी चिंतेने त्याची खूपच घालमेल होत असावी असं त्याच्या डोळ्यांकडे पाहून वाटत होतं.
"तुम्हाला इतक्या रात्रीच्या वेळी त्रास देत असल्याबद्दल मला माफ करा. तुमच्या दारापाशी मी सगळं चिखलमय करून ठेवलं आहे..."
"तुमचा कोट आणि छत्री आपण या हुकाला अडकवून ठेवू या म्हणजे ते कोरडे होतील. ...तुम्ही नैरृत्येकडून आलेले दिसताय..."
"अं.. हो हॉर्शेम मधून आलोय"
"तुमच्या बुटाच्या चवड्यांवर दिसणारं वाळू आणि चुन्याचे मिश्रण खास वेगळं आहे..."
"मला तुमचा सल्ला हवाय ..."
" ते तर सहज शक्य आहे"
".... आणि मदतही हवी आहे."
"हम्म ते मात्र तितकं सोपं काम नाही"
"मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलं आहे. मला मेजर प्रेन्डरगास्टांनी सांगितलं तुम्ही त्यांना टंकरव्हिल क्लब च्या घोटाळ्यातून कसं सोडवलंत ते..."
"हो खरं आहे. उगाचच त्यांच्यावर खोटे पत्ते लावल्याचा आरोप केला होता..."
"ते म्हणाले तुम्ही कुठलंही रहस्य उलगडू शकता....."
"ते काही तितकंसं खरं म्हणता येणार नाही.... ही अतिशयोक्ती आहे."
"आणि आजपर्यंत तुम्हाला कोणीही गंडवू शकलेलं नाही."
". आत्तापर्यंत मी चार वेळा फसवला गेलो आहे तीन पुरुषांकडून आणि एका स्त्रीकडून..."
" पण तुमच्या यशस्वी केसेसची संख्या तर खूपच जास्त असेल?"
"हो खरंय "
"मला खात्री आहे की या वेळीही तुम्हीच यशस्वी व्हाल...."
" तुम्ही शेकोटीजवळ सरकून बसा आणि काय तुमचा प्रश्न आहे ते मला जरा सविस्तर सांगा पाहू.."
" हा प्रश्न साधा नाही."
"माझ्याकडे येणारे कुठलेच प्रश्न साधे नसतात.. म्हणूनच तर लोकं माझ्याकडे येतात ना... "
"आमच्या घरात फारच रहस्यमय आणि अतर्क्य घटना घडल्या आहेत "
" मला फार कुतूहल वाऱायला लागलं आहे. मला सगळं नीट पहिल्यापासून सांगा ."
खुर्ची पुढे ओढून आणि शेकोटीकडे पाय करून तो सांगू लागला.
"माझं नाव जॉन ओपनशॉ..खरं पाहता या गोष्टीशी माझा तसा काहीच संबंध नाही. या आमच्या घरात पूर्वापार घडलेल्या घटना आहेत. मी सुरुवातीपासूनच सांगतो."
"माझ्या आजोबांना दोन मुलं होती.एक माझा काका इलिअस आणि दुसरे माझे वडील जोसेफ. माझ्या वडिलांचा सायकलचे सुटे भाग बनवण्याचा कारखाना होता आणि त्यांच्याकडे असलेल्या "ओपनशॉ अनब्रेकेबल टायर्स" च्या पेटंटमुळे निवृत्त होईपर्यंत त्यांनी बराच पैसा मिळवला ."
"इलिअसकाका मात्र त्याच्या तरुणपणीच अमेरिकेत फ्लोरिडाला गेला. तिथे शेतीमधे त्याचा चांगला जम बसला होता. पुढे युद्ध सुरू झाल्यावर तो जॅक्सनच्या सैन्यात सामील झाला आणि नंतर हूडच्या हाताखाली त्याने कर्नलच्या पदापर्यंत मजल मारली. लीने युद्धबंदी केल्यावर काका परत शेतीकडे वळला. ३-४ वर्षांनंतर ,साधारण १८६९ - ७० च्या सुमाराला निग्रोंबद्दल त्याला वाटणारी घृणा आणि रिपब्लिकन सरकार त्यांना देत असलेल्या सवलती यांना वैतागून तो इंग्लंडला परत आला. आणि आपल्या पैशातून त्याने ससेक्स जवळ हॉर्शॅममधे जमीन घेतली. तो एकलकोंडा आणि संतापी होता . संतापला की तो वाट्टेल ते बोलत असे. इतकी वर्षं तो हॉर्शेम मधे राहिला पण एकदाही त्याने गावात पाऊल टाकल्याचं मला तरी आठवत नाही. त्याच्या घराभोवती बाग होती आणि घराशेजारीच त्याचे २-३ मळे होते तिथेच तो आपले मन रमवत असे. पण बरेचदा आठवडेच्या आठवडे तो आपल्या खोलीतून बाहेरही पडत नसे. तो खूप प्यायचा आणि सिगारेट्सही ओढायचा . तो अगदी माणूसघाणा होता. त्याला कोणी मित्रही नव्हते आणि सख्ख्या भावाशीही त्याचे संबंध नव्हते."
"पण आश्चर्य म्हणजे माझ्यावर मात्र त्याचा जीव होता. त्याला मी पहिल्यांदा भेटलो तेंव्हा मी अकरा-बारा वर्षांचा असेन नसेन. इंग्लंडमधे येऊन ८-९ वर्षं झाल्यावर १८७८ च्या सुमारास ' मी त्याच्याजवळ रहावे ' अशी त्याने माझ्या बाबांना गळ घातली. तो माझ्याशी नेहेमीच चांगला वागत असे. तो जेव्हा शुद्धीत असे तेंव्हा तो माझ्याशी खेळतही असे. त्याने सर्व कामकाजामधे आणि व्यवहारांमधे मला सगळे अधिकार दिले होते. त्यामुळे सोळा वर्षांचा होईपर्यंत घरातली बरीचशी कामं मी जबाबदारीने हाताळू लागलो होतो. मी सगळ्या महत्त्वाच्या किल्ल्या सांभाळत असे. मला कुठेही जायची-यायची मुभा होती आणि त्याच्या एकांतवासात व्यत्यय येणार नाही अशा बेताने मी माझ्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगत होतो. पण या स्वातंत्र्याला एक अपवाद होता. घराच्या माळ्यावरची एक खोली सतत कुलूप लावून बंद केलेली असे. तिथे जायची कोणालाच - मलासुद्धा परवानगी नव्हती. बालसुलभ कुतूहलाने मी दरवाज्याच्या फटीतून डोकावून पाहिले होते पण जुन्या ट्रंका आणि इतर अडगळीचं सामान सोडून मला त्या खोलीत दुसरं काहीच दिसलं नाही."
"१८८३ सालच्या च्या मार्च महिन्यात एक दिवस सकाळी काकाच्या न्याहारीच्या टेबलावर परदेशातील पोस्टाचा शिक्का असलेलं एक पाकीट येऊन पडलं. काकाला कोणीच पत्र पाठवायचं नाही. अगदी आमची बिलंसुद्धा आम्ही रोखीने चुकवत असू. त्यामुळे ते आलेलं पत्र ही आश्चर्याचीच गोष्ट होती......"
"भारतातून आलेलं दिसतंय पॉंडिचेरीच्या पोस्टाचा शिक्का आहे. काय असावं बरं हे?" पत्र उघडत तो म्हणाला.
काकाने घाईघाईने तो लखोटा फोडला. यातून संत्र्याच्या वाळलेल्या पाच बिया खडखड आवाज करीत त्याच्या बशीत येऊन पडल्या.
तो प्रकार पाहून मला हसूच फुटलं. पण त्याच्या चेहयाकडे पाहताच माझं हसू ओठावरच विरलं. त्याने डोळे विस्फारले होते आणि आ वासला होता. त्याचा चेहरा एखाद्या भुतासारखा पांढरा फटक पडला होता. आणि आपल्या थरथरणाऱ्या हातातल्या त्या पाकीटावरच्या अक्षरांकडे तो टक लावून पहात होता.
"K.K.K .... परमेश्वरा.... अखेर माझ्या पापांनी मला गाठलंच." तो जवळजवळ किंचाळलाच.
(क्रमशः)
--अदिती
0 Comments:
Post a Comment
<< Home