पुस्तकायन

Sunday, May 03, 2009

कल्पवृक्ष


मला आठवतही नाही तेंव्हापासून मी गाणी ऐकतेय. 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' पासून ते 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' पर्यंत अनेक गाण्यांनी माझं बालपण सजवलं. गीतरामायणातलं 'सेतू बांधा रे सागरी' ऐकायला खूप आवडायचं. 'देवहो बघा रामलीला ,भूवरी रावणवध झाला' हे गाणं मी 'देवहो पहारा मलीला भूवरी रावणवध झाला' असं म्हणत असे. हे ऐकून बाबांना जाम हसू यायचं पण त्यात काय मोठ्ठा विनोद झाला आहे हे काही माझ्या लक्षात येत नसे. हळूहळू ही सगळी गाणी लिहिणाऱ्या जादुगाराचं नाव ग दि माडगूळकर आहे ही माहिती मिळाली. मी शब्दांशी खेळायला सुरुवात खूप उशीरा केली त्यामुळे गदिमांच्या शब्दांचं गारुड माझ्या मनावर व्हायला अंमळ उशीरच झाला. पण गोरी गोरी पान मुळे मी त्यांच्यावर एक्दम खूश होते हे खरंच. नंतर मात्र, 'असा बालगंधर्व आता न होणे' पासून ते अगदी 'मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड' पर्यंत त्याची अगणित कविता - गाणी ऐकून किती साध्या शब्दात ते किती सहजतेने प्राण ओतत असत हे जाणवलं. त्यांचं लेखन वाचणाऱ्याला फार सोपं पण लिहायला अवघड आहे हे ही जाणवलं. 'जोगिया' कविता वाचल्यावर तर त्यातल्या शब्दांचा अर्थ समजण्याच्याही आधी त्यातल्या शब्दांच्या नादमाधुर्याने मला मोहिनी घातली.

या शब्दप्रभूची जडणघडण कशी झाली असेल याबद्दल मला आदरमिश्रित कुतूहल वाटायचं. इकडेतिकडे वाचलेले त्यांच्याबद्दलचे लेख, प्रतिसरकार - बेचाळीसच्या आंदोलनातला त्यांचा सहभाग, 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' चा उल्लेख , अनेक वर्षांपूर्वी वाचलेला आणि लक्षात राहिलेला गदिमांचाच 'हॅलो मिस्टर डेथ' हा लेख वगरे गोष्टींमधून काही तुकडे मिळत होते. अलिकडेच विद्या माडगूळकरांचं आत्मचरित्र वाचलं तेंव्हा गदिमांबद्दल बरंच काही समजलं. तरीसुद्धा हे सगळं कडेकडेनेच चाललं होतं असं वाटायचं. पण परवा गदिमांचंच वाटेवरल्या सावल्या हे पुस्तक वाचलं तेंव्हा या शब्दप्रभूची घडण त्याच्याच शब्दांत वाचायला मिळाली.

एका दिवाळी अंकात लिहिलेला बालपणाबद्दलचा प्रदीर्घ लेख आणि एका मासिकातली लेखमाला यांचं हे पुस्तकरूप संकलन. पण वाचताना तसं जाणवतही नाही. पुस्तक वाचून झाल्यावर जाणवते ती परमेश्वर नावाच्या एका वेड्या कुंभाराची गदिमा नावाचा एक मातीचा गोळा हाती घेऊन, त्याला अमृतकुंभाचा आकार देऊन जीवनरूपी भट्टीत रसरशीत तापवून पक्कं भाजून काढण्याची कारागिरी! आता कुंभारच परमेशवरासारखा सर्व प्रतिभेचा धनी म्हटल्यावर हा अमृतकुंभ अमृताने कसा ओतप्रोत भरला आणि अक्षय उरला हे सर्वश्रुतच आहे. आपल्याकडे कडू पाने असणाऱ्या निंबाला त्याच्या दैवी गुणांमुळे अमृतवृक्षाची उपमा दिली जाते. गदिमा हा असा निंबवृक्ष होता ज्याची पानेफुलेफळे मुळीच कडू नव्हती. ती अमृताचाच वर्षाव करीत असत. जणू काही कल्पवृक्षच! घडणीच्या काळात गदिमांनी जितकी आग पचवली तितक्याच सुखद शब्दचांदण्याचा वर्षाव त्यांनी नंतरच्या आयुष्यात केला.

डावखुरी माणसं तशी आपल्याकडे दुर्मिळच. त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रभावी असल्यामुळे त्यांची प्रतिभा वेगळीच आणि अनपेक्षित उंची गाठताना बरेच वेळा दिसते. शिवाय आपल्याकडे मारून मुटकून सर्व व्यवहार उजव्या हातानेच करायचा दंडक असल्याने या डावखुऱ्या लोकांना काही अंशी सव्यसाचित्व प्राप्त होत असावं. गदिमांच्या मातुःश्री डावखुऱ्या होत्या. जात्यावर बसल्याबसल्या त्या सहज ओव्या रचीत असत. शब्द आणि अर्थचमत्कृतींनी भरलेले अनेक म्हणी - वाक्प्रचार त्यांना मुखोद्गत होते असं गदिमांनीच कुठेतरी लिहून ठेवलंय. अशा मातेकडून गदिमांना कवित्वाचा, प्रसादगुणाचा आणि सहज साधं पण कसदार साहित्य निर्माण करण्याचा वारसा मिळाला. वडील बिचारे स्वभावाने गरीब आणि चाकरमाने. घरच्या कुलकर्णीपदापेक्षा पंतसचिव सरकारकडे कारकुनाची नोकरी करून प्रपंचाला हातभार लावणे त्यांना अधिक योग्य वाटले. पण वडील स्वभावाने अत्यंत प्रेमळ होते. शालेय वयात , कागद हवेत म्हणून हटून बसलो असताना आपल्याकडे लक्ष दिले नाही म्हणून कचेरीत सर्वांसमक्ष तिथला रूळ उचलून गदिमांनी वडिलांना मारले होते. आता वडील आपला चांगला समाचार घेणार अशा भीतीने घाबरून घरी स्वयंपाक करून ठेवला होता. वडिलांना मात्र तो रूळ स्मरणात देखील नव्हता. उलट मुलाने स्वयंपाक केला याचेच कोण कौतुक! गदिमांच्या बिटाकाकाने मात्र एकदोनदा त्यांना चांगला चोप दिला होता. मग त्यांच्या मातेने दिराची चांगली कानउघडणी केली होती. पण या काकाचा आपल्या पुतण्यावर फार जीव होता. या काकाबद्दल गदिमांनी अगदी गहिवरून लिहिले आहे. हा काका , काका व्हायच्या ऐवजी मोठा भाऊच झाला असता तर बरे झाले असते असेही त्यांनी लिहिले आहे.

त्यांच्या वडिलांची आई वेडी होती. म्हणजे ती स्वतःच स्वतःशी बडबडायची आणि आपल्या सुनेला घाबरायची. पण तिचेही गदिमांवर फार प्रेम होते. त्यांचे आजोबा म्हणजे माडगूळचे वतनदार कुलकर्णी. अंगाने चांगलेच भारदस्त. घोड्यावर मांड ठोकून फिरायचे तेंव्हा लोक घाबरायचे, त्यांची पंचक्रोशीत बाबा बामण या नावाने ख्याती होती. आपली जरब आपल्या अपत्यांपैकी कुणाकडेच नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना लौकर एक नातू हवा होता. कुलकर्णीपदाला वारस म्हणून. आजोळचे आजोबा म्हणजे शेजारच्या शेटफळे गावचे. या गावात कुलकर्णीपदावर माणूस टिकत नसे. नवा माणूस नेमला की वर्षाच्या आत त्याचा खून होत असे. अशा परिस्थितीमध्ये शेजारधर्म म्हणून गावचं कुलकर्णीपण करणाऱे हे दुसरे आजोबाही अगदी धीराचेच होते. या अशा सर्व व्यक्तिमत्वांकडून अनेक गुणावगुणांचा मिळालेला वारसा पेलून, जपून त्याला आपलं असं रूप देऊन गदिमा घडले. औंध संस्थानात आडबाजूला असलेल्या माडगूळच्या सातारी बाजाच्या मातीवर पोसलेल्या गदिमांवर या मातीचे संस्कार खोलवर झाले.

आपल्याला आपल्यासारखाच खमका नातू व्हावा अशी इच्छा असलेल्या आजोबांनी पहिली नात झाल्यावरही आशा सोडली नाही. उलट त्या नातीला ते विठ्ठलपंत अशी हाक मारत असत. दुसरा नातू जन्मतःच देवाघरी गेला. तिसऱ्या खेपेला आजोबांची गाठ गदिमांशी पडली आपल्या मिस्कील स्वभावाची चुणूक पाळण्यात पडायच्याही आधीपासून दाखावायची म्हणून की काय पण गदिमा रडलेच नाहीत. याही खेपेला अपयश आलेले पाहून, त्या नवजात बाळाला पुरायला जमिनीत खड्डाही खणला होता. ऐन वेळी सुईणीला सुबुद्धी झाली आणि तिने एक जळता निखारा बाळाच्या बेंबीजवळ नेला. बाळाने एकदम टाहो फोडला. आजोबांची इच्छा अखेरीस पूर्ण झाली. त्यांना तिन्ही लोकी झेंडा लावणारा त्यांच्यासारखा गुंडा नातू मिळाला. त्या वेळी त्या सुईणीला बुद्धी झाली नसती तर काय झाले असते या विचारानेही काळजाचा थरकाप होतो. पण नातू झाला मूळ नक्षत्रावर. केलेली शांत फळली नाही आणि दीड वर्षाच्या आत आजोबा देवाघरी गेले.

आजोबांबरोबर घरातील चांगली परिस्थितीही संपली. घरात वेडी आजी, बिटाकाका, आई, आक्का आणि गदिमा. वडील औंध सरकारच्या नोकरीत कुंडलला. लाडाकोडाचा नातू म्हणून गदिमा विलक्षण हट्टीपणा करत असत. मनाला येईल त्या गोष्टीचा हट्ट घ्यायचा आणि तो पुरा होईपर्यंत शांत बसायचे नाही अशा प्रकाराने त्यांनी घरातल्याच काय पण शेजारपाजारच्याही लोकांना सळो की पळो करून सोडले होते. घराच्या अंगणात बसून आक्काबरोबर मोठमोठ्याने 'बाळ गंगाधर टिळक!' असे ओरडण्याचा खेळ खेळणाऱ्या बाल गदिमांचे वर्णन डोळ्यासमोर अगदी चित्र उभेच करते आणि हसू आल्याखेरीज राहत नाही. मानेवर गळवे होणे, खांबावर धडकल्याने ती फुटणे, अवजड ट्रंक उचलायच्या नादात पायाला जखम होणे, ती चिघळणे असे अनेक 'पराक्रम' गदिमांनी या काळात केले. ही पायावरची जखम चिघळलेली असताना रात्री उखळ भरून तूपसाखर खायचा हट्ट करण्याचा प्रसंग वाचताना गदिमांच्या मातेची या सगळ्यात किती तारांबळ उडत असेल याचा विचार येऊन खूप वाईट वाटले. रात्री अपरात्री उठून भलभलते हट्ट करणाऱ्या मुलाच्या मागण्या त्या माऊलीने न थकता पुरवल्या. त्या फंदात तिलाही अनेकदा अपघात झाले. जखमा झाल्या.

आटपाडीजवळच्या गावी वडिलांकडे असताना, घरासमोरच्या ओढ्याच्या डोहात गदिमा बुडाले. त्यांना बिटाकाकाने आणि घरमालकाने शिताफीने वाचवले. हा प्रसंग लिहिताना त्यांनी घराच्या बुरुजामध्ये पिंपळाखाली कसलेसे देऊळ होते असा उल्लेख केला आहे. नुकतीच मुंज झालेल्या मुलाला पिंपळासमोरच्याच डोहात बुडून मृत्यू आल्यातच जमा होता हा संदर्भ वाचला की उगाचच काहीतरी गूढ वाटतं. आपल्या घरी जेवायला आलेल्या एका दशग्रंथी ब्राह्मणाने, तुझ्या मुलाच्या रूपाने तुझा कर्तृत्ववान पूर्वज तुझ्या पोटी आला आहे तेंव्हा त्याला कधीही मारू नकोस असे आपल्या आईला सांगितल्याचाही यात उल्लेख आहे. खरेखोटे देवाला ठाऊक, पण जन्माने त्रिज असणाऱ्या गदिमांच्यामध्ये काहीतरी विलक्षण असणार खासच असं वाटत राहतं.

अक्षरओळख, आधी वांडपणामुळे शाळेकडे केलेलं दुर्लक्ष, नंतर मात्र अभ्यासाची, विशेषतः पुस्ती काढण्याची लागलेली गोडी, घटवून सुंदर केलेले हस्ताक्षर, वर्गातल्या मुलांच्या गमतीजमतीही अधूनमधून वाचायला मिळतात. देव भक्तावर प्रसन्न होऊन त्याला खूप संपत्ती देतो अशा आशयाची एक कथा एकदा त्यांच्या वाचनात/ऐकण्यात आली. आपल्यावरही अशी कृपा व्हावी आणि घरातली पैशाची चणचण मिटावी अशा आशेने मारुती, विष्णू , शंकर इ. मातब्बर मंडळींकडे वशिला लावल्याचं त्यांनी लिहिलं आहे. मूळ कथा अरबी असल्यामुळे, अरबांचा म्हणजे मुसलमानांचा देव - अल्ला , याच्याकडे अशी कृपा करायची काहीतरी सिद्धीबिद्धी असणार असा अंदाज बांधून , आसपास कोणी नाही असे बघून गावातल्या मशिदीलाही आपण बाहेरून एक नमस्कार ठोकत होतो असेही गदिमांनी लिहिले आहे ते वाचताना फारच गंमत वाटली.

यानंतर मात्र घरातली आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली. आक्काच्या लग्नात वडिलांना कर्ज झाले. अनेक प्रयत्न करूनही बिटाकाका सातवीची परीक्षा पास होऊशकला नाही त्यामुळे त्याच्याही नोकरीचे काम होईना. घरातली खाणारी तोंडे वाढल्यामुळे वडिलांच्या पगारात घरखर्च चालणे अवघड होऊन बसले. तशातच वडिलांची कुंडलला बदली झाली. अठराविश्वे दारिद्र्य मराठी साहित्याला नवे नाही. साधारण गेल्या दीडेकशे वर्षांमध्ये अशा दारिद्र्यातून बाहेर पडायचं हाच विचार अनेक चरित्रनायकांना जगायची ( आणि म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायची! ) प्रेरणा देत आला आहे असं दिसतं. उणीव असते तेंव्हाच जाणीव निर्माण होते असं माझी आई नेहमी म्हणते. ही जाणीव चांगली जोरकसपणे निर्माण व्हावी इतपत उणीव तेंव्हा गदिमांच्या घरात होती. तिचं वर्णन वाचताना डोळ्यांत पाणी येतं. घर म्हणून घेतलेली जागा जेमतेम एका खोलीची. त्यात अक्षरशः कोंड्याचा मांडा करून जगणारे कुटुंब, त्यांची गावात होणारी अवहेलना, मुलांचा अंगावर कोट नाही म्हणून मास्तरांनी दिलेला चोप घरी सांगणार कसा ही विवंचना, त्यात प्लेगाची साथ, वडिलांचा दमा हे सगळं वाचताना खरंच रडू फुटतं.
पण याच काळात गावाबाहेर खेळताना शेजारच्या किर्लोस्करवाडीला कधीतरी पाहिलेलं नाटक खेळायचा विचार गदिमांच्या डोक्यात आला. सगळे सवंगडी या नव्या खेळाला तयार झाल्यावर गदिमांनी रामायण - महाभारत - पुराणांमधले प्रसंग घेऊन हाहा म्हणता संवाद लिहिले आणि ते बसवून नाटक नाटक खेळताना आलेली गंमत मनोरंजक आहे. पुराणातले प्रसंग कमी पडायला लागल्यावर त्यांनी सद्यस्थितीवरही संवाद लिहिले होते. त्यातले काही गुपचूप एका मासिकात पाठवल्यावर छापूनही आले होते. शाळेच्या नव्या इमारतीत हट्टाने एक स्टेज बांधून औंध सरकारांसमोर गडकऱ्यांचे एक नाटकही (बहुधा राजसंन्यास ) या मुलांनी सादर केले होते. गावातल्या एका नाटकवेड्या माणसाने हे नाटक बसवले होते. पण शेवटच्या अंकात स्टेजवर मरून पडलेले एक पात्र पडदा पडला असे समजून पददा पडायच्या आधीच उठले आणि त्या अतिकरुण प्रसांगाचा अतिविनोदी प्रसंग मात्र झाला. आपण नट व्हावे आणि अभिनय अरावा ही ओढ बहुधा या प्रसंगापासूनच त्यांच्यात निर्माण झाली. पुढे त्यांच्या पहिल्यावहिल्या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांनी "गडकऱ्यांचा वारस आज आपल्याला लाभला आहे, त्याचं नाव गजानन दिगंबर माडगूळकर! " अशी ओळख करून दिली होती तो प्रसंग वाचताना गडकऱ्यांचे संस्कार इतक्या लहान वयापासून त्यांच्यावर झाले होते हे नकळत आठवलं. त्याच प्रसंगी, लोकांनी आग्रह केल्यावर, "माझ्यात आणि गडकऱ्यांच्यात एकच साम्य आहे ते म्हणजे आम्ही दोघेही सभेत भाषण करायला फार भितो! " असे हजरजबाबी उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली होती .

हे सगळे वर्णन एका दीर्घलेखातले आहे त्यामुळे त्यात आणखी तपशील वाचायला मिळाले असते तर किती मजा आली असती असेही वाटते. वेड्या आजीचा दारुण मृत्यू, त्यानंतर आजारपणामुळे मृत्यूच्या दारात उभी असलेली आई आणि स्वतः गदिमांचे जिवावरचे आजरपण या रडू फोडणाऱ्या आणखी काही जागा. कडक शिस्तीमुळे ज्या मुख्याध्यापकांची त्यांच्या पाठीवर टिंगल चाले त्याच मुख्याध्यापकांनी स्वतः सायकलवरून किर्लोस्करवाडीला जाऊन गदिमांसाठी औषध आणले. अशाच कडू गोड आठवणींमध्ये बालपणीचीहकीगत संपते आणि सुरू होतो तो चित्रपटक्षेत्रातला उमेदवारीचा प्रवास.

हा प्रवास मात्र फारफार रंजक आहे. ब्रह्मचारी चित्रपटात गदिमांनी एक्स्ट्रॉ म्हणून इतक्या भूमिका केल्या आहेत हे वाचल्यावर तो चित्रपट पुन्हा एकदा नीट बघायची इच्छा निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या एका वाण्याच्या दुकानात रात्रापुरती अंग टाकायची सोय आणि एक अंगावर एक दोरीवर अशी एकच कपड्यांची जोडी एवढ्या भांडवलावर ब्रह्मचारी चित्रपटापासून गदिमांनी आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. कुठल्याही उमेदवाराला करावी लागते तशी गर्दीतला एक ते ग दि माडगूळकर इथपर्यंतची वाटचाल खडतरच होती. ( इथे नकळत पुलंची त्यांच्याशी तुलना करावीशी वाटते. गदिमांच्या मानाने पुलंचं बालपण आणि एकूणच आयुष्य सुखवस्तू असावं किंवा पुलंनी आपले पैशाचे हाल फारसे कुठे बोलून दाखवले नसावेत. पण चरित्रनायकांची वगरे टिंगल करण्याइतकी विनोदबुद्धी बाळगून असणाऱ्या पुलंच्या बाबतीत पहिलीच शक्यता जास्त असं मला का कोण जाणे पण वाटतं.... तशीही पुलंनी चित्रपटक्षेत्रात उमेदवारी केली नसावी. नाटकात केली. ते कॉलेजपासून विलक्षण लोकप्रिय होते. त्यांचं शिक्षणही पूर्ण झालं. गदिमांना कॉलेजचं शिक्षण घेता आलं नाही याबद्दल खंत वाटे. एकूण परिस्थितीने पुलं माडगूळकरांपेक्षा उजवेच वाटतात. )

चित्रपटसृष्टीत शिरकाव करून घेतला खरा पण जिचं श्रेय मिळू शकेल अशी एकही भूमिका त्यांना मिळाली नाही. बाबूराव पेंढारकरांसारख्या लोकांचा कृपाप्रसाद मात्र मिळाला. अत्र्यांचा सहवास मिळाला. अत्रे किती सहज आणि सोपी गाणी लिहित ते जवळून बघायला मिळाले. चालीत बांधायला सोपी आणि सहज गुणगुणता येतील असे शब्द असलेली गाणी लिहिण्यासाठी गदिमांनी प्रयत्न केले. आपली शैली बदलली. अक्षर सुरेख असल्यामुळे चित्रपटाच्या पटकथेची कॉपी करायचं काम मिळालं. हळूहळू वर्तमानपत्रांत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी द्यायचे लेख लिहायची संधी मिळू लागली. आधी हा सगळा उद्योग हौशी नट या सदरात असल्यामुळे मोबदल्याच्या नावाने 'पूज्य' असला प्रकार होता. पुढे बाबूराव पेंढारकरांनी चित्रपट कंपनीला ( बहुधा हंस पिक्चर्स ) सांगून पगार देण्याची व्यवस्था करवली. तोवरशि कवण्या करून पैसे मिळवावे लागले. लेखनाचं काम वाढल्यावर गदिमांनी 'आपल्याला एक लेखणी मिळावी ' अशी बाबूरावांकडे विनंती केली. बाबूरावांनी तात्काळ आपल्या खिशाला लावलेले सोन्याचा मुलामा दिलेले पेन काढून दिले. हा प्रसंग वाचताना अंगावर एकदम रोमांच उभे राहतात. कोल्हापूर शहराच्या पावसाळ्याचा काही भरोसा नसल्यामुळे सकाळी भिजत दोन तीन मैल चालत स्टुडिओत जायचे आणि रात्री तसेच भिजत परतायचे असा दिनक्रम चाललेला पाहून बाबूरावांनीच कंपनीच्या नोकराला सांगून एक नवी छत्री गदिमांना देववली.

सुंदर हस्ताक्षरामुळे साक्षात वि. स. खांडेकरांकडे लेखनिक म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यांची पटकथा लिहायची पद्धत मुळातून समजून घेता आली. याच सुमारास राम फडके नावाच्या एका तरूण गायकाशी गदिमांची घट्ट मैत्री जमली. पुलंचीही ओळख साधारण याच सुमारास झाली असावी. पुलं तेंव्हा कॉलेजात असल्याचा उल्लेख आहे. भावी पिढ्यांना आदर्श ठरणारा एक कथा-पटकथा-संवादकार आणि सिद्धहस्त कवी जन्माला घालण्यासाठी जणू काही 'द होल युनिव्हर्स कॉन्स्पायर्ड टुगेदर!' गरिबीतही कविता जगायला बळ देत होत्या. लेखणीची नेट प्रॅक्टिस चांगलीच जोरात सुरू असल्यामुळे हळूहळू ती सिद्धहस्त होत होती. अशाच एका चित्रपटासाठी लिहून दिलेला पोवाडा अकून एच एमव्ही या मतब्बर कंपनीकडून गाणं लिहून देण्याबद्दलची विचारणा झाली. गदिमा- एचएमव्ही प्रवास सुरू झाला. विश्राम बेडेकरांबरोबर दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम करताना त्याच चित्रपटासाठी गाणीही लिहायला मिळाली. एक नाटक रंगभूमीवर आलं. हा सगळा प्रवास खडतर खराच पण तो आश्वासक वाटतो आणि म्हणूनच स्वप्नवत सुद्धा. व्ही शांतारामांसारख्या माणसाबरोबर रामजोशी हा चित्रपट करायला मिळाला आणि गदिमांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या गाडीने पहिला गियर सोडून दुसरा गियर टाकला. वंगण घालून ओव्हरॉयलिंग केलेल्या गाडीसारखी तिने जोमाने जी वाटचाल सुरू केली ती नंतर कधीच न थांबण्यासाठी. हे सगळं वाचताना आपण जादूच्या गालिच्यावरून वेगाने चाललो आहोत आणि खाली घडणाऱ्या घटना थक्क होऊन पाहतो आहोत असंच वाटत राहतं.

हे लेखन एकोणीसशे पन्नास पंचावन्नच्या सुमारासचं असावं असा माझा अंदाज आहे. 'वेदमंत्राहून आम्हा ' पाशी येऊन हा प्रवास संपतो. तो कदाचित आयुष्याच्या रंगमंचावर पुढचे प्रसंग घडायचे होते म्हणून संपला असेल. पण एका अर्थाने गदिमांची मेकिंग इयर्स तिथे संपली आणि हातखंडा प्रयोग सुरू झाले तिथे हा प्रवास संपला आहे. 'द इयर्स ऑफ सफरिंग वेअर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ कॉझ दे मेड मी हू आय ऍम टुडे' असं लिटल मिस सनशाईन सिनेमातलं एक वाक्य आहे. ते किती खरं आहे हे अनुभवाने पटतंच. त्या मापाने गदिमांच्या बेस्ट डेज चा हा आलेख फारच छान उतरला आहे. अत्यंत साधेपणाने, कुठल्याही प्रसंगाचं उदात्तीकरण न करताना , एक सामान्य माणूस म्हणून त्या क्षणी आपल्या मनात काय विचार आले हे त्यांनी ज्या सहजपणे आणि तरीही समर्थपणे लिहिलंय त्याला तोड नाही. त्या अर्थाने स्वतःचा उदोउदो करणाऱ्या इतर आत्मचरित्रांपेक्षा हे पुस्तक एकदम वेगळं आणि जास्त खरं वाटायला लागतं.
माझ्या मस्ट रीड यादीत याचा क्रमांक वरचा आहे.

--अदिती

5 Comments:

Blogger Yawning Dog said...

Chaan olakh karun dili ahe pustakachee - vachavese vatayla lagale ekdum

2:08 AM  
Anonymous Anonymous said...

dhanyavaad!

--aditee

9:51 PM  
Anonymous bhaanasa said...

अदिती, 'गदिमा' मनामनात स्वतःचे खास स्थान बाळगून आहेतच. तुझ्या ह्या दोन्ही लेखांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळाला. हे सारे वाचलेलेच असले तरीही तू छान मांडल्याने वाचतच गेले. आवडले. ' बेस्ट डेज ' पुढच्या मायदेशाच्या भेटीतील खरेदीत अजून एक भर. ( हवेच ह्या यादीत मोडणारे. )

11:38 PM  
Blogger chhotisikahani said...

सुंदर.. खुपच छान..!

10:10 PM  
Blogger Suvarna said...

Hi Aditi,
I agree with u about Mr.Kurian's lifestory.May I tell u 1 thing? After reading this book in June 2008,I alongwith my 7 friends visited Amul Dairy @ Vill.Anand,Gujrat.We met Mr.Kurian, Mrs.Kurian @ their bunglow and had small talk with him.I personaly feel to meet people like this instead of visiting shrines.Since then I have a spl.place for Amul in my heart.

4:47 PM  

Post a Comment

<< Home