पुस्तकायन

Tuesday, December 05, 2006

मला आवडलेले अनुवाद

नमस्कार मंडळी,
यस्तु संचरते देशान् सेवते य च पंडितान्।
तस्य विस्तारिता बुद्धिः तैलबिन्दुरिवम्भसि॥
असे एक सुभाषित आहे. याच सोपा अर्थ सांगायचा झाला तर तो असा होईल
--- केल्याने देशाटन,पंडितमैत्री सभेत संचार,शास्त्रग्रंथविवेचन मनुजा चातुर्य येतसे फार॥
सध्याच्या काळात परदेशगमन पूर्वीपेक्षा फारच सोपं झालं आहे. पण परदेशगमनाइतकंच मनोरंजक असतं ते परदेश समजून घेणं जे बरेचदा तिथे प्रत्यक्ष जाऊनही जमत नाही. पण परभाषांमधल्या उत्कृष्ठ साहित्यात ही किमया करण्याची शक्ती असते. त्या त्या प्रांतातल्या साहित्यकृतींमधून तिथल्या लोकजीवनाचं, त्यातल्या प्रेरणांचं,सुखदुःखाचं आणि एकूणच साऱ्या मानवी जीवनाचं एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. एक असं प्रतिबिंब जे खरं असतं. निर्मळ असतं. आपल्या मनातले विचार समाजातीत इतरांना सांगण्याच्या प्रक्रियेतून जन्माला आलेलं असल्यामुळे ते अतिशय प्रामाणिक, क्वचित रोकठोक सुद्धा असू शकतं. या साहित्याचा जर मुळातून आस्वाद घेता आला तर ते फारच छान असतं पण जगातल्या सर्वच भाषा सगळ्यांना येणं जे अशक्य आहे. म्हणून आपल्यासमोर पर्याय उभा राहतो तो भाषांतराचा. भाषंतरीत पुस्तकं बऱ्याचदा मूळ पुस्तकाइतकाच आनंद देतात.
माझं सर्वात आवडतं अनुवादित पुस्तक आहे पाडस. "मार्जोरी किनन रॅलिंग्ज" (Marjorie Kinnan Rawlings) नावाच्या लेखिकेने साधारण १९३२ च्या सुमारास हे पुस्तक लिहिलं आहे. मूळ पुस्तकाचं नाव आहे "the yearling". अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातल्या एका जंगलात आपल्या वयस्कर आई-वडिलांबरोबर राहणाऱ्या एका बारा वर्षांच्या मुलाच्या - ज्योडीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठीत राम पटवर्धन यांनी अतिशय सुबोध आणि नेमका अनुवाद केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच अनुवाद ही सुद्धा श्रेष्ठ कलाकृती झाली आहे असं मला वाटतं.
छोटा ज्योडी जंगलात जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो. त्याच्या आईवडिलांची त्याच्या आधीची सर्व मुले जन्माला आल्यानंतर काही काळातच देवाघरी गेलेली असतात. त्यामुळे खूपच उशीरा जन्माला आलेल्या आणि जगलेल्या - वाढणाऱ्या या मुलाकडे पाहाण्याचा आईचा - ओरी बॅक्स्टर चा दृष्टीकोन अलिप्त असतो. जणू काही आपली माया तिने आधीच्या मुलांवर उधळून टाकलेली असते. तिच्या मते दुःखामुळे कडवं-कठोर होणं हाच दुःख सहन करायचा योग्य मार्ग असतो. तिच्या दृष्टीने घरचा गाडा हाकणं आणि त्यासाठी जी लागेल ती मदत ज्योडीने करणं हे महत्वाचं असतं . ज्योडीचं पोरवय आणि जंगलाच्या सुरेख साथीमुळे लहानपणाचा आनंद उपभोगण्याची त्याला मिळणारी संधी ही तिच्या मते वेळ वाया घालवण्याचे उद्योग असतात. ज्योडीचं आता संपायला आलेलं पण अजूनही तितकंच मधुर असणारं बाल्य, त्याची निरागसता, साहसाची त्याची जात्याच असणारी आवड, आणि अतिशय समृद्ध अशा वेड लावणाऱ्या जंगलाची त्याला सतत वाटणारी ओढ ही तिला समजतच नाही किंवा ती समजूनही आतपर्यंतच्या अपत्यवियोगाच्या दुःखाने जिची संवेदनशीलता साशंक झाली आहे अशा स्त्रीप्रमाणे ती वागते.
छोट्या ज्योडीचा खरा आसरा,मित्र,मार्गदर्शक,आदर्श,गुरू आणि त्याच्या बालमनाच्या सर्वात जवळ घर करणारी व्यक्ती आहे ज्योडीचा वडील इझ्रा उर्फ पेनी बॅक्स्टर. अतिशय मानी, सदाचारी आणि अतिशय कोमल सृजनशील मनाचा पेनी आपल्याला पानापानांतून भेटतो आणि आपल्याही जवळचा होतो. पेनीचं वर्णन लेखिकेने केलं आहे 'माणूस तांब्याच्या धातूसारखा नितळ आणि अभंग आणि तितकाच सच्च्या मनाचा' . पेनीला स्वतःला निसर्गातल्या विविध चमत्कारांबद्दल एक जिवंत कुतूहल वाटतं आणि तेच कुतूहल त्याला ज्योडीच्या डोळ्यांमधे प्रतिबिंबित झालेलं दिसतं तेव्हा तो मुलाशी मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारतो. त्याला अनेक गोष्टी शिकवतो पण उपदेश करत नाही. मुलाला खऱ्या अर्थाने तो समजून घेतो. आपल्या बालपणाच्या खुणा तो मुलामधे पाहतो आणि आपल्याला न मिळालेल्या संधी प्रसंगी पदरमोड करूनही मुलाला मिळवून देण्यासाठी धडपडतो. अनेकदा आईच्या ओरडण्यापासून तो ज्योडीची सुटका करतो. वडील आणि मुलामधलं हे मित्रत्वाचं,जरासं दुर्मिळ असं जवळचं नातं आपल्या मनाला स्पर्श करून जातं. पेनीला खुळखुळ्या साप चावतो आणि जीवनमरणाच्या सीमेवर उभा असतानाही तो ज्योडीला सर्दी होण्यापूर्वीच चिंब ओले कपडे बदलून ठेवायला सांगतो तेव्हा ज्योडीच्या मनाला स्पर्श करणारी मायेची ऊब आपल्यालाही जाणवते.
पुस्तकातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या कथेचा नायक ज्योडी. बारा वर्षांचा पण अजून पोरपण पुरते न सरलेला हा मुलगा. सांगितलेल्या कामात चुकारपणाही करेल पण निसर्गाची , वांडपणाची , अवखळ रानवाऱ्याची हाक ऐकून लगेच धावेल असा हा मुलगा. एकुलता एक असल्यामुळे एकटा पडणारा, सतत त्याच्या अशा एखाद्या मित्राची वाट पाहाणारा, ते मैत्र प्राणी-पक्ष्यांमधे शोधणारा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवू पाहाणारा, त्याशिवाय जीवाला चैन न पडणारा, पौर्णिमा आमावास्येपासून पाऊस वादळ वाऱ्यापर्यंत निसर्गाच्या साऱ्या चमत्कारांची, साऱ्या गूढ गुपितांची कोडी आपल्यापरीने उलगडू पाहाणारा ज्योडी म्हणजे बाळपणाचं मूर्तीमंत गोजिरं असं रूपच जणू. त्याच्या लाडक्या घळीपाशी उभा राहून तो म्हणतो ," इथून जो ओढा निघतो तो नदीला मिळतो. नदी सेंट जॉर्ज सरोवराला मिळते आणि सरोवर समुद्रात जाऊन मिळतं... म्हणजे ही घळ हा समुद्राचा उगमच म्हणायचा." त्याच्या बालसुलभ निष्कर्षांची आपल्याला गंमत वाटते. ज्योडी धांदरटपणा करतो. त्याच्या 'पा' शी बरोबरी करताच येणार नाही हे कळूनसुद्धा ती करू पहातो. आपण इतर विचारांच्या नादात अर्धवट सोडलेलं काम 'पा' ने पूर्ण करून टाकलेलं पाहून ओशाळतो पण खूशही होतो. 'पा' शिकारीला गेलेला असताना आईच्या सोबतीला एखाद्या शूराप्रमाणे घरी थांबतो , पण तरीही आपल्याला खरंच वाटणारी भीती तिला दिसू न देण्यासाठी गणिताचं पुस्तक वाचायचं नाटक करतो. अस्वलाने कालवड मारली हे ऐकल्यावर चिडून पेटून उठतो. पोट भरण्यासाठी इतर प्राण्यांना मारावं लगतं यासाठी दुःखी होतो आणि त्यांना न मारताही आपल्याला त्यांचं रुचकर मांस मिळालं तर किती छान होईल असा भाबडा प्रश्नदेखिल विचारतो. या तिघा मुख्य पात्रांखेरीज पुस्तकात इतर पात्रं सुद्धा मधून मधून येतात आणि आपल्याला सरळसाध्या निर्व्याज अशा ग्रामजीवनाची गोडी चाखवून जातात. नैसर्गिक अशा शाहाणपणाबरोबरच येणारं असं एक नागरी शाहाणपण इथे दिसतं जे देशकालाचे बंधनं सोडून आपल्या स्वतःच्या सामाजाशी आपलं नातं सांगतं आणि वाचक थक्क होऊन जातो.
याशिवाय कलाकृतीचं मुख्य आकर्षण म्हणजे पानोपानी येणारी अतिशय चित्रमय अशी निसर्गवर्णनं. त्या त्या ऋतूतल्या या सहजसाध्या आणि अनुवादात तरी जऱ्याशा जुन्या बोलीभाषेतल्या शब्दांमधून आपल्या नजरेसमोर साकार होणारं निसर्गचित्र इतकं निर्मळ, नितळ आणि शब्दांनीच ओलंचिंब करून टाकणारं असतं की आपण मुग्ध होऊन तिकडे पाहातच राहतो. अतिशय नेमक्या अशा या वर्णनांमधून फ्लोरिडामधला तो सगळाच परिसर नजरेसमोर अगदी चट्कन उभा राहतो. कथेच्या ओघात जंगलातल्या ऋतूचक्राचं एक आवर्तन पूर्ण होतं परिस्थितीचं आकलन अतिशय दुःखमय मार्गाने झालेला अतिशय पीडित पण क्षणात मोठा झालेला ज्योडी नव्याच सुजाण मोठेपणानं आपली जबाबदारी मान्य करतो. स्वतःच्या हाताने आपल्याला प्राणाहूनही प्रिय असलेलं सगळंच तो संपवतो. भुकेची राक्षसीण सगळ्याच चराचराच्या मागे कशी सतत हात धुवून लागली आहे हे त्याला कळतं आणि त्याचं सारं पोरवय अदृश्य होतं . त्याच्या घळईतली जादू आता त्याच्या मनाला गुंगवत नाही. सगळ्या जगाकडून फसवला गेलेला तो मुलगा एक क्षणात माणूस बनतो. आपल्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी स्वीकारतो. या शेवटच्या भागात वडील-मुलाचा जो संवाद आहे त्याने आपलं काळीज पिळवटून जातं. पण अटळ अशा वास्तवाचा सामना करणाऱ्या त्या मुलाबद्दल मनाला खरंच औतुक वाटत राहतं. कसलाही देखावा न करता जीवनाचं खरं रूप जेव्हा पेनी मुलाला सांगतो तेव्हा त्यातल्या अमोघ अशा सत्याचा आघात आपल्याही मनावर झाल्यावचून राहात नाही. हातातलं पुस्तक संपतं पण मनात झिरपलेल्या आणि अनंत परींनी अचानकपणे समोर उभ्या राहणाऱ्या त्यातल्या व्यक्तिरेखा मनात कायमचं घर करून राहतात.
--अदिती