पुस्तकायन

Tuesday, October 23, 2007

द सीक्रेट ऍडव्हर्झरी

ऍगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथा वाचताना आपण एका जागी खिळून असतो. एखाद्या नागराजाने आपल्या भक्ष्याला मोहिनी घातल्यावर ते भक्ष्य जसं भयचकित होऊन हालचाल करायचं देखिल विसरून जातं ना अगदी तशीच आपली अवस्था होते. पॉयरॉ श्रेष्ठ की होम्स हा सध्या जिकडेतिकडे अगदी हमखास रंगणारा वाद झाला आहे. त्यात मला पडायचं नाही कारण मी पॉयरॉच वाचलेला नाही. पण होम्सची मोहिनी , गारुड, जादू, भुरळ काय वाट्टेल ते म्हणा, मला इतकं जखडून घालते की बास. असो हा लेख काही शेरलॉक होम्सचं गुणवर्णन करावं म्हणून लिहिलेला नाही.

नुकतंच ख्रिस्तीबाईंचं द सीक्रेट ऍडव्हर्झरी हे पुस्तक वाचनात आलं. 'देन देअर वेअर नन' नंतर सीक्रेट ऍडव्हर्झरी म्हणजे लहान मुलांचा खेळ आहे असं सुरुवातीला वाटून गेलं. पण या बाईची कथानकावरची पकड इतकी भक्कम आहे की हा पोरखेळ सुद्धा खिळवून ठेवण्यात अतिशय यशस्वी झाला. कसोटी असो की एक दिवसीय सामना सचिन तेंडुलकर जसा सूर्यासारखाच तळपतो तशीच ही रणजी मॅचसुद्धा एक वाचक म्हणून मला दिपवायाला पुरेशी वाटली. या बाई एका टोपणनावाने प्रेमकथा लिहीत असत असं कुठेतरी वाचलं होतं. यात प्रेमकथेचा भाग अगदी नगण्य आणि काहीसा अपेक्षितच असला तरीही मला तो आवडला.

साधारण पहिलं महायुद्ध संपत असताना, लुसिटानिया बोट बुडाली तेंव्हा सुरू होणारी ही कथा अनेक वळणं, काही सुखद काही दुःखद झटके देत देत इष्टस्थळाला पोहोचते तेंव्हा घालवलेला वेळ सार्थकी लागल्याचं समाधान नक्कीच मिळतं. विशीच्या आसपासच्या लोकांमधे जीवनाची आव्हानं स्वीकारण्याचा जो नैसर्गिक जोम असतो आणि आपण जे करू त्यात यशस्वी होऊच असा जो भाबडा आशावाद असतो त्याने भरलेले दोन तरुण लोक यात आहेत. 'यंग ऍडव्हेन्चरर्स' या नावाने ते चक्क एक कंपनी काढतात. टुपेन्स आणि टॉमी ही ती जोडी. टुपेन्स स्त्रीसुलभ आत्मविश्वासाने आणि मुली मुलांपेक्षा हुशार असतात या विश्वासाने (किंवा आपण टॉमीपेक्षा निश्चित जास्त हुशार आहोत या खात्रीने) यंग ऍडव्हेन्चरर्सचं सुकाणू आपल्या हातात घेते खरी पण ते काही तितकंसं सोपं काम नाही हे लवकरच तिला कळून चुकतं. टॉमीने तर काय पुस्तकाच्या खऱ्या हीरोचं काम अगदी उत्कृष्ठपणे वठवलंय. अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्याने दाखवलेलं चातुर्य आणि अडचणीच्या वेळी आश्चर्यकारकपणे शांतपणे विचार करणारा त्याचा मेंदू अफलातूनच. या दोन व्यक्तिरेखा विलक्षण लोभस उतरल्या आहेत. आणि निःसंशय सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. बाकी पात्रांची नावं आणि वर्णनं देऊन भावी वाचकांचा रसभंग न करणंच उत्तम. एकेक पात्र अवतरतं आणि कोरम जमत जातो तसतशी मजा वाढत जाते. पण एकेक पात्र म्हणजे एकेक नमुना आहे हे मात्र जाताजाता सांगते.

या कथेचं मला जाणवलेलं वैशिष्ठ्य म्हणजे यात पात्र मुळातच थोडी आहेत. आणि ती सतत आपल्या नजरेसमोर बांधून पण घातलेली नाहीत. तरीही ऍगाथा ख्रिस्तीचे चाहते या नात्याने आपण त्यातल्या प्रत्येकावर संशय घेत राहतो. (मी तर फक्त टुपेन्स वर संशय घेऊ शकले नाही. बाकी सगळ्यांवर ती सुई कधी ना कधी रोखली होतीच!) सगळी परिस्थिती आपल्यासमोर अगदी उघड करून सांगतानाही आपला पुरेसा गोंधळ उडवून द्यायचं या बाईंचं कसब खरंच थोर आहे. सगळ्या व्यक्तिरेखा अगदी ठळक, सुस्पष्ट. सगळी वर्णनं अचूक. नेमकी. कथेचा वेग आणि ओघ खुर्चीत शांत बसणं अशक्य करणारे. वाचकाला विचार करायला सवडच न देता नुसते धक्क्यांवर धक्के देण्याचं हे तंत्र अगदी अचूकपणे, हुकुमीपणे वापरलंय इथे. सगळा मामला अगदी चोख आहे. एखाद्या कंजूष बनिया मारवाड्याप्रमाणे, एक भरीचा शब्द नाही, उल्लेख नाही की वळण नाही. तसा कथेचा जीव लहान मुलांच्या सहसकथांच्या इतकाच ठरावा पण मी वर म्हटल्याप्रमाणेच 'रणजी' तच काय पण गल्ली क्रिकेटमधेही सचिन तेंडुलकर सचिन म्हणूनच खेळतो ना(किंवा खेळायचा.... गेले ते दिवस असं काही लोक ठासून सांगत असतात त्यांच्या पत्रांची मारामारी नको!) त्यामुळे ही इटुकली कथा संपेपर्यंत पुस्तक हातातून अगदी सोडवत नाही. जाता जाता डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स वाचून त्यातलं सगळं खरं असतं असं मानणाऱ्यांनाही काही कोपरखळ्या मारलेल्या आहेत. त्या वाचताना जाम हसू येतं. आणि वर्णनशैली तर कथेचा प्राण आहे. पात्रांशी आपण अगदी चटकन एकरूप होतो. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. प्रसंगानुरूप अरेरे.., काय हे, केवढा हा मूर्खपणा, अरे देवा वाचव रे याला/हिला, किंवा असलेच कायकाय उद्गार आपल्या तोंडून कधी निघून जातात कळतच नाही. रहस्यदेखील इटुकलं असलं तरी अनपेक्षित असल्याने चांगला धक्का देऊन जातं ही अजून एक जमेची बाजू.

मधेमधे युरोप - अमेरिकन संस्कृतींचं एकमेकींना खेटून जाणं, आमचं वळण सरळ तुमचंच वाकडं वगरे भागही पदार्थातल्या मिठाइतका आहे आणि मिठासारखा चविष्टही झाला आहे. कंटाळा येण्याच्या आत पुस्तक संपतं पण दीर्घकाळ मनात रेंगाळून राहतं हे त्याचं खरं यश असावं बहुधा.
एका बैठकीत सगळं पुस्तक अक्षरशः अधाश्यासारखं वाचून काढल्यामुळे माझ्यावर त्याचा कदाचित जास्त परिणाम झाला असेल. मध्यंतर नसलेल्या सिनेमाचा होतो तसा. पण ते वाचल्यावर परीक्षण लिहिल्याशिवाय अगदी राहवलंच नाही. नाही म्हणायला सुरुवाती सुरुवातीला बन्याची नाही पण मालीची आठवण अनेक वेळा झाली. नंतर मात्र ट्टॉक्क वगरे टिकटिकायचंही विसरायला झालं होतं.

अर्थात रहस्यकथा वाचून निर्ढावलेल्या किंवा होम्ससारख्या बौद्धिक चमत्कृतींची अपेक्षा ठेवून वाचणाऱ्या व्हेटरान लोकांचा कदाचित अपेक्षाभंग होईल. तसं झाल्यास मला क्षमा करावी ही विनंती. पण आमच्या ऑफिसच्या बुक- क्लबमधे वाचनीय पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचं नाव असल्यामुळे असा अपेक्षाभंग होणारे फार लोक नसतील असं वाटतं आहे.

हा एवढा निबंध वाचून (सुद्धा!) कोणी हे पुस्तक वाचलं आणि त्याला/ तिला ते आवडलं तर आनंद वाटून घेतल्याने द्विगुणित झाल्याचा आनंद नक्की होईल म्हणून हा सगळा खटाटोप.
--अदिती (२३ ऑक्टोबर २०७)