पुस्तकायन

Saturday, June 10, 2006

काही पुस्तकांबद्दल थोडेसे

पु. ल. , शिवाजी सावंत, रणजीत देसाई,श्री. ना .पेंडसे , भा. रा. भागवत इ. प्रथितयश लेखकांची पुस्तके वाचायला मला नेहेमीच खूप आवडतं आणि त्यांच्या पुस्तकांना मोठा वाचकवर्ग लाभलेला असल्यामुळे या पुस्तकांबद्दल नेहेमीच चर्चा होत असते. पण आडबाजूला कोपऱ्यात असणाऱ्या किंवा वेगळ्या विषयावरच्या पुस्तकांबद्दलही मला तितकाच जिव्हाळा वाटतो. त्यातली ही काही रत्नं...

१.धूळपाटी :
शांता शेळकेशांताबाईंचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. हे रूढ आत्मचरित्र नाही पण शैक्षणिक जीवनाचे मनोरम चित्र रेखाटणारे हे पुस्तक मला अतिशय आवडते. शांताबाईंची एका वनखात्यातल्या अधिकाऱ्याची परकरी मुलगी या रूपातून 'शांता शेळके' या रूपापर्यंतच्या प्रवासातली जडणघडण, त्यातले कडू-गोड टप्पे , बालसुलभ सुख दुःख, कौटुंबिक आघात-प्रेम इ. घटनांच्या पार्श्वभूमीवर हे कथन पुढे पुढे जाते. शांताबाईंच्या साहित्यिक 'असण्याचा' एक अतिशय सुंदर आलेख इथे वाचायला मिळतो. कॉन्व्हेन्ट शाळेत सरदारांच्या मुलींबरोबर केवळ शिक्षणाची लालसा बघून त्यांना मिळालेला प्रवेश, ती शाळा, तिथले ते प्रशस्त ग्रंथालय, ते इंग्रजीचे तास, ती आमराई, ते एकूणच संस्कारक्षम आणि प्रसन्न वातावरण, वाचनाची त्यांना लागलेली गोडी , नंतर महाविद्यालयीन जीवन, संस्कृत सारख्या विषयाबद्दल निर्माण झालेली आत्मीयता, ते शिक्षक, तो भारलेला काळ, उत्तररामचरिताच्या अभ्यासासाठी जागून काढलेल्या संस्मरणीय रात्री आणि बरेच काही संदर्भ, उल्लेख त्यांच्या सरळ साध्या ओघवत्या शैलीत वाचताना आपल्यालाही अनुभवावेसे वाटतात. अगदी सरळ साधं हृद्गत असं आईच्या हातच्या पदार्थासारखं पुढे येतं आणि क्षणात आपलंसं करून टाकतं. (या सगळ्याला माझ्या व्यक्तिगत आनंदाची एक किनार जोडली जाते कारण यात वर्णन केलेल्या शाळेची आणि महाविद्यालयाची मी स्वतः विद्यार्थिनी आहे. तो अभिमानाचा रंग नकळत यात मिसळला जातो. )अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे. जरूर वाचावं असं आहे.
२. तोत्तोचान :
तेत्सुको कुरोयानेगी (अनुवाद चेतना सरदेशमुख-गोसावी)दुसऱ्या महायुद्धातील नागासाकीच्या दुर्दैवी बाँबहल्ल्यात जिचा दुर्दैवी अंत झाला अशा एका अनोख्या शाळेची गोष्ट यात आहे. बालवाडीतून विक्षिप्त वर्तनाबद्दल काढून टाकलेल्या तोत्तोचान या मुलीला आत्मसन्मानाने जगायला शिकवणारी तोमोई ही ती शाळा. या तोत्तोचान नेच मोठेपणी तिचे लाडके कोबायाशी सर आणि त्यांच्या शिक्षणक्षेत्रातल्या या आगळ्या प्रयोगाची कथा लिहिली आणि ती जगभर लोकप्रिय झाली. तेत्सुको कुरोयानेगी यांना युनेस्को च्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करायचा सन्मान या पुस्तकामुळे मिळाला. हे पुस्तक विलक्षण आहे आणि लहान तोत्तोचाअच्या मनोविश्वाशी समरस होऊन लिहिलं आहे. कोबायाशी गुरुजींची ही जरा वेगळ्या पद्धतीची शाळा जिथे शिस्तीचा बाऊ न केला जाताही मुलांना चांगल्या-वाईटाची समज येत असे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. रस्त्यावरून जाणाऱ्या बँडवाल्यांची वाट पहात वर्गाच्या खिडकीशी उभी राहणारी चिमुरडी तोत्तोचान आणि तिच्यात सहज होत जाणारे बदल वाचताना मन आनंदाने भरून जातं. प्रत्येक मुलाकडे स्वतंत्रपणे लक्ष देणारे कोबायाशी मला तरी थक्क करून सोडतात. मुलांच्या शर्यतीत एक प्रकार फक्त एका अपंग मुलालाच करता येईल असा ठेऊन त्याला गरज पडली तर त्याच्या नकळत एक 'लिफ्ट' देणारे कोबायाशी मला अंतर्मुख करून जातात. प्रत्यक्षच वाचावं असं हे पुस्तक. अधिक प्रसंग इथे सांगून रसभंग करणार नाही मी पण हे पुस्तक चटका लावून जातं हे मात्र खरं...
३. टोकियोच्या प्रांगणातील चमकत्या तारका :
भाषांतरकर्तीचं नाव अत्ता मला आठवत नाही पण एका ब्रिटिश पत्रकर्तीने जपानमधल्या वास्तव्यातील निरीक्षणांवरून विसाव्या शतकातील पाच जपानी स्त्रियांबद्दल लिहिले आहे. जपानी समाजाच्या बदलत्या स्पंदनांचे चित्रण तर यात आहेच पण आपल्या कलाविष्कारांमधे आणि कलावंताला सततच ज्याची आस असते अशा स्वतःच्या शोधामधे रमू पाहणाऱ्या-रमणाऱ्या किंवा ती आस लागूनही ते न करू शकणाऱ्या या स्त्रियांच्या या कहाण्या मला माझ्या विश्वाच्या परिघाबाहेरच्या आणि विलक्षण वाटल्या. या स्त्रियांमधे एक कवयित्री, दोन अभिनेत्री, एक नटी, एक चित्रकार अशा विविध स्तरांवरच्या स्त्रिया आहेत. आणि त्यांची भावविश्व, त्यांची पार्श्वभूमी, त्यांना वेढून असणारा समाज हाही भिन्न आहे. वेगळं,कसदार आणि घालवलेल्या वेळाची चांगली परतफेड करणारं असं हे पुस्तक मला तरी वाटलं. विशेषतः शिको या कवयित्रीच्या आयुष्याची दुर्दैवी कहाणी मला खिन्न करून गेली. प्रांत-भाषा-समाज बदलला तरी स्त्रियांच्या कहाण्या त्याच बंधनांनी, त्याच कर्तव्यांच्या बेड्यांनी बांधलेल्या असतात याचा एक उदासवाण प्रत्यय मला या पुस्तकातून आला.
४. '!चीपर बाय द डझन' :
मूळ लेखन ऍन गिलब्रेथ-कॅरे व तिचा भाऊ(बहुधा फ्रँक आहे त्याचं नाव मूळ लेखकांची नावे चुकण्याचा संभव आहे चूभूदेघे!) अनुवाद मंगला निगुड्कर. आपल्याला सहा मुले आणि सहा मुली अशी एकूण बारा मुलं व्हावीत अशी इच्छा असणाऱ्या आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलेल्या एका अमेरिकन ज्यू माणसाची ही कथा. बारा मुलं का या प्रश्नाचं उत्तर 'चीपर बाय द डझन' असं ते देत असत. त्यांच्या एका मुलीने आणि मुलाने मिळून हे चरित्र लिहिलं आहे. फ्रँक गिलब्रेथ हे कुठलंही काम अतिशय तीव्र गतीने कसं करता येईल या विषयातले तज्ञ होते. लोकविलक्षण अशी तीव्र बुद्धिमत्ता त्यांना लाभली होती. त्यांच्या मरणानंतर त्यांचा मेंदू त्यांच्या इच्छेने प्रयोगशाळेत अभ्यासासाठी दिला गेला. त्यांनी आपल्या डझनभर मुलांना कसे वाढवले याची ही अतिशय प्रसन्न अशी कथा आहे. मुलांना टंकलेखन यंत्र शिकवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या युक्त्या तर अप्रतिम आहेत. नेहेमीच्या परिघाला टँजंट जाणारे हे अनुभव वाचताना रंगून जायला होतं. आई बाळंतपणाला गेल्याअवर बाबा आणि इतर मुलांनी घर कसे चालवले,बारा मुले एकदम गाडीत बसल्यावर काय काय गंमती होत, वाढत्या वयाच्या मुलांची काळजी बाबा कशी घेत असत, खट्याळ आणि खोड्याळ मुलांच्या डांबरटपणाला आई-बाबा मिळून कसे तोंड देत असत वगैरे तपशील तर विलक्षण मनोरंजक आणि प्रसंगी हास्यस्फोटक आहेत. माझ्या 'वाचलीच पाहिजेत अशा' पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचे स्थान वरचे आहे.
अजून बऱ्याच पुस्तकांबद्दल लिहायला मला आवडेल. पाहू या आता ते कधी होतंय लिहून ते....
--अदिती

1 Comments:

Blogger Manjiri said...

अदिती,
नव्या ब्लॉग निमित्त अभिनंदन!
नव्या पुस्तकांची ओळख झाली आता नक्की मिळवुन वाचेन.
चिपर बाय द डझन मला पण खुप आवडते. त्यातला ध्वनिमुद्रिकांच्या सह्हायाने फ्रेंच शिकायचा किस्सा मस्त आहे.
या पुस्तकावर आधारित असलेला सिनेमा मात्र अपेक्षाभंग करणारा ठरला.
परत एकदा अभिनंदन.

10:44 AM  

Post a Comment

<< Home