पुस्तकायन

Monday, January 02, 2012

खड्यांच्या मुगुटाची गोष्ट

आमच्या घराला एक मोठी खिडकी होती. तिची चौकट आमच्या भिंतीच्या बाहेरच्या अंगाला बसवलेली होती. त्यामुळे ही खिडकी पुढे रस्त्यावर उघडता येत असे. खिडकी उघडली की आमच्या घरापुढच्या रस्त्याचा बराचसा भाग आमच्या नजरेच्या टप्प्यात येत असे. एक दिवस सकाळी या खिडकीत उभा राहून मी रस्त्यावरची गंमत बघत होतो. "अरे होम्स! हा बघ हा वेडा रस्त्यावर कसा सैरावैरा धावतोय. त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला असे मोकळे सोडता कामा न ये... "

आपल्या आरामखुर्चीत आळसावून पहुडलेला होम्स उठला. आपले दोन्ही हात कोटाच्या खिशात ठेवून तो माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि त्यानेही रस्त्यावरचा प्रकार निरखून बघायला सुरुवात केली. सध्या फेब्रुवारी महिना सुरू होता. आजची सकाळ अगदी लख्ख आणि प्रसन्न होती. काल पडलेले बर्फ अजून रस्त्याच्या कडेला तसेच होते आणि हिवाळ्यातल्या फिकट सूर्यबिंबाच्या प्रकाशात चकाकत होते. आमच्या घरासमोर पसरलेल्या बेकर रस्त्याच्या मधल्या भागातल्या बर्फाचा रंग रहदारीमुळे मातकट झाला असला तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथांवर साठलेले बर्फाचे ढीग मात्र पांढरे शुभ्र होते. पदपथांचे करडे काठ स्वच्छ केलेले दिसत होते, पण तिथले निसरडे काही कमी झालेले नव्हते. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ दिसत नव्हती. मेट्रोपोलिटन स्टेशनाकडून आमच्या दिशेने पळत येत असलेल्या त्या विचित्र माणसाला वगळल्यास दुसरे कोणीच त्या दिशेने येताना दिसत नव्हते.

तो माणूस पन्नाशीचा असेल. तो उंच होता. त्याचे व्यक्तिमत्व रुबाबदार आणि भारदस्त होते. त्याचा चेहरा निग्रही दिसत होता. त्याच्या हालचालींमधून अधिकार प्रकट होत होता. त्याचे कपडे साधेच असले तरी उंची दिसत होते. त्याने काळ्या रंगाचा फ्रॉक कोट घातला होता. त्याची हॅट चकचकीत होती. त्याची मोतिया-करड्या रंगाची पँट त्याचा उच्च्भ्रूपणा अधोरेखित करत होती. त्याने तपकिरी बूट घातले होते. पण त्याचे सध्याचे वागणे मात्र त्याच्या त्या आबदार, सभ्य छबीला अगदीच विसंगत होते. तो जोरजोराने धावत होता आणि धावताना मध्येच अडखळत होता. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की अशा पळापळीची त्याला आजिबात सवय नव्हती. धावताना त्याचे हात जोराने वर-खाली होत होते, मान मागे-पुढे हलत होती आणि विचित्र पद्धतीने चेहरा पिळवटला जात होता.

"बापरे! काय झालेय काय या माणसाला? तो घरांचे क्रमांक का तपासून बघतोय असे? " मी म्हणालो.

"मला वाटतेय, तो आपल्याकडे येणार आहे. " आपले तळहात एकमेकांवर चोळत होम्स म्हणाला.

"इथे? आपल्याकडे? "

"तो माझ्याकडे सल्ला मागायला येतोय असे माझे मत आहे. ही सगळी लक्षणे माझ्या अगदी ओळखीची आहेत. बघ! बघ मी म्हटले नव्हते! "

होम्सचे हे बोलणे सुरू असतानाच तो माणूस आमच्या दारासमोर थांबला आणि धापा टाकत त्याने आमच्या दारावरची घंटा वाजवायला सुरुवात केली. आमच्या सगळ्या घरात त्या घंटेचा आवाज दुमदुमला तरीही तो घंटा वाजवायचा थांबला नाही.

थोड्याच वेळात तो आमच्या खोलीत शिरला. तो अजूनही धापा टाकत होता. जोरजोराने हातवारे करत होता. पण त्याच्या डोळ्यात दुःखाची आणि हताशपणाची अशी काही झाक दिसत होती की आम्हाला त्याच्याबद्दल एकदम कणव दाटून आली. सुरुवातीला काही वेळ त्याला काही बोलताच येईना. पण सगळे उपाय थकल्यासारखा तो जोरजोराने हातपाय हलवत होता आणि आपल्या डोक्यावरचे केस उपटत होता. अचानक त्याने आपले पाय जमिनीवर जोराने आपटले आणि आपली हॅट समोरच्या भिंतीवर इतक्या जोरात मारली की आम्ही दोघेही एकदम पुढे धावलो. त्याला दोन्ही बाजूंनी धरले आणि खोलीच्या मध्यभागी असलेल्या खुर्चीत बसवले. त्याच्या शेजारी बसून त्याच्या हातावर थोपटत होम्स त्याच्याशी मृदू आवाजात बोलायला लागला. या क्रियेत तो अगदी तरबेज होता.

"तुम्ही माझ्याकडे तुमची कर्मकहाणी सांगायला आला आहात. हो ना? पण या सगळ्या गडबडीमुळे तुम्ही खूप दमला आहात. थोडा वेळ थांबा. तुमच्या जिवात जरा जीव आला, की तुमची जी काही अडचण आहे तिच्यात लक्ष घालायला मी आनंदाने तयार आहे. " होम्स म्हणाला.

तो माणूस काही क्षण तसाच बसला होता. त्याची छाती अजूनही जोरजोराने हलत होती. आपला अनावर झालेला भावनावेग आवरायचा तो प्रयत्न करत होता. मग त्याने खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला. निग्रहाने ओठ आवळले आणि आमच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली.

"तुम्हाला मी नक्कीच वेडा वाटलो असणार... "

"तुमच्यावर काहीतरी मोठे संकट कोसळलेले आहे हे मला दिसतेय. " उत्तरादाखल होम्स म्हणाला.

"होय. आणि संकटही असे आणि इतके अचानक, की माझी तर मतिच कुंठित झाली आहे. मला जाहीर बदनामीला तोंड द्यावे लागेल. आजवर मी अतिशय स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून आयुष्य जगलो आहे. माणसाला त्याची व्यक्तिगत दुःखही असह्य असतात. पण व्यक्तिगत दुःख आणि जाहीर बदनामी इतक्या भयंकर प्रकारे एकत्रितपणे भोगावी लागेल असं दिसायला लागल्यापासून माझा तर अगदी थरकांप झाला आहे. एवढेच नाही, तर याची झळ आपल्या राजघराण्यालाही बसणार आहे. त्यामुळे या प्रकरणातून लौकरात लौकर मार्ग काढणे गरजेचे आहे. "

"साहेब, तुम्ही शांत व्हा. आणि तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल मला व्यवस्थित सगळे सांगा. " होम्स म्हणाला.

"माझे नाव बहुतेक तुमच्या कानावरून गेले असेल. माझे नाव अलेक्झांडर होल्डर. थ्रेडनीडल रस्त्यावर 'होल्डर अँड स्टीव्हन्सन' नावाची बँक आहे. त्यातला होल्डर तो मीच." आमचा पाहुणा म्हणाला.

लंडन शहरातील दुसऱ्या क्रमांकाच्या बँकेच्या वरिष्ठ भागीदाराचे हे नाव आम्हाला खरोखरच चांगले परिचयाचे होते. अशा या प्रसिद्ध माणसाची इतकी दयनीय अवस्था होण्यासारखे काय बरे घडले असेल? आमचे कुतूहल चाळवले गेले. आम्ही त्याचे बोलणे ऐकण्यासाठी सरसावून तो बोलायची वाट बघू लागलो. क्षणभरात त्याने स्वतःला सावरून घेतले आणि बोलायला सुरुवात केली.

"वेळ अमूल्य असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे मदत मागावी असे मला एका इन्स्पेक्टरने सुचवल्याबरोबर मी तडक तुमच्याकडे धाव घेतली. मी भुयारी रेल्वेतून बेकर रस्त्यावर आलो. या बर्फात टांगे फारच हळू जातात म्हणून मी पायीच तुमच्याकडे आलो. त्यामुळेच मला एवढी धाप लागली. मी फारसे शारीरिक श्रम करणारा माणूस नाही. पण आता मला बरे वाटतेय आणि मी शक्य तितक्या कमी शब्दात पण शक्य तितक्या स्पष्टपणे जे काही झाले आहे ते आपल्यापुढे मांडतो. " तो म्हणाला.

"आमच्या बँकिंगच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक होणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते आमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ होऊन आमचे भांडवल वृद्धिंगत होणे हे तर तुम्हाला माहीतच असेल. हे भांडवल वाढण्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा सौदा म्हणजे काहीतरी तारण घेऊन पैसे कर्जाऊ देणे. या व्यवहारात तारण म्हणून ठेवलेल्या गोष्टीला निर्विवाद महत्त्व असते. या क्षेत्रात आम्ही बरेच काम केले आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बड्या उमराव घराण्यांना त्यांच्या चित्रे किंवा पुस्तकांसारख्या अमूल्य वस्तू गहाण ठेवून घेऊन आम्ही मोठ्या रकमा कर्जाऊ दिल्या आहेत. "

"काल सकाळी नेहमीप्रमाणे मी बँकेत माझ्या खोलीत बसून काम करत होतो. तेवढ्यात आमचा एक कारकून एका माणसाचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन आला. त्या कार्डावरचे नाव वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते नाव फक्त इंग्लंडमध्येच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अगदी घराघरात पोचलेले आहे. तपशिलाच्या जास्त खोलात न जाता मी एवढेच सांगतो की आपल्या राजगादीशी जवळचा संबंध असणाऱ्या उमराव घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे ते नाव होते. जेव्हा हे श्रीयुत माझ्या खोलीत आले तेव्हा तो माझ्या दृष्टीने इतका मोठ्या अभिमानाचा क्षण होता की मी अगदी भारावून गेलो होतो. ही गोष्ट मी त्यांना सांगायचा प्रयत्नही केला पण मला फार काही बोलायची आजिबात संधी न देता त्यांनी थेट मुद्द्याचे बोलायला सुरुवात केली. एखादे नावडते काम करताना उगाचच वेळकाढूपणा न करता लगोलग ते काम उरकून टाकायची त्यांची इच्छा असावी असे त्यांचा आविर्भाव पाहून वाटत होते. "

"होल्डरसाहेब, मला असे कळलेय की तुम्ही कर्जाऊ पैसे देता... " त्यांनी बोलायला सुरुवात केली.

"जर गहाण ठेवत असलेली गोष्ट चांगली मौल्यवान असेल तरच आम्ही कर्जाऊ रक्कम देतो. " मी म्हणालो.

"मला पन्नास हजार पौंडांची अगदी तातडीने गरज आहे. खरे सांगायचे तर ही रक्कम माझ्यासाठी अगदी मामुली आहे. मी माझ्या जवळच्या मित्रमंडळींकडे शब्द टाकला तर याच्या दसपट रक्क्म सहज उभी राहू शकते. पण तसे न करता ही गोष्ट व्हावहारिक पातळीवर राहिली तर बरे पडेल असे मला वाटते. आणि काहीही झाले तरी माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारे कोणाचे उपकार स्वीकारणे किती अवघड आहे हे तुम्ही सहज समजू शकाल. "

"आपली परवानगी असेल तर मला असे विचारायचेय की किती वेळासाठी ही रक्कम आपल्याला हवी आहे" मी विचारले.


"येत्या सोमवारी मला एक मोठी रक्क्कम येणे आहे. ती एकदा माझ्या हातात आली की मी तुमच्याकडून घेतलेले सगळे पैसे सव्याज परत करीन. अगदी तुम्हाला हव्या त्या दराने मी व्याज द्यायला तयार आहे. पण हे पैसे मला आत्ता लगेच मिळणे फार फार गरजेचे आहे. "

हे ऐकल्यावर मी म्हणालो, "मला स्वतःला ही रक्कम द्यायला आनंदच वाटला असता, पण एवढा ताण माझ्या खिशाला पेलणार नाही. जर आमच्या बँकेतर्फे ही रक्कम मी तुम्हाला द्यायची असेल तर मात्र सगळे व्यवहार पूर्ण केल्याशिवाय ती देणे म्हणजे माझ्या भागीदारावर अन्याय केल्यासारखे होईल. "

"हो. मला हेच बरे वाटते. " असे म्हणत त्यांनी खुर्चीशेजारी ठेवलेली काळी पेटी उचलली. "वैदूर्याचे खडे बसवलेल्या मुगुटाबद्दल तुम्ही ऐकलेच असेल ना? " त्यांनी विचारले.

"अर्थातच! आपल्या राज्याच्या खजिन्यातला सगळ्यात मौल्यवन अलंकार आहे तो. " मी म्हणालो.

"बरोब्बर! " असे म्हणून त्यांनी आपली पेटी उघडली. आत लालसर मखमलीवर तो मुगुट ठेवलेला होता. " याच्यावर एकोणचाळीस मोठे मोठे वैदूर्याचे खडे बसवलेले आहेत. आणि मुगुटात वापरलेल्याची सोन्याची किंमत करणेच अशक्य आहे. सगळी मिळून याची किंमत कमीत कमी केली तरी मी मागितलेल्या रकमेच्या दुप्पट भरेल. सोमवारपर्यंत हा मुगुट तारण म्हणून मी तुमच्याकडे ठेवायला तयार आहे. "

मी ती मुगुटाची पेटी हातात घेतली आणि या प्रकारावर विश्वास ठेवणे अवघड असल्यामुळे त्यांच्या तोंडाकडे बघत राहिलो.

"या मुगुटाच्या खरेपणाबद्दल तुम्हाला शंका येते आहे का? " त्यांनी मला विचारले.

"नाही तसे नाही पण... "

"मग तुम्ही म्हणत असाल की हा मुगुट गहाण ठेवायचा मला काय अधिकार? अशी काही शंका तुमच्या मनात असेल तर कृपा करून ती तुमच्या डोक्यातून काढून टाका. जर चार दिवसांच्या आत मी हा मुगुट परत मिळवेन याबद्दल मला खात्री नसती तर मी तो गहाण ठेवायचा विचारही केला नसता, हा सगळा केवळ रीतीचा भाग आहे. बरे, मला सांगा हे तारण पुरेसे आहे ना? "
"हो, पुष्कळ झाले"

"एक गोष्ट लक्षात घ्या होल्डरसाहेब, मी तुमच्यावर मोठा विश्वास टाकला आहे आणि त्याचा पुरावाही मी तुम्हाला दिला आहे. मी तुमच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. आणि त्यामुळेच ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आहे. तुमचावर फक्त या मुगुटाच्या संरक्षणाचीच जबाबदारी नाही, तर या गोष्टीचीही जबाबदारी आहे की यातले एक अक्षरही बाहेर जाता कामा नये. या मुगुटाचे सर्वप्रकारे रक्षण तुम्हाला केले पाहिजे. कारण या मुगुटाला काही झाले तर त्यामुळे जो काही जनक्षोभ उसळेल तो खुद्द सगळा मुगुट नष्ट झाल्यासारखाच उसळेल. या मुगुटात बसवलेल्या वैदूर्य खड्यांना सगळ्या जगात तोड नाही आणि तसे खडे परत मिळवणे अशक्य आहे. पण तुम्ही ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल असा मला विश्वास वाटतो आणि याच विश्वासाने मी हा मुगूट तुमच्याकडे सोपवतो आहे. सोमवारी सकाळी मी तो परत न्यायला येईनच. "

"त्यांना निघण्याची घाई होती असे दिसले. म्हणून मी आमच्या खजिनदाराला बोलावणे पाठवले आणि त्याच्याकरवी एक हजार पौंडांच्या पन्नास नोटा त्यांच्या हाती दिल्या. ते पैसे घेऊन निघून गेल्यावर मी एकटाच माझ्या खोलीत होतो. माझ्या टेबलावर ठेवलेली त्या मुगुटाची पेटी पाहिल्यावर मात्र आपण हे भलतेच धाडस केले की काय असे मला वाटून गेले. कारण त्या मुगुटाच्या रक्षणाची जबाबदारी आता सर्वस्वी माझ्यावर होती. शिवाय तो मुगुट ही राष्ट्राची मालमत्ता होती. देव न करो, जर त्या मुगुटाला काही झाले असते तर केवढा घोटाळा आणि सार्वजनिक स्तरावर बोंबाबोंब झाली असती याची मला पूर्ण कल्पना होती. त्या मुगुटाची जबाबदारी मी स्वीकारली याचा मला पश्चात्ताप होऊ लागला. पण आता या पश्चात्बुद्धीचा काय उपयोग होणार होता? काहीच नाही. म्हणून मी ती पेटी माझ्या खाजगी तिजोरीमध्ये कुलूपबंद करून ठेवली आणि माझी दैनंदिन कामे करू लागलो. "

"संध्याकाळ झाल्यावर माझ्या असे लक्षात आले की इतकी मौल्यवान वस्तू माझ्या मागे ऑफिसात तशीच सोडून जाणे हा त्या मुगुटाचा अपमान तर होताच पण ते अतिशय धोकादायकही ठरू शकत होते. बँकेच्या तिजोऱ्या फोडण्याच्या आजवर काही कमी घटना घडल्या नहीयेत. आणि मी असा कोण लागून गेलोय की मला त्यापासून अभय मिळावे? आणि असा दरोडा पडला तर माझी अवस्था किती भयानक होईल? मी असे ठरवले, की पुढचे काही दिवस ती पेटी सदैव माझ्याबरोबर घेऊन जायची म्हणजे क्षणभरही ती माझ्या नजरेपासून लांब जाणार नाही. असा निश्चय केल्यावर मी टांगा करून स्ट्रीटहॅमला माझ्या घरी गेलो. घरी पोचल्यावर, आधी वरच्या मजल्यावर जाऊन माझ्या कपडे करायच्या खोलीतल्या कपाटात ती पेटी मी कुलूपबंद करून ठेवली तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला, "

"होम्स साहेब, तुम्हाला सगळी परिस्थिती नीट लक्षात यावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या घराबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दल तुम्हाला तपशीलवार सांगतो. माझा घरगडी आणि माझा निरोप्या हे दोघेजण माझ्या घरी राहत नसल्यामुळे त्यांना यातून संपूर्णपणे वगळले तरी चालू शकेल. माझ्याकडे तीन मोलकरणी आहेत. त्या बऱ्याच वर्षांपासून माझ्याकडे काम करत आहेत आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला आजिबात शंका नाही. माझ्याकडची चौथी मोलकरीण मात्र काही महिन्यांपूर्वीच आमच्याकडे लागली आहे. तिचे नाव ल्यूसी पार. ती दुसऱ्या एका मोलकरणीच्या हाताखाली काम करते. तिच्याकडे चांगली शिफारसपत्रे आहेत आणि आजपर्यंत तिने उत्तम काम केले आहे. ती दिसायला फार सुंदर आहे आणि त्यामुळे खूप लोक तिच्या मागे लागलेले आहेत. असे लोक कधीकधी आमच्या घराच्या आसपास घोटाळताना दिसतात. ल्यूसीच्या बाबतीत ही एवढी एक गोष्ट सोडली तर तिच्यात नाव ठेवायला कुठेच जागा नाही. "

"हे झाले घरातल्या नोकरचाकरांबद्दल. आता माझ्या कुटुंबाबद्दल सांगतो. माझे कुटुंब फारच लहान आहे. माझी बायको हे जग सोडून गेली आहे. मला एक मुलगा आहे त्याचे नाव आर्थर. होम्ससाहेब, आर्थरच्या बाबतीत मी अतिशय निराश झालो आहे. अर्थात या गोष्टीला मी स्वतःच जबाबदार आहे. सगळे म्हणतात माझ्यामुळेच तो वाया गेला. हेच खरे आहे बहुतेक. माझी लाडकी पत्नी देवाघरी गेली तेव्हा आर्थरशिवाय मला दुसरे कोणीच नव्हते. एक क्षणभरसुद्धा त्याचा चेहरा रडवेला झालेला मला सहन व्हायचा नाही. आजपर्यंत कुठल्याच गोष्टीसाठी मी त्याला कधीच नाही म्हटलेलं नाही. मी जर त्याच्याशी थोडासा कठोरपणाने वागलो असतो तर ते आम्हा दोघांसाठीही बरे झाले असते. पण त्या वेळी तरी त्याचे हित व्हावे हाच माझा उद्देश होता. "

"माझ्यानंतर आर्थरने माझी जागा सांभाळावी अशी साहजिकच माझी इच्छा होती, पण आर्थर कामधंदा बघायला नालायक निघाला. तो उनाड आहे. त्याच्या हातात मोठी रक्कम द्यायची मला भीती वाटते. लहान वयातच तो एका उमरावांसाठी असलेल्या क्लबाचा सदस्य झाला. वागायला - बोलायला चटपटीत असल्यामुळे थोड्याच वेळात त्याची अनेक लोकांशी घट्ट मैत्री झाली. हे सगळे लोक पैसेवाले आणि पैसे उधळण्यात मश्गुल होते, त्यांच्या संगतीत राहून आर्थरला जुगाराचे व्यसन लागले. तो घोड्यांच्या शर्यतींवर पैसे लावायला लागला. पुन्हापुन्हा माझ्याकडे येऊन तो त्याला महिन्याच्या खर्चासाठी मिळणाऱ्या रकमेची आगाऊ उचल मागायचा आणि त्यातून आपली बदनामीकारक देणी फेडायचा. ही वाईट संगत सोडून देण्याचा त्याने काही वेळा प्रयत्नही केला. पण सर जॉर्ज बर्नवेल नावाच्या त्याच्या मित्रामुळे दर वेळी तो पुन्हा यात ओढला गेला. "

"सर जॉर्ज बर्नवेलसारख्या माणसाचा आर्थरवर इतका प्रभाव कसा काय पडला हेही मला माहीत आहे. आर्थरच्या बरोबर हा बर्नवेल बऱ्याच वेळा आमच्या घरी आलेला आहे. आणि त्याच्या वागण्याबोलण्यात असे काही चातुर्य आणि सफाई आहे की खुद्द मलाही त्याच्या सहवासाचा मोह झाला. बर्नवेल आर्थरपेक्षा वयाने बराच मोठा आहे. जग हिंडून आल्यामुळे त्याला अनेक विषयांबद्दल विस्तृत ज्ञान आहे. तो सर्व विषयांवर विलक्षण अधिकारवाणीने बोलतो आणि समोरच्या माणसाला संभाषणात ओढून घेण्याचं, त्याला बोलण्यात गुंतवून ठेवण्याचे कसब त्याच्याकडे आहे. या त्याच्या गुणांमुळे त्याची उत्तम छाप पडल्यावाचून राहत नाही. पण या सगळ्या वरच्या रंगाला न भुलता त्याच्याकडे पाहिले तर मात्र असे दिसून येते की त्याच्यावर विश्वास टाकण्यात मुळीच अर्थ नाही. त्याच्या नजरेत दिसणारी लोभी छटा आणि त्याचे तिरकस बोलणे या गोष्टी पाहिल्यावर तर क्षणभरही त्याच्या संगतीत राहू नये असे वाटायला लागते. आणि हे फक्त माझेच नाही तर आमच्या मेरीचेही म्हणणे आहे. बायकांना एखाद्या माणसाची नियत चटकन ओळखता येते म्हणतात आणि मेरीलाही ती लक्षात आलेली आहे. "

"आणि आता मी तुम्हाला मेरीबद्दल सांगतो. मेरी म्हणजे माझी पुतणी. पाच वर्षांपूर्वी माझा भाऊ वारला. मेरी एकटी पडली. मग मी तिला घरी घेऊन आलो आणि आजवर मी तिचा माझ्या मुलीसरखाच सांभाळ केला आहे. मेरीने अतिशय उत्तम प्रकारे आमचे घर सांभाळले आहे. ती आमच्या घरातला आशेचा किरण आहे म्हणा ना!. ती खूप सुंदर आहे. प्रेमळ आहे. आपल्या ऋजू स्वभावाने आणि स्त्रीसुलभ गोडव्याने तिने आम्हाला केव्हाच जिंकून टाकले आहे. ती म्हणजे माझा उजवा हात आहे. तिच्याशिवाय माझे काम पावलोपावली अडते. फक्त एकाच बाबतीत ती माझे ऐकत नाही. आर्थरचे तिच्यावर खूप प्रेम आहे. आजवर दोन वेळा त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि दोन्ही वेळा तिने ती धुडकावून लावली. मला असे मनापासून वाटते की आर्थरला योग्य आर्गावर आणायला तिच्यापेक्षा लायक कोणीच नाही. हे लग्न झाले असते तर माझ्या मुलाचे आयुष्यच बदलून गेले असते. पण आता या गोष्टीला फार फार उशीर झाला आहे... "

"तर होम्स साहेब, आमच्या घरातल्या माणसांबद्दल तुम्हाला सांगून झालेय. आता माझी कर्मकहाणी मी पुढे सांगतो"

"त्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही दिवाणखान्यात बसून कॉफी घेत होतो. माझी अशी खात्री आहे की दिवाणखान्यात कॉफी आणून दिल्यावर ल्यूसी पार तिथून निघून गेली होती. पण दिवाणखान्याचे दार बंद होते किंवा नाही हे मात्र मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. कॉफी घेता घेता मी आर्थर आणि मेरीला त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले आणि काही दिवसांसाठी माझ्या ताब्यात असलेल्या त्या अमूल्य खजिन्याबद्दलही सांगितले. फक्त तो मुगुट माझ्याकडे सोपवणाऱ्या माणसाचे नाव मात्र मी वगळले. मेरी आणि आर्थर दोघांनाही तो मुगूट बघायचा होता. पण मी काही त्यांना मुगुट दाखवला नाही. म्हटले, कशाला उगाच त्याला धक्का लावायचा. "

"कुठे ठेवलायत तो मुगुट? " आर्थरने मला विचारले.

"माझ्या कपाटात. "

"देव करो आणि आज रत्री आपल्याकडे चोरी न होवो" तो म्हणाला.

"तो मुगूट व्यवस्थित कुलुपात ठेवला आहे. " मी म्हणालो.

"तुमच्या कपाटाचे कुलूप लापट झालेय. कुठल्याही जुनाट किल्लीने ते सहज उघ्डते. मी लहान असताना बाहेरच्या खोलीतल्या कपाटाच्या किल्लीने ते कितीतरी वेळा उघडलेले आहे. "

त्याला एखादी गोष्ट उगाचच वाढवून सांगायची सवय आहे हे माहीत असल्यामुळे मी त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. माझ्या मागोमाग तो माझ्या खोलीत आला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर झाला होता.

"बाबा, मला दोनशे पौंड हवेत. " खालमानेने तो म्हणाला.

"आजिबात मिळायचे नाहीत. आजवर पैशांच्या बाबतीत मी तुला खूपच सैल सोडले आहे. "

"हो आजवर तुम्ही खरेच माझे खूप लाड केले आहेत. पण आत्ता जर हे पैसे मला मिळाले नाहीत तर मी पुन्हा कधीच क्लबात पाऊल ठेवू शकणार नाही. "

"फार उत्तम होईल" माझा पारा चढला.

"पण अशा रितीने मानहानी आणि बदनामीला तोंड देऊन मी क्लब सोडलेला तुम्हाला चालेल का? मी हे सहन करू शकत नाही. मला पैसे उभे केलेच पाहिजेत. आणि तुम्ही मला पैसे देणार नसाल तर मला इतर उपाय करावे लागतील. " आर्थर म्हणाला.

महिन्याभरात माझ्याकडे पैसे मागायची त्याची ही तिसरी वेळ होती. मी संतापलो. "मी तुला एक पैसाही देणार नाही." माझ्या या बोलण्यावर त्याने आपली मान झुकवली आणि एक अक्षरही न बोलता तो चालता झाला.

तो निघून गेला त्यानंतर मी माझ्या कपाटाचे कुलूप काढले आणि आतला मुगुट जागच्या जागी असल्याची खात्री करून कपाटाला पुन्हा एकदा कुलूप लावून टाकले. एवढे झाल्यानंतर मी घरात सगळीकडे एक फेरी मारायला गेलो. सगळे काही ठाकठीक आहे ना हे बघायला. एरवी हे काम मेरी करते पण त्या दिवशी आपणच हे काम करून टाकावे अस मी ठरवले. मी जिन्यावरून खाली आलो तेव्हा मेरी हॉलमधल्या खिडकीपाशी उभी होती. माझ्या देखतच तिने खिडकी बंद केली आणि कडी लावून टाकली.

"बाबा, तुम्ही ल्यूसीला आज रात्री बाहेर जायला परवानगी दिली होतीत का? " ती जरा चिंतेत पडल्यासारखी दिसत होती असे मला वाटले.

"छे छे! आजिबात नाही. "

"ती आत्ता मागच्या दाराने आत आली. मला वाटते कोणाला तरी भेटायला ती पुढे फाटकापर्यंत गेली असणार, पण हे काही बरोबर चाललेले नाअही. हे थांबले पाहिजे कारण हे धोकादायक ठरू शकते"

"तू उद्या सकाळीच तिला चांगली समज दे. हवे तर मीही बोलतो तिच्याशी. सगळीकडची कड्याकुलुपे झाली का लावून? "

"हो झाली. "

"ठीक आहे मग! गुड नाईट" असे म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. थोड्याच वेळात मला झोप लागली.

"होम्स साहेब, मी जे काही झाले ते सगळे तुम्हाला सांगतो आहे. मग त्याचा या प्रकरणाशी संबंध असो किंवा नसो. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल आणखी माहिती द्यायला हवी असे तुम्हाला वाटले तर मला लगेच प्रश्न विचारा. "

"त्याची काही गरज नाही. तुम्ही व्यवस्थित सांगताय सगळे. " होम्स म्हणाला.

"आता मी जे काही सांगणार आहे ते मला अगदी व्यवस्थितच सांगितले पाहिजे. माझी झोप तशी सावधच असते. शिवाय माझ्या शिरावर येऊन पडलेल्या त्या मुगुटाच्या जबाबदारीमुळे माझी झोप उडाली होती म्हणा ना. मला नीट झोप अशी लागली नव्हती. पहाटे साधारण दोन वाजायच्या सुमाराला कसल्या तरी आवाजाने मला एकदम जाग आली. मी अगदी टक्क जागा होईस्तोवर तो आवाज यायचा थांबला होता. मला असे वाटले की माझ्या घराची कुठलीतरी खिडकी हलकेच बंद करून घेताना तो आवाज झाला होता. मी तसाच पडल्यापडल्या कान देऊन ऐकू लागलो. तेवढ्यात शेजारच्याच खोलीत कोणीतरी दबक्या पावलांनी चालल्याचा आवाज आला आणि मी उडालो. माझ्या छातीत धडधडायला लागले. मी अंथरुणातून बाहेर पडलो आणि शेजारी असलेल्या कपडे करायच्या खोलीच्या दारातून आत डोकावून पाहिले. "

"आर्थर! चांडाळा, त्या मुगुटाला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? " माझा आवाज चढलेला होता.

"त्या खोलीतला गॅसचा दिवा मी सुरू ठेवला होता तो तसाच मिणमिण जळत होता. आर्थर नुसत्या शर्ट आणि पायजम्यात हातात तो मुगूट घेऊन दिव्याशेजारी उभा होता. आपली सगळी शक्ती लावून तो मुगुट पिरगाळण्याचा किंवा वाकवण्याचा आर्थरचा प्रयत्न चाललेला होता. माझ्या आवाजाने दचकून त्याच्या हातातून मुगुट खाली पडला. मला पाहून आर्थर एखाद्या भुतासारखा पांढरा फटक पडला होता. मी तो मुगुट उचलला आणि तो व्यवस्थित आहे याची खात्री करून घेऊ लागलो. मुगुटाचा एका बाजूचा सोन्याचा तुकडा आणि त्यावर बसवलेले तीन वौदूर्य खडे गायब झालेले होते. "

"नतद्रष्टा! कुळबुडव्या!! तू याची वाट लावलीस. तू माझ्या नावाला कायमचा बट्टा लावलास. यातले चोरलेले खडे कुठे आहेत? " संतापाने माझा माझ्यावरचा ताबाच सुटला.

"चोरलेले खडे? " आर्थर माझ्या अंगावर ओरडला.

"होय! तू चोर आहेस... " असे म्हणून मी त्याचे खांदे धरून त्याला गदागदा हलवू लागलो.

"त्याच्यावरचे सगळे खडे जागेवर आहेत. एकही खडा हरवलेला नाही. असूच शकत नाही. "

"चांगले तीन - तीन खडे गायब आहेत. आणि तुला ठाउक आहे ते कुठे आहेत. चोरी करण्याबरोबरच आता तू धडधडीत खोटेही बोलायला लागलास का? आत्ता तू याचा आणखी एक तुकडा काढायचा प्रयत्न करत होतास की नाही? "

"बास. खूप बोललात. यापुढे हे मला खपायचे नाही. तुम्ही माझा पाणउतारा करायचाच असे ठरवलेले असल्यामुळे मी यापुढे या विषयावर काहीही बोलणार नाही. उद्या सकाळीच मी तुमचे घर सोडून जातो. माझे काय होईल ते मी बघून घेईन. " तो म्हणाला.

"तू इथून जाशील तो थेट पोलिसांच्या ताब्यात. मी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन याचा छडा लावणार आहे" संताप आणि दुःख याने मला वेड लागायची पाळी आली होती.

"मला यावर काही बोलायचेच नाहीये. तुम्हाला पोलिसांना बोलवायचे असेल तर खुशाल बोलवा. त्यांनाच यातलं खरे काय आहे ते शोधून काढू देत. " त्याच्या चेहऱ्यावर झळकलेला निर्धार पाहून मला धक्काच बसला.

"संतापाने माझा आवाज इतका चढला होता की सगळे घर माझ्या आवाजाने जागे झाले. सगळ्यात आधी मेरी तिथे येऊन पोचली. तो मुगूट आणि आर्थरचा चेहरा बघून काय झाले असेल हे तिने लगेच ओळखले आणि एक किंकाळी फोडून ती जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध पडली. एका मोलकरणीला पाठवून मी पोलिसांना बोलावले आणि लगोलग सगळे प्रकरण त्यांच्या हाती सोपवले. हा सगळा प्रकार आर्थर संतप्त चेहऱ्याने हाताची घडी घालून बघत उभा होता. पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदार आमच्या घरी पोचल्यावर त्याने मला विचारले की मी त्याला चोरीच्या आरोपाखाली खरोखरीच पोलिसांच्या ताब्यात देणार होतो की काय. मी म्हणालो, की तो मोडलेला मुगुट ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही गोष्ट चार भिंतींच्या आत राहणे आता अशक्य झाले आहे. तेव्हा कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होऊ देत. "

"पोलीस घरात शिरल्याशिरल्या मला त्यांच्या ताब्यात देऊ नका. मी फक्त पाच मिनिटे घरातून बाहेर जाऊन आलो तर ते आपल्या दोघांच्याही हिताचे होईल. " आर्थर म्हणाला.

"कशाला? इथून पोबारा करायला? का चोरीचा माल लपवून ठेवायला? " मी म्हणालो आणि मग एकदम माझ्या लक्षात आलं की मी स्वतः किती मोठ्या संकटात सापडलो होतो. मी त्याला सांगितले, की प्रश्न फक्त माझ्या अब्रूचा नव्हता तर माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या माणसाची अब्रूही पणाला लागलेली होती. या सगळ्यातून निर्माण होणारा घोटाळा सगळ्या देशभर गाजला असता. पण त्या हरवलेल्या तीन खड्यांचे त्याने काय केलेय हे जर आर्थरने मला सांगितले असते , तर सगळे घोटाळे टाळता आले असते. "

"तू चोरी करताना रंगे हाथ सापडला आहेस. आणि आता तू काहीही सारवासारवीचा प्रयत्न केलास तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्या कर्माची फळे तुला भोगलीच पाहिजेत. पण जर तू शहाण्यासारखा त्या हरवलेल्या तीन खड्यांचा ठावठिकाणा मला सांगितलास तर अजूनही मी घडलेला सगळा प्रकार विसरून जायला तयार आहे. " मी म्हणालो.

"हा तुमचा कनवाळूपणा मला नका सांगू... "आर्थर करवादला आणि त्याने आपले तोंड फिरवले. माझ्या शब्दांचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण तो पुरता निर्ढावला आहे हे मला कळून चुकले. आता करण्याजोगी एकच गोष्ट माझ्या हाती होती. मी पोलीस इन्स्पेक्टरला हाक मारली आणि आर्थरला त्याच्या ताब्यात दिले. आम्ही त्याची, त्याच्या खोलीची, घराची कसून झडती घेतली. जिथे त्याने चोरलेले खडे लपवलेले असू शकत होते अशा एक न एक जागा धुंडाळल्या. पण त्या खड्यांचा काहीही पत्ता लागला नाही. आणि आमच्या साम दाम दंडाला त्या अवलक्षणी कार्ट्याने जरासुद्धा धूप घातली नाही आणि आपले तोंड उघडले नाही. सकाळ झाल्यावर त्याला पोलीस कोठडीमधे बंद करून ठेवलेय. आणि पोलिसांचे सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर मी तुमच्याकडे धाव घेतली आहे. आता तुम्हीच याचा छडा लावा. पोलिसांनी मला स्वच्छ सांगून टाकलेय की या प्रकरणात सध्या तरी ते काहीही करू शकत नाहीत. तुम्हीच यातून मार्ग काढा. खर्चाचा विचार करू नका. कितीही खर्च आला तरी चालेल. मी त्या खड्यांसाठी हजार पौंडांचे बक्षीसही जाहीर केलेय. देवा रे, काय करू मी? एका रात्रीत माझी अब्रू, माझी रत्ने, माझा मुलगा सगळे गमावून बसलोय मी... काय करू मी आता? "

आपल्या दोन्ही हातांमध्ये त्यांनी आपले डोके घट्ट दाबून धरले आणि असह्य दुःखाने एखाद्या लहान मुलाने करावे तशी पुढे मागे डोलायला सुरुवात केली.

शेरलॉक होम्स कपाळाला आठ्या घालून शेकोटीकडे बघत काही वेळ तसाच बसून राहिला.

"तुमच्याकडे माणसांची बरीच वर्दळ असते का? " होम्सने विचारले.

"छे छे. आजिबात नाही. माझा भागीदार, त्याच्या घरातली मंडळी आणि आर्थरचा मित्र सर जॉर्ज बर्नवेल हे लोक सोडले तर फारसे कुणी येत नाही. हा जॉर्ज बर्नवेल मात्र गेल्या काही दिवसात खूपच वेळा आलाय घरी. "

"तुम्ही लोकांमधे खूप मिसळता का? बाहेर वगरे जाता का? "

"आर्थर जातो. मी आणि मेरी घरीच असतो. आम्हाला तेच जास्त आवडते. "

"मेरीसारख्या तरुण मुलीला घरीच बसायला आवडते? हे जरा विचित्र नाही? "

"ती जात्याच शांत्त आणि एकलकोंडी आहे. शिवाय ती काही तितकी तरुण नाही. चोवीशीची आहे ती. "

"तुमच्या बोलण्यावरून असे दिसतेय की तिलाही या प्रकाराचा बराच धक्का बसला असावा. "

"हो. तिची अवस्था तर माझ्यापेक्षाही वाईट झाली आहे. "

"तुम्हा दोघांचीही खात्री आहे की तुमचा मुलगाच दोषी आहे? "

"हो. माझ्या डोळ्यांनी पाहिलेय मी त्याला मुगुट हातात घेऊन उभा असताना. मग संशयाला जागाच उरत नाही ना"

"माझ्या दृष्टीने एवढा पुरावा पुरेसा नाही. त्या मुगुटाला आणखी काही इजा झाली होती का? "

"हो. तो चिमटला होता. "

"मग तुम्हाला असे नाही वाटले, की तुमचा मुलगा तो मुगुट सरळ करत असेल? "

"तुम्ही माझ्या मुलाला आणि मला मदत करण्याचा प्रयत्न करताय! देव तुमचे भले करेल. पण यात मोठा धोका आहे हो. जर माझ्या मुलाचा उद्देश सरळ असेल तर तो काही बोलला का नाही? आणि मुळात तो मुगुट ठेवलेल्या खोलीत काय करायला गेला होता? "

"अगदी हेच म्हणायचेय मला. आणि जर तो दोषी असेल तर त्याने काहीतरी थाप का नाही मारली? या प्रकरणात त्याचे मौन दोन्ही बाजूंकडे इशारा करतेय. या प्रकरणात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला झोपेत असताना ऐकू आलेल्या त्या आवाजाबद्दल पोलिसांचे काय म्हणणे आहे? "

"त्यांना वाटतेय की आर्थरच्या खोलीचे दार लावताना तो आवाज झाला असेल. "

"सहज शक्य आहे! जेव्हा एखाद्या माणसाला चोरून काही काम करायचे असते तेव्हा तो सगळे घर दार जागे होईल इतक्या जोरात दारांची आदळ आपट करतो नाही का? मग ते खडे गायब झालेत त्याबद्दल पोलीस काय म्हणतात? "

"पोलीस अजून आमच्या घरातले सामान उलटेपालटे करून त्या खड्यांचा शोध घेतायत. "

"घराबाहेर शोधाशोध करायचा विचार त्यांना शिवलाय का? "

"हो! त्यांनी फारच चपळाईने काम केलेय. सगळी बाग पार उकरून शोध करून झालाय एव्हाना. "

"आता असं बघा साहेब, तुम्हाला आणि पोलिसांना वाटतेय तितके हे प्रकरण वरवरचे नाही हे उघड आहे. तुम्हाला हे पटतेय का? " होम्स ने बोलायला सुरुवात केली. " तुम्हाला जी गोष्ट सुतासारखी सरळ वाटली ती विलक्षण गुंतागुंतीची आहे असे मला दिसतेय. तुम्हाला वाटतेय तशा घटना आपण मांडून बघू या. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तुमचा मुलगा झोपेतून उठला, मोठा धोका पत्करून तुमच्या कपडे करायच्या खोलीत गेला, तुमचे कपाट उघडलेन, तुमचा मुगूट बाहेर काढला, नुसत्या हातांनीच त्याचा तुकडा मोडला, घरातून बाहेर गेला, एकोणचाळीस खड्यांपैकी तीन खडे असलेला तुकडा अशा पद्धतीने लपवलान की कोणालाच तो शोधता येणार नाही, मग उरलेले छत्तीस खडे घेऊन तुमच्या खोलीत परत आला आणि मोठा धोका पत्करून पकडला गेला? आता तुम्हीच मला सांगा, हे सगळे तुम्हाला शक्य वाटतेय? "

"पण याखेरीज दुसरे काय आहे? जर तो निर्दोष आहे, तर त्याने तसे सांगितले का नाही? "

"ते शोधून काढणे हेच तर आपले काम आहे! त्यामुळे होल्डर साहेब, आता आपण एकत्रच स्ट्रीटहॅमला जाऊ या आणि साधारण एक तासाभर परिस्थितीची बारकाईने पाहणी करू या"

ही सगळी कथा ऐकल्यावर पुढे काय होणार याची उत्सुकता मला लागली होतीच. खरे सांगायचे तर झाल्या प्रकारात आमच्या दुर्दैवी सावकारबुवांचा मुलगाच दोषी आहे याबद्दल मला स्वतः सावकारबुवांच्या इतकीच खात्री वाटत होती. पण होम्सवरही माझा तितकाच विश्वास होता. ज्या अर्थी घडलेल्या गोष्टींचा सावकारबुवांनी लावलेला अन्वय होम्सला पटलेला नव्हता, त्या अर्थी अजूनही या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळू शकते असे मला राहून राहून वाटत होते. त्यामुळे होम्सने जेव्हा मलाही आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला तेव्हा मला ती एक इष्टापत्तीच वाटली. स्रीटहॅम हे उपनगर लंडनच्या दक्षिणेला आहे. तिथे पोहोचेपर्यंत होम्सने तोंडातून चकार शब्दही काढला नाही. उलट पूर्ण वेळ तो मान खाली घातलेली आणि कपाळाला आठ्या अशा अवस्थेत विचारात गर्क होऊन बसला होता. होम्सचा एकंदर आविर्भाव बघता होल्डर साहेबांना मात्र कुठेतरी आशेचा किरण गवसल्यासारखे झाले होते. त्यामुळे काही वेळानंतर आपल्या व्यवसायाबद्दल त्यांनी माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. थोडा वेळ आगगाडीतून प्रवास केल्यावर थोडेसे अंतर चालत आम्ही आमच्या प्रसिद्ध सावकारबुवांच्या लहानशा निवासस्थानी फेअरबँक इथे येऊन पोचलो.


फेअरबँक हे घर मोठे होते. चौरस आकारात पांढऱ्या दगडाने बांधून काढलेले. इतर घरांच्या तुलनेत रस्त्यापासून जरा लांब उभे आहे असे वाटणारे. रस्त्यावरच एक मोठ्या बिडाच्या लोखंडी दारांचे फाटक होते. फाटकातून आत आल्यावर समोरच घोडागाडी जाऊ शकेल अशा दोन आवळ्या जावळ्या वाटा होत्या. त्यांच्या मधोमध हिरवळीचा राखलेला पट्टा होता. हिरवळीवर सगळीकडे बर्फाची पांढरी चादर पसरलेली होती. उजव्या हाताला झाडांची एक लहानशी राई होती. राईच्या पलिकडे उंच वाढलेल्या मोठ्या झाडांचे दोन पट्टे रस्त्यापासून ते स्वयंपाकघराच्या दरवाज्यापर्यंत गेले होते. या दोन पट्ट्यांच्या मधून एक पाऊलवाट रस्त्यापासून ते स्वयंपाकघरापर्यंत जात होती. ती बहुतेक फेरीवाले, भाजीवाले वगैरे लोकांसाठी केलेली असावी. डाव्या हाताला एक आळी मागे तबेल्यापर्यंत गेली होती. ती सार्वजनिक असावी कारण घराच्या आवाराचा भाग असल्यासारखी काही ती दिसत नव्हती. पण सार्वजनिक असली तरी फारशी वापरात नसावी असे वाटत होते. मी आणि सावकारबुवा, आम्हाला दोघांना घराच्या फाटकात तसेच उभे करून होम्स घराची तपासणी करायला निघून गेला. घराचे बाहेरून चारी बाजूंनी सावकाश निरीक्षण केल्यावर त्याने फेरीवाल्यांसाठी केलेल्या वाटेची तपासणी केली. मग तो परसदारच्या बागेकडे आणि तिथून तबेल्यातून तबेल्याकडे जाणाऱ्या आळीकडे गेला. सावकाश एकेक पाऊल टाकत टाकत बारकाईने चाललेला हा तपास इतका वेळ चालला होता की शेवटी मी आणि होल्डरसाहेब आत जेवणघरातल्या शेकोटीजवळ बसून त्याची वाट पाहू लागलो. आम्ही दोघं नुसतेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो असतानाच जेवणघराचे दार उघडून मध्यम उंचीची, सडपातळ अशी एक तरुण मुलगी आत आली. तिचे केस काळेभोर होते आणि डोळेही तसेच काळे होते. तिच्या फिकुटलेल्या वर्णामुळे तिचे डोळे आणखीनच गडद असल्यासारखे दिसत होते. आजवर कधी एखाद्या बाईचा चेहरा इतका पांढरट पडलेला मी पाहिला नव्हता. तिचे ओठही रक्त नसल्यासारखे पांढरे पडले होते पण तिचे डोळे मात्र रडून रडून चांगले लाल झाले होते. जराही आवाज न करता माझ्या शेजारून ती निघून गेली तेव्हा तिला किती जबरदस्त दुःख झाले आहे हे मला अगदी लख्खपणे जाणवले. सकाळी होल्डरसाहेब म्हणाले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तिला दुःख झालेले दिसत होते. ती चांगली खंबीर मनाची आणि स्वतःवर विलक्षण ताबा असलेली मुलगी होती हे तिच्याकडे बघून कळत असल्यामुळे तिला झालेले दुःख जास्त जाणवत होते. माझ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत ती आपल्या काकांपाशी गेली आणि स्त्रीसुलभ अशा वात्सल्याने तिने काकांच्या डोक्यावर हलकेच थोपटले.

"बाबा, आर्थरला सोडून द्यायला तुम्ही त्यांना सांगितलेत ना? "

"नाही गं बाळा. आपल्याला याच्या मुळापर्यंत जायला हवे ना"

"पण आर्थर निर्दोष आहे. माझी खात्री आहे. तुम्हाला माहित्ये बायकांना या गोष्टी बरोबर ओळखू येतात. त्याने काहीच वेडेवाकडे काम केलेले नाहीये. मला माहित्ये. त्याच्याशी इतके निर्दयपणे वागल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल. "

"जर तो इतका धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, तर तोंड का नाही उचकटते स्वतःचे? "

"तुम्ही त्याच्यावर इतका मोठा आळ घेतलात याचा त्याला राग आला असेल"

"मी त्याला मुगूट हातात धरलेला माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. मग त्याच्यावर आळ घेण्याशिवाय मी दुसरे काय करू शकतो? "

"त्याने फक्त बघायला म्हणून तो मुगूट हातात घेतला असेल. मी सांगते तुम्हाला असेच झाले असणार. ही चौकशी बंद करा हो. आपला आर्थर तुरुंगात आहे या कल्पनेनेच मला रडू फुटते. "

"जोपर्यंत ते हरवलेले खडे परत मिळत नाहीत तोवर मी ही चौकशी थांबवणार नाही. मुळीच नाही. मेरी, आर्थरबद्दलच्या तुझ्या प्रेमापोटी तुझे या सगळ्याच्या भयंकर परिणामांकडे साफ दुर्लक्ष होतेय. चौकशी बंद करणे लांबच राहिले, उलट मी याचा खोलवर तपास करायला म्हणून लंडनहून एका सद्गृहस्थांना घेऊन आलो आहे. "

"हेच का ते सद्गृहस्थ? " माझ्याकडे तोंड करून ती म्हणाली.

"नाही. हे ते नव्हेत. हे त्यांचे मित्र आहेत. त्या गृहस्थांना एकट्यानेच काही तपास करायचा होता. ते सध्या तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत आहेत. "

"अबेल्याकडे जाणाऱ्या आळीत? " तिच्या भुवया उंचावल्या. "तिथे काय सापडणार त्यांना? हे बघा हे तेच सद्गृहस्थ दिसतायत. साहेब, माझा भाऊ आर्थर निर्दोष आहे हेच तुम्हीही सिद्ध करून दाखवाल. हो ना? "

"माझंही हेच मत आहे आणि ही गोष्ट आपण नक्कीच सिद्ध करू या. " दाराजवळच्या पायपुसण्यावर आपल्या बुटांना लागलेले बर्फ पुसता पुसता होम्स म्हणाला. "आपण मेरी होल्डर आहात खरे ना? बाईसाहेब, आपली परवानगी असेल तर आपल्याला एक दोन प्रश्न विचारू शकतो का मी? "

"जरूर विचारा. हा गोंधळ निस्तरण्यासाठी मी कुठलीही मदत करायला तयार आहे"

"काल रात्री तुम्ही काही ऐकले नाहीत का? "

"नाही. माझ्या काकांच्या चढलेल्या आवाजाने मला जाग आली आणि मी खाली आले"

"तुम्ही काल रात्री सगळी दारे - खिडक्या लावल्यात त्या वेळी सगळ्या कड्या व्यवस्थित लावल्या होत्यात? "

"हो. "

"आज पहाटे त्या सगळ्या तशाच लावलेल्या होत्या? "

"हो"

"तुमच्या मोलकरणीचे काही प्रेमप्रकरण आहे का? काल रात्री ती आपल्या प्रियकराला भेटायला बाहेर गेली होती अशी तक्रार तुम्ही आपल्या काकांकडे केली होतीत? "

"हो. तीच काल रात्री दिवाणखान्यात कॉफी घेऊन आली होती. काका त्या मुगुटाबद्दल सांगत असताना तिने ऐकले असणार. "

"अच्छा! तुम्हाला असे वाटते का, की रात्री तिने आपल्या याराला ही गोष्ट सांगितली असेल आणि मग त्या दोघांनी मिळून हा दरोडा घालायचा बेत आखला असेल? "

"पण मी आर्थरला चोरी करताना पकडलेय ना? मग आता या सगळ्या गप्पा कशाला मारताय तुम्ही लोक? " होल्डर साहेब न राहवून ओरडले.

"होल्डर साहेब, जरा थांबा. आपण त्या गोष्टीवर बोलणारच आहोत. बाईसाहेब, मी असे धरून चालतो की या मोलकरणीला स्वयंपाकघराच्या दारातून आत येताना काल रात्री तुम्ही बघितलेत? "

"हो. रात्री स्वयंपाकघराचे दार लावलेले आहे का हे मी बघायला गेले तेव्हा ती गुपचूप दारातून आत येत होती. बाहेरच्या अंधुक प्रकाशात मी तिच्या दोस्तालाही पाहिले. "

"तुम्ही ओळखता त्याला? "

"हो हो. आमच्याकडे नेहमी येणारा आमचा भाजीवाला आहे तो. त्याचं नाव फ्रान्सिस प्रॉस्पर. "

"तो दरवाज्याच्या डाव्या बाजूला उभा होता? दाराजवळ पण लगेच आत पाऊल टाकता येईल इतक्या जवळ नाही. थोड्या अंतरावर? " होम्सने विचारले.

"हो बरोबर आहे"

"त्याचा एक पाय लाकडाचा आहे का? "

हे ऐकताच मेरीच्या काळसर डोळ्यांमध्ये भीती दाटून आली. ती म्हणाली, " तुम्हाला पिशाच्च - जादू असले काही वश आहे की काय? तुम्ही कसे काय ओळखलेत? " ती हलकेच हसली. पण तिला प्रश्न विचारणाऱ्या होम्सच्या चेहऱ्यावर उत्तरादाखल हसू काही उमटले नाही.

"मला आता वरचा मजला तपासून पहायचाय̱. घराच्या अंगणाची आणि परसाची तपासणी अजूनही थोडी बाकी आहे. पण मला वाटते, आधी या खालच्या खिडक्या आपण तपासून पाहू या! "

असे म्हणून तरातरा चालत तो एकेका खिडकीपाशी गेला. फक्त हॉलमधून तबेल्याकडच्या गल्लीत उघडणाऱ्या खिडकीपाशी तो थांबला. ती खिडकी उघडून आपल्या मोठ्या भिंगातून त्याने बराच वेळ पाहणी केली. शेवटी एकदाचा तो म्हणाला, "हं. आता वर जाऊ या"

"होल्डरसाहेबांची कपडे बदलण्याची खोली लहानशी आणि साधी होती, खोलीत फार सामानसुमान नव्हते. एक करड्या रंगाचे जाजम, एक मोठे अनेक खणी कपाट आणि एक भला थोरला आरसा एवढ्याच वस्तू तिथे होत्या. त्या कपाटाजवळ जाऊन होम्सने त्याच्या अंगच्या कुलुपाची तपासणी केली.


"हे कपाट उघडायला कुठली किल्ली वापरली होती? "

"आर्थर म्हणाला होता तीच. बाहेरच्या खोलीतल्या कपाटाची किल्ली. "

"ती आहे का इथे? "

"ही काय या आरशाच्या टेबलावर आहे"

आरशाच्या टेबलावरची किल्ली उचलून होम्सने कपाटाचे कुलूप काढले.

""हे कुलूप उघडताना आजिबात आवाज होत नाही. त्याचमुळे तुम्हाला काल रात्री जाग आली नाही. आणि ही त्या मुगुटाचीच पेटी ना? आपल्याला तो मुगूट पाहणे गरजेचे आहे. " असे म्हणत होम्सने ती पेटी उघडली आणि आतला दागिना टेबलावर ठेवला. तो मुगुट म्हणजे अलंकार घडवणाऱ्याच्या कौशल्याचा एक अजोड नमुना होता. आणि त्याच्यावर बसवलेले छत्तीस खडे आजवर मी पाहिलेल्या खड्यांपैकी सर्वोत्कृष्ट होते यात काही वादच नाही. त्याच्या एका बाजूला मात्र एक मोठा चरा गेलेला होता आणि तीन खडे बसवलेला त्याचा एक तुकडा गायब होता.


"होल्डर साहेब, या मुगुटाच्या एका बाजूचा तुकडा हरवलेला आहे तसाच हा भाग आहे. हा बघा इथे हे तीन खडे आहेत. मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही आपल्या हाताने हा भाग तोडावा. "


होल्डर साहेब भीतीने दोन पावले मागे सरकले. "मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही. "

"ठीक आहे. मग मलाच हे केले पाहिजे. " होम्सने आपली सगळी शक्ती एकवटून तो तुकडा तोडायचा जोरदार प्रयत्न केला. पण व्यर्थ.

"तो भाग जरा हलला खरा. ही पाहा ही माझी बोटे. माझ्या बोटांमधे एरवी असते त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती आहे. तरीही हा तुकडा मोडायचा झाला तर मला कितीतरी वेळ शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. मग एखादा साधासुधा माणूस तर हे काम करूच शकणार नाही. आता मला सांगा होल्डरसाहेब, मी जर हा तुकडा तोडलाच तर काय होईल असे तुम्हाला वाटते? इथे बंदुकीतून गोळी झाडल्यासारखा जोरदार आवाज होईल. मग हे सगळे तुमच्यापासून केवळ हाताच्या अंतरावर घडले आणि तुम्हाला काहीसुद्धा ऐकू आले नाही? "

"मला काहीच कळत नाहीये. मी या सगळ्याबद्दल खूपच अंधारात आहे. "

" आपण हा अंधार जमेल तितका कमी करू या. तुम्हाला काय वाटते बाईसाहेब? "

"मीही माझ्या काकांइतकीच गोंधळून गेले आहे. "

"तुम्ही तुमच्या मुलाला पकडलेत तेव्हा त्याच्या पायात चपला - बूट काहीच नव्हते? "

"नाही. त्याच्या अंगावर फक्त शर्ट आणि पायजमा होता. "

"आपले दैव बलवत्तर आहे असेच म्हटले पाहिजे. आणि तरीसुद्धा हा गुंता आपल्याला सोडवता आला नाही, तर आपणच कर्मदरिद्री... होल्डर साहेब, माझे इथले काम झालेय. आता आपली परवानगी असेल तर मी बागेत आणखी काही गोष्टींची तपासणी करतो. "

त्याने आम्हाला घरातच थांबायला सांगितले. बागेत पावलांचे ठसे जितके कमी असतील तितके त्याचे काम सोपे होईल असे त्याचे म्हणणे होते. सुमारे तासभर तो बाहेरच होता. काम संपवून तो आत आला तेव्हा त्याचे पाय बर्फाने भरले होते आणि नेहमीप्रमाणे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कसलाही अंदाज बांधणे अशक्य होते.

"होल्डर साहेब, माझे इथले काम संपले आहे. जे काही बघण्यासारखे होते त्याची पाहणी मी केली आहे. आता पुढचे काम मी माझ्या घरी गेल्यावरच करता येईल. " होम्स म्हणाला.

"पण होम्स साहेब, ते खडे? ते कुठायत? "

"ते काही मी सांगू शकत नाही"

"आता काही ते खडे मला परत मिळायचे नाहीत.. आणि माझ्या मुलाचे काय? मी त्याची आशा करायची का? " होल्डर साहेबांना दुःख असह्य झाले.

"माझं मत अजूनही तेच आहे. "

"मग सांगा तरी काल रात्री माझ्या घरी नेमका काय प्रकार घडला ते? "

"उद्या सकाळी नऊ ते दहा या वेळात तुम्ही माझ्या घरी आलात तर मी त्याबद्दल तुम्हाला नक्की सांगू शकेन. बरं, मला सांगा, ते खडे परत मिळवण्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करायची तुमची तयारी आहे ना? "

"मी अगदी कफल्लक झालो तरी चालेल पण ते खडे परत मिळाले पाहिजेत. "

"हे उत्तम झाले. आता मी बघतो काय करायचे ते. गरज पडली तर आज दुपारी मी पुन्हा येईन तुमच्याकडे. "

काहीतरी अंदाज बांधण्याचे काम होम्सने पूर्ण केलेले होते हे उघड होते. पण हे अंदाज नेमके काय आहेत हे काही मला ओळखता येईना. आमच्या परतीच्या प्रवासात कैक वेळा मी त्याला याबद्दल प्रश्न विचारले. पण दर वेळी तो काहीतरी बोलून विषय एकदम तिसरीकडेच न्यायचा. शेवटी मीच कंटाळून तो नाद सोडला. आम्ही घरी पोचलो तेव्हा तीनचा सुमार होता. घरी आल्या आल्या होम्स घाईने आपल्या खोलीत निघून गेला. आणि काही क्षणातच वेष बदलून खाली आला. त्याने मवाल्याचं बेमालूम सोंग काढलं होतं. आपली कॉलर सरळ उभी करून. त्याने चकचकीत रंगाचा कोट घातलेला होता. गळ्यात लाल रुमाल बांधलेला होता आणि त्याचे बूट मात्र जुनाट होते. तो अगदी नमुनेदार दिसत होता.

"मला वाटते हे जमलेय नीट. वॉटसन, तू माझ्याबरोबर येऊ शकला असतास तर फार बरे झाले असते. पण मी ज्या कामगिरीवर निघालोय त्यामध्ये खरेच आशेला काही जागा आहे का नुसताच मृगजळाचा पाठलाग करावा लागणार आहे हे माझे मलाच सांगता येणार नाही. पण मला ते कळेल लौकरच. मला यायला वेळ लागेल. कदाचित दोनपाच तासही घालवावे लागतील. "

असं म्हणून टेबलावरच्या ब्रेडच्या दोन तुकड्यांचे त्याने सँडविच करून ते आपल्या खिशात टाकत तो आपल्या कामगिरीवर निघून गेला.

माझा दुपारचा चहा नुकताच संपला होता तेव्हा तो परत आला. स्वारी एकदम खुशीत दिसत होती. त्याच्या हातात एक जुनाट इलॅस्टिक लावलेला बूट होता. तो बूट गोल फिरवत फिरवत त्याने खोलीच्या कोपऱ्यापाशी ठेवला. मग टेबलावर बसत त्याने एका कपात चहा ओतून घेतला.

"मी माझ्या कामाला जाता जाता घरी डोकवायला आलो आहे! " तो म्हणाला.

"आता कुठे जाणारेस? "

वेस्ट एंडच्या पलिकडेपर्यंत मजल मारायची आहे. मला यायला चिकार उशीर होईल. त्यामुळे माझी वाट बघत बसू नकोस. "

"तपास कसा चाललाय? "

"मस्त चाल्लाय. मगाशी मी पुन्हा एकदा स्ट्रीटहॅमला जाऊन आलो. पण आत घरी मात्र गेलो नाही. हे प्रकरण छोटे आहे पण फारच रंजक आहे. मी काहीही झाले असते तरी ते माझ्या हातून सुटू दिले नसते. अरे पण मी इथे गप्पा छाटत काय बसलोय! मला हे कपडे बदलून पुन्हा एकदा माझा सभ्य वेष धारण केला पाहिजे"

त्याच्या एकूण आविर्भावाकडे बघून मला असे जाणवत होते, की तो वरवर दाखवतोय त्यापेक्षा मोठे यश त्याला मिळालेय. त्याचे डोळे लुकलुकत होते आणि त्याच्या खोल गेलेल्या, खप्पड गालांवर चमक दिसत होती. तो गडबडीने वर निघून गेला आणि थोड्याच वेळात हॉलचे दार लावून घेतल्याचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या आवाजाने होम्स पुन्हा एकदा आपल्या कामाला निघून गेला आहे हे मी ओळखले.

मी रात्री साडेबारापर्यंत होम्सची वाट बघत बसलो होतो. पण त्याचं घरी परतण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याला ताजा माग लागलेला असला की दिवस रात्रीची फिकीर न करता अनेक दिवस आणि अनेक रात्री तो गायब असायचा. या गोष्टीची मलाही चांगली सवय झाली होती. त्यामुळे जास्त काळजी करायच्या फंदात न पडता मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. होम्सला घरी यायला किती वाजले कोणास ठाऊक! पण सकाळी न्याहारीसाठी मी खाली आलो तर स्वारी प्रसन्न मुद्रेने टेबलावर बसलेली होती. एका हातात कॉफीचा कप आणि एका हातात ताजे वर्तमानपत्र घेऊन दोन्हींचा आस्वाद घेणे चाललेले होते.


"वॉटसन, मी तुझ्यासाठी थांबलो नाही याचा राग मानू नकोस. आपले सावकारबुवा आज सकाळी सकाळीच आपल्याला भेटायला येणारेत हे विसरून चालायचे नाही. " तो मला म्हणाला.

"हो खरेय. अरे, नऊ वाजून गेलेत आणि ही बघ दारावरची घंटा वाजली. तेच आले असणार. "

आलेले पाहुणे म्हणजे आमचे मित्र सावकारबुवाच होते. एका दिवसभरात त्यांच्या चेहऱ्यात पडलेला फरक पाहून मला धक्काच बसला. त्यांची रुंद आणि भारदस्त वाटणारी चर्या आज चिमटली होती आणि पडलेली दिसत होती. त्यांचे केसही अचानक पांढरे झाले होते. काल सकाळी ते जितक्या तावातावाने आमच्याकडे आले होते तितकेच आज ओढगस्तीला लागल्यासारखे स्वतःला ओढत ओढत ते आत आले आणि मी पुढे केलेल्या खुर्चीमध्ये मटकन बसले.

"मी काय पाप केलेय म्हणून हे भोग माझ्या वाटेला आलेत काही कळत नाही. दोन दिवसांपूर्वीपर्यंत मी एक सुखी समाधानी आणि श्रीमंत माणूस होतो. आयुष्यात कसली चिंता नव्हती. आणि आज अचानक मला कुठे तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. या वयात आता मी कशाकशाला तोंड देऊ? संकटेही एकामागून एक येऊन कोसळताहेत माझ्यावर. माझी पुतणी मेरी घर सोडून पळून गेली आहे. "

"पळून गेली? "

"हो. पळून गेली. आज सकाळी आम्ही पाहिले तर तिची खोली रिकामी होती. तिच्या अंथरुणात कोणी झोपल्याच्या काही खुणा नव्हत्या. आणि माझ्यासाठी एका चिठोऱ्यावर एक निरोप लिहिलेला होता. काल रात्री दुःखाच्या भाराखाली दबून जाऊन मी तिला म्हणालो होतो की तिने जर माझ्या पोराशी लग्न केले असते तर आज हा प्रसंग ओढवला नसता. खरे सांगतो हो, मी हे चिडून वगैरे बोललो नव्हतो. बहुतेक असे बोललो ही माझी चूकच झाली. माझ्या त्याच बोलण्याचा तिने यात उल्लेख केलाय. हा बघा-
प्रिय काकासाहेब, माझ्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीत सापडलात आणि मी जर अशी वागले
नसते तर आज परिस्थिती काही वेगळीच असती यात शंका नाही. या सगळ्याला मी कारणीभूत
आहे हा विचार माझ्या डोक्यात आल्यापासून मला तुमच्या छपराखाली राहणे अशक्य झाले आहे.
त्यामुळे मी हे घर कायमचे सोडून जात आहे. माझी काळजी करू नका. माझ्या निर्वाहाची सोय
झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचा
काही उपयोग होणार नाही. आणि ते मला आजिबात आवडणार नाही. -जिवंतपणी आणि
मेल्यावरही कायम तुमच्या ऋणात असणारी तुमची मेरी.

"होम्स साहेब, तुम्हाला काय वाटते, याचा काय अर्थ आहे? मेरीने स्वतःच्या जिवाचे काही बरेवाईट तर केले नसेल ना? "

"छे छे! मला तर वाटतेय की हाच सगळ्यात सोपा उपाय आहे. तुमच्यावर आलेले संकट आता संपल्यात जमा आहे. "

"काय सांगता!! म्हणजे तुम्हाला काहीतरी कळालेय. सांगा लौकर सांगा कुठेयत ते खडे? "

"ते खडे परत मिळवण्यासाठी एकरकमी हजार पौंड भरावे लागले, तर तुमच्यासाठी ती खूप मोठी रक्कम आहे का? "

"अहो मी दहा हजार पौंडास सुद्धा आनंदाने द्यायला तयार आहे"

"एवढ्या पैशांची गरज नाही पडायची. तीन हजार पौंडात ते काम होईल. पण इथे थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. तुम्ही तुमचे चेक बुक आणले असेलच ना? मग मला चार हजार पौंडांचा धनादेश लिहून द्या बरे! "

सावकारबुवानी दिग्मूढ होऊन या रकमेचा धनादेश होम्सच्या हाती दिला. होम्सने आपल्या डेस्काचे झाकण उघडून एक लहानशी पर्स बाहेर काढली आणि त्यातून एक सोन्याचा त्रिकोणी तुकडा बाहेर काढला. त्याच्यावर तीन वैदूर्याचे खडे चमचम करत होते. होम्सने तो तुकडा टेबलावर ठेवला.

एक किंकाळी फोडून सावकारबुवांनी तो तुकडा उचलून घेतला.

"तुम्हाला सापडला हा! मी वाचलो.. मी वाचलो!!! "

तो तुकडा गायब झाल्यावर त्यांना जितकी जोराने दुःखाची उबळ आली होती तेवढाच त्यांचा आनंदही जोरदार होता. त्यांनी दोन्ही हातांनी तो तुकडा उराशी धरून ठेवला होता.

"तुमची देणी अजून संपलेली नाहीत होल्डर साहेब. " होम्स कोरडेपणाने, खरे म्हणजे तुसडेपणाने हे वाक्य म्हणाला.

"देणी" काय रक्कम आहे? सांगा मला. मी लगेच भरतो. " आपल्या पेनाचे टोपण काढत होल्डर म्हणाले.

"नाही या बाबतीत तुम्ही मला नाही देणे लागत. तुमच्या मुलाची तुम्ही क्षमा मागायला हवी. तुमचा मुलगा म्हणजे चोख सोने आहे. हे प्रकरण त्याने इतक्या कौशल्याने हाताळलेय, की देवाने माझ्या नशिबी एखाध्या मुलाचा बाप होणे लिहिले असेल, तर त्याच्यासारखाच मुलगा माझ्या पोटी यावा असे मी देवाकडे मागेन. "

"याचा अर्थ, आर्थरने ते खडे चोरले नाहीत? "

"मी कालही म्हणालो होतो आणि आजही तेच म्हणेन की आर्थर यात संपूर्णपणे निर्दोष आहे. "

"तुम्ही खात्रीने सांगताय? चला मग आपण लगेच आर्थरकडे जाऊ. त्याला सांगू की खरे काय ते आपल्याला कळालेय"
त्याला याची पूर्ण कल्पना आहे. काल हा सगळा गुंता सोडवल्यावर मी पोलीस चौकीत जाऊन त्याला भेटलो. तो आपले तोंड उघडायला तयार झाला नाही. मग मीच झालेला प्रकार त्याला सांगितला. शेवटी त्याला सगळे मान्य करावे लागले. आणि काही मुद्द्यांबद्दल मी स्वतः अंधारात होतो, तेही त्याने स्पष्ट करून सांगितले. आज सकाळी घडलेल्या प्रकारानंतर मात्र तो याबद्दल बोलेल असा माझा अंदाज आहे. "

"हे सगळे काय रहस्य आहे सांगा तरी एकदा मला"

"सांगतो. सगळे सांगतो. शिवाय मी कसा कसा या निष्कर्षांपर्यंत येऊन पोचलो तेही सांगतो. सगळ्यात आधी अशी गोष्ट सांगतो, जी मला सांगायला आणि तुम्हाला ऐकायला अतिशय वेदनादायक आहे. सर जॉर्ज बर्नवेल आणि तुमची पुतणी मेरी यांच्यात संगनमत झालेले होते आणि आता ते दोघेजण एकत्रितपणे फरारी झाले आहेत. "
"मेरी? शक्यच नाही! "

"हे शक्य आहे, नव्हे हेच सत्य आहे. तुम्ही आणि तुमच्या मुलाने आपल्या घराचे दरवाजे बर्नवेलसाठी उघडलेत तेव्हा तो किती उलट्या काळजाचा नराधम आहे याबद्दल तुम्हाला किंचितही कल्पना नव्हती. हा माणूस इंग्लंडमधल्या सगळ्यात धोकादायक माणसांमधे मोडतो. तो अट्टल जुगारी आहे आणि तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अगदी कुठल्याही थराला. त्याच्याजवळ दया नाही, माया नाही. तो अगदी निर्दय आणि निर्ढावलेला बदमाश आहे एक नंबरचा. मेरीला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. आजवर त्याने शेकडो मुलींना आपल्या नादी लावून फसवलेले आहे. मेरीवरही त्याने हाच प्रयोग केला. तिला बिचारीला वाटले, बर्नवेलच्या काळजावर फक्त तिलाच कब्जा करता आलाय. तो तिच्याशी असे काय बोलला देवास ठाऊक, पण मेरी त्याची हस्तक झाली होती. रोज रात्री नियमाने ती बर्नवेलला भेटत असे. "

"हे शक्य नाही. यावर विश्वास ठेवणे शक्य नाही... " होल्डर साहेबांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता.

"ठीक आहे, मग परवा रात्री तुमच्या घरी नेमके काय घडले ते मी तुम्हाला सांगतो. मेरीला वाटले, की तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपला आहात. त्यानंतर ती घराच्या मोठ्या खिडकीत उभी राहून तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत उभ्या असणाऱ्या आपल्या याराशी गप्पा मारत होती. तो इतका वेळ तिथे खिडकीखाली उभा होता, की त्याच्या पावलांचे अगदी स्पष्ट ठसे एवढ्या बर्फातही खिडकीखाली दिसत होते. मेरीने त्या मुगुटाबद्दल त्याला सांगितले. त्याला सोन्याच्या वस्तूंबद्दल फार आकर्षण आहे. त्याने मेरीचे मन वळवले. माझी खात्री आहे की मेरीचा तुमच्यावर खूप जीव होता पण काही मुलींना आपल्या प्रेमपात्रापुढे सगळे जग तुच्छ वाटते. मेरीही त्यातलीच निघाली. काय करायचे हे बर्नवेल मेरीला समजावून सांगत असतानाच तुम्ही खाली आलात. मेरीने घाईघाईने खिडकी लावून घेतली आणि एक पाय लाकडाचा असणाऱ्या आपल्या प्रियकराला भेटायला गेलेल्या तुमच्या मोलकरणीवर सगळे काही ढकलून दिलेन. त्या मोलकरणीचे प्रेमप्रकरण मात्र खरे आहे. "

"तुमचा पोर आर्थर तुमच्याशी वाद झाल्यावर निमूटपणे खोलीत जाऊन झोपला. पण क्लबातल्या देण्यांबद्दलच्या चिंतेमुळे त्याला नीटशी झोपच लागली नाही. मध्यरात्रीच्या सुमाराला त्याच्या कानावर दबक्या पावलांचा आवाज आला. कोणीतरी त्याच्या खोलीच्या दाराबाहेरून जात होते. तो खडबडून जागा झाला आणि त्याने कुतूहलाने बाहेर डोकावून पाहिले. साक्षात आपल्या बहिणीला तिथे बघून त्याला धक्काच बसला. आणि आपली बहीण दबक्या पावलांनी चोरटेपणाने चालत चालत आपल्या वडिलांच्या कपडे करण्याच्या खोलीत गेलेली पाहून तर त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याने घाईघाईने हाताला आले ते कपडे अंगावर चढवले आणि हा सगळा काय प्रकार आहे ते शोधून काढायच्या उदेशाने अंधारात जाऊन उभा राहिला. काही वेळातच मेरी तुमच्या कपडे करण्याच्या खोलीतून बाहेर आली. बोळकांडीतल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात तिच्या हातात तो अमूल्य मुगूट आर्थरला दिसला. भयाने आर्थरचा थरकांप झाला. त्याही अवस्थेत त्याने मेरीचा पाठलाग केला आणि तुमच्या खोलीच्या दाराबाहेर लावलेल्या पडद्याच्या आडोशाने तो पुढे काय होते ते बघायला उभा राहिला. तिथून खालच्या हॉलमधले दृश्य त्याला दिसत होते. मेरी चोरट्या पावलांनी जिना उतरून खाली गेली. तिने आवाज न होऊ देता हॉलची मोठी खिडकी उघडली आणि बाहेर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात तो मुगूट सोपवला. मग तिने पुन्हा हळुवारपणे खिडकी लावून घेतली आणि ती आपल्या खोलीत परत गेली. तिच्या वाटेत अगदी जवळच पडद्यामागे उभ्या असलेल्या आर्थरने हा सगळा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. "

"आर्थरचा मेरीवर जीव होता आणि ती आपल्या खोलीत पोचण्यापूर्वी जर त्याने काही हालचाल केली असती, तर तिची चोरी उघडकीला आली असती. आर्थरला हे नको होते. पण ज्या क्षणी मेरी सुखरूप आपल्या खोलीत पोचली त्या क्षणी आर्थरला झाल्या प्रसंगाची जाणीव झाली. हे सगळे प्रकरण तुमच्या दृष्टीने किती भयंकर होते आणि ते वेळीच निस्तरणे किती गरजेचे होते हे त्याला कळून चुकले. तो तसाच अनवाणी पावलांनी खाली धावला, खिडकी उघडून त्याने रस्त्यावर उडी मारली आणि तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत साचलेल्या बर्फातून धावत सुटला. चांदण्यात त्याला एक काळी आकृती त्या आळीमध्ये चालताना दिसत होती. सर जॉर्ज बर्नवेलने पळून जायचा प्रयत्न केला पण आर्थरने त्याला गाठलेन. दोघांची मारामारी जुंपली. एका बाजूने तुमचा पोर आणि दुसऱ्या बाजूने बर्नवेल अशा दोघांनी त्या मुगुटाची खेचाखेची सुरू केली. या मारामारीमध्ये आर्थरचा जोराचा फटका बर्नवेलच्या डोळ्यावर बसला आणि त्याच्या जखमेतून रक्त वहायला लागले. अचानक कसलातरी आवाज झाला आणि सगळाच्या सगळा मुगूट आर्थरच्या हातात आला. मुगूट हातात आल्याअल्या आर्थर उलटपावली घरी आला, खिडकी लावलीन आणि जिना चढून तुमच्या खोलीत शिरला. तुमच्या खोलीत आल्यावर त्याच्या लक्षात आलं की या मारामारीमध्ये तो मुगूट पिळवटला आहे आणि मुगूट सरळ करायला तो धडपडत असतानाच तुम्ही खोलीत प्रवेश केलात. "

"असे घडू शकते? " सावकारबुवांना धाप लागली होती.

"तुम्ही पुढे होऊन त्याची पाठ थोपटायला हवी, त्याचे मनापासून आभार मानायला हवेत अशी त्याची अपेक्षा असताना तुम्ही त्याला नावे ठेवायला सुरुवात केल्यावर तो खूप संतापला. या प्रकरणातला खरा चोर कोण आहे हे सांगितल्याशिवाय तो खरी गोष्ट तुम्हाला सांगू शकत नव्हता. मेरीसाठी त्याने एवढे बलिदान द्यावे अशी खरोखरी तिची लायकी नाही. पण आर्थरने मात्र मोठ्या शूरपणाने परिस्थितीला तोंड दिले आणि मेरीचे नाव फुटू दिले नाही. "

"मुगूट पाहून मेरी किंचाळली आणि बेशुद्ध पडली त्याचे कारण हे होते होय! अरे देवा!! डोळे असून आंधळा आणि इतका शतमूर्ख माझ्याइतका मीच असेन बहुतेक. आणि तो बिचारा पोर पाच मिनिटांसाठी बाहेर जाऊ द्या म्हणत होता ते मारामारीच्या जागी तो तुकडा पडा असेल तर शोधायला. मी माझ्या पोराशी फारच क्रूरपणे वागलोय. त्याच्यावर फार मोठा अन्याय केला आहे मी" सावकारबुवा हताश होऊन म्हणाले.

होम्सने बोलायला सुरुवात केली. "मी जेव्हा काल सकाळी तुमच्या घरी आलो, तेव्हा मी घराच्या आवारात साठलेल्या बर्फामध्ये चौफेर फेरी मारून कुठे पावलांचे ठसे दिसतात का ते शोधत होतो. अगदी डोळ्यात तेल घालून मी ही तपासणी केली कारण हे पावलांचे ठसे फार उपयोगी ठरणार होते. शिवाय मला ही गोष्ट निश्चितपणे माहीत होती, की आधल्या दिवशी रात्री नव्याने बर्फ पडलेला नव्हता, पण रात्रीचे तापमान इतपत थंड होते की साठलेले बर्फ वितळून जाऊ शकणार नाही. त्यामुळे बर्फात जर ठसे उमटले असतील तर ते सुरक्षित असायला हवे होते. घराकडे येणाऱ्या फेरीवाल्यांच्या वाटेची मी पाहणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले, की तिथे सगळ्याच ठशांचा चांगलाच गुंताडा झाला होता. त्या वाटेवर, स्वयंपाकघराच्या विरुद्ध दिशेला मला एका बाईच्या पावलांच्या खुणा सापडल्या. त्या बऱ्याच स्पष्ट होत्या. तिथे बर्फात उभी राहून ती बाई एका माणसाशी काही वेळ बोलत होती असे दिसत होते. त्या माणसाच्या पावलांपैकी एक पाऊल आकाराने गोल होते. त्यावरून मी असा निष्कर्ष काढला, की त्याचा एक पाय लाकडाचा असावा. त्या खुणांवरून असेही दिसत होते, की त्यांच्या गप्पांमध्ये काहीतरी व्यत्यय आला असावा. अचानक ती बाई स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली होती. तिच्या चवड्यांकडे स्पष्ट आणि खोल तर टाचेकडे पुसट अशा पाऊलखुणांवरून मी हा निष्कर्ष काढला. तो माणूस थानंतर थोडा वेळ वाट बघत तिथेच उभा होता पण शेवटी तो निघून गेला. तुम्ही आपल्या मोलकरणीबद्दल मला बोलला होतात. मी असा अंदाज बांधला की या खुणा तुमची मोलकरीण आणि तिच्या मित्राच्या असल्या पाहिजेत. आणि माझा अंदाज खरा आहे असे चौकशी केल्यावर आढळून आले. मी जेव्हा बागेची पाहणी केली तेव्हा तिथे बरेच उलटसुलट माग होते. ते पोलिसांचे असणार म्हणून मी तो विषय सोडून दिला. पण मी जेव्हा तबेल्याकडे जाणाऱ्या आळीत पोचलो तेव्हा मात्र बर्फात उमटलेल्या खुणा एक मोठी कहाणीच सांगत होत्या. गुंतागुंतीची आणि भलीथोरली.

तिथे एक बुटांचा माग होता. जाणारा आणि येणारा. शिवाय आणखी एक माग होता. तोही जात आणि येत होता. पण हा दुसरा माग अनवाणी पावलांचा होता. ही गोष्ट पाहिल्यावर मला आनंद झाला कारण हाअनवाणी माणूस म्हणजे तुमचा पोरच असणार होता. बुटांचा माग येत-जात असला, तरी अनवाणी पावले मात्र पळत गेली होती. शिवाय ठिकठिकाणी बुटाच्या ठशावर पावलांचे ठसे होते. याचा अर्थ सरळ होता की बूट घातलेल्या माणसाच्या मागून अनवाणी पावलांनी तुमचा मुलगा धावला होता. पाठलाग करत. बुटांच्या ठशांचा मागोवा घेत घेत मी तुमच्या हॉलच्या मोठ्या खिडकीपाशी येऊन पोचलो. तिथे बूट घातलेला माणूस इतका वेळ बर्फात उभा राहिला होता की तिथले बर्फ विरघळून गेले होते. मग पुन्हा एकदा मी त्या ठशांचा पाठलाग करत उलट दिशेला गेलो. घरापासून साधारण शंभर यार्डांवर जाणारे बुटाचे पाय एकाएकी मागे वळले होते. तिथल्या बर्फात चिखलाची चांगलीच गिचमीड झाली होती. त्यावरून असे वाटत होते की इथे काहीतरी मारामारी झाली आहे. तिथून पुढे थोड्याच अंतरावर रक्ताचे थेंब सांडलेले दिसत होते. ते पाहून या प्रकाराबद्दलचा माझा अंदाज बरोबर असल्याची मला खात्रीच पटली. तिथून पुढे बुटातली पावले फक्त जाताना दिसत होती आणि आणखी पुढे थोडे अंतर गेल्यावर रक्ताचे थेंब सांडल्याची आणखी एक खूण होती. ती पाहिल्यावर बूट घातलेला माणूस जखमी झाला असला पाहिजे हे मी ओळखले. तो माग तसाच हमरस्त्यापर्यंत गेला होता. हमरस्त्याला लागल्यावर मात्र वाटेवरचे बर्फ झाडून टाकलेले होते आणि रस्ता स्वच्छ केलेला दिसत होता त्यामुळे बुटांचे पुढे काय झाले हे काही सांगता आले नसते.

आत घरात आल्यावर हॉलच्या मोठ्या खिडकीची दारे आणि तिची लाकडी चौकट मी माझ्या भिंगातून नीट तपासली. तेव्हा मला असे दिसले की तिथून कोणीतरी बाहेर गेले होते. बाहेरून आत येणाऱ्या ओल्या पावलांचा एक ठसाही मला तिथे सापडला. त्यानंतर काय घडले असेल हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागले. एक माणूस खिडकीबाहेर वाट पाहत उभा होता. घरातल्या एका माणसाने त्याला मुगूट आणून दिला. ही गोष्ट घडताना तुमच्या पोराने प्रत्यक्ष पाहिलीन. त्याने चोराचा पाठलाग केला त्याच्याशी मारामारी केलीन. ते दोघेजण जोर लावून तो मुगूट ओढत होते आणि त्या खेचाखेचीमध्ये दोघांच्या एकत्रित शक्तीचा परिणाम ओऊन तो मुगूट मोडला. पण हे काम दोघांपैकी एकालाही एकट्याला करताच आले नसते. तुमचा मुलगा चोराच्या हातातून मुगूट हिसकावून घेऊन आला आणि त्याचा मोडलेला तुकडा चोरट्याच्या हातात तसाच राहिला. हे एवढे सगळे स्वच्छ दिसत होते. आता प्रश्न असा होता की हा चोर कोण आणि त्याला मुगूट आणून देणारा त्याचा हस्तक कोण.


मी नेहमीच असे मानत आलेलो आहे, की हातात असलेल्या शक्यतांपैकी ज्या घडू शकत नाहीत अशा गोष्टी वगळल्यानंतर, जे काही उरेल ते कितीही अशक्य कोटीतले वाटले, तरीही तेच सत्य असते. तुम्ही स्वतःहून त्या चोराला मुगूट आणून दिला नसतात हे मला ठाऊक होते. राहता राहिल्या तुमच्या मोलकरणी आणि तुमची पुतणी. आता, जर तुमच्या मोलकरणींपैकी एखादीने घरात चोरी केली असती तर तिला वाचवायला आपला बळी देण्याचे आर्थरला काय कारण होते? पण आर्थरचे मेरीवर प्रेम होते. त्यामुळे तिच्या रक्षणासाठी आर्थर पुढे सरसावला हे अगदीच पटण्याजोगे होते. शिवाय मेरीचे बिंग फुटले असते तर तिची छी थू झाली असती त्यामुळे तर आर्थरचे तिला पाठीशी घालणे आणखीनच सयुक्तिक वाटत होते. चोरी झाली त्या रात्री ती खिडकीजवळच उभी होती असे तुम्ही मला सांगितलेत आणि हेही म्हणालात की त्या मुगुटाकडे पाहून ती बेशुद्ध पडली होती. या गोष्टी लक्षात घेतल्यावर मला या बाबतीत नुसतीच शंका न राहता पक्की खात्रीच झाली.

मेरीला तुमच्याबद्दल विलक्षण कृतज्ञता आणि प्रेम वाटत असतानाही ज्याच्य्य्साठी साक्षात तुम्हाला फसवायला ती तयार झाली असा हा माणूस कोण बरे असू शकेल? निश्चितपणे तिचा प्रियकर असणार. तुमच्याबद्दल वाटत असलेल्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम तिला फक्त तिच्या प्रियकराबद्दलच वाटू शकते. तुम्ही म्हणालात की तुमचा जनसंपर्क फार मोठा नाही आणि तुम्हाला मित्रही अगदी मोजकेच आहेत. पण तुमच्या मित्रमंडळात सर जॉर्ज बर्नवेलचा समावेश होता. तो स्त्रियांचा कर्दनकाळ असल्याच्या कहाण्या मी यापूर्वी कैकवेळा ऐकल्या होत्या. याचा अर्थ खिडकीबाहेर बूट घालून उभा असलेला माणूस बर्नवेलच होता. आणि मुगुटाचा तो हरवलेला तुकडाही त्याच्याकडेच मिळाला असता. तुमच्या पोराने बर्नवेलला मुद्देमालासहित पकडले असले, तरी आपल्या घराण्याची बेअब्रू होण्याच्या भीतीने तो तोंड शिवून बसेल हे बर्नवेलला पुरेपूर माहीत होते. त्यामुळे आपल्याला काहीच धोका नाही अशी त्याने स्वतःची समजूत करून घेतली होती.

एवढा उलगडा झाल्यावर मी पुढे काय केले असेल याचा अंदाज तुम्ही सहज बांधू शकाल. काल दुपारी मी मवाल्याच्या वेषात बर्नवेलच्या घरी गेलो. थोड्या प्रयत्नांनंतर मी त्याच्या घरगड्याची ओळख काढली. त्या गड्याकडून मला समजले की त्याच्या धन्याच्या डोक्याला आधल्या दिवशी रात्रीच एक जखम झाली होती. शेवटी बर्नवेलचे जुने बूट मी सहा शिलिंग देऊन विकत मिळवले. मग मी पुन्हा एकदा तुमच्या घरापाशी येऊन बर्फातले ठसे त्याच बुटांचे असल्याची खात्री करून घेतली. "

"तरीच, काल एक विचित्र कपडे घातलेला माणूस माझ्या घराभोवती फिरताना दिसला मला... "

"अगदी बरोबर! तो माणूस म्हणजे मीच होतो. मी ज्या माणसाच्या शोधात होतो तो मला सापडला आहे याबद्दल खात्री झाल्यावर मी घरी परतलो आणि पुन्हा एकदा माझा नेहमीचा, सभ्य माणसाचा वेष धारण केला. झाल्या प्रकाराचा गाजावाजा झाला असता तर चारचौघांत तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरली नसती त्यामुळे पोलिसांची मदत घेता येणार नाही हे मला माहीत होते. पण यामध्ये ददडाखाली अडकलेत ते तुमचे हात ही गोष्ट बर्नवेलसारख्या अट्टल बदमाशापासून लपून राहणार नाही हेही मला पक्के ठाऊक होते. त्यामुळे सगळ्या गोष्टींची हाताळणी काळजीपूर्वक आणि नाजूकपणानेच केली पाहिजे हे मी ओळखले. मी जाऊन बर्नवेलला भेटलो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच, सुरुवातीला त्याने कानावर हात ठेवले. मग मी त्याला घडलेल्या सगळ्या गोष्टी अगदी तपशीलवारपणे सांगितल्या. तेव्हा मात्र मला गुंगारा द्यायच्या बेताने त्याने भिंतीवर लावून ठेवलेले शस्त्र खाली घेतले. मला याचा अंदाज होताच. त्याने माझ्यावर वार करायच्या आत माझे पिस्तूल मी त्याच्या कपाळावर लावले. त्याबरोबर तो एकदम सुतासारखा सरळ झाला. मी त्याला त्याच्याजवळच्या खड्यांसाठी एकरकमी हजार पौंड देऊ केले. हे ऐकल्यावर मात्र त्याला दुःख झालेले दिसले. तो म्हणाला, "मी तीनही खडे फक्त सहाशे पौंडांना विकून बसलो! मीच माझा घात केला... " हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार नाही या बोलीवर मी त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतली. शेवटी हजार पौंडांना मी ते तीनही खडे विकत घेतले, तुमच्या मुलाकडे जाऊन सगळे आलबेल झाल्याची बातमी सांगितली आणि एकदाचा घरी आलो. रात्री झोपायला मला दोन वाजले. एकूणात कालचा दिवस फारच कष्टाचा आणि धकाधकीचा होता. "

"कालच्या दिवसामुळे इंग्लंड एका मोठ्या घोटाळ्यापासून वाचले आहे! " असं म्हणून सावकारबुवा उठून उभे राहिले. "सर, मी तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही. मी तुमची जी कीर्ती ऐकली होती त्यापेक्षाही तुम्ही कितीतरी पटींनी थोर आहात! मी खरंच तुमचा अतिशय ऋणी आहे. आणि आता मात्र जराही वेळ न घालवता मला माझ्या बाळाकडे गेलं पाहिजे. मी फारच वाईट वागलोय त्याच्याशी. त्याची जाऊन आधी क्षमा मागतो. फक्त बिचाऱ्या मेरीसाठी वाईट वाटतं मला. तिचा ठावठिकाणा अगदी तुम्हीसुद्धा सांगू शकणार नाही का? "

"आपण असे नक्की म्हणू शकतो की सध्या ती बर्नवेलबरोबरच असली पाहिजे. आणि तिच्या कर्मांची फळे आज ना उद्या तिला चांगलीच भोगायला लागतील यात शंका नाही" होम्स म्हणाला.

--अदिती
(पौष शु. ४ शके १९३३,
२८ डिसेंबर २०११ )

(सर आर्थर कॉनन डॉइल यांच्या शेरलॉक होम्सच्या साहसकथांपैकी 'द बेरील कॉरोनेट' या कथेचा स्वैर अनुवाद)