ती पराक्रमाची ज्योत मावळे...
शेजारच्या मुलाची दहावीची परीक्षा सुरू होणार होती. त्यावरून विषय निघाला आणि माझं मन एकदम काही वर्षं मागे गेलं. याच मार्च महिन्याच्या दिवसांमध्ये रंगपंचमी खेळता खेळता आम्ही शेवटची उजळणी केली होती. सगळ्यात मजा आली होती ती इतिहासाच्या पेपरची तयारी करताना. वर्षानुवर्षे कोळून प्यालेला भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा भाग मला अतिशय कंटाळवाणा वाटायचा. पण पहिलं आणि दुसरं महायुद्ध यांच्याबद्दल असलेले पहिले पाच धडे मी इतक्या वेळा वाचले होते की पुस्तकाची तेवढीच पानं सैल झाली होती. तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाबद्दल वाचायला मला अतिशय आवडतं.. गेल्या शतकभरात पहिलं आणि दुसरं अशी पाठीला पाठ लावून झालेली महायुद्धं जगाच्या इतिहासात मोठी उलथापालथ करून गेली. त्यातही जमिनीपेक्षा आकाशातून लढलं गेलेलं आणि भीषण नरसंहार करणारं दुसरं महायुद्ध अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होतं. या महायुद्धाने अनेक लोकांची आहुती घेतली आणि अनेक नवी क्षेत्रंही उदयाला आणली. तशीच अनेक कर्तृत्ववान माणसंही जगासमोर आणली. ही माणसं एरवी त्यांच्या स्वतंत्र वाटेनं गेली असती आणि त्यांच्यातले हे पैलू कधीच जगासमोर आले नसते.
दुसऱ्या महायुद्धात अनेक ठिकाणी भारतीय रक्तही सांडलं आहे. त्याचे उल्लेख अधूनमधून सापडतात. वर म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धामुळे जिचं आयुष्य बदलून गेलं आणि आपल्या मूळ वाटेपासून वेगळ्याच वाटेला लागलं अशा एका मुलीची कथा अलिकडेच वाचनात आली. तिचं नाव नूरुन्निसा इनायत खान. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीव्याप्त फ्रान्समध्ये उतरवलेली ती पहिली स्त्री हेर होती. ती एक अत्यंत उत्कृष्ट बिनतारी यंत्रचालक होती. त्या काळी हे काम करणाऱ्या मोजक्याच महिला होत्या आणि नूर ही सर्व स्त्री - पुरुष बिनतारी यंत्रचालकांमधल्या अग्रगण्य लोकांपैकी एक होती. फ्रान्समध्ये जर्मनीविरुद्ध तिने जी हेरगिरी केली त्याबद्दल तिला 'कूर दे फ्रान्स' आणि जॉर्ज क्रॉस असे अनुक्रमे फ्रेंच आणि ब्रिटिश नागरी सन्मान बहाल करण्यात आले आहेत. पॅरिसजवळ फझल मंजिल इथे असलेल्या तिच्या घरासमोर दर वर्षी फ्रान्स चा लष्करी बँड तिच्या सन्मानार्थ संचलन करतो.
या मुलीबद्दल भारतीय लोकांना काहीच माहिती नसते. तिच्या मृत्यूला आता पन्नास वर्षे उलटून गेलेली आहेत. तरीही तिच्या देशबांधवांना तिच्या कर्तृत्वाबद्दल गंधवार्ताही नाही ही खेदाची बाब आहे. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या लंडन येथील प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पत्रकार श्राबनी बासू यांनी अतिशय कष्टाने नूरबद्दल माहिती जमवून 'स्पाय प्रिन्सेस' हे तिचं चरित्र लिहिलं आहे. त्याचा भारती पांडे यांनी केलेला अनुवाद नुकताच माझ्या वाचनात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिन येऊ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर या वीरांगनेबद्दल थोडीशी माहिती इथे देत आहे.
नूर इनायत खान हिची पणजी म्हणजे टिपू सुलतानाची मुलगी. तिचे पणजोबा सूफी गायक होते. नूरचे वडील इनायत खान हेसुद्धा सूफी गवई होते आणि अनेक वाद्ये ते उत्कृष्ठपणे वाजवत असत. त्यांच्या सूफी गुरूंच्या आज्ञेवरून सूफी तत्त्वज्ञानाचा प्रसार जगात करण्यासाठी इनायत खान आपल्या दोघा धाकट्या भावांबरोबर जगप्रवासाला गेले होते. अमेरिकेत त्यांची ओळख ओरा रे बेकर नावाच्या मुलीशी झाली आणि पुढे तिच्याशी त्यांचे लग्नही झाले. या दोघांची पहिली भेट रामकृष्ण मठात झाली असल्यामुळे लग्नानंतर तिच्या आईचे नाव अमीना शारदा बेगम असे ठेवण्यात आले. ही सर्व मंडळी अमेरिकेतून युरोपात गेली. तिथेच रशियात मॉस्को शहरात १ जानेवारी १९१४ ला नूरचा जन्म झाला. तिला दोन धाकटे भाऊ आणि एक लहान बहीण आहे. या चारही मुलांचे बालपण इंलंडमध्ये आणि शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पॅरिसमध्ये झाले. पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय सूफी संघटनेची स्थापना पॅरिसमधल्या त्यांच्या राहत्या घरी झाली. या सर्व भावंडांना संगीतात उत्तम गती होती आणि वीणा, हार्प ते अगदी चेलो पर्यंत बरीच वाद्ये ती उत्तम वाजवत असत. नूरने बालमानसशास्त्राचे शिक्षण घेतले होते आणि लहान मुलांबद्दल तिला विशेष जिव्हाळा होता. अतिशय तरल मनाची आणि कलासक्त व्यक्तिमत्त्वाची नूर पुढे सशस्त्र युद्धात भाग घेईल असे जर तिला कोणी सांगितले असते तर ते तिला मुळीच खरे वाटले नसते. नूर बारा वर्षांची असताना वडिलांबरोबर भारतात आली होती. ज्याच्याबद्दल बाबा - काका इतक्या जिव्हाळ्याने बोलतात तो हा तिचा देश तिला फार आवडलाही होता. हिंदी आणि उर्दूबरोबरच संस्कृत भाषेचाही ती अभ्यास करत होती. तिने काही जातक कथांचे फ्रेंचमधे भाषांतर करून त्याचे पुस्तक प्रसिद्ध केले होते. एका वर्तमानपत्राच्या लहान मुलांसाठी असलेल्या पुरवणीमध्ये तिचे लेख प्रसिद्ध होत होते आणि ते अतिशय लोकप्रियही झाले होते. अर्थात या सगळ्या गोष्टी दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या शांततेच्या काळातल्या आहेत.
नूर चौदा वर्षांची असताना इनायत खान भारतात आले. आपले मरण त्यांना कळले असावे. त्यांनी सगळी निरवानिरव केली होती. त्यांच्यामागे विलायतला सूफी संघटनेचा प्रमुख म्हणून त्यांनी नियुक्त केले होते. त्या वेळी तो खूप लहान होता. भारतात आल्यावर इनायत खान यांचे निधन झाले. अमीना बेगम यांना या घटनेचा फार धक्का बसला आणि मग कुटुंबप्रमुखाने करायची कामे नूरवर येऊन पडली. नूरने काकांच्या मदतीने घर सांभाळले, प्रपंच चालवला. तिच्यावर वडिलांचा आणि सूफी तत्त्वज्ञानाचा खोलवर प्रभाव होता. पुढे जर्मनांच्या तुरुंगात असताना या वडिलांच्या आठवणींनी आणि त्यांच्या उपदेशानेच तिला मोठे आंतरिक बळ दिले.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीलाच जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण केले आणि फ्रान्स बिनशर्त शरण गेला तेव्हा नूर, विलायत, खैरुन्निसा उर्फ क्लेअर आणि अमीना बेगम हे कुटुंब इंग्लंडला परत आले. तिचा सगळ्यात धाकटा भाऊ हिदायत फ्रान्समध्येच राहिला. इंग्लंडला जाण्यामागे शक्य त्या मार्गाने जर्मनांचा प्रतिकार करायचा हेच धोरण होते. हा निर्णय घेणे नूर आणि विलायत या दोघांनाही अतिशय कठीण गेले होते कारण सशस्त्र लढा हा सूफी तत्त्वज्ञानाच्या सपशेल विरुद्ध होता. पण फ्रान्सवर मातृभूमीसारखंच प्रेम करणाऱ्या या बहीणभावाने जन्मभूमीच्या रक्षणासाठी जमेल ती मदत करायचीच असा निश्चय केला. विलायत ब्रिटिश नौदलात सामील झाला आणि नूरने नर्सिंगाच्या पुढील शिक्षणाला सुरुवात केली. हा काळ अतिशय आणीबाणीचा होता. या काळातल्या सर्व घडामोडींबद्दल श्राबनी बासूंनी तपशीलवार लिहिले आहे. त्यातले काही उल्लेख मनोरंजक आहेत. उदा. 'जेम्स बाँड' चा जन्मदाता इयान फ्लेमिंग याचा भाऊ या काळात ब्रिटिश सरकारच्या दिल्लीतल्या हेरखात्यात काम करत होता आणि सुभाषचंद्रां बोसांना नजरकैदेत ठेवण्याच्या कामगिरीमध्ये सामील होता. या काळात ब्रिटिश गुप्तहेर संस्थांनी शत्रूच्या प्रदेशात आपले हेर उतरवायला सुरुवात केली होती. या कामासाठी त्यांनी एक स्वतंत्र विभागच स्थापन केला. या विभागाकडे देशोदेशी पसरलेले हेरांचे जाळे बिनतारी संदेशांमार्फत अनेक प्रकारची माहिती पाठवत असे. पुरुषवर्गाला युद्धाच्या आघाडीवर लढायचे होते. तशातच हा माहितीचा ओघ वाढायला लागल्यावर बिनतारी संदेश पाठवणे आणि ग्रहण करणे या कामासाठी मनुष्यबळाची प्रचंड चणचण भासू लागली होती. यावर उपाय म्हणून महिलांना ही यंत्रे चालवण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली होती. महिलांना हे काम जमणार नाही असा सार्वत्रिक समज पसरलेला असतानाही ब्रिटिश सरकारला हा निर्णय घ्यावा लागला होता. अशाच एका तुकडीत नूरचीही निवड झाली. तांत्रिक गोष्टींमध्ये तुलनेने कमी रस असल्यामुळे हे प्रशिक्षण नूरच्या दृष्टीने फारसे सुखावह नव्हते. पण आपल्या देशासाठी लढण्याचा ठाम निर्धार केल्यामुळे नूरने अपार कष्टांनी या तंत्रात उत्तम प्रावीण्य मिळवले.
याच काळात भारतात बेचाळीसची चळवळ सुरू झाली होती. नूरला भारतीय स्वातंत्र्ययुद्धाबद्दल सर्व माहिती होती. तिचे मत सध्या युद्धकाळात भारतीयांनी ब्रिटनला सहकार्य करावे असे असले तरी युद्धानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची तिची आणि विलायतची इच्छा होती. बिनतारी यंत्रचालकांच्या विशेष अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यापूर्वी झालेल्या सरकारी मुलाखतीमध्ये आपली ही मते तिने अगदी ठामपणे मांडली होती आणि प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याची पहिली संधी गमावली होती. त्या काळात लंडनमध्ये भारतीय लोकांची संख्या लक्षाणीय होती आणि एकमेकांच्या संपर्कात राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मंडळी झटत होती. यातील अनेकांशी नूरचा परिचय झाला होता.
साधारण याच काळामध्ये ब्रिटिशांना जर्मनीव्याप्त फ्रान्समध्ये उतरवण्यासाठी अस्खलित फ्रेंच बोलू शकणाऱ्या आणि कणखर मनाच्या लोकांची हेर म्हणून गरज होती. फ्रान्समध्ये जर्मनांविरुद्ध खदखदत असलेल्या असंतोषाला खतपाणी घालणे आणि
या स्थानिकांना पैसे, स्फोटके आणि शस्त्रास्त्रे इ. ची मदत करून फ्रान्समध्ये घातपाती कृत्ये घडवून आणणे अशी कामे या लोकांनी करायची होती. शालेय शिक्षण फ्रास्नमध्ये झाल्यामुळे नूरला अतिशय उत्तम फ्रेंच बोलता येत असे. त्यामुळे नूरची या कामासाठी निवड झाली. शिवाय बिनतारी यंत्रावरील तिचं प्रभुत्व तिच्या बरोबरच्या सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी जास्त होतं. त्यामुळे फ्रान्समधून संदेश पाठवण्याच्या कामात तिची बहुमोल अशी मदत होणार होती. हेरगिरीचं हे प्रशिक्षण अतिशय खडतर असच होतं. श्राबनी बासूंनी या काळातली सरकारी कागदपत्रं मिळवून नूरचे प्रशिक्षक आणि वरिष्ठ यांचे तिच्याबद्दलचे अहवाल दिले आहेत. ते मुळातूनच वाचावेत असे आहेत. नूरने विलक्षण इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या जोरावर या प्रशिक्षणात आघाडी घेतली होती. तिचा बिनतारी संदेश पाठवायचा वेग तिच्या सहाध्यायींपेक्षा कितीतरी जास्त होता. पण तिची शारीरिक क्षमता मात्र एका हेराला साजेशी नव्हती. कदाचित अंगभूत हळवेपणा, मुलींनी 'मुलींसारखेच' वागावे असा सार्वत्रिक समज याबरोबरच तिचे ऍपेंडिक्सचे ऑपरेशनही याला कारणीभूत असू शकते. पण हेर होण्याच्या प्रशिक्षणात कवायती आणि शारीरिक कष्टाची कामे करण्यावर चांगला भर दिलेला असल्यामुळे नूरची तब्येत चांगलीच सुधारली. आपल्याला फ्रान्समध्ये जावे लागेल हे तिला चांगले माहीत होते. आणि त्या गोष्टीचा तिला आनंदही होता. पण तिला एका गोष्टीबद्दल मात्र काळजी वाटत असे. तिचा भाऊ हिदायत त्याच्या बायकोमुलांबरोबर फ्रान्समध्येच होता. तिचे खरे नाव उघडकीला आले असते तर हिदायतचा छळ होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे इंग्लंडमध्ये ती नूर इनायत खान या नावाने ओळखली जात असली तरी आपली सूफी विचारपरंपरेशी असलेली बांधिलकी तिने कसोशीने गुप्त ठेवली होती. फ्रान्सला पाठवताना तिचा उल्लेख नोरा बेकर असा केलेला होता. बेकर हे तिच्या आईचे पूर्वाश्रमीचे नाव असल्यामुळे तिला ते लक्षात ठेवायलाही सोपे होते. शिवाय फ्रान्समध्ये पाठवताना तिला जी नवी ओळख दिलेली होती त्यात तिच्या खऱ्या आयुष्याशी संबंधित अनेक खऱ्या घटनाही गोवण्यात आलेल्या होत्या. फ्रान्समध्ये असताना तिचं सांकेतिक नाव होतं मादलेन.
असं असूनही, तिच्या अनेक सहाध्यायांना आणि प्रशिक्षकांना या गोष्टीची कुणकुण लागलेली होती की ती एक सूफी मुसलमान मुलगी आहे. तिच्या स्वाभाविक हळवेपणाबद्दल काही लोकांनी तिच्या वडिलांना दोष दिलेला आहे. नूर हळवी होती आणि जात्या तिचा पिंड जोखमीची तांत्रिक कामे करू शकेल अशा माणसाचा नव्हताच. शिवाय ती धांदरट होती आणि घाईगडबडीत तिच्या हातून काही चुकाही होत असत. शिवाय तिच्या अंगी असलेला एक अतिशय मोठा दुर्गुण म्हणजे तिची सत्यप्रियता. तिच्यावरचे संस्कार इतके प्रभावी होते की हेर झाल्यावरही कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायला तिने साफ नकार दिलेला होता. तिच्या प्रशिक्षणादरम्यान तिला इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विभागात एक कामगिरी सांगितलेली होती. त्यादरम्यान एका पोलिसाने तिला हटकल्यावर तिने आपले खरे नाव, काम इ. तर सांगितलेच, पण दडवून ठेवलेले आपले बिनतारी यंत्रही बाहेर काढून दाखवले. हळवेपणाबरोबरच कमालीचा भित्रेपणा तिच्या अंगी होता. खोट्या गेस्टापो चौकशीच्या वेळी ती अतिशय घाबरून गेली होती, पांढरी फटक पडली होती आणि तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. या सगळ्या गोष्टींमुळे तिला प्रत्यक्ष कामगिरीवर पाठवावे किंवा नाही याबद्दल तिच्या प्रशिक्षकांमध्ये दुमत निर्माण झाले होते. पण तिची मुलाखत घेऊन या कामासाठी तिची निवड करणारा अधिकारी बकमास्टर आणि प्रशिक्षणादरम्यान तिच्यावर लक्ष ठेवणारी अधिकारी व्हेरा अटकिन्स या दोघांना तिच्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास वाटत होता.
फ्रान्समध्ये पाठवलेल्या प्रत्येक हेराला काही सुरक्षा कसोट्या ठरवून दिलेल्या असत. हा संदेश त्याच माणसाने पाठवलेला आहे याची खातरजमा करायला या कसोट्यांचा उपयोग होत असे. या कसोट्या हा हेर आणि त्यांच्यासाठी सांकेतिक भाषा तयार करणारा तज्ज्ञ या दोघांखेरीज कोणालाही माहीत नसत. शिवाय काही कळीची अक्षरे संदेशात घालून पाठवायला म्हणून रेशमी कापडावर छापून या हेरांकडे दिलेली असत. यातली वापरून झालेली अक्षरे कापून टाकायच्या सूचना त्यांना दिलेल्या होत्या. हे हेर जर पकडले गेले तर हे रेशमी कापड म्हणजे त्यांच्या दोषीपणाचा प्रत्यक्ष पुरावाच ठरत असे म्हणून नूरला हे कापड देण्यात आले नाही. तिच्या सर्व सांकेतिक खुणा तिच्याकडून तोंडपाठ करून घेतल्या गेल्या होत्या. संदेश पाठवायला लागणारी सांकेतिक भाषा लिओ मार्क्स हा एकच माणूस तयार करत असे. तो या कामात अतिशय तरबेज होता. तो सर्व हेरांना ही भाषा स्वतःच शिकवत असे. हेरांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे आणि हे प्रशिक्षण स्वतःच दिल्यामुळे हेराकडून आलेल्या संदेशातली लहानशी चूकही त्याच्या लक्षात येत असे. मार्क्सने तीन दिवस नूरला सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण दिले. तिच्याकडून संदेशाचं रूपांतर करताना काही चुका होत होत्या पण याही कामात तिचा वेग खूप चांगला होता. मग मार्क्सने तिच्याच पुस्तकातली एक जातककथा तिला सांगितली. त्याने तिला अशी कल्पना करायला सांगितली की ती तयार करत असलेला प्रत्येक संदेश म्हणजे राजाच्या तावडीतून इतर माकडांना सोडवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा पूल करून झोपलेलं एक माकड आहे आणि तो संदेश जर अचूक नसेल तर हा पूल मध्येच कोलमडेल. या गोष्टीचा परिणाम खूप चांगला झाला. त्यानंतर नूरच्या संदेश रूपांतरातल्या चुका खूपच कमी झाल्या. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रातून तिने पाठवलेल्या संदेशांमध्ये तर एकही चूक राहिली नव्हती. मार्क्सने तिला अशीही मर्यादा घालून दिली होती की तिच्या संदेशात एका ओळीत अठरापेक्षा जास्त अक्षरे असणार नाहीत. आणि जर तिने अठरापेक्षा जास्त अक्षरे असलेला संदेश पाठवला तर बेकर स्ट्रीटवर बसून तिचा संदेश ऐकणारे लोक हे ओळखतील की तिला अटक झालेली आहे. नूरने या सर्व सूचना अगदी तंतोतंत पाळल्या. इंग्लंडच्या दुर्दैवाने तिच्या संदेशांचा नीट अर्थ लावण्याचे काम करण्यात बेकर स्ट्रीट ऑफिस कमी पडलं आणि याची बरीच मोठी शिक्षा दोस्त राष्ट्रांना आणि त्यांच्या हेरांना भोगावी लागली.
नूरचे प्रशिक्षण संपायला अजून थोडा वेळ शिल्लक असतानाच फ्रान्समधून बिनतारी यंत्रचालकाची मागणी सतत होत होती. शेवटी तिथल्या लोकांची निकड लक्षात घेऊन नूरला प्रशिक्षण संपायच्या आधीच फ्रान्सला पाठवण्याचे ठरले. ब्रिटिश लोकांना फ्रान्समध्ये पाठवण्याचे काम लायसॅंडर जातीच्या विमानांवर सोपवलेले होते. तीन माणसे बसतील अशी ही विमाने जमिनीच्या खूप जवळून प्रवास करत असत आणि त्यांना खूप मोठ्या धावपट्टीचा गरज नसल्यामुळे ती अगदी शेतातही उतरू शकत असत. ही कामे पौर्णिमेच्या रात्री होत असत. या विमानांना बाहेरून हिरवट चंदेरी रंग दिल्यामुळे ती चंद्रप्रकाशात पटकन नजरेस पडत नसत. याच लायसँडर विमानातून सोळा जून एकोणीसशे चव्वेचाळीसच्या रात्री नूर फ्रान्सला गेली. त्या दिवशी या विमानांमधून गेलेले सर्व लोक दुर्दैवी होते. हे सगळे जण जर्मनांच्या हाती लागले आणि छळ सोसून मरण पावले.
फ्रान्समध्ये दोस्तांचे हेर मंडलांमध्ये काम करत असत. एक हेर, त्याचा एक बिनतारी यंत्रचालक आणि त्याच्यासाठी काम करणारा एक निरोप्या अशी तीन माणसे एकत्र असत. अशा गटांचे एक मंडल तयार होत असे. जर्मनीव्याप्त फ्रान्समधले सर्वात यशस्वी मंडल होते 'प्रॉस्पर' मंडल. या मंडलाचा प्रमुख प्रॉस्पर नावाचा माणूस होता. या मंडलाने अनेक घातपाताची कामे यशस्वीपणे पार पाडली होती. नूर या मंडलासाठी काम करणार होती. पण ती फ्रान्सला पोचल्यापासून दोन - तीन दिवसांच्या आतच या मंडलातले अनेक सदस्य पकडले गेले. आता नूर ही एकमेव बिनतारी यंत्रचालक आणि दोन हेर एवढीच माणसं उरली होती. या दोन हेरांपैकी एक हेर जर्मनांना फितूर झाला होता असं नंतर लक्षात आलं. आता नूरवर सहा बिनतारी यंत्रचालकांचं काम करण्याची जबाबदारी येऊन पडली. शिवाय तिला तीस पौंड वजन असलेले आपले बिनतारी यंत्र घेऊन पकडली न जाता पॅरिसमधे लपून रहायचे होते आणि रोज आपली संदेश प्रक्षेपणाची जागा बदलून संदेश पाठवायचे होते. हे काम अतिशय अवघड होते पण नूरने ते अतिशय उत्तम प्रकाराने पार पाडले. त्या वेळी पॅरिस शहर गेस्टापो अधिकाऱ्यांनी गजबजलेले होते आणि आपला संदेश प्रक्षेपित करताना नूरला तिच्या यंत्राची सत्तर फुटी एरियल उभी करावी लागत असे. यावरूनच तिच्या कामातले धोके लक्षात यावेत. शिवाय पॅरिसमध्ये तिला ओळखणारे असंख्य लोक होते आणि ती युद्धाच्या सुरुवातीलाच फ्रान्स सोडून गेली आहे हे त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतही होते. त्यामुळे तर गेस्टापोंच्या जाळ्यात ती अडकायची शक्यता वाढली होती. हा सगळाच भाग अतिशय सुरस आहे आणि तो मूळ पुस्तकातूनच वाचण्याजोगा आहे.
या संपूर्ण काळात तिने प्रॉस्पर मंडलाच्या पुनर्बांधणीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. शिवाय विविध कारणांमुळे फ्रान्समध्ये अडकलेल्या सुमारे तीस ब्रिटिश वैमानिकांना सुखरूप मायदेशी पाठवण्यासाठी तिने सगळी व्यवस्था करून त्यांना परत पाठवले. इतर मंडलांनाही फितुरीचा शाप भोवला आणि हेरांची धरपकड सुरूच राहिली. अखेरीस बाहेरचे जग आणि फ्रान्समधील हेर यांच्यात नूर एकटीच संपर्क माध्यम म्हणून शिल्लक होती. त्यामुळे एकदा बेकर स्ट्रीटवरून परत यायची आज्ञा मिळूनही ती फ्रान्समध्येच काम करत राहिली. पण ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेस्टापोंची तिच्याभोवतीची पकड आवळली गेली होती. आधी ही मादलेन नावाची व्यक्ती कोण आहे हे जर्मन पोलिसांना माहीत नव्हतं. पण वेषांतर केलेले दोन पोलिस अधिकारी प्रॉस्पर मंडलाची पुनर्बांधणी करण्याच्या मिषाने दोन गेस्टापो अधिकारी तिला भेटूनही गेले. आणि हे दोघे शत्रू आहेत हे तिला माहीत नव्हते. पण आता जर्मनांना तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत होती. तिला असलेला वाढीव धोका लक्षात घेऊन बकमास्टरने अखेरीस तिला परत येण्याचा निकराचा आदेश दिला. सतरा ऑक्टोबरला पौर्णिमेच्या रात्री ती परतणार असे ठरले होते. चार महिने जर्मन पोलिसांना यशस्वीपणे गुंगारा देणारी नूर सोळा ऑक्टोबरच्या दुपारी अचानक पकडली गेली. पोलिसांना तिच्या राहत्या घराचा पत्ता एका फितूर मुलीने दिला होता आणि तिला अटक करणारा माणूस स्वतः फ्रेंचच होता.
नूरचे बिनतारी यंत्रही तिला पकडल्याच्या दुसऱ्याच दिवशी जर्मन पोलिसांच्या हाती लागले. नूर एकाच वेळी सहा वेगवेगळ्या लोकांचे संदेश पोचवत होती शिवाय ब्रिटनमधून काम करणाऱ्या द गॉल यांच्यासाठीही तिने संदेश पाठवले होते. हे सगळे संदेश तिने एका फाईलमध्ये ठेवले होते. त्यामुळे ते जर्मन लोकांच्या हाती लागले. अर्थात तिने आधी पाठवलेल्या अहवालांच्या प्रती फितुरीमुळे जर्मन पोलिसांच्या हाती यापूर्वीच लागलेल्या होत्या. जर्मन लोकांनी या यंत्राच्या साहाय्याने एक नवा खेळ खेळायला सुरुवात केली. त्यांनी नूरच्या नावाने नूरच्या यंत्रावरून 'सगळं काही ठीक असल्याचे' संदेश पाठवले. या संदेशात तिच्या खुणेच्या कसोट्या नाहीत त्या ती का विसरली आहे असा उलटा संदेश बेकर स्ट्रीटवरून पाठवण्यात आला. ही एक अक्षम्य चूक होती. यामुळे जर्मन लोकांना या कसोट्यांबद्दल माहिती मिळाली आणि ब्रिटिश सरकार गाफील राहिले. पुढचा संदेश नूरच्या मदतीनेच पाठवण्यात आला. चतुराई करून नूरने यात अठरापेक्षा जास्त अक्षरे एकेका ओळीत घातली होती. पण दुर्दैवाने हाही धोक्याचा इशारा ब्रिटिश संदेश ग्राहक ओळखू शकले नाहीत. त्यामुळे नूरला अटक झाली आहे ही गोष्ट बकमास्टरच्या लक्षात आली तेव्हा सुमारे चार - पाच महिने उशीर झाला होता. ही गोष्ट लक्षात आल्यावरही हाच खेळ ब्रिटनकडून सुरू ठेवण्यात आला कारण जर्मन अधिकाऱ्यांचं लक्ष डंकर्कच्या मोहिमेवरून दुसरीकडे वेधायचं होतं.
जर्मन चौकशीपुढे भलेभले हेर मोडून पडले पण नूरने मात्र त्यांना दाद दिली नाही. उलट जर्मन कैदेतून सुटण्यासाठी तिने तीन अयशस्वी प्रयत्न केले. त्यात ती यशस्वी झाली असती तर दुसऱ्या महायुद्धातील एक रोमहर्षक घटना म्हणून ते पलायन अजरामर झाले असते. पण तीनही वेळा तिचे दुर्दैव आड आले. नंतर ती जर्मनांच्या कैदेत सुमारे एक वर्षभर होती. अत्यंत धोकादायक कैदी असा शेरा तिला देण्यात आला होता. अखेरीस युद्ध संपण्याच्या काहीच महिने आधी जर्मनीतील 'डाखाऊ' तुरुंगात तिला गोळी झाडून ठार मारण्यात आले. या तुरुंगवासाच्या काळात तिच्या वदिलाची आठवण आणि त्यांचे विचार यांनीच तिला बळ दिले.
एकदा फ्रान्सला गेल्यावर तिचे पुढे नक्की काय झाले हे जगासमोर यायला आठ नऊ वर्षे लागली. तिचा भाऊ विलायत आणि व्हेरा अटकिन्स यांनी तिला शोधण्यासाठी खूपच कष्ट घेतले. व्हेराने तर स्वतः युरोपभर फिरून तिच्या हाताखाली तयार झालेल्या आणि युद्धकाळात बेपत्ता झालेल्या अनेक हेरांचा शोध घेण्याचे अतिशय मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळेच नूरच्या त्यागाची हकीगत जगासमोर यायला मदत मिळाली. अखेरीस तिच्या मृत्यूच्या वेळी तिच्याबरोबर तुरुंगात असलेल्या दोन महिलांनी तिच्या कुटुंबियांचा शोध घेतला. या महिला फ्रेंच होत्या आणि नूरचा त्यांच्याशी संपर्क होता. त्यांनी तिचा शेवट कसा झाला हे जगाला सांगितले. तिला डाखाऊमध्ये नेल्यानंतर काय झाले हेही शोधून काढणे बरेच कष्टाचे होते. कारण तिच्यासहित चार ब्रिटिश स्त्री हेरांचा मृत्यू डाखाऊमध्येच झाला. त्यांना तर मृत्यूनंतर अंत्यसंस्कारही नीट लाभले नाहीत. डाखाऊमध्ये तैनात असलेल्या जर्मन अधिकाऱ्यांवर अभियोग चालू असताना त्यांनी दिलेल्या माहितीवरून हे सिद्ध झाले की या चार स्त्रियांपैकी जिला आपल्या कोठडीतच गोळ्या घालण्यात आल्या तीच नूर होती. हा सगळा भाग वाचताना खूप वाईट वाटते. मरताना नूरने एकच शब्द उच्चारला होता 'लिबेर्ते'. व्हेरा सारख्या लोकांनी हे कष्ट घेतले नसते तर नूरची अवस्था 'नाही चिरा नाही पणती' अशीच झाली असती.
अखेरपर्यंत तिने आपली सुसंस्कृतता सोडली नाही. तिला वाईटसाईट बोलणाऱ्या जर्मन पहारेकऱ्याला ती अतिशय नम्रपणे जर्मनमधूनच उत्तरे देत असे असेही तिच्याबरोबर तुरुंगात असणाऱ्या फ्रेंच महिलांनी नमूद करून ठेवलेले आहे. तिचा मृत्यू झाला त्या दिवशी तिच्या आईला आणि विलायतला एकच स्वप्न पडले. त्यात नूर हसऱ्या चेहऱ्याने हवाईदलाचा निळा गणवेश घालून उभी होती. ती म्हणाली, मी मुक्त झाले आहे. नूरची फारशी छायाचित्रे उपलब्ध नाहीत. पण गणवेशातले एक छायाचित्र बऱ्याच ठिकाणी सापडते. तिच्या सोज्ज्वळ चेहऱ्यावर असलेले आश्वासक हसू पाहून शांतही वाटतं आणि रडूही येत. अशी मुक्ती फार लोकांच्या नशिबी नसते.
ही सर्व कथा अंगावर रोमांच उभे करणारीच आहे. ती पुस्तकरूपाने भारतीय वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्राबनी बासूंचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत.
नूरची कथा माझ्यासाठी ऍन फ्रँकच्या कथेइतकीच चटका लावणारी आहे. त्यात ती भारतीय होती ही गोष्ट काकणभर जास्त अभिमान वाटायला भाग पाडते.
या लेखातील सर्व माहिती श्राबनी बासूंच्या पुस्तकातून मिळालेली आहे. तिच्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर तो दोष माझ्या स्मरणशक्तीचा आहे आणि सर्व श्रेय ( टंकायचे श्रम सोडल्यास) बासूंचे आहे. उद्याच्या महिलादिनानिमित्त भारतालाच काय पण जगाला ललामभूत ठरलेल्या या तेजकळीला माझा प्रणाम.
--अदिती
(७ मार्च २०१०,
फाल्गुन वद्य ६, शके १९३१)
0 Comments:
Post a Comment
<< Home