पुस्तकायन

Wednesday, April 11, 2007

माझे भाषांतराचे प्रयत्न - संत्र्याच्या पाच बिया (३)

"वॉटसन, आजपर्यंतच्या आपल्या सगळ्या केसेस मधे ही केस सगळ्यात अद्भुत आहे..हा प्राणी अतिशय भयंकर परिस्थितीत वावरतो आहे."
"तुला माहितेय त्याच्यापुढे काय वाढून ठेवलंय ते?"
"प्रश्नच नाही...."
"कोण त्रास देतंय त्याला? आणि हा KKK कोण आहे? तो का त्या बिचाऱ्याच्या मागे लागलाय?"
"आपल्यापुढे एका मोठ्या साखळीतला एक दुवा आहे. त्यावरून त्या साखळीतल्या पुढच्या आणि मागच्या कड्या आपल्याला ओळखायच्या आहेत... आता या केससाठी माझ्या तर्कबुद्धीबरोबरच माझ्या माहिती-साठ्याचाही आपल्याला उपयोग करायचा आहे. जरा त्या खणातून अमेरिकन एन्सायक्लोपीडिया काढ पाहू.. त्यातलं K अक्षर बघ.. काढलास? हां.. तर आता आपण कर्नल ओपनशॉबद्दलचे सगळे दुवे एकत्र मांडून त्यावरून आपल्याला काय मिळतंय ते पाहू. "
."पहिली गोष्ट म्हणजे ओपनशॉसारखा माणूस इंग्लंडला परत आला त्यापाठीमागे तसंच मोठं कारण असणार. साधारण त्याचं वय बघता त्याला त्याच्या सगळ्या सरावाच्या झालेल्या गोष्टी सोडून आणि तेही फ्लोरिडामधलं उत्कृष्ठ हवापाणी सोडून इंग्लंडमधल्या एका कोपऱ्यातल्या खेड्यात येऊन राहणं खूप अवघड गेलं असणार. इथे आल्यावरही त्याचा एकलकोंडेपणा आणि माणूसघाणेपणा पाहून आपण असा तर्क करू शकतो की त्याला कशाचीतरी किंवा कोणाचीतरी भिती वाटत होती आणि याच भितीने त्याला अमेरिका सोडून पळून जायला भाग पाडलं. त्याच्या जुन्या सहकाऱ्यांकडून त्याला मिळालेल्या पत्रांकडे पाहून तू हे अनुमान सहज काढू शकतोस की त्याला नक्की कशाची भिती वाटत होती. त्या पत्रांवरच्या पोस्टांचे शिक्के कुठले होते हे तू नीट पाहिलंस का?"
"पहिला पॉंडिचेरी, दुसरा डंडी आणि तिसरा लंडनचा होता..." .
"नुसतं लंडन नाही... ईस्ट लंडन... यावरून तुझा काय तर्क होतो?"
"ही सगळी गावं बंदरं आहेत. पत्र लिहिणारा बोटीवर असला पाहिजे..."
"सुरेख! आपल्याला एक क्लू मिळाला आहे. पत्र लिहिणारा माणूस बोटीवर असण्याची दाट शक्यता आहे. आता आपण अजून एक मुद्दा लक्षात घेऊ. जेव्हा पत्र पॉंडिचेरीहून आलं तेंव्हा धमकी खरी ठरायला सात आठवडे लागले होते. डंडीहून आलं तेंव्हा फक्त तीन ते चार दिवस लागले. याचा अर्थ काय होतो?"
"हे अंतर बरंच जास्त आहे प्रवास करून यायला.."
"पण पत्र यायलाही जास्त वेळ लागणार ना..."
"माझ्या नाही बुवा काही लक्षात येत..."
"याचा अर्थ असा आहे की पत्र लिहिणारा माणूस किंवा माणसं एका शिडाच्या जहाजावर आहेत. ते नेहेमीच कामाला सुरुवात करायच्या आधी एक धोक्याची सूचना पाठवतात. डंडीहून काम पूर्ण करायला त्यांना किती कमी वेळ लागला हे तू पाहिलंच आहेस. ते जर पॉंडिचेरीहून आगबोटीने आले असते तर त्या पत्रासोबतच ते पोचले असते. पण त्यांना लागलेल्या सात आठवड्यांमधून आपल्याला डाकबोट आणि शिडाच्या जहाजाच्या वेगातला फरक कळतो. "
"असेल. असं असेल..."
"असेल नाही, आहे. आता तुझ्या लक्षात आलं असेल की मी जॉनला इतकी घाई का केली... त्याच्याभोवती घोटाळणारा धोका किती मोठा आहे हे तुला कळलं का? दर वेळी त्यांना पत्र पाठवल्याच्या ठिकाणाहून इथे यायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ आपल्याला मिळतो. या वेळी पत्र लंडनहूनच आलं आहे. म्हणूनच आपल्याला वेळ वाया घालवून चालणार नाहीये..."
"अरे बापरे... या सगळ्यामागचं कारण काय असेल?"
"ओपनशॉने पळवून आणलेली कागदपत्रं त्या जहाजावरच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाची असणार. ही गोष्ट उघड आहे की हे एकट्या माणसाचं काम नाही. कोर्टात ज्यूरीला पटू शकेल अशा तऱ्हेने दोन दोन खून करणं एकट्या माणसाला जमणार नाही. यात एकापेक्षा जास्त माणसं आहेत आणि ती सगळी कल्पक आणि दृढनिश्चयी आहेत. त्यामुळे KKK हे एका माणसाचं नाव नसावं.. ते एखाद्या संघटनेचं नाव असणार."
"कुठली संघटना?"
"तू कू क्लक्स क्लान बद्दल ऐकलं आहेस का?" तो पुढे सरकत अगदी हळू आवाजात म्हणाला.
"नाही बुवा...."
त्याने हातातलं पुस्तक उघडलं " हे बघ... कू क्लक्स क्लान हे एका गुप्त संघटनेचं नाव आहे. हे नाव रायफलमधून गोळी झाडताना होणाऱ्या आवाजावरून ठेवलं गेलं आहे. अमेरिकन सिव्हिल वॉर नंतर माजी सैनिकांनी मिळून ही संघटना काढली जी अतिशय वेगाने अमेरिकेच्या टेनेसी, लुईझियाना, कॅरोलिना, जॉर्जिया आणि फ्लोरिडा यासारख्या दक्षिण राज्यांमधे फोफावली तिचा मुख्य उपयोग राजकीय स्वार्थासाठी, निग्रो लोकांमधे दहशत माजवण्यासाठी आणि या पॉलिसीच्या विरोधात असणाऱ्यांना संपवण्यासाठी किंवा त्यांना देशाबाहेर पळवून लावण्यासाठी केला जात असे. या संघटनेचे लोक त्यांच्या शत्रूंना ओकच्या फांदीचे पाच तुकडे, टरबुजाच्या पाच बिया किंवा संत्र्याच्या पाच बिया पाठवून पूर्वसूचना देत असत. ही सूचना मिळाल्यावर त्या माणसाने आपली मते बदलावीत किंवा तिथून कायमचे पळून जावे अशी अपेक्षा असे. जर त्या माणसाने विरोध केला तर त्याचा 'आकस्मिक' मृत्यू ठरलेलाच होता. या संघटनेची बांधणी इतकी कौशल्याने केली गेली होती की आजतागायत त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. ही संघटना मोडून काढायच्या अमेरिकन सरकारच्या प्रयत्नांना न जुमानता ती बरीच वर्षे वाढत राहिली. १८६९ मधे ती अचानक नाहीशी झाली. तिचं पुनरुज्जीवन करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न होत राहिले आहेत. "
"तुझ्या हे लक्षात आलंच असेल की ही संघटना कोलमडून पडली तेंव्हाच ओपनशॉ या कागदपत्रांसकट अमेरिकेतून अदृश्य झाला. त्या कागदपत्रांमधे संघटनेच्या सुरुवातीच्या काळातल्या नोंदी असणार आणि म्हणूनच त्या संघटनेतील काही भयंकर लोक ओपनशॉ कुटुंबाच्या मागावर आहेत. आणि जोपर्यंत हे कागद परत मिळत नाहीत तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत."
"म्हणजे ते आपण पाहिलेलं पान...."
"त्यावरही अशाच घटनांच्या नोंदी आहेत... आता आज रात्री या विषयावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही. आता तू जाऊन झोप आणि मी जरा वेळ व्हायोलिन वाजवत बसतो. सकाळी आपण यात लक्ष घालू. जॉन ओपनशॉ त्याच्या कामगिरीत यशस्वी झाला असेल अशी आशा करू या..."
सकाळपर्यंत पाऊस जरा उघडला होता. जीव नसलेला फिकट सूर्य आकाशात तरंगत होता. मी खाली आलो तेंव्हा शेरलॉक होम्स बाहेर पडण्याच्या तयारीत ब्रेकफास्टच्या टेबलावर बसला होता.
"सॉरी मी तुझ्यासाठी थांबलो नाही.आज मला बरीच कामं करायची आहेत आणि या ओपनशॉच्या केसचाही छडा लावायचा आहे."
"काय करायचं ठरवलं आहेस तू?"
"आधी काही गोष्टींची चौकशी करायची आहे.पुढे काय करायचं हे त्यावर ठरेल.बहुतेक मला हॉर्शेमलाही जावं लागणारसं दिसतंय..."
माझी कॉफी येईपर्यंत मी ताजं वर्तमानपत्र उघडलं.माझी नजर एका मथळ्यावर खिळली आणि माझ्या काळजाचा थरकाप झाला..
"आता या सगळ्याला फार उशीर झालाय..." मी म्हणालो.
"अरेच्या..." ही भिती मला होतीच.. कसं काय झालं हे?" तो वरवर शांतपणे म्हणाला पण त्याला धक्का बसला होता हे कळत होतं.
मी बातमी वाचू लागलो

वॉटरलू पुलावरील अपघात
काल रात्री ९ ते १० च्या दरम्यान एच. डिव्हिजनच्या कॉन्स्टेबल कूक यांनी ड्यूटीवर असताना मदतीसाठी ठोकलेली आरोळी ऐकली आणि काहीतरी पाण्यात पडल्याचा आवाज ऐकून ते धावत गेले. अतिशय अंधारामुळे काही दिसणं अशक्य होतं. वॉटर पोलिस डिपार्टमेंटच्या मदतीने त्यांनी त्या माणसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. नंतर बॉडी बाहेर काढण्यात आली. ती हॉर्शेमच्या मिस्टर ओपनशॉ यांची असल्याचे त्यांच्या खिशात सापडलेल्या पाकिटावरून समजते. रात्रीच्या अंधारात शेवटची ट्रेन पकडण्याच्या धांदलीमधे रस्ता चुकून ते नदीकाठच्या बोटी नांगरण्याच्या पट्ट्यात पडले असावेत. त्यांच्या शरीरावर झटापटीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यांचा अपघातामधे दुर्दैवी अंत झाला आहे. नदीकाठच्या नांगरपट्टीच्या सुरक्षिततेकडे महानगरपालिका आता तरी लक्ष देईल अशी आम्हाला आशा वाटते.

आम्ही काही काळ सुन्नपणे बसून होतो. मी होम्सला इतकं गळून गेलेलं आणि हादरलेलं आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं.
"हा माझ्या अभिमानावर घाला आहे. देवाने मला तेवढी ताकद दिली तर मी त्यांना सोडणार नाही. तो माझ्याकडे मदतीसाठी आला होता. आणि मी त्याला सरळ त्याच्या मृत्यूकडे पाठवलं...."
तो संतापाने खोलीभर येरझाऱ्या घालू लागला. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता.
"शुद्ध उलट्या काळजाचे असले पाहिजेत हे लोक. तो पूल स्टेशनच्या इतकाही जवळ नाही. आणि उशीर झाला असला तरी तिथे गर्दीही बरीच असणार. तरीही त्यांनी असं कसं काय केलं? वॉटसन, आता बघूच या यात कोण जिंकतंय... मी जरा बाहेर जाऊन येतो..."
"पोलिसांकडे?"
"नाही. आता मीच हा सापळा रचणार आहे. तो एकदा जमला की मग पोलिसांना बसू दे पकडापकडी करत."
त्यानंतर दिवसभर तो गायब होता. रात्री जवळजवळ दहा वाजता तो परत आला. तो विलक्षण दमलेला दिसत होता.. आधाशासारखा पुरेसा न चावताच त्याने ब्रेड खायला सुरुवात केली...
"जाम भूक लागलीये मला.. मी सकाळपासून काहीच खाल्ल्लेलं नाहीये..." तो म्हणाला.
"तुझ्या कामाचं काय झालं... काही क्लू मिळाला का?"
"ते जवळजवळ माझ्या मुठीत आहेत. जॉन ओपनशॉचा मी लवकरच सूड घेणार आहे. आता त्यांचंच ते सैतानी प्रतीक त्यांना पाठवायची वेळ आली आहे..."
"काय करतोयस तू?"
त्याने कपाटातून एक संत्रं काढलं आणि भराभरा ते सोलून त्यातून बिया बाहेर काढल्या. त्यातल्या पाच बिया एका रिकाम्या पाकिटात घालून त्याच्या आतल्या बाजूला त्याने लिहिलं "S.H. for J.O". एवढं झाल्यावर त्याने ते पाकीट चिकटवून टाकलं आणि त्यावर पत्ता लिहिला
कॅप्टन जेम्स कॅल्होन,
बार्क 'लोन स्टार',
सॅव्हाना,
जॉर्जिया.
"तो बंदरात परत येईल तेंव्हा हे त्याची वाट पहात असेल. हे पाहून त्याची झोप उडून जाईल.." तो मंद हसत म्हणाला.
"हा कॅप्टन कॅल्होन कोण आहे?"
"त्यांच्या टोळीचा म्होरक्या. मी इतरांनाही पकडणारच आहे पण आधी याला पकडू या..."
"तू कसं काय शोधून काढलंस त्यांना?"
"दिवसभर जुन्या वर्तमानपत्रांच्या आणि कागदपत्रांच्या लायब्ररीमधे बसलो होतो. १८८३ मधे पॉंडिचेरीमधे असणाऱ्या सगळ्या बोटींची यादी शोधून काढली मी. त्यातल्या आपल्याला हव्या असलेल्या सदतीस आहेत. त्यातल्या 'लोन स्टार' नावाच्या एका बोटीने माझं लक्ष वेधून घेतलं. कारण लोन स्टार हे एका दक्षिणेकडच्या राज्याचं नाव आहे. "
"हो बहुधा टेक्सासचं"
"ते मला माहीत नाही पण ही बोट अमेरिकन असणार असं मला वाटलं . नीट पाहिल्यावर तिच्या डंडीमधे असण्याच्या तारखाही जुळल्या आणि मग मी सध्या लंडनच्या किनाऱ्यावर असलेल्या बोटींची नावं शोधली."
"मग?"
"लोन स्टार मागच्या आठवड्यात लंडनला आली. अल्बर्ट डॉक मधून अशी माहिती मिळाली की आज सकाळच्या भरतीच्या वेळी ती नदीतून बाहेर पडली आहे. वाऱ्याची दिशा बघता ती पूर्वेकडे जाणार"
"मग आता तू काय करणार?"
"माझा पंजा त्या तिघांच्याभोवती आवळला गेला आहे. कॅप्टन आणि त्याचे दोघे दोस्त एवढीच अमेरिकन मंडळी आहेत बोटीवर. काल रात्री त्यांच्या बोटीवर माल चढवणाऱ्या पोऱ्याकडून मी ही माहिती काढून घेतली की ते तिघेही काल रात्री बोटीवरून गायब होते. ते सॅव्हानाला पोचतील तोपर्यंत माझं पत्र तिथे पोचलं असेल आणि तिथे तारेने ही बातमीही पोचली असेल की हे तीन सद्गृहस्थ खुनाच्या आरोपाखाली हवे आहेत. बघच तू..."
पण माणसाने कष्टाने अचूकपणे बांधलेले आडाखे नियतीपुढे टिकू शकत नाहीत हेच खरं. त्या वर्षी शरदसंपाताचं वादळ इतकं भयंकर होतं की बरेच दिवस वाट पाहूनही लोन स्टारबद्दल आम्हाला काहीही बातमी कळू शकली नाही. लोन स्टारची शेवटची नोंद दूर अटलांटिक मधे एका डाक-बोटीला समुद्राच्या एका लाटेवर बोटीचं एक फळकुट तरंगताना दिसलं तेंव्हा झाली. त्या फळी वर दोनच अक्षरं होती... ' L.S.'....

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

<< Home