पुस्तकायन

Sunday, June 20, 2010

धवलक्रांतीची कथा : माझंही एक स्वप्न होतं...

पावभाजी या पदार्थाचं नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पावभाजी असं म्हणताक्षणी डोळ्यासमोर त्या पदार्थाचं चित्र उभंच राहतं आणि नाकाला त्या भाजीच्या खमंग वासाची सुखद जाणीव व्हायला लागते. या वासात एक अतिशय स्वादिष्ट आणि नुसत्या नामोल्लेखानेही तृप्तीची जाणीव करून देणारा एक वास अंतर्भूत असतो. ( याचं नुसतं नाव ऐकलं तरी गेल्या पिढीतली लोकं लगेच कॅलरीज कॅलरीज म्हणून ओरडायला लागायची भिती आहे ).... हा वास कुठला ते ओळखा बरे असं कोडंबिडं काही मी घालणार नाहीये. तेव्हा घाबरू नका ! पावभाजीचा हा पावभाजीहूनही सरस असा जोडीदार म्हणजे अमूलचं लोणी!

काही वर्षांपूर्वी अत्यंत लोकप्रिय असलेल्या सुरभि या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून अमूलने सहकार्य दिल्यावर सुरभिमध्येच अमूलची कथा काही प्रमाणात बघायला मिळाली होती. अमूलचं शोभाचिन्ह असलेली ती अति-खट्याळ मुलगी , दर आठवड्याला वाचायला मिळणाऱ्या आणि सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱ्या अमूलच्या जाहिराती, 'मैय्या मोरी, मै नही अमूल खायो' असं म्हणणारं लंगड्या बाळकृष्णाचं ते गोजिरं ऍनिमेटेड रूप आणि चॉकलेटजगताशी माझी ओळख ज्या खाद्यामुळे झाली ते 'अमूल' चॉकलेट अशा स्वरूपांमध्ये अमूल सतत डोळ्यासमोर येत राहिल्यामुळे जिव्हाळ्याचं होतंच. पण अमूल म्हणजे नक्की काय याची कल्पना एरवी येणं जरा कठीणच होती. सुरभिमध्येच एकदा डॉ. व्हर्गीस कुरियन यांची मुलाखत बघण्याचा योग आला होता. पण हरितक्रांती आणि त्यात आपल्या देशाने केलेली प्रगती पाठ्यपुस्तकांमधून माझ्यापर्यंत पोचली तशी धवलक्रांती मात्र पोचली नाही. धवलक्रांती ला साहेबाच्या भाषेत ऑपरेशन फ्लड असं म्हणतात. याचा अर्थ दुधाचा महापूर. यापूर्वी ऑपरेशन फ्लड हे नाव मी (बहुधा ) 'दूध दूध दूध दूध, दूध है वंडरफुल, पी सकते है रोज ग्लासफुल' या जाहिरातीमधे वाचलं होतं. ( ती जाहिरात काय सुरेख आहे! हल्ली फारशी बघायला मिळत नसली तरी यूट्यूबवर सापडावी. शोधायला हवी! )

त्यामुळे, "अरे भाऊ , अमूल म्हणजे रे काय? " हा प्रश्न मला बरेच दिवस पडला होता. अमूलची कितीतरी उत्पादनं आणि त्यांची (मॅनेजमेंटच्या मॅमच्या भाषेत 'चितळे' दर्जाची ) अचाट गुणवत्ता सतत जाणवत असली तरी जाहिरात आणि मार्केटिंगच्या तंत्राचा इतका सहज सराईत वापर करणारी अमूल एखादी बहुराष्टीय किंवा राष्ट्रीय (बिग बजेट) कंपनी असावी असा माझा एकूण ग्रह झाला होता. 'मंथन' या चित्रपटातलं प्रीती सागर यांनी म्हटलेलं गाणं सुरभी च्याच कृपेने पाहत असल्यामुळे अमूल व्यापारी तत्त्वांवर काम करत असली तरी ठोकळेबाज भांडवलशाही कंपन्यांपैकी नाही हे लक्षात आलेलं होतं. तरीसुद्धा 'रे भाऊ, अमूल म्हणजे रे काय? " या माझ्या प्रश्नाला अजून उत्तर मिळालंच नव्हतं.

एक दिवस डॉ. कुरियनांचंच आत्मचरित्र माझ्या हाती लागलं. साहेबाच्या भाषेतल्या मूळ पुस्तकाचं नाव आहे 'आय टू हॅड अ ड्रीम'. मी वाचला तो त्याचा अनुवाद ' माझेही एक स्वप्न होतं '. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा अनुवाद केला आहे सुजाता देशमुखांनी. साधारण दोनशे वीस पानांचं हे पुस्तक म्हणजे माहितीचा आणि स्फूर्तीचा झराच आहे. हे पुस्तक वाचल्यावर धवलक्रांतीचा विलक्षण प्रेरणादायी इतिहासच समोर उभा राहिला आहे. भारतातील धवलक्रांतीचे निःसंशय शिल्पकार ठरलेल्या कुरियनांची ही कहाणी साठा उत्तरी सुफळ झाली असली तरी ती साधी सोपी मात्र नाही हे लक्षात येतं. नैसर्गिक आपत्ती, अपुरी साधनसामग्री, अपुरा अनुभव, नवजात राष्ट्राच्या स्वयंपूर्णतेसाठी चाललेल्या प्रयत्नांच्या गळ्याला नख लावून तिथल्या बाजारपेठेत एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या नववसाहतवादी बहुराष्ट्रीय कंपन्या, भ्रष्टाचाराने पोखरलेली शासनव्यवस्था आणि अत्यंत उद्दाम आणि स्वार्थलोलुप अशी नोकरशाही अशा अनेक शत्रूंना तोंड देत देत गुजराथामधील कैरा जिल्ह्यातल्या एका दूध संकलन केंद्रात सुरू झालेला हा प्रवास दुग्धोत्पादन क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण झाल्यावर संपला आहे. खरं म्हणजे तो संपलेला नाही. फक्त वर्षानुवर्षे खांद्यावर वाहून आणलेली सहकाराची ही पालखी डॉक्टरांनी आता दुसऱ्या खांद्यावर दिली आहे इतकंच. संस्कृत भाषेत सहकार वृक्ष म्हणजे आंब्याचं झाड. अमूल हे महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेलांच्या प्रेरणेने भारतात रुजलेल्या आणि बहरलेल्या या सहकारवृक्षाचं फळ आहे असं म्हटल्यास त्यात काही वावगं वाटू नये. पण अमूल हे धवलक्रांतीच्या हिमनगाचं आपल्याला माहीत असलेलं फक्त एक टोक आहे ही गोष्ट हे पुस्तक वाचताना लक्षात येते.

केरळमधल्या एका सीरियन ख्रिश्चन कुटुंबात व्हर्गीस कुरियन यांचा जन्म झाला. त्यांची 'डॉक्टर'की ही स्टेथॅस्कोपवाली डॉक्टरकी नव्हे. त्यांना मानद डि. लिट्. ही पदवी मिळालेली आहे. डॉ. कुरियनांचे सख्खे मामा जॉन मथाई हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. कुरियन लहानपणापासून अतिशय हुशार होते. त्यांच्या फोटोकडे पाहिलं की सगळ्यात आधी जाणवतो तो त्यांचा आत्मविश्वास. त्यांना अनेक विषयांमध्ये रस आणि उत्तम गती आहे. विद्यार्थी दशेत असताना भारत सरकारने शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले होते. फक्त हे शिक्षण त्यांनी दुग्धोत्पादानासंबंधी विषयात घ्यायचे होते. त्यांनी मेटॅलर्जीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि दुग्धोत्पादनासंबंधी जुजबी माहिती घेऊन ते परत आले. एखाद्या माणसाच्या नशिबात किती मजेशीर योगायोग असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जुलमाचा रामराम म्हणून घेतलेल्या दुग्धोत्पादत क्षेत्रातच डॉक्टरांची कारकीर्द घडली. आणि नुसती घडलीच नाही, तर मागून येणाऱ्या पिढ्यांनी जिचा अभ्यास करायला हवा अशी घडली. अमेरिकेतून परतल्यावर त्यांना थेट गुजराथामधील कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादन संस्थेत नोकरी मिळाली. ही नोकरी सरकारी शिष्यवृत्तीच्या पाठिंब्यावर घेतलेल्या शिक्षणाचा राष्ट्राला उपयोग व्हायला हवा म्हणून करावी लागलेली नोकरी होती. कैरा जिल्ह्यातून (आताचा खेडा जिल्हा) मुंबई शहराला दुधाचा रतीब पुरवला जात असे. या कामात पेस्तनजींची पोल्सन ही कंपनी त्यांची मुख्य स्पर्धक होती. कैरामध्ये दुग्धोत्पादन व्यवसायाला सुरुवात झाली त्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतातली दूध उत्पादन, संकलन, साठवण आणि वितरण व्यवस्था अजून बाल्यावस्थेतच होती. कधी दूध कमी पडे तर कधी जास्त उरल्यामुळे फेकून द्यावे लागे. दुधाची मागणी नक्की किती असेल याचा अंदाज बांधणेही कठीण होते. पण मुंबईसारखी वेगाने वाढणारी बाजारपेठ आणि वेगवान वाहतुकीची नवनवी साधने यांच्यामुळे कैरामध्ये सहकारी दूध संकलन संस्थेने चांगले मूळ धरले होते. डॉ. कुरियनांनी कैरामध्ये प्रवेश केला तेव्हाची दूध उद्योगाची परिस्थिती फारशी सुधारलेली नव्हती. पण गरज ही शोधाची जननी असते म्हणतात तशी या परिस्थितीमधून अनेक नवी तंत्रे जन्माला आली. या कामात डॉक्टरांचं योगदान खूप मोठं आहे तशीच या कामी त्यांना योग्य वेळी मिळत गेलेली योग्य माणसांची साथही अमूल्य आहे.

महात्मा गांधींनी ज्याचे कौतुक केले आहे असा बारा बलुतेदारांवर अवलंबून असलेला भारतीय गाववाडा स्वयंपूर्ण होता हे खरं. पण यामुळेच उत्पादकांकडून मातीमोल भावाने वस्तू विकत घेऊन बाजारपेठेत चढ्या भावाने विकणाऱ्या अडत्यांचे फावले. हे लोक मधल्यामध्ये सगळा मलिदा फस्त करत आले आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये नाडला जातो तो उत्पादक. अनेक वर्षांपासून ही वितरण व्यवस्था आपल्याकडे खोलवर मुळे रुजवून उभी आहे. राणीच्या सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याचा सूर्यास्त होऊन साठ वर्षं लोटली तरीही या व्यवस्थेला जरासुद्धा धक्का लागलेला नाही. अशा परिस्थितीमधे उत्पादक आणि ग्राहक यांचा थेट संपर्क निर्माण झाला तर ग्राहकाला योग्य वस्तू रास्त किमतीला तर मिळतीलच, शिवाय सगळा मोबदला उत्पादकालाच मिळेल आणि त्यातला मोठा वाटा उगाचच अडते आणि व्यापारी मंडळींना द्यावा लागणार नाही हे लक्षात घेऊन डॉक्टर कुरियनांनी काम केले. सर्व उत्पादकांनी एकत्र यावे आणि परस्परपूरक होईल अशा प्रकारे संघटितपणे आपापली उत्पादने बाजारपेठेत विकावीत असे सहकाराचे तत्त्व सांगते. यासाठी उत्पादकांना एकत्र येण्यास योग्य जागेची गरज असते. ही जागा अत्यल्प मोबदल्यामध्ये मिळायला हवी आणि इथे उत्पादकांना एकमेकांचा अडचणी सोडवता याव्यात असे तिचे स्वरूप असायला हवे. अशा प्रकारे उत्पादक संघटित झाले तरच नफेखोर व्यापारीवर्गाच्या हालचाली मोडीत निघू शकतात हे डॉक्टरांना चांगले माहीत होते. त्यामुळे कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघटनेचे काम याच तत्त्वाचे अतिशय डोळसपणे पालन करून चालवायला त्यांनी सुरुवात केली. दूध उत्पादकांना एकत्र येण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून त्यांना मिळणाऱ्या नफ्यामध्ये घसघशीत वाढ कशी होईल याकडे लक्ष पुरवण्यापर्यंत सगळी कामे कुरियनांनी केली. खरं सांगायचं तर सुरुवातीच्या काळात याच सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करण्यासाठी कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने त्यांना नोकरीवर ठेवले होते. या सर्व गोष्टींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे काम हा कुरियनांच्या कारकीर्दीतला एक महत्त्वाचा भाग आहे.

सहकाराच्या तत्त्वाचे पालन करून अमूल सारखी संस्था उभी राहू शकते हे कुरियनांनी सिद्ध करून दाखवलं. हे करताना त्यांना पोल्सनसारख्या स्थानिक स्पर्धकांपासून ते ग्लॅक्सो - नेस्टले अशा बहुराष्ट्रीय स्पर्धकांपर्यंत सगळ्यांना तोंड द्यावं लागलं. आपल्याकडे असलेली पैशांची अफाट ताकद वापरून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यापासून ते योग्य ठिकाणी पैसे चारून आपल्या फायद्याचे कायदे पारित करून घेण्यापर्यंत भांडवलशाहीतले तमाम उपाय अमूलच्या विरोधात वापरले गेले. तरीही अमूल तग धरून उभी राहिली. यामागे कुरियन यांच्या कुशल व्यवस्थापनाबरोबरच अमूल मध्ये काम करणाऱ्या आणि अमूल साठी दूध संकलित करणाऱ्या सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांचे अथक श्रम होते. वानगीदाखल एक उदाहरण इथे दिल्यावाचून राहवत नाही. तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रामुख्याने न्यूझिलंड आणि हॉलंड अशा गवताळ कुरणांनी समृद्ध देशांचे वर्चस्व होते. पण या देशांमध्ये दूध- दुभत्यासाठी गायींचा वापर केला जातो. भारतात गायींपेक्षा जास्त खप म्हशीच्या दुधाचा असतो. न्यूझिलंडसारख्या देशांनी आपले व्यापारी हित जपण्याच्या उद्देशाने 'फक्त गायीच्याच दुधापासून दुधाची भुकटी निर्माण करता येते' असा अपप्रचार सुरू केला. अमेरिकेत शिक्षण घेत असताना कुरियनांचे सहाध्यायी असलेले श्री. खोसला हे दूध-दुभत्याशी संबंधित तंत्रज्ञानात अतिशय प्रवीण होते आणि अमूल मधले त्यांचे सहकारीही होते. त्यांच्याशी याबद्दल चर्चा केल्यावर हा दावा खोटा असल्याचे कुरियन यांच्या लक्षात आले. या अपप्रचाराला उत्तर म्हणून कुरियन यांनी आणंदजवळ एक दूध भुकटी तयार करण्याचा कारखाना उभा करायची घोषणा करून टाकली. हा कारखाना प्रामुख्याने म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी बांधायचा होता. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे मोठे यंत्र यासाठी विकत घेण्याचे ठरले. यासाठी अमूल ने कर्ज काढले होते. कारखान्याची नुसती घोषणा करूनच न थांबता त्याच्या उद्घाटनासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आमंत्रणही गेले होते. प्रत्यक्षात, हवे असलेले यंत्र योग्य वेळेत कारखान्यापर्यंत पोचू शकणार नाही असे लक्षात आल्यावर कुरियनांनी रेल्वेखात्याला मदतीसाठी विनंती केली. रेल्वेखात्यानेही कारखान्यापर्यंत खास रूळ बसवले आणि मुंबई गोदीत बोटीने येऊन पडलेले यंत्राचे अजस्र धूड उद्घाटनाच्या केवळ बारा तास आधी कारखान्याच्या दारात नेऊन पोचवले! या उद्घाटनाची कथा कुरियन यांच्याच शब्दात वाचावी अशी आहे. एखादे काम करायला माणसांना योग्य प्रकारे प्रेरित केले आणि सुयोग्य नियोजन केले तर किती मोठे यश मिळवता येते ही गोष्ट हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते.

अमूलमध्ये काम करताना फक्त नफा हा उद्देश कुरियनांनी कधीच ठेवला नाही. उलट अमूलमध्ये दूध जमा करणाऱ्या सर्व कुटुंबाचा आर्थिक विकास, महिलांचे सबलीकरण, ज्या गोवंशाच्या जिवावर हा उद्योग चालतो त्या दुभत्या जनावरांच्या आरोग्याचे रक्षण, त्यांची नियमित तपासणी असे अनेक उपक्रमही त्यांनी राबवले. आणंद हे अमूल चं मुख्यालय आहे. त्याच्या आसपासच्या शेकडो खेड्यांमधल्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास अमूल मुळे साधला गेला. बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी मार्केटिंग तंत्राचा अतिशय कुशल वापर हेही अमूल चं एक वैशिष्ठ्य आहे. याची सुरुवात १९७३ मध्ये झाली. अमूलने दुधाबरोबरच इतर दुग्धजन्य पदार्थ आणि बेबी फूड या वर्गात मोडणाऱ्या वस्तूंचे उत्पादन आणि वितरण करायला सुरुवात केली. तेव्हाच त्यांनी अमूलची जाहिरात करायला सुरुवात केली. अमूलची ती खोडकर मुलगी त्याच वेळी जन्माला आली. अमूलच्या जाहिराती अतिशय कल्पकपणे केलेल्या असतात. गावातल्या प्रमुख रस्त्यावर होर्डिंगमध्ये लावलेल्या अमूलच्या जाहिरातीतले सद्यस्थितीवरचे विनोद हे त्याचं उदाहरण आहे. 'अटरली बटरली डेलिशियस' हे अमूल बटरचं घोषवाक्य या जाहिरातींमुळे सर्वतोमुखी झालं आहे. सहकाराच्या तत्त्वाला मार्केटिंगचं वावडं नसतं तर त्या दोन्ही गोष्टींचा समन्वय अतिशय उपकारक ठरतो हे अमूलने सिद्ध केलं आहे.

अमूल ला मिळालेले यश पाहून इतर राज्यांमधूनही अमूल च्या धर्तीवर दूध उत्पादक संस्था निर्माण करून द्यायची मागणी वाढू लागली. कर्नाटकासारख्या राज्यांमध्ये कुरियनांनी तसे प्रयत्नही केले. पण स्थानिक व्यापारी आणि अडते मंडळी मधल्यामध्ये फायदे मिळवायला चटावलेली असतातच. त्यांचा बीमोड काटेकोरपणे करावा लागतो नाहीतर सगळे प्रयत्न वाया जातात असे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी कुरियन यांच्या मदतीने एन डी डी बी ची (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) स्थापना केली. अमूल सारखे प्रकल्प देशात ठिकठिकाणी उभे करणे, या सर्व प्रकल्पांची साखळी तयार करणे आणि तिच्या माध्यमातून देशातील दुधाच्या मागणीतील तूट भरून काढणे अशी उद्दिष्टे या संस्थेसमोर होती. १९७० ते १९९६ या सव्वीस वर्षांच्या काळात एन डी डी बी ने केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून आज भारत जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश ठरला आहे. डॉ. कुरियन हे एन डी डी बी चे प्रमुख म्हणून थेट पंतप्रधानांच्या हाताखाली काम करत होते. एन डी डी बी चे काम करताना त्यांना सगळ्यात मोठा अडथळा जर कुणाचा झाला असेल तर तो होता अत्यंत अडेलतट्टू आणि निर्लज्ज नोकरशाहीचा. डॉक्टरांची कारकीर्द पाहिल्यावर असं लक्षात येतं, की हा नोकरशाहीशी दिलेला लढा म्हणजे वैयक्तिक स्वार्थ आणि देशाचं कल्याण अशा दोन प्रवृत्तींमधला लढा आहे. वादळात सापडलेल्या एखाद्या जहाजात शिरू पाहणारं समुद्राचं पाणी जसं थांबवता येत नाही आणि क्षणाची उसंतही मिळू देत नाही, तशाच आवेशाने ही नोकरशाही केवळ स्वतःच्याच स्वार्थासाठी झटत असते असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. केवळ भारतातलीच नाही तर भारतीय उपखंडातील इतर देशांच्या कारभारातही कमीअधिक फरकाने हेच चित्र बघायला मिळतं. या प्रकाराला वैतागून कैकवेळा कुरियनांनी आपला राजीनामा तत्कालीन पंतप्रधानांकडे सादर केला होता. सुदैवाने तो मंजूर झाला नाही.

अमूलच्या यशामुळे अमूलसारख्या संस्था स्थापन करायला मदत करावी अशी विनंती भारतीय उपखंडातील इतर देशांनीही करायला सुरुवात केली. एन् डी डी बी चे प्रमुख म्हणून कुरियनांनी या देशांना मदतही केली. पण लाचलुचपतीमुळे पोखरलेली नोकरशाही, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खिशात असलेले मंत्री आणि सर्व सत्ताधाऱ्यांची फक्त स्वतःच्याच तुंबड्या भरायची कळकळ यामुळे हे प्रयत्न वाया गेले. परकीय निर्मितीच्या दूध भुकटीची किंमत देशी बनावटीच्या भुकटीपेक्षा कमी ठेवायचा निर्णय बदलू न शकणारे किंवा एखाद्या बहुराष्टीय कंपनीच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याच मताने कायदे करणारे मंत्री लाभलेल्या आपल्या सख्ख्या शेजारी देशांकडे पाहून वाईट वाटतं. दुसरी अमूल निर्माण होण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सहकाराच्या तत्त्वाचं करावं लागणारं पालन एकूणात लोकांना जड जाणारंच आहे. म्हणूनच आपल्याकडेही अमूल एकमेवच आहे.

अमूलच्या व्यवस्थापनामध्ये सहकाराचा आणि उत्पादक - ग्राहक यांच्या थेट संपर्काचा जो प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला त्याचा लाभ इतर क्षेत्रांनाही मिळावा यासाठी प्रयत्न झाले. सरकारी यंत्रणा आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन अशा स्वरूपाचे हे प्रयत्न होते. कच्छच्या रणात मिठागारांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची दुर्दैवी कहाणी ऐकल्यावर सहकाराचा हा प्रयोग तिथे राबवण्यात आला. पण जे दुधाच्या बाबतीत गोड झालं ते मिठाच्या बाबतीत मात्र कडूच राहिलं. हा प्रयोग दुर्दैवाने यशस्वी होऊ शकला नाही. असाच प्रयोग भाजीपाला उत्पादकांसाठीही केला गेला होता. मदर्स डेअरी या नावाने चार महानगरांमध्ये दुधाचे वितरण करणारी सरकारी व्यवस्था आहे. तिथे भाजीपालाही विकायचा प्रयत्न झाला. तो फार यशस्वी होऊ शकला नाही याचं कारण पुन्हा एकदा भ्रष्ट नोकरशाही हेच होतं. भारतात दुधाइतकीच मागणी आणि तेजी असते ती खाद्यतेलांच्या बाजारपेठेत. खाद्यतेलाच्या व्यापारामध्ये तर अडते आणि व्यापारी लोक कितीतरी पट नफा मधल्यामध्ये गडप करतात. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या 'धारा शुद्ध धारा' या जाहिरातीमधली ही धारा म्हणजे अमूलच्या धर्तीवर खाद्यतेल क्षेत्रात केलेला प्रयोग होता हे वाचल्यावर तर थक्क व्हायला होतं. हा प्रयोग सुरुवातीला यशस्वी झाला खरा पण त्याचे हस्तांतरण झाल्यावर मात्र अडते- व्यापाऱ्यांच्या विषवल्लीने पुन्हा त्यावर आपला ताबा मिळवला आहे.

दूध वितरण क्षेत्राचा विकास होण्यासाठी देशातल्या महानगरांमध्ये व्हेंडिंग मशीन्स बसवणे, त्यांची रचना, निर्मिती आणि ती कार्यक्षम राहावीत याकडे लक्ष ठेवणे अशा अनेक नवनवीन कल्पना कुरियनांनी राबवल्या आहेत ज्यांच्याबद्दल मला फारशी माहितीही नव्हती. पण असे प्रकल्प राबवायला आणि यशस्वी करायला वैयक्तिक स्वार्थाला मुरड घालून कुठेतरी सामाजिक हिताचा विचार व्हायला हवा आणि तो होणं दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललं आहे हेही पुस्तक वाचताना जाणवत राहतं. मागे संजोपरावांनी एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे 'अशा लोकांची पिढी आता लयाला गेली आहे' असं म्हणून शांत बसता मात्र येत नाही. उलट अशी पिढी जर लयाला जात असेल तर ती आपणच वाचवायला हवी नाहीतर भविष्यात अमूलच्या गोष्टी दंतकथा आणि नीतिकथांच्या स्वरूपातच फक्त शिल्लक राहतील असंही वाटायला लागतं.

अर्थात पुस्तक वाचताना एक गोष्ट मात्र खटकते. शाकाहारी गुजराथामध्ये आपल्यासारखा ख्रिश्चन मांसाहारी माणूस इतका सहज सामावला जातो याबद्दल अप्रूप असू शकतं पण त्याचा मुद्दाम उल्लेख केला नसता तरी चालले असते. बाकीच्या स्फूर्तीप्रद लेखनाला उगाचच आत्मप्रौढीची कळेल न कळेलशी छटा प्राप्त झाल्यासारखं वाटायला लागतं. डॉक्टरांनी आपल्या ख्रिश्चनपणाचा उल्लेख दोन तीन वेळा केला आहे. हिंदू संघटनेकडून गोवंशाच्या वृद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख मुद्दाम वेगळा करावासा वाटणेही मला जरासे खटकले. अर्थात हा वैयक्तिक आवडीनिवडींचा भाग झाला. पण हे सोडले तर बाकी पुस्तक विलक्षण प्रभावी झाले आहे. डॉ. कुरियन सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकाराच्या धोरणालाच धाब्यावर बसवणारे निर्णय त्यांनीच प्रशिक्षण दिलेल्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडून घेण्यात आले आहेत यासंबंधीचा उल्लेख पुस्तकाच्या शेवटी पुसटसा आला आहे. या बाबतीत कुरियनांनी थोडं तपशीलवार लिहायला हवं होतं की काय असं एकदा वाटलं. पण मग विचार आला की असं झालं असतं तर पुस्तकाचा सूर कदाचित तक्रारीचा किंवा बचावाचाही होऊ शकला असता. तसा तो झालेला नाही हे एका अर्थी बरंच झालं आहे. तसाही अनुयायांकडून नेत्यांचा पराभव नेहमीच होत असतो. पण या पराभवाने नेत्यांचं स्वप्न कमअस्सल ठरत नाही किंवा तसं ते ठरू नये. डॉ. कुरियनांचं हे आत्मकथन हे प्रामुख्याने त्यांच्या स्वप्नाबद्दल आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्याला पुस्तकात अग्रक्रम मिळालेला आहे.भारतमाता नररत्नांची खाण आहे वगैरे तद्दन छापील वाक्ये वापरायची नाहीत असं म्हटलं तरीसुद्धा अशी कर्तृत्ववान माणसं भारतात जन्माला येतात याबद्दल आपल्या देशाचा अभिमान वाटतोच.

काही वर्षांपूर्वी माझे आजोबा मला म्हणाले होते, समाजकार्य म्हणजे बँकेत पैसे जमा करण्यासारखं आहे. बँकेतून नुसतेच भसाभस पैसे काढणं केव्हाही घातकच असतं. अधूनमधून त्या खात्यावर पैसे जमा करायचंही भान ठेवायला पाहिजे. नाहीतर आपलं संचित लयालाच जाणार ना. आज आपल्याला चाखायला मिळणारी धवलक्रांतीसारखी फळं हे कुणीतरी समाजाच्या बँकेत जमा केलेल्या श्रमांवरचं व्याज आहे. आपली पिढी या ठेवीमध्ये वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न करणार का? की आपणच सगळं मुद्दल संपवून पुढच्या पिढ्यांचे अखंड शिव्याशाप खाणार आहे हा आता मला पडलेला प्रश्न आहे. सध्या तरी आशेला धरून राहावं हे उत्तम.... उद्याचं उद्या पाहू!

--अदिती
(१५ जून २०१०,
ज्येष्ठ शुद्ध ३ शके १९३२)

6 Comments:

Blogger अपर्णा said...

khupach chan mahiti....dhanywad Aditi.

3:22 AM  
Blogger अदिती said...

thanks Aparna!

8:27 AM  
Blogger अभिजीत said...

सुंदर लेख ! माझे आवडते पुस्तक आहे हे.

10:00 AM  
Anonymous Anonymous said...

माझ्या माहितीप्रमाणे अमूल उभी रहाण्यामागे पोलसन बंद पडण्याची शक्यता हे मुख्य कारण होते. तेथील दूध उत्पादकांचे उत्पन्नाचे साधन नष्ट होऊ नये यासाठी अमूल उभी केली गेली. अर्थात् डॉ. कुरियन यांचे कर्तृत्व निर्विवाद आहे. कारण त्यानी बहुराष्ट्रीय कंपन्या विरोधात असूनही अमूल यशस्वी केली.

10:11 PM  
Blogger Vijay Deshmukh said...

For translation, do you need to take the permission of original author or publisher ?

Could you please mail me at
vijay.ghatanjikar@gmail.com

1:03 PM  
Blogger आशिष देशपांडे said...

Sundar Post! Khupach Chaan! Keep it up!

11:14 PM  

Post a Comment

<< Home