पुस्तकायन

Wednesday, June 11, 2008

रिबेका - अज्ञात भूतकाळाची भासमान सावली

जागतिक वाङ्मयामध्ये आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेने आपला असा वेगळा ठसा उमटवणारी काही पुस्तके आहेत. उदा. गॉन विथ द विंड, द अल्केमिस्ट आणि रिबेका. केवळ ही पुस्तके लोकप्रिय आहेत म्हणून ती वैशिष्ठ्यपूर्ण आहेत असे मात्र मला वाटत नाही. यातलं रिबेका मी अलिकडेच वाचलं. रिबेकाबद्दल थोडंसं लिहायचा मोह आवरणं अशक्य आहे. साधारण एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला हे पुस्तक प्रकाशित झालं. तेंव्हापासून आजतागायत त्याची रसिकांवरील मोहिनी कायम टिकून आहे. आल्फ्रेड हिचकॉकसारख्या समर्थ दिग्दर्शकाने या कादंबरीला चित्रबद्ध केले यावरून तिचं महत्त्व लक्षात यावं. मी लहान असताना, प्रसिद्ध पुस्तकांच्या लहान मुलांना वाचण्यायोग्य अशा सोप्या आवृत्त्यांमध्ये मी रिबेका पहिल्यांदा वाचलं. तेंव्हा त्यातला बराचसा धक्कादायक भाग वगळला होता. त्यामुळे त्या पुस्तकाचा म्हणावा तितका प्रभाव पडला नाही. नंतर महाविद्यालयामध्ये असताना मुद्दाम ग्रंथालयातून आणून त्याचा अनुवाद वाचला होता. तेंव्हा मी बऱ्यापैकी प्रभावित झाले होते. पण इंग्रजी भाषा येणाऱ्या माणसाने इंग्रजी पुस्तके अनुवादित स्वरूपात वाचणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखेच आहे (अपवाद पाडस) असे माझे मत आहे. त्यामुळे रिबेका मूळ इंग्रजी भाषेतून वाचण्याची इच्छा होती. कंपनीच्या बुक-क्लबातून ती पूर्ण झाली. पहिली काही पाने पुस्तकाने पकड घेण्यात खर्ची पडली. आणि त्यानंतर मात्र मी पुस्तकात जी शिरले ती पुस्तक संपेपर्यंत बाहेरच येऊ शकले नाही.

तसं पाहिलं तर ही रहस्यकथा नाही. पण एक रहस्य हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली - वाढलेली आणि पोरकी झालेली विशीची एक मुलगी पैसे मिळवण्यासाठी एका श्रीमंत विधवेची सोबतीण म्हणून काम करत असते. परिस्थितीच्या रेट्यामुळे आणि सततच्या गरिबीमुळे कायमच अंग चोरून राहणाऱ्या या मुलीला कुठल्याही गोष्टीबाबत अजिबात आत्मविश्वास वाटत नाही. रूपाने सामान्य आणि इतर कुठलेच वैशिष्ठ्यपूर्ण किंवा लक्षवेधक गुण नसल्यामुळे तिची सोबतिणीची नोकरीच तिच्यासाठी योग्य आहे असं खुद्द तिच्या मालकिणीचंही मत आहे. मुळातच दुर्बळ आणि कमकुवत असलेल्या या व्यक्तिरेखेचा कमकुवतपणा अधोरेखित करण्यासाठीच जणू काही, पूर्ण पुस्तकभर तिला नावच दिलेलं नाही. पुस्तक तिच्याच प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनात असल्यामुळे आपल्याला तिचं नाव कधीच कळत नाही. इतर सर्व व्यक्तिरेखांच्या पार्श्वभूमीवर ही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे विरोधाभास दाखवते. शिवाय तिची घालमेल, नखं खाणं, आपलं मत कधीच ठामपणे मांडू न शकणं, सारखं आपल्या हातून काही चुकलं तर? या शंकेनं भेदरून जाणं यातून तिची अवस्था अतिशय सुंदर रितीने प्रकट होते.

आपल्या मालकिणीबरोबर फ्रान्सच्या माँटे कार्लो नावाच्या एका बेटावर सुट्टीसाठी म्हणून आलेल्या या मुलीची गाठ एका श्रीमंत आणि प्रसिद्ध इंग्लिश उमरावाशी पडते ती या मालकिणीच्या आगाऊ - भोचक स्वभावामुळेच. तिच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या या उमरावाचं म्हणजेच काउंट मॅक्झिमिलियन डि विंटर चं घर मँडरलीला आहे. हे घर अतिशय देखणं आहे आणि मॅक्झिमच्या पहिल्या पत्नीने आपल्या रसिकतेने आणि सौंदर्यदृष्टीने ते अधिकच लोभसवाणं बनवलं आहे. हीच रिबेका. आपल्या संभाषणचातुर्यामुळे, अलौकिक सौंदर्यामुळे आणि आदरातिथ्यातील नैपुण्यामुळे तिने मँडरलीच्या पार्टीज म्हणजे लोकांनी आतुरतेने वाट पाहण्याच्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत. या रिबेकाचं वर्षभरापूर्वी अपघाती निधन झालं आहे. तिच्या निधनाबद्दल सगळं इंग्लंड शोक व्यक्त करतं आहे. मँडरलीचा काउंट आणि रिबेकाचा नवरा मॅक्झिम आपल्याच हॉटेलात उतरला आहे हे कळल्यावर तिची मालकीण त्याला आपल्याबरोबर जेवायचं आमंत्रण देते. बादरायण संबंध जोडून, प्रसिद्ध व्यक्तींच्या गळ्यात पडून त्यांच्याशी आपली सलगी असल्याचं दाखवण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या या बाईला सगळेच लोक टाळतात. बिचारा मॅक्झिम तिच्या तावडीत सापडतो. तिची आणि मॅक्झिमची जेवणाच्या टेबलावर गाठ पडते. मॅक्झिम तिला माझ्याबरोबर फिरायला येशील का असं विचारतो. मॅखिमचा हुद्दा, त्याची प्रसिद्धी, त्याची श्रीमंती हे काहीही माहीत नसताना ती मॅक्झिमच्या प्रेमात पडते. मॅक्झिम कायमच तिच्याशी अतिशय मृदूपणे वागतो. मधूनच येणारं त्याचं अबोलपण म्हणजे त्याला त्याच्या लाडक्या पत्नीची येणारी आठवण आहे असं समजणारी ती आपल्या भावना त्याच्याकडे बोलायचं धाडस करू शकत नाही. इथपासूनच रिबेकाची अदृश्य सावली आपल्याला जाणवायला लागते. अचानक मॅक्झिम तिला लग्नाबद्दल विचारतो. जगाला आश्चर्याने बुचकळ्यात पाडायला लावून आणि मालकिणीच्या धोक्याच्या सूचनांना धाब्यावर बसवून ते दोघं साधेपणाने लग्न करतात. काही दिवस इटलीमध्ये घालवून अखेरीस ते मँडरलीला येऊन पोचतात.

लहानपणी एका भेटकार्डावर पाहिलेलं स्वप्नासारखं सुंदर घर म्हणजेच मँडरली हे कळल्यावर कुठेतरी खूश झालेली ती मँडरलीची मालकीण म्हणून तिथे पाऊल ठेवताना थबकते. घाबरते. बावचळते. कळत नकळत प्रत्येक माणूस आपली तुलना रिबेकाशी करतो आहे आणि करणार आहे हे लौकरच तिच्या लक्षात येतं. अगदी हाऊसकीपर मिसेस डेन्व्हर्स पासून ते घरातला कुत्रा जॅस्परपर्यंत सगळेच लोक ही तुलना करत आहेत हे तिला जाणवतं. कुठलीही गोष्ट करताना "मॅडम ही गोष्ट अशीच करायच्या" हे वाक्य ऐकावं लागणं तिच्यासाठी अपरिहार्य होऊन बसतं. फुलं कुठल्या फुलदाणीत ठेवावीत इथपासून ते जेवणातील पदार्थ काय असावेत इथपर्यंत सगळ्या गोष्टी 'मॅडम' जशा करत असत अगदी तशाच केल्या जातात. तिला त्यात काहीही बदल करण्याचं धाडसच होत नाही. मॅक्झिमची नवी बायको म्हणून तिला भेटायला येणारे लोकही आपल्याकडे पाहून "मॅक्सने हिच्यात असं काय पाहिलं? ही तर अगदी सामान्य आहे. रिबेकासारखी मुळीच नाही... " असाच विचार करत आहेत हे तिला स्पष्टपणे दिसतं. ती घरात बिचकत बिचकतच वावरते. मालकीण असल्याची जबाबदारी तिला घेताच येत नाही. आपलं काहीतरी चुकेल, काहीतरी मोडतोड होईल आणि आपल्याला कोणीतरी रागावेल ही भीती तिला कायम वाटत राहते. मॅक्झिमची मोठी बहीण बिऍट्रिस, तिचा नवरा गाईल्स तिला भेटायला येतात. बिऍट्रिसला कुठे काय बोलावं याचा मुळीच पोच नाही. ती बोलताबोलता अनेक गोष्टी अर्ध्याच सोडून देते किंवा तिला कळू शकत नाही असं काहीतरी सूचक बोलते. रिबेकाची सावली गडद होऊ लागते. घरभर रिबेकाच्या खुणा आहेत. मिसेस डेन्व्हर्सने तिची खोली अशा प्रकारे ठेवली आहे जणू काही कुठल्याही क्षणी, ज्या बोटीतून जाताना वादळात सापडून रिबेका बुडाली, तीच आपली बोट नांगरून रिबेका घरात येईल आणि आपलं नेहमीचं कामकाज काही झालंच नाही अशा थाटात सांभाळायला लागेल. मॅक्झिम आणि ती घराच्या कमी सजवलेल्या आणि एके काळी पाहुण्यांच्या राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भागात राहतात. रिबेका जिथे राहायची तो भाग अधिक सुंदर, प्रशस्त आहे. मॅक्झिमला आता त्या भागात राहावंसं वाटत नाही कारण तिकडे गेल्यावर रिबेकाच्या आठवणींनी त्याला त्रास होत असेल असं तिला वाटतं. घरापुढे एक सुंदर राई आहे आणि तिच्यापलिकडे समुद्रकिनारा. या समुद्रकिनाऱ्यावर एक खाजगी धक्का आहे. तिथे रिबेकाचं एक लहानसं खोपटं आहे. तिची बोट नांगरायची जागा आहे. मॅंडरलीला आलेल्या पाहुण्यांबरोबर अनेक वेळ तिने इथे चांदण्या रात्रीच्या सहली आयोजित केलेल्या होत्या. त्या भागातल्या वार्षिक बोटींच्या शर्यतींमध्ये रिबेका भाग घेत असे. हे सगळं हळूहळू तिला समजतं नकळत तिच्या मनात रिबेकाची आकृती तयार होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूवर, अगदी मॅक्सवरही तीच आकृती हक्क सांगते आहे आणि आपली किंमत नगण्य आहे असं तिला वाटायला लागतं. अगदी मॅक्सला सुद्धा रिकाम्या वेळात अचानक जॅस्परची आठवण व्हावी तशीच तिची आठवण होते. थोडक्यात फावल्या वेळात मन रमवण्यासाठी मॅक्सने सांभाळलेल्या जॅस्परची आणि आपली जागा सारखीच आहे असं तिला वाटत राहतं. सर्व कामं सहजतेने, आपल्या डौलदार स्टाइलमध्ये करणाऱ्या रिबेकाच्या सर्व जनमानसात असलेल्या छबीशी आणि त्यामुळे ओघानेच येणाऱ्या दुय्यमपणाशी या प्रकारचा कुठलाच अनुभव किंवा आत्मविश्वास नसलेली ती लढा देण्याचा प्रयत्न करते खरी पण बऱ्याच वेळा एखाद्या भेदरलेल्या पाखरासारखी तिची अवस्था होऊन जाते. तिच्या सभोवताली असणारी रिबेकाची सावली आता आणखी गडद असं त्रिमित रूप घ्यायला लागते.

नव्या मालकिणीच्या सन्मानार्थ मँडरलीला दर वर्षी भरवल्या जाणाऱ्या फॅन्सी ड्रेस बॉलचं आयोजन परत सुरू केलं जावं याबद्दल तिथले लोक मॅक्सला गळ घालतात. या बॉलपासून अशा काही घटना घडत जातात की वाचकाला विचार करायलादेखील सवड मिळत नाही. भूतकाळाची भुतं वर्तमानाला राहू-केतूप्रमाणे ग्रासू पाहतात. त्याच्या कराल दाढांमध्ये तिने जे जे काही आपलं म्हणून उराशी जपून ठेवलं आहे ते सारं नष्ट होणार असं दिसायला लागतं. यापुढचा प्रकार, उकललेलं रहस्य आणि शेवट हा प्रत्यक्षच वाचावा असा आहे. तो इथे देऊन वाचकांचा रसभंग करण्यात काहीच अर्थ नाही.

पूर्ण पुस्तकभर मरूनही जिवंत असलेली रिबेका आणि जिवंत असूनही अनाम आणि मृतप्राय वाटणारी ती हा विरोधाभास अत्यंत उत्तम रितीने चित्रित केलेला आहे. तिच्यासारख्याच वाचकांनाही भूतकाळातल्या घटना अज्ञात आहेत त्यामुळे हाती आलं असं वाटत असतानाच क्षणार्धात हातातून निसटून जाणारं भूतकाळाचं भूत अस्वस्थ करत राहतं. मिसेस डेन्व्हर्सचं गूढ वागणं, मॅक्सचे वेगवेगळे मूडस, रिबेकाचं नाव घेतल्यावर फ्रान्सिसचा बदलणारा चेहरा, फॅवेलचं येणं, रिबेकाच्या खोपटात तिला वाटलेली अनाम भीती यातून त्या भूतकाळाबद्दल काहीतरी सूचना मिळत तर राहतात पण त्यांचा अर्थ मात्र लागत नाही. एक प्रकारच्या गूढ आणि रहस्यमय वातावरणात तिच्याबरोबर आपणही अडकून पडतो. अर्थही लागत नाही आणि सुटकाही होत नाही अशा प्रकारची परिस्थिती दाखवून वाचणाऱ्याच्या मनात योग्य आंदोलनं निर्माण करण्यात लेखिका अत्यंत यशस्वी झालेली आहे. काळाच्या ओघात वाहून गेलेली जुनी इंग्लिश समाजरचना आणि श्रीमंतांची बेफिकीर-बेदरकार वृत्तीही उत्तम प्रकारे दाखवली आहे. मिसेस डेन्व्हर्सची व्यक्तिरेखा तर फार सुंदर रितीने उतरली आहे. मॅक्सच्या आजीने रिबेकाला भेटण्यासाठी केलेला हट्ट आणि तिला ओळखायला दिलेला नकार आणि घरातल्या म्हाताऱ्या कुत्रीने सतत रिबेकाच्या पावलांची चाहूल घेणं यातून तिच्या मनावर झालेला परिणाम सुरेख अधोरेखित होतो. रिबेकाची सावली अस्वस्थ करते. भयचकित करते. आणि सत्याचा चेहरा समोर आल्यावर तर विषण्ण करून सोडते.

Daphne du Maurier या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेलं हे पुस्तक हा हा म्हणता विक्रमी खपाच्या यादीत जाऊन बसलं. (या नावाचा उच्चार कसा करायचा हे मात्र मला खरंच माहीत नाही. कृपया तज्ज्ञांनी खुलासा करावा. ) आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटाला पाच ऑस्कर पुरस्कारही मिळाले. या पुस्तकावर अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट निर्माण झालेले आहेत. अनेक समकालीन पुस्तकांमध्ये याचा उल्लेख सापडतो. आपल्याकडेही या पुस्तकावर आधारित 'कोहरा' नावाचा एक अप्रतिम कृष्णधवल चित्रपट काढला गेला. अर्थात त्यात कथा थोडीशी बदलली आहे. एकूणच वाचणाऱ्यावर हे पुस्तक चांगला प्रभाव पाडते. या लेखिकेवर अशाच विषयावर आणि घटनांवर आधारित अशा एका ब्राझिलियन लेखिकेच्या पुस्तकावरून रिबेका बेतलेले आहे असा आरोपही झालेला आहे. अनेक प्रकारांनी सतत चर्चेत राहिलेले हे पुस्तक एकदा तरी वाचावेच असे आहे असे मला वाटते. हे वाचून कुणी ते वाचले आणि त्यांना ते आवडले तर तेच माझ्या या लेखनाचे फलित आहे असे मी मानते.

--अदिती
(१०. ६. २००८
ज्येष्ठ शुद्ध ७ शके १९३०)

2 Comments:

Blogger Yogesh said...

Hi,
Tumacha lekh vaachun pustak nahi vaachale pan Alfred Hitchcock cha 1940 release Rebecca maatra nakki pahila... Chhan..!!
Keep writting such good stuff..!!
Shubheccha..!
-Yogesh

2:55 AM  
Blogger Ruminations and Musings said...

yaat ekdahaee kadambari jichya tondun yete tiche naav kaLat nahee.. evadhee pradeergha kadambari asun he sambhaLane phar awaghaD aahe.. Tumhee lihile aahe surekh.. manapasun.

5:41 PM  

Post a Comment

<< Home