आनंदी आनंद गडे!
वाचनालयाच्या कोपऱ्यात दुर्लक्षिलेली अनेक पुस्तके असतात. अनेकदा या घुळीतही माणकं सापडतात. एकदा मी असं ठरवलं होतं की काही काळ अनुवादित पुस्तकंच वाचायची. आमच्या ग्रंथालयातल्या काकांचं माझ्यावर सुपर लक्ष असायचं. मी चुकून मिल्स ऍन्ड बून्स तर वाचत नाहीये ना याकडे ते लक्ष ठेवून असायचे. "आपल्या डोळ्यांसमोर लहानाच्या मोठ्या झालेल्या या मुलीला चांगली संस्कारक्षम आणि कसदार साहित्याने परिपूर्ण पुस्तकं वाचायला मिळावीत " असा थोर हेतू त्यामागे होता हे मला माहीत असल्यामुळे मलाही त्यात वावगं असं काहीच वाटलं नाही (याचा अर्थ मी मिल्स ऍन्ड बून्स वाचलीच नाहीत असा मात्र नाही.. पण ती वेगळी कथा आहे... पुन्हा केंव्हातरी :) )
तर ग्रंथालयातल्या काकांनी माझ्यासाठी खास आतलं सगळं कपाट मोकळं केलं होतं. पण मला मनासारखं पुस्तक काही मिळत नव्हतं. तेंव्हाच एका जीर्ण शीर्ण पानांचे तुकडे पडू लागलेल्या पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. पुस्तकाचं नाव होतं "आनंदी आनंद गडे" भाषांतर केलं होतं भा. रा. भागवतांनी. खरं म्हणजे त्यात सांगण्यासारखी काही कथाच नाही. आता उद्या कोणी तुम्हाला सांगितलं की साथिया सिनेमाची 'स्टोरी' सांगा तर तुम्ही म्हणालच ना की त्यात काय सांगायचंय कप्पाळ! भातुकलीची गोष्ट दुसरं काय... या पुस्तकाचं पण तसंच आहे. पण मधूनच इतकं सरळ साधं वाचलं की कसं हलकं हलकं वाटतं... तर ही गोष्ट आहे एका मुलीची. दीडेकशे वर्षांपूर्वीची असावी. एक सतरा - अठरा वर्षांची अमेरिकन मुलगी. लॉर्ना तिचं नाव. घरचं वातावरण जाम मर्मठ. वडील धर्मोपदेशक. अमेरिकेच्या डोंगराळ भागात निसर्गाशी दोन हात करत करत नीतीबंधनं पाळून सदाचाराने आयुष्य जगणारं ते एक कुटुंब. चार मैल अंतर चालून शाळेत जाणारी लॉर्ना. तिला असलेली ज्ञानलालसा तिला थंडीवाऱ्याची पण पर्वा करू देत नसे. घरची सगळी कामं सांभाळून ती शिकत होती. अशा वेळीच घरची आर्थिक चणचण दूर करण्याची एक संधी तिच्यासमोर चालून आली. दोन तास अंतरावरच्या एका गावातल्या शाळेत तिला शिक्षिकेची नोकरी . मिळाली. याचा अर्थ आता शाळेत जाऊन शिकण्यावर पाणी सोडणे हा होता.. लॉर्ना याला तयार झाली. त्यांच्या घराजवळ राहणारा अल्बर्ट गाडीवाला तिला आपल्या घोडागाडीतून दर सोमवारी तिच्या नोकरीच्या गावी सोडायचा आणि शनिवारी संध्याकाळी परत घेऊन यायचा.
शाळेत शिकवतानाही तिने आपला अभ्यास सुरू ठेवला होता. तिच्या विद्यार्थ्यांमधे एक तिच्यापेक्षाही मोठा मुलगा होता. त्याचे आणि तिचे सुरुवातीला खटके उडायचे. पण लौकरच लॉर्नाचा सरळ साधा स्वभाव, तिची अंगभूत हुशारी आणि तिचा कष्टाळूपणा सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ लागला. ती कशी सतत अभ्यास करते,क्षणभरही वेळ वाया न घालवता सगळा वेळ सत्कारणी लावते, तिला इतिहास - भूगोलातल्या कितीतरी अद्भुत गोष्टी कशा मुखोद्गत आहेत, लॅटिन भाषेचं तिचं व्याकरण कसं पक्कं आहे, गणिते ती कशी पट्कन सोडवते, तिची भाषा कशी स्वच्छ - शुद्ध असते याची चर्चा तिच्या पाठीमागे होऊ लागली. "ही कोण आपल्याला शिकवणार" ही हेटाळणी "बाईंसारखं लिहून / बोलून दाखव आणि मग शेखी मिरव" अशी बदलली. असं करता करता काही महिने लोटले. दर वेळी घरी आली की शाळेतल्या मैत्रिणींकडे जाऊन ती आपला झालेला अभ्यास आणि त्यांचा झालेला अभ्यास यांची तुलना करायची. आपण आपल्या वर्गमित्रांच्या कितीतरी पटीने पुढे आहोत हे पाहिलं की तिच्या अंगावर रोमांच उभे रहायचे. आणि मग एक दिवस ती ज्या शाळेत शिकवायची त्या शाळेला एक नवी शिक्षिका मिळाली. आता लॉर्ना पुढचे शिक्षण घ्यायला मोकळी होती. आणि तिच्या हाताखाली काही महिन्यांमधे तिच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली होती. प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता तोंड देऊन संकटांचे डोंगर तिने हसत हसत पार केले होते. आणि या सगळ्याचं अगदी गोड असं बक्षीस तिला मिळालं. अल्बर्टने तिला मागणी घातली. घोडागाडीच्या चिमुकल्या प्रवासात दोघांच्याही मनात फुटलेले अस्फुट धुमारे नकळत प्रेमात परिवर्तित झाले होते. नाताळच्या आनंदात तिने अल्बर्टला होकार दिल्याच्या आनंदाची भर पडली. थाटामाटात लग्न लावायचे असे मोठ्या खर्चाचे अल्बर्टच्या आईचे बेत धाब्यावर बसवून एका शनिवारी संध्याकाळी दोघांनी लग्न केले. धर्मोपदेशक असलेल्या लॉर्नाच्या बाबांनी स्वतः त्यांचे लग्न लावले. तिचा वधूवेष तिच्या आईने स्वतः शिवला होता. तिचं आणिअल्बर्टचं घर खूप मोठं आणि लाकडी होतं. ते अल्बर्टने स्वतः बांधलं होतं आणि त्यातलं सामानसुमान लावून स्वयंपाकघर जय्यत तयार करायला तिने स्वतः त्याला मदत केली होती. आणि तिचे दिवस पालटले. तिच्या डोळ्यांसमोर नवीन संसाराची, उच्च शिक्षणाची सुखस्वप्ने होती. पण आता ती स्वप्ने हाताच्या अंतरावर होती. अळवाच्या पानावरच्या मोत्यांसारखी विरून जाणारी नव्हती. इतके दिवस जे कष्ट काढले त्यांच्या अश्रूतून जणू काही फुलांचा सडा सांडला होता. साऱ्या दुःखांचं वाळवंट पार करून लॉर्नाने नव्या सुखाच्या सुंदर प्रदेशात हसतमुखाने प्रवेश केला होता. सगळीकडे आनंदी आनंद झाला होता.
बस्स एवढीश्शी गोष्ट. त्यात कुठे भव्य राजमहाल नाहीत. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून दाखवलेली यश चोप्राच्या चित्रपटातल्यासारखी स्वप्नं नाहीत.निसर्ग आणि खडतर आर्थिक परिस्थिती सोडली तर कोणी खलनायकपण नाही. आजकाल चोहीकडे मांडलेला स्वप्नांचा मायाबाजार पाहून ही कथा अगदी सरळ साधी सोवळी वाटते. पण रोजरोज पंचतारांकित जेवण जेवल्यावर काही दिवसातच कंटाळा येतो. आणि मग साधी ताजी भाकरी किंवा गुरगुट्या भात हवाहवासा वाटायला लागतो. तसंच आहे हे पुस्तक. फार मोठ्या बाता न करणारं पण जीवनातल्या अमूल्य अशा मूल्यांचं महत्त्व पटवून देणारं...
याचं मूळ इंग्रजी पुस्तक कुठलं होतं हे काही मला आठवत नाहीये. कोणाला माहीत असलं तर सांगू शकाल का?
--अदिती(वरील गोषवारा माझ्या आठवणींवर विसंबून लिहिलेला आहे. हे पुस्तक वाचून मला जवळपास १० वर्षं झाली. त्यामुळे तपशिलात घोर चुका असल्या तरी उदार मनाने क्षमा करावी ही विनंती...)