पुस्तकायन

Friday, October 28, 2011

जिप्सींचे गाणे

"टाचा जुळवून घ्या. कमरेत वाकू नका. एक दो तीन चार... मॅक्कलो खांदे सरळ ठेव. पोट आत ओढून घे. ताठ उभी राहा. किती वेळा तेच तेच सांगायचं तुला? हं. आता ठीक आहे. चला सगळ्या पहिल्यापासून पुन्हा एकदा सुरू करा. एक दो तीन चार..."

पीटी अत्यंत कंटाळवाणी होती. पण ती तशीच सुरू राहिली. आठवड्याभरात वेगवेगळ्या कारणांसाठी शिक्षा झालेल्या वीस मुली आपापल्या चुकांची भरपाई म्हणून पॅऍटी करत होत्या. खरं तर, शनिवार दुपार ही काय पीटी करायची वेळ असते का? वीसही जणींच लक्ष मिस जेलिंग्जच्या मागे लावलेल्या दोऱ्या, रिंग्ज आणि डबल बार्सच्याही पलिकडे असलेल्या गर्द झाडीकडे आणि नितळ निळ्या आकाशाकडे गेलं आणि वीसही जणींना त्या क्षणी तरी आपल्या वागण्यात चूक झाली असं मनापासून वाटून गेलं.

स्वतः मिस जेलिंग्ज सुद्धा आज जराशी घुश्श्यातच होती. बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशा तिच्या तोंडून सूचना सुटत होत्या . चाळीस मुद्गलांचे व्यायाम अगदी तिच्या इशाऱ्याबरहुकूम चालले होते. पीटीचा पोषाख चढवून ताठपणे उभी असलेली मिस जेलिंग्ज आधीच अंगकाठीने बारीक होती. त्यात उन्हात उभी राहिल्यामुळे तिचे गाल लालबुंद झाले होते. त्यामुळे ती समोरच्या विद्यार्थिनींपैकीच एक वाटत होती. पण लहान दिसत असली तरी तिच्या चेहऱ्यावर निग्रह झळकत होता. लॅटिनच्या शिक्षिका मिस लॉर्ड यांच्यापेक्षाही तिची शिस्त जास्त करडी होती,

"एक – दो – तीन – चार...
पॅटी वॅट! समोर बघ, काही गरज नाही घड्याळ बघायची. मला वाटेल तेव्हाच मी तुम्हाला सोडणार आहे. कदमताल एक दो तीन चार... " शेवटी मुलींचा अगदी अंत पाहिल्यावर एकदाची पीटी संपल्याची घोषणा झाली.
" सावधान. एका रांगेत उभ्या राहा. मुद्गले जागेवर ठेवा. पळा! "

मुलींनी अगदी सुटकेचा निःश्वास टाकला आणि त्या आपापल्या खोल्यांकडे पळाल्या.

पॅराडाईझ ऍलीमधल्या आपल्या खोलीत शिरता शिरता पॅटी म्हणाली, "हुश्श आता फक्त एकच अठवडा राहिलाय पीटी करायचा. "

"मग पीटीला कायमचा रामराम! हुर्रे" आपला हात हवेत नाचवत कॉनी म्हणाली.

"जेली कसली दुष्ट आहे ना! " पॅटी हे वाक्य अशा थाटात म्हणाली की कोणीही याला तात्काळ संमती दिलीच पाहिजे. काही वेळापूर्वी मिळालेल्या तंबीमुळे ती अजूनही धुमसत होती. "जेली इतकी वाईट वागायची नाही. सध्या तिच्या डोक्यात काहीतरी खूळ शिरलंय."

"हल्ली ती जरा जास्तच कडक झालीये खरी. पण तरीही मला ती दुष्ट वगरे नाही हं वाटत. ती कसली भारी आहे. नेहमी उत्साहाने सळसळत असते. " प्रिसिला म्हणाली.

"जेलीला ना कोणीतरी सरळ करायला हवं. तिला वठणीवर आणणारा माणूस तिला भेटायला हवा. " पॅटीचा राग अजूनही शांत झालेला नव्हता.

"तुम्ही दोघी जणी लौकर आवरा बरं का. अर्धाच तास शिल्लक आहे अजून. त्यानंतर मार्टिन बाहेर पडेल गाडी घेऊन. " प्रिसिलानी तयांना आठवण करून दिली.

"मी तयार झालेच... " पॅटी म्हणाली आणि तिने एक काळा थर आपल्या चेहऱ्यावर लावायला सुरुवात केली.

दर वर्षी मे महिन्यामध्ये सेंट उर्सुला शाळेतर्फे एक फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली जात असे. मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही स्पर्धा असे. कालच ही स्पर्धा पार पडली होती. आणि आज दुपारी शाळेतल्या सगळ्या मुली पुन्हा एकदा कालचे पोषाख चढवून गावात फोटो काढायला जायच्या होत्या. ज्या मुलींच्या वेषभूषा वेळखाऊ आणि विचित्र होत्या, त्यांनी शाळेतच सगळी तयारी करून मग चारी बाजूंनी बंद असलेल्या घोडागाडीतून गावात जायचं होतं. ज्यांच्या वेषभूषा साध्या सोप्या होत्या त्या मुली शाळेच्या उघड्या गाडीतून पुढे जाणार होत्या आणि फोटो स्टुडिओमध्येच तयार होणार होत्या.

पॅटी आणि कॉनी दोघी शाळेतच आवरून तयार होणार होत्या कारण त्यांचा मेक-अप हे भलतंच नाजूक प्रकरण होतं. दोघींनी जिप्सी मुलींची सोंगं काढली होती. एखाद्या नाटकातल्यासारखी झुळझुळीत कपडे घालून नव्हे तर खरीखुरी. मळलेले, फाटलेले आणि ठिगळं लावलेले कपडे घालून. (आपले कपडे मळवण्यासाठी त्या दोघी आठवडाभर फॅन्सी ड्रेसच्याच कपड्यांमध्ये आपल्या खोलीचा केर काढत होत्या आणि धूळ पुसत होत्या ) पॅटीने एका पायात तपकिरी स्टॉकिंग घातला होता तर दुसऱ्या पायात पांढरा स्टॉकिंग चढवला होता. त्यात उजव्या पायातल्या स्टॉकिंगला घोट्याच्या वर एक मोठं भोक पडलेलं होतं. कॉनीच्या एका बुटाच्या फाटक्या चवड्यातून तिच्या पायाची बोटं बाहेर आली होती आणि दुसऱ्या बुटाची टाच गायब असल्यामुळे तो फटाक फटाक वाजत होता. दोघींचे केस भरपूर विस्कटले होते आणि चेहऱ्यावर थापलेल्या काळ्या रोगणाला चिरा गेल्या होत्या. दोघीही अगदी खऱ्या जिप्सींसारख्याच दिसत होत्या.

दोघींनी घाईघाईने आपापले पोषाख चढवले. कॉनीने हातात एक खंजिरी घेतली होती. पॅटीच्या हातात एक जुनाट पत्त्यांचा कॅट होता. आपल्या खोलीच्या मागच्या दारातून पत्र्याच्या छपराखालून त्या खालच्या हॉलमध्ये आल्या. तिथे त्यांची गाठ मिस जेलिंग्जशी पडली. तिने मलमलीचा झुळझुळीत झगा घातला होता आणि तिची चर्या प्रसन्न दिसत होती. घड्याळ बघू दिलं नाही याबद्दल असलेला ’जेली’वरचा आपला राग पॅटी एव्हाना विसरून गेली होती. ती फार काळ अशा गोष्टींचा विचार करत बसत नसे.

"बाय, माज्या हातावं चार पैकं टाका. तुमचं भोविष्य सांगतू... "

पॅटीने पीटीच्या बाईंपुढे आपला गुलाबी परकर नाचवला आणि आपला काळा काळा झालेला , मळलेला हात पुढे केला.

"अगदी झ्याक भौष्य सांगतू बगा. येक देकना तरून किनई.... "कॉनी खंजिरी वाजवत वाजवत म्हणाली.

"कार्ट्यांनो, काय अवतार करून ठेवलायत हा... आणि हे तोंडाला काय लावलंय? " त्यांच्या खांद्याला धरून दोघींनाही गोल फिरवत मिस जेलिंग्ज म्हणाली.

"कोरी कॉफी.... "

मिस जेलिंग्ज जोरजोरात हसायला लागली.

"तुम्ही दोघींनी शाळेचं नाकच कापून टाकलंयत, आता जर तुम्ही एखाद्या पोलिसाच्या हातात सापडलात ना तर घुसखोर म्हणून पकडून नेईल तुम्हाला तो. " ती म्हणाली.

" ए पॅटी, कॉनी... लौकर या. गाडी निघाली आहे... " आपल्या हातातलं पातेलं जोरजोराने हलवत प्रिसिलाने त्यांना हाक मारली. खूप उशीरापर्यंत कुठलं सोंग काढायचं हे न ठरवता आल्यामुळे प्रिसिलाने सेंट लॉरेन्सचा वेष केला होता. तिने अंगभर एक पांढरी चादर गुंडाळली होती आणि स्वयंपाकघरातलं मोठं पातेलं हातात घेतलेलं होतं.

"त्यांना थांबायला सांग. आम्ही आलोच.... " पॅटी धावत सुटली.

"पॅटी, तुझा कोट नाही का घेतलास? " कॉनी म्हणाली.

"पळ लौकर. आपल्याला कुठे लागणारेत कोट? "

दोघीजणी घोडागाडीच्या मागून पळत सुटल्या. शाळेचा गाडीवान मार्टिन उशिरा येणाऱ्या मुलींसाठी थांबत नसे. उशिरा येणाऱ्यांनी गाडीमागून पळत जाऊन ती पकडायची असे. पॅटी आणि कॉनी धावत धावत गाडीच्या मागच्या पायरीवर चढल्या. त्याबरोबर गाडीतून पाचसहा हात बाहेर आले आणि त्या दोघींना आत ओढून घेण्यात आलं.

घोडागाडीतून निघालेला गट फोटोग्राफरकडे पोचला तेव्हा तिथल्या मेकअपच्या खोलीमध्ये एकच गोंधळ सुरू होता. बारा लोक मावतील अशा जागेमध्ये साठ शाळकरी मुलींना उभं केल्यावर हा असा अनेकरंगी गोंधळ माजायचाच ना!

"काजी आणलीयेत का कोणी? "

"थोडी पावडर दे गं मला.. "

"बापरे! माझी सेफ्टीपीन कुठेय? "

"जळलेलं बुच कुठे ठेवलंस गं? "

" ए, माझे केस व्यवस्थित दिसतायत ना? "

"माझ्या पाठीवरची बटणं लावून देतेस का जरा? "

"माझा परकर दिसत नाहीये ना? "

सगळ्या एकाच वेळी बडबडत होत्या आणि कोणीच कोणाचं बोलणं ऐकत नव्हतं.

"शी!! किती उकडतंय इथे! चला आपण जरा बाहेर जाऊ या... "

सेंट लॉरेन्सने दोनही जिप्सी बायकांना हाताला धरून बाहेरच्या रिकाम्या सज्जात नेले. तिथे एक खिडकी होती आणि ती उघडी असल्यामुळे तिथे वाऱ्याची छानशी झुळूक येत होती. एक सुस्कारा सोडून त्या तिघी तिथल्या सहा पायऱ्या चढून गेल्या आणि खिडकीजवळ उभ्या राहिल्या.

"जेलीला काय झालंय हे मला माहितेय.... " पॅटी त्यांचा मागचा विषय पुढे सुरू करत म्हणाली.

"काय झालंय?" "काय झालंय?" दोघीजणी उत्सुकतेने म्हणाल्या.

"आपल्या वीज मंडळाच्या कचेरीत काम करणारा तो लॉरेन्स गिल्रॉय आहे ना, त्याच्याशी जेलीचं भांडण झालंय. पूर्वी नाही का ते दोघे तास न तास गप्पा मारायचे. आणि अलिकडच्या काही दिवसात तो एकदम गायब झालाय. आपल्याला नाताळची सुट्टी होती ना तेव्हा तर तो अगदी रोज नियमाने यायचा. ते दोघं दोघंच फिरायला जायचे. ते दोघंच फिरायला जायचे याबद्दल आपल्या मोठ्या बाईंनी एरवी किती आरडाओरडा केला असता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत माहितेय? आणि मिस जेलिंग्ज त्याच्याशी किती लाडे लाडे वागायची हे तर तुम्ही बघयलाच हवं होतंत. सगळा बावळटपणा नुसता. आयरीन मॅक्क्लोच्या एवढ्याशा चुकीकडे तिचं कमी लक्ष असेल इतकं लक्ष देऊन ती त्याच्याशी वागायची. "

"पण त्याचं काही चुकलं तर त्याला पीटी करावी लागत नसेल. तो हे सगळं कसं काय सहन करतो? " कॉनीचा भाबडा प्रश्न.

"कुठे सहन करतोय... "

"तुला कसं गं माहीत? "

"त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. म्हणजे मी काही मुद्दाम ऐकलं नाही. त्याचं काय झालं, नाताळच्या सुट्टीत एक दिवस मी ग्रंथालयामध्ये बसून ’द मर्डर्स इन द रु मॉर्ग; हे पुस्तक वाचत होते. तेव्हाच मिस जेलिंग्ज आणि मिस्टर गिल्रॉय तिथे आले. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही. आणि सुरुवातीला मीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी पुस्तक वाचण्यात इतकी गुंग झाले होते की बास. मी अशा ठिकाणी पोचले होते, जिथे तो गुप्तहेर म्हणतो ना की इथे तर एका माणसच्या बोटांचा स्पष्ट ठसा उमटला आहे ... पण तेवढ्यात जेली आणि गिल्रॉय यांची जोरजोरात वादावादी सुरू झाली. आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर पडलं. मी काहीच करू शकत नव्हते आणि त्यानंतर मी तिथून बाहेर पडले असते तर मला खूपच शरमल्यासारखं झालं असतं... "

"काय बोलणं झालं त्यांच्यात? " पॅटीच्या कबुलीजवाबांकडे दुर्लक्ष करत कॉनी म्हणाली.

"मला सगळं काही कळलं नाही पण गिल्रॉय तिला काहीतरी समजावून सांगायचा प्रयत्न करत होता आणि मिस जिलिंग्ज त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. ती आपल्याला कशी सांगते -मला सगळं माहितेय. उगाच कारणं देत बसू नका. मी तुम्हाला दहा काळे गुण दिलेले आहेत आणि रविवारी दुपारी जादा कवायत करून तुम्हाला ते भरून काढायचे आहेत.- तशीच ती तयाच्याशी वागत होती, ते दोघं बराच वेळ भांडत होते. दहा पंधरा मिनिटांनंतर दोघांचाही पारा खूप चढला. मग गिल्रॉय आपली हॅट घालून निघून गेला. आणि माझी अशी खात्री आहे की त्या दिवसानंतर तो कधीच परत आला नाही. निदान मी तरी त्याला परत कधी शाळेत आलेलं पाहिलेलं नाही. आणि आता मिस जेलिंग्जला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होतो आहे. आणि म्हणून ती सगळ्यांशी अशी पिसाळलेल्या अस्वलासारखी वागते आहे"

"पण मनात आणलं तर ती किती चांगली वागू शकते... " प्रिसिला म्हणाली.

"वागू शकते. पण ती खूप घमेंडखोर आहे. मला कधीकधी वाटतं गिल्रॉयने एकदा येऊन तिला चांगलं सरळ करावं आणि तिची जागा दाखवावी. " पॅटी म्हणाली.

एव्हाना फोटो घ्यायला सुरुवात झालेली होती त्यामुळे या तिघी जणींची ही गंभीर चर्चा तिथेच थांबली. सुरुवातीला शाळेतल्या सर्व मुलींचा एक ग्रूप फोटो काढण्यात आला. आणि मग मुलींचे छोटे छोटे ग्रूप्स आपले फोटो काढून घ्यायला कॅमेऱ्यासमोर उभे रहायला लागले. ज्या मुली फोटोमध्ये येणार नव्हत्या, त्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला उभ्या राहून इतरांना हसवण्याचं काम करत होत्या.

"मुलींनो, तुम्ही दोन मिनिटं जरा शांत रहाल का? माझ्या तीन प्लेटस वाया गेल्या आहेत. आणि हो. फोटोसाठी उभ्या असलेल्या सन्याशाने आपलं खिदळणं बंद करावं... " फोटोग्राफर वैतागून म्हणाला. "कृपा करून सगळ्यांनी आपापल्या जागेवर स्थिर उभं राहावं आणि कॅमेऱ्याच्या पीप होलकडे बघावं. मी तीन आकडे मोजून फोटो घेणार आहे. एक दोन तीन... "

नुकत्याच घेतलेल्या फोटोची प्लेट घेऊन फोटोग्राफर डार्क रूमकडे पळाला.

आता पॅटी आणि कॉनी असा दोघींचाच फोटो घ्यायचा होता. पण सेंट उर्सुला आणि तिच्या अकरा हजार कुमारी झालेल्या मुलींनी मध्ये घुसून गोंधळ करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की आमची संख्या जास्त आहे त्यामुळे आमचा फोटो आधी काढला पाहिजे. त्यांचा गोंधळ पाहून दोघी जिप्सी बायका निमूटपणे बाजूला उभ्या राहिल्या.

कॅरन हर्से ही सेंट उर्सुला झाली होती तर अकरा लहान मुली मिळून तिच्या अकरा हजार कुमारी झाल्या होत्या. त्या सगळ्यांचा एकत्र फोटो घेण्याल आला.

जेव्हा जिप्सी बायकांचा फोटो घेण्याची दुसऱ्यांदा वेळ आली तेव्हा नेमका पॅटीचा परकर एका खिळ्याला अडकला आणि पुढच्या बाजूने उभा फाटला. निघालेला धांदोटा पॅटीने परिश्रमपूर्वक केलेल्या खऱ्या जिप्सींच्या वेषभूषेच्या हिशोबाने सुद्धा खूप मोठा ठरला असता. त्यामुळे तिला बिचारीला शेजारच्या मेक अप रूम मध्ये जाऊन घाईघाईने एका पांढऱ्या दोऱ्याने तो शिवावा लागला.

शेवटी एकदाच्या दोघी जिप्सी बायका फोटोसाठी उभ्या राहिल्या. फोटोग्राफर स्वतःच एक कलाकार असल्याने त्याने उत्साहाने दोघींना निरनिराळ्या पोझेस सुचवायला सुरुवात केली. या दोघींच्या वेषभूषा खऱ्या जिप्सींच्या खूप जवळ जात असल्यामुळे तो खूश झाला होता. जिप्सी बायका नाचताना, एका कॅनव्हासच्या ढगांच्या पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या अशा वेगवेगळ्या पोझेस मध्ये त्यांचे फोटो काढले. आता फोटोग्राफर त्यांचा तीन दगडांच्या चुलीवर उकळत असलेल्या किटलीच्या पार्श्वभूमीवर फोटो काढायचा या तयारीत होता. तेव्हाच कॉनीच्या एकदम लक्षात आलं की आजूबाजूला एकदम शांतता पसरलेली आहे.

"बापरे, सगळ्या जणी कुठे गेल्या? "

कॉनी धावत जाऊन मेक अप रूम्स मध्ये शोधून आली. तिला एकाच वेळी खूप हसू येत होतं आणि ती गोंधळूनही गेली होती.

"ए पॅटी, आपली घोडागाडी कधीच निघून गेली आहे. दुसऱ्या गाडीतल्या मुली मार्श ऍंड एल्किन्सच्या शेजारी आपली वाट पाहतायत. "

"कसला दुष्टपणा आहे हा सगळा... आपण इथे आत आहोत हे त्यांना माहीत होतं. " आपल्या हातातली लाकडं खाली टाकत पॅटी एकदम उठून उभी राहिली. किटलीवरची धूळ पुसण्यात मग्न असलेल्या फोटोग्राफरला ती म्हणाली, "क्षमा करा, पण आम्हाला गाडी पकडायची आहे आणि त्यासाठी आम्हाला पळावं लागेल."

"ए पॅटी, अगं आपल्याकडे कोट पण नाहीयेत. मिस वर्डस्वर्थ आपल्याला या कपड्यांमध्ये कधीच गाडीत घेणार नाहीत... " कॉनी एकदम म्हणाली.

"पण त्या आपल्याला गावात असं सोडून देऊ शकत नाहीत. त्यांना आपल्याला गाडीत घ्यावंच लागेल. "

त्या दोघी धावतच खाली आल्या आणि खालच्या अंधाऱ्या खोलीतून रस्यावर उतरताना क्षणभर थबकल्या. शनिवार दुपारच्या गर्दीचा लोंढा गावातल्या मुख्य रस्त्यावरून वाहत होता. पण ही थबकायची, बिचकायची किंवा संकोचायची वेळच नव्हती. त्यामुळे दोघींनी मोठ्या शूरपणाने मुख्य रस्त्यावर पाऊल टाकलं.

"ए आई! त्या बघ जिप्सी बायका चालल्या आहेत. " या दोघी बाहेर पडलयावर एक लहान मुलगा आपल्या आईला म्हणाला.

"अरे देवा! मला आपण सर्कशीत काम करायला लागलो आहोत असं वाट्टंय... " कॉनी म्हणाली.

"चल लौकर. " पॅटीने कॉनीचा हात धरला आणि पळायला सुरुवात केली. धापा टाकतच ती म्हणाली. " गाडी तिकडे थांबली आहे. ए थांबा! .. थांऽऽबा... !!!" गाडीतल्या लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिने खंजिरीचा जोरजोरात आवाज केला.

चौकात एक मोठी गाडी उभी होती. त्या गाडीने या मुलींचा रस्ता अडवला. अकरा हजार कुमारींपैकी शेवटची मुलगी शाळेच्या गाडीमध्ये चढली आणि एकदा मागे वळून सुद्धा न बघता गाडी निघाली. बघता बघता ती गाडी एखाद्या ठिपक्याएवढी दिसायला लागली. दोघी जिप्सी बायका चौकात उभ्या राहून नुसत्याच एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या.

"माझ्याकडे एक सेंटही नाहीये. तुझ्याकडे काही पैसे आहेत का? "

"काहीही नाहीत. "

"आता आपण घरी कशा जाणार? "

"मला तर काहीच सुचत नाहीये.. "

पॅटीच्या कोपराला एक झटका जाणवला. तिने वळून पाहिलं तर शाळेच्या देणगीदारांपैकी एक असलेला जॉन ड्र्यू डॉमिनिक मर्फी तिथे उभा होता आणि असुरी आनंदाने त्यांच्याकडे पाहत होता. हा माणूस अगदी तरूण होता आणि योगायोगाने त्याची आणि पॅटीची चांगलीच ओळख होती.

"आम्हाला तुमचा नाच बघायचाय... गाणंही ऐकायचंय"

"या अवतारामुळे निदान आपल्या ओळखीची माणसं तरी आपल्याला ओळखू शकत नाहीयेत हे त्यातल्या त्यात नशीब म्हणायचं" कॉनी स्वतःचीच समजूत घातल्यासारखं म्हणाली.

एव्हाना चौकामध्ये बरीच गर्दी जमा झाली होती. आणि ती वाढतच होती. पायी जाणाऱ्या लोकांना त्या गर्दीतून वाट काढण्यासाठी वाट वाकडी करावी लागत होती.

"आपल्याला गाडीभाड्यापुरते तरी पैसे जमा करावे लागतील आणि त्याला थोडा वेळ लागेल. " पॅटी म्हणाली. तिच्या काळा रंग फासलेल्या चेहऱ्यावर एक मिस्कील छटा उमटली होती. "तू खंजिरी वाजव आणि मी आपला खलाशांचा नाच करते"

"पॅटी तुझं डोकंबिकं फिरलंय का? आठवड्याभराने आपण ग्रॅज्युएट होऊ. त्याच्या आत आपल्याला शाळेतून काढून टाकावं अशी तुझी इच्छा आहे का? " कॉनीने आपल्या मैत्रिणीच्या डोक्यात अक्कल घुसवण्याचा प्रयत्न केला.

आणि पॅटीचं बखोटं धरून तिला रस्त्याला फुटलेल्या फाट्याकडे न्यायला कॉनीने सुरुवात केली. जॉन ड्र्यू मर्फी आणि त्याचे मित्र थोडा वेळ त्यांच्या मागून चालत होते. पण जिप्सी बायकांचा गाण्याबजावण्याचा काही विचार नाही असं पाहून शेवटी ते सगळे निघून गेले.

त्यांच्या मागून चालत असलेली लहान मुलंही परत फिरल्यावर कॉनी म्हणाली "आता काय करायचं आपण? "

"आता आपल्याला चालत जावं लागणारसं दिसतंय"

"छे! हा असला फाटका बूट घालून मी तीन मैल चालत जाऊ शकत नाही.. " आपला फटाक फटाक वाजणारा बूट काढून दाखवत कॉनी म्हणाली.

"चांगलंए. मग काय करूया? "

"आपण फोटोग्राफरकडे जाऊन त्याच्याकडे पैसे उसने मागू या का? "

"मी हे असले भोकं पडलेले स्टॉकिंग्ज घालून मुख्य रस्त्याच्या आसपाससुद्धा फिरकणार नाहीये पुन्हा कधी"

"ठीक आहे. मलाच काहीतरी विचार केला पाहिजे. " खांदे उडवत कॉनी म्हणाली.

आपण गावातल्या घोड्यांच्या तबेल्यातून एक.. "

"पण तो तबेला गावाच्या दुसऱ्या टोकाला आहे. मी तिथवर चालूच शकणार नाही. या फाटक्या टाचेमुळे प्रत्येक पाऊल टाकताना मला माझा पाय दहा दहा इंच उचलून टाकावा लागतोय महितेय? "

"छान. आता तुलाच काही चांगला मार्ग सुचत असेल तर बघ. " आता खांदे उडवायची पॅटीची वेळ आली होती.

"मला वाटतं, सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे एखादी बस पकडायची आणि कंडक्टरला विनंती करायची की पैसे नंतर आणून देतो"

"वा वा. आणि बसमधल्या सगळ्या लोकांसमोर त्याला सांगायचं की आपण सेंट उर्सुला शाळेत शिकतो? रात्र पडण्यापूर्वी ही गोष्ट सगळ्या गावभर होईल आणि मग आपल्या मोठया बाई संतापतील. "

"हम्म! काय करूया मग? "

त्या दोघी उभ्या होत्या तिथे समोरच एक टुमदार घर होतं. घराच्या पुढच्या सोप्यात दोन तीन लहान मुलं खेळत होती. जिप्सी बायकांना पाहून ती मुलं आपला खेळ सोडून बाहेर आली आणि त्यांच्याकडे उत्सुकतेने बघायला लागली.

"चल ना आपण जिप्सींचं गाणं म्हणू या (सध्या हे गाणं सगळ्या शाळेत दुमदुमलं होतं). तू खंजिरी वाजव आणि तुझ्या पायांनी ताल धर. माझा आवाज दहा सेंट मिळवण्याच्या लायकीचा आहे असं मला वाट्टंय. कदाचित ही मुलं आपलं गाणं ऐकून आपल्याला गाडीभाड्यापुरते दहा सेंटस देतील. "

कॉनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडे नजर टाकली. रस्ता निर्मनुष्य होता. शिवाय कोणी पोलीसही आसपास दिसत नव्हता. हताश झाल्यासारखी तिने या बेताला संमती दिली. गाणं सुरू झालं. ऐकणाऱ्या मुलांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हे पाहून दोघी खूश होतायत न होतायत तोच त्या घराचं मुख्य दार उघडून एक बाई बाहेर आली. ती लॅटिन शिकवणाऱ्या लॉर्डबाईंची बहीण होती.

"ए, काय गोंगाट चालवलाय? आधी आवाज बंद करा. घरात आजारी माणसं आहेत.... "

तिच्या आवाजात, बोलण्यातही लॅटिनचा भास होता. कॉनीचे फाटके बूट घालून जितकं जोरात पळणं शक्य होतं तितक्या जोरात त्या दोघी तिथून पळत सुटल्या. त्या घरापासून तीन चार घरं पलिकडे गेल्यावर एका घराच्या बाहेर असलेल्या पायरीवर त्या जराशा टेकल्या आणि त्यांना एकदम जोरजोरात हसूच यायला लागलं.

त्या घराभोवती असलेल्या बागेत एक माणूस लॉन मोअर घेऊन हिरवळ कापत होता. त्याने जोरात या दोघींना हटकलं आणि तिथून हुसकून लावलं. "ए शुक शुक.. चला पळा इथून"

दोघीजणी तिथून उठल्या आणि पुढे चालू लागल्या. खरं तर त्या ज्या दिशेने निघाल्या होत्या, ती गावाची बाजू सेंट उर्सुला शाळेच्या बरोबर विरुद्ध दिशेला होती. पण काय करायचं हे त्यांना सुचत नव्हतं आणि करायला दुसरं काहीच नसल्यासारख्या त्या पुढेपुढेच चालल्या होत्या. अशा प्रकारे आणखी बरंच अंतर चालून गेल्यावर त्या दोघी गावाच्या शिवेवर येऊन पोचल्या. त्यांच्या पुढ्यातच काही छोट्या बैठ्या इमारती होत्या आणि त्यातल्या एकीची चिमणी उंच आकाशात गेली होती. तिथे गावाचा पाणी पुरवठा विभाग आणि वीज मंडळाची कचेरी होती.

कसल्या तरी आशेने पॅटीचे डोळे एकदम लकाकले.

"ए कॉनी, आपण मि. गिल्रॉयला सांगू या का आपल्याला त्याच्या गाडीतून घरी सोडायला? "

"तुझी ओळख आहे का त्याच्याशी? " कॉनीने खात्री करून घेण्याच्या सुरात विचारलं. एव्हाना तिने इतके फटके खाल्ले होते की ती ताकही फुंकून प्यायला लागली होती.

"हो. तो मला चांगलं ओळखतो. नाताळच्या सुट्टीत तो रोज आपल्या शाळेत यायचा. एक दिवस तर आम्ही एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकायचा खेळही खेळलो होतो. चल माझ्याबरोबर. तो नक्की आपल्याला घरी सोडेल. त्या निमित्ताने जेलीशी झालेलं भांडण मिटवायची आयतीच संधी पण मिळेल त्याला. "

पलिकडे 'ऑफिस' अशी पाटी लावलेली एक विटांनी बांधून काढलेली इमारत होती. त्या इमारतीकडे जाणाऱ्या वाटेवरून दोघी चालू लागल्या. ऑफिसमध्ये चार कारकून आणि एक टायपिस्ट मुलगी आपापलं काम करत होते. ऑफिसच्या दारात उभ्या राहिलेल्या दोन जिप्सी बायकांकडे पाहून ते सगळे जण आपलं काम सोडून हसायला लागले. दाराजवळ बसलेल्या कारकुनाने तर आपली खुर्ची फिरवून घेतली आणि तो या मुलींची मजा बघायला लागला.

"हलो! स्त्रियांनो, कुठून प्रकट झालात आपण? "

एकीकडे ती टायपिस्ट मुलगी पॅटीच्या स्टॉकिंग्जला पडलेल्या भोकांबद्दल शेरे मारत होती.

चेहऱ्यावर कॉफी थापलेली असूनही पॅटीचा चेहरा आणखीनच काळवंडला.

"आम्ही मि. गिल्रॉयना भेटायला आलोत. " आबदारपणे पॅटी म्हणाली.

"मि. गिल्रॉय कामात आहेत. तुमचं काय काम आहे ते मला सांगा" कारकुनाने हसू दाबत दाबत म्हटले.

पॅटी निग्रहाने म्हणाली, "कृपा करा आणि मि. गिल्रॉयना सांगा की आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. लौकरात लौकर"

"जरूर. आता सांगतो बाईसाहेब. असं करता का? तुमचं व्हिजिटींग कार्ड माझ्याकडे देता का? " कारकून खोट्या नम्रपणे म्हणाला. या दोन जिप्सी मुलींची चेष्टा करताना त्याला खूपच मजा वाटत होती असं दिसलं.

"आत्ता माझं कार्ड माझ्याकडे नाहीये. पण मि. गिल्रॉयना सांगा की दोन सभ्य स्त्रिया त्यांना भेटायला आल्या आहेत. "

"ठीक आहे बाईसाहेब, तुम्ही असं करा, इथे बसा. मी त्यांना निरोप सांगून येतो. "

त्याने आपली खुर्ची पॅटीला दिली आणि शेजारची एक खुर्ची कॉनीला दिली. मग त्याने खोट्या अदबीने कमरेत वाकून त्यांना सलामी दिली. हा सगळा प्रवेश पाहताना इतर कारकून मनसोक्त हसत होते पण दोघी जिप्सी बायका मात्र खूपच गंभीर झाल्या होत्या. त्या दोघींनी खुर्च्या दिल्याबद्दल त्या कारकुनाचे आभार मानले आणि त्या आपापल्या खुर्चीमध्ये अगदी ताठ बसल्या. त्यांचा सगळा आविर्भाव अगदी अचूक आणि सामाजिक शिष्टाचारांच व्यवस्थित पालन करणारा होता. तो कारकुन या अजब पाहुण्यांच्या आगमनाची वर्दी आपल्या साहेबाला देऊन परत आला तोपर्यंत पॅटीच्या स्टॉकिंग्जबद्दलची चर्चा कॉनीच्या फटाक फटाक वाजणाऱ्या बुटापर्यंत आली होती. परत आल्यावर त्याने पुन्हा एकदा कमरेत झुकून जिप्सी बायकांना अभिवादन केले आणि आपल्या मागून येण्याची त्यांना विनंती केली. त्या दोघी गिल्रॉयच्या खोलीत पोचल्या.

गिल्रॉय काहीतरी लिहीत होता. त्यातून मान वर करून बघायला त्याला थोडासा वेळ लागला. त्याला निरोप देताना कारकुनाने एका शब्दाचाही बदल केला नव्हता. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांकडे पाहून तो चकित झाला. खुर्चीत रेलून बसत त्याने दोघी बायकांना आपादमस्तक न्याहाळून घेतलं आणि विचारलं

"हं ? "

त्याच्या चेहऱ्यावर ओळख पटल्याचं एकही चिन्ह नव्हतं.

पॅटीचा असा बेत होता की आपली खरी ओळख सांगून आपल्याला सेंट उर्सुला शाळेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी गिल्रॉयला विनंती करावी. पण या गोष्टीचा बोभाटा होईल अशी परिस्थिती समोर दिसत असताना ती यातलं काहीच करू शकत नव्हती. समोर आलेल्या प्रश्नांच्या भूलभुलैय्याला तोंड द्यायचं असा तिने निर्णय घेतला आणि संभाषणात अशी काही उडी घेतली की ते पाहून कॉनीला धक्काच बसला.

"त्ये लॉरेन्स के गिल्रॉय त्ये तुमीच म्हनायचे का? म्या तुमालाच शोदायला आलू हाय" आपल्या परकराची खालची टोकं हातात धरून तिने गिल्रॉयला दरबारी प्रणाम केला.

"ते दिसतंच आहे. " गिल्रॉय खोचकपणे म्हणाला. "आता मला शोधत आलाच आहात तर बोला काय काम आहे तुमचं माझ्याकडे? "

"तुम्चं भोविष्य सांगतू... " काल रात्री तिने आणि कॉनीने बसून या गोष्टीचा सराव केला होता. शाळेतल्या मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या त्या सरावाचा चांगला वापर करत पॅटी म्हणाली, "माज्या हातावं चार पैकं टाका"

हा सगळा प्रकार कॉनीला फारसा मंजूर नव्हता पण आता वेळ पडल्यावर तिनेही यात उडी घेतली.

"अगदी झ्याक भौष्य सांगतू बगा! येक सुंदर पोरगी.. " कॉनी तिची री ओढत म्हणाली.

"वा वा"

गिल्रॉयने पुन्हा एकदा या जिप्सी बायकांचं गंभीरपणे निरीक्षण केलं. पण या सगळ्याची त्यालाही आता गंमत वाटायला लागली आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं. "माझं नाव कसं कळलं तुम्हाला? "

खिडकीतून पलिकडची जनित्राची खोली आणि कोळशाचं कोठार दिसत होतं. त्या दोन्ही इमारतींच्या मधून क्षितिजाची रेषा दिसत होती. तिकडे बोट दाखवून पॅटी म्हणाली "जिप्सी लोकांच्या खुना आस्तात. त्या जिपसींना भेटतात. आबलात, बादलात. वादलात... पर तुमाला त्या नाई कळाच्या. लॉरेन्स के गिल्रॉय साब, आमी तुमाला निरोप सांगाया आलू. लाई लांबून आलो बगा" आणि तिने आपल्या आणि कॉनीच्या पावलांची दुर्दशा त्याला दाखवली. "दमलो साब. लांबून आलो आणि दमलो"

गिल्रॉयने खिशात हात घातला आणि अर्ध्या डॉलरची दोन नाणी काढली.

"हं. हे घ्या पैसे. आणि आता मला खरं खरं सांगा. हा कुठला फसवणुकीचा नवा प्रकार आहे? आणि मुळात तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? "

त्याने दिलेले पैसे दोघींनी खिशात टाकले. पुन्हा एकदा आपल्या परकराचं खालचं टोक हातात धरून त्याला दरबारी प्रणाम केला. आणि संकटात पाडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याचं टाळून मोठ्या शिताफीने बगल दिली.

"तुमचं भौष्य सांगतू हा.. " कॉनी एखाद्या विक्रेत्याच्या तत्परतेने म्हणाली. हातातला पत्त्यांचा गड्डा पिसत पिसत तिने खाली जमिनीवर बैठक मारली. मांडी घालून खाली बसल्यावर हातातले पत्ते तिने स्वतःभोवती गोलाकारात पसरले. इकडे पॅटीने आपल्या कॉफीचे डाग पडलेल्या हातांमध्ये गिल्रॉयचा तळहात धरून त्याचं निरीक्षण सुरू केलं. गिल्रॉयला एकदम संकोचायला झालं आणि त्याने आपला हात मागे ओढून घ्यायचा प्रयत्न केला. पण पॅटीची पकड एखाद्या माकडासारखी घट्ट असल्यामुळे तिने मुळीच गिल्रॉअचा हात सोडला नाही.

"मला एक तरुण मुलगी दिसती... " जास्त वेळ न घालवता पॅटी म्हणाली.

कॉनीने पसरलेल्या पत्त्यांमधून बदामाची राणी बाहेर काढली आणि तिच्याकडे बघत बघत ती म्हणाली "उंच, पिवळी क्येसं, बदामी डोले, आक्षी सुंदर... "

"पर तुमाला लई तरास देती. भांडान करती" त्याच्या हातावर आलेल्या लहानश्या फोडाकडे बघत पॅटी म्हणाली.

गिल्रॉयचे डोळे संशयाने बारीक झाले. हा सगळा फालतूपणा आहे हे माहीत असूनही तो यात ओढला जात होता.

"तुमाला ती खूप खूप आवडती. " कॉनी म्हणाली.

"पर तुमाला ती भ्येटत नाय. येक दोन तीन चार म्हैनं जालं बगा तुमची तिची कायबी गाट भेट नाय का बोलनं चालनं नाय" त्याच्या बुचकळ्यात पडलेल्या चेहऱ्याकडे नजर टाकून त्याच्या डोळ्यात बघत पॅटी हळू आवाजात म्हणाली "तुमी रोज तिचाच इच्यार करत आस्ता"

हे ऐकल्यावर त्याने आपला हात ओढून मागे घ्यायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. पॅटी घाईघाईने म्हणाली, "तुमच्याबिगार ती बी दुक्कात हाये. पहिल्यावानी हसत नाय का बोलत नाय"

आता मात्र गिल्रॉयचं कुतूहल प्गारच चाळवलं होतं. आता पुढे काय ऐकायला मिळणार हे पाहण्यासाठी तो हात मागे घेताघेता थबकला.

"ती दुक्कात हाए. तुम्च्यावं चिडली हाए. एकदा भांडान जालं तवाधरनं चार म्हैनं जालं ती तुम्ची वाट बगत बसली हाए. पर तुमी काय परत तिला भेटाया ग्येला न्हाई"

गिल्रॉय अचानक उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला.

त्याचे हे अनाहूत पाहुणे अगदी योग्य क्षण साधून प्रकट झाले होते. दुपारपासून जवळजवळ दोन तास तो याच गोष्टीचा विचार करत होता. आणि आपल्या मोडक्यातोडक्या भाषेमध्ये या जिप्सीं बायकांनी त्याला योग्य ठिकाणी आणून ठेवलं होतं. त्याच्या मनात विचार पुन्हा सुरू झाले. काय करावं? अपमान गिळून पुन्हा तिला भेटायला जावं का? शाळेची उन्हाळी सुट्टी तोंडावर आली होती. काही दिवसातच ती आपल्या घरी गेली असती. आणि कोणी सांगावं, कदाचित परतही आली नसती. या जगात देखण्या तरुण मुलांना काहीच तोटा नव्हता आणि मिस जेलिंग्जसाठी तर तसा तोटा असण्याचं काहीच कारण नव्हतं.

कॉनी एकाग्रतेने हातातल्या पानांकडे बघत होती.

"एक संधी भ्येटल. ती घ्येताल तर जिंकताल. सोडताल तर हरताल" कॉनी एखाद्या वाचासिद्धी मिळालेल्या ग्रीक भविष्यवेत्त्याच्या थाटात म्हणाली.

कॉनीच्या खांद्यावर वाकून तिच्या हातातली पानं बघत पॅटीने मात्रेचा आणखी एक वळसा दिला.

"ही पोरगी - लई शिष्ठ हाए. डोस्क्यात हवा ग्येलेली. आपलं तेच खरं करती. तुमालाच तिला पटवाया लागल. सम्जलं का? "

गोल गुबगुबीत आणि गोबऱ्या गालांच्या चौकट गोटूकडे पाहताना कॉनीला एक भन्नाट कल्पना सुचली.

"यात एक दुस्रा मानूस पन हाए. मला दिस्तोय. लाल लाल क्येसं हायती आणि जाडाजुडा हाए चांगला. तसा देकना न्हाई पर... "

"लई डेंजर हाए बगा त्यो. आता ज्यादा टाईम नका घालवू साब. न्हाईतर त्यो मदी घुसल" पॅटीने कॉनीला भरघोस अनुमोदन दिले.

पॅटी आणि कॉनीला या दुसऱ्या माणसाचं वर्णन करताना चौकट गोटूची मदत झाली असली तरी त्यांच्या दृष्टीने असा कोणी माणूस त्यांच्या कल्पनेतूनच जन्माला आला होता. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी नकळत एका ठुसठुसणाऱ्या जखमेवर अचूकपणे बोट ठेवलं होतं. कारण कॉनीचं हे वर्णन शेजारच्या गावातल्या एका माणसाला अचूक लागू पडत होतं. हा माणूस मिस जेलिंग्जवर भेटवस्तूंचा वर्षाव करत असे आणि याच गोष्टीसाठी गिल्रॉयला त्याचा मनापासून तिरस्कार वाटत असे. आज दिवसभर गिल्रॉयच्या मनात चाललेले विचार, भवति न भवति असा त्याला पडलेला प्रश्न यांच्या पार्श्वभूमीवर प्रेमातल्या या प्रतिस्पर्ध्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. गिल्रॉयचा नशीब, दैव, त्याचे शुभाषुभ संकेत वगरे गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. पण प्रेमात पडलेल्या माणसांना शकुनांचं वावडं नसतं म्हणतात, तसा या सगळ्यामागे नक्की काहीतरी दैवी संकेत असावा असं त्याला नक्की वाटायला लागलं.

खिडकीतून दिसणारं कोळशाचं कोठार, जनित्राची खोली आणि आजूबाजूला असलेल्या ऑफिसमधल्या परिचित गोष्टींकडे पाहून त्याने आपण स्वप्नात नाही याबद्दल स्वतःचीच खात्री पटवून दिली. आणि मग आकाशातून पडल्यासारख्या दिसणाऱ्या आपल्या या अजब पाहुण्यांकडे तो बघायला लागला. त्याच्या मुद्रेवर उत्सुकता, अविश्वास आणि अस्वस्थपणा यांचं मिश्रण दिसत होतं.

पॅटी आणि कॉनी एकाग्रतेने हातातल्या पानांकडे बघत होत्या. आपल्या कल्पनेतून त्या जे चित्र रंगवत होत्या त्यामध्ये आणखी कोणते रंग भरावेत याबद्दल चांची विचारचक्रं वेगाने फिरत होती. पॅटीला वाटलं की पन्नास सेंटसमध्ये जेवढं भविष्य सांगण्यासारखं होतं तेवढं त्यांनी आधीच साण्गितलं होतं. आता हा गोंधळ आवरता कसा घ्यावा आणि बिनबोभाट इथून बाहेर कसं पडावं याबद्दल ती विचार करत होती. तिच्या लक्षात आलं होतं की त्या दोघींच नाटक आता इतकं पुढे गेलं होतं की गिल्रॉयला आपली खरी नावं सांगून शाळेपर्यंत नेऊन सोडण्याची विनंती करायला आता फार उशीर झाला होता. आता हे नाटक असंच चालू ठेवून झाल्या प्रवेशाला साजेसा काहीतरी शेवट करावा आणि गुपचूप इथून बाहेर पडावं हेच उत्तम झालं असतं. शिवाय आता घरी जायला त्यांच्याकडे अख्खा एक डॉलरही होता.

"तुम्चं नशीब चांगल हाए साब. जर... "

बोलता बोलता तिचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. शाळेच्या मुख्याध्यापिका ट्रेंटबाई आणि त्यांची मुलगी सारा या दोघीजणी गाडीतून खाली उतरत होत्या. त्या दोघी शाळेत नव्यानेच बसवलेल्या विजेच्या दिव्यांबद्दल तक्रार दाखल करायला आल्या होत्या.

पॅटीने कॉनीचा खांदा जोरात दाबला.

"सॅली आणि मोठ्या बाई आल्या आहेत. माझ्या मागून ये" ती कॉनीच्या कानात पुटपुटली.

एका क्षणात पॅटीने सगळे पत्ते हातात उचलून घेतले. मोठ्या बाईंचा आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता त्या अर्थी दारातून पळून जायचा मार्ग बंद झालेला होता.

"जातो साब. जिप्सींची हाळी आली" खिडकीतून बाहेर उडी मारता मारता पॅटी म्हणाली.

आठ फूट उंचावरच्या खिडकीतून उडी मारून पॅटी थेट जमिनीवर उभी राहिली. कॉनीही तिच्या मागोमाग खाली आली. या दोघी 'जेली'च्या तिला शोभणाऱ्या विद्यार्थिनी होत्या ते काही उगाच नाही!

त्या दोघींच्या या पलायनाकडे लॉरेन्स के. गिल्रॉय आ वासून बघतच राहिला. पुढच्याच मिनिटाला सेंट उर्सुला शाळेच्या मुख्याध्यापिका त्याच्या ऑफिसात शिरल्या. गिल्रॉयने अदबीने त्यांना प्रणाम केला. शाळेच्या इमारतीच्या पश्चिमेकडच्या बाजूला शॉर्ट सर्किट का झालं या विषयावर लक्ष केंद्रित करायला त्याला बरेच प्रयास पडले.

शाळेच्या कोपऱ्यावर पॅटी आणि कॉनी बसमधून खाली उतरल्या. सगळी बस त्यांच्याकडे अचंबित होऊन बघत होती. शाळेच्या भिंतीला गोल वळसा घालून घोड्यांच्या तबेल्याच्या बाजूने त्या गुपचूप आत स्गिरल्या. पॅरेडाइझ ऍलीपर्यंत जाताना त्यांना शाळेच्या स्वयंपाकीण बाई सोडता कोणी पाहिलं नाही. (स्वयंपाकीण बाईंनी आलं घालून केलेला ताजा ब्रेड त्यांना खाऊ घातला. ) झाल्या प्रकाराचा गाजावाजा न होऊ देता त्या अल्लादपणे आपल्या खोलीत पोचल्या तेव्हा या प्रकरणातून झालेली कमाई - नव्वद सेंटस त्यांच्या खिशामध्ये खुळखुळत होते!

---------------------------------------------------

सध्या संध्याकाळ मोठी असे. संध्याकाळचं जेवण आणि रात्रीचा अभ्यासाचा तास यांच्यामधला सगळा वेळ सेंट उर्सुलाच्या मुली बाहेर लॉनवर घालवत असत. एखाद्या हॉलमध्ये जमून नाचाचा सराव करण्यापेक्षा हिरवळीवर फेऱ्या मारणं मुलींना जास्त आवडे. आज तर शनिवार असल्यामुळे रात्रीच्या अभ्यासाच्या तासाला सुट्टी होती. त्यामुळे यच्चयावत मंडळी आज बाहेर आली होती. शैक्षणिक वर्ष संपत आलं होतं. उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी तोंडावर होती. त्यामुळे शाळेतल्या चौसष्ठ मुली कानात वारं शिरलेल्या चौसष्ठ कोकरांसारख्या बागडत होत्या. आंधळ्या कोशिंबिरीपासून रस्सीखेचीपर्यंत सगळे खेळ एकाच वेळी जोरात सुरू होते. व्यायामशाळेच्या पायऱ्यांवर दोन गटांचं संगीत युद्ध सुरू होतं. गाणाऱ्यांचा गट वाद्य वाजवणाऱ्यांचा आवाज खाऊन टाकायचा प्रयत्न करत होता. ओव्हल मैदानावर काही मुली कमरेत आडव्या रिंग्ज घालून त्या गोल फिरवत उभ्या होत्या. आणि यापैकी कशातच भाग न घेतलेल्या मुली हिरवळीवर फिरताना एकमेकींशी जोरजोरात गप्पा मारत होत्या.

स्वच्छ अंघोळ करून, चांगले कपडे घालून सभ्य मुलींमध्ये रूपांतर झालेल्या पॅटी - कॉनी आणि प्रिसिला एकमेकींचे हात धरून बागेत फेऱ्या मारत होत्या. आजवर ज्याची आतुरतेने वाट पाहिली तो रम्य भविष्यकाळ आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता. आणि त्याच भविष्यकाळाबद्दल त्यांची त्यांच्या एरवीच्या अवखळपणाला न साजेशी गंभीर चर्चा सुरू होती.

"पोरींनो, " पॅटीने नकळत एक आवंढा गिळला. "एका आठवड्याभरात आपण मोठ्या होऊ. "

त्या मुली आपापल्या जागी थबकल्या आणि नकळत त्यांनी मागे वळून पाहिलं. हिरवळीवर मुलींचा आनंदी जमाव फुलपाखरांसारखा भिरभिरत होता. हिरवळीच्या मागे संधिप्रकाशात झळाळून उठलेली शाळेची उंच आणि मोठी वास्तू उभी होती. गेली चार वर्ष या प्रेमळ वास्तूने त्यांना घरासारखं प्रेम दिलं होतं. त्यांची चिमणी सुखदुःख आणि निरागस बालपण तिथे निर्धास्तपणे आणि विश्वासाने नांदलं-खेळलं होतं. मोठं होणं हे एखाद्या वैराण वाळवंटासारखं ओसाड वाटत होतं. एक क्षणभर त्यांना असं तीव्रतेने वाटलं की आपले हात पुढे करून इतक्या बेफिकीरीने जगून टाकलेल्या आपल्या गोजिरवाण्या बाळपणाला घट्ट धरून ठेवावं

"मोठं होणं किती भयाण आहे... मी बाबा लहानच राहीन" कॉनी म्हणाली.

अचानक वातावरण तंग झालं. कावऱ्याबावऱ्या झालेल्या तिघी मुली तिथून पुढे निघाल्या. 'विषामृत' खेळायला आलेलं आमंत्रण नाकारून, व्यायमशाळेला बगल घालून - व्यायामशाळेच्या पायऱ्यांवरून जिप्सींच्या गाण्याचे सूर येत होते- वेलींच्या मांडवाखालून मागच्या गल्लीत आल्या. या गल्लीमध्ये सफरचंदाच्या झाडाच्या फुलांचा सडा पडलेला होता. या गल्लीच्या दुसऱ्या टोकाला दोन माणसांच्या आकृत्या दिसत होत्या. तिकडे लक्ष जाताच तिघीजणी श्वास रोखून एकदम उभ्या राहिल्या.

"ही तर जेली आहे" कॉनी हळूच म्हणाली

"आणि मि. गिल्रॉय" पॅटी कुजबुजली.

"चला इथून पळूया" कॉनी गडबडून गेली होती.

"नको. आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही असं दाखवा. " पॅटी म्हणाली.

खाली जमिनीकडे नजर लावून त्या चालत राहिल्या. पण त्यांच्या शेजारून जाताना मिस जेलिंग्जने त्यांना हाक मारली. ती भलतीच आनंदात दिसत होती. कळेल न कळेल अशी उत्साहाची आनंदाची आणि थराराची लाट तिच्या सभोवताली पसरल्यासारखं वाटत होतं. काही तरी चैतन्याने सळसळणारं आहे असं पॅटीला वाटून गेलं.

"काय गं जिप्सी बायकांनो! "

खरं तर अशी हाक एरवी कोणी मारली नसती. पण उत्साहाच्या भरात आपण काहीतरी वेगळं बोललो हे तिच्या गावीही नव्हतं.

"जिप्सी बायका? "

गिल्रॉयने हे शब्द उच्चारले आणि त्याची बंद पडलेली विचारचक्रं पुन्हा सुरू झाली. त्याने बारकाईने तीनही मुलींच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मुलींनी मलमलीचे झुळझुळीत झगे चढवले होते आणि त्या नमुनेदार सभ्य तरुण मुलींसारख्याच दिसत होत्या. पण झपाट्याने कमी होत असलेल्या प्रकाशात सुद्धा पॅटी आणि कॉनीच्या चेहऱ्यावरचं सावळेपण लपत अव्हतं. कडकडीत पाण्याने खसाखसा चोळून धुतल्याशिवाय चेहऱ्यावरचे कॉफीचे डाग निघत नसतात!

"अच्छा! "

गिल्रॉयच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने एक खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावरून अनेक भाव झरझर सरकत गेले. संकोचून कॉनीने जमिनीकडे नजर वळवली. पॅटीने मात्र मान वर करून त्याच्याकडे पाहिले. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. तेवढ्या एका क्षणात दोघांनीही एकमेकाकाला मनोमन बजावले "काही बोलू नको हं" आणि दोघांनीही मनोमन एकमेकाला सांगितले "नाही बोलणार"

व्यायामशाळेच्या पायऱ्यांवरचे जिप्सींच्या गाण्याचे सूर वाऱ्यावर नाचत तिथवर आले. मुली पुढे निघून गेल्या आणि मिस जेलिंग्ज त्या सुरांबरोबर गुणगुणायला लागली...

जिप्सींच रगात जिप्सींच्या रग्ताच्या
पाठी धावतं
जगात मावतं,
सखे जगात मावतं
जगात साऱ्या रगात आपलं
एकच हाय
जगात साऱ्या रगात आपलं
भरून ऱ्हाय
रगताची आपल्या जातच अश्शी
फिरून धावतं तुज्याच पाशी
सखे तुझ्याच पाशी
जिप्सींच्या रक्ताची एकच धाव
घ्या चला सारं रामाचं नाव!

हळूहळू हे शब्द वाऱ्यावर विरून गेले.

कॉनी, पॅटी आणि प्रिसिला त्या दोघांकडे बघत राहिल्या,

"मिस जेलिंग्ज आता शाळा सोडून जाईल. आणि हे आपल्यामुललंय कॉन! " पॅटी म्हणाली.

"किती छान झालं! " कॉनी मनापासून बोलत होती. "सगळं आयुष्य तिनी फक्त आयरीन मॅक्कलोला सरळ उभं रहायला सांगण्यात घालवावं असं मला नाही वाटत. तिची लायकी यापेक्षा कितीतरी जास्त आहे. "

"काय असेल ते असो, पण मला नाही वाटत गिल्रॉयला राग येईल असं आपण वागलो. कारण आपल्या मदतीशिवाय तिच्याशी बोलायचा त्याला धीरच झाला नसता. " पॅटी म्हणाली.

तशाच चालत चालत त्या मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कुरणापर्यंत आल्या. तिथल्या गवताच्या भाऱ्याला टेकून त्यांनी आभाळाचा शेंदरी रंग बघायला सुरुवात केली. मिस जेलिंग्जचा उत्साह संसर्गजन्य असावा. त्यांनाही त्याची बाधा झाली. भविष्यकाळातल्या गोष्टींची अनाकलनीय सूचना मिळाल्यासारख्या त्या थरारून गेल्या.

"मला वाटायला लागलंय, की हे इतकं वाईट नाही... " कॉनीने शांततेचा भंग केला.

"काय वाईट नाही? " प्रिसिलाने विचारलं

"हे सगळंच" गोलाकार हात फिरवत कॉनी म्हणाली.

प्रिसिलाने सगळं समजल्यासारखी मान हलवली आणि मग अचानक ती म्हणाली, "माझा विचार बदललाय. मी कॉलेजला जायची नाही. "

"कॉलेजला जायची नाही? ते का? "पॅटीने विचारले.

"त्यापेक्षा लग्न करून संसार थाटीन मी. "

"हा हा. मी मात्र दोन्हीही करणार आहे" पॅटी हसत हसत म्हणाली.

--अदिति
(२९ सप्टेंबर २०११,
आश्विन शु. २ शके १९३३)

[जीन वेब्स्टर नावाच्या लेखिकेच्या १९११ साली म्हणजे शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या जस्ट पॅटी या पुस्तकातली ही एक कथा आहे. पॅटी ही वेब्स्टरबाईंची मानसकन्या आहे. हजरजवाबी आणि कुठल्याही प्रसंगाला हसतमुखाने सामोरी जाणारी ही चुणचुणीत धिटुकली वाचकांना भ्रळ घातल्याशिवाय राहत नाही. कॉन्व्हेंट शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेणारी पॅटी पुढे कॉलेजमध्ये जाऊनही बरीच मजामजा करते. ही कथा वाचकांना रंजक वाटेल अशी आशा आहे.

--अदिती]

3 Comments:

Anonymous Dhanashree Kelkar said...

khup awadla

5:38 PM  
Blogger Dhanashree said...

majja ali wachtana

6:01 PM  
Blogger अदिती said...

dhanyavad!

11:55 AM  

Post a Comment

<< Home