माझेही बुकटॅगिंग...
१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
माणसे अरभाट आणि चिल्लर - जी. ए. कुलकर्णी
२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
जीएंच्या भाषाशैलीबद्दल काय लिहू? मला त्यांनी अगदी भारावून - मोहून टाकले आहे. रोजच्या वापरातले शब्द सुद्धा एखाद्या कुशल जादूगाराच्या परिसस्पर्शाने कसे वेगळ्याच उंचीवर जाऊन उभे ठाकतात हे पाहताना थक्क व्हायला होते. विचार तर इतके सॉलिड आहेत की मेंदूला मुंग्या येतात. त्या मुखपृष्टावरच्या अनेक पिंपळपानासारखं मनही एक पिंपळपान ओऊन त्याच पुस्तकाच्या अवकाशात गरगरत राहतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक आहे. मी काही जीएंची डाय हार्ड फॅन नाही.. खरं म्हणजे मी वाचलेलं त्यांचं हे एकमेव पुस्तक आहे. पण त्यातल्या शब्दांच्या मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या खेळामुळे माझा जीएंबद्दलचा आदर शतपटीने वढला आहे हे मात्र खरं.शाळेत असताना बाईंनी त्यातला 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' चा किस्सा सांगितला होता ... तो उल्लेख, तो पायथागोरसचा सिद्धान्त आणि देवाने दिलेले ते पुण्याअच्या गणितातले दशांश चिन्ह हे मनावर कायमचे कोरले गेलेले काही प्रसंग.
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
पाडस - (अनुवाद) राम पटवर्धन
चौघीजणी - (अनुवाद) शांता शेळके
उत्खनन - गौरी देशपांडे
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
व्यासपर्व दुर्गाबाई भागवत
४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-
बापलेकी
इडली ऑर्किड आणि मी
एक झाड दोन पक्षी
इजिप्तायन
चित्रमय स्वगत
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
एक होता कार्व्हर
वीणा गवाणकरांचं हे पुस्तक मला अक्षरशः संस्कारक्षम वयात सापडलं. शाळेत असताना दिसलं पुस्तक की वाचून काढ असा सपाटा लावला होता मी. पण माझ्या बाईंचं मी काय वाअते आहे याकडे बारीक लक्ष असायचं. वर्गाच्या छोट्याश्या ग्रंथालयातून हे पुस्तक मला मिळालं आअणि ते वाचून मी जी थरारून गेले म्हणता... छोट्या कार्व्हरची ती गोष्ट वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याची थोरवी, साधेपणा, मनाचा निर्मळपणा आणि अनेक दैवी गुणांचा त्याच्या ठिकाणी असलेला तो समुच्चय पाहिल्यानंतर त्याची ती असीम नम्रता आणि निगर्वी वृत्ती म्हणजे फळांनी लगडलेल्या वृक्षराजाची खाली झुकण्याची वृत्ती हे अगदी पटलं मला. आजही त्याचं पुस्तक घेऊन बसले आणि कुठलंही पान काढून काही ओळी जरी वचल्या तरी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. नतमस्तक होण्यासारख्या किती जागा देवाने निर्माण केल्या आहेत हे पाहिलं की या जगाचा पसारा नक्की कोणत्या डोलाऱ्यावर उभा आहे हा प्रश्न पडायचा बंद होतो...
1 Comments:
माणसे: अरभाट आणि चिल्लर मधले शाळेतील प्रसंग ज़ीएंनी अतिशय सुंदर रंगवले आहेत.
जीएंचे पिंगळावेळ हे अतिशय सुंदर पुस्तक आहे... जरूर वाचा..
Post a Comment
<< Home