पुस्तकायन

Sunday, June 18, 2006

नर्मदेऽऽहर

श्री. जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेल्या स्वानुभवांवर आधारित नर्मदेऽऽऽहर या पुस्तकाबद्दल थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून लिहीत आहे. नुकतेच मी हे पुस्तक वाचून संपवले. अलिकडे म्हणजे ऑगस्ट २००५ मधे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कुंट्यांनी (लेखकाने असे न म्हणता कुंट्यांनी असे म्हणते आहे.) केवळ २० दिवसात ते एकहाती लिहून काढले आहे. पुस्तक अतिशय सुंदर आणि विलक्षण पकड घेणारे आहे,इथे सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की ज्यांना देव,धर्म,पाप,पुण्य,श्रद्धा इ. कल्पनांवर भरपूर वाद घालायला आवडते त्यांनी हे(पुस्तक सोडा , पण हा लेख सुद्धा!) न वाचलेले बरे. कारण कुंट्यांना आलेले अनेक अनुभव तर्काच्या-विज्ञानाच्या कसोटीवर अपासून बघणे अशक्य आहे. काही लोकांना तर ते दिवास्वप्न अर्थात हॅल्युसिनेशन वाटण्याचा संभव आहे. माझा स्वतःचा चमत्कारांवर विश्वास नाही. तरीही या पुस्तकात दिलेले अनुभव थक्क करून सोडतात हे खरे. तेव्हा एका वेगळ्या शक्यतेचा विचार करायला लावणारे आणि आपल्या भोवतालच्या चाकोरीबद्ध जगातून काही काळापुरती मुक्तता देणारे हे वेगळे अनुभव ज्यांने त्याने स्वतःच सत्यासत्यता ठरविण्यातले आहेत. (हे डिस्क्लेमर म्हणून धरायला हरकत नाही. कृपया माझ्यावर वाचकांच्या पत्रांची मारामारी नको!)
तर आता विषयाकडे वळू या. पुस्तकाच्या नावावरून लक्षात आलंच असेल की हे पुस्तक नर्मदा परिक्रमेवर आधारित आहे. सध्या नर्मदा म्हटली की सरदार सरोवर, नर्मदेकाठचे आदिवासी, त्त्यांचा संघर्ष, मेधा पाटकर इ. गोष्टी प्रकर्षाने आठवतात्. ही नर्मदा नदी अमरकंटक पर्वतात उगम पावते आणि भडोच अर्थात भृगुतीर्थाजवळ पश्चिम सागराला मिळते. तिच्याबद्दल नर्मदापुराणात अशी गोष्ट सांगितली जाते की तिचा विवाह शोण नावाच्या नदाशी होणार होता परंतू प्रत्यक्षात शोणाने तिच्या दासीशी लग्न लावले. त्यामुळे संतापून तिने अमरकंटक पर्वतावरून उडी फेकली आणि ती थेट समुद्रात जाऊन गुप्त झाली. अशी ही नर्मदा. तिला आज हजारो वर्षे लोक माता मानून तिची पूजा करत आले आहेत. शंकराचर्यांनी तिची अतिशय प्रासादिक अशी अष्टकं रचली आहेत. आणि ही लोकमाता सदैव एखाद्या जागृत दैवताप्रमाणे आपल्या भक्तांच्या रक्षणाला धावून जाते असा तिच्या भक्तांचा विश्वास आणि अनुभव सुद्धा आहे.या नर्मदेची परिक्रमा अतिशय अवघड आहे. तिला कोठेही न ओलांडता तिच्या काठाला उजव्या हाताला घेऊन निघायचे. वाटेत तिचे ओहोळ-नाले लागले तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांच्या उगमाच्या मागे जाऊन मग पुढे जायचे हा मुख्य नियम. वाटेत डोंगराळ प्रदेश, भीषण जंगले, हिंस्र श्वापदे, निसर्गाचा असमतोल इ. नैसर्गिक आपत्ती आणि जंगलातले लुटारू वगैरे इतर संकटे ही तर ठरलेलीच. त्यात या साधकाने कुठेही उच्चासनावर बसायचे नाही, कुठेही वस्ती करून फार काळ रहायचे नाही, अनवाणी जायचे, शक्यतो चालतच जायचे असे कठोर नियम. एकूणच हजारो जन्मांचे पापक्षालन करणारी ही परिक्रमा. परिक्रमा विधिवत् पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे ३ वर्षं, ३ महिने आणि १३ दिवस.कारण चातुर्मासात परिक्रमा निषिद्ध. पाऊस थांबेपर्यंत वाटेतच मुक्काम करायचा.जगन्नाथ कुंटे म्हणजे प्रसिद्ध संशोधक कृष्णमेघ कुंटे चे वडील. त्यांचा जन्म विलक्षण हालाखीच्या परिस्थितीत गेला आहे. लहानपणापासून कमालीचे दारिद्र्य आणि आध्यात्माची ओढ या दोनच गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आणि भोगलेल्या. कळायला लागल्यापासून हिमालयाची ओढ. तिथल्या एका गुहेचे सतत दर्शन त्यंना होत असे. वयाच्या आठव्या वर्षी कुंटे हिमालयात जायला म्हणून घरातून बाहेर पडले. त्यांची विधवा आई तेव्हा भिकारदास मारुतीच्या मंदिरात राहात असे. तेव्हा कुंट्यांना साताऱ्याला शंकर महाराजांच्या मठात प्रत्यक्ष शंकर महाराजांनी दर्शन दिले(या प्रसंगी शंकर महाराजांना समाधिस्थ होऊन बरीच वर्षे झाली होती असे कळले.) त्यानंतर अनेक सत्पुरुषांचा स्नेह आणि सद्गुरुंची कृपा कुंट्यांना लाभली. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. यामुळे ते ध्यानाला बसले की त्यांची कुंडलिनी जागृत होते आणि तिला हवे तसे सर्व प्रकारचे प्राणायम-ओंकार त्यांच्याकडून करून घेते. कुंट्यांना घरात राहूनही अध्यात्माणिची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणीची ओढ सतत आहे. यापूर्वीही बरेचदा ते मनात आलं की तीर्थक्षेत्री प्रवासाला गेले आहेत.त्यांना धानात गुरुंकडून आदेश मिळाला की परिक्रमा करून ये. आणि दोन दिवसात ते निघले परिक्रमेला. प्रत्यक्ष प्रवासाचे वर्णन त्यांच्याच भाषेत वाचावे. परिक्रमावासींना वाटेत लोक अन्न-पाणी-चहा-अंथरूण-ओपांघरुण अशी यथाशक्ती मदत करतात. त्यामुळे नित्यपाठाचे पुस्त, नम्रदामैय्याचा एक फोटो आणि थोडेसे प्रवासखर्चापुरते पैसे घेऊन कुंट्यांनी परिक्रमेला सुरुवात केली. वयाच्या साठीच्या आसपास असेल वय त्यांचं. पण चालण्याचा रेटा इतका अफाट की तरुण मुलं सुद्धा त्यांची बरोबरी करू शकत नसत. परिक्रमेत कुंट्यांना प्रचंड शारिरीक कष्टांना तोंड द्यावे लागले. पण नर्मदामैय्यावर सगळा भार त्यांनी सोपवला. आणित्यांच्या श्रद्धेचं फळ, सद्गुरुंची कृपा आणि आपल्या भक्तांवरची नर्मदेची अफाट माया यातलं काहेही कारण असेल पण त्यांना तिच्या कृपेची अनुभूती असंख्य वेळा मिळाली. एकदा पट्टेरी वाघ त्यांच्या शेजारून गेला. पण त्यांना काहीही झाले नाही. एक्दा चालताना पाय ठेचकाळून जखम झाली म्हणून त्यांना थांबावे लागले. समोर पाहिले तर त्यांना थांबावे लागण्याचे कारण कळले. समोर पिवळा जर्द नाग त्यांच्या पायाशी उभा होता. एकदा रात्री झोपेत त्यांच्या छातीवरुन असाच एक महानाग दोन वेळा सरपटत गेला. त्यांची भुकेची सोय करायला, त्यांना मार्गदर्शन करायला, त्यांच्या निवाऱ्याची काळजी करायला एवढंच नाही तर सिगारेटचा( त्यांच्या भाषेत करंटा) हट्ट पुरवायला, त्यांची पूजा स्वीकारायला नर्मदामाईने अनेक रूपांत त्यांना दर्शन दिले. त्यांचा सगळा भार त्यांनी तिच्यावर टाकलेला असल्याने आई जशी लहानग्याची काळजी घेते तशीच त्यांची काळजी तिने घेतली. एकदा त्यांना प्रचंड जुलाब झाले. उभं सुद्धा राहणं अशक्य झालं. तेव्हा ते रानात होते. पुढचा मुक्काम किंवा मनुष्यवस्ती १२ किलोमीटर लांब होती. त्या दिवशी शनिवार होता. त्यांनी मारुतीरायाची प्रार्थना केली की देवा वाटेवर ठेव मला. आणि आश्चर्य म्हणजे कुठून कसे ते गेले काही कळत नाही पण १२ किलोमीटर चे अंतर ते २ तासात अवघ्या २ किलोमीटर मधे चालून गेले.नदी पार करताना योग्य मार्ग सुचेना. नाकापर्यंत पाणी आले. तेव्हा त्यांनी नर्मदेचा धावा केला. नर्मदेने एका आदिवासी बालिकेच्या रूपात त्यांना दर्शन दिले आणि मार्ग दाखवला.एकापेक्षा जास्त वेळा त्यांना आडरानात भुकेच्या वेळी अन्न-निवारा मिळाला आणि त्या निवाऱ्यातून ते बाहेर पडताच त्या जागा अदृश्य झाल्या. पण तिथल्या लोकांनी दिलेल्या काही वस्तू आजही त्यांच्याकडे आहेत. चमत्कार वाचताना आपण अगदी आश्चर्यचकित होऊन जातो.सगळ्यात आश्चर्य वाटते ते त्यांची आणि अश्वत्थाम्याची भेट वाचताना. असे अनेक चमत्कार त्यांच्या संपूर्ण परिक्रमांमधून उलगडत जातात. कुंट्यांनी एकापाठोपाठ एक अशा तीन परिक्रमा केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा चमकार म्हणजे पहिली परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्यांनी उद्यापन केले तेव्हा एका वृद्ध माणसाच्या रूपात नर्मदामातेने त्यांना दर्शन दिले आणि पांढरे वस्त्र मागून घेतले हा प्रसंग वाचून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
जाता जाता ते सद्यस्थिती, भ्रष्ट शासन, प्रेमळ प्रामाणिक आदिवासी, स्वतः मुसलमान असून परिक्रमावासीला मायेने शिधा देणाऱ्या आणि त्यांच्याच आग्रहावरून तोच शिधा रांधून जेवायला वाढणाऱ्या माताजी, संन्यासाचा आव आणणारे भोंदू साधू, चांगल्या वाईटाची चांगली पारख असणारे सत्पुरुष,श्रीमंत आश्रमांमधून श्रीमंतांना मिळणारी व्हीआयपी वागणूक, परिक्रमेत मिळालेल्या गोष्टींचा व्यापार करणारे परिक्रमावासी, अंतरीच्या खुणा जाणणारे आणि उपदेश करून मार्ग दाखवून गुप्त होणारे स्वामी, क्षुद्र माणसे, ज्ञानी माणसे, भगवी वस्त्रे धारण करूनही स्वार्थ न सुटलेली माणसे, नर्मदामैय्याची उपासना मनोभावे करणारे आणि म्हणून परिक्रमावासीयांना घासातला घास काढून देणारे आदिवासी अशी माणसांची अनेक उदाहरणे इथे सापडतात. कुंट्यांच्या शब्दात त्यांच्या कुंडलिनीच्या जागृत अवस्थेतील वर्णन वाचावेच असे आहे. अध्यात्माचा मर्ग अतिशय निसरडा आहे आणि केवळ सद्गुरूची कृपा आणि स्वतःचा जागृत सद्सद्विवेक याच आधारांवर ही वाट चालावी लागते हे पुस्तक वाचून अगदी पटते. कुंत्यांनीच एकेठिकाणी लिहिलंय की हिमालयापेक्षाही नर्मदा-अमरकंटक प्राचीन आहेत. आणि अतिप्राचीन काळापासून नर्मदा परिक्रमेची ही पद्धत चालत आलेली आहे. त्यामुळे अनादिकालापासून चालत आलेले ही परंपरा आणि नर्मदेची खरी मुले असे तिथले आदिवासी यांचं अद्भुत असं साम्राज्य आपल्या मनात उभं राहतं. आजच्या काळात इतके जाज्ज्वल्य चमत्कार आणि तेही एकाच माणसाला अनुभवायला मिळणं हे दुर्मिळ आहे. आणि कुंट्यांनी अगदी सहज सोप्या भाषेत हे सगळं लिहिलं आहे. ते वाचून माअला जी शांती मिळते ती अवर्णनीय आहे. कुंटे सध्या चौथ्या परिक्रमेत मग्न आहेत. मलाही एक दिवस परिक्रमेला जायला निश्चित आवडेल. कोणी आहे का उत्सुक माझ्याबरोबर यायला......
--अदिती

4 Comments:

Blogger Vishal K said...

अदिती,

ही नोंद वाचून नर्मदा आणि त्या पुस्तकाविषयी अधिकच कुतूहल निर्माण झालं आहे. वाचायला नक्कीच आवडेल.

मनोगतावर या अनुदिनीवरच्या पुस्तकांची यादी वाचली होती. तसं पुस्तकांचं मला तितकसं वेड नाही. पण जपानला आल्यापासून मराठी पुस्तकांविषयी विलक्षण ओढ निर्माण झाली आहे. भारतात आल्यावर ही सगळी पुस्तकं विकत घ्यावी म्हणतो. इतर नविन पुस्तकांविषयीही वाचायला आवडेल.

धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

1:50 PM  
Blogger अदिती said...

विशाल...
तू मनोगतावर आहेस का? तूच विकु का? अरेच्या! its a small world...
हाजिमेमाश्ते! वाताशिवा अदिती देसु...
--अदिती

12:08 AM  
Blogger अदिती said...

btw तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

12:09 AM  
Blogger Manjiri said...

अदिती,

तुझ्या कौतुकाबद्द्ल धन्यवाद.

तुझ्या ब्लॉगवर उल्लेख बघुन, धुळपाटी मिळवुन वाचले. त्यातले बाळपणीचे लेख मला अधिक आवडले. आता नर्मदे.. मिळते का बघते.
कृष्णमेघ कुंटेचे पुस्तक वाचले आहे. ते पण मस्त आहे नाही.
परिक्रमा म्ह्ट्ल्यावर कुणा एकाची भ्रमणगाथाची आठवण येणे साह्जिक आहे. पण ते वाचुन काळ झाला.

मस्त नोंदी ... अजुन येऊ द्यात.

5:51 PM  

Post a Comment

<< Home